बुधवार, १९ ऑक्टोबर, २०१६

प्रतिसाद

'झीरो एफ आय आर' या माझ्या लेखावर अनेक लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या.
"जपून राहा बाई, काळजी घे, इतक्या पहाटे फिरायला जाऊ नकोस, महिलांनी अशा आक्षेपार्ह वर्तनाकडे दुर्लक्ष करणेच जास्त शहाणपणाचे असते" अशा सावध प्रतिक्रिया काहीं स्त्रियांनी दिल्या. कित्येक स्त्रियांनी त्यांच्यावर ओढवलेले असेच प्रसंग मला सांगितले व मी 'एफ आय आर' दाखल करण्याचे धारिष्ट्य दाखवल्याबद्दल माझे खूप कौतुक केले.
"अशा गैरप्रकाराला हाताळता येणे प्रत्येक स्त्रीला किंवा पुरुषाला जमेलच असे नाही" अशी प्रतिक्रिया देऊन, पुरुषही अशा गैरवर्तनाचे बळी ठरू शकतात, याकडे काहींनी माझे लक्ष वेधले.
सर्वानाच विचार करायला प्रवृत्त करणारा असाही एक प्रश्न मांडला गेला की "मांडलेला विषय आणि त्यामागचा विचार समजून घ्यायची कुवत, बलात्कारांनंतर पीडितेच्या आणि गुन्हेगारांच्या जातीची चर्चा करणाऱ्या आपल्या समाजामध्ये आहे तरी का?"

पोलिसांविषयी मी जे लिहिलं, त्याबाबत मात्र सर्वांकडून आपल्या पोलीस खात्याला नांवे ठेवण्यात आली. पोलीसखात्यात काम करणाऱ्या आणि स्वच्छ प्रतिमा असलेल्या काही व्यक्तींनी माझा लेख वाचला आणि त्यांना थोडेसे वाईट वाटले. त्यातल्या एक-दोघांनी मला असेही सुचवले की " 'झीरो एफ.आय.आर.' म्हणजे काय? बाललैंगिक शोषण आणि इतर सर्वच लैंगिक गुन्हयाविरुद्ध कायद्यात काय तरतुदी आहेत? स्त्रिया स्वसंरक्षणासाठी काय करू शकतात? सरकारने त्यासाठी काय काय पावले उचलली आहेत? पोलिस नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी काय-काय करीत आहेत ?" याबद्दलही सविस्तर माहिती लिहून मी  समाजस्वास्थ्याला आणि स्त्रियांच्या सबलीकरणाला हातभार लावावा. म्हणूनच हा लेख.

"झीरो एफ.आय.आर." ही पोस्ट वाचून कित्येकजणींनी त्यांना त्यांच्या लहानपणी आलेले असेच काही वाईट अनुभव मला सांगितले. बाललैंगिक शोषण हा एक गंभीर गुन्हा आहे. जवळजवळ पन्नास टक्के मुला-मुलींना कुठल्या ना कुठल्या प्रकारात मोडणाऱ्या लैंगिक शोषणाला सामोरे जावे लागते, असे आकडेवारीने सिद्ध झालेले आहे. कित्येक  लहान मुलांना आपल्याबरोबर काही गैरकृत्य केले जातेय, याची जाणही नसते. अशा प्रकारच्या जवळजवळ नव्वद टक्के घटनांमध्ये मुलां-मुलींचे शोषण, नातेवाईकांकडून अथवा जवळच्या ओळखीच्या व्यक्तींकडून होत असते. दुर्दैवाने, कित्येक शोषणकर्तेही स्वतः कायद्याने अज्ञान, म्हणजेच अठरा वर्षाच्या खालील वयोगटातील असतात.  सुदैवाने, The Protection of Children from Sexual Offences Act, 2012, (POCSO) हा कायदा आज अस्तित्वात आलेला आहे. या कायद्याचे ज्ञान जास्तीतजास्त पालकांना असायला हवे.
आपल्या मुलाचे किंवा मुलीचे लैंगिक शोषण होणार नाही ही  काळजी घेणे तर आवश्यकच आहे, पण त्याबरोबरच आपला पाल्य कोणाचेही शोषण करणार नाही अथवा लैंगिक गुन्हे करण्यास प्रवृत्त होणार नाही यासाठी पालकांनी सतर्क राहून आपापल्या पाल्यांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे. 

