या वर्षीच्या होळीच्या सुमारास 'काश्मीर फाईल्स' हा सिनेमा प्रदर्शित झाल्यामुळे, समाजमाध्यमांमध्ये अनेक रंगांची उधळण चालू आहे.
१९८० च्या दशकात काश्मीर खोऱ्यात वास्तव्यास असलेल्या हिंदूंच्या अमानुष नरसंहाराचे विदारक चित्रण 'काश्मीर फाईल्स' सिनेमामध्ये केले आहे. दाखवलेल्या सगळ्या घटना सत्य आहेत. पण त्या एकाच कुटुंबातील व्यक्तींवर आणि एका ठराविक काळात घडल्या आहेत असे नाही. पूर्ण सिनेमा व त्यातील प्रसंग 'रक्तरंजित' आहेत. त्या घटनांचा आणि त्या दृश्यांच्या लाल रंगाने आपल्या मनांत काळे ढग निर्माण झाल्याशिवाय राहत नाहीत.
आपण हा सिनेमा बघायचा नाही, असा निश्चय काहीं लोकांनी केलेला आहे. काहींनी त्यापुढे जाऊन, तो इतरांनीही सिनेमागृहात जाऊन पाहू नये यासाठी प्रयत्न केलेले आहेत. पण अनेक जण स्वतः सिनेमा बघत तर आहेतच पण इतरांनाही सिनेमा पाहण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत. सिनेमा पाहून आलेल्या लोकांच्या मनांमध्ये मात्र, जातीधर्मातील तेढीच्या अनेक छटा दिसत आहेत.
कश्मीर खोऱ्यात अनेक वर्षांपासून काश्मीरी हिंदूंचा छळ, त्यांचे धर्मांतर आणि स्त्रियांची अब्रू लुटणे हा प्रकार चालत होता. पण या कारवायांना १९८० च्या दशकात ऊत आला. त्या काळात अल्पसंख्याक, निःशस्त्र काश्मिरी हिंदूंना कमलीची दहशत बसवून त्यांचे हत्याकांड केले गेले. हे सत्य या सिनेमात दाखवले गेले आहे.
पण, "असा काही नरसंहार घडला हेच मुळी खोटे आहे", असे सांगणारे काहीजण आहेत. अशा लोकांमध्ये मुख्यत्वे, धर्मनिरपेक्षतेचा मुखवटा धारण करणाऱ्या, डाव्या विचारसरणीच्या लोकांचा भरणा आहे. देशाचे तुकडे करण्याची घोषणाबाजी करणाऱ्या 'आझादी गँग'चा मुखवटा या सिनेमाने फाडून काढला आहे. त्यामुळे, मुखवट्यामागचे त्यांचे रंग उडालेले चेहरे समोर आलेले आहेत. इतर सगळ्या धर्मांतील लोकांच्या छळाचे भांडवल करून गळे काढणाऱ्या या 'धर्मनिरपेक्ष' लोकांना, हिंदूंचा झालेला छळ अमान्य करणे सोयीचे वाटते आहे.
बहुसंख्याकांकडून अल्पसंख्याकांचे शोषण किंवा हत्या होणे हे निंदनीयच आहे. अर्थात, काश्मीरमध्ये अल्पसंख्याक पंडितांवर झालेले अत्याचार निंदनीय असलेच पाहिजेत. पण एकंदरीत काश्मीरबाबतच्या तोकड्या ज्ञानामुळे, एक मोठाच गैरसमज भारतीय समाजात पसरलेला आहे.
काश्मिरी पंडित म्हणजे केवळ ब्राह्मणसमुदाय आहे असे अनेकजण समजतात. प्रत्यक्षात, काश्मिरी हिंदूंमध्ये अधिकांश लोक जरी ब्राह्मण असले तरी, 'कारकून', 'वाणी' अशा इतर जातींचे लोकही आहेत. त्यांच्यावरही अत्याचार झालेच आहेत आणि त्यांनाही जिवाच्या भीतीने काश्मीर सोडून पळावेच लागले आहे. प्रत्यक्षात, 'पंडित' हा शब्द काश्मीरमध्ये 'हिंदू' या शब्दाचा समानार्थी शब्दच म्हणावा लागेल. दहशतवादामुळे हिंदूंना जसे काश्मीर खोरे सोडावे लागले तसेच अनेक शीख कुटुंबियांनाही सोडावे लागले हेही आपल्याला लक्षात घेतले पाहिजे.
पण हे सत्य समजून न घेता, सिनेमात दाखवलेल्या सत्य घटनांना काही लोक जातीय रंग देत आहेत. "या चित्रपटात ब्राह्मणांवरील अत्याचारांचे विनाकारण उदात्तीकरण केले आहे", अशी मुक्ताफळे उधळणारेही काही आहेत. त्याही पुढे जाऊन, "ब्राह्मणांची जातच भेकड. आम्ही असतो तर शर्थीने लढलो असतो आणि शेजारचा देशही काबीज केला असता" अशा फुशारक्या मारणारेही अनेक आहेत. हे दोन्ही प्रकारचे लोक, त्यांच्या मनातल्या काळ्या रंगाच्या छटांचे दर्शन घडवत आहेत.
काश्मिर खोऱ्यामध्ये काही शतकांपूर्वी, दहशतीच्या जोरावर मुस्लिमांनी हिंदूंचे धर्मांतर केले. धर्मांतर न करणाऱ्या हिंदूच्या हत्या केल्या. अशा प्रकारे हिंदूंना जीवाची भीती घालून भगव्या रंगाचे उच्चाटण करण्यात आले. तसाच प्रकार १९८८ सालापासून पुढे घडू लागला. त्या काळातले सत्य 'काश्मीर फाईल्स' हा सिनेमा आपल्यापुढे अत्यंत प्रभावीपणे मांडतो. त्यामुळे न्याय्यनिष्ठ आणि संवेदनशील वृत्तीच्या प्रत्येक व्यक्तीला मनापासून वाईट वाटते.
परंतु, ते सत्य पाहिल्यावर भडकून जाऊन, "संपूर्ण देशातून हिरव्या रंगाचे पूर्णपणे उच्चाटण केले पाहिजे", अशी दुसऱ्या टोकाची भूमिका घेणारे महाभागदेखील आहेत. ही भूमिका देशहिताच्या दृष्टीने वाईट आहेच पण ती तर्कसंगतही नाही. कारण, आपल्या धर्मनिरपेक्ष देशात रक्तपाताचा लाल रंग वगळता, इतर कुठल्याही एका रंगाचे उच्चाटण करणे, हे आपले ध्येय असूच शकत नाही.
आपल्या राष्ट्रध्वजातील सर्व रंगांना एकत्र ठेवणे, आणि आपल्या देशाच्या खऱ्या शत्रूंना ओळखून त्यांना नेस्तनाबूत करणे, हेच ध्येय आपण सर्वांनी मनात ठेवले पाहिजे.
होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!