सोमवार, १६ मार्च, २०१५

शब्दसंपदा

काही दिवसापूर्वी टीव्हीवर दाखवल्या गेलेल्या 'पारंपारिक' खाद्यपदार्थांबद्दल मनात आलेले विचार मी लिहिले होते. त्यावर अनेकांनी आपापल्या प्रतिक्रिया कळवल्या. आपल्या खाद्यसंस्कृतीची पारंपारिकता आपण जपली पाहिजे असा सूर त्यात होताच. पाश्चात्य संस्कृतीचा आपल्या खाद्यसंस्कृतीवर चाललेल्या आक्रमणाचा निषेध काहींनी केला होता.
कुणाकुणाच्या हातचे साजूक लाडू आठवून मन भरून आले असेही मी लिहिले होते. परंतु, हे लिहिताना कुणा एखादीच्याच हातचे लाडू विशेष चांगले होतात असे मला म्हणायचे नव्हते. पण नात्यातल्या काही बायका आणि मैत्रिणींचा उल्लेख राहून गेला. त्यांच्या हातच्या साजूक लाडवांना मी न जागल्यामुळे त्यांच्याकडून थोड्याशा तुटक प्रतिक्रियाही आल्या! मला लाडू पाठवण्याची, त्यांनी आजवर जपलेली परंपरा बंद होऊ नये या भीतीपोटी मी त्वरित त्यांची माफी मागून टाकली.

माझी तरुण मैत्रीण संपदा हिने, मी लिहिलेले मनोगत आवडल्याचे आवर्जून कळवले. तसेच, "तो शब्द 'पारंपारिक' असा आहे का 'पारंपरिक' आहे याची खातरजमा करून घ्यावी", अशी एक नम्र सूचनाही केली. तो शब्द वापरण्याच्या 'पारंपारिक' मानसिकतेतून माझे मन काही केल्या बाहेर पडत नव्हते. त्यामुळे  मी तिच्या प्रतिक्रियेवर लगेच आणि फार खोलात जाऊन विचार केला नाही. तरीही, "आपले काही चुकले तर नाही ना?" ही  बोच मनांत कुठेतरी होतीच.
मराठी भाषेवर विशेष प्रभुत्व असलेल्या माझ्या नणंदेला, अरुणाताईंना हळूच मी या शब्दाबद्दलची शंका विचारून घेतली. त्या म्हणाल्या, "हा शब्द 'पारंपारिक' असा नसून 'पारंपरिक' असा आहे."

'पारंपरिक' खाद्यसंस्कृती जपताना 'पारंपरिक' भाषा संस्कृतीदेखील जतन करून आपली शब्दसंपदा वाढवण्याची परंपरा चालू ठेवली पाहिजे हे खरे !