शनिवार, २७ जून, २०२०

अखेर मी स्मार्ट झाले!

पाच एक वर्षांपूर्वी मी सँर्टफोन वापरत नव्हते. प्रथम मी जेव्हा स्मार्टफोन विकत घेतला त्यावेळच्या अनुभवावरच हा लेख, प्रसिद्ध करायचा राहून गेला होता.


दोन-तीन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळपर्यंत माझया बर्याच मित्रमंडळींनी 
स्मार्टफोन वापरायला सुरुवात केली हायती . त्यामुळे त्या मित्रमंडळींना 'अजूनही स्मार्टफोन शिवाय ही कशी काय जगतेय?' हा प्रश्न सतावत होता. पण, मी स्वतःला स्मार्ट समजत असल्यामुळे, स्मार्टफोन न वापरण्याचा माझा 'पण' मी बरेच दिवस टिकवला. परंतु, माझ्या पेशंटसचे आईवडील वरचेवर मला विचारायला लागले,  "बाळाचे रिपोर्ट, X-ray, बाळाला आलेल्या पुरळाचे फोटो, किंवा 'बाळ कसंसंच करतंय' त्याचा व्हिडीओ WhatsApp वर पाठवू का?".  तेंव्हा मात्र माझ्याकडे स्मार्टफोन नसल्यामुळे  माझी पंचाईत होऊ लागली होती .  

अशा अनेक मित्र-मैत्रिणींना, नातेवाईकांना आणि  माझ्या लहानग्या पेशंटसच्या आईवडिलांना, "तुम्ही स्मार्ट फोन का वापरत नाही?" या प्रश्नाचे उत्तर देऊन-देऊन शेवटी मी कंटाळले. सुरुवातीला "माझ्याकडे  स्मार्टफोन नाही आणि मला तो वापरताही येत नाही" असं सोपं उत्तर मी देत असे. पण लोकांच्या टोमणेबाजीमुळे ती सोयही राहिली नव्हती. आय टी कंपनीमध्ये काम करणाऱ्या एका मॉडर्न मॉमने एकदा मला ऐटीत ऐकवले होते, "डॉक, मी की नाही, माझ्या बेबीला सांभाळणाऱ्या मेडला एक स्मार्टफोन घेऊन दिलाय. त्यामुळे मी सतत तिच्याशी WhatsApp वर कॉन्टक्टमधे असते. डॉक, ती डंब मेडसुद्धा स्मार्टफोन वापरते तर तुम्ही नक्की वापरू शकाल!"

असे अनेक अपमानास्पद अनुभव झेलून आणि लोकांच्या असंख्य प्रश्नांना कंटाळून मला जरा 'शहाणपण' आले आणि शेवटी एकदाचा मी स्मार्टफोन घ्यायचा निर्णय घेतलाच. लोकाग्रहास्तव फोन घेतेय, त्यामुळे उगीच जास्त खर्च नको, पाच हजाराच्या आतलाच फोन घ्यावा असं मी मनाशी ठरवलं.  हा माझा विचार, मोबाईलच्या दुनियेतील तरबेज भाचरंडांना आणि काही जवळच्या मित्र मंडळींना ऐकवला. तर काय, "पाच हजाराच्या आत कुठे काय बरा फोन येणार आहे का? तसला  स्मार्ट फोन घेणं आणि न घेणं सारखंच आहे"  असं बोलून  त्या सर्वांनी  माझ्या 'बावळटपणावर' शिक्कामोर्तब केलं.

कुणी म्हणालं " कॉलेजला जाणारी लोअर इकोनॉमिक क्लासमधली मुलंसुद्धा हल्ली सात आठ हजाराचे फोन वापरतात. आणि पाच हजारांत अगदीच कमी चॉइस मिळेल, कमीतकमी दहा हजारांचं  बजेट तर हवेच."

मग मी नाईलाजाने माझे बजेट वाढवून दहा हजारापर्यंत नेले.

"फक्त दहा हजाराच्या मोबाईलनं काही खास इम्प्रेशन पडणार नाही. त्यासाठी निदान वीस हजारचा स्मार्टफोन तरी घेचही काही हितचिंतकांची सूचना मात्र मी पूर्णपणे कानाआड केली.

माझ्या वाढीव बजेटमध्ये बसेलसा चांगला स्मार्टफोन शोधू लागल्यावर मात्र मी चांगलीच चक्रावले. दुकानांत त्या रेंजमधली दहा कंपन्यांची शंभर मॉडेल्स होती. त्यातून 'अँड्रॉईड' का 'विंडोझ?', 'जेली बीन' का 'आईस्क्रीम सँडविच', 'सिंगल सिम' का 'ड्युअल सिम', 'क्वाड कोअर' का 'ड्युअल कोअर'? असले अनेक अगम्य प्रश्न विचारून आणि अनंत पर्याय  देऊन, दुकानदारांनी मला पूर्ण गोंधळात टाकलं. उच्चशिक्षित असूनही यातलं आपल्याला काहीच कळत नाही, हे मला उमगलं. आपल्या  या अज्ञानाचा फारसा गवगवा होऊ नये याची दक्षता घेत आणि  विनासायास  'ready answers' मिळवीत म्हणून मी माझ्या भाचीला फोन लावला.

