शुक्रवार, २६ मे, २०१७

आरक्षणाचे रक्षण!


"बाई माझ्या नातीचा फार्म भरून देणार का?"

परवा सकाळी आल्याआल्या मोलकरणीने प्रश्न केला.
"भरून देते. पण कसला फॉर्म आहे गं?"
"नात दहावीला बसलीय.आता आनलाईन का काय ते कालेज भरायचंय. पन जातीचा दाखला नाई. त्यो मिळवायला फार्म भरायचाय."
"आता तुझी नात शिकलीय ना ? मग तिने का नाही भरला फॉर्म ?"
"आता काय सांगू बाई? तिनंच भरला होता. ती गेली पन होती त्या हापिसात. पन त्यो मानूस म्हनला त्यो दाखला इथे नाय, नगरला मिळंल. म्या म्हनलं नातींनं फार्म चुकीचा भरला आसल म्हनून तुमाला सांगायला आले. आमाला तर त्यातलं कायबी कळत नाय. माज्या पोरीचा नवरा मेलाय. आमच्या घरात कोन बी शिकलेलं नाय. पर माजी नातं लै हुशार हाय, चांगली शिकली तर बरं हुईल. मॅडम द्या ना फार्म भरून "
"पण दाखला नगरला का मिळणार ? ती तर इथे शिकते ना ? "
"माज्या मुलीला नगरला दिली होती. तिचा  नवरा मेल्यावर मी तिला इकडे आनली. त्या हापिसातला मानुस म्हनला आता दाखला नगरलाच मिळनार"

माझ्या "डॉक्टरी सुवाच्य" अक्षरांत मी  फॉर्म भरण्यापेक्षा आनंदने भरलेला बरा म्हणून त्याला फॉर्म भरायला सांगितले. त्या फॉर्मबरोबर त्या मुलीची, तिच्या वडिलांची आणि आजोबांची अशी अनेक कागदपत्रे पण जोडायची होती. आनंदने तो फॉर्म भरला आणि मोलकरणीच्या मुलीला आणि नातीला बोलावून घेऊन त्यांची सर्व कागदपत्रे तपासून घेतली. फॉर्म कुठे जमा करायचा, काही अडचण आली तर काय करायचे त्याबाबत योग्य ते मार्गदर्शन करून नगरच्या कार्यालयात जायला सांगितले. काल मोलकरणीची मुलगी आणि नात नगरला जाऊन तिथल्या कार्यालयात तो फॉर्म  जमा करून आल्यासुद्धा.
आता नातीला जातीचा दाखला मिळणार या कल्पनेने आज सकाळी मोलकरीण भलतीच खुशीत होती. "बाई सायबांनी आमाला सगळं नीट सांगितलं म्हणून काम झालं. नाहीतर काही खरं नव्हतं. सायबांचं लैच उपकार हायत"
"अगं उपकार कसले मानतेस. तुझी नात हुशार आहे. चांगली शिकली तर आम्हाला दोघांनाही आनंदच होईल. पण मला एक सांग, या मुलीच्या आईचा, वडिलांचा, आज्ज्याचा, पणज्याचा, कोणाचाच जातीचा दाखला कसा नाही? जातीच्या दाखल्याशिवाय त्यांना आरक्षणाचे फायदे  कसे मिळाले ?"

"त्यानला काय आन आमाला तरी कुटं काय आरक्षनाचे फायदे मिळाले? मी पयल्यापासून कामाला जायचे. आमची वस्ती लै वाईट. माजी पोरगी सातवीत होती तवाच मोठी झाली म्हनून तिचं लगीन लावून दिलं. तिचा नवरा, त्याचा बाप, आज्जा कोनबी शिकलेलं नाय. मग ते आरक्षनाचा फायदा कसा आन कुटं घेणार? माजी पोरं, माजा नवरा, माजा सासरा, त्याचा बाप, कोनबी शिकलेलं नाई. आमच्या जातीतले जे शिकले, त्यांना आरक्षनामुळं सरकारी नोकऱ्या मिळाल्या, डॉक्टर, इंजनेरबी हुता आलं. त्यांच्याकड आज गाड्या हायत, फ्लॅट हायत, मोप पैसा हाय. आता त्यांची पोरं मोठ्या शाळा-कालेजात जात्यात. पुन्हा आरक्षनाचा फायदाबी त्ये घेनारच. आमी अडानी हुतो आन आमची पोरंबी तशीच राह्यली. आमाला कुटल आरक्षन आन कसलं काय? म्हनून तर म्हन्ते बाई, तुमचे आन सायबांचे लै उपकार आहेत. तुमच्यामुळं माजी नात कालेज शिकल आन कायतरी नोकरीबी मिळवल."

तिच्या बोलण्याने मी विचारात पडले. सहज बोलता-बोलता, एक विदारक सत्य आणि गंभीर सामाजिक प्रश्न ती माझ्यासमोर मांडून गेली होती. दलितांसाठी आरक्षणाचा हक्क कायद्याने दिलेला आहे आणि ते योग्यच आहे. परंतु, गेली सत्तर वर्षे आरक्षणाचा फायदा न मिळालेल्या, त्यांच्यामधीलच खऱ्या-खुऱ्या उपेक्षितांच्या उन्नतीचं काय? आधीची पिढी शिकली नाही म्हणून पुढची पिढी सुशिक्षित नाही, जवळ पैसे नाहीत, आणि झोपडपट्टीतल्या कष्टाच्या जीवनातून सुटकाही नाही.

आरक्षणाच्या समर्थनात आणि विरोधातही आज नुसताच आरडा-ओरडा ऐकू येतो. पण, प्रत्यक्ष तळागाळात असलेले हे लोक कधी वर येणार? त्यांच्या हक्काचं रक्षण व्हायला नको कां ?