गुरुवार, १९ एप्रिल, २०१८

टिकली तर टिकली


काही महिन्यांपूर्वीची गोष्ट असेल. मी वॉर्डमध्ये शिरले आणि फर्नांडिस सिस्टर म्हणाल्या," मॅडम आज कपाळावर टिकली का नाही लावलीत?"

मी गोंधळले.  "मी टिकली लावली होती , कुठेतरी पडली असणार" असे पुटपुटत चटकन माझा हात कपाळाकडे गेला. अर्थातच तिथे टिकली नव्हती. त्यामुळे टिकली शोधण्यासाठी मी गडबडीने माझी पर्स धुंडाळू लागले. पर्समध्ये टिकलीचे पाकीट नेहमी असते. पण नेमके त्या दिवशी ते सापडेना, तशी मी थोडीशी ओशाळले. माझ्या चेहऱ्यावरचे भाव फर्नाडिस सिस्टरांनी वाचले असावेत.
"मॅडम थांबा. कदम सिस्टर कडे नेहमी टिकल्यांचे पाकीट असते. मी आणते" असं  म्हणत काही क्षणांतच फर्नांडिस सिस्टरांनी टिकली आणून माझ्या कपाळावर लावली आणि आम्हा दोघींचाही जीव जणू भांड्यात  पडला.


टिकलीचे आणि माझे नाते फार वर्षांचे आहे. माझ्या लहानपणी आई बरेचदा मेण लावून त्यावर पिंजर लावायची. कधीतरी पुढे ती गंधाच्या उभ्या बाटलीतून गंध लावायला लागली आणि नंतर लालभडक मोट्ठी टिकली. अगदी लहानपणी मी पण गंधच लावत होते. पण माझ्या कपाळावर ते उतायला लागल्यामुळे नंतर मी टिकली वापरायला लागले. पण क्वचित कधी गंध फिस्कटले गेले  किंवा टिकली पडली तर आज्जी ओरडायची. सधवा बायकांनी आणि कुमारिकांनी भुंड्या कपाळाने हिंडायचे नाही, असं म्हणायची. कदाचित त्या शिकवणीमुळे असेल किंवा टिकली लावणे सवयीचे झाल्यामुळे असेल, टिकली माझ्या व्यक्तिमत्वाचा एक भागच होऊन गेली.

लग्नानंतर उत्तरभारतात राहण्याचा योग्य आल्यामुळे त्यावेळी नाविन्यपूर्ण वाटणाऱ्या, वेगवेगळया आकाराच्या  आणि कपड्यांना मॅचिंग रंगाच्या टिकल्या वापरायला लागले. पुढे पाश्चात्य वेशभूषा करायाला लागले तरीही माझी टिकली कपाळावर टिकलीच. जीन्स आणि टॉप घालून कपाळावर टिकली लावून आले की माझी मुलं, भाचरंडं चेष्टा करतात. कधी ती टिकली काढ म्हणतात. त्यांच्या आग्रहाला  बळी पडून मी कधीतरी ती काढतेही. पण कपाळावर टिकली असली की मला जरा बरं वाटतं, हे ही तितकंच खरंय.

गेल्या सात आठ वर्षांमध्ये चार-पाच वेळा परदेशात जाण्याचा योग आला. तिथे गेले तरी माझी टिकली कपाळावर असायचीच. अमेरिकेत एका फेलोशिप प्रोग्रॅमला गेले होते त्यावेळी त्या प्रोग्रॅमला आलेल्या अमेरिकन बायकांना माझ्या टिकलीबद्दल कोण कुतूहल होतं. एक दोघींनी तर मला त्यांच्यासमोर टिकली लावायला लावली. त्यांनाही कपाळाला टिकली लाऊन बघायची होती की काय, कुणास ठाऊक. चार वर्षांपूर्वी उझबेकिस्तानला गेलो होतो तेंव्हा तिथल्या काही उझबेक स्त्रियांनी, त्यांच्या अगम्य भाषेत," तुम्ही टिकली का लावता? ती कशी लावायची? सगळ्या भारतीय बायका टिकली लावतात का?  भारतातल्या मुसलमान बायका पण टिकली लावतात का? टिकली लावणे म्हणजे भारतीय संस्कृती का? असे अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडले होते. काही बायकानीं तर माझ्या कडून आणि माझ्या वहिनींकडून मोठया कौतुकाने टिकल्या मागून घेतल्या होत्या.

आमच्या लहानपणी काही सोप्पे ठोकताळे होते. सर्वच हिंदू मुली गंध किंवा टिकली लावायच्या. टिकली किंवा गंध नसलेली मुलगी ही इतर धर्माचीच असायची. आजकाल मात्र तसं काही राहिलेलं नाही. हल्ली हिंदू मुलींनाही टिकली शिवायच बघायची आपल्या डोळ्यांना सवय होऊन गेलीय. माझी मुलगी, भाच्या, पुतण्या कपाळाला टिकली लावतातच असे नाही. मी शिकवते त्या महाविद्यालयांमध्ये जवळ जवळ सगळ्या मुली टिकली न लावताच येतात. मागच्या महिन्यात एक दिवस कॉलेजमध्ये गेले आणि बघते तर काय, सगळ्या मुली अगदी नटलेल्या दिसल्या . जवळजवळ सगळयांच्या कपाळावर टिकल्या, चंद्रकोरी,  हातात बांगड्या, गळयात सोन्या-मोत्याचे हार , साड्या अथवा घागरा-चोळी नेसलेल्या, काही विचारू नका. मी अगदी चकित झाले. शिकवायला सुरुवात करायच्या आधी," आज काही विशेष आहे का?" असे विचारले, तर त्यांचा ' कल्चरल डे' आहे असे कळले. आता आपली संस्कृती सुद्धा फक्त ‘असे 'कल्चरल डे' किंवा 'संस्कृती दिन’ साजरा करण्यापुरती उरली आहे की काय? असाही एक प्रश्न माझ्या मनांत येऊन गेला.

पण काहीही म्हणा, या 'कल्चरल डे' च्या निमित्ताने कितीतरी मुलींच्या कपाळावर टिकली बघितली आणि छान वाटले. आपली संस्कृती टिकेल ना टिकेल देव जाणे, पण निदान या 'कल्चरल डे' च्या निमित्ताने चार मुलींच्या कपाळावर टिकली टिकली तरी मिळवली, असे म्हणायची वेळ आली आहे, नाही का?