मुलांना सक्षम बनवून सुरक्षित ठेवण्यासाठी,  पालकांच्या आणि शालेय  शिक्षकांच्या कार्यशाळा 
मी स्वतः घेत असते. तसेच, चार-पाच वर्षांपासून ते मोठ्या वयाच्या मुलांसाठी मी शाळांमध्ये जाऊन  प्रबोधनसत्रे घेत असते. कुठले वर्तन अयोग्य आहे, त्यांच्याबरोबर असे अयोग्य वर्तन  होऊ नये यासाठी त्यांनी काय काळजी घ्यायची, कुणाबरोबर  असे काही घडत असेल  तर काय करायचे, नेमकी कशी व कोणाची मदत घ्यायची,अशा अनेक बाबींवर मी गप्पांच्या माध्यमातून मुलांचे प्रबोधन करते. चाईल्डलाईन या संस्थेने बनवलेली 'कोमल' ही फिल्म दाखवून मुलांना बोलते करते. नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाईल्डच्या 'POCSO E-Box' आणि चाईल्ड लाईनच्या Helpline बद्दल माहिती देते. लैंगिकता, योग्य-अयोग्य लैंगिकवर्तन, निकोप प्रेमसंबंध, सायबर सिक्युरिटी अशा विषयांवर विद्यार्थी-विद्यार्थिनींचे प्रबोधन मी करत असते. सर्व शाळांमधून व महाविद्यालयांमधून  असे प्रबोधन सातत्याने होणे अत्यावश्यक आहे. लैंगिक शिक्षणांमध्ये केवळ शारीरिक बदलाबद्द्दल न बोलता विद्यार्थी-विद्यार्थिनींना त्यांच्या भावनिक समस्या सोडवायला शिकवले पाहिजे. 

'झीरो एफ.आय.आर.' या पोस्टवर अशीही एक प्रतिक्रिया आली की, 'सर्व समाजात विकृती असतात, सर्वाना कधी ना कधी तरी अशा प्रसंगातून जावे लागते. आपल्याला जर काही शारीरिक इजा होत नसेल तर स्त्रियांनी डोके शांत ठेऊन अशा वागण्याकडे दुर्लक्ष करावे, हे बरे'. ही प्रतिक्रिया मात्र मला तितकीशी रुचली नाही. खरे बोलायचे तर, वर्षानुवर्षे स्त्रिया व लहान मुली घराबाहेर किंवा घरातदेखील येणाऱ्या अशा अनुभवांकडे दुर्लक्षच करत आलेल्या आहेत. कामाच्या ठिकाणी कित्येक महिलांना, बरोबरच्या पुरुषांच्या शोधक नजरा टाळत, अश्लील शेरेबाजी, शिट्ट्या, द्व्यर्थी चावट गाण्यांच्या ओळी ऐकत, किंवा सूचक हावभाव नजरेआड करतच काम करावे लागते. असे वागणे हा पुरुषांचा जन्मसिद्ध हक्क आहे, अशा समजुतीने पुरुष सर्रास वागतात. "डोके शांत ठेऊन अशा वागण्याकडे दुर्लक्ष करावे",  हा 'सबुरीचा सल्ला' मात्र स्त्रियांना दिला जातो हे योग्य नव्हे. स्त्रियांपुढे प्रश्न असाही येतो की अशा प्रकारात मोडणारे वर्तन सिद्ध कसे करायचे? असल्या 'क्षुल्लक' गोष्टीसाठी थेट पोलिसांकडे जाणे म्हणजे अजूनच अवघड. शिवाय, अशा गैरप्रकाराला आपल्याला  सामोरे जावे लागते आहे, याची घरी आई-वडील, भाऊ आणि नवरा यापैकी  कोणालाही काही सांगण्याची चोरी असते. नोकरी करणे तर आवश्यकच आहे. मग करायचे काय? तर कामाच्या ठिकाणी असले आक्षेपार्ह वर्तन निमूटपणे सहन करायचे, अशीच स्त्रियांची  मनोधारणा झालेली आहे. 

सतत होणाऱ्या या कुचंबणेतून सुटका व्हावी याकरिता राजस्थानात भंवरीदेवीच्या बलात्कारानंतर सुरु झालेला लढा, दिल्लीतील निर्भयाच्या बलिदानाने अजूनच तीव्र झाला. 'Sexual Harassment of Women at Workplace (Prevention, Prohibition and Redressal) Act, 2013' हा एक अत्यंत महत्वाचा, दिवाणी कायदा अस्तित्वात आला. या कायद्यामधील तरतुदींची स्त्रियांना आणि पुरुषांनाही व्यवस्थित माहिती असायला हवी. आक्षेपार्ह वागण्याकडे दुर्लक्ष न करता पीडित स्त्रियांनी तक्रार नोंदवावी, हेच योग्य. अशा कायदेशीर तरतुदींबद्दलही मी प्रबोधनसत्रे घेत असंते. तसेच, अशा स्वरूपाच्या गुन्ह्यांच्या तक्रारनिवारण समितीवरही माझी नेमणूक झालेली आहे. आज जरी या कायद्याने केवळ स्त्रियांनाच संरक्षण मिळाले असले तरी हा कायदा gender-neutral करून पुरुषांनाही त्यायोगे संरक्षण मिळावे, असे माझे मत आहे. त्याचबरोबर, महिलांनी या कायद्याचा दुरुपयोग करू नये असेही मला वाटते.

