रविवार, ११ एप्रिल, २०२१

"दहावीनंतरची सुट्टी"!

माझा मोठा भाऊ जयंत, शाळेत माझ्यापेक्षा एक वर्ष पुढे होता. त्याच्या दहावीचे संपूर्ण वर्षभर, घरातल्या बारीक-सारीक कामातून त्याची सुटका झाली होती. त्याचाच दाखला देऊन मीदेखील दहावीच्या वर्षात पूर्ण आराम केला. १९७८ साली आमची दहावीची परीक्षा शिक्षकांच्या संपामुळे जवळजवळ दोन महिने उशिरा झाली. परीक्षा  पुढे गेल्यामुळे मला जास्तीचे दोन महिने आराम करायला मिळाला. घरात कुठलेही काम करायचे नाही, अभ्यासाच्या नावाखाली पाठ्यपुस्तकांमध्ये कथा-कादंबऱ्या लपवून भरपूर अवांतर वाचन करायचे, असे माझे छान आयुष्य चालले होते.  परंतु, परीक्षा झाल्या-झाल्या माझी आई आणि आजी मला घर कामाला जुंपणार अशी लक्षणे मला दिसायला लागली होती.  शिवाय, माझी दहावी झाल्यावर जयंतची बारावी सुरू होणार होती. त्यामुळे त्याला आराम आणि मला जास्तीचे काम अशी धोकादायक परिस्थिती निश्चितच निर्माण होणार होती. 

या संभाव्य धोक्यापासून सुटका करून घेण्याकरिता मी एक शक्कल लढवली. त्यावेळी आमची प्रभाआत्या दिल्लीला राहत होती. तिचे यजमान श्री दादासाहेब, हे मिलिटरी इंजिनियर सर्व्हिस (MES) मध्ये मोठ्या हुद्द्यावरचे अधिकारी होते.  माझा आतेभाऊ राजीव याची IIT मध्ये ऍडमिशन झालेली होती, आणि त्याला कॉलेजमध्ये जायला अजून अवकाश होता. माझी आतेबहीण मालविका माझ्यापेक्षा ४-५ वर्षे लहान असल्याने तिचे अजून हुंदडायचेच दिवस होते. त्यामुळे, परीक्षा संपताच आपण प्रभाआत्या कडे जावे, आतेभावंडांबरोबर खावे-प्यावे, खेळावे, आणि भरपूर हिंडून "जिवाची दिल्ली" करत सुट्टी मजेत घालवावी, असा सोयिस्कर विचार मी केला.  त्यानुसार, एके दिवशी वडिलांचा चांगला मूड बघून, मी त्यांच्याकडून परीक्षेनंतर सुट्टीत प्रभाआत्याकडे दिल्लीला जायची परवानगी मिळवली. अर्थातच, ही परवानगी मी आई-आजींच्या अपरोक्ष मिळवलेली असल्यामुळे त्या दोघींची फारच चडफड झाली. 

इतक्या लहान मुलीला एकटेच दिल्लीच्या प्रवासात पाठवणे योग्य नाही, असे आईचे आणि आजीचे ठाम मत होते. परंतु, "आज तिची भीड चेपली तर तिला पुढे एकटीने प्रवास करणे अवघड जाणार नाही" असे म्हणून, आई आणि आजीच्या विरोधाला न जुमानता माझ्या उत्साही वडिलांनी माझे मुंबई ते दिल्ली असे राजधानीचे एसी चेअरकारचे तिकीट काढून टाकले. परीक्षा झाल्यानंतर मी सोलापूरहून मेलने एकटीच मुंबईला गेले. एक दिवस मुंबईत मुक्काम करून, पुढे सोळा तासांचा प्रवास करून मी दिल्लीला पोहोचले. प्रथमच एकटी प्रवास करत असल्याने मला नक्कीच थोडी भीती वाटली होती. भावी आयुष्यात, मी एका सेनाधिकाऱ्याची पत्नी झाले. कोणाच्याही सोबतीशिवाय दोन मुलांना घेऊन एकटीने भारतभर केलेल्या अनेक प्रवासात, माझा तो पहिला अनुभव अतिशय कामी आला. 

