सोमवार, २१ फेब्रुवारी, २०२२

'आया' आणि 'गया'

काल दि. २० फेब्रुवारी २०२२ च्या टाइम्स ऑफ इंडियामध्ये छापून आलेल्या एका बातमीने माझे लक्ष वेधून घेतले. पूर्व लंडनमधील, हॅकने या भागात, २६ किंग एडवर्ड रस्त्यावर असलेल्या 'The Ayah's Home' या इमारतीला 'Blue Plaque' मिळाल्याचे ते वृत्त होते. 

काही महत्त्वाच्या व्यक्तींचे भूतकाळात वास्तव्य असलेल्या इमारतींवरअशी 'Blue Plaque' किंवा निळ्या रंगाचा स्मृतिफलक लावण्याची पद्धत भारतातही आहे. पण, या 'The Ayah's Home' नावाच्या इमारतीला 'Blue Plaque' का मिळाली असावी? अशा कोण विशेष व्यक्ती त्या इमारतीमध्ये भूतकाळात वास्तव्यास होत्या? त्याबद्दल आणखी माहिती वाचल्यावर मला आश्चर्याचा धक्काच बसला. 

'गोरे साहेब' आणि त्यांच्या मड्डमांनी भारतात कमालीचे ऐषोआरामाचे आयुष्य व्यतीत केले. इंग्लंडमधल्या नोकरांच्या पगाराच्या एक अष्टमांश पगारात भारतीय नोकर मिळत असल्याने, एकेका गोऱ्या कुटुंबाच्या दिमतीला, भारतीय नोकर आणि मोलकरणींचा मोठा ताफाच असायचा. हे ब्रिटिश साहेब-मेमसाहेब, उन्हाळ्याच्या सुट्टीत, किंवा सेवानिवृत्त झाल्यावर, इंग्लंडला परतताना भारतीय मोलकरणी म्हणजेच 'आया' आपल्याबरोबर इंग्लंडला नेत असत. तिथे गेल्यावर, काही कारणाने त्यांची सेवा नको असल्यास, ते दुसऱ्या एखाद्या गोऱ्या अधिकाऱ्याकडे त्यांना काम मिळवून देत, किंवा भारतात परत पाठवत असत. पण मोलकरणींना नीट न वागवणाऱ्या काही महाभागांनी त्या 'आयां'ना अगदी पगारही न देता, रस्त्यावर सोडून दिले होते. अशा अशिक्षित, निर्धन 'आयां'ना, अक्षरशः भीक मागून परतीच्या प्रवासासाठी पैसे जमा करावे लागत. कुठल्यातरी गलिच्छ वस्तीमध्ये, एकाच खोलीत अनेक 'आया' दाटीवाटीने राहून,  कसेबसे दिवस कंठत असत. 

इग्लंडमधील काही महिला सामाजिक कार्यकर्त्यांना, या 'आयां'च्या सामाजिक स्वाथ्याची समस्या लक्षात आली. अशा 'आयां'च्या आसऱ्यासाठी जागा मिळवण्याकरता काही संस्थांनी पुढाकार घेतला. प्रथम १८९१ साली, एलगेड  ईस्ट लंडन मधील, ६ ज्युरी स्ट्रीट वरच्या एका घराचा ताबा लंडन सिटी मिशनने घेतला व तिथे 'The Ayah's Home' चालू केले. सन १९०० साली, पूर्व लंडनमधील, हॅकने नावाच्या भागात, २६ किंग्ज एडवर्ड रोड वर, तीस खोल्यांच्या एका प्रशस्त वास्तूत 'The Ayah's Home' हलवले गेले. निष्कांचन अवस्थेत मालकांनी सोडून दिलेल्या, परतीच्या प्रवासाची वाट बघत थांबलेल्या, किंवा किंवा प्रकृती अस्वास्थ्यामुळे प्रवासच  करू शकत नसलेल्या, अशा अनेक भारतीय, चिनी, मलेशियन 'आयां'ना 'The Ayah's Home' ने आसरा दिला.
ज्या परकीय 'आयां'नी ब्रिटिशांची मुले-बाळे आत्मीयतेने सांभाळली त्यांच्या सेवेची सन्मानपूर्वक आठवण राहावी यासाठी, 'The Ayah's Home' ला 'Blue Plaque' प्रदान करण्यात आला. मला याचे खूप अप्रूप वाटले, आणि माझ्या वडिलांकडून अनेक वेळा ऐकलेल्या एका गोष्टीची प्रकर्षाने आठवण झाली.   

