रविवार, ३१ मे, २०२०

अनलॉक-१.0

आज मे महिना संपला. मे महिन्याच्या आपल्या सगळ्यांच्या काही विशेष आठवणी असतात. मे महिना आला की मला सगळ्यात आधी आठवण येते ती बाबांची, म्हणजे माझ्या सासऱ्यांची. परिवारातील सगळ्यांचे वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस बाबा आवर्जून लक्षात ठेवायचे. त्या-त्या तारखेला त्या व्यक्तींना फोन करून ते हमखास शुभेच्छा द्यायचेच. मे महिन्यात त्यांच्या सहा नातवंडांपैकी तीन नातवंडांचे वाढदिवस असल्यामुळे, मेच्या सुरुवातीपासूनच, अमुक तारखेला याचा वाढदिवस, तमुक तारखेला हिचा वाढदिवस, या तारखेला अमक्यांच्या लग्नाचा वाढदिवस, त्या तारखेला तमक्याची मुंज झाली होती, असे तपशील ते वरचेवर घोकत राहायचे. नातवंडांसाठी, स्वहस्ते एक छानसे ग्रीटिंग करायचे. त्या  ग्रीटिंगच्या वरच्या कोपऱ्यात त्यांचे एक 'ट्रेडमार्क' फूल काढलेले असायचे. माझ्या मुलाचा, अनिरुद्धचा वाढदिवस मे महिन्यातला. तो भारताबाहेर शिकायला गेल्यानंतर दर वर्षी, जवळजवळ १ मेच्या सुमारासच बाबा त्याचा पत्ता आमच्याकडून कन्फर्म करून घ्यायचे आणि त्याला ग्रीटिंग करून पाठवायचे. दरवर्षी, बाबांनी घोकलेल्या तारखा आणि वाढदिवसाचे तपशील ऐकून घरातल्या सगळ्यांना मे मधले वाढदिवस लक्षात राहिले आहेत. मे महिन्यात बाबांचा एक वाढदिवस असायचा. प्रत्यक्षात त्यांचा जन्म जुलै महिन्यातला. पण त्यांना शाळेत घालताना कुणीतरी अंदाजे ३० मे अशी तारीख लावून टाकली होती. त्यांचे हे दोनही वाढदिवस साजरे केलेले त्यांना आवडायचे.

मे महिन्यातल्या लहानपणीच्या तर अनंत आठवणी आहेत. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आते-मामे-चुलत-मावस भावंडांसोबत घातलेला धिंगाणा आठवला की पुन्हा लहान व्हावेसे वाटते. एकत्र जमलेल्या सगळ्या बाळगोपाळांना खेळण्यासाठी भरपूर जागा आणि वाट्टेल ते करायची मुभा माझ्या माहेरच्या मोठ्या वाड्यात होती. घरात एका खोलीत, रायवळ आंब्याची आढी लावलेली असायची. आम्ही मनसोक्त आंबे चोखायचो. दुपारच्या जेवणात रोज आमरस असायचाच. काका किंवा वडील, मंडईतून आमरसासाठी वेगळे आंबे आणायचे. आणलेले आंबे बादलीत बुडवून ठेवायचे. आंबे पिळणे, मोठ्ठे पातेले भरून रस काढणे, आंब्यांच्या कोयी चोखणे हे कार्यक्रम झाले की दुपारची जेवणे व्हायची. डायटींग, कॅलरीज, कोलेस्टेरॉल वगैरे शब्द त्यावेळी आमच्या किंवा घरातल्या कोणा मोठ्यांच्याही शब्दकोशात नव्हते. त्यामुळे आम्ही अगदी पोट फुटेस्तोवर जेवायचो. घरातल्या मुलांच्या पांढऱ्या छाटणींवर आणि मुलींच्या पांढऱ्या पेटीकोटवर आंब्यांमुळे केशरी नक्षी उमटायची. दुपारभर सगळे मिळून, पत्त्यांचे डाव, व्यापार किंवा कॅरम खेळायचो. संध्याकाळी अंगणात आणि गच्चीवर पाणी मारायचो. रात्री सगळी भावंडे गच्चीत झोपायचो. एकमेकांना भुताटकीच्या गोष्टी सांगायचो. एखाद्या संध्याकाळी, घरच्याघरी पॉटमध्ये आईस्क्रीम करायचा बेत असायचा. त्या 'फॅमिली आईस्क्रीम पार्टी'ची सर आजच्या कुठल्याही 'फॅमिली पॅक'ला येत नाही. पुढच्या पिढीतल्या मुलांना इतकी भावंडे नसतील, आणि असलेली भावंडे सर्रास एकत्र येण्याची शक्यताही कमीच असणार आहे. त्या बिचाऱ्यांना आम्ही चाखली ती मजा कुठून मिळणार? 

