काल सकाळचं काम संपवून घरी आल्यावर, आमरस-पोळीचे जेवण जेवून मी ताणून दिली. तास-दीड तासाने जाग आल्यावर सवयीने व्हॉट्सऍप उघडले. दि. १६/०५/१८, म्हणजे आजच एका 'हेल्थ कॅम्पला' मी रुजू व्हायचे आहे अशी ऑर्डर नॅशनल अर्बन हेल्थ मिशनच्या कार्यालयातून कोणीतरी व्हॉट्सऍपवर मला पाठवलली दिसली. बांधकामावरील मजुरांच्या कुटुंबियांसाठी हा मोफत हेल्थ कॅम्प, क्रेडाई आणि पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेला आहे, असे मला त्या ऑर्डरवरून कळले. अचानक आलेल्या या ऑर्डरमुळे खरंतर माझी खूप चिडचीड झाली. माझ्या क्लिनिकच्या आजच्या अपॉईंटमेंट्स रद्द कराव्या लागणार, घरची कामे सकाळी लवकर उरकून, मरणाच्या ट्रॅफिकमध्ये घरापासून दहा किलोमीटर दूर असलेली कॅम्पची साईट शोधत जावे लागणार, हे सर्व मला अगदी नको वाटत होते. त्यातून १६ मे हा आमच्या मुलाचा वाढदिवस. मुलगा जरी दूर अमेरिकेत असला तरी त्याचा वाढदिवस 'राझी' सिनेमा बघून साजरा करावा असे मनात योजले होते. ऑर्डर रद्द करून घ्यावी असा मनात विचार आला पण कार्यालयीन वेळ संपून गेलेली असल्यामुळे ते केवळ अशक्य होते.
मनातल्या मनात चडफडतच कॅम्पच्या ठिकाणी पोहोचले. बांधकामावरील मजुरांच्या कुटुंबियांच्या वसाहतीत पत्रे ठोकून उभ्या केलेल्या एका खोलीत कॅम्प आयोजित केला होता. बाहेर वीस-पंचवीस लहान मुले तपासणी सुरु होण्याची वाट बघत बसली होती. कामगारांच्या बायका आणि काही कामगारही मोठ्या आशेने थांबून होते. 'मान्यवर' न आल्याने, कार्यक्रम तासभर उशिरा चालू झाला. त्यानंतर दीपप्रज्ज्वलन, भाषणबाजी आणि खानपान यामध्ये पुढचा पाऊण तास गेला. त्या सोहळ्यादरम्यान अनेक फोटो काढून झाले आणि लगेच तमाम मान्यवर गायब झाले. हे सर्व होऊन गेल्यावर आमचं काम चालू झाले. त्या वेळपर्यंत भर उन्हात पत्र्याच्या शेड मध्ये बसून, ढिसाळपणे चाललेला कार्यक्रम आणि दिखाऊपणा बघून माझे डोके चांगलेच तापले होते. असले कार्यक्रम मुख्यतः फोटोपुरतेच घडवून आणले जात असल्याने, त्यात नियोजनाचा अभाव आहे, हे माझ्या लक्षात आले आणि वैद्यकीय तपासणीची सगळी सूत्रे मी हातात घेतली. दोन कर्मचाऱ्यांना केसपेपर्स बनवायला बसवले, महानगरपालिकेच्या दवाखान्यातून रुग्णांना मोफत वाटण्यासाठी कोणती आणि किती औषधे आणलेली आहेत याचा आढावा घेतला आणि कामाला सुरुवात केली.