माझ्या शंकांचे निरसन न करता, "ते सगळं तुझ्या युजवर डिपेंड आहे आणि ते तुलाच ठरवावं लागेल" असे स्मार्ट उत्तर अगदी  तत्परतेने तिने देऊन टाकले! त्यातून वर, "आत्या, अगं मोबाईल घ्यायला दुकानांत कशाला गेलीस? फ्लिपकार्ट किंवा अमेझॉन वर मॉडेल्सची रेटिंग्स आणि कॉनफ़िगरेशन्स बघायची, काहीऑफर्स मिळत असतील तर घ्यायच्या आणि ऑनलाईन मागवून टाकायचा." असा फुकट सल्ला देऊन मला वेड्यात काढलं ते वेगळंच!

आता मात्र स्वाभिमान जागृत झाल्यामुळे मी पेटून उठले. भाचीने सुचवलेला हा साधा-सोप्पा मार्ग पडताळून बघायचाच असं मी ठरवलं. मग काय विचारता! ऑपरेटिंग सिस्टम्स,प्रोसेसर्स,मॉडेल्स आणि त्यांची रेटिंग्स असे माझे नवीन ऑनलाईन शिक्षण चालू झाले. शेवटी माझ्या वापरासाठी योग्य आणि अगदी 'value for money' अशा मॉडेलचा शोध मला लागला. पण तो इतका दहा हजाराचा फोन ऑनलाईन मागवण्यापूर्वी एकदा आपल्या डोळ्यांनी प्रत्यक्षात बघावा, हाताळावा, या विचाराने  एक दोन दुकानांत / virtual stores मध्ये  गेलेच .

मी ठरवलेल्या मॉडेलची किंमत प्रत्येक दुकानात, ऑनलाईन मार्केटपेक्षा जवळ-जवळ एक हजार रुपयांनी जास्त होती. साहजिकच 'हे असं कसं?' हा प्रश्न मनांत आलाच. उत्सुकतेपोटी, "हेच मॉडेल ऑनलाईन स्वस्त कसं हो?" हे विचारण्याचा बावळटपणा केलाच. उत्तरादाखल, "भारतात ऑनलाईन मालाचा काय भरवसा? बघा बुवा, इथे असलं करणं काही शहाणपणाचं नाही. कदाचित फसाल बरं का!" असं एक पिल्लू दुकानदाराने सोडून दिलं! 

आता मात्र माझी पंचाईत झाली. फोन दुकानातून घ्यावा का ऑनलाईन घ्यावा, अशी  व्दिधा मनस्थिती असली तरी, ऑनलाईन स्वस्त मिळत असल्यामुळे मन तिकडेच ओढ घेत होते. "फोन ऑनलाईन मागवल्यावर हे असलं काही होणार नाही ना?" असं विचारायला पुन्हा भाचीला गाठले. तर तिने, "मी बऱ्याच गोष्टी ऑनलाईन मागवते. पण कधीही फसलेले नाही. तू मागवून बघ काय होतय ते!" असे सावध उत्तर देऊन स्वत:ची सुटका करून घेतली आणि माझी धाकधूक मात्र अजूनच वाढवली.

योगायोगाने, 'अमेझॉन इंडिया' मध्येच वरच्या हुद्द्यावर काम करणारा माझा एक भाचा त्याच रात्री जेवायला येणार होता. जेवणं झाल्यावर मी, "काही फसवणूक तर होणार नाही ना? दुकानापेक्षा ऑनलाईन स्वस्त कसं? फोन खराब निघाला तर पैसे परत करतात का?" वगैरे माझ्या सगळ्या शंका-कुशंका भाच्याला  धडाधड विचारून टाकल्या.
"मावशी, तसं काहीही होणार नाही, तू निर्धास्त रहा." त्याने अत्यंत हसतमुखपणे मला दिलासा दिला. परंतु, मनातल्या मनात, "आमची अमेझॉन काय अशी चलती-फिरती कंपनी आहे काय? इतकी शिकली आहेस पण काय उपयोग? इतकं कसं कळत नाही? असले प्रश्न पडतातच कसे?" असा, माझी कीव करणारा, विचार त्या हास्यामागे  दडलेला होता की काय, असेही क्षणभर मला वाटून गेले .
इतकी हमी मिळाली तरी ऑनलाईन मागवलेला फोन हातात येईपर्यंत माझ्या अगदी जीवात जीव नव्हता. पैसे तर आधीच कापले गेलेले असल्यामुळे कुठे माशी शिंकायला नको अशी मी मनोमन प्रार्थना करत होते. जेमतेम दोन दिवसांत फोन घरपोच येऊन पोहोचलासुद्धा! सर्व काही व्यवस्थित असल्यामुळे माझा जीव भांड्यात पडला.

