रविवार, ११ नोव्हेंबर, २०१८

इलू, इलू,इलू,इलू, !

इलू -इलू , इलू -इलू !

खडगपूर आय आय टी ची मुख्य इमारत 
या दिवाळीत अगदी अचानकच  खडगपूर आय आय टी मधे जाण्याचा आणि दिवाळीचे तीन-चार दिवस तिथल्या गेस्टहाऊसमध्ये राहण्याचा योग आला. सध्या तेथे माझा भाचा जयदीप इंजिनियरिंगच्या दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी आहे. दिवाळीमध्ये जयदीपला फक्त  लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच सुट्टी असल्यामुळे, त्याला इतक्या लांबून घरी येणे शक्य होणार नव्हते. जयदीपला भेटायला माझा भाऊ शिरीष हा खडगपूरला जाणार होता. मग मी आणि आनंदनेही त्याच्याबरोबर जायचे ठरवले.

"दिवाळीच्या तुमच्या सुट्टीच्या दिवशी आपण काय करू या? तुझ्या आवडीचं काहीतरी करू या ना?" आम्ही जयदीपला विचारले.

"दिवसा काय करायचे ते आपण ठरवू. पण संध्याकाळी मात्र तुम्ही आर पी हॉलवर, म्हणजे आमच्या हॉस्टेलवर  'इलू' बघायला या" जयदीप मोठ्ठ्या  उत्साहाने म्हणाला.

"इलू? ते काय असतं?"

"ते काय असतं ते मी आत्ता नाही सांगणार. ते तुम्ही बघायलाच हवे. नुसतं सांगून तुम्हाला कळणारच नाही"  आमच्या प्रश्नाला बगल देत जयदीप उत्तरला.

खडगपूर आयआयटीमध्ये अनेक हॉल्स अथवा हॉस्टेलस आहेत. बरेचसे हॉल्स मुलांचे आहेत आणि काही हॉल्सवर फक्त मुलीच राहतात. त्या प्रत्येक हॉलवर 'इलू' साजरे होणार होते. तसेच कुठल्या हॉलवर किती वाजता ते साजरे होणार आहे, याचे वेळापत्रकही दिले गेले होते.

 AGV चे निरीक्षण करताना शिरीष  
लक्ष्मीपूजनाच्या, म्हणजे खडगपूर आय आय टीच्या  सुट्टीच्या दिवशी,  आम्ही आय आय टी चा  विस्तृत कॅम्पस जयदीपबरोबर पायी हिंडून पहिला. जयदीपने  आम्हाला सगळी डिपार्टमेंटस दाखवली. जयदीप Automated guided vehicle (AGV) वर काम करतो. त्याने त्यांची ती 'मनुष्य विरहित' चालणारी गाडी आम्हाला दाखवली आणि त्यांच्या त्या प्रोजेक्टची सविस्तर माहिती दिली. ब्रिटिशांनी वसवलेल्या 'हिजली डिटेन्शन कॅम्प'च्या आवारात खडगपूर आयआयटी  आज उभी आहे. त्या कॅम्पच्या मुख्यालयाची दिमाखदार इमारत बघितली. स्वातंत्र्य संग्रामात तिथे बळी पडलेल्या  स्वातंत्र्य सैनिकांना आम्ही आदरांजली वाहिली. दिवसभर पायी भटकून आम्ही खूप दमलो होतो. चालून चालून झालेली आमची दमणूक बघून जयदीपने असे सुचवले की आम्ही राधाकृष्णन हॉल आणि त्याला लागूनच असलेला जयदीपचा राजेंद्रप्रसाद हॉल या दोनच हॉलचे 'इलू' बघावे. ती सूचना आमच्याही पथ्यावरच पडली. 'इलू' बघायला आम्हाला राधाकृष्णन हॉलवर (आर के) हॉलवर आठ वाजता आणि जयदीप राहात असलेल्या राजेंद्रप्रसाद (आर पी) हॉलवर आठ वाजून वीस मिनिटांनी पोहोचायचे होते.