कर्नाटक, बिहार, उत्तरप्रदेश आणि छत्तीसगड अशा वेगवेगळ्या राज्यातून आलेली ही कामगारांची कुटुंबे होती. मी फक्त बालरुग्णांना तपासणार होते. सगळी मुले थोड्याफार प्रमाणात कुपोषित होती. त्या वसाहतीतील बऱ्याच मुलांना नुकताच गोवर येऊन गेलेला होता. त्यामुळे त्यांची भूक कमी झालेली होती आणि ती खूप चिडचिडी झालेली होती. अनेक मुलांच्या अंगात रक्त कमी आहे, हे मला कळत होते. काहींना खरूज झालेली होती तर काहींची पोटात जंत झाल्याची तक्रार होती. कित्येक मुलांचे लसीकरण पूर्ण झालेले नव्हते. आई-वडील कामावर गेल्यामुळे, सात आणि आठ वर्षांची मुले पालकांशिवायच तपासणी करून घ्यायला आलेली होती. दहा-बारा वर्षांच्या मुली कडेवर लहान भावंडांना घेऊन आल्या होत्या. मी पेशन्ट्स तपासत होते पण त्यांना द्यायला, योग्य आणि पुरेशी औषधेही आमच्याकडे नव्हती. गोवर आलेल्या मुलांना द्यायला साधे 'अ' जीवनसत्वाचे औषधही नव्हते. मुलांना रक्तवाढीसाठी पातळ औषध द्यावे, तर तेही नव्हते. काही अत्यावश्यक औषधे मी विकत आणायला लावली आणि मोठ्या जिव्हाळ्याने सर्व मुले तपासली. एका वेगळ्याच उपक्रमात सहभागी होऊन मुलाचा वाढदिवस साजरा केल्याचे समाधान मिळाले, पण मनात मात्र विचारांचे काहूर उसळले.
कार्यक्रम सुरु होण्याआधी कुतूहलापोटी मी काही लोकांशी बोलले होते. त्यांच्या झोपड्याकडेही माझे लक्ष गेलेले होते. तात्पुरते पत्रे ठोकून तयार केलेल्या काड्यापेटीसारख्या झोपड्या. त्यात खेळती हवा नाही, ड्रेनेजची नीटशी सोय नाही. सगळीकडे अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरलेली. पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची तरी काय सोय होती देव जाणे. अशा परिस्थितीतच ही कुटुंबे राहत होती आणि तिथेच त्यांची मुले खेळत होती. सर्व सुखसोयींनी युक्त अशा मोठ्या मोठ्या इमारती बांधायच्या आणि इमारत पूर्ण झाल्यावर पुन्हा पुढच्या साईटवर जायचे. दर दीड दोन वर्षांनी जुने घर मोडायचे, जुनी जागा सोडायची आणि नवीन जागी पुन्हा घर उभे करायचे. या जागी किती दिवस राहायचे आहे ?नवीन जागा कुठे असेल? कशी असेल? किती दिवसांनंतर जायचे आहे ? शेजारीपाजारी कोण असेल? मालक कोण असतील? काम मिळेल का? किती दिवसांसाठी मिळेल ? किती पगार मिळेल ? मुलांसाठी शाळा असेल का? सगळी प्रश्नचिन्हेच. क्रेडाईच्या सदस्यांनी या कामगारांना मूलभूत सुविधा पुरविल्याच पाहिजेत अशी कायदेशीर सक्ती का नाही? आणि तशी तरतूद कायद्यात असल्यास त्याची कठोर अंमलबजावणी करता येणार नाही का? चकचकीत घरामध्ये राहताना, त्यासाठी राबलेल्या या कामगारांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या हालअपेष्टांबद्दल आपल्याला सुतराम कल्पनाही नसते, याची जाणीव मनाला त्रास देऊन गेली. या कॅम्पला मला यायला लागू नये, हा कातडीबचाऊ विचार मी केला होता, याचीही मला लाज वाटली.
मागच्याच महिन्यात माझ्या भावाने घेतलेल्या नवीन घराची वास्तुशांती पूजा झाली. मी मुळीच भाविक नाही, पण पूजा करताना गुरुजी मंत्रोच्चार करून त्यांचा अर्थही समजावून सांगत होते, ते कानावर पडले होते. वास्तू उभी राहताना ज्यांना ज्यांना म्हणून त्रास झाला असू शकेल त्या सगळ्यांचा उल्लेख करून ती पूजा केली गेली. नवग्रहांचीही शांत केली. आज, या कामगाराच्या वसाहतीत प्रथमच गेल्यावर मला वाटले की,नवीन वास्तूत प्रवेश करताना, वास्तूसाठी राबलेल्या कामगारांचा एखादा प्रश्न जर एकेक फ्लॅटधारकाने सोडवला तर ती एक आगळी वेगळी वास्तुशांत होईल.