या सगळ्या प्रवासांत स्मार्टफोनबद्दलचे माझे ज्ञान मात्र भलतेच वाढले. त्यामुळेच आताशा कुणी ओळखीचं भेटलं की त्यांना "तुमच्या स्मार्टफोनचा प्रोसेसर कुठला? स्क्रीन ४.७ इंच का ५.५ इंच?" असले प्रश्न मी हटकून विचारते. मधे एका स्मार्ट मुलाला त्याच्या फोनचा प्रोसेसर कुठला आहे असे विचारल्यावर त्याने "सिंगल सिम" असे सांगितले. मी जेंव्हा हसून म्हटलं, "अरे, 'क्वाड कोअर' का 'ड्युअल कोअर'?", तेंव्हा त्याच्या चेहऱ्यावरचा गोंधळलेला भाव, माझ्या वाढलेल्या 'भावाची' साक्ष पटवून गेला.
माझ्या एका मैत्रिणीने  कौतुकाने मला सांगितले, "मला जेली आवडत नाही ना, म्हणून यांनी त्यांचा 'आईस्क्रीम सँडविच' वाला स्मार्टफोन मला दिला आणि स्वतःसाठी 'जेली बीन' वाला घेतला!" मला मात्र तिच्या अज्ञानावर आणि भाबडेपणावर हसावे का रडावे ते कळेना!
एका प्रथितयश डॉक्टर मित्राने मला सुनावले, "अगं, फोनचा price tag महत्वाचा असतो, प्रोसेसर नाही काही!
या सगळ्यावर कळस म्हणजे ड्युअल सिम handset मध्ये एकाच वेळी दोन सिम कार्ड घालता येतात याचा माझ्या ओळखीतल्या एका सुशिक्षित बाईंना पत्ताच नव्हता!

बऱ्याच लोकांना स्मार्ट दिसण्यासाठी स्मार्टफोनची गरज असते, असं आता माझं मत झालंय. स्मार्टफोन वापरणाऱ्या बराचशा लोकांना, फोन करणे व घेणे, गेम्स खेळणे, सेल्फी काढणे आणि Whatsapp वर चकाट्या पिटणे याव्यतिरिक्त तो अजून कशाकशासाठी वापरता येतो याचा गंधच नसतो. आता हे कळल्यामुळे माझा स्मार्टनेस मात्र कमालीचा वाढलाय हे जाणवते !

गुरुवार, २५ जून, २०२०

"दिल्या घरी तू सुखी राहा"

मुलांना घेऊन  १९९५ सालच्या मे  महिन्यापासून पुण्यात राहायला लागले. त्यानंतर साधारण वर्षभरातच म्हणजे १९९६ सालच्या मे महिन्यात आनंदने त्याची बदली अलाहाबादहून पुण्यात करून घेतली. आमची पहिली  मारुती व्हॅन आम्ही अलाहाबादला आधीच विकलेली होती. (माझी यापूर्वी प्रसिद्ध झालेली पोस्ट वाचा:- 'व्हॅन'टढॅण !)
त्यामुळे, आमच्याकडे पुण्यात वापरायला फक्त एक स्कूटर होती. पण पुण्यातल्या दक्ष पोलिसांमुळे आम्हा चौघांना त्या स्कूटरवरून हिंडणे शक्य होईना. म्हणून पुन्हा आम्ही एक चारचाकी विकत घ्यायचे ठरवले. पुण्यातच स्थायिक होण्याच्या दृष्टीने घर व क्लिनिकची जागा विकत घेण्यासाठीही पैसे लागणार होते. म्हणून आम्ही सेकंडहॅन्ड गाडीच घ्यायचे ठरवले. १९९७ मध्ये एका रविवारी, पांढऱ्या रंगाच्या मारुती-800 गाडीची एक अत्यंत आकर्षक जाहिरात वाचनात आली. नेमके त्या दिवशी माझे वडील, म्हणजे दादा आमच्याकडे आलेले होते. "लगेच फोन फिरव आणि गाडी चांगली असेल तर आजच्या आजच घेऊन टाका", असे फर्मानच दादांनी काढले. त्यामुळे आनंदने जाहिरातीत दिलेल्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधला. ती गाडी एका सिंधी व्यापाऱ्याची होती. घरातल्या सगळ्यांनाच ती गाडी बघायची आहे, हे समजल्यावर तो स्वतःच तत्परतेने आमच्या घरी गाडी दाखवायला घेऊन आला. पहिल्या दोन-चार वाक्यातच त्याने दादांचा विश्वास संपादन केला. तसेच गाडी टेस्ट ड्राईव्हला नेण्याचा आग्रह धरला. म्हणून मग, मी आणि आनंद पुढे आणि तो माणूस आणि दादा मागे, असे त्या गाडीतून फिरायला बाहेर पडलो. त्याने ती गाडी कशी उत्तम कंडिशनमध्ये ठेवलेली आहे व त्यामुळे त्याला अपेक्षित असलेली किंमत कशी रास्त आहे हे मोठ्या खुबीने आम्हाला पटवले. गप्पा-गप्पातून, दादा वकील आहेत हे त्याला कळलेच होते. त्यामुळे, जाताना दादांकडून एक फुकटचा वकिली सल्ला मिळवून आणि त्याला अपेक्षित असलेल्या किंमतीचा चेक खिशात घालूनच तो परतला. 

