रविवार, २६ जुलै, २०१५

देवाचिया दारी!

काही दिवसांपूर्वी माझ्या वयस्कर आईला आळंदीला दर्शनासाठी घेऊन गेलो होतो. वयोमानाप्रमाणे तिला चालताना थोडे कष्ट होत असल्याने गाडीने देवळाच्या शक्य तितके जवळ उतरून आम्ही चालत आत गेलो  साधारण साडेबाराच्या सुमारास देवळांत पोहोचलो असू. त्यावेळी विशेष गर्दी नव्हती पण नैवेद्याची वेळ असल्यामुळे, दर्शन एक वाजेपर्यंत बंद होते. मी चौकशी केली तेंव्हा कळले की, देवळाच्या मागच्या बाजूच्या दारावरच्या सुरक्षारक्षकांना विनंती केल्यास, वृद्ध किंवा अपंग भाविकांना लगेच आत सोडतात. मी आईला घेऊन देवळाच्या मागच्या बाजूला गेले व मुक्ताईच्या देवळाजवळ एका खुर्चीवर तिला बसवले. बरोबर एक वाजता तिथल्या सुरक्षारक्षकाने आम्हाला दोघींनाच आत पाठवले. आईचे दर्शन घेऊन होईपर्यंत, पुजाऱ्यांनी बारी थांबवलेली होती. त्यामुळे दर्शन उत्तमरीत्या पार पडले.

आम्ही बाहेर पडल्याबरोबर, आमच्या मागोमाग भाविकांची झुंड पुढील दाराने आत आली. त्यामध्ये आईपेक्षाही वयस्कर, वाकलेले, म्हातारे-कोतारे, अपंग- अधू असे कितीतरी भाविक बघून मला वाईट वाटले. कित्येकजण एक-एकटेच, काठी टेकत, कसेबसे तिथपर्यंत चालत आलेले होते. काहीजण परगावाहूनही आलेले असावेत. बरेचसे अशिक्षितही असावेत. मला वाटले, या सर्वच वयस्कर आणि अधू व्यक्तींना सुलभपणे देवदर्शन घेता यावे, यासाठी इथे कुठल्याही सोयी का नाहीत? 'मागच्या बाजूने गेल्यास विनासायास, रांगेत उभे न राहता दर्शन घेता येईल' ही माहिती, मी विचारली म्हणून मला कळली. इतर सर्व वृद्ध व्यक्तींना रांगेत तिष्ठत राहून दर्शन का घ्यावे लागले ? देवाच्या दारीचा हा कुठला न्याय ?

'देवळात सामान घेऊन जाता येणार नाही' असे सूचना फलक कोठेही लावलेले नव्हते परंतु, देवळाबाहेरचे काही दुकानदार, भाविकांना तसे सांगून, त्यांचे सामान स्वतःच्या दुकानांत ठेवायला भाग पाडत होते. काही भाविक आपले सामान दुकानदारांजवळ ठेवतही होते. देवस्थानात सामान न्यायला मनाई नसतांना, भाविकांनी त्यांच्या पिशव्या अथवा इतर सामान देवळाबाहेरील या दुकानदारांकडे ठेवून त्यासाठी पैसे का भरायचे? देवस्थानातर्फे चपला व सामान ठेवण्याची योग्य व्यवस्था का केलेली नसावी ?

देवळाच्या आवारांत सुरक्षेसाठी कॅमेरे बसवलेले आहेत तसेच 'आपल्यावर सीसीटीव्ही कॅमेरांची नजर आहे' असे ठिकठिकाणी लावलेल्या पाट्यांवर लिहलेले होते. 'देवळाच्या आवारात पादत्राणे नेण्यास मनाई आहे', तसेच 'देवळाच्या आवारात मोबाईल नेण्यास मनाई आहे', अशा सूचनाही सर्वत्र लिहिलेल्या होत्या. सर्वजण पादत्राणे बाहेर काढून ठेवत होते. पण सुरक्षा कर्मचाऱ्यांसकट कित्येकजण, मोबाईल  देवळाच्या आवारात घेऊन जाऊन मोठमोठ्या आवाजांत मोबाईलवर निवांतपणे बोलत होते. कित्येक भाविक आणि काही सुरक्षा कर्मचारीदेखील पान-तंबाखू खाऊन देवळाच्या आवारातच पिचकाऱ्या टाकून घाण करत होते. देवळाचा परिसर पान तंबाखूच्या पिंका, बिडी-काडी व इतर कचरा या सर्व गोष्टींनी प्रदूषित आणि अपवित्र होत होता.

देवळाच्या आवारांत सगळीकडे अस्वच्छता होती. फुलांचे हार आणि कोमेजलेली फुले इकडे-तिकडे पडलेली होती. ठिकठिकाणी पाणी सांडून घसरडे झालेले होते. आत जाणाऱ्या व बाहेर येणाऱ्या भाविकांकरिता  वेगवेगळे मार्ग असावेत म्हणून लावलेल्या धातूच्या दांड्या, जमिनीतून अर्धवट निखळून हलत होत्या. गर्दीच्यावेळी, भाविकांच्या लोंढ्याच्या रेट्याने, हा दांड्याचा अडसर तुटून, ऐन दरवाज्यातच अपघात होण्याची शक्यता होती. आवारात बारीसाठी बांबू लावून केलेली व्यवस्था अपुरी, तकलादू आणि अतिशय धोकादायक असल्याचे जाणवले. देवळांत किमान स्वच्छता आणि कोणी पडणार नाही किंवा चेंगरा-चेंगरी होणार नाही इतपत सुरक्षा असायला नको का? देवळाची आणि देवाची सुरक्षा जशी महत्त्वाची तशी भक्तांची सुरक्षाही महत्त्वाची नाही का?

आळंदी देवस्थानातील अस्वच्छता, ध्वनिप्रदूषण, देवस्थानाची आणि भाविकांच्या सुरक्षिततेचा अभाव आणि भाविकांकडून पैसे उकळण्याचा किळसवाणा प्रकार ही सर्व दृश्ये माझ्या नजरेला खटकली. फक्त 'आपल्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर आहे' अशा पाट्या सगळीकडे लावून  भागणार आहे का? आळंदीला जाऊन  मला असे म्हणावेसे वाटले " देवा, कृपा करा, हे प्रकार उघड करणारे कुठलेतरी सीसी टीव्ही कॅमेरे तुम्हीच बसवा आणि हे प्रकार थांबवा"!

मंगळवार, १४ जुलै, २०१५

अखेर मी स्मार्ट झाले!

दोन-तीन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळी 'अजूनही स्मार्टफोन शिवाय ही कशी जगतेय?' हा प्रश्न माझ्या मित्रमंडळींना सतावत होता. पण, मी स्वतःला स्मार्ट समजत असल्यामुळे, स्मार्टफोन न वापरण्याचा माझा 'पण' मी बरेच दिवस टिकवला. परंतु, माझ्या पेशंटसचे आईवडील वरचेवर मला विचारायला लागले,  "बाळाचे रिपोर्ट, X-ray, बाळाला आलेल्या पुरळाचे फोटो, किंवा 'बाळ कसंसंच करतंय' त्याचा व्हिडीओ WhatsApp वर पाठवू का?".  तेंव्हा मात्र माझ्याकडे स्मार्टफोन नसल्यामुळे  माझी पंचाईत होऊ लागली होती .  


