६ मे चा दिवस हा आमच्या सहलीचा शेवटचा दिवस होता. त्या दिवशी सकाळी ११ वाजेपर्यंत आम्हाला आमची खोली सोडायची होती. दुपारी आनंदचा मित्र, मेजर जनरल मनदीप कोहली याने आम्हाला कसौली क्लबमध्ये जेवायला बोलावले होते. कसौलीच्या हॉलिडेहोमची देखरेख करणाऱ्या हवालदाराला, "आमची खोली जरा उशीरा सोडली तर चालेल का? असे आम्ही विचारले. त्याने उशीरात उशीरा दुपारी चार वाजेपर्यंत खोली सोडता येईल असे सांगितले. जनरल कोहली आणि पम्मी कोहली यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारत आमचे जेवण दोन वाजेपर्यंत संपले. त्यानंतर आम्ही कसौलीच्या, Central Reasearch Institute या सुप्रसिद्ध संस्थेला भेट दिली. तिथे वेगवेगळ्या आजारावरच्या लसी कशा तयार होतात, याची माहिती घेतली.
आम्ही त्या रात्री बाराच्या सुमारास नेताजी एक्सप्रेसने काल्काहून दिल्लीला जाणार होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी दिल्लीहून मुंबईला विमानाने परतणार होतो. कसौली ते काल्का टॅक्सीने जेमतेम दोन तासांत पोहोचता येते. त्यानंतर काल्का रेल्वेस्थानकावर पाच ते सहा तास वेळ कसा काढायचा? हा प्रश्न आमच्या समोर होता. पण कर्नल प्रताप जाधव (सेवानिवृत्त), या आनंदच्या मित्राने तो प्रश्न चुटकीसरशी सोडवला. कसौलीहून काल्काला जाण्याआधी थोडी वाट वाकडी करून दगशाई छावणीला भेट द्यायचा सल्ला त्याने आम्हाला दिला. तिथे असलेले दगशाई कारागृह आणि दगशाई संग्रहालय ही दोन्ही ठिकाणे आवर्जून बघण्यासारखी आहेत, असेही तो म्हणाला. आम्हाला वेळ काढायचा होताच. त्यामुळे आम्ही साधारण तीन-साडेतीन वाजेपर्यंत कसौली हॉलिडे होम सोडले आणि दगशाईचा रस्ता पकडला. भरपूर नागमोडी वळणे घेत, दोन तीन डोंगर ओलांडून शेवटी आम्ही दगशाई छावणीमध्ये पोहोचलो. आम्ही वाटेतूनच फोन करून पूर्वसूचना दिल्यामुळे आमच्या स्वागतासाठी तिथे आर्मीचा एक जवान दक्ष होताच. त्याने आम्हाला दगशाई छावणीची, तिथल्या कारागृहाची आणि संग्रहालयाची सविस्तर माहिती दिली.
एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीपासूनच गुरखा, अफगाण आणि शीख राजांच्या कडव्या प्रतिकारामुळे धास्तावलेल्या इंग्रजांना, आसपासच्या भागातल्या छोट्या राजांच्या आणि जंगली टोळ्यांच्या म्होरक्यांच्या हालचालींवर बारीक नजर ठेवण्याची गरज भासत होती. म्हणून त्यांना या दुर्गम भागात एखादी भक्कम छावणी हवी होती. १८४७ साली, ईस्ट इंडिया कंपनीने ६०७८ फूट उंचीची एक टेकडी आणि आसपासची पाच गावे पतियाळाच्या महाराजांकडून फुकटात मिळवली. त्यापैकीच दगशाई या गावाच्या नावाचीच छावणी इंग्रजांनी या टेकडीवर वसवली. १८४९ साली इंग्रजांनी दगशाई छावणीमध्ये एक भक्कम कारागृह बांधले. इंग्रजी T अक्षराच्या आकारात बांधलेल्या या कारागृहामध्ये एकूण चौपन्न खोल्या आहेत. त्यापैकी अकरा खोल्यांमध्ये कारागृहाचे अधिकारी व कर्मचारी यांची कार्यालये व निवासस्थाने होती. उरलेल्या ४३ खोल्यांपैकी २७ साध्या कोठड्या आणि १६ एकांतवास कोठड्या होत्या. ही माहिती ऐकत आम्ही कारागृहाच्या मुख्य दरवाज्यापर्यंत पोहोचलो.
कारागृहाच्या भक्कम लोखंडी दरवाज्याच्या वरच्या भिंतीत एक अवजड पितळी घंटा बसवलेली दिसली. त्या घंटेचे नाव, 'मृत्युघंटा' आहे असे आम्हाला आमच्या वाटाड्याने सांगितले. ब्रिटिश काळामध्ये या कारागृहातील एखाद्या कैद्याला फाशी दिल्यानंतर ती घंटा जोरजोरात वाजवली जाई. तिचा आवाज संपूर्ण पंचक्रोशीत घुमत असल्यामुळे आपोआपच आसपासच्या नागरिकांमध्ये जरब निर्माण होत असे. हे वर्णन ऐकूनच माझ्या अंगावर सर्र्कन काटा आला.
बारा फूट लांब, आठ फूट रुंद आणि वीस फूट उंच असलेल्या प्रत्येक कोठडीला पोलादी गजांचा एक दरवाजा आणि छताजवळ एक छोटीशी खिडकी आहे. खिडकीपर्यंत चढणे तर अशक्यच आहे, आणि दरवाजा व खिडकीचे पोलादी गज इतके मजबूत आहेत की ते कापून पळून जाण्याचा विचारही कुणाच्या मनात येणार नाही. संपूर्ण कारागृहाची जमीन सागवानी लाकडाची आहे. हे कारागृह बनवतानाच, त्या लाकडांवर वाळवीप्रतिबंधक प्रक्रिया केलेली असल्यामुळे आजही ती लाकडे सुस्थितीत आहेत. त्या लाकडी जमिनीखालून, एका पाइपलाइनमधून बाहेरची स्वच्छ हवा आत आणण्याची व्यवस्था केलेली आहे. जमिनीखालच्या पोकळीमुळे कैद्यांच्या चालण्याचा हलका आवाजही बाहेरच्या सुरक्षारक्षकांना सहजी ऐकू येत असे. विचारपूर्वक केलेल्या अशा रचनेमुळे ते कारागृह अभेद्य होते.