दिवसभराची रपेट करून आम्ही चार-साडेचारला गेस्टहाऊस मध्ये येऊन झोपलो ते सहा सव्वासहाला उठलो.  चहा प्यायला शिरीषला आणि जयदीपला आमच्या खोलीमध्ये बोलावण्यासाठी त्यांच्या खोलीवर फोन केला तर तिकडून काही उत्तरच आले नाही. परत थोड्यावेळाने फोन केला, त्यांच्या खोलीच्या दाराची घंटी वाजवली तरीही काहीच उत्तर आले नाही, हे बघून मी आणि आनंद चांगलेच चक्रावलो होतो. इतक्यात शिरीष मोठ्या विजयी मुद्रेने जयदीपला घेऊन बाहेरून आला. 'इलू'च्या वेळी घालायला आपल्याकडे चांगला कुडता नाही हे अचानकच जयदीपच्या लक्षात आलं होतं. त्यामुळे त्याला घेऊन कुडता खरेदीच्या मोहिमेवर शिरीष बाहेर पडला होता. लक्ष्मीपूजनाचा दिवस असल्यामुळे कॅम्पसमधली आणि बाहेरचीही बरीचशी दुकाने बंदच होती. गावातल्या सगळ्या गल्लीबोळातून 'सायकलरिक्षाने फिरून झाल्यावर, आता काही कुठेही कुडता मिळणार नाही अशा निष्कर्षाला आल्यावर, अचानक एका छोट्याशा दुकानात त्यांना जयदीपच्या मनासारखा कुडता मिळून गेला होता. त्यामुळे जयदीप आणि शिरीष दोघेही अतिशय आनंदले होते.

