काल माझ्या ध्यानीमनी काही नसताना अचानकच आनंद म्हणाला,
"आज 'ध्यानीमनी' बघायला जायचे का? व्हिक्टरीला सव्वाआठचा शो आहे "
वॅलेंटाईन डे जवळ आल्याचे सोशल मीडियातून नवऱ्याला कळल्यामुळे त्याने हे विचारले असावे असा गोड समज करून घेऊन मी चटकन हो म्हणून टाकलं. "तिकिटे मिळणार का? किती रुपयाचे तिकीटआहे?" असले व्यवहारी प्रश्न न विचारता मी लगेच तयार झाल्यामुळे त्यालाही आश्चर्य वाटलं असावं!
गडबडीने जेवण उरकून, आठ वाजून दहा मिनिटांपर्यंत आम्ही तिकिटाच्या खिडकीवर पोहोचलोसुद्धा. बाल्कनीची तिकिटे मिळणार नाहीत हे कळल्यामुळे खालची दोन तिकिटे काढली. मनातल्या मनातच, "दोन तिकिटाचे मिळून चाळीस रुपये वाचणार आहेत" या 'मध्यमवर्गीय' विचाराचे मलम त्या दुःखावर लावून मी पिक्चर बघायला सज्ज झाले. थिएटरवर सगळाच शुकशुकाट होता. पिक्चर सुरु झाला की काय या कल्पनेमुळे मी धास्तावले आणि गडबडीने थिएटरच्या दरवाज्यापाशी गेले. बराच वेळ झाला तरी कोणी आत सोडायचे नांवच घेईना. विचारणा केल्यावर कळलं की बाल्कनीची दुरुस्ती चालू असल्यामुळे तिथली तिकिटे विकलेलीच नाहीत. आणि आमची दोन तिकिटे धरून एकूण तीनच तिकिटांची विक्री झाली आहे!
पंधरा-वीस मिनिटे वाट बघितली. पण कोणीही प्रेक्षक न फिरकल्यामुळे तो शो रद्दच झाला. आम्ही तिकिटाचे पैसे घेऊन घरी परत असताना माझ्या ध्यानीमनी नसताना मन हलकेच भूतकाळात, म्हणजे माझ्या लग्नाआधीच्या काळातल्या सोलापूरात गेले.
मला सिनेमाचे वेड आहे, किंवा व्यसनच म्हणा ना! आणि या व्यसनाचे मूळ लहानपणी आमच्या घरी असलेल्या शिस्तीत आहे. आमचं एकत्र कुटुंब आमच्या आजीच्या अधिपत्याखाली चालायचे. ज्या काळांत आमच्या बरोबरच्या काही मुलामुलींनी राजेशखन्ना, अमिताभच्या पिक्चरची , 'फर्स्ट डे फर्स्ट शो'ची नशा अनुभवलेली होती, त्या काळांत आम्हा सहा-सात भावंडांना मात्र कधीतरी वर्ष-सहा महिन्यातून 'रामजोशी' किंवा 'आम्ही जातो आमुच्या गांवा' असले सोवळे सिनेमे दाखवले जायचे. एखादा सिनेमा 'गेवा कलर' आहे, 'फुजिकलर' आहे, 'टेक्निकलर' आहे का 'इस्टमनकलर' आहे, असल्या तांत्रिक बाबी, किंवा कुणा हिरो-हिरोईनला सायनिंग अमाऊंट किती मिळाली, असल्या आर्थिक बाबींची माहिती आमच्या बरोबरच्या दर्दी मुलामुलींना असायची. 'बिनाका गीतमाला' मध्ये त्या-त्या आठवड्याला कोणते गाणे नंबर एकवर येऊन 'सरताज गीत' होणार, यांवर त्यांच्या पैजा लागायच्या. त्या काळात सिनेमा बघणं, त्यातली गाणी ऐकणं आणि म्हणणं, अगदी गुणगुणणं सुद्धा, आमच्या घरातल्या शिस्तीत बसत नसल्यामुळे, आम्ही मात्र अगदीच अज्ञानी होतो. पण घरातल्या त्या विरोधामुळेच सिनेमा माझ्या मनाला जास्तच खुणावत राहिला. दहावीत असताना, आमच्या वर्गातल्या दीपाली आणि इतर दोघी-तिघी मुलींनी सिनेमांची गाणी लिहिण्यासाठी केलेली दोनशे पानी वही बघून, मीही चोरून तशीच एक वही केली होती. माझ्या 'चुगलीतत्पर' भावंडांपैकी कोणीतरी त्याबद्दल आईला खबर पोहोचवली. मला बरीच बोलणी खावी लागली आणि अर्थातच ती वहीदेखील जप्त करण्यात आली. पण या सगळ्यामुळे सिनेमाबद्दलचे माझे आकर्षण वाढतच गेले.
