आज एकसष्ठी पूर्ण झाली. मध्यरात्रीपासूनच अनेक मित्र-मत्रिणी,आप्तांच्या आणि माझ्या बालरुग्णांच्या पालकांच्या शुभेच्छांचा नुसता पाऊस पडतोय. "आतातरी जरा तुझा बालिशपणा सोडून देऊन, जरा पोक्तपणे वागत जा" असा लाडिक सल्ला माझ्या काही 'हितचिंतकांनी' दिला. तर माझा एक वर्गमित्र फोनवर शुभेच्छा देत म्हणाला, "तुला एकसष्ट वर्षे पूर्ण झाली? खरंच वाटत नाही. तुझ्या वयाचे आकडे उलटे केले तर १६ हा अंक येतो. परवाच तू तोरण्यासारखा अवघड किल्ला सर केलास. त्यामुळे मला तर तू अजून षोडशाच वाटतेस!" त्याचे ते बोलणे ऐकून मी मनोमन अगदी सुखावले होते. माझ्या काही मोठ्या भावंडानी, 'साठ प्लस' या गटामध्ये माझे मागच्या वर्षीच सहर्ष स्वागत केले होते. आयुष्यातला साठीचा महत्त्वाचा टप्पा ओलांडून, वर एक वर्ष उलटून गेल्यामुळे 'साठ प्लस' या गटामधले माझे स्थान पक्के झाले. माझ्या मोठ्या भावंडानी आणि आप्तस्वकीयांनी माझे हार्दिक अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या! पण आता यापुढे तब्येतीला जपायला हवे असा प्रेमळ सल्ला दिला. माझ्या काही आत्या मावशा आणि काकूंनी, "अगंबाई मागच्याच वर्षी तू साठ वर्षांची झालीस नाही का? खरंच वाटत नाही गं. मला तर तू अजूनही अगदी फ्रॉक आणि दोन वेण्यातलीच अल्लड मुलगी आठवतेस!"
एकूण काय? माझ्या मागच्या वर्षीच्या वाढदिवसाला बोलले तसेच या वर्षीही मला शुभेच्छा देणारे सर्वजण 'वय' या संकल्पनेच्या वेगवेगळ्या पैलूंबद्दलच बोलत होते. त्यामुळे व्यक्तीच्या वयाबद्दल किती वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू शकतात, याचा मला पुनःप्रत्यय आला. सर्वसाधारणपणे वय मोजताना आपण जन्मतारखेपासून किती वर्षे उलटली, इतका आणि इतकाच विचार करत असतो. पण वैद्यकीय परिभाषेमधे केवळ या वयाचा विचार न करता, वयाच्या वेगवेगळ्या पैलूंचा किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या वयाचाही विचार केला जातो. जन्मदिवसापासून आजतागायत जो काळ उलटून गेला आहे त्याला आम्ही Chronological Age म्हणतो. ते महत्त्वाचे असतेच. पण बुद्ध्यांक काढण्यासाठी Mental Age हे खूप महत्त्वाचे ठरते. म्हणजे एखाद्या ठराविक वयाच्या मुला-मुलीच्या मेंदूची वाढ आणि प्रगल्भता, त्यांच्याच वयाच्या इतर मुला-मुलींच्या मेंदूइतकी झाली आहे की नाही, यावर त्या मुला-मुलीचे Mental Age ठरते. Mental Age हे Chronological age च्यापेक्षा बरेच कमी असेल तर त्या व्यक्तीला मतिमंद म्हटले जाते. Mental Age हे Chronological age च्या बरोबरीचे असेल तर त्या व्यक्त्तीचा बुद्ध्यांक १०० असतो. Mental age हे Chronological Age च्या पेक्षा जास्त असणे, अर्थात तुमचा बुद्ध्यांक जास्त असणे, हे कधीही चांगले समजले जाते.
