बुधवार, २७ सप्टेंबर, २०२३

आठवणींची पुडी!

आज सोलापुरात सकाळी सकाळी काही किराणामाल विकत घ्यायला घराबाहेर पडले. नऊ वाजत आले होते तरी एक-दोनच दुकाने उघडी दिसली. एका दुकानातून  सामान घेतले. त्या दुकानदाराने सगळे सामान वर्तमानपत्राच्या कागदाच्या वेगवेगळ्या पुड्यांमधे बांधून दिले. 
अलिकडे कित्येक वर्षांमधे मला अशा कागदाच्या पुड्या बघायची सवयच राहिलेली नाही. दुकानदाराने अगदी सफाईने भराभर पुड्या बांधल्या होत्या. घरी येईपर्यंत एकही पुडी सुटली नव्हती, हे विशेष. प्रत्येक पुडीच्या आत वर्तमानपत्राचा एक छोटा तुकडा बाहेरच्या मोठ्या तुकड्याला आधार देत होता! 

पूर्वी माझ्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक असलेली ही पुडी अचानकपणे माझ्या समोर आल्यामुळे मी भूतकाळात शिरले गेले. लहानपणी आईबरोबर  वाणीसामान आणायला मी जायचे. किराणामालाच्या दुकानात वर एक दोऱ्याने रीळ लटकवलेले असायचे. दुकानातले नोकर, सामानाच्या भराभर पुड्या बांधून द्यायचे त्यावेळी ते रीळ एका लयीत नाचत असायचे! घरी आल्यावर तो दोरा अगदी जपून सोडून आम्ही एका काडीला गुंडाळून ठेवायचो. तो दोरा पुडी बांधायला उपयोगी यायचा. "रिड्यूस, रीयुज आणि रिसायकल" या त्रिसुत्रीचा कुठल्याही प्रकारचा गाजावाजा किंवा घोष न करता आपण त्या त्रिसुत्री आचरणात आणत होतो.  

आपल्या आयुष्यात किराणामालाच्या व्यतिरिक्त अनेक पुड्या यायच्या. अनेकांच्या घरी फुलपुडा यायचा. तो तर पानात बांधलेला असायचा. भेळेच्या गाडीवर भेळ बांधून घेतली की ती कागदाच्या पुड्यातच  मिळायची. भाजलेल्या शेंगांची निमुळती पुडी खूपच मोहक दिसायची. देवळातला अंगाऱ्याची चपटी पुडी, परीक्षेला जाताना किती आधार देऊन जायची! केळी सुद्धा वर्तमानपत्रात बांधून दिली जायची. 

पण मधल्या काळात आपल्या नकळत या सगळ्या पुड्यांची जागा प्लॅस्टिकने घेतली आणि सगळ्या पुड्या गायब झाल्या. आज ही पुडी बघितल्यानंतर अचानक त्या सगळ्या पुड्या माझ्या डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. आज आता या लेखाच्या निमित्ताने ही पुडी मी सोडून दिलीय. आता तुम्हाला कोणकोणत्या पुड्या आठवत आहेत, ते सांगा बरं!