शनिवार, ३० ऑक्टोबर, २०२१

२."वाह ताज! वन्स मोर..!"

आमच्या मदुराई-रामेश्वर सहलीच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजे १६ ऑक्टोबरला, मला रोजच्या सवयीप्रमाणे पहाटे लवकर जाग आली. पहाटेचा चहा घेतल्यानंतर, आम्ही राहत असलेल्या ताज ग्रुपच्या "द गेटवे हॉटेल" या रिसॉर्टचा निसर्गरम्य परिसर पायी हिंडून बघण्याचा मोह मला आवरेना. आनंद अजून साखरझोपेत होता. त्यामुळे त्याला न जागे करता, मी एकटीच पायात बूट चढवून खोलीच्या बाहेर पडले. पसुमलाईच्या टेकाडावर, या रिसॉर्टचा त्रेसष्ठ एकर विस्तीर्ण परिसर आहे. 'जे बी कोट्स' या ब्रिटिश  कंपनीची भारतातील शाखा  'मदुरा कोट्स' या सूत निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यासाठी, १८९० साली बांधलेल्या, या भल्यामोठ्या बंगल्याचे रूपांतर, आता लक्झरी रिसॉर्टमध्ये केलेले आहे. स्वातंत्र्यापूर्वी, ब्रिटिश अधिकाऱ्याचे वास्तव्य असलेला मूळ बंगला आजही मोठ्या दिमाखात उभा आहे. त्या काळातल्या धनाढ्य ब्रिटिश लोकांनी भारतामध्ये राहून काय ऐश करून घेतली असेल याची कल्पना अशा वास्तू बघितल्यावर येते. "सूत कारखानदारांच्या त्या बंगल्याचे आणि सभोवतालच्या परिसराचे वैभव बघूनच, 'सुतावरून स्वर्ग गाठणे' ही  म्हण पडली असेल की काय?" असा एक गंमतशीर विचार माझ्या मनात तरळून गेला!

जुन्या वास्तूत, रिसॉर्टच्या चार-सहा  खोल्या आहेत. नव्याने बांधलेल्या पंच्चावन्न-साठ खोल्या, रेस्तराँ व इतर काही इमारती आसपासच्या पाच एकरांवर पसरलेल्या आहेत. आम्ही राहत असलेली खोली जुन्या वास्तूतच होती. त्यामुळे ती खूपच मोठी होती. नजरेने अंदाज घेतला असता, आमची खोली सहजी सहाशे ते सातशे चौरस फुटाची असावी असे दिसत होते. नवीन इमारतीतील इतर खोल्याही  चांगल्या प्रशस्त होत्या. प्रत्येक खोलीच्या आकारमानाला शोभेसे जुने सुंदर फर्निचर, दोन भलेमोठे क्वीन-साईझ पलंग, आणि अटॅचड वेस्टर्न टॉयलेट आणि बाथरूम होते. नवीन खोल्याही जुन्या धाटणीच्या वाटाव्या अशा पद्धतीने बांधलेल्या आहेत. त्यामुळे एकूण सर्व रिसॉर्टला एक 'मॅजेस्टिक लुक' आलेला आहे. रिसॉर्टमध्ये स्विमिंग पूल, जिम, बॅडमिंटन व टेनिस कोर्ट अशा सुविधा आहेत, पण कोव्हिड निर्बंधांमुळे स्विमिंग पूल आणि जिम बंद होते. रिसॉर्टचे रेस्टॉरंट उत्तम होते. सर्व चांगल्या हॉटेल्समध्ये असतात तसे अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ इथे होते. शिवाय, ताज हॉटेल्सच्या पाहुणचारात नेहमीच जाणवणारा 'Tajness', इथल्या कर्मचाऱ्यांची कर्तव्यदक्षता आणि अदबशीर वागण्यामध्ये जाणवत होताच.

हे रिसॉर्ट एका टेकाडावर असल्यामुळे, इथले सगळे रस्ते वळणा-वळणाचे आणि चढ-उताराचे आहेत. त्यामुळे माथेरान किंवा महाबळेश्वरची आठवण झाल्याशिवाय राहिली नाही. इथे दीड-दोनशे वर्षे जुनी, मोठमोठाली वडा-पिंपळाची झाडे आहेत. कित्येक भल्यामोठ्या वडाच्या पारंब्या लांबवर जमिनीत रुतून, त्यापासून नवनवीन वट-वृक्ष उगवलेले आहेत.  संपूर्ण टेकडी हिरव्यागार झाडांनी भरलेली आहे. हे हरित-धन जतन कारण्याचे श्रेय अर्थातच ताज ग्रुपच्या कर्मचाऱ्यांनी ठेवलेल्या निगराणीला आहे. या परिसरात अनेक मोर व इतरही अनेक पक्षी आहेत. मोरांच्या केकावलींमुळे आणि इतर पक्षांच्या मधुर किलबिलाटाने वातावरण संगीतमय झालेले होते. या परिसरात एकूण पन्नास-साठ मोर आहेत. ते सर्व मोर अगदी माणसाळलेले आहेत. काही ठराविक ठिकाणी तिथले मोर मोठ्या डौलात आपल्या हातातून दाणे टिपायला येतात. 

