शुक्रवार, १ डिसेंबर, २०२३

दीव-सोमनाथ-व्दारका- ४


१९६० च्या दशकामध्ये केंव्हातरी दादांनी सोमनाथ मंदिर बघितलेले होते. शिवाय, मंदिरामध्ये असलेली  तुफान गर्दी आम्ही आदल्या दिवशी पहिली होती. त्यामुळे १६ नोव्हेंबरला, आम्ही दादांना बरोबर न घेताच दर्शनाला जायचे ठरवले. आंघोळी करून आम्ही पाचजण पहाटे साडेसहा वाजेपर्यंत दर्शनाच्या रांगेमधे लागलो. पहाटेच्या वेळीही बरीच गर्दी होती. तरी आम्हाला सकाळची आरती बघायला मिळाली. आनंद, गिरीश आणि शिरीष पुरुषांच्या रांगेत आणि मी व प्राची बायकांच्या रांगेमध्ये होतो. कोणाजवळही मोबाईल नसल्यामुळे, दर्शनानंतर बाण-स्तंभाजवळ भेटायचे असे आधीच ठरवून ठेवले होते. काही वर्षांपूर्वी मोबाईलशिवायही आपले आयुष्य सुरळीत कसे चालू होते, याचे आज आश्चर्य वाटते. 

सोमनाथ मंदिर परिसरातील बाणस्तंभ हे एक मोठे आश्चर्य मानले जाते. या प्राचीन स्तंभावर असलेल्या बाणाचे टोक दक्षिणेला असलेल्या समुद्राकडे रोखलेले आहे. "आसमुद्रांत दक्षिण ध्रुवपर्यंत अबाधित ज्योतिर्मार्ग" असा संस्कृत भाषेतला मजकूर या बाणस्तंभावर लिहिलेला आहे. सोमनाथ मंदिराकडून सरळ रेषेमध्ये दक्षिणेकडे सागरी प्रवास सुरू केल्यास, हजारो मैल दूर असलेल्या दक्षिण ध्रुवापर्यंत जमिनीचा तुकडादेखील वाटेत लागणार नाही, असा त्याचा अर्थ आहे. कित्येक शतकापूर्वी, कुठलीही साधने अथवा उपकरणे नसताना, आपल्या पूर्वजांना हे सत्य कसे समजले असावे, याचे आश्चर्य वाटते. 

पहाटेच्या प्रसन्न वेळी फिरत-फिरत आम्ही सोमनाथ मंदिराचा संपूर्ण परिसर बघितला. त्यानंतर आपापले फोन, पर्सेस वगैरे ताब्यात घेतले आणि जवळच असलेल्या जुन्या शिवमंदिरात गेलो. पुण्यश्लोक अहल्याबाई होळकरांनी बांधलेल्या या जुन्या मंदिरामध्ये मात्र मोबाईल व इतर सामान नेण्यावर काहीही पाबंदी नव्हती. त्यामुळे तिथे आम्हाला फोटो काढता आले. दर्शन घेऊन झाल्यावर आनंद, शिरीष आणि गिरीश हॉटेलवर परतले. प्राचीला अभिषेक करायचा असल्याने आम्ही दोघी मागे थांबलो. प्राची भक्तिभावाने अभिषेक करत होती आणि मी नुसतीच 'मम' म्हणत होते. 


मुख्य सोमनाथ मंदिरात पूजा-अर्चा-अभिषेक इत्यादि करण्याची व्यवस्था नाही. ते सर्व विधी अहल्याबाईंनी बांधलेल्या जुन्या मंदिरातच करता येतात. त्याकरता ठरवून दिलेले शुल्क अनेक ठिकाणी फलकांवर लिहिलेले आहे. आपण जमा केलेले पैसे सोमनाथ ट्रस्टला मिळतात आणि ट्रस्टमार्फत नेमलेले गुरुजी ते विधी पार पाडतात. आपल्याला कोणी ओळखीचे गुरुजी हवे असल्यास त्यांच्याकडून आपण  विधी  करून घेऊ शकतो. पूजा झाल्यावर आम्ही दोघी हॉटेलवर परतलो. सोमनाथ देवळाच्या उत्तरेला काही अंतरावर प्राचीन सोमनाथ मंदिराच्या अवशेषांचे संग्रहालय आहे पण ते आम्ही पाहिले नाही. 

दुपारची विश्रांती झाल्यावर, आनंद, मी आणि गिरीश-प्राची असे चौघे सोमनाथमधील इतर देवस्थाने बघायला बाहेर पडलो. शिरीषला बरे वाटत नसल्याने तो दादांबरोबर हॉटेलमध्येच थांबला. आम्ही लक्ष्मीनारायणाचे देऊळ, सूर्यमंदिर, त्रिवेणी संगम, त्रिवेणी संगम मंदिर, गीता मंदिर, कामनाथ महादेव मंदिर इत्यादी अनेक मंदिरे बघितली. पाच पांडव गुहा सध्या बंद ठेवलेल्या असल्यामुळे त्या बघता आल्या नाहीत. भालका तीर्थ आणि देहोत्सर्ग स्थान ही दोन ठिकाणे भाविकांनी विशेष भेट द्यावीत अशी आहेत. पिंपळाच्या झाडाखाली झोपलेल्या श्रीकृष्णाला हरीण समजून व्याधाने बाण मारला आणि त्यामुळे श्रीकृष्णाचा देहांत झाला अशी पौराणिक कथा आहे. ज्या ठिकाणी ही घटना घडली त्याच ठिकाणी भालका तीर्थ आहे. हिरण नदीच्या काठावर देहोत्सर्ग तीर्थ आहे. तिथे भगवान श्रीकृष्णांच्या पावलांचा ठसा आहे. या दोन्ही मंदिरातही बरीच गर्दी होती आणि स्वच्छतेचा अभावच होता. 

सोमनाथ मंदिराच्या आवारात रोज संध्याकाळी ''light and sound show" असतो. त्या कार्यक्रमाची तिकिटे गिरीशने संध्याकाळी आधीच जाऊन काढली होती. कार्यक्रम उत्तम होता, पण त्यामध्ये मुख्य भर पौराणिक कथांवर होता. सोमनाथाचे देऊळ कोणी-कोणी आणि किती वेळा लुटले, याचा तपशीलही मिळेल या अपेक्षेने मी गेलेले असल्याने माझा थोडा अपेक्षाभंग झाला. देवळाच्या मागच्या बाजूला समुद्रकिनाऱ्यावर, अंबानी कुटुंबियांनी बांधलेले 'सागर दर्शन' नावाचे अतिथीगृह आहे. तिथे रास्त दरामध्ये राहण्याची उत्तम सोय उपलब्ध आहे. पण त्यासाठी त्यांच्या वेबसाइटवरून, बरेच आधी अर्ज करून आरक्षण करावे लागते. तिथले जेवणही शुद्ध-सात्विक आहे असे समजले. 

मागच्या वर्षी आम्ही इजिप्तला गेलो होतो. मूर्तिभंजक आक्रमणकर्त्यांनी तिथल्या प्राचीन मंदिरांची केलेली तोडफोड आम्ही पाहिली होती. मोठमोठ्या शिळा वापरून उभारलेली ती मंदिरे आपल्या मंदिरांपेक्षा अतिभव्य आकाराची असल्याने आक्रमणकर्त्यांना ती पूर्णपणे उध्वस्त करता आली नव्हती. मात्र त्या धर्मांध आक्रमणकर्त्यांनी  इजिप्तवासीयांचा धर्म पूर्णपणे नामशेष केला. त्यामुळे, आक्रमण होण्यापूर्वी प्राचीन इजिप्तवासीयांच्या धर्माचे नेमके स्वरूप कसे होते? या प्रश्नाचे उत्तर आज आपल्याला मिळत नाही. 

तुलना करायची झाल्यास, आपली मंदिरे जरी वेळोवेळी उद्ध्वस्त झाली तरी आपला धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा जतन  केला गेला, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. सोमनाथचे मंदिरही मुसलमान आक्रमकांनी कैक वेळा लुटून जमीनदोस्त केले. परंतु, प्रत्येक वेळी, तत्कालीन राजांनी ते मंदिर पुन्हा बांधून घेतले.  १९५१ साली पुनर्निमाण झालेले सोमनाथ मंदिर, सनातन धर्माच्या शाश्वततेचे प्रतीक म्हणून आज  दिमाखात उभे आहे. याच कारणामुळे हे  देऊळ बघण्याची माझी प्रबळ इच्छा होती. पण सोमनाथ मंदिराचा इतिहास बघता, एका गोष्टीचे मात्र मला कमालीचे वाईट वाटते. एकदा हल्ला झाल्यानंतर, आपल्या पूर्वजांनी या मंदिरावर पुन्हा-पुन्हा हल्ले का होऊ दिले? 

आजच्या युगात कोणी परकीय आक्रमक येऊन आपल्या मंदिरांवर हल्ला करण्याची शक्यता कमीच आहे. पण समाजमाध्यमांतून, जाहिरातींमधून, आणि लव्ह-जिहाद, सक्तीचे धर्मांतर अशा प्रकारातून, आपल्या धर्मावर आणि संस्कृतीवर सतत हल्ला होतो आहे. झालेला प्रत्येक हल्ला परतवण्यासाठी आपण सक्षम असायला हवे. परंतु, त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे, हल्ला करण्याची कोणाची हिंमतच होऊ नये, यासाठी आपण सजग राहिले पाहिजे असे मला वाटते .  

(क्रमशः)   

मंगळवार, २८ नोव्हेंबर, २०२३

दीव-सोमनाथ-व्दारका-३

१५ नोव्हेंबरच्या सकाळी आम्ही सगळेच आरामात उठलो. सामान आवरून, दोन टॅक्सी घेऊन आम्ही सोमनाथकडे निघालो. आमच्या चालकाने सुचवलेल्या, हायवे वरच्या एका हॉटेलमधे थांबून नाष्टा घेतला. सोमनाथ देवस्थान प्रभास पाटण या गावामधे आहे. दीव ते प्रभास पाटण हे अंतर ९५ किलोमीटर आहे. रस्ता चांगला असल्याने आम्ही एक वाजायच्या आतच प्रभास पाटण येथील हॉटेलमधे पोहोचलो. त्या दिवशी दुपारी भारत आणि न्यूझीलंड दरम्यान होणारा विश्वचषक उपांत्य फेरीचा सामना, कुठल्याही परिस्थितीत शिरीषला चुकवायचा नव्हता. म्हणूनच सोमनाथला दुपारी एक वाजायच्या आत पोहोचण्याबाबत तो आग्रही होता. आपापल्या खोल्यांचा ताबा घेऊन स्थिरस्थावर होईपर्यंत भारत-न्यूझीलंड सामना सुरू झाला होता.

सकाळी उशीरा आणि भरभक्कम नाष्टा केलेला असल्याने कोणालाही जेवायची इच्छा नव्हती. तसे अडीअडचणीला उपयोगी पडावा म्हणून मी आणि प्राचीने, एका पिशवीमध्ये दिवाळीचा फराळ भरून आणला होता. खाद्यपदार्थाच्या गच्च भरलेल्या त्या पिशवीचे नामकरण शिरीषने 'गाझा पिशवी' असे केले होते! त्याच्या म्हणण्याप्रमाणे, हेलिकॉप्टरने ती पिशवी गाझा पट्टीमध्ये टाकली तर युद्धविराम होईपर्यंत तमाम गाझावासियांना पुरून उरतील इतके खाद्यपदार्थ त्या पिशवीत होते! त्याउप्पर, शिरीषच्या मित्राने आणि शिरीषच्या सासूबाईंनी बांधून दिलेला फराळ त्याने सोबत आणलेला होता, तो वेगळाच! त्यामुळे एखादे-एखादे जेवण चुकले आणि अगदीच भूक लागली तर चिवडा, लाडू, शंकरपाळे, चिरोटे आणि चकल्यांवर भागवायचे, असा अलिखित नियम आम्ही केला होता. 