दिल्लीतील सरोजिनी नगरजवळ एका सरकारी कॉलनीत दादासाहेबांचा प्रशस्त फ्लॅट होता. उन्हाळ्याची सुट्टी भावंडांबरोबर पत्ते खेळत, निवांत लोळून पुस्तके वाचत, आणि दिल्ली दर्शन करण्यात मजेत जाणार या कल्पनेने मी मोठी हरखून गेले होते. मात्र, दिल्लीत गेल्या-गेल्या माझा भ्रमनिरास झाला. कधी एकदा स्वाती येते आणि तिला काय-काय वेगवेगळ्या गोष्टी आपण शिकवू शकू, अशा विचारात, प्रभाआत्या आणि दादासाहेब जवळ-जवळ टपूनच बसले होते. दादासाहेबांनी सरोजिनी मार्केटमध्ये माझ्यासाठी एक टायपिंगचा क्लास बघून ठेवलेला होता, आणि आत्याने मला भरतकाम आणि विणकाम शिकवण्याचा चंग बांधला होता. 

खरे सांगायचे तर, सुट्टीमध्ये यापैकी काहीही शिकण्यात मला स्वारस्य नव्हते. पण, त्या दोघांना तसे स्पष्टपणे सांगण्याची हिंमतही माझ्यात नव्हती. आता हे सगळे शिकावेच लागणार असे वाटत असतानाच, यापैकी काय शिकणे जास्त महत्वाचे आहे, या विषयावरून दादासाहेब आणि आत्या यांच्यामध्ये जोरदार वाद चालू झाला. दादासाहेबांच्या मते, टायपिंग आणि त्यापाठोपाठ शॉर्टहँड शिकणे हे माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे होते. तर आत्याच्या दृष्टीने, 'मुलीच्या जाती' ला विणकाम व भरतकाम येणे हे जास्त महत्त्वाचे होते. या दोघांच्या भांडणांत, आपला लाभ होतोय की काय असे सुखद विचार मनात येतात न येतात तोच त्या दोघांमध्ये अचानक समझोता झाला. असे ठरले की, सकाळच्या वेळी मी टायपिंगच्या क्लासला जावे आणि दुपारी आत्याने मला भरतकाम व विणकाम शिकवावे. मला मात्र, दिल्लीला येऊन अगदीच आगीतून फुफाट्यात पडल्यासारखे वाटले. 

सकाळी भरपेट नाश्ता करून मी जवळच असलेल्या सरोजिनी मार्केट मधल्या टायपिंगच्या क्लासला चालत जायचे. तिथे लवकर पोहोचण्याची मला मुळीच गडबड नसायची. त्यामुळे जाताना टंगळमंगळ करत, सरोजिनी मार्केटमध्ये दुकाने बघत, विंडो-शॉपिंग करत मी क्लासला पोचायचे. परतीच्या वाटेवर हे सगळे करत, आणि रमत-गमत येण्याची सोय नव्हती. कारण, मी वेळेत परत आले नसते तर आत्याला माझी काळजी वाटली असती. अर्थात क्लासलादेखील फार उशिरा पोहोचलेले चालायचे नाही. मी क्लासला वेळेवर जाते आहे की नाही आणि तिथे मी कशी प्रगती करते आहे, यावर दादासाहेबांचे बारीक लक्ष असायचे. महिनाभराच्या क्लासमधे रडतखडत का होईना, मी थोडेफार टायपिंग शिकले. आज कॉम्युटरच्या कीबोर्डवर टाईप करताना त्याचा मला उपयोग निश्चित होतोच.  तिथे नव्याने झालेल्या मित्रमैत्रिणींबरोबर गप्पा मारून थोडेफार हिंदी बोलायलाही शिकले. शिकलेल्या या दोन्ही गोष्टींचा मला माझ्या भावी आयुष्यात उपयोग झालाच. 

एकवेळ टायपिंगचा क्लास परवडला होता, पण आत्याचा क्लास मात्र मला अगदी नको-नकोसा व्हायचा. दुपारच्या जेवणानंतर लोळायच्या वेळेला आत्याचा क्लास सुरु व्हायचा. भरतकामातले बरेचसे टाके मी शाळेत शिकले आहे असे सांगून आणि दोन तीन प्रकारच्या टाक्यांची नावे सांगून मी भरतकाम शिकण्यापासून सुटका करून घ्यायचा मी प्रयत्न केला. पण माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत, आत्याने एका रिंगवर कापड ताणून लावले आणि प्रत्यक्षात कोणकोणते टाके मला घालता येतात याची खात्री करून घेतली. ते टाके मला घालता येतात हे समजल्यावर ती विणकामाकडे वळली. 