माझी पणजी, म्हणजे माझ्या वडिलांच्या वडिलांची आई,  कै. सौ. लक्ष्मीबाई नारायण गोडबोले, यांना वयाच्या चाळीशीतच, १९२७ साली,  अर्धांगवायूचा झटका आला. त्यानंतरची सतरा वर्षे, म्हणजे, १९४४ साली मृत्यू पावेपर्यंत  ती अंथरुणाला खिळलेली होती. तिच्या सेवेला गया नावाची एक मोलकरीण ठेवलेली होती. माझ्या पणजीचे मलमूत्राने खराब झालेले कपडे बदलणे, तिला अंघोळ घालणे, जेवण भरवणे अशी सगळी सेवा, गयाबाईने अत्यंत मायेने केली.

पणजीच्या निधनानंतरही, सुमारे १९५२ सालापर्यंत, गयाबाई माझ्या माहेरीच पगारी मोलकरीण म्हणून काम करीत राहिली. त्यानंतर मात्र तिला अंधत्व आल्यामुळे, आमचे काम सोडून ती आपल्या गावी, म्हणजे टेंभुर्णीला वास्तव्यास गेली. १९५८ सालापर्यंत, आमच्या कुटुंबियांना  भेटायला ती अधून-मधून येत असल्याचे वडील सांगतात.  

माझे पणजोबा, कै. नारायण रामचंद्र गोडबोले यांनी,  १९५३ साली आपले मृत्युपत्र केले. त्यांच्या पत्नीच्या अखेरच्या काळात गयाबाईने केलेल्या सेवेबाबत त्यांनी त्या मृत्युपत्रात कृतज्ञता व्यक्त केली होती.  तसेच, तिने केलेल्या सेवेच्या सन्मानार्थ, गयाबाईला दोनशे रुपये बक्षीस द्यावेत, अशी इच्छा त्यांनी लिहून ठेवली होती. 

पणजोबांच्या मृत्यूनंतर, माझ्या वडिलांच्या काकांनी, टेंभुर्णीला जाऊन, ती रक्कम गयाबाईंना देऊ केली. पुढील काळात, गयाबाईंच्या टेंभूर्णीच्या राहत्या जागेवर अतिक्रमण झाल्याचे समजताच, ते हटवण्यासाठी माझ्या वडिलांनी न्यायालयात दावा लढवून, गयाबाईला तिच्या जागेचा ताबा मिळवून दिला. 

आजदेखील सोलापूर-पुणे प्रवासात, टेंभुर्णी गाव जवळ आले की, गयाबाईची आठवण काढून तिचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख माझे वडील हमखास करतात. गयाबाईंने केलेल्या सेवेची आठवण माझ्या कुटुंबियांनी जागृत ठेवली याचा मला रास्त अभिमान वाटतो. 

बुधवार, ९ फेब्रुवारी, २०२२

प्रसन्न रूप चित्ती राहो...

लतादीदी आज या जगात राहिल्या नाहीत हे क्लेशदायक सत्य आपल्याला स्वीकारावे लागणार आहे. पण त्यांच्या स्वर्गीय आवाजाच्या रूपाने त्या अजरामर राहणार आहेत, हेही आपल्याला माहिती आहे.


लतादीदींच्या मृत्यूनंतर वर्तमानपत्रातून, आणि सोशल मीडियावर त्यांच्या  संगीत कारकिर्दीची समग्र माहिती देणारे, आठवणी जागवणारे, अनेक लेख, सुरेल गाण्यांच्या ध्वनिफिती आणि चित्रफिती आल्या. मी बरेचसे लेख समरसून वाचले, ध्वनिफिती आणि चित्रफिती कानात आणि डोळ्यांत प्राण आणून ऐकल्या. एकीकडे माझे मन हेलावत होते तर दुसरीकडे त्या स्वरसम्राज्ञीचे सूर ऐकून माझा ऊर अभिमानाने भरून येत होता.  