त्याच संध्याकाळी सोमनाथ देऊळ बघण्याची माझी व प्राचीची इच्छा होती. पण आम्ही काही बोलायच्या आतच, सामना संपेपर्यंत कुठेही बाहेर न पडण्याचा निर्णय चौघाही पुरुषांनी जाहीर करून टाकला. त्यामुळे आम्ही दोघीच, दुपारच्या चहानंतर रिक्षा पकडून देवदर्शनाला निघालो. आम्हा सहा जणांपैकी श्रद्धाळू म्हणावे अशी फक्त प्राचीच होती. आधीच्या बेतानुसार गिरीश आणि प्राची असे दोघेच सोमनाथ-द्वारका करणार होते. नंतर मीही सोबत येतेय हे समजल्यावर, प्राचीबरोबर देवळामधे जाण्याचे काम गिरीशने अगदी तत्परतेने मला आऊटसोर्स करून टाकले होते! मला देवळे बघायला आवडत असल्याने मीही ते आनंदाने स्वीकारले होते.  

मंदिर परिसरात अतोनात गर्दी असल्याने, देवळापासून चार-पाचशे मीटरच्या अंतरावर पोलिसांनी वाहनप्रतिबंधक अडथळे लावून ठेवले होते. रिक्षावाल्याने ज्या ठिकाणी आम्हाला सोडले, तिथे समोरच लक्ष्मीनारायण मंदिर दिसत होते. त्या देवळात दर्शन घेऊन, उजवीकडे वळून आम्ही समुद्राच्या दिशेने, म्हणजे सोमनाथ मंदिराकडे पायी चालत निघालो. अनेक शतके भग्नावस्थेत आणि दुर्लक्षित असलेल्या सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाचे कार्य श्री. वल्लभ भाई पटेलांच्या पुढाकारामुळे १९५१ साली पूर्ण झाले. अतिशय भव्य आणि देखणे असे हे मंदिर आहे. 
मुख्य सोमनाथ मंदिरात मोबाईल, बॅग्स, पर्सेस, डिजिटल घड्याळे आणि अर्थातच चपला न्यायला मनाई आहे. या वस्तू लॉकरमध्ये ठेवण्याची मोफत व्यवस्था आहे. आपण आपली वस्तू ठेवली की आपल्याला एक टोकन मिळते. ते टोकन परत केले की आपली वस्तू आपल्याला परत मिळते. मात्र, मोबाईल्स एका ठिकाणी, पर्स दुसऱ्याच ठिकाणी आणि चप्पल्स तिसऱ्याच  ठेवायची असल्याने बराच वेळ वाया जातो. देवळात फार गर्दी असेल तर लॉकरमध्ये जागा नसते आणि बराच वेळ तिष्ठत उभे राहावे लागते. त्या दालनामध्ये सर्वत्र CCTV कॅमेरे बसवले असल्यामुळे वस्तू चोरीला जाण्याची भीती जरा कमी असते. आमचे मोबाईल्स, पर्सेस आणि चप्पल्स ठेऊन, टोकन घेऊन आम्ही महिलांच्या बारीमध्ये उभे राहिलो. 

रांगेमध्ये जवळपास तास-दीडतास उभे राहिल्यानंतर आम्ही देवळामध्ये पोहोचलो. गर्दी असल्याने, लांबूनच जेमतेम काही सेकंद दर्शन मिळाले. संध्याकाळच्या आरतीच्या दोन मिनिटे आधीच आम्ही गाभाऱ्यात पोहोचल्यामुळे, ती आरती बघायला मिळाली नाही. बाहेर पडून, परत रांगेत घुसून आरती बघण्याचा प्रयत्न केला पण आम्ही  गाभाऱ्यापर्यंत पोहोचेस्तोवर आरती संपून गेली होती. 

देवळाच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ आणि हिरवागार ठेवलेला आहे. देवळाच्या मागच्या बाजूला समुद्रतट आहे. समुद्रकिनाऱ्यावर असलेला सुप्रसिद्ध, दिशादर्शक बाणस्तंभ आम्ही बघितला. मुख्य मंदिराजवळच एक जुने शिवमंदिरदेखील आहे.  १७७३ साली पुण्यश्लोक अहल्याबाई होळकरांनी ते बांधून घेतले होते. त्या मंदिरातही जाऊन आम्ही दर्शन घेतले. अशा रीतीने सर्व परिसराची पाहणी (Recce) करून आम्ही हॉटेलवर परतलो. सोमनाथ मंदिराची महती, आणि त्याचा इतिहास यावर पुढील भागांमध्ये लिहीन.   




 

शनिवार, २५ नोव्हेंबर, २०२३

दीव-सोमनाथ-व्दारका-२

१४ नोव्हेंबरला दुपारचे ऊन ओसरल्यावर आम्ही INS Khukri स्मारक बघायला बाहेर पडलो. १९७१ सालच्या भारत-पाकिस्तान युद्धामधे, भारतीय नौदलाचे हे लढाऊ जहाज पाकिस्तानी पाणबुडीने केलेल्या सागरी हल्ल्यामध्ये कामी आले. दिनांक ९/१२/१९७१ या दिवशी, दीवच्या किनाऱ्यापासून ४० सागरी मैल दूरवर या जहाजाला आणि त्यावरील १८ नौदल अधिकारी आणि १७६ नौसैनिकांना जलसमाधी मिळाली. खुकरी जहाजाचे अवशेष आजही दीवजवळ समुद्राच्या तळाशी पडून आहेत. 

नौदलाच्या परंपरेप्रमाणे, जहाजावरील सर्व व्यक्ती सुखरूप बाहेर पडल्याशिवाय जहाजाचा कप्तान जहाज सोडत नाही. ती परंपरा सांभाळत, 'खुकरी'चे मुख्य अधिकारी, कॅप्टन महेंद्रनाथ मुल्ला यांनी जहाजासोबतच जिवंत जलसमाधी घेतली. भारतीय नौदलाने, कॅप्टन महेंद्रनाथ मुल्ला यांना मरणोत्तर महावीरचक्र देऊन त्यांचा गौरव केला. INS Khukri स्मारकाचे उद्घाटन १५ डिसेंबर १९९९ साली, नौदलाच्या पश्चिम विभागाचे तत्कालीन मुख्य अधिकारी, व्हाईस ऍडमिरल माधवेंद्र सिंग यांच्या हस्ते केले गेले. हे स्मारक चोवीस तास खुले असते आणि इथे जाण्यासाठी काहीही प्रवेशशुल्क आकारले जात नाही. 

आम्ही स्मारकाजवळ पोहोचलो त्यावेळी ऊन उतरलेले असल्याने हवा आल्हाददायक होती. समुद्रकिनाऱ्याजवळच एका टेकाडावर हे स्मारक उभे केलेले आहे. हे छोटेसे टेकाड चढून जाणे सहजी शक्य आहे.  तसेच वर जाण्यासाठी, बॅटरीवर चालणाऱ्या गोल्फ कार्टची व्यवस्था अगदी माफक दरात उपलब्ध करून दिलेली आहे. दादा आमच्याबरोबर असल्याने आम्ही सर्वजण गोल्फ कार्टनेच वर गेलो. त्या टेकाडावर उभे राहून, तेथे फुलवलेल्या बागेकडे नजर टाकल्यास,  समुद्राच्या लाटांचा आभास होतो. टेकाडावरील बाग, आसपासचा परिसर आणि अगदी समुद्रालगत असलेले अँफीथिएटर, हा सर्व परिसर अतिशय स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटका ठेवलेला आहे. 

टेकाडावरील सर्वात उंच जागी, चहूबाजूंनी काचेच्या भिंती असलेल्या एका बंदिस्त खोलीत खुकरी जहाजाची प्रतिकृती ठेवलेली आहे. समुद्राच्या दिशेला तोंड करून ठेवलेली जहाजाची प्रतिकृती काचेतून व्यवस्थित दिसते. १९७१ साली भारत-पाकिस्तान युद्धामधल्या त्या दुर्दैवी घटनेत जलसमाधी मिळालेल्या सर्व वीर नौसैनिकांची नावे त्या काचेच्या भिंतींवर लिहिलेली आहेत. स्मारकाजवळ उभे राहून आम्ही त्या सर्व वीरांना, मनोमन श्रद्धांजली वाहिली. स्मारकाचा स्वच्छ परिसर, समुद्राच्या तटावर असलेले सुंदर, खुले अँफी थिएटर, आणि त्या तटाला धडक देणाऱ्या फेसाळत्या लाटा, हे सगळे दृश्य अतिशय मनोहर होते. पण तरीही, खुकरी दुर्घटनेच्या आठवणीमुळे, "आहे मनोहर तरी गमते उदास" अशाच काहीश्या संमिश्र भावना आमच्या मनामध्ये होत्या. 

१९७१ च्या युद्धात खुकरी जहाज बुडाल्यानंतर काही वर्षांनी, भारतीय नौदलामधील Corvette प्रकारच्या दुसऱ्या एका जहाजाला पुन्हा 'खुकरी' हेच नाव दिले गेले. हे भारतीय बनावटीचे जहाज, माझगाव डॉक येथे तयार केले गेले होते. ऑगस्ट १९८९ मध्ये नौदलाच्या सेवेत रुजू झालेले हे खुकरी जहाज डिसेंबर २०२१ मध्ये नौदलाच्या सेवेमधून निवृत्त झाले. जानेवारी २०२२ मध्ये नौदलाने ते जहाज दीव प्रशासनाकडे हस्तांतरित केले. आता ते दीवच्या समुद्रकिनाऱ्यावर नांगर टाकून उभे आहे आणि तरंगते संग्रहालय म्हणून ओळखले जाते. लढाऊ जहाजामध्ये वापरली जाणारी विविध शस्त्रे व उपकरणे आणि इतर काही वस्तू या संग्रहालयामध्ये ठेवलेल्या आहेत. खुकरी स्मारक पाहून निघाल्यावर खरं तर आम्हाला हे 'खुकरी संग्रहालय' बघायला जायचे होते. पण सर्वानुमते आमचे असे ठरले की आधी संग्रहालय पाहण्याऐवजी दिवसाउजेडी नागोवा बीचवर जाऊन यावे. 

दीव गावापासून सुमारे तेरा किलोमीटर अंतरावर आणि दीव विमानतळापासून अगदी जवळ नागोवा बीच आहे. इथे दीवमधली सर्वात आलिशान आणि महागडी हॉटेल्स आहेत. दीवमधल्या बऱ्याच  हॉटेल्सचे दर पर्यटनाचा मौसम सुरु झाला की गगनाला भिडतात. इतरवेळी ३ ते ४ हजार रुपये रोजचे भाडे अससेल्या हॉटेलच्या खोलीसाठी काही लोकांना १५ ते २०००० रुपये मोजावे लागले होते. आम्ही उतरलेल्या हॉटेलमध्येही आमची अशीच लुबाडणूक झाली होती. दीव हे गुजरातशेजारच्या केंद्रशासित प्रदेशातील शहर गुजरातच्या सीमेलगतच आहे. गुजरातमध्ये दारूबंदी असल्यामुळे आणि या केंद्रशासित प्रदेशात दारूबंदी नसल्यामुळे, खास मद्यपान करण्यासाठी अनेक गुजराती पर्यटक या ठिकाणी येतात, असे मी ऐकून होते. 'खास पिण्यासाठी' आलेले वाटावेत अशा पर्यटकांची गर्दी नागोवा बीचच्या आसपास दिसली. 