भारतात लैंगिक गुन्ह्यांसाठी अनेक फौजदारी कायदे ब्रिटिशांनी १८७२ सालापासून लागू केले आणि भारतीय दंड विधानातील  ५०९ , ३५४, ३७५, ३७६ ही कलमे अस्तित्वात आली. त्यामध्ये वेळोवेळी काही सुधारणाही होत गेल्या. बऱ्याच कायद्यांमध्ये स्त्रियांना विशेष संरक्षण दिलेले आहे. पत्नीला किंवा सुनेला गैरवागणूक देणे, हुंडा किंवा माहेरून पैसे आणण्यासाठी तगादा  लावणे हा गुन्हा आहे ही जाणीव समाजात  रुजायला लागली असली तरीही, आज भारतात कौटुंबिक अत्याचारांचे व हुंडाबळीचे  प्रमाण बरेच आहे. अशा प्रकारच्या अन्यायाला विरोध करण्यासाठी मुलींना आणि स्त्रियांना सक्षम बनवणे आवश्यक आहे. असा गैरप्रकार घडत असल्यास योग्य त्या कायद्याची मदत घेऊन स्वतःचे संरक्षण कसे करावे, याची माहिती स्त्रियांना असणे आवश्यक आहे.
 
"First Information Report (एफ.आय.आर.)" म्हणजेच, गुन्ह्याच्या तक्रारीची पोलीसांकडे सर्वप्रथम होणारी नोंद.  गुन्हा घडल्याची तारीख, वेळ, ठिकाण असे गुन्हयाबद्दलचे सर्व तपशील पोलीस विचारून घेतात आणि एफ.आय.आर.मध्ये नमूद करतात. प्रत्येक एफ.आय.आर.ला त्या पोलीस स्टेशनचा एक क्रमांक दिला जातो. पूर्वापार अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसार, ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हा घडलेला आहे, त्या पोलीस स्टेशनमध्येच गुन्ह्याची नोंदणी होणे अपेक्षित होते. मात्र, दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर गठित केल्या गेलेल्या 'न्यायमूर्ती वर्मा आयोगाच्या' सूचनांनुसार २०१३ साली कायद्यात बदल केला गेला. बदललेल्या तरतुदीनुसार, एखाद्या दखलपात्र गुन्हयाची नोंद पीडित व्यक्तीला आपल्या सोयीच्या कुठल्याही पोलीस स्टेशनला करता येते. यालाच "झीरो एफ.आय.आर."
असे म्हणतात, कारण
 गुन्हा नोंदविणाऱ्या पोलीस स्टेशनमध्ये अशा एफ.आय.आर.ला "००" असा क्रमांक देऊन ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हा घडलेला आहे, तेथे ती पाठवली जाते. दखलपात्र गुन्ह्याची नोंद लवकरात लवकर होऊन तपास जलदगत्या चालू व्हावा यासाठी ही तरतूद केलेली आहे. तेंव्हा, ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हा घडलेला आहे, त्याच पोलीस स्टेशनला जाऊन गुन्ह्याची नोंदणी करणे आता बंधनकारक नाही, हे जर सर्व नागरिकांना समजले तरच ते या हक्काचा वापर करू शकतील. 

पोलीस खाते काहीच कामाचे नाही असे म्हणून आपणच पोलीस खात्याला नेहमीच नावे ठेवत असतो. महाराष्ट्र पोलिसांनी स्त्रियांच्या संरक्षणासाठी 'प्रतिसाद' नावाचे एक मोबाईल ऍप तयार केलेले आहे. अपघात, अतिरेकी हल्ला, चोरी किंवा 'महिलांच्या सुरक्षेला धोका', अशा प्रकारचा कुठलाही गुन्हा घडल्यास आपण त्या ऍपचे बटन दाबून त्वरित पोलिसांची मदत मिळवू शकतो. या ऍपचा वापर करून लोक आज पोलिसांची मदत घेत आहेत  व पोलीस खातेही मदत करते आहे. तसेच १०० नंबर फिरवूनही आपण आपली तक्रर नोंदवू शकतो. १०० नंबर फिरवल्यानंतर काही मिनिटांतच पोलिसांची मदत मिळू शकते असा माझा आत्त्तापर्यँतचा अनुभव आहे. आपल्या देशांत कायदा व सुव्यवस्था हवी असेल तर पोलिसांबरोबरच नागरिकांचीही काही सामाजिक बांधिलकी आहे याचे भान आपण सर्वांनी ठेवले पाहिजे हे नक्कीच . 