घरात नवीन आलेल्या सुनेप्रमाणे, ती गाडी जेमतेम वर्ष-दीड वर्षे नीट राहिली असेल. त्यानंतर मात्र त्या पांढऱ्या गाडीने आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली. १९९८ मध्ये मे महिन्याच्या शेवटी आनंदची बदली अखनूरला झाल्याने तो तिकडे रुजू झाला. नेमके त्याच सुमारास अनिरुद्धच्या पायाला फ्रॅक्चर झाले आणि पाठोपाठ त्याची शाळाही सुरु झाली. पुढचा दीड महिना अनिरुद्धचा पाय प्लास्टरमध्ये ठेवावा लागणार होता. त्याची शाळा सकाळी साडेसातला भरायची. त्याला उठवून, सगळीकडे उचलून ठेवत, तयार करून, गाडीने शाळेत सोडण्यासाठीही मलाच जावे लागायचे. पण बरेचदा, शाळा अगदी हाकेच्या अंतरावर असताना ती गाडी अचानकच निष्प्राण व्हायची. मग अनिरुद्धला गाडीतून बाहेर काढून, दोन्ही हातांवर उचलून घेऊन, त्याच्या पहिलीच्या वर्गापर्यंत नेईपर्यंत, शाळा भरल्याची घंटा व्हायची. शाळेची वेळ 'मिस' करून शिस्तभंग केल्यामुळे त्याच्या 'मिस' माझ्याकडे एखादा जळजळीत कटाक्ष तरी टाकायच्या किंवा एखादे कडवट वाक्य तरी फेकायच्या! तो अपमान मुकाट्याने गिळून, पुढे मेकॅनिकला बोलावून गाडी दुरुस्त करून घेण्यात माझ्या दिवसभराचे वेळापत्रक आणि मनस्वास्थ्य पूर्ण  बिघडून जायचे.

एकदा तर भर कर्वे रोडवर, नळस्टॉपच्या चौकात संध्याकाळी सहाच्या सुमारास, ती गाडी  बंद पडली. माझ्या मागे सगळा ट्रॅफिक अडला आणि मोठीच गर्दी जमा झाली. ट्रॅफिक पोलीस येऊन शिट्ट्या मारायला लागले, पण मदतीला कोणीच आले नाही. बायकांना गाडी चालवताच येत नाही अशी ठाम समजूत असलेले बरेच जण मात्र मला मनोमन,(आणि काही उघड-उघडही) शिव्या देऊन गेले. अशा अनेक दुर्धर प्रसंगांना एकटीने तोंड देऊन मी पार वैतागून गेले होते. १९९९ च्या उन्हाळ्यामध्ये, कारगिल युद्धाच्या काळात, आनंद तिकडे अखनूर बॉर्डरवर बंकरमध्ये दिवस ढकलत होता तर मी पुण्यात आमची गाडी ढकलत होते! शेवटी जून २००० मध्ये आनंद पुण्याला परत आला आणि आम्ही नवी कोरी, लाल रंगाची 'मॅटिझ' गाडी, पुन्हा आर्मी कॅन्टीनमार्फत बुक करून टाकली. ती गाडी आमच्या अपेक्षेपेक्षा लवकरच हातात मिळाली. त्यामुळे लगेच, जुन्या गाडीची थोडी दुरुस्ती करून घेतली आणि, "आर्मी ऑफिसरची पांढरी मारुती-800 विकणे आहे" अशी जाहिरात आम्ही  वर्तमानपत्रात देऊन टाकली. 