कारागृहाच्या एका भिंतीमध्ये, एक मनुष्य जेमतेम उभा राहू शकेल, अशा आकाराची एक खोबण होती. त्या खोबणीला, कुलूप लावून बंद करता येईल असा, जाळीचा भक्कम पोलादी दरवाजा होता. एखाद्या कैद्याला अधिक कडक शिक्षा देण्यासाठी तासंतास या खोबणीत उभे केले जात असे. या अवधीमध्ये त्या कैद्याला विश्रांती मिळणे तर दूरच, साधी हालचाल करणेही दुरापास्त असे.
कारागृहाच्या एका बाजूला, तीन संलग्न खोल्यांची एक छळकोठडीही होती. त्या छळकोठडीत, कैद्याला दिल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या यातनांचे मी ऐकलेले वर्णन इथे लिहिणेदेखील मला नकोसे वाटते आहे. या छळकोठडीमधून कारागृहाच्या पिछाडीला उघडणारा एक दरवाजा होता. म्हणजे, एखादा कैदी छळादरम्यान मरण पावल्यास, त्याचे शव या दरवाज्यातून गुपचूप बाहेर नेण्याचीही व्यवस्था केलेली होती!
कारागृहातील कोठड्यांमध्ये पूर्वी वास्तव्य केलेल्या काही विशेष व्यक्तींसंबंधी माहितीही आम्हाला मिळाली. इंग्रजांच्या सेनेतील काही आयरिश सैनिकांनी आयर्लंडच्या स्वातंत्र्यलढ्याला पाठिंबा देत बंड पुकारले होते. यापैकी काही आयरिश सैनिकांना येथे ठेवण्यात आले होते. त्यापैकी, इमोन द वेलेरा नावाच्या एका कैद्याला भेटून आयरिश स्वातंत्र्यसंग्रामाची माहिती घेण्यासाठी, १९२० साली महात्मा गांधी दगशाई कारागृहात आले होते. गांधीजींच्याच विनंतीवरून, त्या रात्री त्यांची राहण्याची व्यवस्था तेथील एका कोठडीतच केली गेली होती. गांधीजींना थंडीचा त्रास होऊ नये म्हणून, त्या कोठडीच्या भिंतीत एक शेगडीदेखील ऐनवेळी बांधून घेतली गेली होती, जी आजही तेथे दिसते.
पंजाब राज्याची राजधानी पूर्वी शिमला येथे होती. तेथील उच्च न्यायालयात नथुराम गोडसे यांच्यावरील गांधीवधाचा खटला १९४८-४९ दरम्यान चालला होता. गोडसेंना दिल्लीहून शिमल्याला आणले जात असताना, वाटेत एक रात्र त्यांना याच दगशाई कारागृहातील एका कोठडीमध्ये ठेवले गेले होते. विशेष म्हणजे, या कारागृहामध्ये ठेवले गेलेले ते अखेरचेच कैदी होते.
गांधीजी आणि नथुराम गोडसे या दोघांचेही फोटो व माहिती त्या-त्या कोठडीबाहेर लावलेली आहे. या दोघांनीही, वेगवेगळ्या काळात व वेगवेगळ्या कारणास्तव, एकेक रात्र याच कारागृहात काढली होती, हा एक विचित्र योगायोगच म्हणायचा!
दगशाई कारागृह आणि संग्रहालयाच्या इमारती, बरीच वर्षे मिलिटरी इंजिनियर सर्विसेसच्या सामानाचे गोडाऊन म्हणून वापरात होते. मात्र, डॉ. आनंद सेठी यांनी २०१० साली सुरु केलेल्या अथक प्रयत्नांमुळेच या ऐतिहासिक वास्तूंना नवजीवन मिळाले आहे. डॉ. आनंद सेठी यांचे वडील, श्री. बाळकृष्ण सेठी हे १९४२-४३ दरम्यान दगशाई छावणीमध्ये Cantonment Executive Officer होते. त्यामुळे, डॉ. आनंद सेठी यांचे बालपण दगशाई छावणीतच गेले होते. डॉ. आनंद सेठी यांनी २०१० साली, दगशाई छावणीतील तत्कालीन ब्रिगेड कमांडर यांच्याकडून कारागृहाच्या वास्तूचे पुनरुज्जीवन करण्याची परवानगी मिळवली. पुढील वर्षभर अविरत मेहनत करून डॉ सेठींनी या वास्तू आजच्या रूपात आणल्या. त्यांच्याप्रति आभार व्यक्त केल्याशिवाय हा लेख पूर्ण होऊ शकणार नाही.
शिमल्याच्या आसपास पर्यटनासाठी जाणाऱ्या सर्वांनीच दगशाई कारागृह व संग्रहालयाला आवर्जून भेट दिलीच पाहिजे.
दगशाई कारागृह आणि संग्रहालय पाहून झाल्यावर आम्ही काल्का येथून नेताजी एक्प्रेसने रात्रभराचा प्रवास करून दिल्ली स्टेशनवर पोहोचलो. तिथून दिल्ली विमानतळावर जाऊन मुंबईला परतलो. अशा रीतीने आमची शिमला-कसौलीची सहल आनंदात पार पडली.