अनेक मित्र-मैत्रिणींना, नातेवाईकांना आणि  माझ्या लहानग्या पेशंटसच्या आईवडिलांना, "तुम्ही स्मार्ट फोन का वापरत नाही?" या प्रश्नाचे उत्तर देऊन-देऊन शेवटी मी कंटाळले. सुरुवातीला "माझ्याकडे  स्मार्टफोन नाही आणि मला तो वापरताही येत नाही" असं सोपं उत्तर मी देत असे. पण लोकांच्या टोमणेबाजीमुळे ती सोयही राहिली नव्हती. आय टी कंपनीमध्ये काम करणाऱ्या एका मॉडर्न मॉमने एकदा मला ऐटीत ऐकवले होते, "डॉक, मी की नाही, माझ्या बेबीला सांभाळणाऱ्या मेडला एक स्मार्टफोन घेऊन दिलाय. त्यामुळे मी सतत तिच्याशी WhatsApp वर कॉन्टक्टमधे असते. डॉक, ती डंब मेडसुद्धा स्मार्टफोन वापरते तर तुम्ही नक्की वापरू शकाल!"

असे अनेक अपमानास्पद अनुभव झेलून आणि लोकांच्या असंख्य प्रश्नांना कंटाळून मला जरा 'शहाणपण' आले आणि शेवटी एकदाचा मी स्मार्टफोन घ्यायचा निर्णय घेतलाच. लोकाग्रहास्तव फोन घेतेय, त्यामुळे उगीच जास्त खर्च नको, पाच हजाराच्या आतलाच फोन घ्यावा असं मी मनाशी ठरवलं.  हा माझा विचार, मोबाईलच्या दुनियेतील तरबेज भाचरंडांना आणि काही जवळच्या मित्र मंडळींना ऐकवला. तर काय, "पाच हजाराच्या आत कुठे काय बरा फोन येणार आहे का? तसला  स्मार्ट फोन घेणं आणि न घेणं सारखंच आहे"  असं बोलून  त्या सर्वांनी  माझ्या 'बावळटपणावर' शिक्कामोर्तब केलं.

कुणी म्हणालं " कॉलेजला जाणारी लोअर इकोनॉमिक क्लासमधली मुलंसुद्धा हल्ली सात आठ हजाराचे फोन वापरतात. आणि पाच हजारांत अगदीच कमी चॉइस मिळेल, कमीतकमी दहा हजारांचं  बजेट तर हवेच."

मग मी नाईलाजाने माझे बजेट वाढवून दहा हजारापर्यंत नेले.

"फक्त दहा हजाराच्या मोबाईलनं काही खास इम्प्रेशन पडणार नाही. त्यासाठी निदान वीस हजारचा स्मार्टफोन तरी घेचही काही हितचिंतकांची सूचना मात्र मी पूर्णपणे कानाआड केली.

माझ्या वाढीव बजेटमध्ये बसेलसा चांगला स्मार्टफोन शोधू लागल्यावर मात्र मी चांगलीच चक्रावले. दुकानांत त्या रेंजमधली दहा कंपन्यांची शंभर मॉडेल्स होती. त्यातून 'अँड्रॉईड' का 'विंडोझ?', 'जेली बीन' का 'आईस्क्रीम सँडविच', 'सिंगल सिम' का 'ड्युअल सिम', 'क्वाड कोअर' का 'ड्युअल कोअर'? असले अनेक अगम्य प्रश्न विचारून आणि अनंत पर्याय  देऊन, दुकानदारांनी मला पूर्ण गोंधळात टाकलं. उच्चशिक्षित असूनही यातलं आपल्याला काहीच कळत नाही, हे मला उमगलं. आपल्या  या अज्ञानाचा फारसा गवगवा होऊ नये याची दक्षता घेत आणि  विनासायास  'ready answers' मिळवीत म्हणून मी माझ्या भाचीला फोन लावला.

माझ्या शंकांचे निरसन न करता, "ते सगळं तुझ्या युजवर डिपेंड आहे आणि ते तुलाच ठरवावं लागेल" असे स्मार्ट उत्तर अगदी  तत्परतेने तिने देऊन टाकले! त्यातून वर, "आत्या, अगं मोबाईल घ्यायला दुकानांत कशाला गेलीस? फ्लिपकार्ट किंवा अमेझॉन वर मॉडेल्सची रेटिंग्स आणि कॉनफ़िगरेशन्स बघायची, काहीऑफर्स मिळत असतील तर घ्यायच्या आणि ऑनलाईन मागवून टाकायचा." असा फुकट सल्ला देऊन मला वेड्यात काढलं ते वेगळंच!

आता मात्र स्वाभिमान जागृत झाल्यामुळे मी पेटून उठले. भाचीने सुचवलेला हा साधा-सोप्पा मार्ग पडताळून बघायचाच असं मी ठरवलं. मग काय विचारता! ऑपरेटिंग सिस्टम्स,प्रोसेसर्स,मॉडेल्स आणि त्यांची रेटिंग्स असे माझे नवीन ऑनलाईन शिक्षण चालू झाले. शेवटी माझ्या वापरासाठी योग्य आणि अगदी 'value for money' अशा मॉडेलचा शोध मला लागला. पण तो इतका दहा हजाराचा फोन ऑनलाईन मागवण्यापूर्वी एकदा आपल्या डोळ्यांनी प्रत्यक्षात बघावा, हाताळावा, या विचाराने  एक दोन दुकानांत / virtual stores मध्ये  गेलेच .


मी ठरवलेल्या मॉडेलची किंमत प्रत्येक दुकानात, ऑनलाईन मार्केटपेक्षा जवळ-जवळ एक हजार रुपयांनी जास्त होती. साहजिकच 'हे असं कसं?' हा प्रश्न मनांत आलाच. उत्सुकतेपोटी, "हेच मॉडेल ऑनलाईन स्वस्त कसं हो?" हे विचारण्याचा बावळटपणा केलाच. उत्तरादाखल, "भारतात ऑनलाईन मालाचा काय भरवसा? बघा बुवा, इथे असलं करणं काही शहाणपणाचं नाही. कदाचित फसाल बरं का!" असं एक पिल्लू दुकानदाराने सोडून दिलं! 

आता मात्र माझी पंचाईत झाली. फोन दुकानातून घ्यावा का ऑनलाईन घ्यावा, अशी  व्दिधा मनस्थिती असली तरी, ऑनलाईन स्वस्त मिळत असल्यामुळे मन तिकडेच ओढ घेत होते. "फोन ऑनलाईन मागवल्यावर हे असलं काही होणार नाही ना?" असं विचारायला पुन्हा भाचीला गाठले. तर तिने, "मी बऱ्याच गोष्टी ऑनलाईन मागवते. पण कधीही फसलेले नाही. तू मागवून बघ काय होतय ते!" असे सावध उत्तर देऊन स्वत:ची सुटका करून घेतली आणि माझी धाकधूक मात्र अजूनच वाढवली.