गिरीश-प्राची काही वर्षांपूर्वी माझ्या आई-वडिलांना घेऊन याच रिसॉर्टमध्ये राहून गेलेले होते. त्या वेळी आलेल्या सुखद अनुभवांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी त्यांनी यावेळीही पुन्हा इथेच राहण्याचे ठरवले होते. त्यामुळे आम्हालाही हे स्वर्ग-सुख उपभोगता आले. दादांचे, म्हणजे आमच्या वडिलांचे वय लक्षांत घेऊन, गिरीशने दादांसाठी रेस्टोरंटच्या जास्तीतजास्त जवळची खोली मिळवली होती. रिसॉर्टमध्ये वयस्कर लोकांसाठी व्हीलचेयरचीही सोय होती. विशेष म्हणजे, रिसॉर्टच्या मध्यवर्ती भागांत सगळीकडे व्हील चेअर घेऊन जाता येईल असे रॅम्प्स केलेले होते. त्यामुळे दादांना जरा दमणूक जाणवली की आम्ही त्यांना व्हील चेयरवर बसवून नेत होतो. 

आदल्या दिवशी संध्याकाळी आम्ही रिसॉर्टमध्ये इकडे-तिकडे हिंडत असताना  हॉटेलचा एक कर्मचारी रिसॉर्टबाबतची सर्व माहिती देण्यासाठी आमच्या बरोबर आलेला होता. दुसरा एक कर्मचारी दादांना  व्हील चेअर वरून आमच्यासोबत हिंडवत होता. त्यामुळे दादांनाही रिसॉर्टची आरामदायी सफर मिळाली. मुख्य इमारतीच्या वरच्या मजल्यावरच्या खोल्याकडे बोट दाखवत त्या कर्मचाऱ्याने आम्हाला सांगितले"या खोल्यांमध्ये पंतप्रधान मोदीजी दोन वेळा राहून गेलेले आहेत"त्यामुळे साहजिकचती खोली आपण बघून यावे असे मला वाटले. दुसऱ्या दिवशी पहाटे बाहेर पडल्यावर, मी जरा दबकतच त्या खोलीसमोरील व्हरांड्यात उभी राहून इकडे-तिकडे बघत होते. तेवढ्यात, रूम सर्व्हिससाठी आलेल्या कर्मचाऱ्याने अत्यंत अदबीने मला सांगितले कीसध्या त्या खोलीत आमच्यासारखेच कोणी गेस्ट राहत आहेत. त्यामुळे ती खोली आतून बघण्याची संधी हुकली. पण वरच्या मजल्यावर हिंडून, तिथल्या जुन्या सुंदर फर्निचरचे फोटो माझ्या मोबाईलमध्ये, आणि आणि उंचावरून दिसणारा मदुराई शहराचा नजारा माझ्या मनात मी साठवून ठेवला. 


पक्ष्यांचा किलबिलाट वगळता सर्वत्र असलेल्या पहाटेच्या शांततेत तासभर फेरफटका मारून झाल्यावर, आमच्यापैकी इतर कोणी जागे झाले आहे का, ते पाहण्यासाठी मी आमच्या खोल्यांजवळ गेले. आनंदही फिरायला बाहेर पडला होता. ज्योत्स्ना आसपास हिंडून पक्षीनिरीक्षण करत होती. त्यानंतर हळू-हळू आम्ही सगळेच नाश्त्यासाठी रेस्टॉरंटमध्ये जमा झालो. गप्पा-गोष्टी करत भरपेट नाश्ता केला, आणि तयार व्हायला आपापल्या खोल्यांकडे वळलो. आज  मीनाक्षी मंदिर व मदुराई दर्शनासाठी आम्ही  जाणार होतो. 