त्यावेळी आम्ही पुणे कॅंटोन्मेंटमध्ये परेड ग्राउंड रस्त्यावरच्या आर्मी ऑफिसर कॉलनीत राहत होतो. ते घर सिव्हिलिअन्स काय, पण आर्मीतल्या लोकांनाही सापडणे जरा अवघडच होते. जाहिरातीत, घराचा पत्ता देताना, "रेसकोर्स जवळ, लिबर्टी टॉकीजच्या अलीकडे," असे आम्ही  नमूद केले होते. लिबर्टी टॉकीज काही वर्षांपूर्वीच बंद पडलेले होते. त्यामुळे ते तरी कितीशी लोकांना आणि कसे माहिती असणार आणि खरेदीदार आमच्या घरापर्यंत कसे पोहोचणार या चिंतेत आम्ही होतो. गतकाळात जेंव्हा लिबर्टी टॉकीज चालू होते तेव्हा त्यामधे मुख्यत्वेकरून 'A' rating असलेले सिनेमे लागायचे. त्यामुळे, तिथे पूर्वी सिनेमे पाहिलेले "जुने जाणते" खरेदीदार आमच्या अपेक्षेपेक्षा फारच लवकर, आणि सहजी आमच्या घरापर्यंत येऊन धडकले. त्यातले काहीजण तर गाडी बघण्यापेक्षा 'लिबर्टी' टॉकीजमधल्या 'गुलाबी आठवणीं'ना उजाळा द्यायला, आमच्या त्या भागात फिरायला आल्यासारखेच वाटत होते. 'लिबर्टी' टॉकीज माहीत असलेल्या गटातले बहुतेक जण तंबाखू चघळत आलेले, रेसचा नाद किंवा काही-बाही व्यसने असावीत असे वाटणारे, जरा टपोरीच दिसत होते.  त्यामुळे तसल्या लोकांशी बोलणे करण्याचे काम आनंदच करत होता. 

पण इच्छूक खरेदीदारांमध्ये, लिबर्टी टॉकीज बाबत अनभिज्ञ असलेला दुसरा एक गटही होता. त्या गटातील बरेचसे लोक 'लिबर्टी' ऐवजी कॅम्पातल्या ईस्ट स्ट्रीटवरच्या 'व्हिक्टरी' टॉकीज जवळ जाऊन पोहोचत होते. अर्थातच तिथे आमचे घर न सापडल्यामुळे पार बुचकळ्यात पडत होते. खरे पाहता, आमचे ते घर व्हिक्टरी टॉकीजपासूनही तसे फार लांब नव्हते. पण त्यांना तिथून आमच्या घराचा रस्ता, खात्रीशीरपणे कोणीही सांगू शकले नसते. एकतर, आर्मी कॅंटोन्मेंटमधले सगळे रस्ते सहसा बऱ्यापैकी सुनसान असतात. एखादा-दुसरा 'वर्दी'धारी दिसलाच तरी त्याच्याशी बोलायला सिव्हिलियन्सना भाषेची अडचण आणि थोडीशी भीती असतेच. त्यातून सगळेच वर्दीवाले, जेमतेम एक-दोन वर्षेच त्या भागात राहिलेले असल्यामुळे तेही खात्रीने पत्ता सांगू शकत नाहीत. त्यावेळी ना मोबाईल, ना स्मार्टफोन आणि ना गूगल मॅप्स! त्यामुळे अनंत अडचणींना तोड देत, 'व्हिक्टरी' टॉकीजपाशी पोहोचलेले लोक हताश होऊन आमच्या घरच्या फोनवर, सतत फोन करत होते. त्यांना फोनवर रस्ता सांगण्याचे काम मात्र आनंदने माझ्यावर सोपवलेले होते. 

ती गाडी आम्ही ऐंशी हजार रुपयांना विकत घेतली होती. दीड-दोन वर्षांत दुरुस्तीवर आमचे सहज पंधरा-वीस  हजार खर्च झाले होते. तरीदेखील त्या नाठाळ गाडीला पंचवीस-तीस हजार मिळाले तरी खूप झाले असा विचार आम्ही मनोमन केला होता. परंतु, खरेदीदारांना "आमची चाळीस हजाराची अपेक्षा आहे", असेच सांगत होतो. त्या दिवशी सकाळी नऊपासून दुपारी चार-पाच वाजेपर्यंत लोकांना फोनवर घराचा पत्ता समजावून सांगणे आणि घरापर्यंत पोहोचलेल्यांना गाडी दाखवणे यातच आम्ही व्यस्त होतो. पण पंधरा-वीस हजाराच्या वर किंमत द्यायला कोणीही तयार होईना. 'लिबर्टी टॉकीज' गटातल्या एका मोटार मेकॅनिक माणसाने गाडीची किंमत पाडून मागण्याच्या उद्देशाने एक अनाहूत सल्ला आम्हाला दिला. "आपकी ये नयी गाडी भी आई है। पुरानी गाडी बैठे-बैठे खराब होगी। बादमे ये गाडी उठानेके लिये आपको पैसा खर्चा करना पडेगा। इससे अच्छा तो ये है की आप ये गाडी किसीको फ्रीमें ही दे डालो" त्याचे बोलणे अर्थातच आम्ही मनावर घेतले नाही. पण आमचाही धीर सुटत चालला होता, हे ही खरेच . हे सगळे जरी असले तरीही ती गाडी कुणा 'लिबर्टी टॉकीज' गटातील व्यक्तीच्या घरी पडू नये असेच आम्हाला वाटत होते!

