Thursday, 17 March 2022

उधळण रंगांची...

या वर्षीच्या होळीच्या सुमारास 'काश्मीर फाईल्स' हा सिनेमा प्रदर्शित झाल्यामुळे, समाजमाध्यमांमध्ये अनेक रंगांची उधळण चालू आहे. 

१९८० च्या दशकात काश्मीर खोऱ्यात वास्तव्यास असलेल्या हिंदूंच्या अमानुष नरसंहाराचे विदारक चित्रण 'काश्मीर फाईल्स' सिनेमामध्ये केले आहे. दाखवलेल्या सगळ्या घटना सत्य आहेत. पण त्या एकाच कुटुंबातील व्यक्तींवर आणि एका ठराविक काळात घडल्या आहेत असे नाही. पूर्ण सिनेमा व त्यातील प्रसंग 'रक्तरंजित' आहेत. त्या घटनांचा आणि त्या दृश्यांच्या लाल रंगाने आपल्या मनांत काळे ढग निर्माण झाल्याशिवाय राहत नाहीत. 

आपण हा सिनेमा बघायचा नाही, असा निश्चय काहीं लोकांनी केलेला आहे. काहींनी त्यापुढे जाऊन, तो इतरांनीही सिनेमागृहात जाऊन पाहू नये यासाठी प्रयत्न केलेले आहेत. पण अनेक जण स्वतः सिनेमा बघत तर आहेतच पण इतरांनाही सिनेमा पाहण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत. सिनेमा पाहून आलेल्या लोकांच्या मनांमध्ये मात्र, जातीधर्मातील तेढीच्या अनेक छटा दिसत आहेत.

कश्मीर खोऱ्यात अनेक वर्षांपासून काश्मीरी हिंदूंचा छळ, त्यांचे धर्मांतर आणि स्त्रियांची अब्रू लुटणे हा प्रकार चालत होता. पण या कारवायांना १९८० च्या दशकात ऊत आला. त्या काळात अल्पसंख्याक, निःशस्त्र काश्मिरी हिंदूंना कमलीची दहशत बसवून  त्यांचे हत्याकांड केले गेले. हे सत्य या सिनेमात दाखवले गेले आहे. 

पण, "असा काही नरसंहार घडला हेच मुळी खोटे आहे", असे सांगणारे काहीजण आहेत. अशा लोकांमध्ये मुख्यत्वे, धर्मनिरपेक्षतेचा मुखवटा धारण करणाऱ्या, डाव्या विचारसरणीच्या लोकांचा भरणा आहे. देशाचे तुकडे करण्याची घोषणाबाजी करणाऱ्या 'आझादी गँग'चा मुखवटा या सिनेमाने फाडून काढला आहे. त्यामुळे, मुखवट्यामागचे त्यांचे  रंग उडालेले चेहरे समोर आलेले आहेत. इतर सगळ्या धर्मांतील लोकांच्या छळाचे भांडवल करून गळे काढणाऱ्या या 'धर्मनिरपेक्ष' लोकांना, हिंदूंचा झालेला छळ अमान्य करणे सोयीचे वाटते आहे. 

बहुसंख्याकांकडून अल्पसंख्याकांचे शोषण किंवा हत्या होणे हे निंदनीयच आहे. अर्थात, काश्मीरमध्ये अल्पसंख्याक पंडितांवर झालेले अत्याचार निंदनीय असलेच पाहिजेत. पण एकंदरीत काश्मीरबाबतच्या तोकड्या ज्ञानामुळे, एक मोठाच गैरसमज भारतीय समाजात पसरलेला आहे. 

काश्मिरी पंडित म्हणजे केवळ ब्राह्मणसमुदाय आहे असे अनेकजण समजतात. प्रत्यक्षात, काश्मिरी हिंदूंमध्ये अधिकांश लोक जरी ब्राह्मण असले तरी, 'कारकून', 'वाणी' अशा इतर जातींचे लोकही आहेत. त्यांच्यावरही अत्याचार झालेच आहेत आणि त्यांनाही जिवाच्या भीतीने काश्मीर सोडून पळावेच लागले आहे. प्रत्यक्षात, 'पंडित' हा शब्द काश्मीरमध्ये 'हिंदू' या शब्दाचा समानार्थी शब्दच म्हणावा लागेल. दहशतवादामुळे हिंदूंना जसे काश्मीर खोरे सोडावे लागले तसेच अनेक शीख कुटुंबियांनाही सोडावे लागले हेही आपल्याला लक्षात घेतले पाहिजे.   

पण हे सत्य समजून न घेता, सिनेमात दाखवलेल्या सत्य घटनांना काही लोक जातीय रंग देत आहेत. "या चित्रपटात ब्राह्मणांवरील अत्याचारांचे विनाकारण उदात्तीकरण केले आहे", अशी मुक्ताफळे उधळणारेही काही आहेत. त्याही पुढे जाऊन, "ब्राह्मणांची जातच भेकड. आम्ही असतो तर शर्थीने लढलो असतो आणि शेजारचा देशही काबीज केला असता" अशा फुशारक्या मारणारेही अनेक आहेत. हे दोन्ही प्रकारचे लोक, त्यांच्या मनातल्या काळ्या रंगाच्या छटांचे दर्शन घडवत आहेत. 

काश्मिर खोऱ्यामध्ये काही शतकांपूर्वी, दहशतीच्या जोरावर मुस्लिमांनी हिंदूंचे धर्मांतर केले. धर्मांतर न करणाऱ्या हिंदूच्या हत्या केल्या. अशा प्रकारे हिंदूंना जीवाची भीती घालून भगव्या रंगाचे उच्चाटण करण्यात आले. तसाच प्रकार १९८८ सालापासून पुढे घडू लागला. त्या काळातले सत्य 'काश्मीर फाईल्स' हा सिनेमा आपल्यापुढे अत्यंत प्रभावीपणे मांडतो. त्यामुळे न्याय्यनिष्ठ आणि संवेदनशील वृत्तीच्या प्रत्येक व्यक्तीला मनापासून वाईट वाटते. 