     


सोमवार, १० ऑक्टोबर, २०१६

"झीरो एफ आय आर"

'पिंक' सिनेमा प्रदर्शित झाला आणि 'झीरो एफ.आय.आर' या विषयावर बरंच काही-काही लिहून यायला लागले. त्याच सुमारास कोपर्डीतील बलात्कार प्रकरणानंतर मूक मोर्चे निघायला लागले. मग इतर जातीतील महिलांवरदेखील कसे लैंगिक अत्याचार नेहमीच होत आलेले आहेत याचाही उहापोह चालू झाला. पण या सर्व गदारोळात, जाती-पातीचे राजकारण न करता, महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारांविरुद्ध प्रतिबंधनात्मक ठोस पावले उचलली गेली पाहिजेत, हे नजरेआड होत आहे. 'झिरो एफ.आय.आर' वरून मला, मागच्या वर्षी नवरात्रात घडलेली एक  घटना आठवली.

नेहमीच्या सवयी प्रमाणे, पहाटे उठून मी सव्वापाच-साडेपाचच्या सुमारास फिरायला घराबाहेर पडले होते. भल्या पहाटेचे थंड, शांत व प्रसन्न वातावरण होते. अजून उजाडलेले नसल्याने  व रस्त्यावरचे काही दिवे बंद असल्याने, रस्त्यावर प्रकाश अगदीच कमी होता. साधू वासवानी चौकातून विधानभवनकडे उजव्या हाताच्या फुटपाथवरून चालत निघाले. त्या निर्मनुष्य रस्त्यावरून एक दांडगा तरुण फुटपाथच्या लोखंडी रेलींगजवळून चालत येताना मला दिसला. लांबूनच त्याची व माझी नजरानजर झाली, आणि मला काही कळायच्या आतच त्याने घाणेरडे अंगप्रदर्शन करून, माझ्याकडे बघत काही अश्लील हावभाव सुरु केले. अचानक असे दृश्य समोर आल्याने मी स्तब्ध झाले, कमालीच्या भीतीची लहर माझ्या शरीरातून गेली आणि अक्षरशः घाम फुटला. पण दुसऱ्याच क्षणी मी भानावर आले आणि माझ्या मनांत किळस, राग, उद्वेग या भावना उफाळून आल्या. त्याच्या त्या हिडीस वर्तनाबद्दल  त्याला चांगलाच धडा शिकवायला पाहिजे अशी प्रबळ भावना मनात आली.

तो तरुण माझ्या डाव्या बाजूला जवळच उभा असला तरी मी त्याच्या कानफटात लावू शकेन इतका जवळ नव्हता. रागाने त्याच्यावर ओरडत पटकन मागे वळून फुटपाथवरून रस्त्यावर उतरून, त्याला पकडण्याच्या उद्देशाने मी जवळ-जवळ धावतच त्याच्याकडे निघाले. माझा रणचंडिकेचा अवतार बघून तो घाबरून, मला चुकवून, वासवानी चौकाकडे पळू लागला. मग मीही सगळे बळ एकवटून त्याच्या मागे शक्य तितक्या जोरात पळायला लागले. पण तो  जोरात पळत काही क्षणांतच माझ्या नजरेआड झाला. त्या दरम्यान मी माझ्या  मोबाईल फोन वरून १०० नंबरवर फोन फिरवला, पण तो लागला नाही. म्हणून मी घरी फोन करून झालेला प्रकार आनंदला कळवला आणि पोलिसांना कळवायला सांगितले. रस्त्यावरून पळता-पळता, "पकडा पकडा" असा आरडाओरडा मी करीत असल्याने, रस्त्यावरून चाललेला एक अनोळखी रिक्षावाला मदतीला धावून आला व मी त्याच्या  रिक्षात बसून त्या तरुणाचा पाठलाग सुरु केला. रिक्षावाल्याने प्रसंगावधान राखून सुसाट वेगाने रिक्षा चालवत पाठलाग केल्यामुळे, साधू वासवानी रस्त्यावरील पोलीस मुख्यालयाच्या अलिकडच्या पेट्रोल पंपासमोर त्या तरुणाला आम्ही गाठले.

