रविवार, ६ ऑक्टोबर, २०१९

दुर्गा अष्टमीचे कुमारिकाप्रबोधन

आमच्या इमारतीत आम्ही दुसऱ्या मजल्यावर राहतो. आज दुपारी, एक मजला उतरून खाली गेले तोवर जिना अगदी स्वच्छ होता. पण पहिल्या मजल्यावरून इमारतीतून बाहेर पडेपर्यंत जिन्यावर व इतरत्र सगळीकडे खाद्य पदार्थांची वेष्टने आणि थोडी बिस्किटे, वेफर्स पडलेले दिसले. खाद्यपदार्थांची अशी नासाडी झालेली पाहून मला वाईट वाटले. जिना उतरून खाली आले आणि हे असे का झाले आहे,  याचा उलगडा मला झाला.

करपार्कच्या जवळच एक रिक्षा उभी होती. साधारण सहा ते दहा वयोगटातील आठ-नऊ  मुली, कलकल करत रिक्षात बसलेल्या होत्या. त्या मुली कुठल्याश्या झोपडपट्टीतून आल्या असाव्यात असे वाटत होते. त्यांच्याबरोबर, त्यांना घेऊन आलेली, मोलकरीण वाटावी अशी एक बाई होती. ती बाई आणि त्या रिक्षाचा चालक रिक्षाजवळच उभे राहून गप्पा छाटत होते. त्या सर्व मुलींच्या कपाळावर कुंकवाचे मोठ्ठे टिळे लावलेले होते. अनेक भाविक स्त्रिया दुर्गाष्टमीला कुमारिकापूजन करतात. आमच्या इमारतीमध्येच कोणाकडे तरी कुमारिकापूजनासाठी, या मुली आलेल्या असणार, हे माझ्या लक्षात आले. रिक्षाशेजारी उभ्या असलेल्या त्या बाईला विचारून मी त्याबाबत खात्रीही करून घेतली.

त्या मुली रिक्षात बसून दंगा घालत होत्या. भसाभसा हातातली पाकिटे फोडत होत्या. एखादे बिस्किट खाऊन बघत होत्या. चव आवडली नाही की उरलेली बिस्किटे, बाहेर फेकून देत होत्या. रिक्षात बसलेल्या कुणा इतर मुलीचा धक्का लागून एखादीच्या हातातले पाकीटही रस्त्यावर सांडत होते. मी रिक्षा जवळ गेले. त्या बाईंना सांगून त्या मुलींना रस्त्यावर आणि जिन्यावर पडलेले खाद्यपदार्थ उचलून कचऱ्याच्या पेटीत टाकायला लावले.

"अन्नाची अशी नासाडी करू नका. तुम्हाला खायचे आहे  तेव्हडे आत्ता खा. बाकीचे घरी न्या आणि नंतर खा . तुम्हाला खायचे नसेल तर ते इतर कोणाला तरी द्या. ते अन्न आहे, कोणाच्या तरी पोटात जाऊ द्या, पण  फेकू नका. रिकामी पाकिटे इकडे-तिकडे टाकून, सगळीकडे घाण करू नका." हेही त्या मुलींना मी अत्यंत पोटतिडिकीने सांगितले.

कुमारिका हे देवीचे रूप समजले जाते. अष्टमीला कुमारिकापूजन केल्याने मोठे पुण्य मिळते, असा समज आहे.
पण अन्न वाया घालवल्याने मोठे पाप लागते, असेही मानले जाते. यजमानीणबाईंना आज कुमारिकापूजनाचे पुण्य लाभले असेलही. तसेच, त्या कुमारिकांचे थोडे प्रबोधन केल्याचे पुण्यकर्म माझ्याही हातून घडले, हेही नसे थोडके.
नाही का ?