योगायोगाने, 'अमेझॉन इंडिया' मध्येच वरच्या हुद्द्यावर काम करणारा माझा एक भाचा त्याच रात्री जेवायला येणार होता. जेवणं झाल्यावर मी, "काही फसवणूक तर होणार नाही ना? दुकानापेक्षा ऑनलाईन स्वस्त कसं? फोन खराब निघाला तर पैसे परत करतात का?" वगैरे माझ्या सगळ्या शंका-कुशंका भाच्याला  धडाधड विचारून टाकल्या.
"मावशी, तसं काहीही होणार नाही, तू निर्धास्त रहा." त्याने अत्यंत हसतमुखपणे मला दिलासा दिला. परंतु, मनातल्या मनात, "आमची अमेझॉन काय अशी चलती-फिरती कंपनी आहे काय? इतकी शिकली आहेस पण काय उपयोग? इतकं कसं कळत नाही? असले प्रश्न पडतातच कसे?" असा, माझी कीव करणारा, विचार त्या हास्यामागे  दडलेला होता की काय, असेही क्षणभर मला वाटून गेले .
इतकी हमी मिळाली तरी ऑनलाईन मागवलेला फोन हातात येईपर्यंत माझ्या अगदी जीवात जीव नव्हता. पैसे तर आधीच कापले गेलेले असल्यामुळे कुठे माशी शिंकायला नको अशी मी मनोमन प्रार्थना करत होते. जेमतेम दोन दिवसांत फोन घरपोच येऊन पोहोचलासुद्धा! सर्व काही व्यवस्थित असल्यामुळे माझा जीव भांड्यात पडला.

या सगळ्या प्रवासांत स्मार्टफोनबद्दलचे माझे ज्ञान मात्र भलतेच वाढले. त्यामुळेच आताशा कुणी ओळखीचं भेटलं की त्यांना "तुमच्या स्मार्टफोनचा प्रोसेसर कुठला? स्क्रीन ४.७ इंच का ५.५ इंच?" असले प्रश्न मी हटकून विचारते. मधे एका स्मार्ट मुलाला त्याच्या फोनचा प्रोसेसर कुठला आहे असे विचारल्यावर त्याने "सिंगल सिम" असे सांगितले. मी जेंव्हा हसून म्हटलं, "अरे, 'क्वाड कोअर' का 'ड्युअल कोअर'?", तेंव्हा त्याच्या चेहऱ्यावरचा गोंधळलेला भाव, माझ्या वाढलेल्या 'भावाची' साक्ष पटवून गेला.
माझ्या एका मैत्रिणीने  कौतुकाने मला सांगितले, "मला जेली आवडत नाही ना, म्हणून यांनी त्यांचा 'आईस्क्रीम सँडविच' वाला स्मार्टफोन मला दिला आणि स्वतःसाठी 'जेली बीन' वाला घेतला!" मला मात्र तिच्या अज्ञानावर आणि भाबडेपणावर हसावे का रडावे ते कळेना!
एका प्रथितयश डॉक्टर मित्राने मला सुनावले, "अगं, फोनचा price tag महत्वाचा असतो, प्रोसेसर नाही काही!
या सगळ्यावर कळस म्हणजे ड्युअल सिम handset मध्ये एकाच वेळी दोन सिम कार्ड घालता येतात याचा माझ्या ओळखीतल्या एका सुशिक्षित बाईंना पत्ताच नव्हता!

बऱ्याच लोकांना स्मार्ट दिसण्यासाठी स्मार्टफोनची गरज असते, असं आता माझं मत झालंय. स्मार्टफोन वापरणाऱ्या बराचशा लोकांना, फोन करणे व घेणे, गेम्स खेळणे, सेल्फी काढणे आणि Whatsapp वर चकाट्या पिटणे याव्यतिरिक्त तो अजून कशाकशासाठी वापरता येतो याचा गंधच नसतो. आता हे कळल्यामुळे माझा स्मार्टनेस मात्र कमालीचा वाढलाय हे जाणवते !

बुधवार, ८ जुलै, २०१५

माझा फेसबुकमधला 'जॉब'!

पाच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. अनिरुद्धला अमेरिकेतील कॉलेजमध्ये प्रवेश मिळाल्याचे कळल्यावर मी  रडायलाच लागले.
"आईआता सगळं मनासारखं झालंयअसिलताप्रमाणे मलाही चांगले कॉलेज मिळायला हवे, ही तुझी इच्छाही  पूर्ण झालीय. मग आता का रडतेयस? "
आनंदनेमाझ्या नवऱ्याने अनिरुद्धला समजावले. "अरे, आनंदाश्रू आहेत ते. रडू दे मनसोक्त. हलकं वाटेल जरा तिला." 

खरेदीअमेरिकेचा व्हिसासामानाची बांधाबांध या गडबडीत पुढचे काही दिवस कसे गेले ते कळलेच नाही. अनिरुद्धचे जाणे दोन दिवसावर आले. पण माझे मन काही थाऱ्यावर नव्हतेच. वरचेवर डोळे पाण्याने भरून येत होते. एकदा अनिरुद्धच्या लक्षात ते आलेच.
"आई आता काय झालंय रडायला ?"
"काही नाही रे. डोळ्यात काहीतरी गेलं आणि पाणी आलंय" मी गडबडीने सारवासारव केली.
"आईहे काय चाललय काय तुझंआजकाल तू एकतर गप्प गप्प तरी असतेस किंवा सतत डोळ्यात पाणी आणत असतेस."
यावर मी काहीच उत्तर न दिल्यामुळे तो जास्तच वैतागून म्हणाला, "आईचं मन तुला कधीच कळायचं  नाही, कारण  तू कधीच आई होणार नाहीस' ' हा तुझा नेहमीचा डायलॉग नको ऐकवूस"
माझ्या डोळ्यात जास्तीच पाणी जमायला लागलेले पाहूनअनिरुद्ध कावरा बावरा होऊन म्हणाला,
"तू अशी रडत राहिलीस तर जाताना मला किती त्रास होईलयाचा तरी विचार कर."
"तू दूर चालला आहेस याचा त्रास होतोय रे फार"  मी हुंदका देत म्हणाले.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आनंदने वर्तमानपत्रातून डोके वर काढले.
"अगंत्याला बाहेर पाठवण्यासाठीतुझीच तर किती धडपड होती. चांगल्या कॉलेजमध्ये स्कॉलरशिपवर तो चाललाययाचा आनंद त्याच्या विरहाच्या त्रासापेक्षा नक्कीच  जास्त आहे नाअसा  रडवेल्या चेहऱ्याने  निरोप  दिलास तर त्याला बरं वाटेल कासांग बरं?
"आनंद तर आहेच रेपण आता मी अगदीच जॉबलेस होणार याचंही कुठेतरी वाईट वाटतंय"
"धिस इज नॉट फेयर हंआई! 'तुझी बारावी होईस्तोवर माझी काही सुटका नाही'; 'एकदा का तू कॉलेजला गेलास, की मी माझ्या मनासारखं आयुष्य जगणार'असली तुझी वाक्ये सतत चार वर्षे ऐकून कान  किटले होते माझे. वर आता ही रडारड!"
अनिरुद्धच्या आवाजाला आता भलतीच धार आली होती. पण माझा रडवेला चेहरा बघूनसमजूत काढत तो  म्हणाला,
"अगं जॉबलेस व्हायला तू रिकामी कुठे असतेससकाळी फिरायला जातेसस्वैंपाक करतेस आणि दिवसभर तुझी प्रॅक्टीस असतेच की. वाचनसंगीतनाटक, सिनेमा या सगळया गोष्टींची तुला आवड आहे. कसा वेळ जाईल ते तुला कळणारही नाही."
"ते खरं आहेपण आत्तापर्यंत मी काहीही करत असले तरी मनांत सतत तुम्हा मुलांचाच विचार असायचा. तुमचं सगळं करणं आणि तुमच्या अभ्यासावर लक्ष ठेवणंहाच जणू माझा 'फुलटाईम जॉब' होता. त्यामुळे, ना  कधी मी मेडिकल कॉन्फरन्सेसना गेलेना इतर बायकांसारखी भिशी आणि लेडीज  क्लबमध्ये रमले. आता नव्यानं यातलं काही सुरु करावंस नाही वाटत. एकदम पोकळी निर्माण झाली आहे रे" मी हुंदका आवरत म्हणाले.
"होपण माझ्यावर लक्ष ठेवण्याच्या जॉब मधून तुला मी मोकळं करतोय याचं मला किती समाधान वाटतंय, ते तू समजूच शकणार नाहीस." अनिरुद्ध हसत-हसत म्हणाला. बाप-लेकांची नेत्रपल्लवी झाली आणि आनंदनेही गालांतल्या गालांत हसून घेतले.