तातडीने रिक्षातून उतरून त्या तरुणाला मी पकडले  व त्याला एक सणसणीत थोबाडीत मारली. तो तरुण माझ्या पायावर लोळण घेऊन, हात जोडून, "मावशी माफ करा, मला सोडा. परत असं करणार नाही " अशी गयावया करायला लागला.  तेवढ्यात पोलीस मुख्यालयाच्या गेट नंबर तीन मधून एक महिला पोलीस शिपाई बाहेर आल्या व काय घडले याची विचारपूस करू लागल्या. तसेच पाठोपाठ एक पुरुष पोलीस शिपाई मोटारसायकलवरून आला. त्या माणसाने जे घृणास्पद वर्तन  केले होते त्याबद्दल  सांगण्याचीही मला लाज वाटत होती. तरीही घडलेला प्रकार  मी त्यांना सांगितला. मग त्या शिपायाने त्या तरुणाला पकडून पोलीस मुख्यालयाच्या दारात तैनात असलेल्या शिपायांच्या हवाली केले. हे सर्व होईस्तोवर घरातून निघून आनंदही तिथे आलेला होता. त्याने पोलिस कंट्रोल रूमला माझा फोन नंबर कळवलेला असल्याने, कंट्रोल रुमकडूनही मला फोन आलेला होता. तसेच विधान भवन पोलीस चौकीचे फौजदारही एका शिपायासह दाखल झालेले होते.

"या माणसांविरुद्ध तुम्हाला गुन्हा दाखल करायचाय का?" असा प्रश्न माझ्यापुढे पोलिसांनी ठेवला. गुन्हा घडलेलाच होता आणि तो दाखल करणे आवश्यक आहे यावर मी आणि आनंदही ठाम होतो. मग पोलीस त्या तरुणाला घेऊन बंडगार्डन  स्टेशनमध्ये गेले व मलाही तिथे जावे लागले. तिथे गेल्यावरचा अनुभव वेगळाच होता. 'आता पहाटे पहाटे ही काय पीडा आणलीय या बाईने?' असा भाव तिथल्या ड्युटीवरील पोलीस कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आला होता. त्यांनंतरचा सगळा प्रकार अत्यंत त्रासदायक होता. "बाई, कम्प्लेंट कशाला करता? याला जरा आत घेतो, आमच्या पद्धतीने समज देऊन सरळ करतो आणि देतो सोडून" किंवा, "एफ. आय. आर. दाखल केलीत तर तुम्हालाच त्रास होईल. कोर्टात साक्ष द्यायला यावे लागेल" आणि कळस म्हणजे, "बाई त्यानं तुम्हाला हात तर नाही ना लावला? मग द्या ना सोडून. कशाला एफ. आय. आर. देण्याच्या भानगडीत पडता?" हे सगळं कमी होतं की काय म्हणून, "बाई इतक्या पहाटे-पहाटे तुम्ही कशाला घराबाहेर पडला होतात?" पोलिसांच्या असल्या भडिमाराला मला सामोरे जावे लागले. मला हे सगळे असह्य होत होते. पण आनंद मला धीर देत, माझ्या बरोबर होता म्हणून मी शांत राहू शकले.   

सर्वांत चीड आणणारे वक्तव्य विधानभवन पोलीस चौकीच्या फौजदारसाहेबांचे होते," बाई, गुन्हा जर आमच्या पोलीस चौकीजवळ घडला असे तुम्ही म्हणता, तर मग तुम्ही आमच्या पोलीस चौकीवर तक्रार द्यायला का नाही आलात? इकडं पोलीस हेडक्वार्टरपाशी यायची काय गरज होती?" गुन्हेगाराच्या मागे जाऊन त्याला पकडणे मला जास्त महत्त्वाचे वाटले, असे स्पष्टीकरण मी दिले. पण त्यांना पटत नव्हते व ते सतत माझ्यावरच अविश्वास दाखवत होते! 
"विधान भवन पोलीस चौकीचे दार सकाळी आठ वाजेपर्यँत चक्क बंद करून ठेवलेले असते, मग मी कशी तिकडे येणार होते?" असा प्रतिप्रश्न मी त्यांना करू शकले असते. 
माझे फिरणे संपवून मी परत येईपर्यंत म्हणजे सुमारे आठ वाजेपर्यंत खरोखरीच, विधान भवन पोलीस चौकीचे दार बंद असते, हे मी गेली कित्येक वर्षे बघते आहे. हे सांगून त्या पोलीस फौजदाराचे तोड बंद करावे, असे मला क्षणभर वाटलेही होते. पण त्या वेळी त्यांची उणी-दुणी काढणे योग्य होणार नाही या जाणिवेने गप्प बसले. 