शेवटी, आता कोणीही येणार नाही असे वाटत असतानाच, संध्याकाळी सहानंतर एक 'व्हिक्टरी टॉकीज' गटातील मनुष्य बऱ्याच ठिकाणी रस्ता चुकत-चुकत, अनेकदा आम्हाला फोन करत, कसाबसा येऊन पोहोचला. कुठल्याशा सरकारी खात्यात असूनही 'न खाणारा-पिणारा' वाटला. त्या माणसाला आमची गाडी एकदमच पसंत पडली. त्याला गाडी चालवायला शिकायचे होते. एकदम नवीन गाडी घेऊन शिकण्यापेक्षा एखाद्या जुन्या गाडीवर हात साफ करून घ्यावा, अशा विचाराने तो गाडी विकत घ्यायला आला होता, असे त्याने सांगितले. "माझे बजेट कमी आहे" असे म्हणत, कुठलीही घासाघीस न करता पस्तीस हजाराचा चेक समोर ठेऊन, त्याने सौदा पक्का केला. मात्र, दुसऱ्या दिवशी त्याच्या घरी ती गाडी आम्हीच नेऊन सोडावी अशी विनंती आम्हाला करून, स्वतःचा पत्ता, गाडीच्या किंमतीचा चेक, आणि आमची गाडी आमच्याकडेच ठेऊन,  तो निघून गेला!
 
दुसऱ्या दिवशी सकाळी-सकाळीच आम्ही दोघे गाडी घेऊन त्याच्या घरी पोहोचलो आणि गाडीची किल्ली त्याला सुपूर्द केली. "निदान चहा तरी पिऊन जा" या त्याच्या आग्रहाला आम्ही मुळीच बळी पडलो नाही.  "बाई, ही भली माणसे आहेत. इथल्या माणसांना त्रास देऊ नकोस" असे आमच्या गाडीला सांगून आणि "दिल्या घरी तू सुखी राहा" असा मनोमन आशीर्वाद देऊन, रिक्षा पकडून आम्ही तडक घरी परतलो. 

लहानपणी घरात धुमाकूळ घालणाऱ्या मांजराला पकडून, पोत्यात घालून आम्ही कुठेतरी लांब सोडून यायचो. तरीही वाट शोधत ते मांजर परत येऊन आम्हाला पुन्हा सळो की पळो करून सोडेल की काय, अशी धाकधूक बराच काळ मनात असायचीच. तशीच काहीशी धाकधूक ती गाडी सोडल्यानंतरही पुढे बराच काळ आमच्या मनात होती! 
  
मॅटिझ गाडीच्या आणि आमच्या सहवासाबद्दलची कथा, मी खूप आधीच प्रसिद्ध केलेली आहे. ती पुढील लिंकवर वाचा:-  आमची सखी

सोमवार, २२ जून, २०२०

'व्हॅन'टढॅण !

१९९२च्या डिसेंबर महिन्यामध्ये, प्रथमच आनंद, मी आणि मुले एकत्र असे अलाहाबादला रहायला लागलो. सुरुवातीला काही दिवस आम्ही आमच्या स्कूटरवर फिरायचो. पण नंतर आम्ही मोठ्या हौसेने नेव्ही ब्लू रंगाची नवीकोरी मारुती 'ऑम्नी' व्हॅन घेतली. ती व्हॅन आम्हाला फारच आवडायची. पुढे बॉनेट नसल्यामुळे, ती चालवताना सगळ्या रस्त्यावर अधिराज्य असल्यासारखे वाटायचे. आज कुणाला सांगितले तर खरे वाटणार नाही, पण त्यावेळी पैसे भरल्यानंतर, व्हॅन मिळेपर्यंत गिऱ्हाईकांना निदान दोन-चार महिने वाट बघावी लागायची. काही उतावळे लोक जास्तीचे पैसे (On Money) देऊन मारुती व्हॅन घ्यायचे. आम्ही ती व्हॅन आर्मीच्या कॅन्टीन मार्फत विकत घेतल्यामुळे आम्हाला ती बाजार भावापेक्षा दहा-बारा हजार रुपयांनी स्वस्तच मिळाली होती. आम्ही व्हॅन विकत घेतली आणि त्यानंतर जवळजवळ लगेच  मारुती कंपनीने व्हॅनच्या किंमती वाढवल्या होत्या. 

