रविवार, १४ डिसेंबर, २०१४

पळा पळा, कोण पुढे पळे तो …

आज सकाळी दै. 'सकाळ' मध्ये एक मोठी जाहिरात वाचली. दोन ते सहा वयोगटातील मुलांच्यासाठी आयोजित केलेल्या "Kids Marathon" बद्दलची. एक बालरोगतज्ञ व समुपदेशक, सुजाण नागरिक आणि एकंदरीतच बालकांची हितचिंतक असल्याने माझी तळपायाची आग तडक मस्तकालाच गेली.

'Little Millenium' या नावाच्या शाळा चालविणाऱ्या 'Educomp' या संस्थेने आयोजित केलेली ही Marathon, 'लहान मुलांच्या लैंगिक शोषणाविरुद्ध' आहे, असे जाहिरातीत म्हटले होते. या Marathonला 'सकाळ टाईम्स' चा पाठिंबा असून 'अमानोरा पार्क टाऊन' ने त्यासाठी जागा उपलब्ध करून दिलेली आहे असेही या जाहिरातीत नमूद केलेले होते. 

लहान मुलांच्या सर्व समस्यांमध्ये 'बाललैंगिक शोषण' ही समस्या महत्वाची होती, आहे आणि पुढेही राहणार, यात शंका नाही. 'माहितीयुगा'च्या महतीने, अनेक वर्तमानपत्रांमधून आणि वाहिन्यांवर वरचेवर बाललैंगिक शोषणाच्या बातम्या झळकल्यामुळे,  हा एक 'ज्वलंत' प्रश्न आहे हे जनतेला अधिकाधिक जाणवू लागले आहे. लैंगिक शोषणाविरुद्ध जनजागृती आवश्यकच आहे. परंतु, बाललैंगिक शोषणाच्या समस्येविरुद्ध योजनाबद्ध लढा द्यायचा असेल तर लहान मुलांचे, त्यांच्या पालकांचे आणि शिक्षकांचे योग्य प्रबोधन सातत्याने होत राहणे आवश्यक आहे. तशी प्रबोधनपर व्याख्याने शाळा-शाळातून मी देत असते तसेच इतर बरेच डॉक्टर्स व समुपदेशकही देत असतात.

मला असा प्रश्न पडला की, "लहान मुलांच्या लैंगिक शोषणाविरुद्ध Marathon" असे,  सर्वसामान्यांच्या मनाला भिडेलसे कारण पुढे करून, दोन ते सहा वयोगटातील मुलांना पळायला लावण्यात ही संस्था काय साध्य करू पाहत असेल? यातून ना कुणाचे प्रबोधन होणार आहे ना शोषण करणाऱ्या व्यक्तींना आळा बसणार आहे. योग्य कारणासाठी घडवून आणली जाणारी ही एक अयोग्य कृती आहे आणि यात मोठा दिखाऊपणा आहे असे मला वाटले . 

या संस्थेच्या संकेतस्थळावरची माहिती वाचताच एक गोष्ट प्रकर्षाने माझ्या लक्षात आली. दोन ते सहा याच वयोगटातील मुलांसाठी उत्तर भारतातील अनेक शहरांमध्ये ही संस्था Little Millenium नावाच्या शाळा चालवते. अशी Little Millenium शाळा अजूनपर्यंत पुण्यात चालू झालेली नाही. मुलांच्या समस्यांमध्ये अग्रेसर असलेल्या एका ज्वलंत प्रश्नाचे कारण पुढे करून, मोठ्या खुबीने, जाहिरातबाजी करण्यासाठी लहान मुलांचाच वापर ही संस्था करू पाहत आहे. 
स्वतःच्या आर्थिक प्रगतीसाठी चाललेली या संस्थेची 'Marathon' दौड कोण आणि कशी थांबवणार?  

