शुक्रवार, १३ जानेवारी, २०२३

उचलबांगडी!

आम्ही राहतो त्या इमारतीत, वरच्या मजल्यावर एक सत्त्याऐंशी वर्षे वयाच्या आजी राहतात. आजींची तिन्ही अपत्ये परदेशी असल्याने त्या इथे एकट्याच राहतात. त्यांच्या घरी, त्यांच्या सोबतीला राहून घरकाम करण्यासाठी, गौरी कांबळे नावाची  एक चाळीशीची बाई राहत होती. २० नोव्हेंबर २०२२ पर्यंत आजी अगदी खुटखुटीत आणि चालत्या फिरत्या होत्या. पण २१ नोव्हेंबर २०२२ ला त्यांच्या पाठीच्या मणक्यातून असह्य कळा जायला लागल्या. त्यामुळे त्यांना रुबी हॉल क्लिनिकमध्ये ऍडमिट व्हावे लागले. तिथे त्यांच्या सर्व तपासण्या झाल्या. त्यांच्या दोन मणक्यांना फ्रॅक्चर झालेले आहे असे निदान झाले. योग्य उपचार सुरु करून त्यांना २६ नोव्हेंबरला  घरी सोडण्यात आले. 

आजी घरी आल्यानंतरही दोन आठवडे त्यांच्या मणक्यातून कळा जातच होत्या. त्यांना कुशीवर वळायलाही त्रास होत होता. पण औषधोपचारामुळे आणि विश्रांतीमुळे हळूहळू त्यांना बरे वाटायला लागले. त्या दरम्यान, स्पेनमध्ये स्थायिक असलेली  त्यांची मुलगी आपल्या आईची शुश्रूषा करायला त्यांच्याजवळ येऊन राहिली. शेजारधर्म म्हणून मी जमेल तसे, आजींची विचारपूस करायला, काही खाद्यपदार्थ-फळे द्यायला त्यांच्याकडे वरचेवर जात होते. त्यातून मी वैद्यकीय व्यावसायिक असल्याने, त्यांना लागेल ती वैद्यकीय मदतही  करत होते. 

साधारण १५ डिसेंबर २०२२ च्या सुमारास, दुखणे जरा कमी झाल्यानंतर आजींना त्यांच्या सोन्याच्या बांगडीबद्दल आठवण झाली. २१ नोव्हेंबरला त्यांना हॉस्पटलमध्ये नेण्यासाठी ऍम्ब्युलन्स आली होती. हॉस्पिटलमध्ये जाण्याच्या आधी आजीनी त्यांच्या हातातली सोन्याची बांगडी, पलंगाशेजारच्या टेबलाच्या ड्रॉवरमध्ये काढून ठेवली होती, हे आजींना पक्के आठवत होते. आजीच्या मुलीने त्या ड्रॉवरमध्ये ती बांगडी शोधली, पण तिथे ती बांगडी काही सापडली नाही.  त्यामुळे तिने घरामध्ये सगळीकडे शोधाशोध सुरु केली. आजी हॉस्पिटलमध्ये असताना, गौरी घरी येत-जात होती. त्यामुळे गौरीने ती बांगडी कुठेतरी ठेवली असण्याची अथवा स्वतःच घेतली असण्याची शक्यता दाट होती. त्यामुळे, "गौरी, तू बांगडी कुठे ठेवली आहेस का? कुठे पहिली आहेस का?" अशी विचारणा आजींच्या मुलीने गौरीकडे केली. पण गौरीने कानावर हात ठेवल्यामुळे आजींची आणि त्यांच्या मुलीची पंचाईत झाली. 

१६-१७ डिसेंबर २०२२च्या सुमारास मी आजींची विचारपूस करायला गेले असताना, आजींच्या मुलीने ती सोन्याची बांगडी हरवल्याचे मला सांगितले. आजीनी त्वरित पोलिसांची मदत घ्यावी असा मी सल्ला दिला. पण आजी आणि त्यांची मुलगी पोलिसांमध्ये तक्रार द्यायला मुळीच तयार नव्हत्या. पुढचे पाच-सात दिवस, पोलिसांमध्ये तक्रार देणे कसे आवश्यक आहे , हे मी त्या दोघीना सातत्याने सांगत होते. शेवटी २३ डिसेंबर २०२२ रोजी,  पोलीस घरी येऊन तक्रार घेणार असतील तरच आम्ही तक्रार देऊ' या बोलीवर त्या दोघी तयार झाल्या. मी त्वरित १०० क्रमांकाला फोन करून चोरीबाबत तक्रार केली आणि आजींना येऊन भेटण्याची विनंती पोलिसांना केली. पुढील दहा-पंधरा मिनिटांत दोन पोलीस मार्शल आजींच्या घरी हजर झाले. 