माझं 'अभ्यासावर लक्ष ठेवणंहा मुलांचा आणि आनंदचा खास चेष्टेचा विषय होता. घारीने पिल्लावर नजर ठेवावी तशी मी अनिरुद्धवर पाळत ठेवून असायचे. तो कधी उठतोयकधी झोपतोयकोणत्या मित्र-मैत्रिणीशी किती वेळ आणि काय बोलतोयइंटरनेटवर किंवा इतरत्र टाईमपास करतोय काया सगळ्यावर माझे अगदी बारीक लक्ष असायचे. माझ्याकडून कधी अतिरेक झालाकी तो चिडायचाआमची वादावादी सुरु व्हायची आणि अशा युद्धप्रसंगांतआमच्यात तह घडवून आणण्याची जबाबदारी आनंद अगदी खुबीने पार पाडायचा.
"जोक्स अपार्ट. पण आईमी तुला एक चांगली आयडिया देतो. बघ पटतेय का! तू सकाळी फिरायला जातेस  आणि तिथे दिसणाऱ्या माणसांशी वर्षानुवर्षे ओळख असल्यासारखी आम्हाला त्यांच्याबद्दल काही-बाही सांगत असतेस. आता असं करत्या सगळ्यांशी प्रत्यक्षात ओळख करून घेहळूहळू गप्पा मारायला लाग. नवनवीन मित्र-मैत्रिणीचे ग्रुप्स मिळतीला बघ."
ही आयडिया मी फारशी उचलून न धरल्याने तो इतर उपाय सुचवू लागला.
"नाहीतर तुझ्या जुन्या मैत्रिणींशी पुन्हा फोनवर गप्पा सुरु कर किंवा सगळ्यात बेस्ट म्हणजे तुझ्या आवडत्या सास-बहू सिरियल्स पाहणं पुन्हा सुरु कर"
माझ्या या दोन्ही आवडी - व्यसनच म्हणा ना - घरातल्यांचा खास चेष्टेचा विषय होता. गेली काही वर्षे त्या व्यसनांवर मी नियंत्रण ठेवलेले होते. मुलांच्या दहावी-बारावीच्या वर्षांत तर ही 'व्यसने' पूर्ण बंदच होती.
माझ्या 'व्यसनांचेसंभाव्य धोके लक्षांत येताच आनंद एकदम सावध झाला आणि अनिरुद्धला डोळ्याने दटावतपण अगदी प्रेमळ आवाजांत म्हणाला,
"मी काय म्हणतो स्वातीतू पूर्वीसारखे दोनवेळा फिरायला जालोकांशी गप्पा मारायला सुरु करम्हणजे दोन्ही वेळचे मिळून अनेक  ग्रुप्स होतील तुझे!"
"आनंदतुझं तिरकस बोलणं मला समजतंय बरं का मला. मैत्रिणींशी फोनवर बोलण्यावरून कमी टोमणे ऐकवलेयत का आजपर्यंतआणि अनिरुद्धतुझे हे  'सीरियल किलर' बाबा मला एकतरी सीरियल निवांतपणे बघू देतील का? "
माझ्या आवाजातला फणकारा जाणवल्यामुळे आनंदने गडबडीने परत वर्तमानपत्रांत डोके खुपसले.
"फिरायला जाताना दिसणाऱ्या लोकांशी माझी  जेमतेम तोंडओळख आहे. फारशी ओळख नसतानाअसं जाऊन कसं बोलायचंमला नाही रे जमणार ते!"
"हो काआमच्या अभ्यासाबद्दल चौकशा करायला जाऊन बोलायचीस की बिनदिक्कतपणे अगदी अनोळखी लोकांशीही. तेंव्हा कसं जमायचं तुलाकाही वेळा तर अक्षरश: लाज आणायचीस आम्हाला." अनिरुद्धने आता  मला शब्दांत पकडले.
"अरेत्यावेळी तसं करणं आवश्यकच होतं. तुम्हां मुलांचा अभ्यास हा एक कॉमन दुवा असायचा आमच्यांत.  जाऊ देमाझ्या जॉबलेस होण्याच्या प्रॉब्लेमला काही उपाय नाही. पण तू नको काळजी करूस माझी. " मी सुस्कारा सोडत म्हणाले. 
तरीही अनिरुद्ध बेचैन होता. थोडावेळ विचार करून जरा  भीत-भीतच म्हणाला,
"आईतू मला रागावणार नाहीसअसं आधी प्रॉमिस देमग मी एक भन्नाट आयडिया  देतो "
शाळेत डबा हरवला, शिक्षा झाली किंवा परीक्षेत काहीतरी घोळ झालाकी मला ते  सांगायच्या आधी ही असली प्रॉमिसेस मागूनअभयदान घेण्याची अनिरुद्धची नेहमीची युक्ती होती.
मी चटकन प्रॉमिस देऊन टाकले. 
"हे बघफेसबुक बद्दलची तुझी जहाल आणि अगदी जुनाट मते जगजाहीर आहेत. पण आज तू माझं ऐकच. तुझ्या 'जॉबलेसहोण्यावरचा उत्तम उपाय म्हणजे तुझे फेसबुक अकाऊन्ट उघडणे!"
आत्तापर्यंत अनिरुद्धच्या फेसबुक अकाऊन्टवरून आम्हा दोघांची झालेली तोंडातोंडी लक्षांत घेता त्याला अभयदान घेणे आवश्यकच होते!