शनिवार, १३ डिसेंबर, २०१४

मातृभाषा

वीस ते तीस वयोगटातल्या, ज्यांची मातृभाषा मराठी आहे अशा अनेक आया, रोज आपापल्या बाळांना घेऊन माझ्याकडे येत असतात . माझ्या कानावर पडणारे त्यांचे बोलणे साधारणपणे हे असे असते:-
"डॉक्टर माझ्या बेबीला मी न्युट्रीशियस असं काय काय खायला देऊ?"
"डॉक बाळाला स्किन ट्रबल होणार नाही असं काहीतरी लोशन प्रिस्क्राइब करा ना, प्लीज"  किंवा 
"डॉक्टर, आज मॉर्निंगपासून त्याने चार वेळा वोमिटिंग केली आणि त्याच्या  लेग्जना स्वेलिंग आलय"
अशा मातांच्या मुलांची मातृभाषा नेमकी कुठली? 
उद्या या मुलांनी मातृभाषेत बोलावे असा आग्रह आपण धरला, तर ही मुले जी भाषा बोलतील, त्या भाषेला आपण कुठली भाषा म्हणणार? 

मंगळवार, ९ डिसेंबर, २०१४

Misfits

वरकरणी अगदी चटपटीत दिसणारी, पण शाळेच्या अभ्यासात खूप मागे पडलेली मुले बघितली की त्यांना कशी आणि  काय मदत करावी हे कळत नाही .  ही मुले कुठल्याच "diagnosis" मध्ये बसत नाहीत . ती मतीमंद नसतात, गतिंमंदही नसतात . त्याना LD म्हणता येत नाही , त्याना काही Metabolic, Physical किंवा chromosomal disability नसते . अशी ही बिचारी मुले एका शाळेतून दुसऱ्या शाळेत, एका बालरोगतज्ञा कडून दुसऱ्या बालरोगतज्ञाकडे आणि एका मानसशात्रज्ञा कडून दुसऱ्या मानसशात्रज्ञाकडे ढकलली जातात.  या सर्व प्रकारात वेळ जातो. त्या काळांत, शिक्षक या मुलांच्या मनाला लागेल असे खूप काही बोलत राहतात किवा शिक्षा देत राहतात. शाळेत आणि इतरत्रही बरोबरची मुले त्याना सतत चिडवतात आणि मग ही मुले कोमेजून जातात .  त्यातून एकदा का पालकांच्या मनात या मुलांबद्दल नकारात्मक भावना निर्माण झाली की  मग तर सगळंच बिघडतं. या मुलांच्या मनातली शिक्षणाबद्द्लची ओढच कमी होऊन जाते .  मुळांत आपल्या शिक्षण पद्धतीत अशा मुलांसाठी काही सोयच नाही , याचा फार त्रास होतो. अशा मुलांच्या मनाचा विचार करून त्यांच्या मनाला उभारी देऊन त्याना शिकवणे शक्य आहे. पण अशी मुलांची मने सांभाळणारे  शिक्षक आणायचे कुठून?   

रविवार, ७ डिसेंबर, २०१४

चुकीलाच क्रेडीट!

मागच्या महिन्याचे क्रेडीट कार्डचे बिल online भरताना माझ्याकडून काहीतरी चूक झाली . आता आर्थिक भुर्दंड पडणार हे निश्चित. पण आता तो पडणारच आहे तर एक विचार मनात येतो आहे. असा काही भरभक्कम दंड एकदा भरला की ते माझ्या मनाला लागणार आणि मग अशा चुका वरचेवर होऊ नयेत यासाठी मी जागरूक राहीन !

