बुधवार, ९ जून, २०२१

'वाढ' दिवस !

काल मला आमच्या अमेरिकास्थित मुलाशी, अनिरुद्धसोबत बोलायची इच्छा झाली. नेमके कालच त्याला काही महत्त्वाचे काम असल्याने, त्याला बोलायला वेळ नव्हता. पण, "आज वेळ नाही. उद्या तुझा वाढदिवस आहे. उद्याच बोलेन" असे व्हॉटसप चॅटवर सांगून, आज माझा वाढदिवस असल्याची आठवण त्याने मला कालच करून दिली होती. हल्ली 'वाढ'दिवस म्हटले की त्यातला वाढ हा शब्द अगदी नकोनकोसा होतो!

जन्मदिवसालाच वाढदिवस का म्हणायचे? दर दिवसागणिक होणारी शारीरिक वाढ कोणी लक्षात घेत नाही का? का ती वर्षातून एकदाच लक्षांत आणून द्यावी या उद्देशानेच वाढदिवस हा शब्द पडला असावा? कोण जाणे. 

काल रात्री, बरोबर बारा वाजता, अमेरिकेतील माझ्यापेक्षा मोठ्या भाऊ-वहिनींचा, म्हणजे जयंत-मेधाचा फोन आला. त्यावेळी मला नुकतीच गाढ झोप लागली होती. त्यामुळे, त्यांच्याबरोबरचे बोलणे फारसे वाढले नाही. मेधा अगदी सुडौल बांध्याची आहे. ती स्वतः आता एका गोड नातीची आज्जी झालेली असली तरी ती 'संतूर मॉम' म्हणून सहज खपून जाईल अशी आहे. मागे एकदा जयंत आणि मेधा माझ्याकडे महिनाभर राहिले होते. मेधाला चांगले-चुंगले खायला घालून तिच्या वजनात वाढ करावी आणि तिला आपल्या गोटात घ्यावे, यासाठी मी बरेच प्रयत्न केले होते. पण कसले काय? ती होती तशीच राहिली आणि माझ्या वजनात मात्र चांगलीच वाढ झाली! ते आठवल्यामुळे रात्री अर्धवट झोपेत, त्यांचा फोन खाली ठेवता-ठेवता, "आजच्या वाढदिवसापासूनआपली वाढ आपण रोखायचीच" असा विचार करतच मी निद्रादेवीच्या आधीन झाले. 

तसे पाहता, वाढदिवसाला surprise gift, किंवा पार्टी देणे वगैरे फॅड आमच्या घरी कधीच नव्हते. लग्नानंतरच्या सुरुवातीच्या दिवसात, आनंदने माझ्यासाठी कधी-कधी काही भेटवस्तू आणल्या होत्या. एखादी वस्तू पाहून नाक मुरडणे, "इतकी महाग का आणलीस?" असे म्हणून त्याच्या हौसेचे मोल अगदीच फोल ठरवणे, किंवा "अनावश्यक वस्तू का आणलीस?" असले व्यावहारिक प्रश्न विचारणे, या माझ्या प्रतिक्रियांमुळे, काही वर्षांमध्येच आनंदचे माझ्याप्रति असलेले 'वाढीव' प्रेम आटलेले होते. अर्थात, अशा त्या परिस्थितीत दुसरे काय होणार होते? 

पण, आपल्या बायकोला हिऱ्याच्या टॉप्सपेक्षा गरम चहाचा कप जास्त आनंद देऊन जातो, हे माझ्या चाणाक्ष नवऱ्याच्या त्या काळातच लक्षात आले होते. त्यामुळे, आज सकाळी आनंदने छान ताजा, गरमागरम चहा करूनच मला उठवले. गरम चहाच्या कपाबरोबरच मला वाढदिवसाच्या शुभेच्छाही आनंद आणि माझ्या वडिलांनी, म्हणजे दादांनी दिल्या. 

आजपासून मी माझ्या 'वाढीला' आळा घालायचा निश्चय केला आहे, असे मी सांगणार इतक्यात आनंद म्हणाला, 'आज नाश्त्यासाठी तुला आवडणारा गरमागरम उडीदवडा आणि चटणी-सांबर मी घेऊन येणार आहे' हे ऐकताच, माझ्या निश्चयाला पहिला सुरुंग लागला. 'मुरुगन' कडून आणलेले कुरकुरीत वडे अगदी आग्रह करकरून मला आनंदने वाढले. मग अर्थातच, माझ्याही जिभेची भूक वाढत गेली. त्यानंतर मात्र, गच्चीवरील माझ्या कचरा प्रकल्पात आणि बागेत काम करून वाढीव कॅलरीजचा निचरा करायचे मी ठरवले. मी गच्चीवर काम सुरु केले आणि लगेच फोनवर फोन येणे सुरु झाले. माझा धाकटा भाऊ आणि वहिनी, म्हणजे गिरीश आणि प्राची, आणि माझा मुलगा अनिरुद्ध, यांच्याशी अगदी थोडक्यात पण प्रेमाने बोलणे झाले. 