आम्ही ती व्हॅन बरीच वापरली. मुले लहान असल्यामुळे उंच सीटवर बसून त्यांना बाहेर बघायला मजा वाटायची. अलाहाबादला आमच्याकडे नातेवाईकांचा सारखा राबता असायचा. अनेक वेळा सात-आठ जण दाटीवाटीने बसून, खाण्यापिण्याचे सामान बरोबर घेऊन आम्ही वाराणसी, लखनौ, फैजाबाद-अयोध्या, चित्रकूट-खजुराहो असे अनेक दौरे केले. त्याकाळी गाडीच्या मॉडेलला, किंवा गाडी किती सीटर आहे या गोष्टीला, फारसे महत्त्व नसायचे. त्यावरून तुमची 'किंमत'ही ठरवली जात नसे. मुख्य म्हणजे गाडी कितीही सीटर का असेना, कुरकुर न करता भरपूर लोक त्यात बसून आनंदात फिरायचे. हल्ली आपले सर्वांचे राहणीमान उंचावले आहे, पण कदाचित मनोवृत्ती संकुचित होत चालली आहे. त्यामुळे, काहींना चार सीटर गाडीमध्ये पाचव्या व्यक्तीची, अगदी  एखाद्या लहान मुलाची सुद्धा अडचण वाटते. 

१९९५ सालच्या मे महिन्यापासून मुलांना घेऊन मी पुण्याला राहू लागले. आनंद एकटाच अलाहाबादेत राहणार असल्याने त्याला गाडीची गरज उरली नाही. म्हणून, ऑक्टोबर महिन्यात, दिवाळीच्या सुट्टीत मी मुलांना घेऊन अलाहाबादला आले असताना आम्ही ती गाडी विकायचे ठरवले. दिवाळी संपल्या-संपल्या, "आर्मी ऑफिसरची एकहाती वापरलेली गाडी विकणे आहे" अशी जाहिरात अलाहाबादच्या स्थानिक वर्तमानपत्रांमधून आम्ही दिली. जाहिरात छापून आली त्याच दिवशी आमच्याकडे इच्छुक गिऱ्हाईकांची अक्षरश: रांग लागली. दिवसभर येत राहिलेल्या अनेक गिऱ्हाईकांना गाडी व गाडीची कागदपत्रे दाखवणे, किंमतीबद्दल घासाघीस करणे हे करून मी, आनंद आणि आनंदचा सहायक, तिघेही अगदी दमून गेलो. त्यातल्या बऱ्याच जणांनी, ही व्हॅन इतर कोणालाही देऊ नका, आम्हीच घेणार आहोत असे सांगितले असले तरीही पैसे कोणीही दिलेले नव्हते. अलाहाबादला बरीच फसवेगिरी आणि गुंडगिरीही असल्यामुळे, एक रकमी पूर्ण पैसे दिल्याशिवाय गाडी विकणार नाही, असे आम्ही निक्षून सांगितलेले होते. 

त्या संध्याकाळी आमच्याकडे आनंदचे दोन आर्मी ऑफिसर मित्र, त्यांच्या बायका-मुलांसह आले होते. आम्ही खात-पीत व गप्पा मारत बसलो होतो. सकाळी येऊन गेलेल्या इच्छुक लोकांपैकी एकजण पुन्हा येऊन आमच्या दारावर धडकला. आनंदने त्याच्याशी बोलणी सुरु केली. तितक्यात, सकाळी गाडी पाहून गेलेला दुसरा एकजणदेखील आला. त्या माणसाला मी दुसऱ्या एका खोलीत नेऊन बसवले आणि आनंदच्या मित्रांनी त्याच्याशी बोलणी चालू केली. आमचे आर्मी क्वार्टर, खूपच मोठे म्हणजे जवळजवळ तीन हजार स्क्वेअर फुटाचे होते. ते दोघे खरेदीदार जरी वेगवेगळ्या खोलीत बसलेले असले तरीही, दुसरा एक ग्राहकदेखील येऊन बोलणी करीत आहे याची त्या दोघांनाही पूर्ण कल्पना होती. दोघेही थोडे पैसे घेऊन आलेले होते आणि उरलेले पैसे उद्या आणून देऊन गाडी घेऊन जाऊ असे म्हणत होते. त्या दोघांनाही ती गाडी हवी असल्यामुळे ते दोघेही किंमत वाढवत गेले. हा अगदीच नाट्यमय प्रसंग होता. एकाच वेळी दोन गिऱ्हाईक आल्यामुळे आम्हाला घासाघीस करायला भरपूर वाव होता. मी एका खोलीतून दुसऱ्या खोलीत फेऱ्या मारून कोण जास्त किंमत द्यायला तयार आहे याचा अंदाज घेत होते. असे करता-करता शेवटी आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त किंमत द्यायला ते दोघेही तयार झाले. हे सगळे नाट्य संपेपर्यंत रात्रीचे आठ वाजून गेले होते. शेवटी, जो कोणी ठरलेली संपूर्ण रक्कम आधी आणून देईल, त्याला आम्ही गाडी देऊ असे सांगून त्या दोघांचीही आम्ही बोळवण केली. त्यानंतर आम्ही पुन्हा मित्र परिवाराबरोबर गप्पा-गोष्टी करण्यात गुंगून गेलो. 