मी आणि जयदीप 'इलू' बघायला तयार 
नवा कुडता घालून जयदीप त्याच्या हॉलवर सायकलवरून पसार झाला. आम्हीही तयार होतोच. जयदीपच्या पाठोपाठच आम्ही चालत-चालत आर के हॉल कडे निघालो. बाहेर पडलो तर आमच्या डोळ्यावर आमचा विश्वासच बसेना. आधीचे दोन दिवस, अगदी साधेच  टीशर्ट आणि जीन्स घातलेली, आणि सायकल मारत भराभर इकडून तिकडे जाणारी  आय आय टी मधली अभ्यासू मुले-मुली आम्ही बघत होतो. पण त्या दिवशी संध्याकाळी ती सगळी मुले-मुली चक्क नटलेली होती. मुलांचे रंगीबेरंगी कुडते काय आणि मुलींचे भरजरी कपडे, साड्या, नट्टापट्टा आणि दागदागिने काय, सगळे वातावरण अगदी फुलून गेले होते. मुलामुलींच्या आणि आमच्या सारख्या इतर पालकांच्या घोळक्याबरोबर आम्ही आर के हॉलपर्यंत आठच्या आधीच पोहोचलो. पण आम्ही पोहोचायच्या आधीच तिथे प्रचंड गर्दी झालेली होती. हॉलसमोरच्या पटांगणात उभ्या केलेल्या बांबूच्या २०-२२ फुटी भव्य चटयांवर, पणत्यांच्या साहाय्याने पौराणिक देखावे सादर केले होते. त्याचसोबत रांगोळ्यांनी रंगवलेली पौराणिक चित्रे आणि त्यावर सोडलेला अल्ट्रा-व्हायोलेट झोत असे 'हाय-टेक' देखावेही होते. सर्व हॉल्सची पहिल्या आणि दुसऱ्या वर्षाची मुले महिनाभर खपून हे देखावे तयार करतात. प्रत्येक हॉल वेगवेगळ्या आशयांचे देखावे सादर करतो आणि नामांकित परीक्षकांच्या मते ज्या हॉलचे देखावे सर्वोत्कृष्ट ठरतात, त्या हॉलला बक्षीस मिळते. एखादा हॉल यावर्षी नेमका कुठला देखावा सादर करणार आहे, हे फक्त त्या-त्या हॉलच्या मुलांनाच माहिती असते. हे जे टॉप सिक्रेट ठेवलेले असते ते त्या स्पर्धेच्या वेळीच बाहेर पडते. विजेवर चालणारे सगळे दिवे बंद करून फक्त हजारो पणत्या एकाच वेळी पेटवल्या जातात आणि अचानक अंधारात आपल्यासमोर हे सुंदर देखावे तयार होतात. या नेत्रदीपक इल्युमिनेशन स्पर्धेचे संक्षिप्त रूप म्हणजेच 'इलू' हे आम्हाला तिथे गेल्यावरच कळले!
जयदीपच्या आर पी हॉलचे या वर्षीचे 'इलू '
आर के हॉल चे देखावे पाहिल्यानंतर आम्ही जयदीपच्या आर पी हॉलवर गेलो. पणत्या पेटवणे चालू असताना 'आता काय-काय दिसणार?' अशी कमालीची उत्सुकता सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. सगळ्या पणत्या पेटल्या आणि तिथलेही सुरेख देखावे आमच्या डोळ्यापुढे उभे राहिले. पाच चटयांवर, केवळ पणत्यांच्या साहाय्याने जणू संपूर्ण महाभारत रेखाटले होते. द्रौपदी-वस्त्रहरण, द्रोणाचार्य आणि एकलव्य, भीष्म-परशुराम युद्ध, कर्णाच्या रथाचे चिखलात रुतलेले चाक, बाणांच्या शय्येवर पडलेले भीष्माचार्य, असे देखावे अगदी हुबेहूब होते. हजारो पणत्या एकाच वेळी पेटवल्यामुळे अमावास्येच्या अंधाऱ्या रात्रीचे आकाश उजळून निघाले होते. उभ्या चटयांवरच्या त्या देखाव्यांचे प्रतिबिंब जमिनीवरच्या कृत्रिम तळ्यातील पाण्यामध्ये पडल्यामुळे ते दृश्य फारच सुरेख दिसत होते. पणत्यांच्या प्रकाशामुळे प्रचंड जनसमुदायाच्या डोळ्यांच्या पणत्याही लखलखत होत्या. हवेत तरंगणारे अनेक रंगीत आकाशकंदील एकापाठोपाठ आकाशात सोडलेले होते. शोभेच्या दारूकामाने आसमंत उजळून निघाला होता. आरपी हॉलची मुले घोषणा देत होती. इतर मुले-मुली त्यांना प्रोत्साहन देत होती. भरपूर फोटो काढले जात होते. फ्लॅश उडत होते. तरुणाईच्या जल्लोषामुळे आणि त्यांच्यातल्या ऊर्जेमुळे वातावरण भारल्यासारखे झाले होते. गेले दोन दिवस पाहिलेल्या त्या 'अभ्यासू' मुला-मुलींचे हे वेगळेच रूप, त्यांचे टीम स्पिरिट, त्यांच्यामधले ते चैतन्य, त्यांच्यातल्या कलागुणांची, कल्पकतेची आणि हरहुन्नरीपणाची एक वेगळीच झलक आम्हाला पाहायला मिळाली. जयदीपच्या आर पी हॉलला, या वर्षीच्या  'इलू' चे पहिले बक्षिस मिळाल्याचे जयदीपने आम्हाला मोठ्ठ्या अभिमानाने सांगितले आणि आम्हाला खूप कौतुक वाटले.
आर पी हॉलच्या 'इलू' समोर  जयदीप 

बऱ्याच वर्षांनंतर खडगपूर आय आय टीमधील दिवाळीच्या निमित्ताने 'इलू' हा शब्द मी ऐकला. पूर्वी एका हिंदी गाण्यात हा शब्द मी ऐकला होता.
"इलू, इलू, इलू, इलू,S S,  इलू का मतलब आय लव्ह यू " असं ते गाणं होतं.

