रामेश्वरच्या सहलीबद्दल एक सविस्तर लेखमाला लिहून झाली असली तरीही अगदी छोट्या-छोट्या काही गोष्टी आणि प्रसंगांबद्दल लिहायचे राहूनच गेले होते. त्याची रुखरुख मनाला लागून असल्यामुळे ते लिहूनच काढावे असे मी ठरवले.
सहलीला जायच्या आधी, एखादे यूट्यूब चॅनेल बघून किंवा विशिष्ट लेख वाचून, मी हे बघून ठेवलेले असते की, आपण जातोय त्या-त्या शहरात, 'कुठली ठिकाणे पाहायची? तसेच तिथे काय विशेष खाद्यपदार्थ मिळतात?' आणि त्यापैकी आपण काय, कुठे आणि कधी खायचे हेही शक्यतो मी आधीच ठरवून ठेवलेले असते. मदुराई आणि रामेश्वरला जाण्यापूर्वी मात्र या गोष्टींचा मी विचारच केला नव्हता. गेल्या पाच वर्षांमध्ये, माझी आई वारंवार आजारी पडत असल्याने आणि तिच्या मृत्यूनंतर कोरोनाकाळातील लॉकडाऊनमुळे, मी कुठल्याही सहलीला जाऊ शकले नव्हते. त्यामुळे रामेश्वरला निघताना, आपण कुठेतरी बाहेर प्रवासाला निघतो आहोत, या गोष्टीचे समाधान इतके होते की कोणत्याही नियोजनाचा विचारच माझ्या मनात आला नव्हता.
मदुराई-रामेश्वरला मिळणाऱ्या विशेष खाद्यपदार्थांबाबत मी आधी माहिती गोळा केलेली नसली तरी, तिथे गेल्यावर वेगळ्या दिसणाऱ्या खाद्यपदार्थांवर माझे चटकन लक्ष जात होतेच. तिथल्या टपऱ्यावर टांगलेली, लाल रंगाच्या सालीची केळी मी खाऊन बघितली. तिथल्या शहाळ्याच्या गाड्यांवर, आपल्याकडे मिळतात तशी हिरव्या रंगाची शहाळी होती. त्याचबरोबर, हळदीच्या रंगाची, पिवळीधमक्क शहाळीही होती. त्या पिवळ्या शहाळ्यांचे पाणी हिरव्या शहाळ्यांच्या पाण्यापेक्षा फार काही वेगळे नव्हते. एका शहाळ्याच्या गाडीच्या शेजारी, एक मनुष्य एक "एलनीर सरबत" तयार करून विकत होता. भिजवलेले तुळशीचे बी, नन्नारी सिरप, शहाळ्याच्या कोवळ्या मलईचे तुकडे आणि बदाम पिसिन (बदामाच्या झाडाचा डिंक), हे सगळे नारळाच्या पाण्यामध्ये घालून तो ते पेय बनवत होता. शिरीषच्या आग्रहाखातर मी ते पेय पिऊन बघितले, पण मला विशेष आवडले नाही. मदुराईचा फेमस "जिल जिल जिगरथंडा" (स्थानिक उच्चार "जिगरदंडा"), जिव्हेला आणि जीवाला शांती देऊन गेला. 'थेनाई कुरुथु' नावाच्या, नारळाच्या झाडाच्या आतल्या कोवळ्या बुंध्याच्या चकत्या मी खाऊन बघितल्या. त्या वेगळ्याच चवीच्या चकत्या मात्र मला फार आवडल्या. मदुराईच्या रस्त्यांवरच्या हातगाड्यांवर नारळाचे कोवळे खोड घेऊन उभे असलेले विक्रेते ठिकठिकाणी दिसतात. कोकणपट्टीत किंवा गोव्यामध्ये, इतकी नारळाची झाडे असूनही, तिथे या चकत्या का मिळत नाहीत? याचे मला नवल वाटले.