त्यानंतर गेल्या दोन दिवसांत, टेलिव्हिजनवर मी लतादीदींच्या अनेक मुलाखती आणि त्यांच्यावरचे काही  कार्यक्रम पाहिले. त्यांच्या मुलाखतीत त्यांनी स्वतः सांगितलेल्या अनेक गोष्टी माझ्या मनाला स्पर्श करून गेल्या. लतादीदींच्या वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचे वडील वारले. तरीही त्या अनाथ झाल्या असे त्यांना वाटले नाही, असे त्या सांगतात. स्वकर्तृत्वावर त्यांचा किती विश्वास होता हे त्यातून कळते. वयाची नव्वदी ओलांडल्यावरही त्यांची बुद्धी आणि स्मरणशक्ती तल्लख होती, आवाज सुरेल होता, आणि त्या नर्म हास्यविनोद करत बोलत असत, हे प्रकर्षाने जाणवते.  

काहीं लोकांनी मात्र अतिउत्साहाच्या भरांत लतादीदींच्या शेवटच्या दिवसातले, गलितगात्र अवस्थेतले, दोन-तीन व्हिडीओ व्हॉटसऍप आणि फेसबूकवर टाकले. ते व्हिडीओ मला बघवले तर नाहीतच, पण ज्या लोकांनी ते व्हिडीओ आवर्जून शेअर केले त्या लोकांबद्दल किंवा त्या मनोवृत्तीबद्दलचा  माझा संताप उसळून आला. 

एखादी महत्वाची व्यक्ती अजून जिवंत पण अत्यवस्थ असताना, "एक्सक्लुझिव्ह ब्रेकिंग न्यूज" देण्याच्या धडपडीत, आणि जणू काही एखादी आनंदाची बातमी सांगतोय अशा आवेशात, त्या व्यक्तीला मृत घोषित करणाऱ्या चॅनेल्सवाल्यांमध्येही तीच मनोवृत्ती मला दिसते. 

लतादीदी वयोवृद्ध होत्या आणि मृत्यूपूर्वी काही काळ त्या आजारी होत्या. साहजिकच, त्या अगदीच कृश आणि अशक्त झाल्या असणार. त्यांचे ते विकलांग रूप बघून कोणाला काय मिळणार? पण तरीही काहीजणांना ते बघावेसे आणि इतरांनाही आवर्जून दाखवावेसे का वाटले असेल? या प्रश्नांची उत्तरे मला सहजी मिळाली नाहीत, पण माझ्या दिवंगत आईबद्दलची एक क्लेशदायक आठवण माझ्या मनांत  जागृत झाली.  

माझी आई अतिशय कामसू होती. वयाची सत्तरी ओलांडल्यानंतरही, नव्वदी पार केलेल्या आपल्या सासूची, म्हणजे माझ्या आजीची सेवा-शुश्रुषा केली. आमच्या घरी खूप येणे जाणे असले तरी ते भले-मोठे घर स्वतः ऐंशी वर्षांची होईपर्यंत, हौसेने सांभाळले. तोपर्यंत तिने अनेक जणांना हरतऱ्हेची मदतही केली. त्यानंतर मात्र हळूहळू तिची तब्येत ढासळू लागली. वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी ती एकदा मृत्यूच्या दारी जाऊन परत आली. पण काही महिन्यातच, पुन्हा अत्यवस्थ होऊन शेवटी तिचा मृत्यू झाला. आईच्या त्या शेवटच्या काळात मला अशाच काही लोकांच्या अविचारी मनोवृत्तीचे दर्शन झाले. 

