१६ तारखेला सकाळी आमची मलबारची सफर संपणार होती. आमचे सहप्रवासी सकाळी १० वाजता हॉटेल सोडणार होते कारण त्यांना मुंबईची फ्लाईट पकडायची होती. पण त्याआधी सकाळीच तळी देऊळ बघायचे ठरले होते. शुभेन्दु, आनंद आणि दादा देऊळ बघायला आले नाहीत. बाकीचे आम्ही सर्वजण सकाळी अंघोळी करून देवदर्शनाला निघालो. देऊळ हॉटेलपासून जवळ असल्यामुळे, चालतच गेलो. या देवळामध्ये प्रवेश करण्यासाठी, तेथील नियमानुसार, पुरुषांना लुंगी नेसावी लागते. देवळाच्या बाहेर, २० रुपये देऊन भाड्याने मिळत असलेल्या लुंग्या परिधान करून, आमच्या बरोबरची पुरुषमंडळी तयार झाली आणि आम्ही सगळेजण देवळामध्ये गेलो.
हे कोळीकोडमधील प्राचीन मंदिर आहे. स्वामी थिरुमूलपाद यांनी १४व्या शतकात हे मंदिर बांधले. तेथील झामोरिन राज्यकर्त्यांचे हे कौटुंबिक मंदिर होते. १८व्या शतकात टिपू सुलतानने कोळीकोडवर केलेल्या आक्रमणामध्ये या मंदिराचे बरेच नुकसान झाले होते. १९६४ साली मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. गर्भगृहातील ज्योतिर्लिंगाची स्थापना परशुरामन यांनी केल्याचे मानले जाते. हे भव्य मंदिर पारंपारिक केरळी स्थापत्यशैलीत बांधलेले आहे. मंदिरात लाकडी कोरीव काम, सुंदर भित्तिचित्रे आणि कलात्मक रचना असलेले छप्पर आहे. गर्भगृहाच्या भिंती रथाच्या आकारात बांधलेल्या आहेत. गर्भगृहातील मुद्रा उमामहेश्वराची आहे. हे मंदिर जरी शिवमंदिर असले तरीही या मंदिरात, गणपती, विष्णू श्रीकृष्ण, अय्यप्पा, नरसिंह यांच्याही मूर्ती आहेत. आम्ही गेलो तेंव्हा देवळामध्ये विशेष गर्दी नसल्यामुळे आम्हाला शांतपणे दर्शन घेता आले.
आम्ही हॉटेलवर परत आलो तोवर दादा आणि आनंद जागे झालेले होते. आम्ही सहप्रवाशांनी तळमजल्यावर नाश्ता घेतला.
सहप्रवाशांसोबत तळी मंदिरासमोर |
इडली-वडा, पुरी-भाजी, कॉर्नफ्लेक्स-दूध, ब्रेड-लोणी, जॅम आणि 'Eggs to order' असे अनेक पदार्थ मांडलेले होते. पण चार दिवस आमच्यासोबत असलेले सहप्रवासी आम्हाला सोडून जाणार असल्यामुळे, आम्हाला अन्न गोड लागत नव्हते. मुंबईला परतणाऱ्या प्रवाशांना विमानतळावर सोडायला निलेश राजाध्यक्ष आणि सुमंत पेडणेकरही गाडीमधून जाणार होते. त्यामुळे आम्ही सगळ्यांचा निरोप घेऊन खोलीवर परत आलो.
१६ तारखेचा संपूर्ण दिवस आमच्यासाठी मोकळाच होता. पण आदल्या रात्री उशिरा मला खोली बदलावी लागली असल्यामुळे आमची झोप पूर्ण झालेली नव्हती. म्हणून, थोडा वेळ विश्रांती झाल्यावर टॅक्सी करून कप्पड बीचवर जाऊन यावे, असे आम्ही ठरवले. ट्रेनिंगच्या काळापासून आनंदसोबत असलेले दोन आर्मी ऑफिसर सेवानिवृत्तीनंतर कोळीकोडला स्थायिक झालेले आहेत. त्यांच्याशी आनंदने आधीच संपर्क साधलेला होता. त्यापैकी एक, कर्नल रामकृष्ण आम्हाला त्या रात्री त्यांच्या घरी जेवायला येण्याचा आग्रह करत होते. परंतु, संध्याकाळी लवकर हॉटेलवर परतून झोपण्याची आमची इच्छा असल्याने, आम्ही नम्रपणे नकार दिला.
आम्ही टॅक्सी करून कोप्पड बीचला जाणार, हे ऐकल्यावर, कर्नल रामकृष्णनी सुचवले की दुपारी चारच्या सुमारास, त्यांच्या गाडीतून ते स्वतःच आम्हाला कप्पड बीचवर घेऊन जातील. ती सूचना मात्र आम्ही लगेच उचलून धरली. त्यांच्या गाडीतूनच आम्ही कप्पड बीचला गेलो. वाटेत गप्पा मारता-मारता, कोळीकोडबद्दल आणि एकूणच केरळच्या इतिहासाबाबत बरीच माहिती त्यांनी आम्हाला सांगितली.