माझी मुले शाळेत जायला लागल्यावर, मे महिन्यात त्या दोघांच्या इंग्रजी शाळेत, दोन वेगवेगळ्या तारखांना सगळी वह्यापुस्तके मिळायची. ती आणायला शाळेत मला जावे लागायचे. ती ढीगभर वह्यापुस्तके आणणे, त्यांना कव्हर्स घालणे, त्यावर नावे लिहिणे हा कार्यक्रम चालायचा. माझ्या मुलांच्या सुदैवाने, त्यांच्या लहानपणी मे महिन्याच्या सुट्टीत त्यांच्यासोबत खेळायला त्यांची दोन मामे  भावंडे तरी होती. त्या चौघांना वॉटर पार्कला नेणे, समर कॅम्पला पाठवणे, त्यांच्यासाठी नवनवीन पदार्थ करणे किंवा त्यांची भांडणे सोडवणे, असे उद्योग मला असायचे. पण माझ्या वैद्यकीय व्यवसायामुळे, रविवार सोडला तर इतर कुठल्याही दिवशी मला सुट्टी नसायची. त्यामुळे त्यांच्यासोबत मजा करायला मला निवांत वेळ कधीच मिळाला नाही, याचे वाईट वाटतेच. पुढे मुले मोठी झाली. ऑलिम्पियाड सारख्या  मानाच्या परीक्षांमध्ये प्राविण्य मिळवून देशपातळीवर होणाऱ्या शिबिरांमध्ये त्यांची निवड होत राहिली. त्यामुळे मे महिन्यांत, त्या शिबिरांसाठी त्यांना मुंबईला सोडणे-आणणे हे एक सुखद व्यवधान असायचे. मे महिना संपताना या शिबिरांचा शेवट यायचा. भारताच्या संघात आपल्या मुलांची निवड होते की नाही, याची हुरहूर लागलेली असायची. शिबिरांच्या सांगतासमारंभांना हजर राहून मुलांना घरी परत आणायला मी जायचे. एखाद्यावर्षी, भारतीय संघात मुलांची निवड झाली नाही तरीही त्यांना हिरमुसले होऊ न देणे हे मोठे नाजूक काम असायचे. शिबिरासाठी भारताच्या वेगवेगळ्या शहरातून आलेल्या विद्यार्थ्यांशी आणि त्यांच्या पालकांशी गप्पा मारण्यात, माहितीची देवाण-घेवाण करण्यात, मे महिना कधी संपून जायचा ते कळायचेच नाही. पुढे मुले परदेशी गेल्यावर जून-जुलै मध्ये सुट्टीवर येऊ घातलेल्या मुलांच्या वाटेकडे डोळे लावून बसण्यात मे महिना निघून जायचा.  यंदाचा मे महिना मात्र अगदीच विचित्र अवस्थेत 'लॉकडाऊन' मध्ये  गेला. माझ्या आईच्या मृत्यूच्या दुःखाचे आणि करोनाच्या भीतीचे सावट तर होतेच. 