परंतु, ते सत्य पाहिल्यावर भडकून जाऊन, "संपूर्ण देशातून हिरव्या रंगाचे पूर्णपणे उच्चाटण केले पाहिजे", अशी दुसऱ्या टोकाची भूमिका घेणारे महाभागदेखील आहेत. ही भूमिका देशहिताच्या दृष्टीने वाईट आहेच पण ती तर्कसंगतही नाही. कारण, आपल्या धर्मनिरपेक्ष देशात रक्तपाताचा लाल रंग वगळता, इतर कुठल्याही एका रंगाचे उच्चाटण करणे, हे आपले ध्येय असूच शकत नाही.

आपल्या राष्ट्रध्वजातील सर्व रंगांना एकत्र ठेवणे, आणि आपल्या देशाच्या खऱ्या शत्रूंना ओळखून त्यांना नेस्तनाबूत करणे, हेच ध्येय आपण सर्वांनी मनात ठेवले पाहिजे. 

होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
Monday, 7 March 2022

मी तर घरीच असते!

अलीकडेच कुठल्याशा समारंभात एका मध्यमवयीन बाईंशी माझी कोणीतरी ओळख करून दिली. त्यांचा नवरा उच्च्पदस्थ अधिकारी होता. बोलताना सहजच  मी त्या बाईंना विचारले,
"तुम्ही काय करता?"
अगदी कसनुसं हसून त्या म्हणाल्या,
"तशी मी डबल ग्रॅज्युएट झालेली आहे. पण मी घरीच असते."

त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव आणि बोलण्याचा सूर, त्यांच्यातला न्यूनगंड दर्शवत होते. त्या बाईंशी बोलत असतानाच मला सौ. सिन्हा आठवल्या. 

पंधरा-सोळा वर्षांपूर्वी आनंदचे पोस्टिंग दिल्लीला होते. मुलांना घेऊन मी पुण्यातच राहत होते. असिलताने, आमच्या मुलीने, नुकतेच भारताच्या ऍस्ट्रॉनॉमी ऑलिम्पियाड संघात स्थान मिळवून, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. गणित ऑलिम्पियाडच्या राष्ट्रीय शिबिरातही तिची निवड झालेली होती. ही सर्व माहिती आनंदबरोबर काम करणाऱ्या एका बिहारी सेनाधिकाऱ्याला समजली. त्याच्या ओळखीतल्या, श्री. सिन्हा या सनदी अधिकाऱ्याचा मुलगादेखील त्याच स्पर्धांसाठी तयारी करत होता. असिलताची यशोगाथा त्या सेनाधिकाऱ्याने सिन्हा कुटुंबियांना सांगितली असणार.

थोड्याच दिवसात मला सौ. सिन्हा यांचा दिल्लीहून फोन आला. "तुमच्या मुलीने या परीक्षांची तयारी कशी केली? कोणकोणती पुस्तके वापरली?" त्या फोनवर मला प्रश्न विचारू लागल्या. माझी उत्तरे त्या लिहून घेत होत्या. 

चार दिवसांनी परत सौ. सिन्हांचा मला फोन आला. त्या स्पर्धापरीक्षांची काही पुस्तके दिल्लीमध्ये उपलब्ध नसल्याने, ती पुण्यात विकत घेऊन, मी  त्यांना पार्सल करावीत अशी विनंती त्यांनी मला केली.  

मुलांना सुट्टी लागत असल्याने दोनच दिवसांनी, मी आणि मुले दिल्लीला जाणार होतो. त्यामुळे, पुस्तके सोबतच घेऊन येईन असे मी त्यांना सांगितले.
 
दिल्लीला पोहोचल्यानंतर मी सौ. सिन्हांना फोन केला. 
 
"स्वातीजी, क्या आप किताबें भिजवा सकती हैं? या फिर आप स्वयं लेकर हमारे घर आईए ना। उसी बहाने मिलना भी हो जाएगा। असलमें, मेरे घरमें कई बच्चे पढ रहें हैं, नहीं तो मैं स्वयं किताबे लेने आ जाती।" 
बाईंनी अत्यंत मृदू स्वरात मला सांगितले. 

"ही 'कई' बच्चेकंपनी कुठून आली?" हा प्रश्न मला पडला पण सौ. सिन्हांच्या मुलाचे मित्र त्याच्याबरोबर अभ्यास करत असतील असा विचार मी केला. ठरलेल्या वेळी मी त्यांच्या घरी गेले. दिल्लीतल्या रामकृष्णपुरम या भागात, सरकारी अधिकाऱ्यांच्या वसाहतीत त्यांचा खूप मोठ्ठा चार बेडरूमचा फ्लॅट होता. प्रशस्त दिवाणखान्याची अगदी साधी सजावट होती. चारही बेडरूम्सची दारे बंद होती. 

सिन्हा बाईंनी हसतमुखाने  माझे स्वागत केले. चहापानाबरोबर आमच्या गप्पा सुरु झाल्या. बोलण्या-बोलण्यात त्यांनी मला  सांगितले,
"मैं घरमेंही रहती हूँ। सब बच्चोंकी पढाई, खाना-पीना, किताबें, नोट्स सब मुझे देखना पड़ता है। कुछ बच्चों को मैं गणित सिखाती भी हूँ।"

उत्सुकतेपोटी, शेवटी मी त्यांना त्यांच्या "बच्चेकंपनीबद्दल" विचारलेच. 

"हमारा इकलौता बेटा है, जो हमारी बेडरूम में पढ रहा है। बाकी तीनों बेडरूम में दूसरे बच्चे पढ रहें हैं।"

सौ. सिन्हांनी मला पुढे सांगितले की, एका बेडरूममध्ये यूपीएस्सीची तयारी करणारे तीन तरुण, दुसऱ्या बेडरूममध्ये मेडिकलची तयारी करणारी दोन मुले, तर तिसऱ्या बेडरूममध्ये आय.आय.एम. च्या प्रवेशपरीक्षेची तयारी करणारी काही मुले होती.

"हा प्रकार तरी काय असेल?"  मी बुचकळ्यात पडले होते. 

माझा प्रश्नार्थक चेहरा पाहून सिन्हा बाईंनीच खुलासा केला. 