आम्ही १७ ऑक्टोबरला दुपारी रामेश्वर दर्शनासाठी गेलो असता, आमच्या पर्सेस, चपला आणि मोबाईल, आम्हाला देवळाबाहेरच्या दुकानातच ठेवावे लागले होते. त्यामुळे, १८ ऑक्टोबरच्या पहाटे, मी आणि माझी वहिनी प्राची, 'स्फटिक लिंग' दर्शनासाठी रामेश्वराच्या देवळाकडे निघालो तेंव्हा आम्ही आमच्या पर्सेस घेतल्याच नव्हत्या. टॅक्सीचालकाने आम्हाला देवळाच्या पश्चिमद्वाराजवळ सोडले. चपला टॅक्सीत ठेवून, आम्ही दोघी देवळाच्या पूर्वद्वारापर्यंत अनवाणी चालत गेलो. दोघीत मिळून एक मोबाईल मात्र आम्ही बरोबर ठेवला होता. देवळात जाण्यापूर्वी मोबाईल दुकानातील लॉकरमध्ये ठेवायचा आणि दर्शन करून बाहेर पडल्यावर, मोबाईलवरून टॅक्सीचालकाला फोन करून बोलावून घ्यायचे, असे आम्ही ठरवले होते. दर्शनासाठी प्रत्येकी दोनशे रुपयांचे तिकीट काढायचे होते. त्यासाठीचे चारशे रुपये आणि वर काही लागलेच तर थोडेसे पैसे असावेत, अशा विचाराने आम्ही आमच्याजवळ शंभर रुपयांच्या एकूण फक्त पाचच नोटा ठेवल्या होत्या.
पूर्वद्वाराजवळ पोहोचताच, एका दुकानाच्या लॉकरमध्ये फोन ठेवायला मी गेले. दुकानदाराने फोन ठेवण्यासाठी १० रुपये मागितले. माझ्याकडे किंवा त्याच्याकडेही शंभराचे सुटे नव्हते. आत्ता फोन आणि १०० रुपये ठेऊन जा आणि परत जाताना फोन आणि ९० रुपये घेऊन जा, असा आग्रह त्या दुकानदाराने धरला. "अहो, तुमच्याकडे माझा फोन आहेच. मी दर्शन घेऊन आल्यावर तुम्हाला दहा रुपये देते आणि माझा फोन घेऊन जाते", असे माझे म्हणणे होते. पण तो दुकानदार काही केल्या ऐकेना. बरं, तो मोबाईल आणि शंभर रुपये ठेऊन घेतल्याची पावतीही द्यायला तयार नव्हता. आजूबाजूची सगळी दुकाने बंद होती. आता काय करावे? हा माझ्यापुढे प्रश्न होता. तेव्हड्यात आणखी एक दुकानदार त्याचे दुकान उघडत असल्याचे मला दिसले. मी त्यांना फोन ठेऊन घेण्याची विनंती केली. त्याने कुठलेही आढेवेढे न घेता माझा फोन ठेऊन घेतला. त्याच्याकडच्या पावती पुस्तकात कार्बन पेपर ठेऊन, माझा फोन नंबर आणि नाव लिहून घेऊन, रीतसर पावती दिली. "दर्शन झाल्यावर दहा रुपये देऊन फोन घेऊन जा" असे त्याने मला सांगितले.
'स्फटिक लिंग' दर्शन झाल्यावर मी फोन घ्यायला गेले. आता आमच्याकडे १०० रुपयाची एकच नोट राहिली होती. पुन्हा सुट्या पैशाचा प्रश्न होताच. दुकानदाराकडेही सुटे ९० रुपये नव्हते. मी त्याला सुचवले, "तुम्ही आत्ता हे १०० रुपये ठेऊन घ्या, संध्याकाळी अभिषेकाच्या निमित्ताने मी देवळात येणारच आहे, त्यावेळेस मला ९० रुपये परत करा" मात्र त्याने १०० रुपयाची नोट ठेऊन घेण्यास नकार दिला, आणि माझा फोनही मला परत दिला. "संध्याकाळी याल तेव्हा माझे दहा रुपये देऊन जा" इतकेच तो म्हणाला आणि आपल्या कामाला लागला.
संध्याकाळी अभिषेक करण्यासाठी आम्ही दोघी पुन्हा देवळात गेलो. आमची टॅक्सी पश्चिमद्वारापाशी असली तरी, अभिषेक झाल्यावर पूर्वद्वारातून बाहेर पडून त्या दुकानदाराचे दहा रुपये आम्ही चुकते केले. न राहवून मी त्या दुकानदाराला प्रश्न केला, "मी तुमचे पैसे बुडवेन, ही भीती तुम्हाला वाटली नाही का? तुमचे पैसे बुडू नयेत म्हणून तुम्ही मला दुकानातील इतर काही वस्तू घेण्याचा आग्रह कसा काय केला नाहीत?"