आज पहाटे फिरायला गेले तेव्हाही तेच विचार माझ्या मनाला अस्वस्थ करत होते. पण अचानकच, रोजच्या पाहण्यातल्या एका बंगल्याच्या आवारात, एक 'मे-फ्लॉवर' फुललेले दिसले. कालपर्यंत ते दिसले नव्हते. अनेक छोट्या-छोट्या नाजूक फुलांनी बनलेले, ते लालचुटुक गोलाकार फूल बघून माझे मन प्रसन्न झाले. गेल्या अनेक वर्षांच्या मे महिन्याच्या आठवणी मनातल्या मनात फुलून आल्या आणि माझ्या मनाचाही 'अनलॉक-१.०' चालू झाल्याचे मला जाणवले.   
शनिवार, ३० मे, २०२०

माझा रेसकोर्सचा नाद !


लहानपणापासून मला पहाटे लवकर उठायची सवय आहे. पहाटेच्या शांत, थंड आणि शुद्ध हवेमधे गरमागरम चहाचा आस्वाद घ्यायला मला फार आवडते. माहेरी, माझी आजी, भल्या पहाटे उठायची व दूध न घालता काळी कॉफी प्यायची. 
आज्जीच्या हातचा चहा विशेष चांगला व्हायचा. बरेचदा, मी आजीला माझ्यासाठी चहा करण्याची गळ घालायचे.  एकीकडे तिची कॉफी करत दुसरीकडे ती मला चहा करून द्यायची. मी मेडिकलचे शेवटचे एक वर्ष माझ्या मोठ्या काकांच्या, अप्पांच्या बंगल्यावर राहिले. तिथे मी आणि काका पहाटे उठून चहा प्यायचो व नंतर मी अभ्यासाला बसायचे. इंटर्नशिपपासून मात्र या सकाळच्या चहानंतर व्यायामासाठी बाहेर पडायची सवय मला लागली. भल्या पहाटे घराबाहेर पडून व्यायाम करण्यासाठी माझे शरीर आणि मन आसुसलेले असते. 

माझ्या लग्नानंतरही आजतागायत व्यायामाची सवय आहेच. आनंद आर्मीच्या नोकरीत असेपर्यंत त्याला पहाटे उठणे बंधनकारक होते. त्यामुळे आम्ही पहाटेचा चहा एकत्र घ्यायचो. त्यानंतर तो आर्मीच्या पीटी परेडला व मी माझ्या व्यायामाला, असे बाहेर पडायचो. पुढे मुलांच्या शिक्षणासाठी मी पुण्यात राहिल्यामुळे बराच काळ आम्ही वेगवेगळे राहिलो.  १९९७ सालापासून आम्ही मुख्य पुणे कँटोन्मेंटमधे, म्हणजे सदर्न कमांड हेडक्वार्टरच्या जवळ, आर्मीच्या क्वार्टर्समध्ये राहायला आलो. आनंद त्याच्या बदलीच्या ठिकाणाहून पुण्याला येऊन-जाऊन असायचा. पुढे २००७ साली आनंदने सैन्यातून स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यानंतर आम्ही कँटोन्मेंटच्या हद्दीलगतच असलेल्या आमच्या सध्याच्या घरात राहू लागलो.  त्यामुळे आजही आम्ही पुणे कँटोन्मेंटमधे राहात असल्यासारखे वाटते. आनंदने सेवानिवृत्तीनंतर हळूहळू पहाटे उठणे बंद केले. पण मी मात्र माझ्या सवयीप्रमाणे पहाटे उठते, चहा घेते आणि मोठ्या उत्साहाने एकटीच व्यायामाला बाहेर पडते. अर्थात हे रोज जमतेच असे नाही. पण रोज जाण्याचा माझा प्रयत्न असतो. 

