सोमवार, २९ जून, २०१५

शब्दबोध

आमची आजी अगदी नेमस्त होती. रोज पहाटे-पहाटे  उठायची. अंघोळ वगैरे आटपून, एखादा तासभर एका ठराविक क्रमाने काही स्तोत्रे आणि श्लोक म्हणत देवपूजा करायची. आम्ही भावंडे साखरझोपेत असताना, तिचे ते हलक्या आवाजातले पण एका ठराविक चालीतले ते म्हणणे आमच्या कानावर पडत असायचे. त्यातल्या काही ओळी आजही माझ्या डोक्यात मधून मधून घोळत असतात.

कधी कधी तर स्वप्नांत मला असाही भास होतो की आपण सोलापूरच्या माहेरच्या घरातच आहोत आणि आजी आसपास काही स्तोस्त्र अथवा काही श्लोक म्हणते आहे आणि मधूनच आम्हाला झोपेतून जागे करण्यासाठी हलक्याशा, प्रेमळ आवाजात हाक मारतेय! तुम्हाला ऐकायला गंमत वाटेल, कदाचित विश्वासही  बसणार नाही, पण माझ्या या स्वप्नाला एक लय असते. तसेच, उदबत्तीच्या सुवासाचा, कापूर जाळल्याचा, देवपूजेसाठीच्या फुलांचा, सहाणेवर उगाऴलेल्या चंदनाचा, बंबाच्या धुराचा आणि अर्थातच वाफाळलेल्या चहाचा, असा काहिसा संमिश्र वास असतो!

वर्तमानपत्रात आलेली एक बातमी काही दिवसांपूर्वी माझ्या वाचनात  आली. फेसबुकचा CEO मार्क झुकरबर्ग याच्या 'बीस्ट' नावाच्या कुत्र्याचे' फेसबुकवर लाखो चाहते आहेत आणि त्याच्या फेसबुक पेजला असंख्य हिट्स मिळतात म्हणे. हे वाचताच मला प्रकर्षाने आठवण झाली ती , लहानपणी सकाळी-सकाळी आजीच्या आवाजात ऐकलेल्या काही ओळींची…
"समर्थाचिया घरचे श्वान।
त्यास सर्वही देती मान ।।
ऐसा तुझा म्हणवितो दीन।
हा अपराध कवणाचा?"

आजीच्या पाठांतरामुळे आणि ते सकाळी म्हणण्याच्या तिच्या परिपाठामुळे, रामदास स्वामींचे शब्दसामर्थ्य माझ्या कानावर अलगदपणे पडत गेले आणि मनात साठत गेले, हे माझे भाग्यच म्हणायचे. आजमितीलाही कित्येक व्यक्तींना दासबोधातील या ओळींमधला मथितार्थ लागू पडतो. मग मार्क झुकरबर्गच्या श्वानाला न पडेल तरच नवल!

सूज्ञांस अधिक सांगणे नलगे!!