तयार होऊन मी खोलीबाहेर पडले आणि नेमका त्याच वेळी मला असिलताचा, म्हणजे आमच्या ऑस्ट्रेलियास्थित मुलीचा फोन आला. आमच्या रिसॉर्टचे भरभरून वर्णन करून मी तिला सांगितले. माझ्या लहानग्या नातीला, नूरला, इकडे-तिकडे नाचणारे मोर व्हिडिओकॉलवर दाखवले. शिरीषने तर मोरांच्या मागे-मागे जाऊन, अगदी दूरवर हिंडून, नूरला मोर आणि लांडोरीही दाखवल्या. मग ज्योत्स्नानेही इलिना आणि अनया, या तिच्या सिंगापूरस्थित नातींना व्हिडीओकॉलवर मोर दाखवून खूष केले. नूरने यापूर्वी कधीच मोर बघितलेला नव्हता किंवा त्यांची केकावलीही ऐकलेली नव्हती. मोर बघून ती भलतीच आनंदित झाली. आमच्या नातींच्या चेहऱ्यावरचे भाव बघून आम्ही ठरवूनच टाकले की, नातवंडांना घेऊन या रिसॉर्टमध्ये परत यायचे आणि त्यांना मोर दाखवायचे. हा विचार पक्का होताच, मी मनातल्या मनातच पुटपुटले, "वाह ताज! वन्स मोर..!"


(क्रमशः)

शुक्रवार, २९ ऑक्टोबर, २०२१

१. सीमोल्लंघन !

माझे वडील, सोलापूरचे श्री. श्रीकृष्ण गोडबोले वकील, यांना नुकतीच ८८ वर्षे पूर्ण झाली. ते खूप हौशी असल्याने, दरवर्षी कोर्टाच्या प्रत्येक मोठ्या सुट्टीमध्ये लांबलांबच्या सहली आखत असत. जवळजवळ ५७ वर्षांपूर्वी, १९६४ सालच्या नाताळच्या सुट्टीत, सोलापुरातील काही वकिलांबरोबर त्यांनी दक्षिण भारताची सहल काढली होती. त्या सहलीदरम्यान, तामिळनाडूमधील शेणकोटा नावाच्या स्थानकावर त्यांची बोगी, शेणकोटा-रामेश्वर पॅसेंजर गाडीला जोडण्यात येणार होती. परंतु ऐनवेळी तेथील स्टेशन मास्तरांनी त्यांची बोगी गाडीला न जोडता, त्याऐवजी, काही गुजराथी व्यापाऱ्यांची बोगी त्या गाडीला जोडून टाकली. व्यापाऱ्यांकडून थोडी 'वरकमाई' करून घेऊन त्याने तसे केले असावे, अशी माझ्या वडिलांची व त्यांच्या मित्रमंडळींची जवळजवळ खात्रीच झाली होती. सात्विक संतापापोटी सर्व वकिलांनी त्या स्टेशन मास्तरला घेरले आणि त्याच्यावर भरपूर तोंडसुख घेतले. पण तोपर्यंत रामेश्वरची गाडी निघून गेल्याने त्यांचा नाईलाज झाला. 

कालांतराने समजलेल्या बातमीमुळे मात्र सोलापूरच्या त्या सर्व वकील मंडळींना कळेना की, त्या स्टेशन मास्तराचे आभार कसे मानावे. ज्या दिवशी त्यांचा रामेश्वर प्रवास हुकला होता त्याच रात्री, एका अभूतपूर्व चक्रीवादळाने त्या सर्व परिसराला झोडपले होते. रामेश्वर बेटाला भारताच्या किनारपट्टीसोबत जोडणारा पंबन रेल्वे पूल त्या वादळाच्या तडाख्यामुळे कोसळला होता. त्याच वेळी त्या पुलावरून धावत असलेली शेणकोटा-रामेश्वर पॅसेंजर गाडीदेखील समुद्रात कोसळून त्यातील सर्व १५४ प्रवासी ठार झाले होते!

त्या स्टेशनमास्तरच्या 'कृपे'ने माझ्या वडिलांचे रामेश्वर दर्शन जरी चुकले असले, तरी त्यांचा जीव मात्र वाचला होता. १९६४ सालच्या त्या घटनेनंतर माझ्या वडिलांनी अनेक सहली आखल्या, पण रामेश्वरला जाण्याचा त्यांचा योग मात्र पुन्हा कधीच जुळून आला नव्हता. 