पुढचा काही काळ मला फेसबुकची महती ऐकवून, माझ्या जोरदार विरोधाला न जुमानता, शेवटी त्याने माझे फेसबुक अकाऊन्ट उघडून दिले. तसेच अकौंटवर जाणेफ्रेंड रिक्वेस्ट पाठवणेचॅटींग  करणेफोटो अपलोड करणे वगैरे गोष्टी माझ्या अज्ञानावर न चिडता, अतिशय संयमाने शिकवल्या आणि त्यांचा सरावही करून घेतला. मुलगा दूर जायच्या वेळी त्याचे मन दुखावायला नको म्हणून मी ते सर्व शिकून घेतले खरेपण 'वेळ वाया घालवण्याचे एक निरुपयोगी साधनहे फेसबुक बद्दलचे माझे मत तो बदलू शकला नाही!

अमेरिकेला पोहोचल्यानंतर अनिरुद्धचा ना काही फोन, ना ईमेल, ना आमच्या ईमेलला उत्तर. आनंद स्थितप्रज्ञ असल्यामुळे, शांत होता. मी मात्र काळजीने कासावीस झाले. अनिरुद्धशी कसा संपर्क साधावा या विचारांत असतानाच माझ्या भाच्याचा फोन आला,
" मावशी, अनिरुद्धची अगदी ऐष आहे , मस्त रूम मिळालीय आणि कॅम्पस तर कसला पॉश आहे!"
"अरे तुला कसं कळलं? फोन आला होता का तुला ?"
"फोन कशाला पाहिजे? त्याच्या FB च्या पोस्ट्स बघ ना. अरे हो. पण तू कशी बघणार ? तू तर FB ची कट्टर विरोधक नां!" भाचा खोचकपणे म्हणाला.
"मी बघते ना लगेच माझ्या FB अकाऊन्टवर" आता माझ्या भाच्यावर आश्चर्यचकित होण्याची पाळी होती. मी गडबडीने फोन ठेवून कॉम्प्यूटरकडे गेले, महत्प्रयासाने फेसबुक अकौंटमध्ये लॉग-इन केले. अनिरुद्धचे नवीन फोटो पाहून भराभर लाइक्स टाकले. तो सुखरूप पोहोचलाय आणि मजेत आहे हे पाहिल्यावर मला अगदी हुश्श झाले. पण त्याने खुशाली न कळवल्यामुळे उफाळून आलेला राग त्याला एक खरमरीत मेसेज पाठवल्यावरच जरा शांत झाला. क्षणार्धात अनिरुद्धचे उत्तर आले. काय तर म्हणे, मला फेसबुक वापरायला भाग पाडण्यासाठीच त्याने मुद्दाम फोन किंवा ईमेलवर खुशाली कळवली नव्हती ! मनोमन  चिडले, चडफडले तरी मी काहीही करू शकत नव्हते. त्याची खुशाली कळण्यासाठी, वरचेवर फेसबुकवर जाण्याशिवाय त्याने आता मला पर्यायच ठेवलेला नव्हता!

हळू-हळू मी फेसबुक वापरू लागले. जुन्या मित्र-मैत्रिणींना, ओळखीतल्या आणि नात्यातल्या लहान-मोठ्यांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणे, आलेल्या रिक्वेस्ट मान्य करणे सुरु झाले. बघता-बघता माझा मित्रपरिवार पाचशेच्या वर गेला. त्यांच्या आयुष्यातल्या बित्तंबातम्या मला आता फेसबुकवरूनच कळायला लागल्या. सुरुवातीला इतरांचे फोटो बघणे, कॉमेंट्स वाचणे, अशा बघ्याच्या भूमिकेत मी होते. पण बघता बघता स्वत:च्या पोस्ट आणि कॉमेंट्स टाकणे सुरु झाले. त्यामुळेच मग वारंवार अकाऊन्ट उघडून आपल्याला किती लाइक्स किंवा कॉमेंट्स येताहेत, हे बघण्याचा चाळाच लागला. नवीनच लागलेल्या चॅटींगच्या व्यसनामुळे, पंधरा-सोळा वर्षे एकत्र शिकूनही एका शब्दाचीही देवाण-घेवाण न झालेल्या, वर्गमित्रांशीसुद्धा माझ्या  चक्क दिलखुलास गप्पा सुरु झाल्या.

फेसबुकमुळे काही व्यक्ती मला अगदी नव्याने उमगल्या. वरकरणी रुक्ष वाटणारे, कलासक्त किंवा कविमनाचे  निघाले. तर  काही पोक्त व्यक्तींच्या थिल्लर पोस्टसमुळे त्या व्यक्ती माझ्या मनातून कायमच्या उतरल्या. काही कोवळ्या वयाच्या मुला-मुलींचे प्रगल्भ विचार वाचून मी अगदी भारावून गेले. त्यामुळे हल्लीची मुले फेसबुकवर फक्त टाइमपास करत असतात हे माझे मत हळू-हळू बदलायला लागले. "फेसबुक हे व्यक्त होण्याचे एक माध्यम आहे. त्याला नावे न ठेवता पालकांनीच आपापल्या मुलांना ते योग्य प्रकारे वापरायला शिकवावे " हे अनिरुद्धचे मत आता मला पटायला लागले. अनिरुद्ध पहिल्यांदाच सुट्टीवर आल्या-आल्या, "फेसबुकच्या प्रेमात पडून मी ते चक्क एन्जॉय करतेय" अशी प्रांजळ कबुलीही त्याला देऊन टाकली.

तो सुट्टीवर असतानाच, एका लग्नाला जाऊन आम्ही घरी आल्या-आल्या त्याने माझ्यावर तोफ डागली,
"आई काय चालवलं आहेस तू हे ? आज तुझ्यामुळे मला सगळ्या भावंडांची बोलणी खावी लागली."
"काय बोलतोयस? मी काय केलंय ?" मी आश्चर्यमिश्रित रागाने म्हणाले.
"शिल्पामावशीला सांगून जयेशचे FB अकाऊन्ट बंद करवलेस ना तू?"
"हे बघ, मी काही अकाऊन्ट बंद  करायला लावलेले नाही, "जयेश बरेचदा फेसबुकवर दिसतो", एवढंच  फक्त  मी शिल्पाला सांगितलं. तिला माहीतच नव्हतं त्याच्या अकाऊन्टबद्दल. आता तिनं जयेशला ते  बंद करायला लावलं, तर त्यात माझा काय दोष ? "
"पण तुला शिल्पामावशीला सांगायची गरजच काय होती ?"
"अरे, जेमतेम दहा वर्षांच्या जयेशला काय करायचंय आत्तापासून फेसबुक? बरं शिल्पा आणि शिवेन दोघं दिवसभर घराबाहेर. जयेश कॉम्प्यूटरवर अभ्यास करतोय का फेसबुकवर टाईमपास करतोय  हे तिच्या सासूबाईना कसं कळणार? मी शिल्पाला सांगितलं, त्यांत माझं काहीही चुकलेलं नाही."
"पण आई थोडावेळ एफबी चा ब्रेक घेतल्यामुळे अभ्यास चांगला होतो, हे तू कधी का नाही लक्षांत घेत?"
"हे बघ, ते मला सांगूच नकोस. मला कधीच पटणार नाही. आम्ही काय अभ्यास केला नाही का कधी?  ब्रेकसाठी  इतर बरंच काही करता येतं." मी त्याला निरुत्तर करून पुढे म्हणाले,
"बघ, चौथीच्या स्कॉलरशिपमध्ये जयेश आला की नाही राज्यांत पाचवा?"
"तू असं बोलतेयस की जणू फेसबुक बंद झाल्यामुळेच तो राज्यांत पाचवा आलाय" अनिरुद्ध उसळून म्हणाला.
"मी डायरेक्टली तसं काही म्हणाले आहे का? पण इनडायरेक्टली ते एक कारण आहेच "