मला रेसचा जरी नसला तरीही पहाटे पुणे रेसकोर्सवर फिरायला जाण्याचे व्यसन १९९७-९८ सालापासून लागले. रेसकोर्सच्या मध्यावर एक वर्तुळाकार मैदान आहे. तिथे घोड्यांचे प्रशिक्षण चालते. त्या मैदानाच्या परिघाभोवती चालण्यासाठी २ किलोमीटर लांबीचा, एक साधारण लंबवर्तुळाकार वॉकिंग ट्रॅक आहे. त्या चालण्याच्या ट्रॅकच्या परिघाभोवती घोड्यांचा पळण्याचा ट्रॅक आहे. बाहेरच्या ट्रॅकवर दौडणाऱ्या घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकत, वेगात धावणाऱ्या घोडयांना बघत, रेसकोर्सवर चालण्यात किंवा पळण्यात मला कमालीची नशा वाटते. कधीकधी जवानांची एखादी तुकडी सकाळच्या पीटी परेडला तिथे येते. मग काय, घोड्यांच्या टापांच्या आवाजाबरोबरच, पळणाऱ्या सैनिकांच्या बुटांचा आवाजही येतो आणि रेसकोर्सवरचे वातावरण अजूनच नशिले होते.  आठ-नऊ वर्षांपूर्वीपर्यंत, घरातून  पहाटे ५-५.३० च्या सुमाराला निघून, रेसकोर्सपर्यंतचे दोन किलोमीटर अंतर चालत मी सहाच्या आत रेसकोर्सवर हजर असायचे. चार-पाच फेऱ्या जॉगिंग करायचे. पण व्यायामाच्या व्यसनापेक्षा, माझे खादाडीचे व्यसन जास्त प्रबळ असल्याने, माझे वजन वाढत गेले. त्यामुळे जॉगिंगपेक्षा आता सायकलिंगवर भर आहे. पहाटे दहा बारा किलोमीटर सायकलिंग करून नंतर मग रेसकोर्सवरच्या ट्रॅकवर चालत एखादी फेरी मारते. 

रेसकोर्सवर फिरण्यामधे, मला नेमकी कशाची नशा जास्त येते हे सांगणे तसे अवघड आहे. सर्व बाजूने गोलाकार दिसणारे आकाश, आणि थंडगार वारे मनाला भुरळ घालतातच. पण अठरापगड जातींचे, धर्मांचे, लहान मुलांपासून अगदी जख्खड म्हातारे, वेगवेगळ्या वेशभूषा केलेले, विविध नोकऱ्या वा व्यवसाय करणारे, वेगवेगळ्या आर्थिक स्तरातले स्त्री-पुरुष मला तिथे दिसतात. फिरत असताना या सर्व व्यक्तींचे बोलणे अर्धवटच माझ्या कानावर पडत असते. ते ऐकण्याचा आणि त्या व्यक्तीबद्दल मनातल्या मनात काही आडाखे बांधण्याचाही मला नाद आहे. त्यातल्या कांहींशीच माझी ओळख आणि काहींशी विशेष मैत्री झालेली आहे. पण अनेक व्यक्तींचे नाव मला किंवा माझे नाव त्यांना माहिती नाही. तरीही आमची "अबोल मैत्री" आहे. रोज ठराविक वेळी दिसणारी व्यक्ती दिसली नाही की मला अगदी चुकल्या-चुकल्यासारखे होते. ती व्यक्ती दुसऱ्या दिवशी दिसली की अगदी हायसे वाटते. जसे मला वाटते अगदी तसेच त्यांनाही वाटत असणार याची मला खात्री आहे. त्यातली एखादी व्यक्ती इतर वेळी बाहेर कुठे भेटली तर आम्ही अगदी खूप जुनी ओळख असल्यासारखे, सलगीने बोलायला लागू, असे वाटते. पण या सर्व गोष्टींपेक्षाही रेसकोर्सच्या वातावरणात ऐकू येत असलेल्या घोड्यांच्या टापांच्या आवाजाच्या नादात, माझ्या मनाला, एखाद्या अबलख वारूसारखे उधळू द्यायला मला फार आवडते. 