"सोलापुरात थंडी कुठे पडते? मला स्वेटर लागतच नाहीत." अशा सबबी सांगून विणकामातूनदेखील आपल्याला निसटता येईल का असे मी पाहिले. पण माझ्या हातात दोन विणकामाच्या सुया आणि लोकरीचा एक गुंडा देऊन आत्याने मला उलट-सुलट टाके शिकवलेच. एकदाचे उलट-सुलट टाके शिकून झाले की हा क्लास संपला, असे मला वाटत असतानाच आत्याने फर्मान काढले. "एक छोटासा का होईना, स्वेटर तुला विणायलाच पाहिजे"! त्यामुळे मग नाईलाजाने माझे स्वेटर विणणे चालू झाले. एवढासा वीतभर स्वेटर विणायला मी एक महिना लावला. टाके निसटणे, 'उलट' च्या जागी 'सुलट' टाके घालणे, अशा चुका वरचेवर केल्यामुळे अनेकदा तो स्वेटर उसवावा लागला. एकूणच विणकामातली माझी गती आणि रस बघता, फुलपाखराची वीण किंवा पिळाची वीण वगैरे शिकवण्याचा आपला उत्साह आत्याने गुंडाळून ठेवला असावा. पूर्ण महिनाभरानंतरच टायपिंग आणि विणकाम या 'डबल ट्रबल' मधून माझी सुटका झाली. 

आपल्या आयुष्याच्या प्रवासात, आपल्या घरातून, आपल्या शिक्षणातून आणि व्यवसायातून आपण अनेक स्किल्स किंवा कसब शिकत असतो. शिकलेले कुठलेही कसब वाया जात नाही. आनंदच्या आर्मीतल्या नोकरीमुळे लग्नानंतर आम्हाला बऱ्याच थंड हवेच्या ठिकाणी राहावे लागले. तिथल्या कडाक्याच्या थंडीला तोंड द्यायला, विकतच्या स्वेटर्सपेक्षा, हाताने विणलेले, उत्तम, लोकरीचे उबदार स्वेटर्सच जास्त उपयोगी पडायचे. दिल्लीतल्या माझ्या त्या सुट्टीनंतर अनेक वर्षांनी, शेजार-पाजारच्या तरबेज उत्तर हिंदुस्तानी मैत्रिणींची मदत घेत, आनंदसाठी एक आणि माझ्या धाकट्या भावासाठी, गिरीशसाठी  एक, असे दोन स्वेटर्स मी महामुश्किलीने विणले. पण, 'उलट-सुलट' करत बसण्याच्या त्या एकसुरी कामात मला कधीही गोडी वाटली नाही, हेच खरे. 

माझ्या सासूबाईंच्या इतर अनेक कलागुणांबरोबरच, त्यांना विणकामातही खूपच गति आहे, हे आमच्या लग्नानंतर काही दिवसातच माझ्या लक्षात आले. विशेषतः थंडीच्या दिवसात, बागेत ऊन शेकत, अतिशय सुबक स्वेटर्स त्या भराभर विणायच्या. त्यांची आवड माझ्या चांगलीच पथ्यावर पडली. माझे, आनंदचे आणि मुलांचेही सगळे स्वेटर्स विणण्याचे काम मी  सरळ त्यांना आउटसोर्स करून टाकले. त्यांनी त्यावेळी विणलेले छान स्वेटर्स, आम्ही अजूनही वापरतो. 

आपल्याला आवडत नसलेले किंवा येत नसलेले काम, गोड बोलून, इतरांकडून (अगदी आपल्या सासूबाईंकडूनही ) करून घेणे, हेही एक स्किलच आहे. नाही का? 

वेगवेगळी स्किल्स डेव्हलप करणाऱ्या "स्किल डेव्हलपमेंट सेंटर" बद्दल मी परत कधीतरी लिहीन!