१४९८ साली, कप्पड येथील पुळणीवर वास्को-द-गामाने पाय ठेवताक्षणी, भारतावरच्या युरोपीय आक्रमणाच्या इतिहासाची सुरुवात झाली होती. त्या घटनेची आठवण करून देणारा एक संगमरवरी शिलालेख त्या किनारपट्टीवर असल्याचे कर्नल रामकृष्णांनी आम्हाला सांगितले. त्यांच्या लहानपणीच्या आठवणीप्रमाणे, ते स्मारक अगदी समुद्रालगत होते. परंतु, ते आम्हाला कुठेच दिसेना. चौकशी करता समजले की, किनारपट्टीचे सुशोभीकरण करताना ते समुद्रकिनाऱ्यापासून जरा दूर नेऊन उभारले होते. आम्ही ते स्मारक शोधले आणि त्यासमोर आमचा फोटोही काढून घेतला.
वास्को द गामा स्मारकशिला |
त्यानंतर, जवळच्या कॅफेमध्ये बसून सँडविचेस आणि चहाचा आस्वाद घेत-घेत सूर्यास्त पाहण्याचा आमचा विचार होता. बसल्या-बसल्या मी विचार करू लागले, की वास्को-द-गामा भारतामध्ये आला नसता तर कदाचित सँडविच आणि चहासुध्दा भारतामध्ये आले नसते! अखेर, कप्पड बीचवरच्या रेस्टॉरंटमध्ये बसून सूर्यास्त बघणेही आमच्या नशिबात नव्हते. सूर्यास्ताच्या वेळीच नेमका पाऊस सुरु झाला.
कप्पड बीचवरून हॉटेलवर परतण्याच्या वाटेवर, कर्नल रामकृष्ण मला मसाले खरेदी करण्यासाठी घेऊन गेले. मसाल्याबरोबर दोन-तीन किलो काजू आणि खजूराचीही खरेदी झाली. तिथे 'आजवा' जातीचे खजूर बरेच स्वस्त मिळाले. दुसऱ्या दिवशी, म्हणजे १७ ऑगस्टला सकाळी, कर्नल रामाकृष्ण, त्यांची पत्नी प्रमिला आणि कोळीकोडमधले आनंदचे दुसरे मित्र कर्नल करुणाकरन, यांच्यासोबत आम्ही 'गुलमोहोर रेस्टॉरंट' मध्ये नाश्ता केला. त्यानंतर हॉटेलच्या खोलीवर येऊन आम्ही कोळीकोड विमानतळावर गेलो आणि परतीचे विमान पकडले. दुसऱ्या दिवसापासून पुण्यात कामे असल्याने, मुंबईला उतरल्यावर गिरीश-प्राचीच्या घरी न जाता, आम्ही विमानतळावरूनच उबर टॅक्सीने पुण्याला घरी येऊन पोहोचलो.
मलाबारच्या त्या सुखद सहलीच्या, आणि सर्व सहप्रवाशांच्या आठवणीने, त्या रात्री मला काही केल्या झोप येईना. खरेतर मी पहिल्यांदाच ट्रॅव्हल कंपनीबरोबर सहलीला गेले होते. 'अनुभव ट्रॅव्हल्स'मुळे आमचे अनुभवविश्व छान समृद्ध झाले होते.
'अनुभव ट्रॅव्हल्स'तर्फे आलेले श्री. निलेश राजाध्यक्ष, श्री. सुमंत पेडणेकर आणि बसचालक श्री. श्याम, यांची वागणूक अतिशय नम्र होती. आम्हा प्रवाशांना जास्तीतजास्त सेवा-सुविधा पुरविण्याबाबत ते तत्पर होते. सोनम-शुभेन्दू हे तरुण रक्ताचे दांपत्य सोबत असल्याने त्यांचा सहवास सर्वांनाच हवाहवासा होता. पेंडसे पती-पत्नी मितभाषी असले तरी, ते स्वभावाने अतिशय मृदू असल्याचे जाणवले. श्री पेंडसे यांचे गाणे आम्हाला खूप आवडले. कु. वृंदा जोशी यांनी पूर्वी भरपूर प्रवास केलेला असल्यामुळे त्यांच्याकडे माहितीचा खजिना होता. त्यांनीही खूप सुरेल आवाजात गाणी म्हटली. म्हात्रे पती-पत्नी दोघेही बोलके आणि हसतमुख होते. सहप्रवाशांबरोबर आमचा वेळ मजेत गेला आणि प्रत्येकाकडून काहीतरी नवीन शिकायला मिळाले.
सरतेशेवटी, माझा भाचा देवाशिष, ज्याच्यामुळे ही मस्त सहल घडली, त्याचे आभार मानायलाच हवेत!