रविवार, १६ मे, २०२१

X=Y

काही दिवसांपूर्वी 'वाजदा' नावाचा, एका अगदी छोट्याश्या विषयावरचा, सौदी अरेबियन सिनेमा पाहिला. 

वाजदा नावाच्या, एका नऊ-दहा वर्षे वयाच्या शाळकरी मुलीला स्वतःची दुचाकी सायकल हवी असते. वाजदाच्या आईवडिलांचे परस्परसंबंध तणावपूर्ण झालेले असल्याने, वडिलांकडून सायकलसाठी पैसे मिळण्याची शक्यता जवळ-जवळ नसतेच. मुलीने सायकल चालवणे, या गोष्टीला तेथील समाजात मान्यता नसल्याने वाजदाच्या  आईचाही विरोधच असतो. वाजदाच्या आईला पहिल्या बाळंतपणात खूप त्रास झालेला असल्याने ती दुसरे मूल होऊ द्यायला तयार नसते. परंतु, वाजदाच्या आजीला, म्हणजे वडिलांच्या आईला, घराण्याला वारस म्हणून नातू हवा असतो. त्यामुळे, वाजदाच्या वडिलांचा दुसरा विवाह होतो. 

स्वकष्टातून सायकल विकत घेण्यासाठी वाजदा अनेक प्रकारे पैसे जमवू लागते. कुराणपठणाची स्पर्धा जिंकल्यास, मिळणाऱ्या बक्षिसाच्या रक्कमेतून  आपण सहजी सायकल विकत घेऊ शकू , हे तिच्या लक्षात येते. त्यामुळे मोठ्या जिद्दीने आणि डोकेबाजपणे कुराणपठणाचा सराव करून वाजदा ती स्पर्धा जिंकते. बक्षिसाच्या रक्कमेतून स्वतःसाठी सायकल घेणार असल्याचे, ती स्टेजवरून मोठ्या अभिमानाने सांगते. स्त्रियांना व्यक्तिस्वातंत्र्य नसलेल्या त्या देशात, जिथे मुलींनी सायकल चालवण्याचा विचार करणेही जणू पाप असते, तिथे सायकल विकत घेण्याचा तिचा हा धक्कादायक निर्णय तिच्या शाळेच्या मुख्याध्यापक बाईंना अजिबात आवडत नाही. त्यामुळे तिच्या बक्षिसाची रक्कम त्या परस्परच धर्मादायी संस्थेला दान करण्याचे जाहीर करून टाकतात. इतक्या प्रयत्नानंतरही आपल्याला आता सायकल मिळणार नाही हे लक्षात आल्यावर वाजदा हिरमुसली होते. पण वाजदाची आई तिच्यासाठी सायकल खरेदी करून तिला आणि प्रेक्षकांनाही शेवटी सुखद धक्का देते.
 
हा सिनेमा मला खूप आवडला. पूर्णपणे सौदी अरेबियात चित्रित झालेला आणि एका स्त्री दिग्दर्शिकेने मोठ्या हिमतीने बनवलेला हा दर्जेदार सिनेमा आवर्जून बघावा असाच आहे. एका व्हॅनमध्ये कॅमेरा ठेवून, चोरीछुपे या सिनेमाचे संपूर्ण चित्रीकरण करण्यात आलेले आहे, असेही वाचनात आले. एका श्रीमंत मुस्लिम राष्ट्रात स्त्रियांकडून अपेक्षित असलेली वर्तणूक, त्यांच्यावर असलेली बंधने, व त्यामुळे समाजातील त्यांचे दुय्य्म स्थान, यावर हा सिनेमा  प्रकाश टाकतो. प्रत्येक विवाहित स्त्रीने मुलगा जन्माला घालून नवऱ्याच्या कुटुंबाची वंशवेल वाढवणे हे अत्यावश्यक असते, हेही त्यातून अधोरेखित होते. आपली आई मुलगा जन्माला घालू शकत नसल्यानेच आपल्या आईवडिलांमध्ये बेबनाव आहे, याचा अंदाज वाजदाला आलेला असतो. केवळ याच कारणामुळे आपले वडील आपल्या आईला सोडून दुसरे लग्न करणार आहेत हेही तिला कळलेले असते. एकदा घरात खेळत असताना, एका फलकावर लावलेली, आपल्या कुटुंबीयांची वंशावळ  वाजदाला दिसते. त्या वंशावळी मध्ये प्रत्येक पुरुषाच्या अपत्यांपैकी फक्त मुलांचीच नावे लिहिलेली असतात. अर्थातच, वाजदाच्या वडिलांच्या नावाखाली कोणाचेच नाव लिहिलेले नसते. वाजदाला ते खटकते आणि ती तिथे आपले स्वतःचे  नाव लिहिते. सिनेमात अगदी सहज दाखवलेला हा प्रसंग माझ्या मनाला फार भिडला. विचाराने मागास असलेल्या राष्ट्रांमध्ये वंशावळी  बाबत हीच संकल्पना रूढ असणार हे जाणून, तिथल्या स्त्रियांबद्दल प्रचंड कीव माझ्या मनात दाटली. 