श्री. सिन्हा बिहारमधील अगदी गरीब कुटुंबात जन्मलेले, पण जात्याच हुशार होते. नोकरी करत-करत ते पदवीधर झाले आणि नंतर दिल्लीला आले. दहा-बारा बिहारी मुलांबरोबर ते एका खोलीत राहिले. अर्धवेळ नोकरी करून, स्वहस्ते जेवण शिजवून खात, कष्टाने अभ्यास करून श्री. सिन्हा पहिल्याच प्रयत्नात  यूपीएससी परीक्षा अव्वल दर्जाने उत्तीर्ण झाले आणि सनदी अधिकारी म्हणून दिल्लीतच रुजू झाले. 

सिन्हा पती-पत्नींनी लग्नानंतर, त्यांच्या नात्या-गोत्यातल्या, ओळखीपाळखीच्या अनेक हुशार मुलांना दिल्लीत आपल्या सरकारी निवासात ठेऊन घेतले. त्यांच्या घरीच राहून, अभ्यास करून अनेक मुले सनदी अधिकारी झाली, कित्येक मुले आयआयटी, आयआयएम मध्ये दाखल झाली.  

सिन्हा साहेब बढती मिळवत, उच्च पदांवर चढत गेले तरी सिन्हा पती-पत्नींनी त्यांचा शिरस्ता तसाच चालू ठेवला. पुढे-पुढे तर बिहारच्या खेड्यातील, अनेक अनोळखी होतकरू, हुशार विद्यार्थ्यांना हुडकून आणून त्यांनी आपल्या घरी ठेऊन शिकवले. 

मी अवाक झाले. आणि मग मला जाणवले, सिन्हा बाईंच्या, "मैं घरमेंही रहती हूँ।" या वाक्यामध्ये कमीपणाचा कुठेही लवलेश नव्हता, उलट खूप अभिमान होता. 

"मी घरीच असते" असे सांगताना स्त्रियांच्या बोलण्यातला कमीपणाचा भाव मला नेहमीच खटकतो. आपल्या आधीच्या पिढ्यांमधल्या बहुतांश बायका घरीच असायच्या.   

माझी आई सतत स्वयंपाकघरात आणि आल्या-गेल्यांचे आगत-स्वागत करण्यात व्यग्र असायची. माझ्या सासूबाई शिवणकाम, विणकाम, वाचन याबरोबरच घरात मुलांची शिकवणीही घ्यायच्या. माझी मोठी काकू तिच्या मोलकरणीच्या मुलांना इंग्रजी बोलायला शिकवायची. तसेच, माझ्या आत्या, मावशा आणि इतरही कितीतरी बायका घरीच असायच्या. सुस्थितीत असलेल्या या सगळ्या बायका, मुलांचे संगोपन, स्वयंपाक, घरची टापटीप अशा कितीतरी गोष्टी करायच्या. अनेक बायका, गृहउद्योग करून आपापल्या संसाराला हातभार लावताना आपण  बघतोच. "मी तर घरीच असते!" हे कमीपणाने सांगणाऱ्या स्त्रियांना मला नेहमीच सिन्हा बाईंचे उदाहरण सांगावेसे वाटते. तसेच हेच वाक्य, मोठ्या अभिमानाने उच्चारता येईल, असे काहीतरी  करा असे त्यांना सुचवावेसे वाटते.

वर्षातला एखादाच दिवस 'महिला दिन' म्हणून साजरा करण्याऐवजी, एकही महिला कधीही 'दीन' कशी होणार नाही, याचा विचार करणे मला अधिक महत्वाचे वाटते.    
 
 


Thursday, 3 March 2022

रताळ्यांना कचऱ्यातच काढले पाहिजे!

या लेखाचे शीर्षक वाचून तुम्हाला जरा आश्चर्यच वाटले असेल. गावाकडच्या मराठी भाषेमध्ये 'रताळ्या' हा एक तुच्छतादर्शक शब्द आहे. साधारणपणे एखाद्या रेम्याडोक्याच्या व्यक्तीसाठी हा शब्द वापरला जातो. खेडयापाडयात, एखाद्या पुरुषाने तरुणींची छेडछाड केली तर, चिडून जाऊन, त्या पुरुषाला कधीकधी 'का रे, ए रताळ्या, तुला काही आई बहिणी नाहीत का?' असे मुली दटावतात. 

त्याचप्रमाणे, एखाद्याला कचऱ्यात काढणे, म्हणजे कस्पटासमान समजणे, या वाक्प्रचाराचा अर्थही अपमानास्पद असाच आहे.  

व्हॅट्सऍप आणि फेसबुकवर बागकामविषयक चर्चा व मार्गदर्शन करणाऱ्या काही ग्रुप्सची मी सदस्य आहे. "गच्चीवरील मातीविरहित बाग संस्था" हा फेसबुक ग्रुप मला आवडतो. या ग्रुपवरील सदस्यांच्या पोस्ट आणि त्यावर चाललेली चर्चा वाचून, मला बागकामाविषयी खूप चांगली माहिती मिळते.  

माझ्या गच्चीवरच्या बागेत, थर्माकोलच्या एका डब्यात लावलेली रताळी शिवरात्रीच्या निमित्ताने मी काढली. त्या रताळ्यांचे वजन सुमारे दीड किलो भरले. वजनकाट्यावर ठेवलेल्या त्या रताळ्यांचा फोटो मी काढला, आणि "आज एका थर्माकोलच्या डब्यातली रताळी काढली! मातीविरहित बागेतून आलेले पीक!" अशा शीर्षकाखाली तो फोटो,  "गच्चीवरील मातीविरहित बाग संस्था" या ग्रुपमध्ये टाकला. त्यावर अनेकजणांनी कौतुक केले व  मातीशिवाय रताळी कशी उगवली? असा प्रश्न मला विचारला. उत्तरादाखल मी खुलासा केला होता.   