खरी गंमत तर पुढे झाली. आमची जेवणे उरकल्यानंतर साधारण रात्री नऊ-साडेनऊच्या सुमारास, आनंदचे मित्र घरी परतायला निघाले होते. तितक्यात त्या दोन इच्छुक खरेदीदारांपैकी एकजण परत आला आणि त्याने नोटांच्या पुडक्याने भरलेली पिशवीच समोर काढून ठेवली. सर्वात जास्त आश्चर्याची गोष्ट म्हणजे "ठरलेली सर्व रक्कम मी आज देऊन जातो, गाडी तुम्ही मला उद्या द्या" असेही तो म्हणू लागला. त्यामुळे आम्ही अजूनच बुचकळ्यात पडलो. आमच्याच सांगण्यानुसार तो पैसे घेऊन तातडीने हजर झाला होता. आता त्याला परत तरी कसे पाठवायचे? एकीकडे हा प्रश्न आमच्यापुढे होता. तर दुसरीकडे, इतकी मोठी रक्कम आणि विकलेली गाडी दोन्हीही आमच्याकडेच ठेवून जाण्यामागे, या माणसाचा काही विपरीत हेतू तर नसेल ना? अशा शंकेने आम्हाला घेरले होते. हे चोरीचे पैसे तर नसतील ना? तसे असले तर काय होईल ? किंवा या पैशांसाठी रात्रीतून आमच्यावर कोणी हल्ला केला तर काय? अनेक शंका आमच्या मनात येऊ लागल्या. पण तो अपरिचित इसम मात्र, "तुम्ही आत्ताच्या आत्ता पैसे घ्याच, पण कुठल्याही परिस्थितीत ही गाडी मलाच विका" असे म्हणत हटूनच बसला. आम्ही मात्र चांगलेच अडचणीत पडलो. "तुम्ही उद्या सकाळी रक्कम घेऊन या, आम्ही उद्या तुम्हालाच गाडी देऊ, इतर कोणालाही विकणार नाही" असेही आम्ही त्या माणसाला सांगून पहिले. पण तो इसम काही केल्या ऐकेना. आत्ता रात्री या रक्कमेची पावती देणे आम्हाला शक्य होणार नाही, अशी लंगडी सबब पुढे केली. तरीही तो ऐकायला तयार होईना. शेवटी मी व आनंद आणि त्याच्या आर्मी ऑफिसर मित्रांनी मिळून चर्चा केली, आणि ते पैसे व गाडी दोन्ही आमच्याकडेच ठेवून घेऊन त्या माणसाशी सौदा पक्का करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरच्या अर्ध्या तासात आनंदने आणि त्याच्या दोन्ही मित्रांनी मिळून ती सगळी रक्कम मोजून घेतली. पैशाची कच्ची पावती घेऊन, पण  खरेदी केलेली गाडी मात्र न घेता तो माणूस रात्री दहानंतर परत गेला. त्या रात्रभर मी आणि आनंद काळजीने नीट झोपूही शकलो नाही.  

दुसऱ्या दिवशी भल्या सकाळी तो खरेदीदार एका स्टॅम्पपेपरवर खरेदीखताचा मसुदा टाईप करूनच घेऊन आला. त्यावर त्याने व आनंदने सह्या केल्या, साक्षीदार म्हणून आनंदच्या दोन्ही मित्रांनी सह्या केल्या आणि तो व्यवहार प्रत्यक्षात पूर्ण झाला. स्वतःला गाडी चालवता येत नसल्याने ती गाडी तो आदल्या रात्री घेऊन गेला नव्हता हा खुलासा त्याने तेंव्हा केला! सकाळी येताना मात्र, गाडी चालवता येत असलेल्या कोणालातरी बरोबर घेऊन तो आला होता. गाडी व कागदपत्रे त्याने ताब्यात घेतली आणि चालकाच्या शेजारी बसून, मोठ्या समाधानाने आणि विजयी मुद्रेने तो निघून गेला. दीड लाखात ऑन-रोड घेतलेली, दोन वर्षे मनसोक्त वापरून झालेली ती व्हॅन आम्ही एक लाख सदुसष्ट हजाराला विकल्यामुळे आम्हीही भलतेच खुषीत होतो. आनंदने तातडीने जाऊन ती रक्कम बँकेत भरून टाकली आणि आम्ही सुटकेचा निश्वास सोडला.