समुद्रकिनारी हजारो पर्यटकांची गर्दी उसळली होती. त्यातच अनेक फिरंगी पर्यटकही होते. एकुणात हा बीच म्हणजे दीव मधील 'Happening place' आहे, हे जाणवत होते. बीचकडे जाणाऱ्या वाटांवर दुतर्फा, गिचमिडीत अनेक छोटी-छोटी दुकाने होती. कपडे, फळे, खाद्यपदार्थ, फुगे, खेळणी, शीतपेये आणि आईस्क्रीम विक्रेते मोठमोठ्याने ओरडून लोकांना आपापल्या दुकानात बोलावत होते. तसेच जवळपासच्या हॉटेल्समध्ये भरपूर रोषणाई, पाश्चात्य संगीत, अशी चहल-पहल दिसत होती. 

पुळणीवर समुद्राला समांतर फेरफटका मारण्यासाठी उंट आणि मोटारबाईक होत्या. तसेच समुद्राच्या पाण्यावर नौकाविहाराला जाण्यासाठी स्पीड बोट्स व साध्या बोटीही दिसत होत्या. दूरवर पॅरासेलिंग चाललेले दिसले. चार वर्षांपूर्वी मी दिवेआगारला प्रथम पॅरासेलिंग केले होते. त्यावेळी जीपला बांधलेल्या एकाच पॅराशूटच्या सहाय्याने मी आणि आनंद, दोघेही हवेत उंच उडालो होतो. पॅरासेलिंगची ती माझी पहिलीच वेळ असल्यामुळे, 'कधी एकदा सुखरूप खाली पोहोंचतोय' या विचाराने मी जीव मुठीत धरून बसले होते. त्यामुळे हवेत तरंगण्याचा आनंद फारसा अनुभवता आला नव्हता. आता मात्र मला आणि प्राचीलादेखील पॅरासेलिंग करायची उर्मी आली. वाऱ्यावर  हेलकावत, हवेत उंच  जाण्याचा आनंद यावेळी उपभोगायचाच अशी खूणगाठ मी मनाशी पक्की केली. पण प्रत्यक्ष वर जाताना आणि खाली येताना पोटामध्ये गोळा उठल्याशिवाय राहिला नाही. प्रशिक्षकाने सांगितल्याप्रमाणे, पॅराशूटच्या दोरीवर घट्ट पकडलेले हात काही सेकंदासाठी सोडून, पक्ष्याच्या पंखाप्रमाणे हवेत पसरून मी हलवले. पॅराशूटमध्ये वारं भरून आपण वर गेलो की आपले अंगही अगदी हलके भासते. अर्थात वजन घटल्याचा तो आनंद क्षणिक असतो, कारण काही मिनिटांतच आपल्याला जमिनीवर आणले जाते! 

मला वाटते प्रत्येक व्यक्तीने आयुष्यात एकदा तरी पॅरासेलिंगचा अनुभव घ्यायलाच हवा. 

पॅरासेलिंग करून येईपर्यंत आम्हाला उशीर झाला होता. खुकरी संग्रहालयाला भेट देणे आम्हाला शक्य झाले नाही. दीवमधल्या प्रत्येक प्रेक्षणीय ठिकाणी, उघड्या पोत्यांमध्ये ठेवलेला सुकामेवा आणि गरम मसाल्याचे  छोटे-छोटे ढीग किंवा वाटे विकणारे विक्रेते दिसले होते. अगदी उत्तम प्रकारचा सुकामेवा बाजारभावाच्या निम्म्या भावात इथे उपलब्ध होता. तो इतका स्वस्त कसा काय विकत असतील? हे कोडे मात्र सुटले नाही. कदाचित तो कर चुकवून आणलेला किंवा तस्करीचा विदेशी माल असू शकेल असे आम्हाला वाटले. नमुन्यादाखल आम्ही सुकामेवा विकत घेतला, आणि थोडा-थोडा सुकामेवा तोंडात टाकत, साडेसात-आठ वाजेपर्यंत हॉटेलमधे परतलो. जेवणानंतर पुन्हा पत्त्यांचे डाव रंगल्यामुळे झोपायला बराच उशीर झाला.     

शुक्रवार, २४ नोव्हेंबर, २०२३

दीव-सोमनाथ-व्दारका-१

यंदाच्या दिवाळीत लक्ष्मीपूजन झाल्यानंतर, गिरीश-प्राची, म्हणजे माझे भाऊ-वहिनी, मुंबईहून सोमनाथ-द्वारका दर्शनासाठी जाणार होते. मी, आनंद, माझा चुलतभाऊ शिरीष, आणि  'दादा', म्हणजे माझे वडील, अशा चौघांनीही त्यांच्याबरोबर जायचे ठरवले. त्यानुसार १३ नोव्हेंबर २०२३ च्या दुपारी मुंबईहून दुपारची फ्लाईट पकडून आम्ही तासाभरात दीवला पोहोचलो. आधीच्या आठवडाभराचे जागरण, पुणे-मुंबई प्रवास, दिवाळीच्या कामांची दगदग अशामुळे आम्ही सगळे दमलो होतो. जेवण झाल्यावर सगळेजण झोपून गेलो. संध्याकाळी चहा घेऊन पत्त्यांचे  डाव लावले आणि सुट्टी सुरू झाल्यासारखे वाटले.


दुसऱ्या दिवशी, म्हणजे १४ नोव्हेंबरच्या सकाळी एक खाजगी टॅक्सी करून आम्ही दीव-दर्शन करायला बाहेर पडलो. सर्वप्रथम आम्ही दीवचा किल्ला बघितला. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर पोर्तुगीजांनी बांधलेला हा किल्ला  अतिशय प्रेक्षणीय आहे. दीव या बेटावर पूर्वापार अनेक राज्यकर्ते राज्य करून गेले. पण १३३० साली गुजरातेतील सुलतान शाहबहादूर याने दीव जिंकून घेतले. १४९८ साली पोर्तुगीजांनी भारतभूमीवर पाय ठेवला. त्यानंतर ते भारताच्या किनारपट्टीवरील एकेका बंदरात आपले पाय रोवू लागले. अनेक वर्षे, दीव येथे किल्ला बांधण्याची परवानगी पोर्तुगीज गुजरातच्या सुलतानाकडे मागत होते. पण, मलिक अय्याझ नावाचा, सुलतानाचा एक सुभेदार पोर्तुगीजांच्या मागणीला सातत्याने विरोध करत राहिला. १५३५ साली मुघल सम्राट हुमाँयू याने गुजरातच्या सुलतानावर स्वारी केली. त्यावेळी  सुलतान शाहबहादूर याने 'नुनो दा कुन्हा' या पोर्तुगीज अधिकाऱ्याशी युती केली. मुघलांच्या विरुद्ध लढण्यासाठी सुलतानाला मदत करण्याच्या बदल्यात पोर्तुगीजानी दीव किनाऱ्यावर किल्ला बांधण्याची परवानगी सुलतानाकडून मिळवली. पोर्तुगीजांनी १५३७ ते १९६१ असे जवळपास सव्वाचारशे वर्षे दीव-दमण या भागावर राज्य केले. 

दीव  बेटाच्या नैऋत्य टोकावर वसवलेला हा मजबूत किल्ला अजूनही उत्तम स्थितीत आहे.  किल्ल्याच्या तिन्ही बाजूने समुद्र आहे. त्या अथांग सागराचे दर्शन आपल्याला श्वास  रोखायला लावते. बाहेरील तटबंदी समुद्रकिनाऱ्यालगतच आहे. आतल्या तटरक्षक भिंतीवर सर्वबाजूनी तोफा मांडलेल्या आहेत. दोन्ही भिंतींच्या मधल्या खंदकामध्ये पाणी आहे. मुख्य प्रवेशदारातून आत आल्यावर उजव्या बाजूला पाच मोठ्ठ्या खिडक्या असलेली भिंत दिसते. डाव्या बाजूला भर समुद्रात वसलेला, 'पाणकोट' नावाचा जलदुर्ग आपले लक्ष वेधून घेतो. किल्ल्याचे प्रवेशद्वार, बुरुज, आतील कमानी, मजबूत तटबंदी हे पाहिल्यावर, हा किल्ला चार शतके अभेद्य का राहिला असावा हे समजून येते. किल्ल्याच्या एका टोकाला समुद्राच्या आत घुसणारी वाट, म्हणजेच बोटींना थांबण्यासाठीचा धक्का आहे. किल्ल्याच्या आत एक कैदखाना, चर्च, दारुगोळ्याचे कोठार, छोटेखानी दीपगृह अशा काही इमारती आहेत. किल्ल्याच्या आत असलेले एक तुळशी वृंदावन पाहून मला आश्चर्यच वाटले. बारकाईने पाहता, त्यावर सोमवार दि. १३/१२/१९४३ असा तपशील कोरलेला दिसला. म्हणजेच किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात असतानाच्या काळातलेच ते तुळशी वृंदावन होते! परंतु, ते कोणी व का बांधले असावे हे मात्र गूढच राहिले. 


किल्ला पाहून झाल्यावर आम्हाला दीवचे सुप्रसिद्ध सेंट पॉल चर्च बघायचे होते. पण त्या चर्चचा जीर्णोद्धार होत असल्यामुळे ते बंद होते आणि आम्हाला ते बाहेरूनच बघावे लागले. चर्चेच्या शुभ्र, दिमाखदार इमारतीचे बाह्यदर्शनही खूप सुखावह होते. त्यानंतर आम्ही दीवपासून तीन किलोमीटर अंतरावरच्या  फुडम  गावाजवळ गंगेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी गेलो. हे प्राचीन मंदिर पांडवांनी बांधले आहे असे मानले जाते. या ठिकाणाला मंदिर म्हणण्यापेक्षा देवस्थान म्हणणे योग्य आहे. कारण, याची रचना कोणत्याही सर्वसामान्य मंदिराप्रमाणे नाही. समुद्रकिनाऱ्यालगतच्या एका खडकाच्या पोटात नैसर्गिकरीत्या एक गुहा बनलेली आहे. या गुहेमध्ये किंवा दगडाच्या खोबणीमध्ये, पाच सुबक शिवलिंगे आहेत. हे देवस्थान अतिशय सुंदर आहे. समुद्राच्या लाटा अहोरात्र या शिवलिंगांवर अभिषेक करत असतात. समुद्राला भरती आल्यावर, समुद्रात घुसणारा खडकाचा एक सुळका वगळता बाकी संपूर्ण खडक पाण्याखाली लुप्त होतो, हे या मंदिराचे वैशिष्टय आहे. 


सकाळपासून जवळपास तीन-चार तास कडक उन्हामध्ये बाहेर हिंडल्याने आम्हाला दमणूक जाणवायला लागली होती. त्यामुळे दुपारच्या वामकुक्षीनंतरच पुन्हा बाहेर पडायचे ठरवून आम्ही हॉटेलवर परतलो.  
 