 


लोकांनी फेकून दिलेल्या थर्माकोलच्या, पत्र्याच्या, व प्लॅस्टिकच्या डब्यांमधे रोपे लावून, आमच्या इमारतीवरच्या गच्चीमध्ये मी माझी बाग उभी केली आहे. तिथेच, प्लॅस्टिकच्या मोठमोठ्या कचराकुंड्या आणि थर्माकोलच्या डब्यांमध्ये मी कंपोस्ट तयार करते. त्या डब्यांमधे आणि कचराकुंड्यांमध्ये मी गांडुळे सोडलेली आहेत. त्यामुळे गांडूळखत व कंपोस्ट एकत्रच तयार होत असते. ते चाळल्यावर खाली जी खतमिश्रित माती मिळते त्यातच मी भाजी-पाला लावते. चाळणीत उरलेला चाळ एका मोठ्या थर्माकोलच्या डब्यात मी साठवते. 

साधारण दीड वर्षांपूर्वी, माझ्या आतोबांनी, त्यांच्या बागेतल्या रताळ्याच्या वेलाचा एक लांबलचक तुकडा मला दिला. ते रोप लावण्यासाठी एकही रिकामा डबा त्यावेळी माझ्याकडे नसल्यामुळे, वेलाचा तो तुकडा मी पाण्यात घालून ठेवला होता. काही दिवसातच त्याला पुष्कळशी मुळे फुटली. अखेर, त्या वेलाचे एक-दोन लहान तुकडे कापले आणि खताचा चाळ साठवलेल्या डब्यात खुपसून ठेवले. 

गंमत म्हणजे, ती रोपे तिथे रुजली. त्यानंतरही मी त्या डब्यात चाळ व पाणी घालतच राहिले. मागच्या वर्षी दोनवेळा रताळ्याचा वेल उपसून, त्याखाली लागलेली रताळी मी काढली होती. पण, गेल्या सात-आठ महिन्यांत मात्र मी रताळी काढली नव्हती. 

यावेळी आलेली ती सणसणीत रताळी बघून मला आनंद झालाच, पण  इतरांनीही कौतुक केल्यामुळे तो द्विगुणित झाला. रताळ्याचा वेल लावलेल्या डब्यात चाळ, म्हणजेच झाड-पाल्याचे मोठे-मोठे तुकडे, असल्यामुळे त्या डब्यात हवा खेळती राहिली होती . तसेच, गांडुळांच्या अविरत कार्यामुळे तेथे गांडूळखतही तयार होत राहिले होते. त्यामुळेच त्या रोपाला भरपूर पोषण मिळून जोरदार पीक आले असावे, असा निष्कर्ष  मी काढला .  

आतोबांकडून आणलेल्या त्या वेलाचे एक-दोन लहान तुकडे, शिरीष गोडबोले या माझ्या सोलापूरस्थित भावालाही दिले होते. महाशिवरात्रीच्या दिवशी, शिरीषने त्याच्याकडे उगवलेल्या रताळ्यांचा एक फोटो मला पाठवला. रताळ्यांचे आकारमान लक्षात यावे म्हणून त्याने त्या रताळ्यांच्या शेजारी एक बॉलपेन ठेवले होते. "डाव्या बाजूचे कचऱ्यातले, आणि उजव्या बाजूचे मातीतले" अशी तुलनात्मक टिप्पणी फोटोखाली त्याने लिहिली होती. कचऱ्यात उगवलेले ते धष्टपुष्ट रताळे बघून मी पटकन म्हणून गेले, "रताळ्यांना कचऱ्यातच काढले पाहिजे!"

एखादे पीक काढणे म्हणजेच एखादे पीक घेणे, असा एक अर्थ अभिप्रेत असतो. पण, "रताळ्या", आणि "कचऱ्यात काढणे" यांचा बोली भाषेतला अर्थ, आणि "रताळ्यांना कचऱ्यातच काढले पाहिजे!" या वाक्यामधे मला प्रत्यक्षात अभिप्रेत असलेला अर्थ, यांच्यामधला विरोधाभास लक्षात आल्याने मला खूपच मजा वाटली.

अचानकच झालेल्या या शाब्दिक कोटीमुळे, मायमराठीबद्दल अभिमानही माझ्या मनात दाटून आला. 

मराठी भाषेचे गुणगान 'मराठी राजभाषा दिनी'च झाले पाहिजे, असे काही नाही! हो ना ?  

Monday, 21 February 2022

'आया' आणि 'गया'

काल दि. २० फेब्रुवारी २०२२ च्या टाइम्स ऑफ इंडियामध्ये छापून आलेल्या एका बातमीने माझे लक्ष वेधून घेतले. पूर्व लंडनमधील, हॅकने या भागात, २६ किंग एडवर्ड रस्त्यावर असलेल्या 'The Ayah's Home' या इमारतीला 'Blue Plaque' मिळाल्याचे ते वृत्त होते. 

काही महत्त्वाच्या व्यक्तींचे भूतकाळात वास्तव्य असलेल्या इमारतींवरअशी 'Blue Plaque' किंवा निळ्या रंगाचा स्मृतिफलक लावण्याची पद्धत भारतातही आहे. पण, या 'The Ayah's Home' नावाच्या इमारतीला 'Blue Plaque' का मिळाली असावी? अशा कोण विशेष व्यक्ती त्या इमारतीमध्ये भूतकाळात वास्तव्यास होत्या? त्याबद्दल आणखी माहिती वाचल्यावर मला आश्चर्याचा धक्काच बसला. 

'गोरे साहेब' आणि त्यांच्या मड्डमांनी भारतात कमालीचे ऐषोआरामाचे आयुष्य व्यतीत केले. इंग्लंडमधल्या नोकरांच्या पगाराच्या एक अष्टमांश पगारात भारतीय नोकर मिळत असल्याने, एकेका गोऱ्या कुटुंबाच्या दिमतीला, भारतीय नोकर आणि मोलकरणींचा मोठा ताफाच असायचा. हे ब्रिटिश साहेब-मेमसाहेब, उन्हाळ्याच्या सुट्टीत, किंवा सेवानिवृत्त झाल्यावर, इंग्लंडला परतताना भारतीय मोलकरणी म्हणजेच 'आया' आपल्याबरोबर इंग्लंडला नेत असत. तिथे गेल्यावर, काही कारणाने त्यांची सेवा नको असल्यास, ते दुसऱ्या एखाद्या गोऱ्या अधिकाऱ्याकडे त्यांना काम मिळवून देत, किंवा भारतात परत पाठवत असत. पण मोलकरणींना नीट न वागवणाऱ्या काही महाभागांनी त्या 'आयां'ना अगदी पगारही न देता, रस्त्यावर सोडून दिले होते. अशा अशिक्षित, निर्धन 'आयां'ना, अक्षरशः भीक मागून परतीच्या प्रवासासाठी पैसे जमा करावे लागत. कुठल्यातरी गलिच्छ वस्तीमध्ये, एकाच खोलीत अनेक 'आया' दाटीवाटीने राहून,  कसेबसे दिवस कंठत असत. 