पण खरी गंमत तर पुढे झाली. माझ्या माहेरच्या कुटुंबीयांची वंशावळ माझ्या पाहण्यात आली. त्यामध्ये पिढ्यानपिढ्या, एकाही 'कन्ये'चे नाव मला दिसले नाही. माझ्या ध्यानात आले की, माझ्या सासरच्या वंशावळीतही माझे नाव असायचे कारण नव्हते. म्हणजे, दोन्हीकडच्या वंशावळींमध्ये कदाचित मला स्थानच नव्हते. आपला समाज पुढारलेला आहे असे आपल्याला कितीही वाटत असले तरी, आपल्याही समाजात स्त्रीला अजूनही  दुय्यम  स्थानच आहे. मुलगा म्हणजे 'वंशाचा दिवा', ही संकल्पना अजूनही आपल्या समाजात मूळ धरून आहे. 


'हम दो हमारे दो' या घोषवाक्याची जागा आता  'हम दो हमारा एक'  या नाऱ्याने घेतली आहे. पहिला मुलगा झाला तर आनंदीआनंद असतो. अशावेळी, एका अपत्यानंतर थांबण्याच्या निर्णयाचे, आप्तस्वकीयांकडून स्वागत होते. पण यदाकदाचित पहिली मुलगी झाली, तर दुसऱ्या 'चान्स'साठी दोन्हीकडचे आप्त त्या नवरा-बायकोच्या मागे लागल्याशिवाय राहत नाहीत. एकापाठोपाठ दोन मुली झाल्या तर 'बिच्चारीला दुसरी मुलगीच झाली' असे वाक्य हमखास ऐकू येतेच. किंवा 'दुसरी मुलगी झाली म्हणून काय झाले? हल्ली मुलीसुद्धा आईवडिलांना म्हातारपणी बघतातच की' असे एखादे 'उत्तेजनार्थ' वाक्य कोणीतरी बोलते. शंभर वर्षांपूर्वी आपल्या समाजात एखाद्या 'पुत्रवती' स्त्रीला जितके महत्व होते, तितकेच महत्व आज आहे असे मला म्हणायचे नाही. किंवा, प्रत्येक पुत्रहीन स्त्रीला आजही डावी वागणूकच मिळते, असेही मला वाटत नाही. पण, एकंदरीत समाजाच्या वैचारिक सुधारणेचा वेग अजूनही मंदच आहे हे खरे. कित्येक घरांमधून, तथाकथित 'वंशाचे दिवे' किती दिवटे निघतात, हे आपल्याला दिसतेच. एखाद्या दिवट्या पुत्राच्या प्रेमात अंध होऊन वाहवलेले पालकही आपण बघतो. परंतु, जर आज आपण मुलगा-मुलगी समान मानतो असे म्हटले, तर निदान वंशावळी मध्ये मुलींच्या नावाचा उल्लेख सहजच यायला हवा. नाही का?