थोडा वेळ शांततेत गेला असेल नसेल, पुन्हा अनिरुद्ध उसळून म्हणाला,"बरं दीपक तर चांगला वीस वर्षांचा आहे, पहिला येतोय कॉलेजमध्ये. मग त्याची चहाडी करायला कुणी सांगितलं होतं तुला?"
"कुणी सांगायला कशाला पाहिजे? त्याच्या पोस्ट बघितल्या होत्यास का तू? काही योग्य-अयोग्यचा विचार नको का आपल्या मुलांना? दीपकचे काही चुकतंय असं वाटलं, तर मी सांगायचं नाही का मामाला? "
"माझं चुकलं तर बोल ना मला. पण दुसऱ्यांच्या मुलांना का उगीच त्रास देतेस ?"
"हे बघ. माझ्या चुलतभाच्याला मुलाला, दुसऱ्याचा मुलगा समजायला, मी काही अमेरिकेत नाही राहात. आणि अमेरिकेतसुद्धा जवळचे लोक असं करतात. पाहिलंय ना मी त्यांच्या  सीरियल्समध्ये."
आता मात्र अनिरुद्धला गप्प बसणे भागच होते.
पुढचे चार दिवस गोडी-गुलाबीत गेले. अनिरुद्धचं मित्र-मैत्रिणींबरोबर सिनेमाला आणि जेवायला बाहेर जाणं चालू होतं. एक दिवस तो तणतणच घरी आला.
"आई तुझ्या वागण्याने तू मित्र-मैत्रिणींशीही माझे संबंध बिघडवून टाकणार आहेस"
"आता काय झालं बाबा?" मी शांतपणे विचारलं .
"शर्मिलाने तुझं नाव घेतलं नाही इतकंच. पण म्हणाली की एफबी वर तुझी फ्रेंड रिक्वेस्ट तिने स्वीकारली आणि  दुसऱ्याच दिवशी तिच्या आईने तिचे फोटो डिलीट करायला लावले"
"बरं झालं बाई. कसेतरीच फोटो होते ते. शर्मिला आणि तिला चिकटलेली चार-पाच मुलं. शाळेच्या सेंड-ऑफला हे असले फोटो काढून घ्यायचे? आणि वर ते फेसबुकवर प्रदर्शनाला ठेवायचे? तिच्या आईला नसेल चाललं ते!"
"तिने काय करावं हा तिचा प्रश्न आहे ना. तिच्या आईला फोटोबद्दल सांगण्याचा उद्योग तुझाच असणार"
"माझ्यासारख्याच इतर कुणा हितचिंतकाने सांगितलं नसेल कशावरून? जे झालंय ते शर्मिलाच्या भविष्याच्या दृष्टीने योग्यच झालंय. पुढे जेंव्हा ती आई होईल आणि तिची मुलगी जेंव्हा वयांत येईल तेंव्हा कळेल तिला. " माझ्या कृत्याची कबुली न देण्याची सावधगिरी बाळगत, मी ठासून म्हणाले.
"आई, तू काय करशील आणि कुठलं बोलणं  कुठे नेशील याचा नेम नाही. यू  आर अन इम्पॉसिबल लेडी!" अनिरुद्धच्या या वाक्यावर, आनंदचा चेहरा इतका फुलला होता की कुठल्याही क्षणी तो टाळ्या वाजवेल, असे मला वाटले !

अनिरुद्ध अमेरिकेला परत जाण्याआधी त्याला भेटायला लोकांची ये-जा चालू होती. माझी एक मैत्रीण तिच्या नववीतल्या मुलाला घेऊन, बारावीपर्यंतच्या अभ्यासाचे नियोजन कसे करावे, कुठली पुस्तके वापरावीत असा महत्वाचा सल्ला विचारायला आली होती. बोलता बोलता आमचा विषय फेसबुककडे वळला.
"तो फेसबुकवर नसेल तर उत्तमच. पण असेल तर जास्त वेळ घालवणार नाही यावर लक्ष ठेव. पुढची चार वर्षे फार महत्त्वाची आहेत."
हे बोलून मी चहा करायला उठले. स्वयंपाकघरात जाता-जाता सहज मुलांच्या खोलीत डोकावले तर अनिरुद्धचे बोलणे कानावर पडले,
"पुढची चार वर्षे फार महत्त्वाची आहेत. मावशी सतत आठवण करून देईलच तुला. नियमित अभ्यास कर. पण त्याच बरोबर कॉम्प्यूटर गेम्स, ग्राउंडवरचे खेळ, फेसबुक, हे सर्व थोडं थोडं करत जा. नाहीतर पकशील लेका."
"आणि हो, एक महत्त्वाची गोष्ट आधीच सांगून ठेवतो. माझी आई आजच तुला एफबी वर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवेल, ती इग्नोअर कर आणि शहाणा असशील तर तुझ्या आईला एफबी वापरायला मुळीच शिकवू नकोस!"
अर्थातच चहा झाल्याबरोबर मी मैत्रिणीला फेसबुक अकाऊन्ट उघडून देऊन वापरायला शिकवले!

अनिरुद्ध अमेरिकेला गेल्यापासून फेसबुकमधल्या माहिती आणि मनोरंजनाच्या दुनियेमध्ये माझा फावला वेळ उत्तम जात होताच. पण हल्ली माझ्या ओळखीतल्या तमाम बायकांना मी फेसबुक अकाऊन्ट उघडून देते आणि "फेसबुकसकट सगळीकडेच आपापल्या मुलांना योग्य मार्गावर ठेवा" असा सल्लाही देते. अर्थात, मी स्वतःदेखील त्यांच्यावर लक्ष ठेवून असते हे सांगायला नकोच!

फेसबुकमधल्या या 'जॉब' मुळे मला आता अजिबात 'जॉबलेस' वाटत नाही!  

रविवार, ५ जुलै, २०१५

छत्री उलटली!

पुण्याच्या पावसाळयात, मला कधीतरीच छत्री वापरण्याचा योग येतो . माझ्याकडे आधीची एक छत्री होती . ती जरा स्वस्तातली असल्यामुळे, तकलादू होती. त्यात जरा वारं भरलं, की ती उलटायची आणि मग भिजायला व्हायचं. उलटून-उलटून ती छत्री निकामी होऊन गेली. मागच्या महिन्यांत इथे सतत आठवडाभर फारच पाऊस होता. एक दोनवेळा पावसांत बाहेर जायला लागले आणि तेंव्हा छत्रीशिवाय माझी चांगलीच पंचाईत झाली . त्यामुळे मग मी नवीन छत्री घ्यायचे ठरवले.  आता तरी अशी उलटणारी ही छत्री नको, म्हणून  चांगली महागातली आणि मजबूत छत्री घेतली. पण मजा बघा , नवीन छत्री घेतल्यापासून पुण्यातला पाऊस गायब. त्यामुळे नवीन छत्री वापरायचा योगच नाही आलेला अजून!

