आज सकाळी दै. 'सकाळ' मध्ये एक मोठी जाहिरात वाचली. दोन ते सहा वयोगटातील मुलांच्यासाठी आयोजित केलेल्या "Kids Marathon" बद्दलची. एक बालरोगतज्ञ व समुपदेशक, सुजाण नागरिक आणि एकंदरीतच बालकांची हितचिंतक असल्याने माझी तळपायाची आग तडक मस्तकालाच गेली.
'Little Millenium' या नावाच्या शाळा चालविणाऱ्या 'Educomp' या संस्थेने आयोजित केलेली ही Marathon, 'लहान मुलांच्या लैंगिक शोषणाविरुद्ध' आहे, असे जाहिरातीत म्हटले होते. या Marathonला 'सकाळ टाईम्स' चा पाठिंबा असून 'अमानोरा पार्क टाऊन' ने त्यासाठी जागा उपलब्ध करून दिलेली आहे असेही या जाहिरातीत नमूद केलेले होते.
लहान मुलांच्या सर्व समस्यांमध्ये 'बाललैंगिक शोषण' ही समस्या महत्वाची होती, आहे आणि पुढेही राहणार, यात शंका नाही. 'माहितीयुगा'च्या महतीने, अनेक वर्तमानपत्रांमधून आणि वाहिन्यांवर वरचेवर बाललैंगिक शोषणाच्या बातम्या झळकल्यामुळे, हा एक 'ज्वलंत' प्रश्न आहे हे जनतेला अधिकाधिक जाणवू लागले आहे. लैंगिक शोषणाविरुद्ध जनजागृती आवश्यकच आहे. परंतु, बाललैंगिक शोषणाच्या समस्येविरुद्ध योजनाबद्ध लढा द्यायचा असेल तर लहान मुलांचे, त्यांच्या पालकांचे आणि शिक्षकांचे योग्य प्रबोधन सातत्याने होत राहणे आवश्यक आहे. तशी प्रबोधनपर व्याख्याने शाळा-शाळातून मी देत असते तसेच इतर बरेच डॉक्टर्स व समुपदेशकही देत असतात.
मला असा प्रश्न पडला की, "लहान मुलांच्या लैंगिक शोषणाविरुद्ध Marathon" असे, सर्वसामान्यांच्या मनाला भिडेलसे कारण पुढे करून, दोन ते सहा वयोगटातील मुलांना पळायला लावण्यात ही संस्था काय साध्य करू पाहत असेल? यातून ना कुणाचे प्रबोधन होणार आहे ना शोषण करणाऱ्या व्यक्तींना आळा बसणार आहे. योग्य कारणासाठी घडवून आणली जाणारी ही एक अयोग्य कृती आहे आणि यात मोठा दिखाऊपणा आहे असे मला वाटले .
या संस्थेच्या संकेतस्थळावरची माहिती वाचताच एक गोष्ट प्रकर्षाने माझ्या लक्षात आली. दोन ते सहा याच वयोगटातील मुलांसाठी उत्तर भारतातील अनेक शहरांमध्ये ही संस्था Little Millenium नावाच्या शाळा चालवते. अशी Little Millenium शाळा अजूनपर्यंत पुण्यात चालू झालेली नाही. मुलांच्या समस्यांमध्ये अग्रेसर असलेल्या एका ज्वलंत प्रश्नाचे कारण पुढे करून, मोठ्या खुबीने, जाहिरातबाजी करण्यासाठी लहान मुलांचाच वापर ही संस्था करू पाहत आहे.
स्वतःच्या आर्थिक प्रगतीसाठी चाललेली या संस्थेची 'Marathon' दौड कोण आणि कशी थांबवणार?