सध्या लॉकडाऊनमुळे रेसकोर्स बंद आहे. मी रोज पहाटे पाच-साडेपाचला उठून एम्प्रेस गार्डनच्या मागच्या भागात, व्हिक्टोरिया रोड, नेहरू रोड , अलेक्झांडर रोड, या भागात सायकलस्वारीला जाते. अतिशय शांत, दुतर्फा झाडी असलेला, अनेकविध पक्षांच्या आवाजाने संगीतमय झालेला, वेगवेगळ्या जातींच्या आणि रंगांच्या फुलांनी सजलेला, ब्रिटिशकालीन प्रशस्त बंगले असलेला, हा अतिशय सुंदर परिसर आहे. तिथे फोर्ट कॉम्प्लेक्सच्या आसपास अनेक मोर मला रोज दिसतात. ते मोर पाहून मनी मोर नाचण्याचा, सध्या मी रोज अनुभव घेतेय. पण या सगळ्या रम्य वातावरणात, माझ्या मनाला बेलगाम उधळू देण्याची किमया करणाऱ्या रेसकोर्सची नशा मात्र नाही. त्यामुळेच कधी एकदा हा लॉकडाऊन संपतोय आणि रेसकोर्स चालू होतंय याचीच  मी आतुरतेने वाट बघतेय.

शनिवार, २३ मे, २०२०

"आईने केलेले" डिंकाचे लाडू!

माझ्या मुलीला, असिलताला दिवस गेल्याचे माझ्या आईला कळल्यावर ती खूपच आनंदली होती. पण बाळंतपणासाठी मी काहीच तयारी करत नाहीये, हे बघून ती अस्वस्थ झाली होती. जवळच्या कोणालाही दिवस गेल्याचे कळले, की तिची तयारी सुरु व्हायची. स्वेटर विणायला घेणे, रंगीत तुकडे जोडून सुंदर दुपटी शिवणे, उबदार कापड आणून त्याच्या बंड्या शिवणे, जुन्या मऊ साडया एकावर एक जोडून सुंदर गोधड्या शिवणे, अशी जय्यत तयारी ती हळूहळू करत असायची. त्यामुळे बाळ व्हायच्या आधी छानसा बाळंतविडा  तयार असायचा. बाळ जन्मले की बाळंतिणीसाठी डिंकाचे आणि अळिवाचे लाडू, खसखसीच्या वड्या, बदामाची खीर, शिरा असे अनेक पदार्थ करण्यात ती पुढे असायची. बरेच येणे-जाणे असलेल्या तिच्या मोठ्या घरातल्या कामाचा धबडगा सांभाळत, हे सगळेदेखील ती अगदी हौसेने करायची हे विशेष! 

२०१९ च्या मे  महिन्यात आई पुण्याला आलेली होती. आपण पणजी होणार याचा आनंद असला तरीही तिला स्वतःला हे काहीच करणे शक्य नव्हते. पण मी बाळंतविडा करणे अत्यावश्यक आहे, असा तिचा आग्रह होता. एकीकडे आईने हा धोशा लावला होता, तर दुसरीकडे, आईची तब्येत अगदी नाजूक असताना तिला मागे सोडून बाळंतपणासाठी, इतक्या लांब मी येऊच नये, असे असिलता म्हणत होती. पण मला जायची इच्छा होती. मधला मार्ग म्हणून, थोड्या काळासाठी का होईना, मी ऑस्ट्रेलियाला जायचे ठरवले. असिलता आणि आमचा जावई आनंद, या दोघांनी, त्यांच्या येणाऱ्या बाळासाठी बरीच तयारी केलेली होती. तसेच, असिलताच्या सासूबाईंनी बरेच कपडे आणून दिले होते. त्यामुळे, बाळंतविडा करण्यात मी वेळ घालवू नये, असेही असिलताने मला सांगितले होते. तरी असिलताशी बोलून, तिला लागणाऱ्या काही गोष्टींचा मी अंदाज घेतला होता. त्यानुसार, जुन्या सुती साड्या आणि ओढण्या वापरून दोन-तीन दुपटी आणि गोधड्या मी शिवल्या, काही लंगोट विकत आणले. बाळंतविडा करण्यासाठी मी काहीतरी हालचाल करते आहे  हे बघून आई जरा शांत झाली. 