खडगपूर आय आय टी मधलं ऊर्जस्वल वातावरण, शिक्षणाचा दर्जा, तिथे घडत असलेली, अनेक कलागुणसंपन्न अशी भावी पिढी, आणि 'इलू' हे सगळं बघून मी भलतीच भारावून गेले आहे. तुम्हाला हसायला येईल, आणि कदाचित तुम्ही माझी चेष्टाही कराल. पण खरंच सांगते, या ट्रिपहून आल्यापासून मी खडगपूर आय आय टी ला उद्देशून "इलू, इलू, इलू, इलू,S S, इलू का मतलब आय लव्ह यू " हे गाणं गुणगुणते आहे,  पण फक्त माझ्या  मनांतल्या मनांतच बरं का!





बुधवार, ३१ ऑक्टोबर, २०१८

वेष्टनांचा विळखा!

पुणे महानगरपालिकेच्या, चंदूमामा सोनावणे रुग्णालयात, साधारण पाच ते दहा वर्षे वयाच्या  बालरुग्णांची तपासणी करीत असताना त्यांच्या पालकांबरोबर, म्हणजे बहुतेक वेळा मुलांच्या आयांबरोबर घडणारा एक ठराविक संवाद असतो.

नकाबाच्या आडून बोलणारी आई, "मॅडम, आप इसको बोलिये ना, की अगर ये रोज LAYS और कुरकुरे खायेंगा, तो आप इसको सुई लगा देंगे"

मग मी विचारते, "क्यूँ , ये रोज ऐसी चीजे खाता है क्या ?"

तिचे उत्तर, "हां, ऐसेहीच करता है. सुनताच नहीं है. इसको कितनाभी समझाओ, लेकिन घरका बना हुवा खाना नहीं खाता. रोज LAYS और कुरकुरे खायेंगा. मानताच नही."

माझा प्रश्न, "इसको रोज LAYS और कुरकुरे, फुकटमें कौन देता है? या फिर आपकी खुदकी दुकान है क्या ?"

कसनुसं हसून तिचं उत्तर, "दुकान कहाँसे होंगी? और इसको फुकटमें कौन देगा? जिद करके, रोज पैसे लेता हैं"

माझा प्रश्न, "लेकिन इसको पैसे कौन देता है?"

तिचे उत्तर, "किसीसेभी लेता है. ज्यादातर इसके अब्बू, दादा, नहीं तो चाचा दे देतें हैं"

माझे उत्तर, "तो फिर ऐसा करो, कल इसके अब्बू, दादा और चाचा, इन तीनोको मेरे पास इधर ले के आ जाओ. मैं तीनोको सुई लगा देती हूं. बच्चेको सुई लगाने से उसकी ये आदत कैसे छूटेगी?"

मग ती बाई निरुत्तर होऊन निघून जाते.

"शक्यतो कुठल्याही पाकिटातलं काहीही खाऊ नका, मुलांच्या हातात पैसे  देऊ नका, घरी बनवलेले ताजे आणि सकस अन्न कुटुंबातील सर्वजण खात जा" हे जवळजवळ प्रत्येक रुग्णाच्या पालकांना मी सांगत असते.

एके दिवशी सोनावणे रुग्णालयातील काम संपल्यावर, मी अगदी रमत-गमत पायीच घरी निघाले होते. माझ्या समोर काही अंतरावर साधारण नववी-दहावीत असावी अशी एक शाळकरी मुलगी, भराभरा चालत असलेली दिसली. तिच्या पाठीवर एक मोठ्ठे आणि अवजड दप्तर होते. केसाच्या दोन घट्ट वेण्या, रंगीत रिबीनीने वर बांधून, रिबिनीची मोट्ठी फुले केलेली होती. मुलगी शाळेच्या गणवेशात होती. तो गणवेश पुण्यातल्या एका नामांकित शाळेचा होता. त्यामुळेच, ती मुलगी मध्यमवर्गीय घरातली असावी असा अंदाज मी मनाशी बांधला. चालता-चालता मधेच, त्या मुलीने, एक पाकीट उघडून काहीतरी तोंडात टाकले आणि त्या पाकीटाचे वेष्टन रस्त्यावर फेकून दिले.  शाळेत शिकणाऱ्या, चांगल्या घरच्या मुलीने ते वेष्टन असे रस्त्यावर फेकावे, याचा मला जरा जास्तच राग आला. तिला रागवावे आणि तिने रस्त्यावर टाकलेले ते वेष्टन तिलाच उचलायला लावून, कचराकुंडीत टाकायला लावावे, या उद्देशाने, मी भराभर पुढे चालत निघाले. पण ते वेष्टन कशाचे आहे हे पाहण्यासाठी प्रत्यक्षांत मीच ते उचलले आणि अचंबितच झाले.
ते वेष्टन होते गुटख्याच्या पाकिटाचे!
मला काय करावे ते सुचेना आणि मी जागच्याजागीच खिळून उभी राहिले. भानावर आले तोवर ती शाळकरी मुलगी माझ्या नजरेआड झालेली होती.