आजी आणि त्यांच्या मुलीला मराठी नीटसे येत नसल्याने त्यांनी मलाही त्यांच्या घरीच थांबवून घेतले होते. पोलिसांनी आजींकडून सगळी घटना नीट समजावून घेतली. तसेच गौरी कांबळेकडे बांगडीबाबत चौकशी केली. गौरीने, 'मी ती बांगडी कधीही पाहिलेली नाही' असाच पवित्रा  घेतला. खरेतर, आजींच्या हातात ती बांगडी नेहमीच असायची. तेंव्हा मला अचानक एक प्रसंग आठवला. १४ ऑक्टोबर २०२२ रोजी आजींच्या वाढदिवसाच्या दिवशी मी केक केला होता. तो केक कापतानाच्या फोटोमध्ये आजींची बांगडी दिसत असणार. माझ्या फोनवरचे ते फोटो काढून मी पोलिसांना दाखवले. पोलिसांनी आजींना आणि त्यांच्या मुलीला धीर देत सांगितले की आमचे माधाळेसाहेब अतिशय चांगले अधिकारी आहेत. तुम्ही बंडगार्डन पोलीस  स्टेशनला येऊन त्यांना भेटा, ते निश्चित मदत करतील.   

आजी अंथरुणाला खिळलेल्या असल्याने, आजींच्या मुलीला घेऊन मी लगेच बंडगार्डन पोलीस स्टेशनमधल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक (API ) संदीप माधाळेसाहेबांची भेट घेतली.  त्यांनी पुन्हा आमच्याकडून सर्व घटनाक्रम जाणून घेतला, व बांगडीचा फोटो पहिला. त्यानंतर त्यांनी महिला पोलीस मार्शलना आजींच्या घरी पाठवून गौरी कांबळेला पोलीस ठाण्यामध्ये आणण्याचे आदेश दिले. गौरी पोलीस स्टेशनला आल्यावर, पोलिसांनी मला आणि आजींच्या मुलीला  बाहेरच्या बाकावर बसून राहण्याची विनंती केली. 

पुढील तास-दीड तास  महिला पोलीस  कॉन्स्टेबलच्या उपस्थितीमध्ये,  माधाळे साहेब आणि पोलीस सब इन्स्पेक्टर रवींद्र गावडेसाहेबानी गौरीची कसून चौकशी केली. बराच वेळ झाला तरी आतून काही खबर मिळत नसल्याने आजींच्या मुलीचा धीर सुटत चालला होता. शेवटी, 'गौरीने बांगडी उचलल्याची कबुली दिली आहे आणि तिचा साथीदार लोणावळ्याहून रात्री बांगडी परत आणून देईल' अशी खुशखबर घेऊन महिला पोलीस बाहेर आल्या. स्पॅनिश नागरिक असलेल्या आजींच्या मुलीला मी ही खबर सांगितली. पुणे पोलिसांची कार्यतत्परता पाहून ती  आश्यर्यचकित झाली. 

त्याच रात्री सुमारे साडेबारा वाजता पोलीस सब इन्स्पेक्टर अजय असवले साहेबांचा मला फोन आला. बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये येऊन बांगडी घेऊन जायला त्यांनी सांगितले. पोलिसांनी माझ्या हातात ती बांगडी सुपूर्द केली. आणि "ती बांगडी मी आजींच्या वतीने स्वीकारलेली आहे", असे माझ्याकडून लिहून घेतले. त्यानंतर मी त्वरित आजींच्या घरी जाऊन त्यांना त्यांची बांगडी सुपूर्द केली. हे सगळे घडायच्या आधी, बांगडी उचलण्याच्या गुन्ह्याबद्दल पोलिसांनी आजींच्या घरातून गौरी कांबळेचीच उचलबांगडी केलेली होती हे सांगायला नकोच!


पोलिसांच्या कार्यतत्परतेबद्दल माझ्या मनामध्ये कधीही शंका नव्हती. पण तक्रार केल्यापासून आठ तासांच्या आत, आपली तीन तोळ्यांची  बांगडी घरपोच मिळाल्यामुळे, आजींच्या आणि त्यांच्या मुलीच्या मनामध्ये पोलिसांवर आपण 'भरोसा' ठेऊ शकतो असा विश्वास निर्माण झाला, हे विशेष!  

मला असे प्रकर्षाने वाटते की सामान्य नागरिकांनी पोलिसांची भिती बाळगू नये, आणि पोलीस निष्क्रिय असतात असा विचारही करू नये. त्याउलट, पोलिस यंत्रणेवर विश्वास ठेऊन, एखादा गुन्हा घडल्याचे लक्षात येताच पोलिसांची मदत घेणे हेच श्रेयस्कर ठरते.