शनिवार, ६ डिसेंबर, २०१४

त्रासदायक भक्ती

शिखांच्या धार्मिक वस्तू विकणाऱ्यांच्या दोन टपऱ्या गेल्या काही दिवसांपासून माझ्या क्लिनिकच्या समोरच्या रस्त्यावर अनधिकृतरीत्या लागल्या आहेत. त्याच्या बरोबर समोर, पाच-सहा वर्षांपासून, एक असेच अनधिकृतपणे बांधलेले छोटेसे दत्ताचे देऊळ होते. त्या देवळाचा 'जीर्णोद्धार' नुकताच झाला. आज दत्तजयंतीचा मुहूर्त साधून मूर्तीची पुनर्स्थापनादेखील झाली. हे देऊळ तसे काही वर्षांपूर्वीच बांधलेले होते आणि काही पडझड वगैरेही झालेली नव्हती. तरीही त्याचा जीर्णोद्धार करावा असे कुणाच्यातरी मनात का आले असावे? बरं, देवळाचा जीर्णोद्धारही कदाचित अनधिकृतपणेच झाला असावा! भक्तांची  हीSS भलीमोठ्ठी रांग लागली होती दर्शनासाठी. शेजारी मंडप, लाऊडस्पीकरवर गाणी आणि प्रसादाचे जेवणही होतेच. रस्त्यावर गर्दी, वाहतुकीची कोंडी हे सर्व त्याबरोबर आलेच. अनधिकृतपणे रस्त्यावर दुकान उभे राहत असताना, देऊळ बांधताना अथवा त्याचा जीर्णोद्धार होताना, किंवा एकूणच अशा सर्व अनधिकृत कारवाया प्रशासनाच्या लक्षांत का येत नाहीत? या सगळ्या गोष्टी मलाच इतक्या त्रासदायक का वाटतात?

गुरुवार, ४ सप्टेंबर, २०१४

आमची सखी

दोन दिवसांपूर्वी आमची चौदा वर्षांची सखी गेली. सखी म्हणजे आमची लाल रंगाची माटीझ गाडी बर का! तशी ती आमची तिसरी गाडी. आज नवीन गाडी (चौथी) आली सुद्धा. पण आमच्या लाल गाडीच्या आठवणी मनांत उसळून येताहेत. खरंतर गेली चार-पाच वर्षे ही गाडी विकून नवी गाडी घेऊया असा विचार चालू होता. पण गाडी विकायला आमचे मन काही केल्या उचल घेत नव्हते.

बरं, गाडी न विकण्यामागे,  प्रत्येकाची वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळी कारणे होती. गाडीबद्दलची भावनिक ओढ हे एक कारण होतेच. आत्तापर्यंत आमच्या या गाडीने आम्हाला मुळीच त्रास दिलेला नव्हता. कधी दुरुस्तीसाठी मोठा खर्चही आलेला नव्हता. या दोन्ही कारणांमुळे  मला आणि आनंदला आमची ही सखी विकूच नये असे वाटायचे. एकदा गाडी विकायचा विषय निघाल्यावर अनिरुद्ध खूपच  भावूक झाला. त्याच्या डोळ्यात पाणीच  येईल की  काय असे वाटले. मग तो विषय पुढे सरकलाच नाही. 

पण माटीझ गाडी बनवणारी "देवू" ही कंपनीच बंद पडलेली असल्यामुळे गाडी बाहेरगावी घेऊन जायला हल्ली जरा भीतीच वाटायची. गाडी कुठे बंद वगैरे पडली आणि एखादा सुटा भाग ऐनवेळेला मिळाला नाही तर पंचाईत व्हायची या विचाराने आम्ही गाडी लांबच्या प्रवासाला नेत नव्हतो. आपल्या स्वत:च्या गाडीतून बाहेरगावाला जाता येत नाही म्हणून मग नवी गाडी घ्यायचा विचार सुरु झाला. लाल माटीझ गाडी विकण्याबद्दलही  सर्वांच्याच मनाची तयारी झाली होती. पण प्रत्यक्षात गाडी जायच्या दिवशी आम्ही सगळेच बेचैन झालो. अनिरुद्धने गाडीबरोबर सर्वांचे फोटो काढले आणि जड मनाने आम्ही आमच्या चौदा वर्षांच्या सखीला निरोप दिला.

निदान अनिरुद्ध पुण्यात असताना त्याच्या समोर  आपली नवी गाडी यावी, ही माझी इच्छा तरी पूर्ण झाली, हेही नसे थोडके! पण याप्रसंगी आमच्या तीनही गाड्याबद्दलची माझ्या मनांतल्या विचारांची गाडी सुरु झालीय आणि ती गाडी ब्लॉग वर उतरवल्याशिवाय मला चैन पडणार नाही. 



