मंगळवार, १७ डिसेंबर, २०१९

'मला जगायचंय'

साडेचार महिन्यांच्या प्रदीर्घ आजारपणाने कृश झालेली माझी वयोवृद्ध आई, गेले अनेक दिवस आयसीयूत आहे. आठ-नऊ दिवस व्हेंटिलेटरवर व डायलिसिसवर राहून, तीन दिवसांपूर्वी त्या दिव्यातून ती सुखरूप बाहेर पडली. कालपासून आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही ती द्यायला लागली आहे.

काल मी सहज तिला विचारले, "काय आई, बरी आहेस ना? काय करावंसं वाटतं आहे? कुठे जावसं वाटतंय? "

तिने माझ्या पहिल्या प्रश्नाचे होकारार्थी उत्तर मान हलवून दिले. मला बरे वाटले.

मी दुसरा व तिसरा प्रश्न परत विचारला. त्यावर ती म्हणाली, "मला जगायचंय. मला सोलापूरला जायचंय"

तिच्या उत्तराने मी अवाक् झाले.

यावर्षी जुलैच्या २२ तारखेला, मुलीच्या बाळंतपणाच्या निमित्ताने, मी पाच आठवड्यांसाठी ऑस्ट्रेलियाला गेले होते. पण पाठोपाठच माझी आई सोलापूरला आजारी पडली. तिने खाणे-पिणे सोडले. शेवटी, ती जवळ-जवळ ग्लानीत जायला लागल्याने, सहा ऑगस्टला सोलापुरातच तिला आयसीयूत अ‍ॅडमिट करावे लागले. 

बरेच दिवस तिच्या आजाराचे काहीही निदान होत नसल्याने आणि तिच्या तब्येतीत काहीच सुधारणा होत नसल्याने, तिच्यावर उपचार करणाऱ्या सोलापूरच्या डॉक्टरांनी हात टेकलेलेच होते. त्यातही कहर असा झाला की तिला नळीवाटे पातळ अन्न देताना, ते अन्न दोन-तीनदा तिच्या फुफुसांत गेले. त्यामुळे तिला Aspiration Pneumonia झाला. तिला दम लागू लागला. तिचे वय आणि एकूणच तिची अवस्था बघून, शेवटी तिथल्या डॉक्टरांनी सांगितले, "आता इथे आम्हाला याउपर कुठलेही वैद्यकीय उपचार करणे शक्य नाही आणि त्याचा काही उपयोग होईल असे वाटत नाही. तुम्ही सगळ्या जवळच्या नातेवाईकांना बोलवून घ्या. तिला आता घरी घेऊन जा किंवा पुण्या-मुंबईतील हॉस्पिटलमध्ये हलवा"

मला हे समजताच, माझ्या भारतात परतण्याच्या नियोजित तारखेपेक्षा आठवडाभर आधीच निघून मी तडक सोलापूरला पोहोचले. आईला अँब्युलन्समध्ये घालून पुण्याच्या रूबी हॉल क्लिनिकमध्ये आणले. तिच्यावर पूर्वी एकदा ज्यांनी उपचार केले होते त्या डॉक्टर वाडियांनी यावेळीही योग्य उपचार करून तिला वाचवले.

त्यानंतर जरी तिला घरी आणले तरी अशक्तपणामुळे तिला नीट खाता-पीता येत नव्हते. त्यामुळे अजूनच अशक्तपणा वाढून तिची प्रतिकारशक्ति संपून गेली व तिला वरचेवर जंतूसंसर्ग होत राहिला. तीन आठवड्यांपूर्वी तिला परत रूबी हॉल क्लिनिकमध्ये अ‍ॅडमिट करावे लागले. हॉस्पिटलच्या खोलीमध्ये असताना काही दिवसांपूर्वी, नळीवाटे पातळ अन्नपदार्थ देताना पुन्हा तिच्या फुफुसांमध्ये अन्न जाऊन तिला अत्यंत गंभीर स्वरूपाचा Aspiration Pneumonia झाला. त्यामुळे तिला पुन्हा आयसीयूत हलवावे लागले. श्वसनाला त्रास होत असल्याने आठ-नऊ दिवस तिला व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले. त्याकाळात ती बेशुद्धावस्थेतच होती. तिच्या किडनी योग्य प्रकारे कार्य करत नसल्याने तिचे तीन वेळा हिमोडायलिसीस करावे लागले. निष्णात डॉक्टर असलेल्या माझ्या अगदी जवळच्या मैत्रिणीच आयसीयूत आईवर वैद्यकीय उपचार करीत आहेत. त्यामुळेच उपचारांमध्ये काही हयगय होणार नाही, याबाबत आता मी निर्धास्त आहे. 