आपल्या भावी पिढ्या वेगवेगळ्या वेष्टनांच्या विळख्यांत अडकून गर्तेत जाणार अशी भीती मला राहून-राहून वाटत असते. निदान आपले स्वतःचे किंवा आपल्या घरातले एखादे मूल या विळख्यात अडकणार नाही, याची दक्षता आपणच घ्यायला नको का?



बुधवार, १६ मे, २०१८

आपली वास्तू खरोखर शांत आहे का?

काल सकाळचं काम संपवून घरी आल्यावर, आमरस-पोळीचे जेवण जेवून मी ताणून  दिली. तास-दीड तासाने जाग आल्यावर सवयीने व्हॉट्सऍप उघडले. दि. १६/०५/१८, म्हणजे आजच एका 'हेल्थ कॅम्पला' मी रुजू व्हायचे आहे अशी ऑर्डर नॅशनल अर्बन हेल्थ मिशनच्या कार्यालयातून कोणीतरी व्हॉट्सऍपवर मला पाठवलली दिसली. बांधकामावरील मजुरांच्या कुटुंबियांसाठी हा मोफत हेल्थ कॅम्प, क्रेडाई आणि पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेला आहे, असे मला त्या ऑर्डरवरून कळले. अचानक आलेल्या या ऑर्डरमुळे खरंतर माझी खूप चिडचीड झाली. माझ्या क्लिनिकच्या आजच्या अपॉईंटमेंट्स रद्द कराव्या लागणार, घरची कामे सकाळी लवकर उरकून, मरणाच्या ट्रॅफिकमध्ये घरापासून दहा किलोमीटर दूर असलेली कॅम्पची साईट शोधत जावे  लागणार, हे सर्व मला अगदी नको वाटत होते. त्यातून १६ मे हा आमच्या मुलाचा वाढदिवस. मुलगा जरी दूर अमेरिकेत असला तरी त्याचा वाढदिवस 'राझी' सिनेमा बघून साजरा करावा असे मनात योजले होते. ऑर्डर रद्द करून  घ्यावी असा मनात विचार आला पण कार्यालयीन वेळ संपून गेलेली असल्यामुळे ते केवळ अशक्य होते.

मनातल्या मनात चडफडतच कॅम्पच्या ठिकाणी पोहोचले. बांधकामावरील मजुरांच्या कुटुंबियांच्या वसाहतीत पत्रे ठोकून उभ्या केलेल्या एका खोलीत कॅम्प आयोजित केला होता. बाहेर वीस-पंचवीस लहान मुले तपासणी सुरु होण्याची वाट बघत बसली होती. कामगारांच्या बायका आणि काही कामगारही मोठ्या आशेने थांबून होते. 'मान्यवर' न आल्याने, कार्यक्रम तासभर उशिरा चालू झाला. त्यानंतर दीपप्रज्ज्वलन, भाषणबाजी आणि खानपान यामध्ये पुढचा पाऊण तास गेला. त्या सोहळ्यादरम्यान अनेक फोटो काढून झाले आणि लगेच तमाम मान्यवर गायब झाले. हे सर्व होऊन गेल्यावर आमचं काम चालू झाले.  त्या वेळपर्यंत भर उन्हात पत्र्याच्या शेड मध्ये बसून, ढिसाळपणे चाललेला कार्यक्रम आणि दिखाऊपणा बघून माझे डोके चांगलेच तापले होते. असले कार्यक्रम मुख्यतः फोटोपुरतेच घडवून आणले जात असल्याने, त्यात नियोजनाचा अभाव आहे, हे माझ्या लक्षात आले आणि वैद्यकीय तपासणीची सगळी सूत्रे मी हातात घेतली. दोन कर्मचाऱ्यांना केसपेपर्स बनवायला बसवले, महानगरपालिकेच्या दवाखान्यातून रुग्णांना मोफत वाटण्यासाठी कोणती आणि किती औषधे आणलेली आहेत याचा आढावा घेतला आणि कामाला सुरुवात केली.