तीन वर्षांपूर्वी दिवाळीत, माझ्या आई-वडिलांना रामेश्वरला घेऊन जावे असे आम्ही ठरवत होतो. पण त्याच सुमारास आई आजारी पडल्यामुळे आमचे जाणे रहित झाले. त्यानंतर माझी आई वरचेवर आजारीच होती व शेवटी गेल्या वर्षी ३० एप्रिलला ती वारली. त्याच काळात सर्वत्र लॉकडाऊनही झालेला असल्याने कोणताच प्रवास करणे अशक्य होते. वडिलांची रामेश्वर दर्शनाची इच्छा आहे हे आम्हाला कळत होते. त्यामुळे, कोव्हिडचे निर्बंध जरासे शिथिल झाल्या-झाल्या आम्ही वडिलांसोबत रामेश्वर दर्शनाचा बेत आखला. माझे वडील, मी व माझा नवरा आनंद, तसेच माझा धाकटा भाऊ गिरीश, भावजय प्राची, आणि त्यांचा मुलगा देवाशिष, असे सगळे या सहलीला जाणार होतो. गिरीशने नेहमीच्या उत्साहात मुंबई मदुराई जाण्या-येण्याची विमान तिकिटे, आणि हॉटेल्सची बुकिंग तातडीने करून टाकली.

दसऱ्याच्या आदल्या दिवशी पुण्याहून मुंबईला जाऊन गिरीशकडे मुक्काम करायचा, दसऱ्याच्या दिवशी, १५ ऑक्टोबरला मुंबईहून विमानाने निघून मदुराईला उतरायचे, आणि विमानतळावरूनच टॅक्सीने निघून तडक रामेश्वर गाठायचे, आणि १५ व १६ ऑक्टोबर रामेश्वर दर्शन करून मदुराईला यायचे असे ठरले. १७-१८ तारखेला मदुराईत हिंडून आणि मीनाक्षी-दर्शन करून १९ तारखेला दुपारपर्यंत मुंबईत परतायचे असा एकूण बेत होता. त्यानंतर, माझा चुलतभाऊ, म्हणजेच व्यवसायाने बिल्डर असलेला शिरीष, आणि चुलतबहीण डॉ. ज्योत्स्ना यांनाही आमच्याबरोबर यायचा आग्रह आम्ही केला. ज्योत्स्ना आनंदाने तयार झाली. शिरीष मात्र आढेवेढे घेत होता. एकदा गमतीने तो असेही म्हणाला, "रामेश्वरला जाण्याइतके काही माझे वय अजून झालेले नाही." मग मीही त्याला चेष्टेखोरपणे म्हणाले, "अरे आमची ट्रीप स्पॉन्सर करायला आम्हाला तुझ्यासारखी 'बडी मछली' पाहिजेच आहे!" बराच आग्रह केल्यानंतर शिरीष आमच्याबरोबर यायला राजी झाला. त्यानंतर त्या दोघांची विमान तिकिटे काढली व हॉटेलचे जास्तीच्या खोल्यांचे बुकिंगही करून टाकले. 

माझे वडील, मी, आनंद, ज्योत्स्ना, आणि शिरीष असे सर्वजण १४ ऑक्टोबरला संध्याकाळी पुण्याहून निघालो. शिरीषच्या मोठ्या 'पाजेरो' गाडीतून अगदी अलगद प्रवास झाला. पुणे-मुंबई 'एक्सप्रेस वे' वर नवीनच झालेल्या फूड मॉल मध्ये मस्त खादाडीही झाली. 

१४ ऑक्टोबरला सकाळीच आम्हाला समजले होते की, तामिळनाडू सरकारच्या नियमावलीनुसार, रामेश्वर मंदिर फक्त सोमवार ते गुरुवार असे चारच दिवस दर्शनासाठी खुले असणार होते. ठरलेल्या बेताप्रमाणे आम्ही १५ तारखेला म्हणजे गुरुवारी संध्याकाळी उशिरा रामेश्वरला पोहोचणार होतो. ही नवीन माहिती कळल्यानंतर आम्ही आमचा बेत बदलला आणि १५-१६ ऑक्टोबर मदुराईतच मुक्काम करून, १७-१८ ऑक्टोबर रामेश्वर करायचे असे आम्ही ठरवले. निदान सोमवारी, म्हणजे १८ तारखेला तरी रामेश्वर दर्शन होऊ शकेल, या कल्पनेने आम्हाला जरा हायसे वाटले. 

देवशिषने तत्परतेने हॉटेलची बुकिंग्स बदलून घेतली. बदललेल्या प्लॅनप्रमाणे, १५-१६ ऑक्टोबर मदुराईमधील पर्यटन स्थळे पाहायची आणि मीनाक्षी दर्शन करायचे असे ठरले होते. पण १४ ऑक्टोबरला संध्याकाळी आम्हाला आणखी एक धक्कादायक बातमी मिळाली. तामिळनाडूमधील सगळीच मंदिरे शुक्रवार ते रविवार बंद असणार होती. इतक्या दूरचा प्रवास करून मदुराईचे सुप्रसिद्ध मीनाक्षी मंदिर पाहता येणार नाही याचे आम्हाला सर्वांनाच फार वाईट वाटले. "मीनाक्षी-दर्शन नाही तर नाही, रामेश्वर-दर्शन तर होणारच आहे. शुक्रवार-शनिवार मदुराईच्या रिसॉर्ट मध्ये पत्ते खेळू, गप्पा मारू, आणि आराम करू" अशी आम्ही आमच्या मनाची समजूत घातली. 