जून महिन्यात माझे आई-वडील पुण्याहून सोलापूरला त्यांच्या घरी परत गेले. ऑस्ट्रेलियाला जाण्याआधीचा दीड महिना सोलापूरला अनेक चकरा मारून मी आईची औषधे, मोलकरणी वगैरे व्यवस्था लावून दिली. तरीही आईच्या काळजीने माझी घालमेल होत होती. तर, बाळंतिणीसाठी मी डिंकाचे लाडू करणार नाहीये, हे समजल्यामुळे आईचा जीव कासावीस होत होता. पूर्वीपासून अनेक वर्षे, माझ्याकडेही आई वेगवेगळे लाडू करून पाठवीत असायची. पोटाच्या वाढलेल्या घेरामुळे मी जी सदासर्वकाळ गर्भारशी असल्यासारखी दिसते, त्यासाठी आई व तिचे लाडूच जबाबदार आहेत, असे मी गमतीने नेहमी म्हणायचे. त्यामुळेच, कुठलेही लाडू आणायचे नाहीत, अशी तंबी असिलताने मला दिलेली होती. मलाही डिंकाचे लाडू करण्याची खास इच्छा नव्हती. जुलैच्या शेवटाला, जसजशी  माझी जाण्याची तारीख जवळ आली तसे आईने डिंकाच्या लाडवांसाठी लागणारे सामान आणण्यासाठी हट्टच धरला. मी बरीच टाळाटाळ केली. मला करायला येत नाहीत, इथे कशाला घाट घालायचा? मी निघण्यापूर्वी मुंबईत विकत घेईन, तिच्या सासूबाई करणार आहेत, अशी बरीच करणे सांगून बघितली. पण तिने जाम ऐकले नाही. 

"हे बघ, मीच करणार आहे. मी करत असताना तू पाहा आणि शीक. त्यानिमित्ताने शिकशील तरी." 
असे बोलून आईने मला निरुत्तर केले. पण, आईची तब्येत अगदीच तोळामासा झालेली होती. तिला लाडू करणे जमणार नाहीये हे मला दिसत होते. केवळ तिची इच्छा राखण्यासाठी, माझ्या ऑस्ट्रेलियाला जाण्याचा आधीच्या सोलापूर-फेरीत, मी डिंकाच्या लाडवांचे सामान आणून द्यायला तयार झाले. तीही उत्साहाने गाडीत बसून आमच्याबरोबर सामान आणायला निघाली. कुठल्या तरी पेठेतल्या, तिच्या जुन्या ओळखीच्या एका घाऊक व्यापाऱ्याकडे घेऊन गेली. अमुक झाडाचा डिंक, तमुक प्रकारच्या गोडंब्या असे तिच्या यादीप्रमाणे सगळे सामान घेऊन आम्ही घरी आलो. तोपर्यंत संध्याकाळचे आठ वाजले होते. त्यानंतर एकीकडे तिला जेवायला वाढून, दुसरीकडे ती सांगेल ती व तशी कामे मी करत गेले. काजू-बदामाचे काप करणे, खारकांची पूड करणे, सुके खोबरे किसून भाजून घेणे, गूळ चिरणे, डिंक तळून घेणे, वेलदोड्याची पूड करणे, ही सगळी तयारी करेस्तोवर जवळजवळ रात्रीचे अकरा वाजायला आले. पूर्वतयारी झालेली असल्याने, आता लाडू पाकात टाकणे आणि वळणे एवढेच बाकी होते. पण डिंकाच्या लाडवांसाठी पाक करणे आणि लाडू वळणे ही मोठी कौशल्याची कामे असतात हे मला माहिती होते. त्या दोनही गोष्टी निवांतपणे कराव्यात म्हणून, मी आमची जेवणेही उरकून घेतली होती. 

पाक करायच्या आधी मी आईला म्हणाले, 
"आता या सामानाच्या अंदाजाने किती गूळ घ्यायचा आणि त्याचा पाक किती-तारी आणि कसा करायचा ते सांग."