कॉलेजमध्ये गेल्यावर, विशेषतः मेडिकल कॉलेजमध्ये गेल्यावर, घरच्या शिस्तीची पकड जरा सैल झाली. कधी चोरून तर कधी उघडपणे मी माझं व्यसन पूर्ण करू लागले. त्या काळातल्या अगदी साध्या, एसी नसलेल्या थिएटरमध्ये सिनेमा बघायला जी मजा यायची, ती आजच्या झुळझुळीत मल्टिप्लेक्समध्येही येत नाही. तसे पाहता 'मल्टिप्लेक्स'ची सुरुवात, सोलापूरसारख्या गावंढ्या शहरांत, ऐंशी वर्षांपूर्वी भागवत थिएटर्सने केली. एकाच आवारात असलेली भागवतांनी बांधलेली चित्रा, कला, छाया, उमा आणि गांधीं कुटुंबियांच्या मालकीची मीना आणि आशा ही थिएटर्स सिनेमाशौकिनांची नशा गेली कित्येक वर्षे पूर्ण करत आहेत. तीस-पस्तीस वर्षांपूर्वी माझ्या कॉलेजच्या दिवसांत, रांगा लावून किंवा प्रसंगी ब्लॅकने सिनेमाची तिकिटे विकत घ्यावी लागायची, हे आज खरे वाटणार नाही. कॉलेजमध्ये अचानकच प्रॅक्टिकल रद्द झाल्यावर किंवा एखाद्या वेळेस प्रॅक्टिकल्स बुडवून मॅटिनी शो 'टाकण्याची' मजा अवर्णनीय होती. आधी पैशांची जुळवाजुळव करणे, "कॉलेज बुडवून सिनेमा बघण्यात तू काही मोठ्ठं पाप करत नाही आहेस" हे एखाद्या 'पापभीरू' मैत्रिणीला पटवून देणे, ट्रिपल सीट बसून पोलिसांना चुकवत चुकवत कसबसं थिएटरपाशी वेळेत पोहोचणे आणि शेवटी आपल्याला हवा तो सिनेमा निर्विघ्नपणे बघायला मिळणे यांत खूप मोठ्ठ थ्रिल होतं. अशावेळी भलीमोठी रांग पाहिली की पोटात गोळा यायचा. रांगेत कोणी ओळखीचे भेटले तर ठीक, अगदी नाहीच तर रांगेत पुढे असलेल्या एखाद्या तरुणाला अगदी गोड आवाजात आमच्यापैकी कोणीतरी तिकिटे काढण्याची विनंती करायचे आणि काम होऊन जायचं! कधी-कधी मात्र आम्ही पोहोचेपर्यंत "हाऊसफुल्ल" चा बोर्ड झळकलेला असायचा. अशा वेळी पोलिसांची नजर चुकवत दबक्या आवाजात तिकिटे विकणाऱ्या ब्लॅकवाल्याशी भरपूर हुज्जत घालून तिकीट मिळवावे लागायचे. अगदी तेही नाही मिळाले, तर डोअरकीपरला थोडे पैसे देऊ केले की तो पत्र्याच्या खुर्च्या टाकून आम्हाला बसवायचा!
त्या काळी सोलापुरातल्या थिएटरमध्ये सिनेमा बघण्याची मजा सांगावी तितकी थोडी आहे. एक तर सिनेमा हेच मनोरंजनाचे मुख्य साधन होते. मोठीमोठी थिएटर्स प्रेक्षकांनी गच्च भरलेली असायची. बाल्कनीतला प्रेक्षक आणि खाली बसलेलं पब्लिक यांच्या सामाजिक आणि आर्थिक स्तरामध्ये मोठा फरक असायचा. खाली बसलेलं पब्लिक दिलखुलासपणे दाद देणारं होतं. गाणी चालू झाली की लोक समोर येऊन नाचायचे, रुमाल-टोप्या-फेटे हवेत उडवायचे, आणि फारच चांगले नाच-गाणे चालू असेल तर पडद्यावरच्या हिरो-हिरोईनवर चक्क पैसे फेकायचे! 'लव्ह सीन्स' चालू असताना, आपण स्वतःच हिरो आहोत असे स्वप्नरंजन काहीजण करत असावेत,पण काही जण मात्र जळकटपणे हिरोला ओरडून सांगायचे, "ए सोड... सोड बे तिला"! व्हिलनवर तर सगळे, सुप्तपणे, भलताच खार खाऊन असायचे!!