रविवार, ३१ ऑगस्ट, २०१४

आमचा विनूकाका



गिरीशने आज सकाळी फोनवर विनायक काकाच्या मृत्यूची दुःखद बातमी दिली.गेला महिनाभर विनूकाका खूपच आजारी होता, मृत्यूशी झुंजच देत होता म्हणा ना. नानावटी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागांत तो बेशुद्धावस्थेत होता. म्हणजे तसा आपल्यांत नव्हताच म्हणायचे. पण जोपर्यंत डॉक्टर एखाद्या व्यक्तीला मृत घोषित करीत नाहीत तोवर ती व्यक्ती अजून आपल्यांत आहे, असेच आपण समजत असतो, नाही का?

गेल्या महिन्यात १३ जुलैला,  असिलताच्या लग्नानिमित्त योजलेल्या स्वागत समारंभाला विनूकाका आवर्जून आला होता. तीच त्याची आणि माझी शेवटची भेट. नेहमीसारखाच प्रसन्न, उत्साही आणि आनंदी दिसत होता. साधेच पण टापटिपीचे राहणीमान, तेल लावून बसवलेले केस आणि किंचितसे हसत बोलणे. त्याचे बोलणे आणि वागणे अगदी प्रेमळ आणि सच्चे असायचे. त्या कार्यक्रमाच्या दिवशी अगदी सकाळी लवकर आला होता. सगळ्यांशी मनमोकळेपणाने आणि हास्यविनोद करत बोलत होता. कार्यक्रमांत बरेच नातेवाईक भेटल्यामुळे त्याला मनापासून आनंद झाला होता. "स्वाती मी तुमच्याबरोबर जेवायला थांबलो नाही तर चालेल का? मला डायबेटीस आहे, मी जरा लवकर, माझ्या ठराविक वेळेवर जेऊन घेऊ का?" त्याने हे मला विचारायची खरंतर काय गरज होती? पण तसाच होता तो. आपल्या वागण्या बोलण्याने कोणीही दुखावले जाणार नाही याची काळजी घेणारा!

विनूकाका कितीदातरी आम्हा दोघांना आवर्जून फोन करायचा. आम्हालाच फोन करायला जमायचे नाही याची लाज वाटायची. पण आमच्याकडून उलटा फोन करायचा राहून गेला तरी कधीही रागवायचा नाही. कुणाच्याही यशाचे मनापासून आणि भरभरून  कौतुक करायचा. सर्व नातेवाईकांच्या सुख-दु:खांत अगदी निरपेक्षपणे सहभागी व्हायची त्याची वृत्ती. पण स्वत:ची दु;खे कधीही कोणाला सांगत बसायचा नाही की त्यावर रडत-कुढत बसायचा नाही. कित्येक वेळा त्याच्याकडूनच इतर सर्व आप्तांची खबरबात आम्हाला कळायची.

विनूकाकाचे वाचन अफाट होते. रोजची वर्तमानपत्रे अगदी बारकाईने वाचण्याचा त्याला छंद होता. पण बँकिंग , अर्थशास्त्र आणि राजकारण हे त्याचे विशेष आवडीचे विषय होते. शेयर बाजारातले चढ उतार, अर्थसंकल्प किंवा नवीन आर्थिक घडामोडी अशा विषयांवर तो कितीही काळ बोलू शकत असे. या विषयांवर तो बोलायला लागला की जणू तो मला त्या विषयांचा चालता-बोलता Encyclopedia वाटायचा .

विनूकाकाचे शेवटचे दर्शन घ्यायला तातडीने मुंबईला जावे असे एकदा मनांत आलेही होते. पण महिनाभर शरीराचे हाल झाल्यानंतरचे त्याचे रूप पहायला मन धजावेना. असिलताच्या कार्यक्रमाच्या वेळचे, त्याचे हसरे रूप आणि त्याचा तो हसरा आवाज माझ्या मनात जपून ठेवायला मला जास्त बरे वाटते आहे. मी ते रूप आणि तो आवाज आयुष्यभर साठवून आणि आठवून विनूकाका अजूनही आपल्यात आहे असेच समजत राहीन.