आमच्या मुलीने, तिच्या लग्नानंतर स्वतःचे नाव आणि आडनाव बदललेले नाही. आमची मुलगी आणि जावई ऑस्ट्रेलियात स्थायिक झाले आहेत. तिथल्या पद्धतीप्रमाणे, अपत्य जन्माला येताच त्याच्या नावानिशी त्याची नोंद करावी लागते. तसेच, मुलगा जन्मणार का मुलगी, हे आधी जाणून घेण्याची आई-वडिलांची इच्छा असेल तर, ते त्यांना आधीच सांगितले जाते. त्यानुसार, आमच्या मुलीला मुलगी होणार हे आम्हाला कळलेले  होते. नवजात मुलीचे नाव आणि आडनाव काय ठेवायचे हे आमच्या मुलगी व जावयाने आधीच ठरवून ठेवले होते. आमच्या नातीचे कागदोपत्री नाव आहे 'नूर बापट'. आता जर मी जुन्या पद्धतीप्रमाणे विचार केला तर, 'बापट वंशावळीमध्ये जिथे आमच्या मुलीलाच स्थान नाही तिथे तिच्या मुलीला कसे स्थान मिळणार'? हा प्रश्न मला पडणारच. नाही का?

काल-परवा मी टीव्हीवर एक कार्यक्रम बघत होते. त्यात 'मॅटर्नल लिनिएज' आणि 'पॅटर्नल लिनिएज', यावर शास्त्रीय चर्चा सुरु होती. आई आणि वडिलांकडून त्यांच्या अपत्यांना X आणि Y ही गुणसूत्रे मिळतात. आईच्या पेशींमध्ये दोन X गुणसूत्रे असल्याने, आईच्या बीजातून अपत्याला फक्त X गुणसूत्रच मिळू शकते. मात्र, वडिलांच्या पेशींमध्ये X आणि Y ही दोन्ही गुणसूत्रे असल्याने, होणाऱ्या अपत्याला आपल्या वडिलांकडून X किंवा Y यांपैकी कोणतेही एक गुणसूत्र मिळू शकते. वडिलांकडून जर Y गुणसूत्र आले तर, आणि तरच, पुत्र जन्मतो. आणि वडिलांकडून जर अपत्याला X गुणसूत्र आले तर मुलगी जन्मते. 

चर्चेत पुढे असेही बोलले गेले की, Y हे गुणसूत्र अपत्याला वडिलांकडून, आणि वडिलांना त्यांच्या वडिलांकडून असेच पिढ्यानपिढ्या येत असल्याने, Y गुणसूत्राचा अभ्यास केल्यास 'पॅटर्नल लिनिएज'चा अभ्यास करता येतो. 'पॅटर्नल लिनिएज' ही संकल्पना 'गोत्र' या नावाने आपल्या धर्मात मानली गेलेली आहे. त्यामुळे, एखाद्या कुटुंबातील मुलगाच त्या कुटुंबाचे गोत्र पुढे चालवू शकतो असाही विचार चर्चेत मांडला गेला. इथपर्यंतची माहिती योग्य पद्धतीने सांगितली गेली. परंतु, त्यापाठोपाठ, "सगोत्र विवाह करणे अयोग्य आहे" असे अशास्त्रीय किंवा अंधश्रद्ध भाष्य केले गेले. याबाबत समाजप्रबोधन होणे गरजेचे आहे, याची मला जाणीव झाली. नियोजित वर आणि वधू या दोघांच्याही कुटुंबांच्या वंशावळीतील वरच्या तीन पिढ्यांपैकी एकाही पूर्वजाचे दुसऱ्या कुटुंबातील पूर्वजासोबत सख्खे नाते असू नये असे आधुनिक शास्त्र सांगते. म्हणजेच, वरच्या तीन पिढ्यांमध्ये दोन्ही कुटुंबांपैकी कोणीही एकमेकांची सख्खी भावंडे नसतील तर सगोत्र विवाहामध्येदेखील धोका नसतो.

आज हे सगळे आठवण्याचे कारण असे की, स्वतःच्या वडिलांकडून आलेले Y गुणसूत्र धारण करणाऱ्या आमच्या मुलाचा, अनिरुद्धचा आज वाढदिवस आहे. आमच्या परीने आम्ही आमच्या दोन्ही अपत्यांना, म्हणजे XX गुणसूत्रधारक मुलीला आणि XY गुणसूत्रधारक मुलाला, समान वागणूक दिली. हेच जर गणिती सूत्रात मांडले तर XX=XY, म्हणजेच X=Y, असेच आम्ही मानत आलो. तरीदेखील, आमच्यावर आपसूक झालेल्या संस्कारांमुळे, कदाचित आमच्याकडून आमच्याही नकळत काही डावे-उजवे झाले असण्याची शक्यता आहे. 