इतकी बोलणी ऐकूनही मी एफ. आय. आर. दाखल करण्यावर ठाम आहे हे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानंतर मग, "मॅडम आत्ता आमची आधीची कामे चालली आहेत. तुमचा फोन नंबर द्या. आम्ही तुम्हाला बोलावून घेतो आणि मग एफ. आय. आर. नोंदवून घेतो", असे सांगण्यात आले. 
मी आणि आनंदने आपसात चर्चा केली आणि तिथेच थांबून एफ.आय.आर नोंदवूनच बाहेर पडायचे असे ठरवले. पुढचे दोन-अडीच तास आम्ही तिथल्या बाकड्यावर बसून होतो. रात्रीची ड्यूटी संपवून जाणाऱ्या व सकाळी ड्यूटीवर येणाऱ्या प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याच्या चेहऱ्यावर, "बाई तर बऱ्या घरच्या दिसताहेत, मग काय भानगड आहे यांची? पहाटे-पहाटे पोलीस स्टेशनला काय करताहेत?" असा प्रश्नार्थक भाव होता. काहींनी, "तुमचं काय आहे? का थांबला आहात?" असे प्रश्न विचारलेही. मग पुन्हा ते सगळे सांगणे आले. त्यावर पोलिसांची अनेक बेजबाबदार विधाने ऐकणे आले. काही पोलिसांचा बोलण्याचा रोख तर मला असाही वाटला की, या बाईच्या बाबतीत असं काही घडलं आहे म्हणजे हिचंच काहीतरी चुकलेलं असणार. मला अगदी लाजिरवाणे वाटत होते. तरीही, या अडचणींना न  जुमानता, एफ.आय.आर दाखल करणे हे माझे कर्तव्य आहे या भावनेने आम्ही तिथे थांबून राहिलो. शेवटी साडेनऊ दहाच्या सुमारास एफ.आय.आर दाखल होऊन त्याची प्रत घेऊन आम्ही तिथून बाहेर पडलो.

या सर्व घटनेतून मला काही गोष्टी जाणवल्या. सर्वप्रथम, अशा प्रसंगातून गेलेल्या स्त्रीला, गुन्ह्याविरुद्ध आवाज उठविण्यासाठी घरातील मंडळींचे, विशेषतः पति, वडील, भाऊ यांचे सक्रिय आणि भावनिक पाठबळ असणे अत्यावश्यक आहे. कित्येक स्त्रियांना अशावेळी कदाचित तेही मिळत नसावे. दुसरी गोष्ट म्हणजे, अशा प्रकारची तक्रार नोंदवायला गेलेल्या माझ्यासारख्या सुशिक्षित, सुस्थितीतील स्त्रीला जर पोलिसांकडून म्हणावे तसे सहकार्य मिळत नसेल, तर एखाद्या अशिक्षित, गरीब घरातल्या स्त्रीला एफ.आय. आर. नोंदवणे किती अवघड जात असेल याचा मला अंदाज आला. तिसरी गोष्ट म्हणजे, केवळ माझ्यासमोर दुरून घडलेल्या त्या वर्तनामुळे जर मी इतकी घाबरले होते तर प्रत्यक्षात लैंगिक अत्याचार झालेल्या स्त्रीची मानसिक अवस्था कशी होत असेल, याची कल्पना करता येऊ शकते. आणि त्यानंतर पोलिसांकडून धीर न मिळता उलट जर तिला अपमानास्पद वागणूक मिळत असेल तर ते अतिशय दुर्दैवी आहे. या सर्व कारणांमुळेच  कदाचित कित्येक गुन्हे घडूनही त्यांची नोंद करायला स्त्रिया कचरत असाव्यात. 'पिंक' सिनेमामुळे, एफ.आय.आर. नोंदवण्याचे महत्व आणि "झीरो एफ.आय.आर." ही संकल्पना अधोरेखित झाली. पण मला हेही लक्षात आले की अशा गुन्हयांची नोंद करूनच न घेण्याकडे पोलिसांचा कल असतो. कदाचित आपले पोलिसखाते, "झीरो एफ.आय.आर" म्हणजे, "एफ.आय.आर. च्या शून्य नोंदी करणे असा अगदी सोयीस्कर अर्थ घेत असावे!