कायद्याच्या परिभाषेमधे Legal Age ला खूपच महत्त्व असते. लग्न करणे, मतदानाचा हक्क मिळणे अशा अनेक गोष्टींसाठी Legal Age लक्षात घेतले जाते. वयाची १८ वर्षे पूर्ण झालेली नसल्यास, त्या व्यक्तीला भारतीय कायद्याच्या नजरेमध्ये 'अल्पवयीन' समजले जाते. 'अल्पवयीन' वयोगटासाठीचे कायदे, त्यांच्यातील गुन्हेगारांना मिळणाऱ्या शिक्षा वेगळ्या असतात. अशा अल्पवयीन व्यक्तींना कायद्याने काही विशेष हक्कही दिले गेलेले आहेत. हे हक्क, व हे कायदे बालकांच्या सुरक्षिततेसाठी खूपच महत्त्वाचे आहेत. काही दिवसांपूर्वी, साडेसतरा वर्षे वयाच्या एका मुलाकडून पुण्यात घडलेल्या एका मोठ्या अपघातानंतर, Legal Age वर खूप उहापोह झाला. असाच उहापोह 'निर्भया' हत्याकांडाच्यावेळीही झाला होता. बाल न्याय अधिनियमातील तरतुदींनुसार, वय वर्षे १६ ते १८ च्या दरम्यानच्या कुणा व्यक्तीने एखादा जघन्य अपराध केल्यास, त्या व्यक्तीच्या शारीरिक व मानसिक स्थितीचे तज्ज्ञांद्वारे मूल्यमापन केले जाते. सदर गुन्हा करण्याकरिता व त्याचे परिणाम जाणण्यासाठी ती व्यक्ती सक्षम असल्याचा निर्वाळा तज्ज्ञांनी दिल्यास त्या व्यक्तीला कायद्याच्या दृष्टीने 'प्रौढ' मानून खटला चालवला जाऊ शकतो व तिला कठोर शिक्षा होऊ शकते.
एखाद्या व्यक्तीच्या प्रत्यक्ष वयाच्या मानाने, तिच्या शारीरिक अवयवांचे वय किती आहे? म्हणजेच एखाद्या व्यक्तीचे अवयव त्याच वयाच्या इतर व्यक्तींच्या अवयवाच्या मानाने कितपत सक्षमपणे काम करू शकत आहेत यावरून त्या व्यक्तीचे Biological Age ठरते. आपला आहार, आपल्या आरोग्यपूर्ण सवयी, आपली जीवनशैली, आपली अनुवांशिकता अशा अनेक घटकांवर आपले Biological age अवलंबून असते. आपल्या Chronological Age च्या मानाने शरीर कमी थकलेले असेल तर आपले Biological Age कमी आहे असे म्हटले जाते, व ते कमी असणे वैद्यकीय दृष्ट्या त्या व्यक्तीच्या दीर्घायुरोग्यासाठी उत्तम असते. अशा व्यक्ती वयोवृद्ध होईपर्यंत कार्यक्षण आणि कार्यरत राहू शकतात. त्यामुळे, कोणालाही आपल्या Chronological Age च्या मानाने आपले Biological Age कमी असावे असे वाटणे सहाजिकच आहे.
जीवनातल्या वेगवेगळ्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी, एखादी व्यक्ती तिच्याच वयाच्या इतर व्यक्तींच्या मानाने, मानसिक दृष्ट्या किती सक्षम आहे, यावर त्या व्यक्तीचे Psychological Age ठरते. वयाच्या मानाने Psychological Age जास्त असलेल्या व्यक्ती, तिच्या वयोगटातील इतर व्यक्तींच्या मानाने नवनवीन आव्हानांना सहजी तोंड देऊ शकतात, जास्त उत्साही असतात, नवीन कौशल्ये लवकर आत्मसात करू शकतात, नवीन व्यवसाय किंवा नोकरीमध्ये लवकर आणि सहजी रुळू शकतात किंवा अगदी नवीन विषय व अभ्यासक्रम सहजी पूर्ण करू शकतात. अशा व्यक्तींच्या व्यक्तिमत्वामध्ये एकप्रकारची लवचिकता असते. म्हणजेच, Chronological Age च्या मानाने Psychological Age जास्त असणे चांगलेच म्हणायचे!
प्रत्येक वयोगटातील व्यक्तीकडून एखाद्या संस्कृतीतील सामाजिक नियमानुसार काही ठराविक वर्तनाची अपेक्षा असते. यामध्ये आपली कौटुंबिक व सामाजिक कर्तव्ये पार पाडणे, आपले शिक्षण वेळेवर पूर्ण करणे, अशा गोष्टींचा समावेश असतो. एखादी व्यक्ती, आपल्या वयोगटातील इतर व्यक्तींच्या मानाने स्वतःच्या सामाजिक जबाबदाऱ्या किती सहजी आणि समर्थपणे पार पडते, यावर त्या व्यक्तीचे Social Age अवलंबून असते. म्हणजेच Chronological Age च्या मानाने Social Age जास्त असणे, कधीही चांगलेच समजले जाते.
थोडक्यात काय? आपल्या Chronological Age च्या मानाने आपले mental age, Psychological Age आणि Social Age जास्त असणे, परंतु Biological Age कमी असणे हे सर्वोत्तम!
म्हणूनच मी म्हणते, "एज इज नॉट जस्ट अ नंबर!"