गुरुवार, ४ सप्टेंबर, २०१४

आमची सखी

दोन दिवसांपूर्वी आमची चौदा वर्षांची सखी गेली. सखी म्हणजे आमची लाल रंगाची माटीझ गाडी बर का! तशी ती आमची तिसरी गाडी. आज नवीन गाडी (चौथी) आली सुद्धा. पण आमच्या लाल गाडीच्या आठवणी मनांत उसळून येताहेत. खरंतर गेली चार-पाच वर्षे ही गाडी विकून नवी गाडी घेऊया असा विचार चालू होता. पण गाडी विकायला आमचे मन काही केल्या उचल घेत नव्हते.

बरं, गाडी न विकण्यामागे,  प्रत्येकाची वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळी कारणे होती. गाडीबद्दलची भावनिक ओढ हे एक कारण होतेच. आत्तापर्यंत आमच्या या गाडीने आम्हाला मुळीच त्रास दिलेला नव्हता. कधी दुरुस्तीसाठी मोठा खर्चही आलेला नव्हता. या दोन्ही कारणांमुळे  मला आणि आनंदला आमची ही सखी विकूच नये असे वाटायचे. एकदा गाडी विकायचा विषय निघाल्यावर अनिरुद्ध खूपच  भावूक झाला. त्याच्या डोळ्यात पाणीच  येईल की  काय असे वाटले. मग तो विषय पुढे सरकलाच नाही. 

पण माटीझ गाडी बनवणारी "देवू" ही कंपनीच बंद पडलेली असल्यामुळे गाडी बाहेरगावी घेऊन जायला हल्ली जरा भीतीच वाटायची. गाडी कुठे बंद वगैरे पडली आणि एखादा सुटा भाग ऐनवेळेला मिळाला नाही तर पंचाईत व्हायची या विचाराने आम्ही गाडी लांबच्या प्रवासाला नेत नव्हतो. आपल्या स्वत:च्या गाडीतून बाहेरगावाला जाता येत नाही म्हणून मग नवी गाडी घ्यायचा विचार सुरु झाला. लाल माटीझ गाडी विकण्याबद्दलही  सर्वांच्याच मनाची तयारी झाली होती. पण प्रत्यक्षात गाडी जायच्या दिवशी आम्ही सगळेच बेचैन झालो. अनिरुद्धने गाडीबरोबर सर्वांचे फोटो काढले आणि जड मनाने आम्ही आमच्या चौदा वर्षांच्या सखीला निरोप दिला.

निदान अनिरुद्ध पुण्यात असताना त्याच्या समोर  आपली नवी गाडी यावी, ही माझी इच्छा तरी पूर्ण झाली, हेही नसे थोडके! पण याप्रसंगी आमच्या तीनही गाड्याबद्दलची माझ्या मनांतल्या विचारांची गाडी सुरु झालीय आणि ती गाडी ब्लॉग वर उतरवल्याशिवाय मला चैन पडणार नाही.