इग्लंडमधील काही महिला सामाजिक कार्यकर्त्यांना, या 'आयां'च्या सामाजिक स्वाथ्याची समस्या लक्षात आली. अशा 'आयां'च्या आसऱ्यासाठी जागा मिळवण्याकरता काही संस्थांनी पुढाकार घेतला. प्रथम १८९१ साली, एलगेड  ईस्ट लंडन मधील, ६ ज्युरी स्ट्रीट वरच्या एका घराचा ताबा लंडन सिटी मिशनने घेतला व तिथे 'The Ayah's Home' चालू केले. सन १९०० साली, पूर्व लंडनमधील, हॅकने नावाच्या भागात, २६ किंग्ज एडवर्ड रोड वर, तीस खोल्यांच्या एका प्रशस्त वास्तूत 'The Ayah's Home' हलवले गेले. निष्कांचन अवस्थेत मालकांनी सोडून दिलेल्या, परतीच्या प्रवासाची वाट बघत थांबलेल्या, किंवा किंवा प्रकृती अस्वास्थ्यामुळे प्रवासच  करू शकत नसलेल्या, अशा अनेक भारतीय, चिनी, मलेशियन 'आयां'ना 'The Ayah's Home' ने आसरा दिला.
ज्या परकीय 'आयां'नी ब्रिटिशांची मुले-बाळे आत्मीयतेने सांभाळली त्यांच्या सेवेची सन्मानपूर्वक आठवण राहावी यासाठी, 'The Ayah's Home' ला 'Blue Plaque' प्रदान करण्यात आला. मला याचे खूप अप्रूप वाटले, आणि माझ्या वडिलांकडून अनेक वेळा ऐकलेल्या एका गोष्टीची प्रकर्षाने आठवण झाली.   

माझी पणजी, म्हणजे माझ्या वडिलांच्या वडिलांची आई,  कै. सौ. लक्ष्मीबाई नारायण गोडबोले, यांना वयाच्या चाळीशीतच, १९२७ साली,  अर्धांगवायूचा झटका आला. त्यानंतरची सतरा वर्षे, म्हणजे, १९४४ साली मृत्यू पावेपर्यंत  ती अंथरुणाला खिळलेली होती. तिच्या सेवेला गया नावाची एक मोलकरीण ठेवलेली होती. माझ्या पणजीचे मलमूत्राने खराब झालेले कपडे बदलणे, तिला अंघोळ घालणे, जेवण भरवणे अशी सगळी सेवा, गयाबाईने अत्यंत मायेने केली.

पणजीच्या निधनानंतरही, सुमारे १९५२ सालापर्यंत, गयाबाई माझ्या माहेरीच पगारी मोलकरीण म्हणून काम करीत राहिली. त्यानंतर मात्र तिला अंधत्व आल्यामुळे, आमचे काम सोडून ती आपल्या गावी, म्हणजे टेंभुर्णीला वास्तव्यास गेली. १९५८ सालापर्यंत, आमच्या कुटुंबियांना  भेटायला ती अधून-मधून येत असल्याचे वडील सांगतात.  

माझे पणजोबा, कै. नारायण रामचंद्र गोडबोले यांनी,  १९५३ साली आपले मृत्युपत्र केले. त्यांच्या पत्नीच्या अखेरच्या काळात गयाबाईने केलेल्या सेवेबाबत त्यांनी त्या मृत्युपत्रात कृतज्ञता व्यक्त केली होती.  तसेच, तिने केलेल्या सेवेच्या सन्मानार्थ, गयाबाईला दोनशे रुपये बक्षीस द्यावेत, अशी इच्छा त्यांनी लिहून ठेवली होती. 

पणजोबांच्या मृत्यूनंतर, माझ्या वडिलांच्या काकांनी, टेंभुर्णीला जाऊन, ती रक्कम गयाबाईंना देऊ केली. पुढील काळात, गयाबाईंच्या टेंभूर्णीच्या राहत्या जागेवर अतिक्रमण झाल्याचे समजताच, ते हटवण्यासाठी माझ्या वडिलांनी न्यायालयात दावा लढवून, गयाबाईला तिच्या जागेचा ताबा मिळवून दिला. 

आजदेखील सोलापूर-पुणे प्रवासात, टेंभुर्णी गाव जवळ आले की, गयाबाईची आठवण काढून तिचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख माझे वडील हमखास करतात. गयाबाईंने केलेल्या सेवेची आठवण माझ्या कुटुंबियांनी जागृत ठेवली याचा मला रास्त अभिमान वाटतो. 

Wednesday, 9 February 2022

प्रसन्न रूप चित्ती राहो...

लतादीदी आज या जगात राहिल्या नाहीत हे क्लेशदायक सत्य आपल्याला स्वीकारावे लागणार आहे. पण त्यांच्या स्वर्गीय आवाजाच्या रूपाने त्या अजरामर राहणार आहेत, हेही आपल्याला माहिती आहे.


लतादीदींच्या मृत्यूनंतर वर्तमानपत्रातून, आणि सोशल मीडियावर त्यांच्या  संगीत कारकिर्दीची समग्र माहिती देणारे, आठवणी जागवणारे, अनेक लेख, सुरेल गाण्यांच्या ध्वनिफिती आणि चित्रफिती आल्या. मी बरेचसे लेख समरसून वाचले, ध्वनिफिती आणि चित्रफिती कानात आणि डोळ्यांत प्राण आणून ऐकल्या. एकीकडे माझे मन हेलावत होते तर दुसरीकडे त्या स्वरसम्राज्ञीचे सूर ऐकून माझा ऊर अभिमानाने भरून येत होता.  