नवरात्रात आपण स्त्रीशक्तीची पूजा करतो. मागच्या नवरात्रात मी माझ्यातली 'शक्ति' जागृत करून लैंगिक गुन्ह्याची प्रवृत्ती असलेल्या एका व्यक्तिला पकडून दिले. पोलिसांकडून केवळ 'समज देववून' त्याला सोडून देण्याऐवजी एफ.आय.आर. नोंदवण्याचा कष्टाचा पर्याय मी निवडला. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीला वेळीच पकडून देऊन, पुढे होणारा एखादा गंभीर गुन्हा कदाचित मी थांबवू शकेन, अशीच माझी ठाम भूमिका होती आणि आजही आहे. सर्वच वयाच्या स्त्रियांनी, लैंगिक स्वरूपाच्या छोट्यातल्या छोट्या गुन्ह्यांबद्दलही   "Zero tolerence" ठेवला आणि न घाबरता गुन्हेगाराला प्रतिकार केला व गुन्हा नोंदवला, तर अशा अपप्रवृत्तींना आपोआप आळा बसेल. गुन्हा नोंदवण्यासाठी "झीरो एफ.आय.आर." ची संकल्पनाही स्त्रियांना नीट माहिती पाहिजेच. नवरात्रात स्त्रिया उपास, पूजा-अर्चा व नट्टापट्टा करतात, त्याला काहीच हरकत नाही. पण स्त्रीने स्वतःतल्या 'शक्ती'ची जाणीव करून घेणे' हे त्यापेक्षा अधिक महत्वाचे आहे.

दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजन केले जाते. स्त्रियांना समाजात सुरक्षितपणे आणि निर्भीडपणे वावरता यावे याकरिता केल्या गेलेल्या कायद्यांच्या 'ज्ञानाचे शस्त्र' स्त्रियांनी पाजळावे आणि निव्वळ अबला न राहता खऱ्या अर्थाने सबला व सक्षम व्हावे असे मला मनापासून वाटते! 
सोमवार, ३ ऑक्टोबर, २०१६

'बुचाची फुले'
बऱ्याच दिवसांनी कालचा रविवार अगदी निवांत गेला. आरामात उठले, सगळी वर्तमानपत्रे वाचली, नाष्टा आणि सकाळचा स्वयंपाक हे सगळंच उशिरा केलं. संपूर्ण दिवसभर कोणी पेशन्ट बघावे लागले नाहीत किंवा कोणी फोन करून त्रासही दिला नाही. संध्याकाळी विवेकच्या, म्हणजे माझ्या बालमित्राच्या कॅफेला भेट देऊन छान जेवलो आणि रात्री अकराच्या पुढेच घरी परतलो. घरी आल्या-आल्याच Whatsapp वरच्या कुठल्यातरी ग्रुपवरून बारामुल्लामध्ये अतिरेकी हल्ल्याची बातमी आली आणि मनात उगीचच एक ताण सुरु झाला. मग ती बातमी इतर ग्रुपसवर पाठवणं, त्यावर चर्चा करणं, वेगवेगळ्या चॅनेल्सवर त्या बातम्या बघणं असं करता करता बराच काळ गेला, त्यातून मनावरचा ताण थोडा वाढतच गेला आणि रात्री एकच्या पुढेच झोप आली. अर्थातच त्यामुळे आज, माझ्या नेहमीच्या वेळेपेक्षा बरीच उशिरा, साडेसहाला जाग आली. 


आज सोमवार, आधीच उठायला उशीर झालेला, आता फिरायला जावं की न जावं, दिवस धावपळीत जाणार आणि व्यायामाला वेळच मिळणार नाही, या विचारांनी पुन्हा मनावर ताण आला. तरी पण निग्रह करून रोजच्याप्रमाणे थोडावेळ का होईना, फिरून यायचंच असे ठरवले आणि घराबाहेर पडले. बाहेर पडल्या पडल्या एक मंद, परिचित वास आला आणि मन प्रसन्न झाले. आमच्या सोसायटीतून बाहेर जाण्याच्या मार्गावरच एक बुचाचे झाड आहे. ते झाड आता डवरलंय आणि झाडाखाली पांढऱ्या फुलांचा सडा पडायला सुरुवात झालीय हे जाणवलं. पुढे माझ्या नेहमीच्या फेरफटक्याच्या मार्गावरही, फुलांनी बहरलेली अशीच अनेक झाडे लागली आणि पुन्हा त्या फुलांचा तोच मंद सुवास आला . 