मंगळवार, ३ ऑक्टोबर, २०२३

नियमबाह्य ?

एक-दोन वर्षांपूर्वीपर्यंत, एकदा का आम्ही हायवेला लागलो की आमचीं चारचाकी गाडी सुसाट चालवत प्रवास करत असू. "छोट्या गाडीनेदेखील कसे आम्ही तीन तासांत पुण्याहून मुंबई आणि साडेतीन तासात पुण्याहून सोलापूर गाठतो", अशी फुशारकी आम्ही मारत असू. पण एकदा असे झाले की, आमच्या गाडीने निर्धारित वेगमर्यादा ओलांडल्याचे दृश्य 'स्पीड गन'च्या कॅमेरामध्ये टिपले गेले आणि आम्हाला १००० रुपयांचा दंड भरावा लागला. त्या घटनेमुळे आमच्या गाडीच्या वेगालाच नव्हे तर जाहीरपणे फुशारक्या मारण्यालाही आपोआपच चाप बसला. त्यानंतर मात्र, "आम्ही वेगमर्यादेचे उल्लंघन कधीही करत नाही", असे सांगून आम्ही मोठेपणा मिळवू लागलो. मात्र, १००० रुपयांचा भुर्दंड बसल्यानंतरच आम्ही नियम पाळायला लागलो, ही कबुली अर्थातच आम्ही कुणापुढे देत नव्हतो! 


आज सकाळी, गाडीच्या टपावरच्या कॅरियरवर सामान बांधून, आम्ही सोलापूर-पुणे प्रवासाला सुरुवात केली. एक टोल पार करून पुढे आलो तोच, रस्त्यावर उभ्या असलेल्या एका सहाय्यक फौजदाराने आम्हाला थांबवले. त्यांनी काही विचारायच्या आतच आनंदने गाडीची कागदपत्रे आणि स्वतःचा वाहनपरवाना त्यांच्या हातात दिला. "गाडीवर कॅरियर बसवून, सामान लादून नेण्याची परवानगी फक्त व्यावसायिक वाहनांना आहे, खाजगी वाहनांना नाही" असे सांगून त्या सहाय्यक फौजदार साहेबांनी आमच्या गाडीचे फोटो काढायला सुरुवात केली.  

गेली दहा वर्षे आम्ही CNG वर चालणारी 'मारुती वॅगन-आर' गाडी वापरतो. CNG चा सिलिंडर गाडीची संपूर्ण डिकी व्यापत असल्यामुळे, आम्ही सुरुवातीपासूनच गाडीवर कॅरियर बसवून घेतले होते. अनेकवेळा आम्ही कॅरियरवर सामान लादून प्रवास करीत  होतो. पण आत्तापर्यंत कधीच दंड भरावा लागलेला नव्हता. तसे करणे नियमबाह्य आहे, हेही आज प्रथमच ऐकले होते. 

"तसा काही नियम आहे का ते गूगलवर तपासून बघा" असे आनंदने मला आणि आमच्या भाचेसुनेला सांगितले. गूगलमावशीने काढून दिलेल्या एक-दोन अनधिकृत लिंक्समधून, असा काही नियम नसल्याचे आम्हाला कळले. मग आनंदने त्या सहाय्यक पोलीस फौजदाराला, "तुम्ही म्हणता तो नियम मला दाखवलात तर मी लगेच दंड भरायला तयार आहे" असे सांगितले. 

दरम्यान, कुठे काही अधिकृत  माहिती मिळते आहे का,  याचा आम्ही दोघी तपास करू लागलो.  

'नियम दाखवा आणि मगच दंड वसूल करा', असा पवित्रा आनंदने घेतल्याने त्या सहाय्यक फौजदाराने आनंदला, जवळच उभ्या असलेल्या पोलीस उपनिरीक्षक (PSI)कडे नेले. त्या अधिकाऱ्यानेदेखील तो नियम शोधण्यासाठी गुगलमावशीचेच पाय धरले. पाच-दहा मिनिटे खटाटोप केल्यावरही त्यांना तो नियम सापडेना. 

शेवटी त्या अधिकाऱ्याने आनंदला विचारले, "साहेब, आपण काय काम करता?" 

आनंद निवृत्त सेनाधिकारी आहे, हे समजल्यावर मात्र नरमाईचा स्वर लावत ते पोलीस उपनिरीक्षक आनंदला  म्हणाले, "अहो साहेब, हे आधीच नाही का सांगायचे? आम्ही तुमचा इतका वेळ घेतलाच नसता. जा तुम्ही" 

ते सहाय्यक फौजदारसाहेबही खजील होऊन आनंदला म्हणाले "साहेब मी पावती फाडण्याबद्दल कुठे काय म्हणालो होतो?"

दंड  भरावा लागला नाही या आनंदात आम्ही सुटकेचा निश्वास सोडला आणि पुढे निघालो. 

पण, "खाजगी वाहनाच्या कॅरियरवर सामान लादून प्रवास करणे नियमबाह्य होते, की आनंद निवृत्त सेनाधिकारी आहे, हे कळल्याबरोबर त्याला तातडीने सोडून देणाऱ्या पोलिसांचे वर्तन नियमबाह्य होते?"  या विचाराने मला आता ग्रासून टाकले आहे!

बुधवार, २७ सप्टेंबर, २०२३

आठवणींची पुडी!

आज सोलापुरात सकाळी सकाळी काही किराणामाल विकत घ्यायला घराबाहेर पडले. नऊ वाजत आले होते तरी एक-दोनच दुकाने उघडी दिसली. एका दुकानातून  सामान घेतले. त्या दुकानदाराने सगळे सामान वर्तमानपत्राच्या कागदाच्या वेगवेगळ्या पुड्यांमधे बांधून दिले. 
अलिकडे कित्येक वर्षांमधे मला अशा कागदाच्या पुड्या बघायची सवयच राहिलेली नाही. दुकानदाराने अगदी सफाईने भराभर पुड्या बांधल्या होत्या. घरी येईपर्यंत एकही पुडी सुटली नव्हती, हे विशेष. प्रत्येक पुडीच्या आत वर्तमानपत्राचा एक छोटा तुकडा बाहेरच्या मोठ्या तुकड्याला आधार देत होता! 

पूर्वी माझ्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक असलेली ही पुडी अचानकपणे माझ्या समोर आल्यामुळे मी भूतकाळात शिरले गेले. लहानपणी आईबरोबर  वाणीसामान आणायला मी जायचे. किराणामालाच्या दुकानात वर एक दोऱ्याने रीळ लटकवलेले असायचे. दुकानातले नोकर, सामानाच्या भराभर पुड्या बांधून द्यायचे त्यावेळी ते रीळ एका लयीत नाचत असायचे! घरी आल्यावर तो दोरा अगदी जपून सोडून आम्ही एका काडीला गुंडाळून ठेवायचो. तो दोरा पुडी बांधायला उपयोगी यायचा. "रिड्यूस, रीयुज आणि रिसायकल" या त्रिसुत्रीचा कुठल्याही प्रकारचा गाजावाजा किंवा घोष न करता आपण त्या त्रिसुत्री आचरणात आणत होतो.  

आपल्या आयुष्यात किराणामालाच्या व्यतिरिक्त अनेक पुड्या यायच्या. अनेकांच्या घरी फुलपुडा यायचा. तो तर पानात बांधलेला असायचा. भेळेच्या गाडीवर भेळ बांधून घेतली की ती कागदाच्या पुड्यातच  मिळायची. भाजलेल्या शेंगांची निमुळती पुडी खूपच मोहक दिसायची. देवळातला अंगाऱ्याची चपटी पुडी, परीक्षेला जाताना किती आधार देऊन जायची! केळी सुद्धा वर्तमानपत्रात बांधून दिली जायची. 

पण मधल्या काळात आपल्या नकळत या सगळ्या पुड्यांची जागा प्लॅस्टिकने घेतली आणि सगळ्या पुड्या गायब झाल्या. आज ही पुडी बघितल्यानंतर अचानक त्या सगळ्या पुड्या माझ्या डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. आज आता या लेखाच्या निमित्ताने ही पुडी मी सोडून दिलीय. आता तुम्हाला कोणकोणत्या पुड्या आठवत आहेत, ते सांगा बरं! 

सोमवार, १२ जून, २०२३

शिमला-कसौली भाग- १३:-दगशाईचा तुरुंग!

६ मे चा दिवस हा आमच्या सहलीचा शेवटचा दिवस होता. त्या दिवशी सकाळी ११ वाजेपर्यंत आम्हाला आमची खोली सोडायची होती. दुपारी आनंदचा मित्र, मेजर जनरल मनदीप कोहली याने आम्हाला कसौली क्लबमध्ये  जेवायला बोलावले होते. कसौलीच्या हॉलिडेहोमची देखरेख करणाऱ्या हवालदाराला, "आमची खोली जरा उशीरा सोडली तर चालेल का? असे आम्ही विचारले. त्याने  उशीरात उशीरा दुपारी चार वाजेपर्यंत खोली सोडता येईल असे सांगितले. जनरल कोहली आणि पम्मी कोहली यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारत आमचे  जेवण दोन वाजेपर्यंत संपले. त्यानंतर आम्ही कसौलीच्या, Central Reasearch Institute या सुप्रसिद्ध संस्थेला भेट दिली. तिथे वेगवेगळ्या आजारावरच्या लसी कशा तयार होतात, याची माहिती घेतली.   

आम्ही त्या रात्री बाराच्या सुमारास नेताजी एक्सप्रेसने काल्काहून दिल्लीला जाणार होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी दिल्लीहून मुंबईला विमानाने परतणार होतो. कसौली ते काल्का टॅक्सीने जेमतेम दोन तासांत पोहोचता येते. त्यानंतर  काल्का रेल्वेस्थानकावर पाच ते सहा तास वेळ कसा काढायचा? हा प्रश्न आमच्या समोर होता. पण कर्नल प्रताप जाधव (सेवानिवृत्त), या आनंदच्या  मित्राने तो प्रश्न चुटकीसरशी सोडवला. कसौलीहून काल्काला जाण्याआधी थोडी वाट वाकडी करून दगशाई छावणीला भेट द्यायचा सल्ला त्याने आम्हाला दिला. तिथे असलेले दगशाई कारागृह आणि दगशाई संग्रहालय ही दोन्ही ठिकाणे आवर्जून बघण्यासारखी आहेत, असेही तो म्हणाला. आम्हाला वेळ काढायचा होताच. त्यामुळे आम्ही साधारण तीन-साडेतीन  वाजेपर्यंत कसौली हॉलिडे होम सोडले आणि दगशाईचा  रस्ता पकडला. भरपूर नागमोडी वळणे घेत, दोन तीन डोंगर  ओलांडून  शेवटी आम्ही दगशाई छावणीमध्ये पोहोचलो. आम्ही वाटेतूनच फोन करून पूर्वसूचना दिल्यामुळे आमच्या स्वागतासाठी तिथे आर्मीचा एक जवान दक्ष होताच. त्याने आम्हाला दगशाई छावणीची, तिथल्या  कारागृहाची आणि संग्रहालयाची सविस्तर माहिती दिली.

एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीपासूनच गुरखा, अफगाण आणि शीख राजांच्या कडव्या प्रतिकारामुळे धास्तावलेल्या इंग्रजांना, आसपासच्या भागातल्या छोट्या राजांच्या आणि जंगली टोळ्यांच्या म्होरक्यांच्या हालचालींवर बारीक नजर ठेवण्याची गरज भासत होती. म्हणून त्यांना या दुर्गम भागात एखादी भक्कम छावणी हवी होती. १८४७ साली, ईस्ट इंडिया कंपनीने ६०७८ फूट उंचीची एक टेकडी आणि आसपासची पाच गावे पतियाळाच्या महाराजांकडून फुकटात मिळवली. त्यापैकीच दगशाई या गावाच्या नावाचीच छावणी इंग्रजांनी या टेकडीवर वसवली. १८४९ साली इंग्रजांनी दगशाई छावणीमध्ये एक भक्कम कारागृह बांधले. इंग्रजी T अक्षराच्या आकारात बांधलेल्या या कारागृहामध्ये एकूण चौपन्न खोल्या आहेत. त्यापैकी अकरा खोल्यांमध्ये कारागृहाचे अधिकारी व कर्मचारी यांची कार्यालये व निवासस्थाने होती. उरलेल्या ४३ खोल्यांपैकी २७ साध्या कोठड्या आणि १६ एकांतवास कोठड्या होत्या. ही माहिती ऐकत आम्ही कारागृहाच्या मुख्य दरवाज्यापर्यंत पोहोचलो. 

कारागृहाच्या भक्कम लोखंडी दरवाज्याच्या वरच्या भिंतीत एक अवजड पितळी घंटा बसवलेली दिसली. त्या घंटेचे नाव, 'मृत्युघंटा' आहे असे आम्हाला आमच्या वाटाड्याने सांगितले. ब्रिटिश काळामध्ये या कारागृहातील एखाद्या कैद्याला फाशी दिल्यानंतर ती घंटा जोरजोरात वाजवली जाई. तिचा आवाज संपूर्ण पंचक्रोशीत घुमत असल्यामुळे आपोआपच आसपासच्या नागरिकांमध्ये जरब निर्माण होत असे. हे वर्णन ऐकूनच माझ्या अंगावर सर्र्कन काटा आला. 

बारा फूट लांब, आठ फूट रुंद आणि वीस फूट उंच असलेल्या प्रत्येक कोठडीला पोलादी गजांचा एक दरवाजा आणि छताजवळ एक छोटीशी खिडकी आहे. खिडकीपर्यंत चढणे तर अशक्यच आहे, आणि दरवाजा व खिडकीचे पोलादी गज इतके मजबूत आहेत की ते कापून पळून जाण्याचा विचारही कुणाच्या मनात येणार नाही. संपूर्ण कारागृहाची जमीन सागवानी लाकडाची आहे. हे कारागृह बनवतानाच, त्या लाकडांवर वाळवीप्रतिबंधक प्रक्रिया केलेली असल्यामुळे आजही ती लाकडे सुस्थितीत आहेत. त्या लाकडी जमिनीखालून, एका पाइपलाइनमधून बाहेरची स्वच्छ हवा आत आणण्याची व्यवस्था केलेली आहे. जमिनीखालच्या पोकळीमुळे कैद्यांच्या चालण्याचा हलका आवाजही बाहेरच्या सुरक्षारक्षकांना सहजी ऐकू येत असे. विचारपूर्वक केलेल्या अशा रचनेमुळे ते कारागृह अभेद्य होते. 

कारागृहाच्या एका भिंतीमध्ये, एक मनुष्य जेमतेम उभा राहू शकेल, अशा आकाराची एक खोबण होती. त्या खोबणीला, कुलूप लावून बंद करता येईल असा, जाळीचा भक्कम पोलादी दरवाजा होता. एखाद्या कैद्याला अधिक कडक शिक्षा देण्यासाठी तासंतास या खोबणीत उभे केले जात असे. या अवधीमध्ये त्या कैद्याला विश्रांती मिळणे तर दूरच, साधी हालचाल करणेही दुरापास्त असे. 

कारागृहाच्या एका बाजूला, तीन संलग्न खोल्यांची एक छळकोठडीही होती. त्या छळकोठडीत, कैद्याला दिल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या यातनांचे मी ऐकलेले वर्णन इथे लिहिणेदेखील मला नकोसे वाटते आहे. या छळकोठडीमधून कारागृहाच्या पिछाडीला उघडणारा एक दरवाजा होता. म्हणजे, एखादा कैदी छळादरम्यान मरण पावल्यास, त्याचे शव या दरवाज्यातून गुपचूप बाहेर नेण्याचीही व्यवस्था केलेली होती!

कारागृहातील कोठड्यांमध्ये पूर्वी वास्तव्य केलेल्या काही विशेष व्यक्तींसंबंधी माहितीही आम्हाला मिळाली. इंग्रजांच्या सेनेतील काही आयरिश सैनिकांनी आयर्लंडच्या स्वातंत्र्यलढ्याला पाठिंबा देत बंड पुकारले होते. यापैकी काही आयरिश सैनिकांना येथे ठेवण्यात आले होते. त्यापैकी, इमोन द वेलेरा नावाच्या एका कैद्याला भेटून आयरिश स्वातंत्र्यसंग्रामाची माहिती घेण्यासाठी, १९२० साली महात्मा गांधी दगशाई कारागृहात आले होते. गांधीजींच्याच विनंतीवरून, त्या रात्री त्यांची राहण्याची व्यवस्था तेथील एका कोठडीतच केली गेली होती. गांधीजींना थंडीचा त्रास होऊ नये म्हणून, त्या कोठडीच्या भिंतीत एक शेगडीदेखील ऐनवेळी बांधून घेतली गेली होती, जी आजही तेथे दिसते.

पंजाब राज्याची राजधानी पूर्वी शिमला येथे होती. तेथील उच्च न्यायालयात नथुराम गोडसे यांच्यावरील गांधीवधाचा खटला १९४८-४९ दरम्यान चालला होता. गोडसेंना दिल्लीहून शिमल्याला आणले जात असताना, वाटेत एक रात्र त्यांना याच दगशाई कारागृहातील एका कोठडीमध्ये ठेवले गेले होते. विशेष म्हणजे, या कारागृहामध्ये ठेवले गेलेले ते अखेरचेच कैदी होते. 

गांधीजी आणि नथुराम गोडसे या दोघांचेही फोटो व माहिती त्या-त्या कोठडीबाहेर लावलेली आहे. या दोघांनीही, वेगवेगळ्या काळात व वेगवेगळ्या कारणास्तव, एकेक रात्र याच कारागृहात काढली होती, हा एक विचित्र योगायोगच म्हणायचा!

दगशाई कारागृह आणि संग्रहालयाच्या इमारती, बरीच वर्षे मिलिटरी इंजिनियर सर्विसेसच्या सामानाचे गोडाऊन म्हणून  वापरात होते. मात्र, डॉ. आनंद सेठी यांनी २०१० साली सुरु केलेल्या अथक प्रयत्नांमुळेच या ऐतिहासिक वास्तूंना नवजीवन मिळाले आहे. डॉ. आनंद सेठी यांचे वडील, श्री. बाळकृष्ण सेठी हे १९४२-४३ दरम्यान दगशाई छावणीमध्ये Cantonment Executive Officer होते. त्यामुळे, डॉ. आनंद सेठी यांचे बालपण दगशाई छावणीतच गेले होते.  डॉ. आनंद सेठी यांनी २०१० साली, दगशाई छावणीतील तत्कालीन ब्रिगेड कमांडर यांच्याकडून कारागृहाच्या वास्तूचे पुनरुज्जीवन करण्याची परवानगी मिळवली. पुढील वर्षभर अविरत मेहनत करून डॉ सेठींनी या वास्तू आजच्या रूपात आणल्या. त्यांच्याप्रति आभार व्यक्त केल्याशिवाय हा लेख पूर्ण होऊ शकणार नाही. 

शिमल्याच्या आसपास पर्यटनासाठी जाणाऱ्या सर्वांनीच दगशाई कारागृह व संग्रहालयाला आवर्जून भेट दिलीच पाहिजे.  

दगशाई कारागृह आणि संग्रहालय पाहून झाल्यावर आम्ही काल्का येथून  नेताजी एक्प्रेसने रात्रभराचा प्रवास करून  दिल्ली स्टेशनवर पोहोचलो. तिथून दिल्ली विमानतळावर जाऊन मुंबईला परतलो. अशा रीतीने आमची शिमला-कसौलीची सहल आनंदात पार पडली. 

गुरुवार, ८ जून, २०२३

शिमला-कसौली भाग- १२: गिल्बर्ट ट्रेल

४ मे च्या रात्री आम्ही कसौलीच्या 'आर्मी हॉलिडे होम'मध्ये पोहोचलो होतो. ते ठिकाण अतिशय मोक्याच्या जागी, म्हणजे डोंगराच्या एका उंच सुळक्यावर आहे.त्यामुळे दोन्ही बाजूला दऱ्या दिसतात. एका बाजूला शिमल्याचे दिवे तर दुसऱ्या बाजूला चंदीगढचे दिवे दिसतात असे आम्हाला तिथल्या शिपायाने सांगितले होते. ५ मेच्या प्रसन्न सकाळी जाग आली. बाहेर पहिले तर  खरोखरच एका बाजूला दूरवर चंदीगढ दिसत होते. तर दुसऱ्या बाजूला पर्वतराजीमध्ये दडलेले शिमला दिसत होते. 

हॉलिडे होम मध्ये आम्हाला चांगली प्रशस्त आणि सुसज्ज खोली मिळाली होती. त्यामध्ये ओटा, भांडीकुंडी, मिक्सर, मायक्रोव्हेव्ह, पाण्याचा फिल्टर अशा सर्व सोयी असलेले एक छोटेसे स्वयंपाकघर होते. जेवणाचे टेबल व खुर्च्या मांडलेली डायनिंग रूम, एक प्रशस्त बेडरूम आणि एक हॉल अशी पाचशे फुटाची सदनिकाच होती ती. घरामध्ये असाव्यात अशा सर्व सोयी इथे होत्या. कपडे वाळत घालायचा स्टॅन्ड, इस्त्रीपासून ते हेयर ड्रायरपर्यंत सगळ्या वस्तू होत्या. पूर्वी या सदनिकांमध्ये गॅसची शेगडी आणि सिलिंडरही असल्याने आपापला स्वयंपाक करून खाता येत असे. पण २००१ साली कसौलीच्या आसपासच्या जंगलात भीषण आग लागून हॉलिडे होमच्या आसपासच्या काही इमारतींचे बरेच नुकसान झाले होते. त्यानंतर या इमारतीचा धोका कमी करण्याच्या दृष्टीने इथे गॅस वापरायला बंदी घालण्यात आली. आता या हॉलिडे होममध्ये, दोन स्वयंपाकी कामाला ठेवलेले आहेत. एका मध्यवर्ती ठिकाणी सर्वांचा स्वयंपाक होतो. आठवड्यातील प्रत्येक दिवशीचा ठराविक मेनू असतो. मात्र जेवण व नाश्ता हवा असल्यास आधी ऑर्डर द्यावी लागते.  