जेंव्हा संपूर्ण समाज, जनुकीय संदर्भात X=Y हे मानायला लागेल, तेव्हाच आपला समाज खऱ्या अर्थाने प्रगत झाला असे म्हणता येईल.

सोमवार, ३ मे, २०२१

अरे तू असा न भेटता कसा गेलास?

सुरेश राठोड या नावाचा कोणी मुलगा, दहावीला आमच्या शाळेत, माझ्या बॅचमध्ये होता, हे मला माहिती असण्याचे त्यावेळी किंवा नंतरही काही कारण नव्हते. पुढे आमच्या दहावीच्या बॅचचा, म्हणजे शाळेतल्या सर्व तुकड्यांचा मिळून एक व्हॉट्सऍप ग्रुप तयार झाला आणि हा सुरेश राठोड आमच्या बरोबर होता असे कळले. 

मागच्या किंवा कदाचित त्याच्याही आधीच्या वर्षी, काहीतरी क्षुल्लक कारणाने राठोड ग्रुप सोडून गेला असल्याचे मला समजले होते. त्यावेळी, मी स्वतःहून त्याला फोन करून, तसे न करण्याचा सल्ला दिला होता. त्यावेळेस प्रथमच आमच्यात संभाषण झाले. तो आधी जरा बुजला होता, पण नंतर मोकळ्या गप्पा झाल्या. त्यानंतरच्या काळात, कधी वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस आणि सणासुदीला, व्हॉट्सऍपवर शुभेच्छांची देवाण घेवाण होत राहिली. या वर्षी, ३० जानेवारीला माझ्या मित्रमैत्रिणींना मी घरी चहाला बोलावले होते. मात्र, तो येऊ शकणार नसल्याचे त्याने मला फोनवर कळवले होते. "पुढे पुण्याला आलो की निश्चित भेटेन" असेही तो त्यावेळी म्हणाला होता. 

सुरेश राठोड कोव्हीड पॉझिटिव्ह झाल्याचे निदान त्याने स्वतःच मला ११ एप्रिलला कळवले. त्याचे सगळे रिपोर्ट्सदेखील त्याने पाठवले. त्याला अगदी सौम्य लक्षणे दिसत होती व रिपोर्टससुद्धा नॉर्मल होते. म्हणून, तो घरीच विलगीकरणात होता. पुढे एक-दोन दिवस त्याच्या तब्येतीची विचारपूस मी व्हॉट्सऍपवर करत होते. त्याला काहीच त्रास जाणवत नव्हता. त्यामुळे मग, "तुला काही वैद्यकीय मदत हवी असेल तर कधीही मला फोन कर" इतकेच आश्वासन देऊन मी  पुढे काही चौकशी केली नाही. 

१७ एप्रिलला सकाळी अचानकच, घाबऱ्या-घुबऱ्या आवाजात त्याचा फोन मला आला. त्याचा खोकला वाढला होता. मी त्याला त्वरित त्याच्या नेहमीच्या डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला दिला. "डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाच तर त्वरित ऍडमिट हो, घाबरू नकोस" असा धीरही मी त्याला दिला. त्याप्रमाणे तो डॉक्टरांकडे गेलाही. डॉक्टरांनी गोळ्या बदलून दिल्याचे त्याने सांगितले. १९ एप्रिलला मी पुन्हा त्याच्या तब्येतीची चौकशी व्हॉट्सऍपवर केली. तो बरा आहे असे त्याने मला २० एप्रिलला कळवले होते. 

आज अचानक तो गेल्याची बातमी माझ्या जीवाला फार चुटपुट लावून गेली. 