कर्नाटक, बिहार, उत्तरप्रदेश आणि छत्तीसगड अशा वेगवेगळ्या राज्यातून आलेली ही कामगारांची कुटुंबे होती. मी फक्त बालरुग्णांना तपासणार होते. सगळी मुले थोड्याफार प्रमाणात कुपोषित होती. त्या वसाहतीतील बऱ्याच मुलांना नुकताच गोवर येऊन गेलेला होता. त्यामुळे त्यांची भूक कमी झालेली होती आणि ती  खूप चिडचिडी झालेली होती. अनेक मुलांच्या अंगात रक्त कमी आहे, हे मला कळत होते. काहींना खरूज झालेली होती तर काहींची पोटात जंत झाल्याची  तक्रार होती. कित्येक मुलांचे लसीकरण पूर्ण झालेले नव्हते. आई-वडील कामावर गेल्यामुळे, सात आणि आठ वर्षांची मुले पालकांशिवायच तपासणी करून घ्यायला आलेली होती. दहा-बारा वर्षांच्या मुली कडेवर लहान भावंडांना घेऊन आल्या होत्या. मी पेशन्ट्स तपासत होते पण त्यांना द्यायला, योग्य आणि पुरेशी औषधेही आमच्याकडे नव्हती. गोवर आलेल्या मुलांना द्यायला साधे 'अ' जीवनसत्वाचे औषधही नव्हते. मुलांना रक्तवाढीसाठी पातळ औषध द्यावे, तर तेही नव्हते. काही अत्यावश्यक औषधे मी विकत आणायला लावली आणि मोठ्या जिव्हाळ्याने सर्व मुले तपासली. एका वेगळ्याच उपक्रमात सहभागी होऊन  मुलाचा वाढदिवस साजरा केल्याचे समाधान मिळाले, पण मनात मात्र विचारांचे काहूर उसळले.  

कार्यक्रम सुरु होण्याआधी कुतूहलापोटी मी काही लोकांशी बोलले होते. त्यांच्या झोपड्याकडेही माझे लक्ष  गेलेले होते. तात्पुरते पत्रे ठोकून तयार केलेल्या काड्यापेटीसारख्या झोपड्या. त्यात खेळती हवा नाही, ड्रेनेजची नीटशी सोय नाही. सगळीकडे अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरलेली. पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची तरी काय सोय होती देव जाणे. अशा परिस्थितीतच ही कुटुंबे राहत होती आणि तिथेच त्यांची मुले खेळत होती. सर्व सुखसोयींनी युक्त अशा मोठ्या मोठ्या इमारती बांधायच्या आणि इमारत पूर्ण झाल्यावर पुन्हा पुढच्या साईटवर जायचे. दर दीड दोन वर्षांनी जुने घर मोडायचे, जुनी जागा सोडायची आणि नवीन जागी पुन्हा घर उभे करायचे. या जागी किती दिवस राहायचे आहे ?नवीन जागा कुठे असेल? कशी असेल? किती दिवसांनंतर जायचे आहे ? शेजारीपाजारी कोण असेल? मालक कोण असतील? काम मिळेल का? किती दिवसांसाठी मिळेल ? किती पगार मिळेल ? मुलांसाठी शाळा असेल का? सगळी प्रश्नचिन्हेच. क्रेडाईच्या सदस्यांनी या कामगारांना मूलभूत सुविधा पुरविल्याच पाहिजेत अशी कायदेशीर सक्ती का नाही? आणि तशी तरतूद कायद्यात असल्यास त्याची कठोर अंमलबजावणी करता येणार नाही का? चकचकीत घरामध्ये राहताना, त्यासाठी राबलेल्या या कामगारांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या हालअपेष्टांबद्दल आपल्याला सुतराम कल्पनाही नसते, याची जाणीव मनाला त्रास देऊन गेली. या कॅम्पला मला यायला लागू नये, हा कातडीबचाऊ विचार मी केला होता, याचीही मला लाज वाटली.

