आनंदाश्रमपासून नीलेश्वर बॅकवॉटर्सला पोहोचायला साधारण पाऊण तास लागला. तो रस्ता खूप वळणा-वळणाचा होता. तसे केरळमधले सगळेच रस्ते नागमोडी होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुंदर बंगल्या आणि नजर पोहोचेपर्यंत सगळीकडे फक्त हिरवाई! एका गावाची हद्द संपून दुसरे गाव कधी सुरु होते हे आपल्याला कळतच नाही. या सहलीला जाण्याचे अचानक ठरवल्यामुळे आपण नेमके कुठे-कुठे जाणार आणि काय बघणार, या बाबत गूगलवर मी काहीही वाचलेले नव्हते. त्यामुळे, नीलेश्वर बॅकवॉटर्स हा जास्तच तरल आणि सुखद अनुभव ठरला.
आम्ही सगळेजण 'बेकल रिपल्स' या कंपनीच्या बोटीवर चढलो. २०-२५ जण आरामात प्रवास करू शकतील अशी मध्यम आकाराची ती बोट होती. बोटीच्या समोरच्या भागात, म्हणजे डेकवर जाण्यासाठी, एक फूटभराची पायरी चढून वर जावे लागत होते. तिथेच कॅप्टनची खुर्ची आणि बोटीचे चक्राकार सुकाणू होते. बोटीच्या अगदी समोरच्या टोकावर तिरंगा फडकत होता. बोटीच्या पुढच्या अर्ध्या भागात प्रवाशांना बसण्याची सोय होती. त्या भागावर ऊन-पावसापासून संरक्षण मिळावे म्हणून छप्पर होते. पण त्या भागाच्या सर्व बाजू मोकळ्या असल्याने, आसपासचा परिसर बघता येत होता. बोटीच्या मधल्या भागामध्ये एक डबल बेड असलेली बेडरूम आणि अटॅच्ड टॉयलेट होते. बोटीच्या मागच्या भागात सुसज्ज स्वयंपाकघर होते.
सुरुवातीला बोटीचे कॅप्टन आलेले नव्हते आणि बोट एका जागी बांधून ठेवलेली होती. बोटीचे सुकाणू बघून माझ्या मनातले 'मूल' जागे झाले आणि कोणाला काही कळायच्या आत मी कॅप्टनच्या खुर्चीवर जाऊन बोटीचे चक्राकार सुकाणू हातात घेतले. 'काय हा हिचा पोरकटपणा' असे आनंदच्या आणि गिरीशच्या मनामध्ये निश्चित आले असणार! बोट चालवायला मिळावी ही सुप्त इच्छा माझ्या मनामध्ये होतीच. पण ते शक्य नसल्याने, मी सुकाणू हातात धरून माझे फोटो मात्र काढून घेतले. माझ्यापाठोपाठ इतर प्रत्येकाने ते चक्र हातात घेऊन आपापले फोटो काढून घेतले. हे होईपर्यंत बोटीचे कप्तान आले आणि बोट चालू केली. त्यानंतर दादाही मोठ्या उत्साहाने बोटीच्या डेकवर चढले. कप्तानाने दादांना आपली खुर्ची दिली, त्यांच्या डोक्यावर आपली टोपी घातली. त्यानंतर आम्ही दादांचे फोटो काढले. तसेच तिरंग्याबरोबरही आम्ही आमचे फोटो काढले.