त्या दुकानदाराने दिलेले उत्तर अतिशय मार्मिक होते. "तुम्ही माझे पैसे दिले नसते तरीही, तुमचा मोबाईल ठेऊन घेऊन, देवदर्शन करण्यासाठी मी तुम्हाला मदत केल्याचे पुण्य मला मिळणारच होते ना? मोबाईल ठेऊन घेण्या बद्दलचे दहा रुपये मिळावेत, यासाठी तुम्हाला माझ्या दुकानातली एखादी वस्तू घ्यायला लावणे अयोग्य झाले असते. मी तसे केले असते तर मला पाप लागले असते ना?" त्या दुकानदाराच्या प्रगल्भ विचारसरणीचे मला प्रचंड कौतुक वाटले. देवाच्या व्दारापाशी दुकानदारी करत असलेल्या त्या दोन दुकानदारांच्या विचारसरणीतील विरोधभासही मला प्रकर्षाने जाणवला.
मदुराईमध्ये मीनाक्षी मंदिराच्या बाहेर, एका फिरत्या विक्रेत्याने शिरीषचा पिच्छा पुरवला होता. तो माणूस मीनाक्षीअम्मनच्या चित्रांची पदके असलेल्या सोनेरी चेन्स विकत होता. शिरीषने त्याच्याकडून बऱ्याच चेन्स विकत घेतलेल्या पाहून मला आश्चर्य वाटले. इतक्या दूर यात्रेला आलोच आहे तर नातेवाईक, मित्रमंडळी, नोकरचाकरांसाठी छोटेसे काहीतरी घेऊन जावे, अशा विचाराने त्या चेन्स घेतल्याचे त्याने मला सांगितले. मला त्याची कल्पना आवडली. त्यामुळे, संध्याकाळी नायकर पॅलेसमध्ये जाताना मीही एक चेन विकत घेतली. माझ्या दिवंगत आईच्या घरी काम करणाऱ्या, एका देवभक्त मोलकरणीला ती द्यावी असे माझ्या मनात होते.
रामेश्वरच्या सहलीनंतर दिवाळीसाठी सोलापूरला गेल्यावर, मीनाक्षीअम्मनच्या चित्राचे पदक असलेली चेन आणि मदुराई-रामेश्वरहून आणलेला प्रसाद मी त्या मोलकरणीला दिला. ती खूपच भारावून गेली. आम्ही रामेश्वराचे दर्शन घेऊन आलेलो असल्याने ती आम्हा तिघांच्याही पाय पडली. रामेश्वराची सहल तर आनंदमय झालीच होती. पण त्या दर्शनाचा आनंद अप्रत्यक्षपणे का होईना आपण त्या भाविक मोलकरणीला देऊ शकलो, याचेच समाधान मला अधिक महत्वाचे वाटले.
शिरीष आणि गिरीशने रामेश्वर आणि धनुष्यकोडी येथे मोठमोठाले शंख विकत घेतले. पण, दुकानदाराने खणखणीत आवाजात वाजवून दाखवलेले शंख, आपण शंखनाद करायला गेलो की तसे वाजत नाहीत असे लक्षात आले. रामेश्वरहून आल्यावर, श्रीमद्भग्वदगीता, रामरक्षा आणि इतर श्लोकांचे स्मरण आणि पठण मी सुरु केले आहे असे मागच्या लेखात मी लिहिलेच होते. गीतेच्या पहिल्या अध्यायात, कुरुक्षेत्रावर वेगवेगळ्या लढवय्यांनी आपापल्या, विशिष्ट नावांच्या शंखांचा नाद करून युद्ध कसे घोषित केले, याचे वर्णन आहे. ते ऐकल्यावर मात्र मला मी आणि आनंदने शंख विकत घेतले नाहीत याचे वाईट वाटते आहे. आम्हा दोघांपैकी कोणालाही दुसऱ्या व्यक्तीशी भांडण्याची उर्मी आलीच, तर अघोषित युद्ध करण्यापेक्षा, आपापल्या शंखाचा नाद करून, ते घोषित करायला कदाचित जास्त मजा आली असती, असे आता वाटते.
म्हणून म्हणते, तुमच्यापैकी कोणी रामेश्वरला गेलातच तर शंख आणायला विसरू नका बरं का !