पुण्याच्या आर्मी कॅन्टोन्मेंटमध्ये, माझ्या रोजच्या फिरण्याच्या रस्त्यावर ठिकठिकाणी बुचाची झाडे आहेत. त्यांचे अस्तित्व इतर ऋतुंमध्ये मला जाणवतही नाही. सैन्यदलाच्या गणवेशाशी साधर्म्य असलेल्या या झाडाच्या, काळपट हिरव्या पानांमुळे, सैनिकांच्या शिस्तीत उभी असलेली ती झाडे, तिथे आहेत हे मला जाणवतच नसावे कदाचित. पण इतर ऋतूंमध्ये लक्षांत न येणारी तीच बुचाची झाडं, या दिवसांत माझ्या नजरेत भरतात ती केवळ गडद हिरव्यागार रंगाच्या झाडावर फुलणाऱ्या आणि उठून दिसणाऱ्या पांढऱ्या फुलांमुळे. पावसाच्या पाण्यामुळे या झाडांच्या पानावरची धूळ धुतली जाऊन आधीच त्यावर एक तरारी आलेली असते. त्यामुळे या चकचकीत हिरव्या रंगावर फुललेली ही नाजूक फुले बघितली की, हिरव्यागार रंगाच्या साडीवर कुणी पांढऱ्या धाग्याने, नाजूक असा कर्नाटकी कशिदाच काढलाय, असे मला वाटते. 

बुचाची फुले पाहिली की मनात जपलेल्या बालपणीच्या आठवणी उचंबळून येतात. लहानपणी मोठ्या टोपलीत किंवा परकर किंवा झग्ग्याच्या सोग्यामध्ये ती फुले आम्ही उचलायचो आणि मग आमची खूप मजा चालायची. ताज्या फुलांना एकमेकात गुंफून, आम्ही मुली छान वेणी करायचो, किंवा मोठा हारही करायचो. पिस्ता रंगांची देठं गुंफून केलेली, पांढऱ्या फुलांची आणि ती वेणी अतिशय नाजूक दिसायची. त्या फुलांबरोबर आमचे काही जरा विध्वंसक खेळही चालायचे. काहीवेळा आम्ही त्या नाजूक फुलांचे जरा जास्तच हाल  करत असू.  फुलाची पाकळी वेगळी करून, चिमटीत पकडून तिचे दोन पदर आधी दूर करायचो. मग तोंडाने हलकेच हवा त्यात सोडली की त्या पाकळीचा एक छोटासा,  पांढरा फुगा तयार व्हायचा.  तो फुगा आपल्या स्वतःच्या किंवा समोरच्याच्या कपाळावर फोडायचा. तो फुगा फुगला आणि चांगला मोठा आवाज करून फुटला की अगदी मस्त वाटायचं. कधीकधी कोण कमीत कमी वेळात जास्तीत जास्त फुगे फुलवतंय आणि फोडतंय याची स्पर्धा चालायची. तर कधी वरच्या पाकळ्या तोडून केवळ खालचे दांडे बाण म्हणून एकमेकांना मारायचो.


ताज्या बुचाच्या फुलांचा दांडा एका ठराविक अंतरावर खुडून, मागच्या बाजूने तो दांडा फुंकला की छान पिपाणी वाजते. उचललेल्या फुलांच्या पिपाण्या तयार करणे आणि दोन ओठांच्यामध्ये एकाचवेळी चार-पाच पिपाण्या घेऊन जोरजोरात वाजवत बसणं हा एक खेळ असायचा. दोन-तीन भावंडांनी किंवा मैत्रिणींनी एकाच वेळी मोजून सारखी फुले घ्यायची आणि मग कोण जास्त पिपाण्या तयार करतंय ते बघायचं, अशीही स्पर्धा चालायची.  कधी कधी हे असले खेळ आम्ही गटागटाने खेळायचो. बालपणीचे हे अगदी छोटे-छोटे आणि बिन खर्चाचे खेळ आम्हाला किती आनंद देऊन जायचे याची कल्पना आजच्या पिढीतल्या, महागड्या गेम्समध्ये रमणाऱ्या मुलांना येऊच शकणार नाही!

आज सकाळी, फिरायला निघताना जाणवत असलेला मनावरचा ताण, बुचाच्या फुलांचा वास श्वासात भरून घेतल्या-घेतल्या कमी झाला. या फुलांशी निगडित असलेल्या बालपणीच्या सुखद आठवणी कोंडून राहिलेल्या, मनाच्या कुपीचे बूच, आपसूक निघाले आणि मन अगदी हलके झाले. परत येताना, दोन्ही हात भरून फुले उचलून आणली. काही फुलांच्या पाकळ्यांचे फुगे करून फोडले आणि दोन चार फुलांच्या पिपाण्या करून आनंदच्या  कानाशी नेऊन वाजवल्या आणि येत्या आठवड्याचे काम करायला सज्ज झाले!