शुक्रवारी म्हणजे ५ मे च्या सकाळी नाश्ता झाल्यावर आम्ही चालतच  बाहेर पडलो.  त्या दिवशी बुद्धपौर्णिमेची सुट्टी होती. त्यामुळे ते छोटेसे गाव अगदी आळसावलेले दिसत होते. नऊ वाजून गेले तरी दुकाने अजून बंदच होती. कसौलीच्या चर्चच्या आवाराचे दारही बंदच होते. त्यामुळे नुसतेच  गावामध्ये फेरफटका मारून आलो. परतीच्या वाटेवर एका दुकानामधून केळी आणि काकड्या विकत घेतल्या. सगळे गाव निवांत असले तरीही वानरसेना मात्र कार्यरत आहे याची जाणीव झाली. आमच्या भोवती माकडे घोंगावायला लागली. अखेर, केळी आणि काकड्या मफलरमधे गुंडाळून, आनंदच्या जॅकेटच्या आत लपवून आम्ही खोलीकडे परत निघालो. परतीच्या वाटेवर सुप्रसिद्ध, 'सेंट्रल रिसर्च इन्स्टिटयूट' ची इमारत दिसली. ती इन्स्टिटयूट आतून बघायची इच्छा होती. म्हणून त्यांच्या ऑफिसला फोन लावला. पण बुद्धपौर्णिमेची सुट्टी असल्याने इन्स्टिटयूटही बंद असल्याचे कळले. 

'आर्मी हॉलिडे होम'च्या आवारात सुंदर बाग केलेली आहे. अनेकविध प्रकारची फुले तिथे बघायला मिळाली. इमारतीसमोरच्या दरीलगत एक प्रशस्त अंगण आहे. तिथे निवांत बसण्यासाठी, दोन झोपाळे आणि बाक ठेवलेले आहेत. झोपाळ्यावर झोका घेत, कोवळे ऊन खात, आम्ही चहा घेतला. कसौलीच्या जवळपास पाऊस झाल्यामुळे हवा थंड होती. पण सुदैवाने कसौलीमधे पाऊस पडत नव्हता. आमच्या राहण्याच्या ठिकाणापासून सनसेट पॉईंट, लव्हर्स पॉईंट आणि सुइसाईड पॉईंट अगदीच जवळ होते. दुपारचे जेवण व वामकुक्षी झाल्यावर चालत जाऊन हे सगळे पॉंईंटस बघायचे ठरवले.

संध्याकाळी पाचच्या सुमारास आम्ही चालत सनसेट पॉईंटच्या दिशेने निघालो. अपेक्षेप्रमाणे अनेक पर्यटकही त्या दिशेने चाललेले दिसले. कुठल्याही थंड हवेच्या ठिकाणी सनराईझ पॉईंटपेक्षा सनसेट पॉइंटला अधिक गर्दी असते. सूर्यास्त व्हायला बराच अवकाश असल्यामुळे आम्ही गिल्बर्ट ट्रेलवर जायचे ठरवले. संध्याकाळच्या थंड आणि शांत वातावरणात नागमोडी पायवाटेवरून आम्ही चालत होतो. थोड्या  वेळातच आम्ही लव्हर्स पॉइंटला पोहोचलो. फूड टेकनॉलॉजीमधे PhD करत असलेल्या २-३ मुली तिथे आम्हाला भेटल्या. त्यांना गिल्बर्ट ट्रेलवर चालत पुढे जायचे होते, पण पुढील वाट निर्मनुष्य असल्याने त्या घाबरत होत्या. आम्ही दोघेही त्या पायवाटेने पुढे जाणार आहोत, हे कळल्यावर त्या आमच्या सोबतीने चालायला लागल्या. आम्ही बराच काळ वेगवेगळ्या टेकडयांना वळसे घालत चालत होतो. आजूबाजूला हिरव्या रंगाच्या अनंत छटा दिसत होत्या. सुंदर गवतफुले आणि घरट्याकडे परतणारे पक्षी दिसत होते. त्या वाटेवर चालणे इतके आनंददायी होते की आम्ही सूर्यास्त बघण्यासाठी सनसेट पॉइंटला न परतता पायवाटेवरूनच सूर्यास्त पहिला. 

त्या रात्री कितीतरी वेळ, आमच्या सदनिकेमधून एका बाजूला दिसणारे शिमल्याचे दिवे आणि दुसऱ्या बाजूला दिसणारे चंदीगढचे दिवे आणि आकाशात दिसणारा पौर्णिमेचा चंद्र आम्ही डोळ्यात साठवत बसलो होतो. बुद्धपौर्णिमेला अनिरुद्धचा तिथीने वाढदिवस असतो. हॉलिडे होमच्या परिसराच एक छानसा व्हिडिओ काढून मुलांना पाठवला. या जागी मुलांना आणि नातवंडांना घेऊन यायचे असा मनाशी निश्चय करून आम्ही झोपी गेलो. 

(क्रमशः)

सोमवार, २९ मे, २०२३

शिमला-कसौली भाग- ११:- खाद्यभ्रमंती !

आर्मी हेरिटेज म्यूझियम पाहून आम्ही जेमतेम ११ वाजेपर्यंत आमच्या खोलीवर परतलो. सामान बाहेर काढून ठेवले. शिमल्याहून कसौलीला निघण्यापूर्वी आम्हाला 'हिमाचली रसोई' मध्ये स्थानिक जेवणाचा आस्वाद घ्यायचा होता.  जिथे खास हिमाचली खाद्यपदार्थ मिळतात अशा या रेस्टॉरंटबद्दल मला यूट्यूब व्हिडीओवरून कळले होते. शिमल्यामध्ये आल्यापासून सतत लागलेल्या पावसामुळे या रेस्टॉरंटमधे जाता आलेले नव्हते. ५ मे ला आम्ही शिमल्यातला मुक्काम अर्ध्या दिवसाने वाढवला होताच. म्हणून दुपारचे जेवण आम्ही 'हिमाचल रसोई' मधे घ्यायचे ठरवले.
  
एपिक चॅनेलवरच्या 'राजा रसोई और अन्य कहानियाँ' आणि 'लॉस्ट रेसिपिज' या कार्यक्रमांमधून हिमाचली खाद्यसंस्कृतीची माहिती मी ऐकली होती. एलिझियम हेरिटेज रिसॉर्टमधे एकदा बुफे ब्रेकफास्ट मधे 'बब्रू' नावाचा तळलेला पदार्थ होता. पण कोणा लाडावलेल्या बबडूसाठी तो केला असेल असे समजून मी त्याकडे दुर्लक्ष केले होते. 'सिद्दू' नावाचा, एक वाफवलेला पदार्थ असतो, हे माहिती असल्यामुळे तो खायची इच्छा होती. 'हिमाचली  रसोईला' फोन करून त्यांच्या वेळा विचारून मी आधीच सिद्दूची ऑर्डर देऊन ठेवली होती. बरोबर साडेबारा वाजता आम्ही त्या रेस्टॉरंटमध्ये हजर झालो. 

'हिमाचली रसोई', हे छोटेसे रेस्टॉरंट शिमल्याच्या लक्कड बाजारमध्ये आहे. तळमजल्यावर, जेमतेम १०-१२ जण बसू शकतील अशी लाकडी टेबल आणि बाकडी आहेत. एक खडी शिडी चढून पोटमाळ्यावर गेल्यावर आठ-दहा माणसांना खाली बसून जेवण्याची व्यवस्था केलेली आहे. वर चढून जाण्याचे अजिबात त्राण पायात नसल्यामुळे आम्ही तळमजल्यावरच बसलो. मोजकेच पण एखाद्या विशिष्ट खाद्यसंस्कृतीचे स्वादिष्ट पदार्थ  मिळणारी रेस्टॉरंट्स आम्हाला आवडतात. 'पंजाबी, मुगलाई, चायनीज, साऊथ इंडियन आणि इटालियन' अशी सरमिसळ पाटी लावलेल्या रेस्टॉरंटमधे आम्हाला जावेसे वाटत नाही. पाश्चिमात्य देशात काही अगदी छोट्या रेस्टॉरंट्सच्या बाहेर एखाद्या पाटीवर त्या-त्या दिवशीचा मेनू, किंमतीसह लावलेला असतो. ते आम्हाला फारच आवडले. 'आपण इथे जावे की नाही?' हे बाहेरच्या पाटीवरची डावी-उजवी बाजू बघून ठरवता येते! 'हिमाचल रसोई' मध्ये मोजकेच पण पारंपरिक हिमाचली पदार्थ मिळत असल्यामुळे ते आम्हाला प्रथमदर्शनीच आवडले. 

त्या दिवशीच्या मेन्यूमध्ये 'मंडियाली धाम' होते. 'धाम' म्हणजे हिमाचलमधील सणासुदीच्या जेवणाचे ताट. आणि हिमाचलमधील मंडी शहराजवळच्या भागातले पदार्थ या थाळीत समाविष्ट असल्याने या जेवणाचे नाव 'मंडियाली धाम' असे होते. आम्ही एक मर्यादित थाळी आणि एक गोडाचे व एक तिखटाचे सिद्दू मागवले. हे जेवण स्वादिष्ट तर होतेच, पण आले-लसूण--कांदा विरहित असल्याने ते अतिशय सात्विकही होते. थाळीतल्या पाच वाट्यांमध्ये, कढी, राजमा, दुधी भोपळ्याची भाजी, पाकातला  दुधीहलवा आणि एक चिंच-गूळ घातलेली आंबट-गोड भाजी, अशी तोंडीलावणी भातासोबत वाढली होती. चायनीज बाऊ या पदार्थाच्या जवळ जाणारा, वाफवलेल, सिद्दू हा पदार्थ, आम्हाला फारच आवडला. गरमागरम सिद्दू फोडून, त्यावर साजूक तूप घालून खायला मजा आली. गोडाच्या सिद्दूमध्ये खसखस, सुका मेवा आणि गुळाचे सारण होते, तर तिखटाच्या सिद्दूमधे खसखस, कोथींबीर आणि गरम मसाले घातलेले सारण होते. जेवण झाल्यावर, माल रोडवरून आम्ही लिफ्टच्या साहाय्याने कार्ट रोडला उतरलो. तोपर्यंत आमचा टॅक्सीचालक कुलदीप, आमचे सामान मेसमधून घेऊन तिथे पोचला. त्यानंतर आम्ही कुफ्री-चैल मार्गे कसौलीचा प्रवास सुरु केला. 

 
कसौलीपर्यंतचा रस्ता रतिशय रम्य होता. थंडीच्या मोसमात बर्फाच्छदित शिखरांसाठी आणि बर्फातल्या खेळांसाठी  कुफ्री प्रसिद्ध आहे. आम्हाला तिथे थांबायला वेळ नव्हता. आमचे जेवण तर झालेले होते, पण तीन वाजून गेले तरी कुलदीप त्याच्या जेवणासाठी कुठेही थांबायला तयार नव्हता. जनेड घाटातल्या 'सोनी दा ढाबा' मधेच मी जेवणार, असे त्याने सांगितले. शेवटी तो ढाबा आल्यावर आम्हाला  हायसे वाटले. कुलदीपच्या सांगण्याप्रमाणे, हा ढाबा उत्तम स्थानिक जेवणासाठी अतिशय प्रसिद्ध आहे. कुलदीप जेवायला गेला तरी आम्ही टॅक्सीमधेच बसून लांबूनच त्या ढाब्याकडे पाहत होतो. एक गोरी-गोबरी पण मिचमिच्या डोळ्यांची बाई, सतत रोट्या लाटत आणि चुलीवर भाजत बसलेली होती. तुपाची धार सोडलेल्या गरमागरम रोट्या, आणि तोंडीलावणी वाढायची लगबग चालू होती. ढाब्याच्या एका गाळ्यामध्ये ड्रायव्हर्स आणि कामकरी लोकांची आसनव्यवस्था होती. तर शेजारच्या गाळ्यामध्ये टूरिस्ट लोकांसाठी जेवण्याची व्यवस्था होती. इथले सगळे जेवण आणि विशेषतः 'हिमाचली मीठी रोटी' अतिशय प्रसिद्ध आहे, असे कुलदीपणे आम्हाला सांगितले. आम्हाला भूक नसल्यामुळे आम्ही मात्र तिथे काहीच खाल्ले नाही. 