मागच्याच महिन्यात माझ्या भावाने घेतलेल्या नवीन घराची वास्तुशांती पूजा झाली. मी मुळीच भाविक नाही, पण पूजा करताना गुरुजी मंत्रोच्चार करून त्यांचा अर्थही समजावून सांगत होते, ते कानावर पडले होते. वास्तू उभी राहताना ज्यांना ज्यांना म्हणून त्रास झाला असू शकेल त्या सगळ्यांचा उल्लेख करून ती पूजा केली गेली. नवग्रहांचीही शांत केली. आज, या कामगाराच्या वसाहतीत प्रथमच गेल्यावर मला वाटले की,नवीन वास्तूत प्रवेश करताना, वास्तूसाठी राबलेल्या कामगारांचा एखादा प्रश्न जर एकेक फ्लॅटधारकाने सोडवला तर ती एक आगळी वेगळी वास्तुशांत होईल. 

गुरुवार, १९ एप्रिल, २०१८

टिकली तर टिकली


काही महिन्यांपूर्वीची गोष्ट असेल. मी वॉर्डमध्ये शिरले आणि फर्नांडिस सिस्टर म्हणाल्या," मॅडम आज कपाळावर टिकली का नाही लावलीत?"

मी गोंधळले.  "मी टिकली लावली होती , कुठेतरी पडली असणार" असे पुटपुटत चटकन माझा हात कपाळाकडे गेला. अर्थातच तिथे टिकली नव्हती. त्यामुळे टिकली शोधण्यासाठी मी गडबडीने माझी पर्स धुंडाळू लागले. पर्समध्ये टिकलीचे पाकीट नेहमी असते. पण नेमके त्या दिवशी ते सापडेना, तशी मी थोडीशी ओशाळले. माझ्या चेहऱ्यावरचे भाव फर्नाडिस सिस्टरांनी वाचले असावेत.
"मॅडम थांबा. कदम सिस्टर कडे नेहमी टिकल्यांचे पाकीट असते. मी आणते" असं  म्हणत काही क्षणांतच फर्नांडिस सिस्टरांनी टिकली आणून माझ्या कपाळावर लावली आणि आम्हा दोघींचाही जीव जणू भांड्यात  पडला.


टिकलीचे आणि माझे नाते फार वर्षांचे आहे. माझ्या लहानपणी आई बरेचदा मेण लावून त्यावर पिंजर लावायची. कधीतरी पुढे ती गंधाच्या उभ्या बाटलीतून गंध लावायला लागली आणि नंतर लालभडक मोट्ठी टिकली. अगदी लहानपणी मी पण गंधच लावत होते. पण माझ्या कपाळावर ते उतायला लागल्यामुळे नंतर मी टिकली वापरायला लागले. पण क्वचित कधी गंध फिस्कटले गेले  किंवा टिकली पडली तर आज्जी ओरडायची. सधवा बायकांनी आणि कुमारिकांनी भुंड्या कपाळाने हिंडायचे नाही, असं म्हणायची. कदाचित त्या शिकवणीमुळे असेल किंवा टिकली लावणे सवयीचे झाल्यामुळे असेल, टिकली माझ्या व्यक्तिमत्वाचा एक भागच होऊन गेली.