आईला जंतुसंसर्ग होऊ नये म्हणून, आम्हा कुटुंबीयांपैकी कुणा एकानेच तिच्यासोबत थांबावे असे डॉक्टरांनी निक्षून सांगितले होते. कदाचित ती काही दिवसांचीच सोबती होती, हे आम्हाला दिसत होते. म्हणूनच, कमीतकमी लोकांनी तिच्याजवळ जावे यासाठी आम्ही दक्ष  होतो. पण काही आप्तस्वकीय 'बघ्या' लोकांनी हॉस्पिटलमध्ये येऊन, "आम्हाला एकदातरी आत जाऊन त्यांना बघून येऊ दे ना", असा आग्रहच  धरला. रुग्णाच्या शुश्रुषेमध्ये आवश्यक असणारी मदत करायला मात्र असले 'बघे' लोक फारसे उत्सुक नसतात, हेही त्यावेळी जाणवले. नाकातोंडात नळ्या घातलेल्या अवस्थेत, मृत्युशय्येवर पडलेल्या, बेशुद्धावस्थेतील रुग्णाला बघण्यात त्यांना का रस असतो? हे मला अजूनही कळलेले नाही. आपण आजारी व्यक्तींच्या नातलगांच्या भावना दुखावत आहोत, याचीही जाणीव अशा लोकांना नसते. 

बालरोतज्ज्ञ म्हणून काम करतानाही मला असाच अनुभव येतो. नवजात अतिदक्षता विभागांत अत्यवस्थ झालेल्या बाळांना वाचवण्यासाठी आम्ही धडपडत असतो. कुठल्याही बाळाला जंतुसंसर्ग होऊ नये यासाठी आम्ही बरीच काळजी घेत असतो. अशावेळी बाळाचे काका, आत्या, मामा, मावश्या, किंवा इतर अनेक नातेवाईक अतिदक्षता  विभागाच्या बाहेर येत राहतात. "आम्हाला फक्त  एकदा बाळाला बघून येऊ दे, आम्ही एकेक करून बघून येतो " असा धोशा सतत आमच्या मागे लावतात. आम्ही कितीही शांतपणे समजावून सांगायचा प्रयत्न केला तरीही हे लोक हुज्जत घालतच बसतात. या लोकांमध्येही मला तोच अविचारीपणा दिसतो. 

रस्त्यावर अपघात होताच, रक्तबंबाळ झालेल्या अपघातग्रस्त व्यक्तींना मदत करण्याऐवजी त्यांचे फोटो किंवा व्हिडीओ काढत बसणारे महाभागही असतातच की! अनेक "बघे" आसपास असूनही,  वेळच्यावेळी  वैद्यकीय मदत न मिळाल्यामुळे अपघातग्रस्तांना प्राण गमवावा लागतो, असेही बऱ्याच वेळा घडते. अशा बातम्या वाचल्या किंवा ऐकल्या की, या अविचारी लोकांबद्दल माझ्या डोक्यात  तिडीक जाते. 

"ब्रेकिंग न्यूज" च्या स्पर्धेपोटी, एखाद्या व्यक्तीला अकालीच मृत घोषित करणाऱ्यांमधे, किंवा अत्यवस्थ व्यक्तीला "बघायला" आयसीयूमध्ये जाण्याची धडपड करणाऱ्यांमधे, किंवा लतादीदींसारख्या महान व्यक्तीचा विकलांग अवस्थेतील व्हिडीओ टाकणाऱ्यांमधे, जवळजवळ विकृतीकडे झुकणाऱ्या अविचाराचा एक समान दुवा मला दिसतो आणि माझे मन उद्विग्न होते. 

लहानपणीच कौटुंबिक जबाबदारी खंबीरपणे  पेलणाऱ्या, अत्यंत कसोशीने प्रयत्न करून आपल्या सुरांमध्ये आणि शब्दोच्चारांमध्ये अचूकपणा आणणाऱ्या, आपल्या असामान्य प्रतिभेच्या व मेहनतीच्या जोरावर सिनेसृष्टीत अढळपद मिळवणाऱ्या, महान समाजकार्य करणाऱ्या, असीम देशभक्ती उराशी जपणाऱ्या, त्या पहाडासारख्या कणखर आणि उत्तुंग व्यक्तिमत्वाचे प्रसन्न रूपच फक्त मनांत  साठवावे आणि डोळ्यांसमोर आणावे असे मला प्रकर्षाने वाटते. 

लतादीदींना भावपूर्ण श्रद्धांजली !