 
मस्त गप्पा मारत, आणि आम्हाला सगळी माहिती सांगत कुलदीप सफाईने गाडी चालवत होता. आम्हाला चैल पॅलेस पाहायला जायची इच्छा नव्हती. पण चैल येथील सुप्रसिद्ध 'राष्ट्रीय मिलिटरी स्कूल'पर्यंत जाऊन तिथल्या विद्यार्थ्यांशी आम्ही संवाद साधला. तसेच, कुलदीपच्या सांगण्यावरून 'काली टिब्बा' या प्राचीन मंदिराला भेट दिली. उंच डोंगरावर बांधलेले हे मंदिर सुंदर असून इथले वातावरण अतिशय प्रसन्न आहे. पण इथल्या तुफान वाऱ्यामुळे आम्ही अगदी कुडकुडून गेलो. हे सगळे होईपर्यंत संध्याकाळचे सहा वाजत आले होते. आम्हाला गरमागरम चहा हवा होता. पण, 'मैं आपको एक जगह बढिया चाय पिलाऊंगा' असे म्हणत कुलदीप इथे-तिथे कुठेही थांबायला तयारच नव्हता. शेवटी कंडाघाट येथील एक छोट्या टपरीपाशी तो थांबला. अगदी हसतमुख अशा माय-लेकींच्या जोडीने चालवलेल्या त्या टपरीवर अप्रतिम चवीचा, आले घातलेला अगदी गरम चहा मिळाला. एक कप चहा  पिऊन झाल्यावर आम्हाला आजून एकेक कप चहा प्यायची आणि त्याबरोबर मठरी  खायची इच्छा अनावर झाली.  

चहा घेऊन आम्ही सोलन मार्गे कसौलीकडे निघालो. त्या दिवशीची आमची भ्रमंती खरेतर खाद्यभ्रमंतीच होती. वाटेत कुलदीपशी गप्पा चालू होत्याच. गप्पांच्या ओघामध्ये व्यसनाधीनता हा विषय सुरु झाला. त्यानंतर मात्र कुलदीपने सांगितलेली माहिती ऐकून आम्ही सुन्न झालो. पंजाबमधल्या तरुण पिढीसारखीच, हिमाचलमधील तरुण पिढीदेखील व्यसनाच्या विळख्यात अडकत चालली आहे आहे हे ऐकून आम्हाला धक्का बसला. 

साधारण रात्री नऊच्या सुमारास आम्ही कसौलीच्या आर्मी हॉलिडे होम मध्ये पोहोचलो. रात्रीचे जेवण खोलीवरच आले. जेवण झाल्यावर निद्रधीन झालो. 

रविवार, २८ मे, २०२३

शिमला-कसौली भाग- १०

शिमल्याला येण्याआधी मी इंटरनेटवरून इथल्या पर्यटनस्थळांबद्दल बरीच माहिती वाचली होती. तसेच यूट्यूबवर चार-पाच ट्रॅव्हलॉगही बघितले होते. पण ऍन्नाडेलच्या आर्मी हेरिटेज म्युझिअम संबंधी फारसे वाचायला अथवा ऐकायला मिळाले नव्हते. शिमल्यामध्ये येणाऱ्या बऱ्याचशा पर्यटकांना या म्युझियमबाबत विशेष माहिती नसते. आर्मी हेरिटेज म्युझियमच्या आवारामध्ये आम्ही दहा वाजायच्या आधीच जाऊन पोहोचलो. २००६ साली सुरु केलेले हे छोटेसे पण अतिशय नीटनेटके म्युझियम, दोन-तीन टुमदार बैठ्या बंगल्यामध्पस रलेले आहे. हे म्युझियम बघण्यासाठी प्रवेशमूल्य नाही. पण फक्त भारतीय नागरिकांनाच इथे प्रवेश दिला जातो. सोमवार सोडून आठवड्यातील इतर सर्व दिवशी हे म्युझियम, सकाळी १० ते २ व ३ ते ५ या वेळात खुले असते. या म्युझियमच्या बाहेर व आतही फोटो काढण्याची मुभा आहे.

म्युझियमच्या आवारामध्ये, मूळ हिमाचल प्रदेशनिवासी शूर सैनिकांचे अर्धपुतळे बसवण्यात आलेले आहेत. हे सर्व वीर भारतमातेच्या रक्षणार्थ लढताना धारातीर्थी पडलेले आहेत. प्रत्येक पुतळ्याखाली त्या-त्या सैनिकाचे अथवा अधिकाऱ्याचे नाव व त्यांनी केलेल्या कामगिरीबाबत थोडक्यात माहिती लिहिलेली आहे. आम्ही ती सगळी माहिती वाचली. अशा ठिकाणी गेले की मनामध्ये खूपच कालवाकालव होते आणि डोळे पाण्याने भरून येतात. 

दहा वाजता हे संग्रहालय उघडणार होते. आम्ही दहाच्या आधी पोहोचलो होतो. आत साफसफाई चालू होती. पण तिथल्या जवानाला आनंदने, आपण निवृत्त सेनाधिकारी असल्याचे सांगितले. तसेच आम्हाला परतण्याची गडबड असल्यामुळे आम्हाला अगदी थोड्या वेळात, ते संग्रहालय आणि परिसर दाखवायची विनंती केली. त्या जवानाने आम्हाला आधी संग्रहालयाच्या बाजूला असलेल्या ग्रीन-हाऊसमधे  नेले. तिथे अतिशय सुरेख अशी निवडुंगांची बाग (कॅक्टस गार्डन) केलेली आहे. या बागेमध्ये अनेक प्रकारचे कॅक्टस आणि फुलझाडे आहेत. या बागेला गेली अनेक वर्षे स्थानिक स्पर्धांमध्ये बक्षीस मिळत असल्याचे त्याने मोठ्या अभिमानाने सांगितले. बाग बघून झाल्यावर आम्ही खालच्या बाजूला असलेल्या एका पॅव्हेलियनमध्ये गेलो. तिथे अनेक रणगाडे, तोफा आणि लढाऊ विमानांच्या छोट्या प्रतिकृती ठेवलेल्या आहेत. या आवारातून डाव्या हाताला ऍन्नाडेल गोल्फकोर्सचे पुन्हा एकदा सुखद दर्शन झाले. तिथे आमचे फोटो काढून होईपर्यंत संग्रहालय उघडलेले होते. त्यामुळे आम्हाला आत प्रवेश मिळाला. 

अगदी महाभारतातल्या अर्जुनापासून सध्याच्या भारतीय सैनिकांच्या कथा संग्रहालयामध्ये दाखवलेल्या आहेत. या संग्रहालयात भारतीय लष्कराबाबत उत्तम माहिती संकलित केलेली आहे. भारतीय सैन्यातील वेगवेगळ्या रेजिमेंटचे पोशाख व झेंडे, सियाचेन ग्लेशियरवर सैनिक वापरतात ते गणवेश, तसेच वायुसैनिकांचे आणि नौसैनिकांचे गणवेश आपल्याला बघायला मिळतात. काही हुतात्म्यांचे गणवेश आणि त्यांची पदकेही इथे संग्रहित केलेली आहेत. तसेच युद्धामध्ये, पूर्वीपासून वापरली जाणारी अनेकविध  शस्त्रास्त्रे, युद्धसाधने, व वाद्येही इथे ठेवण्यात आलेली आहेत.


एका दालनामध्ये लावलेल्या काही फोटोंनी आणि कागदपत्रांनी आमचे लक्ष वेधून घेतले. डेहरादूनची जॉईंट सर्विसेस विंग (JSW) ही संस्था म्हणजेच १९४९-५५ या काळातले, आत्ताच्या NDA खडकवासलाचे जुने रूप होते. JSW देहरादूनच्या पहिल्या बॅचचे कॅडेट म्हणून तिथे प्रशिक्षण घेत असतानाचा, फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांचा 'ब्लू पॅट्रोल' गणवेशातला अतिशय उमदा फोटो इथे लावलेला आहे. १८५७च्या स्वात्रंत्र्यसंग्रामानंतर मंगल पांडे यांचे कोर्ट मार्शल केले गेले होते. त्या कोर्ट मार्शलचे फर्मान एका शोकेसमध्ये लावलेले आहे. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात पाकिस्तानला सपशेल पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर पाकिस्तानी सैन्याच्या आत्मसमर्पण करारावर स्वाक्षरी करतानाचा, पाकिस्तानचे लेफ्टनंट जनरल नियाझी यांचा फोटो तिथे बघायला मिळतो. पाकिस्तानच्या पराभवाची निशाणी म्हणून इथे पाकिस्तानच्या एका रेजिमेंटच्या झेंडाही उलटा लटकावून ठेवला आहे. तसेच पाकिस्तानी हद्दीतून आणलेली एक पोस्टाची पेटीसुद्धा इथे टांगलेली आहे. १९७१ साली आपल्या सैन्याने केलेल्या पराक्रमाची शौर्यगाथा शिमल्यामधल्या या संग्रहालयात पाहताना ऊर अभिमानाने भरून येत होता. पण, याच शिमल्यातली एक कटू आठवणही मनात येत होती. इंदिरा गांधीजींनी, याच शहरात 'शिमला करारावर' स्वाक्षरी केली होती. बदल्यात काहीही न मिळवता, पाकिस्तानच्या युद्धकैद्यांना सोडून दिले होते आणि सैन्याने जिंकलेला प्रदेशही परत केला होता. त्या घोडचुकीची आठवण होऊन खंत वाटली.

यानंतर आम्ही म्यूझियमच्या 'शौर्य हॉल'मध्ये गेलो. तिथे मोठमोठया फलकांवर भारतीय सैनिकांनी लढलेल्या महत्वाच्या लढायांची माहिती थोडक्यात लिहिलेली आहे. तिथेच एक चौकोनी आकाराची टेबलांची मांडणी केलेली दिसली. त्यावर एका बाजूला China आणि दुसऱ्या बाजूला India असे लिहिलेले होते. भारत-चीन सीमेवर, चुशूल, लिपुलेख, नथू-ला, आणि बुम-ला या चार ठिकाणी वेळोवेळी होणाऱ्या वाटाघाटींकरता वापरल्या जाणाऱ्या टेबलची ती प्रतिकृती होती.

साडेअकराच्या आत परतून मेसमधली खोली रिकामी करायची असल्यामुळे आम्हाला इथे वेळ जरा कमीच पडला. त्यामुळे त्या थोडक्या वेळात शक्य तेवढी माहिती जमा करून घेण्याच्या उद्देशाने, आनंदने काही व्हिडिओ घेता-घेता त्याचे धावते वर्णनही करून ठेवले. त्यानंतर मात्र आम्ही बसमध्ये बसून आमच्या खोलीवर परतलो.