वृद्ध वडिलांना इतक्या दूर घेऊन जात असल्याने त्यांना काही त्रास न होता आमची सहल निर्विघ्न पार पडावी अशी आमची इच्छा होती. त्यासाठी आम्ही सर्व माहितगारांकडून मदुराई व रामेश्वरची माहिती घेण्याचा प्रयत्न करीत होतो. माझ्या एका बालरुग्णाचे वडील, श्री श्याम, सौ. गीता नावाची माझी मैत्रीण, आणि कर्नल रामकृष्ण व कर्नल गणपती नावाच्या आनंदच्या दोन मित्रांची या बाबतीत खूपच मदत झाली. श्री. श्याम यांनी तर मदुराईच्या श्री. गणेश नावाच्या त्यांच्या एका मित्राशी माझे बोलणेच करून दिले. श्री. गणेश म्हणाले की, "सध्या राज्यातील सगळी मंदिरे शुक्रवार ते रविवार बंद असली तरी इतर धर्मीयांच्या प्रार्थनास्थळांवरचे निर्बंध कधीचेच उठवले आहेत. त्यामुळे हिंदू देवळावरचे निर्बंधही उठवण्यासाठी हिंदू भाविक तामिळनाडू सरकारवर दबाव आणत आहेत." एक-दोन दिवसातच हे निर्बंध उठवले जाण्याची शक्यता त्यांनी बोलून दाखवली. 

१५ तारखेला आम्ही विमानात बसण्यापूर्वीच श्री. गणेश यांनी आम्हाला आनंदाची बातमी दिली की, तामिळनाडू सरकारने सर्व मंदिरे दर्शनासाठी संपूर्णपणे खुली केली आहेत. दसऱ्याच्या मुहूर्तावर आम्ही महाराष्ट्र राज्याचे सीमोल्लंघन केले. आमच्या तिकिटावर विमानातील खाद्यपदार्थ फुकट मिळू शकणार असल्याची सुवार्ता इंडिगो च्या हवाई सुंदरीने आम्हाला दिली. घरून नाश्ता करून निघालेलो असलो तरीही विमानातील सुकामेवा, चिकन नूडल्स आणि वाफाळती कॉफी अशा सर्व गोष्टींचा आस्वाद आम्ही घेतला. अतिशय सुखद असा विमान प्रवास झाल्यावर मदुराई एअरपोर्टच्या बाहेर टॅक्सीची वाट बघत उभे असताना, तेथील हवेचा दमटपणा आणि उन्हाचा तडाखा आम्हाला अधिकच जाणवला. दोन टॅक्सी करून, एअरपोर्टपासून बऱ्याच अंतरावर असलेल्या, ताज ग्रुपच्या "द गेटवे हॉटेल" नावाच्या रिसॉर्टमध्ये आम्ही पोहोचलो. पसुमलाई नावाच्या टेकाडावर वसलेल्या त्या रिसॉर्टमध्ये  पोहोचेपर्यंत दुपारचे दोन-सव्वा दोन वाजले होते. सर्वांनाच प्रवासाचा शीण जाणवायला लागला होता. हिरवीगार वनराई, पक्ष्यांची किलबिल, धिटाईने इतस्ततः हिंडणारे अनेक मोर, आणि तेथील प्रशस्त वातानुकूलित खोल्यातील उबदार पलंग, असे सर्व निवांत वातावरण पाहताच, उरलेला दिवस आरामात लोळून काढण्याबाबत सगळ्यांचे एकमत झाले. 


थोड्या विश्रांतीनंतर आम्ही त्या रिसॉर्टचा परिसर हिंडून बघितला. तिथल्या माणसाळलेल्या मोरांना आपल्या हाताने खाणे भरवायला फारच मजा येत होती. इकडे-तिकडे हिंडून आम्ही बरेच फोटो आणि व्हिडिओ काढले. संध्याकाळच्या चहानंतर, एकीकडे आय. पी. एल. ची फायनल मॅच बघत, तास दोन तास रमी खेळलो. रात्रीचे जेवण झाल्यावर मात्र सगळ्यांच्याच डोळ्यावर निद्रादेवीने आपले उबदार पांघरूण घातले. 

(क्रमशः)