तात्पर्य काय? छत्री कुठलीही आणि कितीही महागातली घ्या, अशी ना तशी, ती उलटणारच!

सोमवार, २९ जून, २०१५

शब्दबोध

आमची आजी अगदी नेमस्त होती. रोज पहाटे-पहाटे  उठायची. अंघोळ वगैरे आटपून, एखादा तासभर एका ठराविक क्रमाने काही स्तोत्रे आणि श्लोक म्हणत देवपूजा करायची. आम्ही भावंडे साखरझोपेत असताना, तिचे ते हलक्या आवाजातले पण एका ठराविक चालीतले ते म्हणणे आमच्या कानावर पडत असायचे. त्यातल्या काही ओळी आजही माझ्या डोक्यात मधून मधून घोळत असतात.

कधी कधी तर स्वप्नांत मला असाही भास होतो की आपण सोलापूरच्या माहेरच्या घरातच आहोत आणि आजी आसपास काही स्तोस्त्र अथवा काही श्लोक म्हणते आहे आणि मधूनच आम्हाला झोपेतून जागे करण्यासाठी हलक्याशा, प्रेमळ आवाजात हाक मारतेय! तुम्हाला ऐकायला गंमत वाटेल, कदाचित विश्वासही  बसणार नाही, पण माझ्या या स्वप्नाला एक लय असते. तसेच, उदबत्तीच्या सुवासाचा, कापूर जाळल्याचा, देवपूजेसाठीच्या फुलांचा, सहाणेवर उगाऴलेल्या चंदनाचा, बंबाच्या धुराचा आणि अर्थातच वाफाळलेल्या चहाचा, असा काहिसा संमिश्र वास असतो!

वर्तमानपत्रात आलेली एक बातमी काही दिवसांपूर्वी माझ्या वाचनात  आली. फेसबुकचा CEO मार्क झुकरबर्ग याच्या 'बीस्ट' नावाच्या कुत्र्याचे' फेसबुकवर लाखो चाहते आहेत आणि त्याच्या फेसबुक पेजला असंख्य हिट्स मिळतात म्हणे. हे वाचताच मला प्रकर्षाने आठवण झाली ती , लहानपणी सकाळी-सकाळी आजीच्या आवाजात ऐकलेल्या काही ओळींची…
"समर्थाचिया घरचे श्वान।
त्यास सर्वही देती मान ।।
ऐसा तुझा म्हणवितो दीन।
हा अपराध कवणाचा?"

आजीच्या पाठांतरामुळे आणि ते सकाळी म्हणण्याच्या तिच्या परिपाठामुळे, रामदास स्वामींचे शब्दसामर्थ्य माझ्या कानावर अलगदपणे पडत गेले आणि मनात साठत गेले, हे माझे भाग्यच म्हणायचे. आजमितीलाही कित्येक व्यक्तींना दासबोधातील या ओळींमधला मथितार्थ लागू पडतो. मग मार्क झुकरबर्गच्या श्वानाला न पडेल तरच नवल!

सूज्ञांस अधिक सांगणे नलगे!! 

सोमवार, १६ मार्च, २०१५

शब्दसंपदा

काही दिवसापूर्वी टीव्हीवर दाखवल्या गेलेल्या 'पारंपारिक' खाद्यपदार्थांबद्दल मनात आलेले विचार मी लिहिले होते. त्यावर अनेकांनी आपापल्या प्रतिक्रिया कळवल्या. आपल्या खाद्यसंस्कृतीची पारंपारिकता आपण जपली पाहिजे असा सूर त्यात होताच. पाश्चात्य संस्कृतीचा आपल्या खाद्यसंस्कृतीवर चाललेल्या आक्रमणाचा निषेध काहींनी केला होता.
कुणाकुणाच्या हातचे साजूक लाडू आठवून मन भरून आले असेही मी लिहिले होते. परंतु, हे लिहिताना कुणा एखादीच्याच हातचे लाडू विशेष चांगले होतात असे मला म्हणायचे नव्हते. पण नात्यातल्या काही बायका आणि मैत्रिणींचा उल्लेख राहून गेला. त्यांच्या हातच्या साजूक लाडवांना मी न जागल्यामुळे त्यांच्याकडून थोड्याशा तुटक प्रतिक्रियाही आल्या! मला लाडू पाठवण्याची, त्यांनी आजवर जपलेली परंपरा बंद होऊ नये या भीतीपोटी मी त्वरित त्यांची माफी मागून टाकली.

माझी तरुण मैत्रीण संपदा हिने, मी लिहिलेले मनोगत आवडल्याचे आवर्जून कळवले. तसेच, "तो शब्द 'पारंपारिक' असा आहे का 'पारंपरिक' आहे याची खातरजमा करून घ्यावी", अशी एक नम्र सूचनाही केली. तो शब्द वापरण्याच्या 'पारंपारिक' मानसिकतेतून माझे मन काही केल्या बाहेर पडत नव्हते. त्यामुळे  मी तिच्या प्रतिक्रियेवर लगेच आणि फार खोलात जाऊन विचार केला नाही. तरीही, "आपले काही चुकले तर नाही ना?" ही  बोच मनांत कुठेतरी होतीच.
मराठी भाषेवर विशेष प्रभुत्व असलेल्या माझ्या नणंदेला, अरुणाताईंना हळूच मी या शब्दाबद्दलची शंका विचारून घेतली. त्या म्हणाल्या, "हा शब्द 'पारंपारिक' असा नसून 'पारंपरिक' असा आहे."

'पारंपरिक' खाद्यसंस्कृती जपताना 'पारंपरिक' भाषा संस्कृतीदेखील जतन करून आपली शब्दसंपदा वाढवण्याची परंपरा चालू ठेवली पाहिजे हे खरे !    

मंगळवार, १० फेब्रुवारी, २०१५

पारंपरिक?

