सोमवार, २९ मार्च, २०२१

आठवणींचे पक्के रंग!

माझ्या लहानपणी मला आईच्या मागे-मागे करायची सवय होती. तिच्या मागे स्वयंपाक घरात लुडबुड करण्यापासून, तिच्याबरोबर खरेदी करणे तर असायचेच. पण गंमत म्हणजे, ती एखादे गाणे गुणगुणायला लागली की तिच्यामागे आणि तिच्या सुरांत सूर मिसळून तेच गाणे म्हणणेही असायचे. अर्थात तिच्या मागे-मागे करण्याच्या सवयीमुळे नकळतपणे मी घरकाम, स्वयंपाक, शिवणकाम, बाजारहाट आणि बरच काही शिकले असावे, हे आता लक्षांत येतंय. 

आज आपल्या घराघरातून वॉशिंग मशीन्स असतात. पण आमच्या लहानपणी तसे नव्हते. हातानेच कपडे धुवण्याची पद्धत होती. घरोघरी कित्येक जण आपापले कपडे, स्वहस्ते धुवून टाकायचे. आमच्या घरी कपडे धुण्यासाठी कोणी ना कोणी मोलकरीण येत असे. माझे वडील वकील होते. त्यामुळे त्यांचे पांढरे सुती शर्ट्स रोजच्या धुण्यात असायचे. वडिलांचे ऑफिसही घरातच असल्याने ऑफिसमधील बाकांवरील तक्क्यांचे पांढरे अभ्रे धुवायला असायचे. तसेच माझी विधवा आज्जी बहुतेकदा पांढरी तलम सुती नऊवारी साडी नेसायची. शाळेच्या गणवेशाचे मुलींचे ब्लाउज व मुलांचे पांढरे शर्ट्स असायचे. अंथरुणांवर पांढरे पलंगपोस व उशांना पांढरे अभ्रे घालून आम्ही झोपायचो. सोलापुरात खूप डास असल्याने, पांढऱ्या सुती मच्छरदाण्या रात्री झोपताना वापरायचो. एकुणात काय, तर रोज बरेच पांढरे कपडे धुतले जायचे. तसेच रंगीत कपडेही असायचे. आमच्या घरी येणे-जाणे खूपच होते. त्यामुळे रोजच्या कपड्यांमध्ये भर म्हणून पाहुण्यांचे कपडेदेखील असायचे. अर्थात मोलकरणीला एकाच दिवशी जास्त  काम पडू नये म्हणून आई  पलंगपोस, अभ्रे, मच्छरदाण्या वगैरे जास्तीचे  कपडे  बाजूला ठेऊन द्यायची. एखाद्या दिवशी इतर कपडे कमी असले की ती हे जास्तीचे कपडे भिजवून ठेवायची. हा तिच्या होम मॅनेजमेंटचा भाग होता.

दुपारची जेवणे उरकून, अन्न काढून ठेऊन, ओटा व टेबल पुसून झाले की आई कपडे भिजवण्याचा कार्यक्रम सुरु करायची. आईच्या मागेमागे करताना, ती कपडे कशी भिजवतेय हे बघायला मला खूप आवडायचे. कधी कधी माझे भाऊसुद्धा, यावेळी आईच्या भोवती घुटमळत असायचे. आई आधी पांढरे व रंगीत कपडे वेगळे करायची आणि वेगवेगळे भिजवायची. सगळ्या शर्टांच्या मळलेल्या कॉलर्स ब्रशने घासून काढायची. माझ्या आठवणीप्रमाणे त्या काळी, आज सरसकट मिळतात तशा कपडे धुण्याच्या साबणाच्या पावडरी उपलब्ध नव्हत्या. त्यावेळी ५०१ नावाच्या साबणाच्या लांबट वड्या मिळायच्या. आई त्या वड्या आणत असे. आजच्या मुलांना कपडे धुण्याच्या वड्यांचा फक्त निळाच रंग माहित असेल. पण माझ्या डोळ्यासमोर मात्र ती ५०१ ची सोनेरी-पिवळ्या रंगाची वडीच येते. ती वडी किसून पाण्यात घालायची, साबणाचा कीस हाताने ढवळून साबण विरघळला की त्यात कपडे भिजवायची पद्धत होती.