"अगं, काही नाही. पाक करणं अगदीच सोप्पं असतं. आता ते तू कर. तुला येईल. लाडू मात्र अगदी गरम असतानाच वळावे लागतात बरं का. हात चांगले भाजतात. जरा जपून वळ. आता मला झोप येतेय. मी झोपते." असे म्हणून ती शांतपणे झोपायला निघून गेली !

आईने माझी चांगलीच पंचाईत केली होती. दुसऱ्या दिवशी पहाटे सोलापूरहून निघून मला पुण्याला परतायचे होते. त्यामुळे ते लाडू वळून झाल्यावर सगळा चिकटलोळ पसारा आवरून झोपणे अनिवार्य होते. पण, "तयार केलेल्या सामग्रीच्या हिशोबाने किती गूळ घ्यायचा आणि लाडवांसाठी पाक कसा करायचा?" हे रात्री अकरा वाजता कोणाला आणि कसं विचारायचं, हा मला प्रश्नच पडला. मग काय, 'रुचिरा' पुस्तक शोधले, यू-ट्यूब बघितले, सर्व साहित्याच्या अंदाजाने गूळ घेतला, आणि देवाचे नाव घेऊन मी पाक तयार केला. सगळे साहित्य पाकात घातले आणि भराभरा लाडू वळले. चांगले पन्नास-साठ लाडू वळून झाल्यावरही अजून बरेच लाडू होणार आहेत हे माझ्या लक्षात आले. तोपर्यंत, किती लाडू होणार आहेत याबद्दल मी माझे डोके वापरलेलेच नव्हते. आईच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे, खूप जास्त सामान आणलेले होते आणि भरपूर लाडू तयार होणार होते ! 

सगळी आवरासावर करून, लाडू डब्यांमध्ये भरून, कमालीची दमून मी एक-दीडला झोपले असेंन. पहाटे उठून पुण्याला जाऊन कामाला जुंपून घेणे अशक्य आहे, हे माझ्या लक्षात आल्याने मी पुण्याला परतणे पुढे ढकलले. तो दिवसभर मला चांगलीच दमणूक जाणवत होती. सदैव येणे-जाणे असलेल्या आमच्या त्या मोठ्या घरातली सगळी कामे सांभाळून, इतरांसाठी बाळंतविडे, लाडू आणि इतरही बरेच काही माझी आई कशी काय करत असेल, याचे मला कमालीचे नवल वाटले. आईने तिच्या देखरेखीखाली, माझ्या भाचरंडांसाठी व इतर नातेवाईकांसाठी वेगळे, आणि असिलतासाठी वेगळे, असे डबे मला भरायला लावले. त्याशिवाय नेहमीप्रमाणेच, घरात आल्या-गेलेल्या प्रत्येकाला तिने लाडू खायला दिले. सर्व मोलकरणींबरोबर त्यांच्या पोरा-बाळांसाठी दोन-चार लाडू मला द्यायला लावले. गंमत म्हणजे सगळ्यांना ती मोठ्या आंनदाने आणि अभिमानाने सांगत होती,

"असिलताच्या बाळंतपणासाठी स्वाती ऑस्ट्रेलियाला चालली आहे. डॉक्टर असली तरी स्वातीला काही कळत नाही आणि तिची मुलगीही तसलीच. डिंकाच्या लाडवांशिवाय कुठे काय बाळंतपण होत असते का? माझं ती ऐकतच नव्हती. पण मला करायचेच होते. म्हणून मीच लाडू केले!" 

मी ऑस्ट्रेलियाला गेल्यावर काही दिवसातच आई खूप आजारी पडली. त्यामुळे मी तिकडून जरा लवकरच परतले. "तिने केलेले" डिंकाचे लाडू तिच्या नातीने खाल्ले, हे ऐकल्यावर तिला खूप बरे वाटले. आईचे ते आजारपण जवळजवळ शेवटचे आजारपण ठरले. पण ती जायच्या आधी, तिच्या लाडक्या नातीच्या बाळंतपणासाठी डिंकाचे लाडू करण्याचे समाधान तिला मिळाले, हे एक बरे झाले!