त्यानंतर गेल्या दोन दिवसांत, टेलिव्हिजनवर मी लतादीदींच्या अनेक मुलाखती आणि त्यांच्यावरचे काही  कार्यक्रम पाहिले. त्यांच्या मुलाखतीत त्यांनी स्वतः सांगितलेल्या अनेक गोष्टी माझ्या मनाला स्पर्श करून गेल्या. लतादीदींच्या वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचे वडील वारले. तरीही त्या अनाथ झाल्या असे त्यांना वाटले नाही, असे त्या सांगतात. स्वकर्तृत्वावर त्यांचा किती विश्वास होता हे त्यातून कळते. वयाची नव्वदी ओलांडल्यावरही त्यांची बुद्धी आणि स्मरणशक्ती तल्लख होती, आवाज सुरेल होता, आणि त्या नर्म हास्यविनोद करत बोलत असत, हे प्रकर्षाने जाणवते.  

काहीं लोकांनी मात्र अतिउत्साहाच्या भरांत लतादीदींच्या शेवटच्या दिवसातले, गलितगात्र अवस्थेतले, दोन-तीन व्हिडीओ व्हॉटसऍप आणि फेसबूकवर टाकले. ते व्हिडीओ मला बघवले तर नाहीतच, पण ज्या लोकांनी ते व्हिडीओ आवर्जून शेअर केले त्या लोकांबद्दल किंवा त्या मनोवृत्तीबद्दलचा  माझा संताप उसळून आला. 

एखादी महत्वाची व्यक्ती अजून जिवंत पण अत्यवस्थ असताना, "एक्सक्लुझिव्ह ब्रेकिंग न्यूज" देण्याच्या धडपडीत, आणि जणू काही एखादी आनंदाची बातमी सांगतोय अशा आवेशात, त्या व्यक्तीला मृत घोषित करणाऱ्या चॅनेल्सवाल्यांमध्येही तीच मनोवृत्ती मला दिसते. 

लतादीदी वयोवृद्ध होत्या आणि मृत्यूपूर्वी काही काळ त्या आजारी होत्या. साहजिकच, त्या अगदीच कृश आणि अशक्त झाल्या असणार. त्यांचे ते विकलांग रूप बघून कोणाला काय मिळणार? पण तरीही काहीजणांना ते बघावेसे आणि इतरांनाही आवर्जून दाखवावेसे का वाटले असेल? या प्रश्नांची उत्तरे मला सहजी मिळाली नाहीत, पण माझ्या दिवंगत आईबद्दलची एक क्लेशदायक आठवण माझ्या मनांत  जागृत झाली.  

माझी आई अतिशय कामसू होती. वयाची सत्तरी ओलांडल्यानंतरही, नव्वदी पार केलेल्या आपल्या सासूची, म्हणजे माझ्या आजीची सेवा-शुश्रुषा केली. आमच्या घरी खूप येणे जाणे असले तरी ते भले-मोठे घर स्वतः ऐंशी वर्षांची होईपर्यंत, हौसेने सांभाळले. तोपर्यंत तिने अनेक जणांना हरतऱ्हेची मदतही केली. त्यानंतर मात्र हळूहळू तिची तब्येत ढासळू लागली. वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी ती एकदा मृत्यूच्या दारी जाऊन परत आली. पण काही महिन्यातच, पुन्हा अत्यवस्थ होऊन शेवटी तिचा मृत्यू झाला. आईच्या त्या शेवटच्या काळात मला अशाच काही लोकांच्या अविचारी मनोवृत्तीचे दर्शन झाले. 

आईला जंतुसंसर्ग होऊ नये म्हणून, आम्हा कुटुंबीयांपैकी कुणा एकानेच तिच्यासोबत थांबावे असे डॉक्टरांनी निक्षून सांगितले होते. कदाचित ती काही दिवसांचीच सोबती होती, हे आम्हाला दिसत होते. म्हणूनच, कमीतकमी लोकांनी तिच्याजवळ जावे यासाठी आम्ही दक्ष  होतो. पण काही आप्तस्वकीय 'बघ्या' लोकांनी हॉस्पिटलमध्ये येऊन, "आम्हाला एकदातरी आत जाऊन त्यांना बघून येऊ दे ना", असा आग्रहच  धरला. रुग्णाच्या शुश्रुषेमध्ये आवश्यक असणारी मदत करायला मात्र असले 'बघे' लोक फारसे उत्सुक नसतात, हेही त्यावेळी जाणवले. नाकातोंडात नळ्या घातलेल्या अवस्थेत, मृत्युशय्येवर पडलेल्या, बेशुद्धावस्थेतील रुग्णाला बघण्यात त्यांना का रस असतो? हे मला अजूनही कळलेले नाही. आपण आजारी व्यक्तींच्या नातलगांच्या भावना दुखावत आहोत, याचीही जाणीव अशा लोकांना नसते. 

बालरोतज्ज्ञ म्हणून काम करतानाही मला असाच अनुभव येतो. नवजात अतिदक्षता विभागांत अत्यवस्थ झालेल्या बाळांना वाचवण्यासाठी आम्ही धडपडत असतो. कुठल्याही बाळाला जंतुसंसर्ग होऊ नये यासाठी आम्ही बरीच काळजी घेत असतो. अशावेळी बाळाचे काका, आत्या, मामा, मावश्या, किंवा इतर अनेक नातेवाईक अतिदक्षता  विभागाच्या बाहेर येत राहतात. "आम्हाला फक्त  एकदा बाळाला बघून येऊ दे, आम्ही एकेक करून बघून येतो " असा धोशा सतत आमच्या मागे लावतात. आम्ही कितीही शांतपणे समजावून सांगायचा प्रयत्न केला तरीही हे लोक हुज्जत घालतच बसतात. या लोकांमध्येही मला तोच अविचारीपणा दिसतो. 

रस्त्यावर अपघात होताच, रक्तबंबाळ झालेल्या अपघातग्रस्त व्यक्तींना मदत करण्याऐवजी त्यांचे फोटो किंवा व्हिडीओ काढत बसणारे महाभागही असतातच की! अनेक "बघे" आसपास असूनही,  वेळच्यावेळी  वैद्यकीय मदत न मिळाल्यामुळे अपघातग्रस्तांना प्राण गमवावा लागतो, असेही बऱ्याच वेळा घडते. अशा बातम्या वाचल्या किंवा ऐकल्या की, या अविचारी लोकांबद्दल माझ्या डोक्यात  तिडीक जाते. 

