रक्ताचे नाते!
माझी आई, कै. सौ. वसुंधरा श्रीकृष्ण गोडबोले. तिचे माहेर खानदेशातल्या चाळीसगावचे. लग्न होऊन ती सासरी, म्हणजे माझ्या माहेरच्या सोलापूरच्या वाड्यात, १९५७ साली आली. जशी आली, तशी एकत्र कुटुंबातल्या धबडग्याला जुंपली गेली. आमच्या त्या मोठ्या वाड्यात, माझ्या काकांचीही कुटुंबे धरून आम्ही दहा-बारा माणसे एकत्र राहत होतो. माझे वडील वकील होते आणि त्यांचे ऑफिस घरातच होते. त्यामुळे सतत पक्षकारांचे येणे-जाणे घरी असायचे. आमचे जवळचे-लांबचे अनेक नातेवाईक बाहेरगावाहून येऊन आमच्या घरी उतरायचे. कधी कोणी कामानिमित्तही येत असत. कधी आत्या-मावश्या सहकुटुंब सुट्टीसाठी यायच्या, तर कधी कोणी पंढरपूर, गाणगापूर तुळजापूर, अक्कलकोटला जाऊन देवदर्शन करण्यासाठी यायचे. नात्या-गोत्यातला एखादा-दुसरा विद्यार्थी सोलापुरात शिकायला आल्याने आमच्याकडे राहिलेला असायचा. एकुणात काय, घरच्या दहा-बारा माणसांव्यतिरिक्त, बाहेरची दोन-चार माणसेही आमच्या वाड्यात मुक्कामाला असायचीच. त्यावेळी, घरात तिन्ही वेळा ताजा स्वयंपाक व्हायचा. तसेच मधल्या वेळच्या खाण्यासाठी चिवडा, चकल्या, लाडू वगैरे करणं असायचंच. वडिलांच्या ऑफिसमध्ये येणाऱ्या पक्षकारांना चहा किंवा सरबत द्यायची पद्धत होती. या सगळ्यामुळे माझी आई सतत स्वयंपाकघरात राबत असायची.
आमची आई अतिशय मोठ्या मनाची आणि कमालीची हौशी होती. दिवसभर सगळयांचे स्वयंपाक-पाणी अगदी उत्साहाने आणि हौसेने करायचीच, पण अनेक जबाबदाऱ्या ती स्वतःहून अंगावर घ्यायची. कुणाची काही अडचण आहे असे कळले की आई पदर खोचून पुढे असायची. आजारी माणसाजवळ रुग्णालयात बसणे असो, एखाद्या बाळंतिणीला चवीचे खाणे-पिणे पोहोचवणे असो, कोणाचे डोहाळजेवण असो, कोणाचे मूल सांभाळणे असो, किंवा कोणाचे बाळंतपण असो. त्या सगळ्यांना मदत करण्यात आई पुढे असायची.
आम्ही लहान असताना, कधी-कधी आम्हा भावंडांना आईच्या या असल्या उद्योगांचा रागच यायचा. एखाद्या वेळेस मी आईवर चिडायचे. "तो अमुक तमुक, ना आपल्या नात्याचा-ना गोत्याचा. तुला कशाला गं सगळयांना मदत करायला हवी? आणि ओढून ओढून अंगावर ही कामं का घ्यायची? तू इतकी धावून मदत करतेस, भविष्यात ही माणसं काय तुझ्या वेळेला उभी राहणार आहेत का? त्यावर आईचं नेहमीचं उत्तर ठरलेलं असायचं ,"स्वाती, आपण नेहमी आपलं मन मोठ्ठ ठेवावं. जमेल तिथे आणि जमेल त्याला, आपल्याला जमेल ती मदत करत राहावं. त्यात "समोरच्याचे आणि आपले रक्ताचे नाते आहे की नाही?" एवढाच कोता विचार करू नये. गरजवंताला मदत करत राहावं. ते त्याची परतफेड करतील की नाही याचाही विचार आपण करू नये. निरपेक्षपणे आपण इतरांना मदत करत राहिलो तर आपल्या वेळेला कोणी ना कुणीतरी उभे राहतंच. मग भले आपले आणि त्यांचे रक्ताचे नाते असो व नसो."
आईचे हे बोलणे त्या काळात कधीच फारसे पटले नाही. पण, कोणी मदत मागितली किंवा कोणाला आपल्या मदतीची गरज आहे असे कळले की, पुढे होऊन, शक्य असेल ती मदत करायची, ही आईची शिकवण मात्र, नकळतच माझ्या रक्तात भिनत गेली.