आठ-दहा दिवसांपूर्वी जेंव्हा आई अत्यवस्थ होती, तेंव्हा कुठलेही वैद्यकीय ज्ञान नसलेल्या जवळपासच्या सर्व व्यक्तींनाही तिच्या आजाराचे गांभीर्य लक्षात आले होते. त्यामुळे "आता कधी?" अशा अर्थाचे प्रश्नचिन्हच फक्त  त्या सर्वांच्या चेहऱ्यावर होते. आई बरी व्हावी म्हणून माझ्या डॉक्टर मैत्रिणी व मी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होतो. रुग्णाच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपण सर्व प्रयत्न करीत राहायचे, अशी शिकवण आमच्या अंगात भिनलेली असली तरीही, आई या दिव्यातून बाहेर पडेल की नाही याबाबत आम्ही सर्व डॉक्टर्स त्यावेळी जरा साशंकच होतो. 

कमालीचा अशक्तपणा, बेशुद्धावस्था, व्हेंटिलेटर, डायलिसीस, सेप्सीस या सगळ्यातून आई कशी काय बाहेर पडली हा आम्हा सर्व डॉक्टर्सच्या दृष्टीनेही एक आश्चर्याचा विषय आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी आई शुद्धीवर आली. त्यानंतर डॉक्टर वाडियांनी विचारलेल्या प्रश्नांची आईने सुसंगत उत्तरे दिली. ते ऐकून डॉक्टर वाडिया आश्चर्यचकित होऊन म्हणाले, "चमत्कार घडतात."

"मला जगायचं आहे" हे आईचे वाक्य ऐकले आणि हा चमत्कार कसा घडला असावा याचा मला उलगडा झाला.

आई अजूनही आयसीयूतच आहे आणि ती पूर्ण बरी झाली आहे असे म्हणण्यासारखी परिस्थिती आजही नाही. पण तिची जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती, सोलापूरला तिच्या स्वतःच्या घरी जाण्याची उत्कट इच्छा आणि जिद्दच तिला जगवते आहे असे मला वाटते. तिची ही इच्छाशक्ती आणि जिद्द बघून, तिला जगविण्यासाठी अथक प्रयत्न करण्याचे आम्हालाही बळ येते आहे!

रविवार, ६ ऑक्टोबर, २०१९

दुर्गा अष्टमीचे कुमारिकाप्रबोधन

आमच्या इमारतीत आम्ही दुसऱ्या मजल्यावर राहतो. आज दुपारी, एक मजला उतरून खाली गेले तोवर जिना अगदी स्वच्छ होता. पण पहिल्या मजल्यावरून इमारतीतून बाहेर पडेपर्यंत जिन्यावर व इतरत्र सगळीकडे खाद्य पदार्थांची वेष्टने आणि थोडी बिस्किटे, वेफर्स पडलेले दिसले. खाद्यपदार्थांची अशी नासाडी झालेली पाहून मला वाईट वाटले. जिना उतरून खाली आले आणि हे असे का झाले आहे,  याचा उलगडा मला झाला.

करपार्कच्या जवळच एक रिक्षा उभी होती. साधारण सहा ते दहा वयोगटातील आठ-नऊ  मुली, कलकल करत रिक्षात बसलेल्या होत्या. त्या मुली कुठल्याश्या झोपडपट्टीतून आल्या असाव्यात असे वाटत होते. त्यांच्याबरोबर, त्यांना घेऊन आलेली, मोलकरीण वाटावी अशी एक बाई होती. ती बाई आणि त्या रिक्षाचा चालक रिक्षाजवळच उभे राहून गप्पा छाटत होते. त्या सर्व मुलींच्या कपाळावर कुंकवाचे मोठ्ठे टिळे लावलेले होते. अनेक भाविक स्त्रिया दुर्गाष्टमीला कुमारिकापूजन करतात. आमच्या इमारतीमध्येच कोणाकडे तरी कुमारिकापूजनासाठी, या मुली आलेल्या असणार, हे माझ्या लक्षात आले. रिक्षाशेजारी उभ्या असलेल्या त्या बाईला विचारून मी त्याबाबत खात्रीही करून घेतली.

त्या मुली रिक्षात बसून दंगा घालत होत्या. भसाभसा हातातली पाकिटे फोडत होत्या. एखादे बिस्किट खाऊन बघत होत्या. चव आवडली नाही की उरलेली बिस्किटे, बाहेर फेकून देत होत्या. रिक्षात बसलेल्या कुणा इतर मुलीचा धक्का लागून एखादीच्या हातातले पाकीटही रस्त्यावर सांडत होते. मी रिक्षा जवळ गेले. त्या बाईंना सांगून त्या मुलींना रस्त्यावर आणि जिन्यावर पडलेले खाद्यपदार्थ उचलून कचऱ्याच्या पेटीत टाकायला लावले.

"अन्नाची अशी नासाडी करू नका. तुम्हाला खायचे आहे  तेव्हडे आत्ता खा. बाकीचे घरी न्या आणि नंतर खा . तुम्हाला खायचे नसेल तर ते इतर कोणाला तरी द्या. ते अन्न आहे, कोणाच्या तरी पोटात जाऊ द्या, पण  फेकू नका. रिकामी पाकिटे इकडे-तिकडे टाकून, सगळीकडे घाण करू नका." हेही त्या मुलींना मी अत्यंत पोटतिडिकीने सांगितले.