मी डॉक्टर असल्याने, मित्र-मैत्रिणींना आणि आप्तांना जमेल ती वैद्यकीय मदत करत असते. पण, राठोडच्या बाबतीत, 'मी कुठे कमी तर पडले नाही ना? त्याची तब्येत पूर्ववत झाली आहे की नाही हे मी पुन्हा विचारायला पाहिजे होते का?', असे मला सारखे वाटते आहे. 

मैत्रीच्या नात्याने त्याला जाबही विचारावासा  वाटतो, "अरे, तू निश्चित भेटतो म्हणाला होतास ना? मग असा न भेटता कसा गेलास?"

आता मात्र तो प्रश्न अनुत्तरितच राहणार. 

कै. सुरेश राठोड यास भावपूर्ण श्रद्धांजली.  

रविवार, २ मे, २०२१

कानामागून आली आणि ... !

आयुष्यभरात कधीही मी बागकाम केले नव्हते. पण गेल्या वर्षी आमच्या व्याह्यांकडच्या पानवेलीची कोवळी पाने वेलीवरून खुडून खाल्ल्यामुळे म्हणा किंवा माझ्या आत्याच्या बंगल्यातल्या बागेतला ताजा कढीलिंब फोडणीसाठी वापरल्यामुळे असेल, अचानकच मला बागकामाची हुक्की आली. सुरुवातीला, आपण आपल्या रोजच्या जेवणात वापरतो त्या वनस्पती लावाव्यात असा मी विचार केला. कढीलिंब, गवती चहा, पुदिना, तुळस, ओवा, बेसिल, मिरची  अशी रोपे लावली. आज सकाळी सहज शाळेच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर त्यातल्या एक-दोन रोपांचे फोटोही पाठवले. तसेच, मी लावलेली मिरचीची रोपे जगली नाहीत हेही मी लिहिले. लगेच ग्रुपवर चर्चा सुरु झाली. विषयही चांगला  तिखट होता... तो म्हणजे मिरची!


आज मिरची आपल्या भारतीयांच्या जेवणाचा अविभाज्य घटक झालेला असला तरी, मिरची बाहेरून आपल्या देशात आलेली आहे हे कोणाला सांगून खरे वाटणार नाही. सोळाव्या शतकात, वास्को-द-गामाच्या कृपेने भारतात मिरची आली असे म्हणतात. तोपर्यंत भारतात तिखटपणासाठी फक्त काळे मिरेच वापरले जात होते. खरे सांगायचे तर या मिऱ्यांच्याच वासावर पोर्तुगीज, फ्रेंच आणि ब्रिटिश व्यापारी भारतात आले असे म्हटले तरी अतिशयोक्ती होणार नाही. पण नंतर, सतराव्या आणि अठराव्या शतकात मात्र, ही मिरची भारतीय खाद्यजीवनाचा अविभाज्य घटक झाली. कदाचित या घटनाक्रमामुळेच "कानामागून आली आणि तिखट झाली" हा वाक्प्रचार पडला असावा. आज लाल, हिरव्या मिरच्यांशिवाय आपले जेवण होतच नाही!

मी अमेरिकेला पहिल्यांदा गेले तेंव्हा सुशी, बर्गर, पिझ्झा, नूडल्स, पास्ता वगैरे पदार्थ बरे वाटले. नाही म्हणायला पिझ्झावर ऍलोपिनो नावाच्या, तशा बेताच्या तिखट मिरच्या होत्या. मात्र तिकडे बाहेर मिळणारे एकूण सर्व जेवण मला मिळमिळीतच वाटले. त्यामुळे पुढील खेपेला मात्र माझ्या मुलीला, असिलताला, "निदान घरच्या जेवणात, भारतात मिळते तसली चांगली झणझणीत मिरची मला पाहिजेच" असे सांगून टाकले. तरीही, यांच्या देशात आपल्याकडे मिळते तशी झणझणीत मिरची कुठली मिळायला? असाच विचार माझ्या मनात होता. 