लग्नानंतर उत्तरभारतात राहण्याचा योग्य आल्यामुळे त्यावेळी नाविन्यपूर्ण वाटणाऱ्या, वेगवेगळया आकाराच्या  आणि कपड्यांना मॅचिंग रंगाच्या टिकल्या वापरायला लागले. पुढे पाश्चात्य वेशभूषा करायाला लागले तरीही माझी टिकली कपाळावर टिकलीच. जीन्स आणि टॉप घालून कपाळावर टिकली लावून आले की माझी मुलं, भाचरंडं चेष्टा करतात. कधी ती टिकली काढ म्हणतात. त्यांच्या आग्रहाला  बळी पडून मी कधीतरी ती काढतेही. पण कपाळावर टिकली असली की मला जरा बरं वाटतं, हे ही तितकंच खरंय.

गेल्या सात आठ वर्षांमध्ये चार-पाच वेळा परदेशात जाण्याचा योग आला. तिथे गेले तरी माझी टिकली कपाळावर असायचीच. अमेरिकेत एका फेलोशिप प्रोग्रॅमला गेले होते त्यावेळी त्या प्रोग्रॅमला आलेल्या अमेरिकन बायकांना माझ्या टिकलीबद्दल कोण कुतूहल होतं. एक दोघींनी तर मला त्यांच्यासमोर टिकली लावायला लावली. त्यांनाही कपाळाला टिकली लाऊन बघायची होती की काय, कुणास ठाऊक. चार वर्षांपूर्वी उझबेकिस्तानला गेलो होतो तेंव्हा तिथल्या काही उझबेक स्त्रियांनी, त्यांच्या अगम्य भाषेत," तुम्ही टिकली का लावता? ती कशी लावायची? सगळ्या भारतीय बायका टिकली लावतात का?  भारतातल्या मुसलमान बायका पण टिकली लावतात का? टिकली लावणे म्हणजे भारतीय संस्कृती का? असे अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडले होते. काही बायकानीं तर माझ्या कडून आणि माझ्या वहिनींकडून मोठया कौतुकाने टिकल्या मागून घेतल्या होत्या.

आमच्या लहानपणी काही सोप्पे ठोकताळे होते. सर्वच हिंदू मुली गंध किंवा टिकली लावायच्या. टिकली किंवा गंध नसलेली मुलगी ही इतर धर्माचीच असायची. आजकाल मात्र तसं काही राहिलेलं नाही. हल्ली हिंदू मुलींनाही टिकली शिवायच बघायची आपल्या डोळ्यांना सवय होऊन गेलीय. माझी मुलगी, भाच्या, पुतण्या कपाळाला टिकली लावतातच असे नाही. मी शिकवते त्या महाविद्यालयांमध्ये जवळ जवळ सगळ्या मुली टिकली न लावताच येतात. मागच्या महिन्यात एक दिवस कॉलेजमध्ये गेले आणि बघते तर काय, सगळ्या मुली अगदी नटलेल्या दिसल्या . जवळजवळ सगळयांच्या कपाळावर टिकल्या, चंद्रकोरी,  हातात बांगड्या, गळयात सोन्या-मोत्याचे हार , साड्या अथवा घागरा-चोळी नेसलेल्या, काही विचारू नका. मी अगदी चकित झाले. शिकवायला सुरुवात करायच्या आधी," आज काही विशेष आहे का?" असे विचारले, तर त्यांचा ' कल्चरल डे' आहे असे कळले. आता आपली संस्कृती सुद्धा फक्त ‘असे 'कल्चरल डे' किंवा 'संस्कृती दिन’ साजरा करण्यापुरती उरली आहे की काय? असाही एक प्रश्न माझ्या मनांत येऊन गेला.

पण काहीही म्हणा, या 'कल्चरल डे' च्या निमित्ताने कितीतरी मुलींच्या कपाळावर टिकली बघितली आणि छान वाटले. आपली संस्कृती टिकेल ना टिकेल देव जाणे, पण निदान या 'कल्चरल डे' च्या निमित्ताने चार मुलींच्या कपाळावर टिकली टिकली तरी मिळवली, असे म्हणायची वेळ आली आहे, नाही का?