पब्लिकच्या गप्पांमधून सिनेमाचा बॉक्स-ऑफिस वरचा परफॉर्मन्स समजत असे. "त्यात लै एक्सपोज हाय बे! किसींग आन बेडसीन बी हाय बे" असं काहीसं एखाद्या सिनेमाचं वर्णन असलं की तो सिनेमा महिनोंमहिने हाऊसफुल्ल जायचा. अशा सिनेमातील 'तसला' शॉट चालू असला की पब्लिकमध्ये मोठा गोंधळ तरी माजायचा किंवा अगदी पिनड्रॉप सायलेन्स तरी असायचा. त्या काळात तसली कामं फक्त साईड हिरोइन्सकडे किंवा सिनेमातील कॅब्रे डान्सर कडे असायची. आजकालच्या हिरोइन्सनीच 'ती जबाबदारी' उचलून कॅब्रे डान्सर्सची सुट्टी करून टाकली आहे! शिवाय 'एक्स्पोज' आणि 'किसिंग' मध्ये काहीच नावीन्य न राहिल्याने सिनेमामध्ये "लै एक्सपोज आन किसिंग हाय बे !" अशी 'वर्ड ऑफ माऊथ' पब्लिसिटी पण गायब झालीय!
त्यावेळी फक्त बाल्कनीतील सीट्सना नंबर असायचे. त्या खालचं तिकीट असलं की डोअरकीपरने आत सोडताक्षणी धक्का-बुक्की करत, पळत पळत जाऊन जागा पकडावी लागायची. त्यामुळे बाल्कनीत बसलेल्या लोकांना सिनेमा सुरु व्हायच्या आधीच ड्रेस सर्कलमध्ये चाललेल्या तुफान हाणामारीचा ट्रेलर बघायला मिळायचा. सोलापूरच्या रांगड्या पब्लिकच्या तोंडातून मराठी भाषेतील उच्चतम शिव्यांचे शब्दभांडार त्यावेळी ओतले जायचे. एकदा का सिनेमा सुरु झाला की हळूहळू समेट होऊन हा सगळं गोंधळ संपायचा आणि सिनेमाच्या जादुई दुनियेत पब्लिक रंगून जायचं. सिनेमाच्या थिएटरमध्ये जागा पकडण्याची एक गंमतशीर आठवण आहे. एकदा आम्हाला, 'संत तुकाराम' हा सिनेमा शाळेमार्फत दाखवला गेला होता. दोन-दोनच्या जोडीने उभे करून आम्हाला अगदी शिस्तीत रांगेने आत सोडले होते. 'हुशार' विद्यार्थी असल्यामुळे आत शिरताक्षणी पळत-पळत पुढच्या रांगेतल्या खुर्च्या आम्ही पकडल्या. अजूनही मला पडद्यावर अगदी जवळ दिसलेलं ते मोठ्ठंच्या-मोठ्ठं 'पुष्पक' विमान आठवतंय! अर्थातच, घरी आल्यावर डोकं खूप दुखलं आणि, 'सिनेमा नेहमी मागच्या रांगांमधे बसून बघावा आणि नाटक नेहमी पुढच्या रांगांमध्ये बसून बघावं' हे मौलिक ज्ञान त्यावेळी घरच्या वडीलधाऱ्या मंडळींकडूनच मिळाले!