साबणाची ती वडी किसण्यासाठी, लाकडी चौकटीत बसवलेली, मोठी भोके असलेली पत्र्याची एक किसणी होती. उकडलेले बटाटे किसून, वाळवण करण्याकरिता, तशीच एक वेगळी किसणी आमच्या घरात होती. आईच्या मागे लागून आम्ही मुले अनेकदा साबणाची वडी किसायचो. आईबरोबर उकडलेले बटाटे किसायला जशी मजा यायची तशीच मजा साबणाची वडी किसताना यायची. पण सकाळपासून घरकाम करून दमलेल्या आईला आमची लुडबुड नको-नको होत असे. तिला कपडे भिजवून जरा वामकुक्षी घ्यायची इच्छा असायची. पण आमच्या लुडबुडीमुळे तिला उशीर व्हायचा. एखाद्या वेळी वैतागून ती आमच्या पाठीत एखादा रट्टा घालून आम्हाला पळवून लावायची. 

उशांच्या पांढऱ्या अभ्र्यांवर, किंवा विशेषतः वडिलांच्या ऑफिसमधील तक्क्यांच्या अभ्र्यांवर डोक्याचे तेल लागून, व त्यावर धूळ बसून काळपट, तेलकट चिकट डाग पडलेले असायचे. कधी पांढऱ्या पलंगपोसावर पावलांचे मातकट ठसे उमटलेले असायचे. असे कपडे गरम पाण्यामध्ये धुण्याचा सोडा घालून आई भिजवत असे. ते भिजवताना हाताला झोंबू नये म्हणून ती एक लाकडी सोटा वापरायची. कडकडीत गरम पाण्यात सोडा घालून आई त्या लाकडी सोट्याने कपडे दाबत-दाबत भिजवत असताना बघायला मला खूप मजा यायची. त्या बादलीतून, थोड्या गरम पाण्याच्या आणि थोड्या सोड्याच्या वाफा येत असायच्या. कपडे भिजवण्यासाठी आणि धोपटून कपडे धुण्यासाठी असलेला तो सोटा कधी-कधी आम्हाला रट्टे देण्यासाठीही आईच्या हातून वापरला जायचा, हे सांगायला नकोच. 
आमच्या घरी रोज कमीतकमी दोन-तीन बादल्या कपडे असायचे. सगळे कपडे अशा पद्धतीने भिजवून ठेवण्याचा आईचा हा  कार्यक्रम १०-१५ मिनिटे तरी चाललेला असायचा. त्या वेळेपर्यंत ती चांगलीच दमलेली असायची व तिचे डोळे अगदी मिटायला आलेले असायचे. त्यामुळे ती लगेच वामकुक्षी घेण्यासाठी आडवी पडत असे. 