टीव्हीवरच्या सगळ्या कार्यक्रमांपैकी खाद्य पदार्थांबद्दलचे सर्व प्रकारचे कार्यक्रम बघायला मला मनापासून आवडते. Food Factory असो किंवा Master Chef हा कार्यक्रम असो. वेगवेगळ्या खाद्य संस्कृती बघण्याचा मला छंद आहे. Fox Life , TLC , Food-Food वगैरे वाहिन्यांवरचे कार्यक्रम बघून मला नेहमी असे वाटते की आपणही अशा वाहिन्यांसाठी काम करावे आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये किंवा देशांमध्ये फक्त खादाडी करत आणि पदार्थांवर भाष्य करत हिंडावे. ते शक्य होईल न होईल. परंतु, निदान पुण्यातल्या पुण्यात तरी असा कार्यक्रम करत हिंडावे असे अनेकदा मनांत येते. रस्त्यावर मिळणाऱ्या खाद्य पदार्थांचे आणि पारंपरिक पदार्थांबद्दलचे कार्यक्रम मला विशेष आवडतात. एखाद्या कार्यक्रमात खास पारंपरिक पदार्थाची पाककृती दाखवत असतात तेव्हां तर मी अगदी टीव्हीला डोळे आणि कान लावून बसते. कोळाचे पोहे, वरणफळे, धपाटे, उकडीचे मोदक, पाकातले चिरोटे असे खास पारंपरिक पदार्थ आपल्या घरांमधून हल्ली फारसे  केले जात नाहीत. असे पदार्थ लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी,एखादी वाहिनीच आपण चालू करावी असेही मला वाटते.
परवा एकदा Fox Life किंवा तत्सम  वाहिनीवर एक कार्यक्रम बघत होते. त्या कार्यक्रमाच्या 'गोऱ्या' निवेदकाने एका भारतीय सुंदरीला एक पारंपरिक भारतीय मिठाई दाखवायला सांगितली. त्या सुंदरीने भारतीय खाद्यसंस्कृतीमधील 'लाडू' या पदार्थाचे महत्व सांगितले आणि एका प्रकारच्या लाडवाची पाककृती दाखवते अशी प्रस्तावना केली.  आता ही कुठले लाडू दाखवतेय ते बघावे, म्हणून मी सरसावून बसले. 'पारंपारिक लाडू' या नावाखाली तिने चक्क Milkmaid आणि सुक्या खोबऱ्याचे लाडू तयार केले. मी डोक्याला हातच लावून घेतला.  माझी आई, आजी, काकू, मावशी आणि आत्या यांच्या हातच्या  अनेक प्रकारच्या साजूक लाडूंच्या आठवणीने, मन भरून आले. Milkmaid चे लाडू 'पारंपरिक' आहेत, हे त्या सुंदरीने सांगितल्याने आपल्या गृहिणींचा तसा समज होऊ नये यासाठी अळवाच्या आणि साबुदाण्याच्या लाडवापासून ते खास मोतीचूर, डिंक किंवा चुरम्याच्या लाडवापर्यंत सर्व पाककृती दाखवण्याचा मी आता निश्चयच केलाय.
पण, त्या माझ्या आवडत्या कार्यक्रमांमधून दाखवले जाणारे इतर देशांतले 'पारंपरिक पदार्थ' खरोखरीच पारंपरिक असतात की नाही, हा माझ्यापुढे मोठा प्रश्नच आहे.

सोमवार, २ फेब्रुवारी, २०१५

पेशावरची फुले

पेशावरची फुले 

पेशावरच्या मृतांची अजून,नेमकी संख्याही नव्हती कळली
  आरोपप्रत्यारोपांसाठी, दोन्हीकडे अनेकांची जीभ वळवळली

कोणीतरी तिकडे बोलले, यामागे आहे इकडच्यांचाच हात
भावनांचा भडका उसळला मग, दोन्ही बाजूंच्या डोक्यांत
  
आमची संस्कृती, त्यांची संस्कृती, झाला उहापोह मग सुरु
 आपली संस्कृती एकच आहे, इतिहास देईल कसे विसरू ?

  कळ लावून, रेषा आखून, सोडून गेले ते आपसांत भांडायला
    नुकसान दोघांचेही  होतय, हे नको का आम्हाला कळायला? 

हजारो वर्षांची सभ्यता आपली, सिंधू नदीच्या कुशीतली
कुणी रेषा ओढल्याने, अचानक होईल अशीकशी वेगळी?

    प्रतिशोधाची ठिणगी टाकणारे, अनेक आहेत रेषेच्या आरपार
     ती रेषा मिटवून टाकूया का आपण, विचार करून सारासार?   


डॉ. स्वाती बापट 
swateebapat@gmail.com 
९४२२०३५८७५सोमवार, ५ जानेवारी, २०१५

प्राजक्त

आज सकाळी WhatsApp वर प्राजक्ताच्या फुलांचे एक सुंदर चित्र मैत्रिणीने पाठवल्यामुळे मन प्रसन्न झाले आणि माझ्या मनांत अगदी नाजूक अशा काही आठवणी उचंबळून आल्या. लहानपणी आमच्या वाड्याच्या परसदारात प्राजक्ताचे झाड होते. देवाच्या पूजेसाठी परडीमध्ये फुले गोळा करून आणायला आमची आजी आम्हा मुलांना सांगायची. त्या वेळीही देवपूजेवर माझा खास विश्वास होता असे नाही, पण प्राजक्ताची फुले गोळा करायला मात्र  आवडायचे. केशरामध्ये थोडेसे दूध घालून कालवल्यानंतर येतो तशा केशरी रंगाचा दांडा आणि केशर घातलेल्या दुधासारख्या किंचितशा पिवळट पांढऱ्या नाजूक पाकळ्या. ते दोन्ही रंग आजही माझ्या मनांत फक्त पवित्र, शुद्ध भाव निर्माण करतात. आमच्या प्राजक्ताच्या झाडाखाली सदैव फुलांचा सडा पडलेला असायचा. एकावेळी आम्ही पाच-सहा भावंडे फुले गोळा करत असलो, तरीही सगळी फुले आम्ही उचलू शकायचो नाही. फुले गोळा करत असताना, काही फुले झाडावरून हलक्या हलक्या गिरक्या घेत माझ्या अंगावर  पडायची आणि त्यांचा तो नाजूक स्पर्श मला रोमांचित करायचा! एकूणच त्या फुलांचा रंग, मंद सुगंध आणि मऊ मुलायम स्पर्श मला फार आवडतो.

अलीकडेच, माझ्या रोजच्या जाण्या-येण्याच्या दोन रस्त्यांवर, अवचितपणे मला प्राजक्ताची झाडे दिसली. रोज सकाळच्या फिरायला जायच्या रस्त्यावर कौन्सिल हॉल पोलिस चौकी आहे. त्या चौकीच्या कोपऱ्यावर, एक दिवस अचानक पुन्हा तोच नाजूक स्पर्श मला जाणवला. वर बघितले तर प्राजक्ताचे झाड आणि खाली फुलांचा सडा. मला ते इतके अनपेक्षित होते की काही विचारू नका. तशीच दुसरी एक जागा म्हणजे माझ्या क्लिनिकच्या जाण्या येण्याच्या रस्त्यावरची. उंच्यापुऱ्या आणि रांगड्या सरदारजींची वस्ती असलेल्या सायकल सोसायटीच्या गेटजवळून चालत असताना अचानकपणे प्राजक्ताच्या फुलांचा मंद सुगंध आला. मी वर बघितले तर तिथेही चक्क प्राजक्ताचे झाड!

नाजूक प्राजक्ताचे झाड, आणि तेही पोलिस चौकी आणि सरदारजींच्या वस्तीच्या कोपऱ्यावर? या विरोधाभासामुळे विचित्र वाटणारी ही गोष्ट जरा बारकाईने विचार केल्यावर मला वेगळीच वाटायला लागली. वरून कठोर वाटणाऱ्या पोलिसांच्या आणि रांगड्या सरदारजींच्या मनाच्या एखाद्या कोपऱ्यात कुठेतरी प्राजक्ताची फुले फुलत असतीलच की!