हल्ली सोशल मीडियामुळे 'वाढदिवसाचे' स्तोम वाढत चालले आहे. शाळा-कॉलेजच्या काळातल्या जुन्या मित्रकंपूंचे आणि इतरही वेगवेगळे ग्रुप्स तयार झाल्यामुळे मित्र-मैत्रिणींच्या संख्येत आणि प्रेमात कमालीची वाढ झालेली आहे. अनेक जवळचे आणि लांबचे आप्तही जणू नव्याने जोडले गेले आहेत. या सर्वांमध्ये माझ्या विद्यार्थी-विद्यार्थिनी, लहानग्या पेशन्ट्सचे पालक यांच्याकडून मिळणाऱ्या शुभेच्छांचीही भर पडली आहे. 

आज सकाळचे क्लिनिक, दुपारचे जेवण आणि त्यानंतर ऑनलाईन लेक्चर्स, या गडबडीत संध्याकाळचे पाच वाजले. फोनवर शुभेच्छा देणाऱ्यांच्या संख्येत यंदा लक्षणीय वाढ झालेली आहे. वेळ मिळेल तसे सर्वांशी फोनवर बोलणे होत होतेच. संध्याकाळपर्यंत व्हॉट्सअप आणि फेसबुकवरच्या मेसेजेसची संख्या कमालीची वाढली. त्यांना सर्वांनाएकीकडे  उत्तरे देणे चालू होतेच. दुपारी  कुरियरने एक सुरेख केक आला. तो कोणी पाठवला असेल, हे गूढ मात्र उकलेना.
  


संध्याकाळी माझ्या प्रभा आत्याकडे जाऊन तिचे आणि माझ्या वयोवृद्ध आतोबांचे, दादासाहेबांचे  आशीर्वाद घेतले. तिथेच केक कापला आणि वाढीव कॅलरीजचा विचार न करता यथेच्छ चापला. अनेक मित्रमैत्रिणींचे आणि आप्तांचे फोन आले. तो केक माझा धाकटा भाऊ, गिरीशने पाठवल्याचा उलगडा माझ्या भाच्याच्या, म्हणजे देवाशिषच्या फोनमुळे झाला. प्रियंवदा काकू, राणी ताई, ज्योत्स्ना ताई आणि वीणामावशी यांनी शुभाशीर्वाद दिले. मिलिंद शिवशरण, या  माझ्या बालमित्राने फोनवर शुभेच्छा देऊन, मला माझी काही माहिती विचारली. त्यानंतर त्याने माझ्या वाढदिवसानिमित्त माझ्या 'हुशारी'वर एक लेख लिहून आमच्या शाळेच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर पाठवला. विठ्ठल, नृसिंह, विवेक, नंदा, तेजस्विनी, विनय,लक्ष्मी, सतीश, प्रकाश, मनीषा, नितीन, व्यंकटेश, गीता, ऍन, सीमा व इतर अनेक मित्र मैत्रिणींनी माझ्यात असलेल्या, (आणि नसलेल्याही) 'सुप्त' गुणांची केलेली स्तुती वाचून व ऐकून माझ्या शरीरावरील मांस एक नव्हे तर दोन मुठींनी वाढले. रात्रीच्या जेवणाला आनंदने मटण बिर्याणी करून आणि आईस्क्रीम आणून माझी 'वाढ' कायम राहील याची व्यवस्था केली. 

वाढदिवसाच्या निमित्ताने, माझ्या वाढत्या वयाची आणि शरीराची आठवण मला दिवसभर होत होती. पण दुपारचा काही वेळ मात्र मी अगदीच लहान मूल होऊन गेले. त्याचे कारण, आमची छोटी नात, नूर! आमच्या ऑस्ट्रेलियास्थित मुलीचा, असिलताचा आणि जावई आनंद यांचा फोन आला. नूरशीही मनसोक्त बोलणे झाले. नूर आता व्हिडीओ कॉलवरही मला चांगली ओळखायला लागली आहे. तिच्याशी बोलताना आणि वेगवेगळ्या माकडचेष्टा करून तिची करमणूक करताना, माझ्या वाढदिवशी माझ्यात झालेल्या 'वाढी'चा मला पूर्ण विसर पडला.

हा लेख लिहून संपता-संपता, म्हणजे थोड्याच वेळात, माझा हा वाढदिवस संपेल. आजचा दिवस उगवताना केलेला, स्वतःची 'वाढ रोखण्याचा' माझा निश्चय मी आता माझ्या वाढत्या वाढदिवसावर, म्हणजेच उद्यावर ढकलला आहे! 

मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे मनपूर्वक आभार!