सिनेमा चालू असताना मधेच कधीतरी आवाज गायब व्हायचा. मग, 'ए तुझ्या XXX... आव्वाज.... XXX' अशा आरोळ्यांनी आणि शिट्ट्यांनी थिएटर दुमदुमून जायचे. सिनेमाच्या मध्येच रीळ तुटणे, एखादे रीळ उलटे किंवा पुढेमागे लागणे, वीज जाणे, असले व्यत्ययही कधी-कधी यायचे. पण एकंदरीत त्या काळातलं पब्लिक सहनशील आणि समंजस होतं. असला दीर्घ काळाचा व्यत्यय आल्यावर थोडा आरडाओरडा करून मग पब्लिक शांत बसायचं. थिएटरमध्ये जास्त वेळ गेला म्हणून कोणाच्या आयुष्यात फारसा फरक पडत नसे. सगळं आयुष्यच निवांत होतं. पुरुषवर्ग बाहेर चक्कर मारून विडी-सिगरेट फुंकून किंवा 'मावा' खाऊन यायचा. तर स्त्रीवर्ग नाकाला पदर लावून पोराबाळांना काखोटीला मारून स्वछतागृह गाठायचा. अशा वेळी खारे दाणे, वेफर्स, पिवळ्या रंगाच्या नळ्या म्हणजेच 'बॉबी', सोडावॉटरआणि चहाची भरपूर विक्री व्हायची. अगदीच पब्लिकच्या सहनशक्तीचा अंत बघितला गेला तर मात्र प्रोजेक्टर चालवणाऱ्या 'बाळ्या' किंवा 'उस्मान्या' च्या नावाने शिव्यांची लाखोली वाहिली जायची. अशा व्यत्ययानंतर सिनेमा चालू झाला की त्याच 'बाळ्या' किंवा 'उस्मान्या'ला टाळ्यांनी आणि शिट्ट्यांनी उत्स्फूर्त दाद द्यायला लोक हात आखडत नसत !
सोलापुरातील स्त्री प्रेक्षकवर्गाची कथा काही औरच होती. "जय संतोषी माँ", किंवा "माहेरची साडी", "बाळा गाऊ कशी अंगाई" सारखे अलका कुबल, आशा काळे वगैरे रडक्या नट्यांचे सिनेमे "स्त्रियांच्या तुफान गर्दीत सतरावा आठवडा..." अशा वर्णनात चालायचे. तसल्या सिनेमाला कधी चुकून गेलेच तर खास बायकी गोधळ दिसायचा. पोरांची किरकिर, आयांनी त्यांच्या पाठीत घातलेले धपाटे आणि 'टवळे, सटवे..' वगैरे बायकी शिव्यांसहित एकमेकींच्या झिंज्या उपटत केलेली भांडणे, या सर्व आवाजांनी थिएटर कलकलून जायचं. असल्या सिनेमात हिरोईनचा सासरी होणारा छळ पाहून बायका मुसमुसून रडायच्या. सिनेमा संपेस्तोवर समस्त महिलावर्गाचे डोळे सुजून लालेलाल आणि पदर ओले झालेले असायचे.
मागच्या महिन्यात सोलापूरच्या भागवत थिएटरमध्ये एक सिनेमा पाहिला. त्यातल्या एका थिएटरचे नाव आता, 'बिग सिनेमा भागवत' असं झालंय. मोबाईलवरून दीडशे रुपयांच्या तिकिटाचे बुकिंग केले. झुळझुळीत एसी थिएटरमधल्या गुबगुबीत गालिच्यासारख्या पायघड्यांवरून आमच्या तिकिटाच्या नंबरच्या सीटवर अलगद आसनस्थ झालो. कुठलीही रांग नाही, धक्काबुक्की नाही, आरडाओरडा नाही, तिकीट आणि जागा मिळणार की नाही याबद्दलची धास्ती नाही! थिएटरमध्ये बाल्कनी आणि ड्रेससर्कल अशी विभागणीही नव्हती. सगळे प्रेक्षक कमालीच्या शांतपणे सिनेमाचा आस्वाद घेत होते. शिट्ट्या, शिव्या आणि टाळ्या नसल्यामुळे
सोलापूरच्या त्या थिएटर मध्ये 'पब्लिक' नव्हतंच असं वाटलं. सिनेमाच्या मध्यांतरात 'ट्रिंग-ट्रिंग' असा सोडा वॉटर बाटल्यांचा ओळखीचा आवाज आला नाही, आणि कुणी पोऱ्या चहा किंवा खाऱ्या दाण्याच्या कागदी पुड्या विकायलाही आला नाही. नाईलाजाने बाहेर जाऊन कॅरॅमल पॉपकॉर्नचा पुडा विकत घेतला. पण त्या महागड्या कॅरॅमल पॉपकॉर्नला जुन्या काळातल्या एक-दोन रुपयाच्या खाऱ्या दाण्यांच्या पुडीची सर अजिबातच नव्हती.
आजही मला थिएटरमध्ये जाऊनच सिनेमा बघायला आवडते. पण खरे सांगायचे झाले तर, सोलापुरातल्या थिएटरमध्ये, सत्तर-ऐंशीच्या दशकात सिनेमे पाहायला जशी मजा यायची तशी आजकाल येतच नाही!