तेजस्विनी नदीवर संथ गतीने तरंगत बोट चालली होती. बॅकवॉटरच्या दोन्ही बाजूला नारळाच्या घनदाट बागा होत्या. बोटीचे कप्तान आम्हाला आसपासच्या भागाची माहिती सांगत होते. आमच्या डाव्या बाजूला अचमथुरुथी हे एक लहान बेट दिसत होते. नदीच्या मध्यभागी असलेल्या या अगदी छोट्या, शांत आणि नयनरम्य अशा बेटावर केवळ चारशे घरे आहेत. पुढे गेल्यावर चेरुवथुर या गावाजवळ असलेला कोट्टापुरम–अचमथुरुथी फूट-ब्रिज हा केरळ राज्यामधला, नदीवरील सर्वात लांब फूट-ब्रिज आहे, असेही त्याने आम्हाला सांगितले. हा प्रवास करत असताना सभोवताली निळ्या-हिरव्या रंगाच्या अनेक छटा दिसत होत्या. दुपारची वेळ असल्याने हवेमध्ये गारवा नव्हता पण उकाडाही नव्हता.
बोटीवर आमचे स्वागत लिंबू सरबताने करण्यात आले. त्या पाठोपाठ 'स्टार्टर' म्हणून, गूळ आणि केळे घालून केलेले, गरमागरम आणि अतिशय चविष्ट असे तांदुळाचे आप्पे आले. दुपारची जेवणाची वेळ झालीच होती. पण जेवणाला अजून वेळ होता. त्यामुळे निलेश यांनी म्युझिक सिस्टमवर छानसे संगीत सुरु केले. त्यावर 'कराओके'ची पण सोय होती. आमच्याबरोबरचे श्री. प्रफुल्ल पेंडसे यांनी त्यांच्या सुमधुर आणि सुरेल आवाजात, "बार बार देखो, हजार बार देखो..." हे गाणे म्हटले. तिथले सगळे वातावरणच असे होते की या गाण्याच्या ठेक्यावर वर आमचे पाय आपोआप थिरकू लागले. पाठोपाठ वृंदा जोशींनीही "अजीब दास्ताँ हैं ये, कहाँ शुरू कहाँ खतम..." हे गाणे फार छान म्हणले. पेंडसे आणि वृंदा जोशींनी अजूनही एकेक गाणे म्हटले.
स्वयंपाकघरामधून येणाऱ्या खमंग वासामुळे भूक खवळली होती. थोड्याच वेळात जेवणाचा बुफे मांडला गेला. पोळी, भात, दाल फ्राय, रस्सम, सांबर, अवियळ, बीन्सची ओले खोबरे घातलेली भाजी, दह्यातली कोशिंबीर, तळलेले पापड, लोणचे असा अगदी फक्कड बेत होता. मांसाहारी लोकांसाठी करीमीन या जातीचे मासे, गरम-गरम तळून वाढले जात होते. सर्व पदार्थांची चव अगदी वेगळी आणि चटकदार होती. जेवणानंतर, वेलदोड्याची पूड घातलेली शेवयाची खीर, 'पायसम', आली. त्यामध्ये थोडा साबुदाणा आणि तुपात खमंग तळलेले काजूही घातले होते. आजूबाजूची सुखद निळाई बघत, गप्पा-गोष्टी करत अगदी निवांतपणे भरपेट जेवण झाले. त्या सगळ्या वातावरणामुळे, अनंत काळासाठी या बोटीवर राहावे, असे वाटू लागले होते. पण आम्हाला पुढील मुक्कामी, म्हणजे कण्णूरला पोहोचायचे होते. साधारण चारच्या सुमारास गरमागरम चहा पिऊन आणि त्याबरोबर आलेल्या केळ्याच्या भज्यांची चव घेऊन आम्ही कण्णूरकडे निघालो. गिरीश-प्राची आणि जहागीरदार पती-पत्नी बेकलचा किल्ला पाहायला निघून गेले.
केरळच्या दक्षिण भागातील अलेप्पी, कोची आणि कोल्लम भागामधील बॅकवॉटर्स आणि तिथल्या हाऊसबोटस खूप प्रसिद्ध आहेत. त्या मानाने, नीलेश्वर बॅकवॉटर्स अजून फारशा पर्यटकांना माहीत नाही. त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांची विशेष गर्दी नव्हती. या अतिशय शांत, रम्य ठिकाणच्या बॅकवॉटरवरच्या नौकाविहाराचा अनुभव मला फार आवडला.