तिच्या शेवटच्या दिवसात आई माझ्या घरी पुण्यात होती. तिला वेळोवेळी, हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले होते. तिचे अखेरचे आजारपण १० मार्च २०२० ते ३० एप्रिल २०२० इतका दीर्घ काळ टिकले. मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून करोना महामारीला काबूत ठेवण्यासाठी, संपूर्ण देशभर कडक लॉकडाऊनची घोषणा झाली. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून आईची तब्येत अधिकाधिक गंभीर होऊ लागली. तिला सेप्सीस झाले असल्याने रक्तस्राव होऊ लागला. तिला वरचेवर रक्त किंवा रक्तातील काही घटक देणे आवश्यक झाले होते. आईच्या शुश्रूषेसाठी माझा मुंबईचा भाऊ-वहिनीही पुण्यातच येऊन राहिले होते. आईसाठी आम्ही घरच्या सर्वानी रक्तदान केले. पण रक्तस्त्राव होतच राहिल्याने अजूनही अनेक बाटल्या रक्ताची आवश्यकता होती. कडक लॉकडाऊन आणि संचारबंदीमधे, आईसाठी रक्तदाते कुठून मिळवायचे? या चिंतेत आम्ही होतो. पण काहीतरी प्रयत्न करणे आवश्यक होते.
दवाखान्यातल्या आणि शहरातल्या रक्तपेढ्यांमध्ये सरसकट रक्तदान होत नसल्याने रक्त, आणि प्लाझ्मा किंवा प्लेटलेट्स अशा रक्तघटकांचा कमालीचा तुटवडा होता. त्यामुळे ते विकत घेणेही शक्य नव्हते. आम्ही सर्वानी नुकतेच रक्तदान केल्यामुळे, इच्छा असूनही, आम्हाला पुन्हा रक्त देता येत नव्हते. शेवटी हवालदिल होऊन, आम्ही मित्र-आप्त यांच्या व्हॉटसऍप ग्रुपवर रक्तदानाचे आवाहन केले. तसेच, आमचा संदेश जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याची विनंतीही त्या सर्वांना केली. पण, त्यावेळची सगळी परिस्थिती लक्षात घेता, स्वतःचा जीव धोक्यात घालून, पोलिसांकडून पास काढण्याची तसदी घेऊन, कोणी रक्तदाते पुढे येण्याबाबत आम्ही साशंकच होतो.
पुढच्या काही दिवसात मात्र कमालच झाली. ओळखीतल्या अनेक लोकांनी पुढे येऊन माझ्या आईसाठी रक्तदान केले. आमचा मित्र, निशिकांत भोमे याचे कुटुंबीय, आणि आमचे स्नेही श्री. संजय कणेकर यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या व्यक्ती यांचा विशेष उल्लेख करावासा वाटतो. अनेक मित्र-मैत्रिणींनी आमचे आवाहन त्यांच्या ग्रुप्सवर पुढे पाठवल्यामुळे चारही बाजूने मदतीचा ओघ सुरु झाला. श्री. संजय नायडू हे नवनाथ, सोमनाथ आणि सूर्या, या आपल्या सहकाऱ्यांसह त्वरित येऊन रक्तदान करून गेले. संजय नायडू आणि त्यांच्या या मित्ररिवाराशी माझी साधी तोंडओळखही नव्हती, हे विशेष. अशा कित्येक अनोळखी व्यक्ती येऊन रक्त देऊन गेल्या. कडक लॉकडाऊनमध्ये आणि करोनासारख्या जीवघेण्या महामारीचे सावट असतानाही, माणुसकीचा आलेला हा पूर पाहून आम्हाला आश्चर्य वाटले.
दहा-बारा रक्तदाते येऊन रक्तदान करून गेल्यानंतरही आईसाठी अजून रक्तदाते हवेच होते. याच सुमारास माझा मित्र श्री. नृसिंह मित्रगोत्री यांने 'रक्ताचे नाते' नावाच्या सेवाभावी संस्थेच्या श्री. रामभाऊ बांगड यांचा दूरध्वनी क्रमांक मला पाठवला. श्री. बांगड यांच्याशी मी बोलले. काही वेळातच, ते स्वतःबरोबर एका रक्तदात्याला आईसाठी रक्तदान करायला घेऊन आले. "कितीही बाटल्या रक्त लागले तरीही मी ते पुरवीन, तुम्ही काळजी करू नका" असा दिलासा मला देऊन गेले. 'रक्ताचे नाते' या संस्थेबद्दलची माहिती त्यांच्या वेबसाईटवर वाचता येईल. http://www.raktachenate.org/AboutUs/About-Raktache-Nate-Charitable-Trust
३० एप्रिल २०२० ला माझ्या आईने देहत्याग केला. पण जाता-जाता, 'रक्ताच्या नात्याची' अनेक माणसे ती आमच्यासोबत जोडून गेली!
"रक्ताचे नाते असो व नसो, आपल्याला शक्य असेल त्या परीने, निरपेक्षपणे आपण इतरांना मदत करावी, आपल्या वेळेला कोणी ना कोणीतरी उभे राहतेच," हा तिचा विश्वास किती खरा होता, ते आमच्या आणि तिच्याही नकळत, ती आम्हाला दाखवून गेली.
आईच्या आजारपणात आमच्याशी 'रक्ताचे नाते' जुळलेल्या, या अनेक अनोळखी, अनामिक रक्तदात्यांमुळे अगदी निरपेक्षपणे इतरांच्या वेळेला उभे राहण्याची प्रेरणा मला मिळाली.