तसे पाहता, खादाडीमध्ये आम्हा दोघांपेक्षा असिलता अधिक दर्दी आहे. त्यामुळे, अमेरिकेत मिळणाऱ्या मिरच्यांबद्दल इत्थंभूत माहिती तिला होती. भारताबद्दल किती वृथा अभिमान आपण बाळगून असतो ते असिलताने मला लगेच दाखवून दिले. ती मला एका मोठ्या दुकानात घेऊन गेली. तिथून आणलेल्या, मेक्सिकोची 'हाबानेरो', थायलंडची 'बर्ड्स आय' अशा जातीच्या मिरच्या खाल्ल्यावर मात्र, माझा तो वृथा अभिमान माझ्या नाका-डोळ्यातून वाहणाऱ्या पाण्याबरोबर, अगदी शब्दशः गळून पडला. त्यानंतर, विविध जातींच्या मिरच्या आणि त्यांचा तिखटपणा यावर, असिलताने माझे एक झणझणीत बौद्धिक घेतले. 

मिरच्यांच्या बियांमध्ये तिखटपणा नसतो. त्यामुळे बिया खाल्ल्या तरी काही त्रास होत नाही ही माहितीही मला नव्यानेच समजली. अर्थात, मिरच्या खाल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी होणाऱ्या 'त्रासा'त, आपल्याला फक्त बियाच दिसतात! म्हणूनच, आपल्याला मिरचीच्या बियांचाच त्रास होतो असे आपल्याला वाटते, हेही माझ्या लक्षात आले. मिरचीचा सगळा तिखटपणा तिच्या सालींमधे असतो. सालींमधे कॅप्साइसिन (Capsaicin) नावाचे एक रसायन असते. मिरची खाल्ल्यावर हे रसायन आपल्या तोंडातल्या pain receptors ना उत्तेजित करते. ही संवेदना, क्षणार्धांत  आपल्या मेंदूपर्यत पोहोचून आपल्याला तिखटपणाची जाणीव होते. मिरचीचा तिखटपणा मोजण्यासाठी Scoville Heat Unit (SHU) वापरले जाते.

माझ्या संकुचित दृष्टीकोनामुळे, मला आपली कोल्हापूरची "लवंगी मिरची", किंवा फारतर आसामची "भूत जलोकिया" या भारतीय मिरच्या जगातल्या सर्वात जास्त तिखट मिरच्या असतील असेच वाटत होते. असिलताने इंटरनेटवरून याविषयी आणखीही बरीच रंजक माहिती काढून मला दाखवली. तिखटपणामध्ये आपल्या मिरच्यांचा नंबर बराच खाली आहे ही माहिती मात्र माझ्या नाकाला चांगलीच झोंबली! 

इतर देशांमध्ये मिरच्यांचे अनेक पदार्थ असतीलही. पण मिरच्यांपासून बनवलेल्या, आपल्या भारतीय पदार्थांचा मात्र मला सार्थ अभिमान आहे. ओल्या लाल मिरच्या आणि लसूण कुटून, त्यावरून फोडणी घालून केलेला रंजक्याचा चकचकीत रंग कुठल्याही रंगपेटीत मिळणार नाही. लोखंडी तव्यावर गरम तेलात ताज्या हिरव्या मिरच्या परतून, त्या अर्धवट मऊ झाल्यावर तव्यावरच खरडून, त्यात दाण्याचे कूट घालून, केलेला खर्डा अप्रतिम लागतो. हिरव्यागार मिरच्या उखळात किंवा खलबत्त्यात कुटून केलेला ठेचा तर लाजवाबच!

ठेचा, खर्डा किंवा रंजक्यासोबत झुणका-भाकरीच्या ताटापुढे पंचपक्वान्नाचे ताटही फिके पडते. डाळ फ्राय किंवा इतर काही पदार्थांवर, फोडणीत परतून घातलेली काश्मीरी मिरची फारच लोभस दिसते. मिरच्यांची भजी, खाराची मिरची, सांडगी मिरची, ताकातल्या मिरच्या, भरल्या भोंगी मिरच्या, असे अनेक पदार्थ, जेवणाला चव आणतात. 

म्हणूनच मी मनाशी म्हणते, "डोळ्यात पाणी आणायच्या बाबतीत जगातल्या इतर मिरच्या भले जास्त श्रेष्ठ असतीलही. पण मिरचीपासून केलेल्या आपल्या भारतीय पदार्थांच्या नुसत्या विचारांमुळेच आपल्या तोंडाला पाणी सुटते, हे विशेष नाही का?