"ब्रेकिंग न्यूज" च्या स्पर्धेपोटी, एखाद्या व्यक्तीला अकालीच मृत घोषित करणाऱ्यांमधे, किंवा अत्यवस्थ व्यक्तीला "बघायला" आयसीयूमध्ये जाण्याची धडपड करणाऱ्यांमधे, किंवा लतादीदींसारख्या महान व्यक्तीचा विकलांग अवस्थेतील व्हिडीओ टाकणाऱ्यांमधे, जवळजवळ विकृतीकडे झुकणाऱ्या अविचाराचा एक समान दुवा मला दिसतो आणि माझे मन उद्विग्न होते. 

लहानपणीच कौटुंबिक जबाबदारी खंबीरपणे  पेलणाऱ्या, अत्यंत कसोशीने प्रयत्न करून आपल्या सुरांमध्ये आणि शब्दोच्चारांमध्ये अचूकपणा आणणाऱ्या, आपल्या असामान्य प्रतिभेच्या व मेहनतीच्या जोरावर सिनेसृष्टीत अढळपद मिळवणाऱ्या, महान समाजकार्य करणाऱ्या, असीम देशभक्ती उराशी जपणाऱ्या, त्या पहाडासारख्या कणखर आणि उत्तुंग व्यक्तिमत्वाचे प्रसन्न रूपच फक्त मनांत  साठवावे आणि डोळ्यांसमोर आणावे असे मला प्रकर्षाने वाटते. 

लतादीदींना भावपूर्ण श्रद्धांजली !


Sunday, 16 January 2022

असुनी गृहिणी, तू चक्रपाणि!

आजच्या इंडियन एक्स्प्रेस मध्ये पहिल्या पानावरच आलेली एक बातमी वाचून मनात विचारचक्र चालू झाले. 

पुण्यातील वीस-बावीस महिला, त्यांच्या मुला-बाळांना घेऊन, मोराची चिंचोळी गावाला सहलीसाठी गेल्या होत्या. चालत्या बसमध्ये, चालकाला अचानकच अस्वस्थ वाटू लागले, त्याला फिट आली आणि तो खाली कोसळला. त्याचे हातपाय वाकडे झाले होते आणि त्याच्या तोंडातून विचित्र आवाज निघत होता. अशावेळी त्या बसमध्ये प्रवास करणाऱ्या महिला व लहान मुले पार घाबरून गेली आणि प्रचंड आरडाओरडा व रडारडी चालू झाली. पण या महिलांमध्ये  योगिता सातव नावाची एक धीरोदात्त महिला होती. योगिताताईंनी मिनीबसच्या स्टियरिंगचा ताबा घेतला आणि त्यांनी ती बस चालवत, त्या चालकाला लवकरात लवकर शिक्रापूरच्या रुग्णालयात पोंहोचवले. योगिता सातव याना चारचाकी गाडी चालवता येत होती. पण ऐनवेळी मिनीबस चालवण्यास त्या घाबरल्या नाहीत आणि सर्व प्रवाशाना सुखरूप घरी आणले, हे विशेष. ही  बातमी वाचल्यानंतर मी यू-ट्यूबवरची योगिता सातव यांची मुलाखत ऐकली आणि कौतुकाने माझा ऊर भरून आला. प्रत्येक स्त्रीला दुचाकी व चारचाकी येणे किती आवश्यक आहे हे पुन्हा जाणवले. खरंतर मागच्याच महिन्यात महिला चालकांबाबत काहीतरी छानसा लेख लिहावा असा प्रसंग आला होता. पण  एखादा विचार कृतीत आणण्याबाबत आपण चालढकल करत राहतो. तसेच काहीसे माझे झाले. मागच्या महिन्यात आम्ही अमृतसरला जाणार होतो. त्यावेळी पुणे विमानतळावर जाण्यासाठी मी माझ्या मोबाईलमधून उबर टॅक्सी मागवली. चालक कुठे पोहोचला आहे हे फोनमध्ये मी बघत असताना मला समजले की त्या टॅक्सीची चालक एक महिला आहे. मी, आनंद आणि माझे वडील महिला चालक असलेल्या टॅक्सीमध्ये प्रथमच बसणार होतो. हा अनुभव कसा असेल? याचे मला कमालीचे कुतूहल वाटले होते. थोड्यच वेळात ती महिला, अगदी सफाईने टॅक्सी चालवत आमच्याजवळ पोहोचली. अर्थातच त्या बाईंशी गप्पा मारण्याचा मोह आवरला नाही. 

अगदीनम्रपणे आणि मृदू आवाजात बोलणाऱ्या, साधे पण स्वच्छ कपडे परिधान केलेल्या व चेहऱ्यावर अगदी सात्विक भाव असलेल्या त्या चाळिशीच्या महिला चालक बाईंचे नाव होते 'सौ. सुनीता काळे'. सुनीताला लहानपणापासूनच कार चालवायची इच्छा असल्याने, तिच्या तरुणपणातच, कदाचित माहेरीच ती कार चालवायला शिकली होती. मुले मोठी झाल्यावर नुसते घरी बसून काय करायचे? या विचाराने तिने आपली ती आवड अर्थार्जनासाठी वापरायचे असे ठरवले. मारुती सेलेरिओ ही गाडी तिने कर्ज काढून विकत घेतली. प्रथमतः काही दिवस तिने तिची टॅक्सी कंपन्यांच्या नोकरदारांसाठी चालवली. नंतर उबरने महिला चालक घ्यायला सुरु केल्यावर, ती उबरसाठी तिची टॅक्सी चालवू लागली.

सुनिताकडून काही गमतीदार किस्सेही ऐकायला मिळाले. स्त्री चालक आहे हे बघितल्यावर काही पुरुष प्रवासी कसे साशंक होतात, हे तिने सांगितले. काहीजण ट्रिपच रद्द करून टाकतात. एका पुरुष प्रवाशाने, टॅक्सीत बसल्यावर तिला, "'तुला येईल ना? का मी चालवू गाडी?" असेही विचारले होते, हे सुनीताने आम्हाला हसत-हसत सांगितले. 

सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुनीता उबरसाठी टॅक्सी चालवते. सकाळी दहाच्या आधी दोन-तीन महिलांना चारचाकी चालवायला शिकवते. 'आत्मनिर्भर' सुनीताने स्वकमाईतून टॅक्सीसाठी घेतलेले कर्ज तर फेडत आणले आहेच. शिवाय कर्जाचा हप्ता गेल्यानंतरही महिना चाळीस-पन्नास हजार शिलकी पडत आहेत. लॉकडाऊनच्या काळात या कमाईमुळे, त्यांच्या कुटुंबाला आर्थिक चणचण भासली नाही हे विशेष. सुनीताने तिच्या तरुण मुलीलाही गाडी शिकवली आहे. सुनीताचे पती चारचाकी चालवत नसल्याने,  कौटुंबिक सहलींसाठी कुठेही बाहेरगावी गेले तरी गाडी सुनीताच चालवते. सुनीता सोलापूर जिल्ह्याची माहेरवाशीण आहे हे कळल्यावर, मनाने अजूनही 'सोलापूरकरच' असलेल्या आम्हा तिघांनाही खूपचआनंद वाटला.  

अमृतसरहून पुण्याला परतताना आमचे विमान चालवणारी मुख्य वैमानिक एक महिला आहे हे कळल्यावर, मला महिलांच्या क्षमतेबद्दल कमालीचा अभिमान वाटला होता. अशावेळी काही पुरुष प्रवाशांना,' ही बाई कितपत सक्षम असेल? असे निश्चित वाटले असेल. पण ,"बाई तू उठ आणि तुझ्याऐवजी मी विमान उडवतो" असे सांगायला ते स्वतः सक्षम नसल्याने, संपूर्ण प्रवासात जीव मुठीत धरून बसले असतील अशी कल्पना करून मी मनोमन हसले होते. आज प्रवासी विमाने चालवणाऱ्या कितीतरी महिला वैमानिक आहेत. त्यांशिवाय अनेक महिला सशस्त्र सेनादलातली मालवाहू आणि लढाऊ विमानेही चालवत आहेत, हे विशेष.     

योगिता सातव यांना त्यांच्या वडिलांनी आणि काकांनी गाडी चालवायला शिकवली होती. त्यांच्या मुलाखतीत, त्यांनी आपल्या वडील आणि काकांच्या प्रति आभार व्यक्त केलेले ऐकून माझे मन पंचेचाळीस  वर्षे मागे गेले. १९८५-८६ साली मी विशीतली तरुणी होते. नुकतीच डॉक्टर झाले होते. त्यावेळी माझ्या वडिलांनी नवीनच बाजारात आलेली मारुती-८०० ही गाडी विकत घेतली होती. माझ्या हातात त्या नव्या कोऱ्या गाडीचे चक्र देऊन मला त्यांनी ती गाडी शिकवली. पण जवळजवळ पाठोपाठच माझे लग्न झाले. पुढे मला दोन मुले झाली, मुले लहान असतानाच मी माझे एम डी पूर्ण केले. याकाळात आमच्याकडे फक्त एक दुचाकी होती. त्यामुळे गाडी शिकले असले तरीही मला गाडी चालवायचा सराव करायला मिळाला नव्हता.  

पुढे १९९३ साली आम्ही नवीकोरी मारुती व्हॅन विकत घेतली. प्रत्यक्षांत ती व्हॅन घरी आली तेव्हा पेढे घेऊन मी शेजारणीकडे गेले. तिने मला विचारले,

"तुला चारचाकी चालवायला येते का गं ?"

"हो. येते ना. मला वडिलांनी गाडी शिकवलेली आहे. पण गेल्या चार-पाच वर्षांत सराव राहिलेला नाही. आता आमची  नवीन मारुती व्हॅन आली आहे ती चालवेन" असे  उत्साहाने मी तिला सांगितले. 

तिने मला हलक्या आवाजात, एक 'मौलिक' सल्ला दिला, "हे बघ, शहाणी असशील तर गाडी चालवायला लागू नकोस. ही नवरेमंडळी फार चतुर असतात. एकदा का तू गाडी चालवते आहेस हे तुझ्या नवऱ्याला कळले की सगळी बाहेरची कामे तो तुझ्यावर टाकायला सुरु करेल. घरकाम तर आपल्या पाचवीला पुजलेले आहे. ते काही कधी सुटणार नाही. वर बाहेरची सगळी कामेही तुझ्याच गळ्यात पडतील. "

त्यावेळी तिचा तो विचार मला पटला नाही आणि आजही पटत नाही. गेली कित्येक वर्षे मी गाडी चालवते आहे. १९९५ साली पुण्यात राहायला आल्यानंतर माझे सगळे आयुष्यच गाडीच्या चाकावर चालत असल्यासारखे मला वाटते आहे. पण मला चारचाकी चालवायला येत असल्यामुळे, कित्येकदा मी अनेक अत्यवस्थ नवजात बालकांना, त्यांच्या पालकांसह माझ्या गाडीत घालून वेळच्यावेळी नवजात अतिदक्षता विभागात पोहोचवून त्यांचे प्राण वाचवलेले आहेत. मला आणि आनंदला कोविड झाला होता. मी आजारी असतानासुद्धा आनंदला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याचे आणि त्याला डिस्चार्ज  मिळाल्यावर त्याला घरी घेऊन येण्याचे काम मी केले, या गोष्टीचा मला अभिमान आहे. प्रत्येक स्त्रीला दुचाकी आणि चारचाकी यायलाच हवी असे माझे मत आहे. 

योगिता सातव यांच्या समयसूचकतेसाठी आणि त्यांनी दाखवलेल्या धैर्यासाठी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. सुनीता काळे आणि तिच्यासारख्या अनेक 'चक्रधर' महिला चालकांनाही माझा सलाम!        

एकदा मी अमेरिकेला गेलेले असताना मला अशाच एका महिला चालकाचा आलेला अनुभव मी पुन्हा कधीतरी सांगेन...