आईला दुपारची जेमतेम अर्धा-पाऊण तास झोप मिळत असावी. दुपारी चारच्या सुमारास धुणे आणि भांडी करणाऱ्या मोलकरणी एकामागोमाग यायच्या. माझ्या माहेरच्या वाड्यात कपडे धुण्यासाठी वेगळी मोरी होती. त्यात एक भला मोठा, आयताकृती, टाकी मारलेला दगड होता. त्या दगडावर कपडे ठेऊन हाताने घासून, चोळून किंवा धोपटून धुण्याची पद्धत होती. भिजवलेल्या कपड्यांच्या बादल्या घेऊन मोलकरीण त्या मोरीमध्ये कपडे धुवायला गेली की, आईचे कान तिकडे असायचे. मधून-मधून एक दोन वेळा तिकडे चक्कर मारून आई तिच्यावर बारीक लक्ष ठेवून सतत सूचना देत असायची. दगडावर कपडे धोपटण्याचा, हाताने किंवा ब्रशने घासून धुण्याचा, कपडे पिळण्याचा आणि ते झटकून वाळत घालण्याचा असे सगळे वेगवेगळे आवाज, आजही माझ्या कानात साठलेले आहेत. सोलापूरच्या कोरड्या आणि उष्ण हवेत दुपारी चार-साडेचारपर्यंत कपडे धुऊन वाळत घातले तरीही संध्याकाळच्या गाडीने परत जाणाऱ्या पाहुण्यांना त्यांचे कपडे धुवून-वाळवून मिळायचे. धुण्याच्या अथवा भांड्याच्या मोलकरणींपैकी एकीने बुट्टी मारली की आई तिचे काम दुसरीकडून करून घ्यायची. त्या मोलकरणीही एकमेकींची कामे फारशी कुरकुर न करता करायच्या. क्वचित प्रसंगी भिजवलेले कपडे आईलाच धुवावे लागायचे. अशावेळी घरातले सगळेजण, अगदी माझी आजी आणि वडीलदेखील आईला मदत करायचे. 

हळूहळू माझी आई वयस्कर झाली. तसेच, माझी आज्जीही शेवटची काही वर्षे अंथरुणाला खिळलेली होती. स्वतःच्या वयाची सत्तरी उलटल्यावरही माझ्या आईने माझ्या वयोवृद्ध आजीच्या मृत्यूपर्यंत तिचे सर्व काही कसोशीने केले. जुन्या कष्टाळू मोलकरणींनी त्यांची वये झाल्यामुळे किंवा त्यांना जरा बरे दिवस आल्यामुळे कामे सोडली. नव्या मोलकरणींचे काम आईला पसंत पडेना. नवीन मोलकरणी वरचेवर खाडे करायला लागल्या किंवा काही न सांगता कामे सोडून जायला लागल्या. मोलकरीण न आल्यास भिजवलेले कपडे धुणे आईला अशक्य व्हायला लागले. आईचे कष्ट आम्हाला बघवत नव्हते, पण आई-वडील घरात वॉशिंग मशीन घ्यायलाही तयार नव्हते. सुमारे पंधरा वर्षांपूर्वी माझ्या धाकट्या भावाने आणि वहिनीने आई-वडिलांच्या विरोधाला न जुमानता घरी एक वॉशिंग मशीन आणून टाकलेच. हळू-हळू अडीअडचणीला का होईना, आई-वडील ते वापरायलाही लागले. मात्र, वॉशिंग मशीनमध्ये कपडे चांगले धुतले जात नाहीत हे माझ्या आईचे अगदी शेवटपर्यंत ठाम मत होते. 

हल्ली आमच्या सोलापूरच्या घरात कायमस्वरूपी कोणीच राहत नाही. महिन्या दोन महिन्यातून आम्ही वडिलांना घेऊन पुण्याहून येतो. सोलापूरला आलो की सगळे कपडे आम्ही इथल्या वॉशिंग मशीनमध्ये धुतो. पण हल्ली ते वॉशिंग मशीनही वरचेवर बंद पडायला लागले होते. दोन-तीन वेळा दोन चार हजार खर्च करून दुरुस्त करून घेतले. पण ते परत नादुरुस्त झाल्यामुळे, आता नवीन मशीनच घ्यावे असे ठरले. आज ते जुने मशीन बदलून नवीन मशीन घेतले. या नवीन मशीनच्या निमित्ताने, आईचे ते एका ठराविक पद्धतीने कपडे भिजवणे, आमचे आईच्या कामात लुडबुडणे आणि मोलकरणीचे, "स्स...स्स...स्स" असा विशिष्ट आवाज करत कपडे धुणे या सगळ्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. आजच्या होळीच्या रंगांपेक्षाही या जुन्या आठवणींचे रंगच माझ्या मनाला जास्त मोहवून गेले.