कुमारिका हे देवीचे रूप समजले जाते. अष्टमीला कुमारिकापूजन केल्याने मोठे पुण्य मिळते, असा समज आहे.
पण अन्न वाया घालवल्याने मोठे पाप लागते, असेही मानले जाते. यजमानीणबाईंना आज कुमारिकापूजनाचे पुण्य लाभले असेलही. तसेच, त्या कुमारिकांचे थोडे प्रबोधन केल्याचे पुण्यकर्म माझ्याही हातून घडले, हेही नसे थोडके.
नाही का ?

शुक्रवार, १२ जुलै, २०१९

तुझे रूप चित्ती राहो

                
काही वर्षांपूर्वीच्या आषाढी एकादशीची गोष्ट. त्यावेळी माझ्याकडे, अक्कूताई नावाची म्हातारी विधवा बाई,  घरकामासाठी यायची. ती आणि तिची अपंग मोठी बहीण, दोघीच झोपडपट्टीतल्या खोपटात राहायच्या. गावाकडून आणून तिच्या मुलाने त्या दोघींना इथे सोडले होते. कधीतरी वर्ष सहा महिन्याने तो यायचा आणि थोडं धान्य आणि पैसे देऊन निघून जायचा. 

अक्कूताई त्यांच्या घरापासून अर्धातास चालत सकाळी सातपर्यंत माझ्याकडे यायच्या, नऊ-साडेनऊपर्यंत माझ्या घरचं काम संपवून पुढच्या कामांना जायच्या.

आमच्या पहाटेच्या चहाबरोबर आम्ही अक्कूताईंसाठीपण चहा करून ठेवायचो. त्या आल्यावर त्यांना भरपूर साखर घालून तो चहा गरम करून द्यायचो. नऊ- साडेनऊला आमच्या नाष्ट्याच्या वेळेला, आमच्या बरोबर त्यांनाही नाष्टा द्यायचो. अक्कूताईंची खूप गरीबी होती. कधी रात्रीचं उरलेलं अन्न दिलं, तरीही त्या आनंदाने घेऊन जायच्या. 

दरवर्षी आमचा आषाढीचा उपास, सकाळी केलेल्या साबुदाणा खिचडी पुरताच मर्यादित असतो. तसाच त्या दिवशीही होता.
नाष्ट्याला केलेल्या गरम खिचडीची बशी मी अक्कूताईंना दिली आणि सहजी विचारले,

"काय अक्कूताई आज आषाढीचा उपास धरलाय ना?"

"नाय वो ताई"

"मग देवदर्शनाला जाणार ना?"

"नाय वो नाय" अक्कूताईचा चेहरा कसनुसा झाला होता.

"का? देवळात नाही जाणार?" 

"वस्तीतली पोरं नाय जाऊ देत" अक्कूताई वरमून बोलल्या. 

"पोरं का जाऊ देत नाहीत? " मला आश्चर्य वाटलं.

"वस्तीतली पोरं म्हनत्यात, आता आमचा धर्म येगळा, देव येगळा आन् आमचा सनबी येगळा हाय. आता फक्त जयंतीच आमचा सन. आता इट्टल, गणपती, शंकर, अंबाबाई .. हे आमचे देव न्हाईत. आता आमच्या लोकांनी देवळात जायाचं न्हाई आसं आमाला सांगत्यात."

अक्कूताईंची जात, धर्म मी आधी कधीच विचारले नव्हते. पण अक्कूताईंच्या त्या उत्तरामुळे मला सगळा प्रकार लक्षात आला. 

"पण लहानपणापासून तुम्ही देवळात जात असाल ना? उपास करत असाल ना?"

"देवळात जायाचो, उपास पन  करायचो. पन आताची पोरं जायचं नाही म्हनत्यात. त्यांच्या तोंडाला कोन लागनार."

"देवदर्शन नाही, तर मग कसं हो? तुम्हाला वाईट वाटत नाही का?"

"वाईट वाटतं. पन ताई, इट्टल फकस्त देवळातच भेटतो असं कुटं हाय का? त्यो तर मानसाच्या मनातबी असतो ना? देवळात गेलं न्हाई तरी माऊलीला माझा नमस्कार पावतोच न्हवं का?"
अक्कूताई कपाळा जवळ हात जोडत, नमस्कार करत, म्हणाल्या.

"पण अक्कूताई, तुम्ही उपास केलाय का जेवताय, हे बघायला तुमच्या घरांत कोणी येणार आहे का? विठ्ठलावर तुमची भक्ती आहे, तर उपास धरायचा होतात. म्हणजे देवाला तुमचा नमस्कार पोहोचला असता ना."

"उपासाचं काय घेऊन बसलात ताई? आमी करून खानारी मानसं. कामं नाय मिळाली, जिवाला आलं, कामाचा खाडा झाला, की आमाला तसाच उपास घडतुया की. आन् आता तुमी रोज आमच्या पोटाला देता. तुमच्या रुपाने रोज इट्टल मला भेटतोच न्हवं का?"

अक्कूताईंनी परत कपाळावर हात जोडून मला नमस्कार केला.

अक्कूताईंच्या रुपात मलाही  विठ्ठल भेटल्याचा भास झाला आणि नकळत माझे हात जोडले गेले.