Monday, 5 January 2015

प्राजक्त

आज सकाळी WhatsApp वर प्राजक्ताच्या फुलांचे एक सुंदर चित्र मैत्रिणीने पाठवल्यामुळे मन प्रसन्न झाले आणि माझ्या मनांत अगदी नाजूक अशा काही आठवणी उचंबळून आल्या. लहानपणी आमच्या वाड्याच्या परसदारात प्राजक्ताचे झाड होते. देवाच्या पूजेसाठी परडीमध्ये फुले गोळा करून आणायला आमची आजी आम्हा मुलांना सांगायची. त्या वेळीही देवपूजेवर माझा खास विश्वास होता असे नाही, पण प्राजक्ताची फुले गोळा करायला मात्र  आवडायचे. केशरामध्ये थोडेसे दूध घालून कालवल्यानंतर येतो तशा केशरी रंगाचा दांडा आणि केशर घातलेल्या दुधासारख्या किंचितशा पिवळट पांढऱ्या नाजूक पाकळ्या. ते दोन्ही रंग आजही माझ्या मनांत फक्त पवित्र, शुद्ध भाव निर्माण करतात. आमच्या प्राजक्ताच्या झाडाखाली सदैव फुलांचा सडा पडलेला असायचा. एकावेळी आम्ही पाच-सहा भावंडे फुले गोळा करत असलो, तरीही सगळी फुले आम्ही उचलू शकायचो नाही. फुले गोळा करत असताना, काही फुले झाडावरून हलक्या हलक्या गिरक्या घेत माझ्या अंगावर  पडायची आणि त्यांचा तो नाजूक स्पर्श मला रोमांचित करायचा! एकूणच त्या फुलांचा रंग, मंद सुगंध आणि मऊ मुलायम स्पर्श मला फार आवडतो.

अलीकडेच, माझ्या रोजच्या जाण्या-येण्याच्या दोन रस्त्यांवर, अवचितपणे मला प्राजक्ताची झाडे दिसली. रोज सकाळच्या फिरायला जायच्या रस्त्यावर कौन्सिल हॉल पोलिस चौकी आहे. त्या चौकीच्या कोपऱ्यावर, एक दिवस अचानक पुन्हा तोच नाजूक स्पर्श मला जाणवला. वर बघितले तर प्राजक्ताचे झाड आणि खाली फुलांचा सडा. मला ते इतके अनपेक्षित होते की काही विचारू नका. तशीच दुसरी एक जागा म्हणजे माझ्या क्लिनिकच्या जाण्या येण्याच्या रस्त्यावरची. उंच्यापुऱ्या आणि रांगड्या सरदारजींची वस्ती असलेल्या सायकल सोसायटीच्या गेटजवळून चालत असताना अचानकपणे प्राजक्ताच्या फुलांचा मंद सुगंध आला. मी वर बघितले तर तिथेही चक्क प्राजक्ताचे झाड!

नाजूक प्राजक्ताचे झाड, आणि तेही पोलिस चौकी आणि सरदारजींच्या वस्तीच्या कोपऱ्यावर? या विरोधाभासामुळे विचित्र वाटणारी ही गोष्ट जरा बारकाईने विचार केल्यावर मला वेगळीच वाटायला लागली. वरून कठोर वाटणाऱ्या पोलिसांच्या आणि रांगड्या सरदारजींच्या मनाच्या एखाद्या कोपऱ्यात कुठेतरी प्राजक्ताची फुले फुलत असतीलच की!