(क्रमशः)

गुरुवार, २५ मे, २०२३

शिमला-कसौली भाग-९

शिमल्यात आम्ही राहात असलेल्या आर्मी ट्रेनिंग कमांड (आरट्रॅक) ऑफिसर्स मेसमधली खोली आम्हाला ४ मेला सकाळी १० वाजेपर्यंतच सोडावी लागणार होती. पण त्या दिवशी सकाळी आम्हाला ऍन्नाडेललाही जाऊन यायचे होते. त्यामुळे सकाळी लवकर उठून आम्ही आमचे सामान आवरून ठेवले. आमच्यानंतर त्या खोलीचे आरक्षण ज्यांच्या नावे  होते, त्यांच्याशी बोलून, ते लोक किती वाजेपर्यंत पोहोचणार आहेत याचा अंदाज घेतला. ते जरा उशिरा म्हणजे ११.३० वाजेपर्यंत येणार असल्याचे कळले. ऍन्नाडेलचे 'आर्मी हेरिटेज म्युझिअम' दहा वाजता उघडणार होते. ऍन्नाडेलचे गोल्फ कोर्स बघून, दहाच्या आतच म्युझियममध्ये जावे असे आम्ही ठरवले. म्युझिअम बघून ११.च्या आत परतायला हवे होते. हे सगळे वेळेत करण्याच्या हिशोबाने सकाळी आठ वाजताच आम्ही चालत बाहेर पडलो. शिमल्यातल्या आमच्या सख्या, म्हणजे आमच्या छत्र्या आमच्या हातात होत्याच! 

पर्यटनासाठी बाहेर पडल्यानंतर, भोज्ज्याला शिवल्यासारखे, भराभर पर्यटनस्थळे बघत हिंडायला आम्हाला मुळीच आवडत नाही. त्यामुळेच आम्ही शक्यतो ट्रॅव्हल कंपनीतर्फे पर्यटन करत नाही. ट्रॅव्हल कंपनीचा ७-८-९, म्हणजे ७ वाजता उठणे, आठ वाजता नाश्ता आणि ९ वाजता बाहेर पडणे, हा फॉर्म्युला आम्हाला फारसा त्रासदायक वाटत नाही. परंतु, आपल्याला आवडलेल्या पर्यटनस्थळी, हवा तेवढा वेळ घालवण्याची मजा, ट्रॅव्हल कंपनीतर्फे गेल्यावर उपभोगता येत नाही, असे आम्हाला वाटते. बहुतेक सर्व ट्रॅव्हल कंपन्या आठवड्याभरात शिमला-कुलू-मनाली अशी टूर आखतात. त्यामुळेच, आम्ही शिमला-कुलू-मनाली ट्रिप करणार आहोत, असा समज अनेक मित्र-मैत्रिणींचा आणि नातेवाईकांचा झाला होता. पण शिमला-कुलू-मनाली आठवड्याभरात करणे म्हणजे ती-ती ठिकाणे केवळ 'उरकणे' झाले असते आणि आमची खूप धावपळ झाली असती.  

आरट्रॅक मेसच्या बाहेर पडून, शिमला विधानसभा चौकातून खाली, पूर्ण उताराच्या रस्त्याने चालत आम्ही ऍन्नाडेल गोल्फ कोर्सकडे निघालो. गूगल मॅपनुसार आम्ही अर्ध्या तासात पोहोचायला हवे होते. पण गेल्या तीन-चार दिवसात चढ-उताराचे रस्ते चालून आम्हा दोघांचेही गुढगे बोलायला लागले होते. त्यामुळे आम्ही हळूहळू चालत, थांबत, थांबत चाळीस मिनिटामध्ये ऍन्नाडेल गोल्फ कोर्सच्या जवळ पोहोचलो. गोल्फकोर्स आणि आर्मी हेरिटेज म्यूझियम एकाच आवारात आहे. गोल्फकोर्सच्या प्रवेशद्वाराच्या उजवीकडे म्युझिअमचे गेट आहे.  हा सर्व परिसर आरट्रॅकच्या ताब्यात असून त्याची देखरेखही आर्मीतर्फेच केली जाते. सेनाधिकारी आणि काही निवडक सरकारी अधिकाऱ्यांनाच या गोल्फकोर्सवर खेळायची परवानगी आहे. 

एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत शिमला आणि आसपासच्या इलाख्यात गुरख्यांचे राज्य होते. १८१५-१६ साली गुरखा आणि ब्रिटीशांदरम्यान युद्ध झाले. गुरख्यांनी कडवी लढत दिली, पण शेवटी त्यांचा पराभव करण्यात ब्रिटिश यशस्वी झाले. त्यानंतर ब्रिटिशांनी या परिसरात आपला जम बसवला. १८३० च्या सुमारास, ऍन्नाडेल मधली ही सुंदर जागा ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या नजरेस पडली. सुरुवातीला या जागेचा वापर पोलो, क्रिकेट आणि फुटबॉलचे मैदान म्हणून आणि सहलीची जागा म्हणून केला जायचा. तेंव्हा स्थानिक लोक या जागेला 'कंपनीका बाग' असे म्हणत. साधारण १८४० च्या सुमारास इथे रेसकोर्स सुरु करण्यात आले. १८५८ नंतर हे मैदान ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या अधिपत्याखाली आले. १८६४ साली, अधिकृतपणे शिमल्याला ब्रिटिशांच्या  उन्हाळी राजधानीचा दर्जा देण्यात आला. ऍन्नाडेल मैदानावर गोल्फकोर्स कधी तयार केले गेले, या बाबत नेमकी माहिती कुठे दिसली नाही. पण ते १८६४ नंतरच्या काही वर्षांतच तयार केले गेले असावे. १८८४-८५ साली गोल्फ कोर्सचे पॅव्हेलियन उभारण्यात आले. याच ऍन्नाडेल मैदानावर १८८८ साली, सर मॉर्टिमर ड्युरांड यांच्या नावे फुटबॉलची सुप्रसिद्ध 'ड्युरांड ट्रॉफी' स्पर्धा सुरु झाली, जी भारतात आजही खेळली जाते. 

गोल्फ क्लबची पूर्णपणे लाकडी इमारत अतिशय सुंदर आहे. क्लबच्या समोर एका बाजूला, चोचीत गोल्फचा चेंडू पकडलेल्या कावळ्याचा पुतळा आहे. त्या पुतळ्याखाली एक मजेशीर कविता लिहिलेली आहे. ती कविता अशी कल्पना करून रचलेली आहे की जणू तो कावळा तिथे आलेल्या गॉल्फर्सशी बोलतो आहे. क्लबच्या समोर दुसऱ्या बाजूला, भल्या मोठ्या आकाराच्या गोल्फ चेंडूचेही शिल्प आहे. 

गोल्फकोर्सच्या मधोमध एक हेलिपॅड आहे. शिमल्यामधे येणाऱ्या सर्व व्हीआयपी लोकांची हेलिकॉप्टर्स इथेच उतरत असल्यामुळे, या जागेला एक विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे. या जागेचे, ऍन्नाडेल किंवा  ऍन्नानडेल असे नाव का पडले? या बद्दलही एक रंजक कथा आहे. 'डेल' या शब्दाचा अर्थ दरी असा आहे. ऍन्नाडेल नावाची अजून एक दरी शिमल्याच्या पश्चिमेला आधीपासूनच होती. पण अगदी सुरुवातीच्या काळात इथे आलेला, कॅप्टन चार्ल्स प्रॅट केनेडी नावाचा एक ब्रिटिश अधिकारी, कुणा एका ऍना नावाच्या तरुणीच्या प्रेमात होता. सर्वप्रथम तो जेव्हा या जागी आला, तेंव्हा इथले नेत्रसुखद दृश्य बघून तो ऍनाच्या आठवणीने व्याकुळ झाला. त्यामुळे त्याने या जागेचे नाव  ऍन्नाडेल असे ठेवले, असे सांगितले जाते.   

सकाळच्या त्या प्रसन्न वातावरणात गोल्फकोर्सच्या भोवती असलेल्या पायवाटेवर मी एक चक्कर मारून आले. तरी म्युझिअम उघडायला अजून थोडा वेळ होता. त्यामुळे आम्ही गोल्फक्लबच्या आत असलेल्या रेस्टॉरंटमध्ये गरम-गरम चहा घेतला. तिथे बसून निवांतपणे चहा घेत असताना माझ्या मनामध्ये अनेक विचार येत होते. ब्रिटिशांनी आपल्या देशावर दीडशे वर्षे राज्य केले. आपल्या देशाला लुबाडून ब्रिटिश सैन्य इथे अगदी ऐश-आरामात राहिले, या गोष्टीची मला मनोमन चीड आहे. पण ब्रिटिशांमुळे आपल्या देशात अनेक सोयी-सुविधा, व आधुनिकीकरण त्या काळी झाले हेदेखील खरेच.  

मनामधे आलेले हे सगळे विचार बाजूला सारून, आम्ही साडेनऊ-पावणेदहाच्या सुमारास म्युझिअमच्या प्रवेशद्वारात पोहोचलो...  

(क्रमश:)

 


  

सोमवार, २२ मे, २०२३

शिमला-कसौली भाग-८

३ मे हा शिमल्यातला आमचा शेवटचा दिवस होता. अजून, 'इंडियन इन्स्टिटयूट ऑफ ऍडव्हान्सड् स्टडी' बघायचे राहिले होते. सकाळपासून आम्ही पाऊस थांबण्याची वाट बघत खोलीमध्येच थांबलो होतो. खोलीच्या खिडकीपाशी बसून, बाहेर झाडांवर आलेल्या वानर टोळीतील पिल्लांचे चाललेले खोडकर चाळे बघण्यात वेळ जरा बरा गेला. दुपारी दोननंतर पाऊस थांबल्यावर आम्ही छत्र्या घेऊनच, 'ऑब्झर्वेटरी हिल' वर उभ्या असलेल्या इंडियन इन्स्टिटयूट ऑफ ऍडव्हान्स स्टडीज' च्या आकर्षक इमारतीकडे चालत निघालो. 

शिमल्यातल्या 'ऑब्झर्वेटरी हिल' ला एक विशेष महत्व आहे. ती टेकडी भारताची जलविभाजक (Watershed ) किंवा पाणलोट टेकडी आहे. या टेकडीच्या पूर्व बाजूच्या उतारावरून पडणारे पाणी ज्या नद्यांमध्ये वाहत जाते, त्या नद्या बंगालच्या उपसागरात जाऊन मिळतात. पश्चिमेच्या उतारावरून पडणारे पाणी वेगवेगळ्या नद्यांमधून वाहत अरबी समुद्रात जाऊन मिसळते. 

याच 'ऑब्झर्वेटरी हिल'वर ब्रिटिशांनी, १८८४ ते १८८८ या काळात एक भव्य  'व्हाईसरीगल लॉज' बांधले.  तत्कालीन  व्हाइसरॉय, लॉर्ड डफरीन यांचे उन्हाळी निवासस्थान म्हणून ही इमारत बांधली गेली. भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत सर्व व्हाइसरॉयांचे शिमल्यातले निवासस्थान हेच होते.  स्वातंत्र्योत्तर काळात ते भारताच्या राष्ट्रपतींचे अधिकृत  उन्हाळी निवास झाले. पण राष्ट्रपती राधाकृष्णन यांच्या आदेशानुसार, १९६५ साली ती वास्तू, 'इंडियन इन्स्टिटयूट ऑफ ऍडव्हान्स स्टडीज' या संस्थेला दिली गेली. त्यानंतर राष्ट्रपतींचे अधिकृत निवास मशोब्रा येथे नेण्यात आले. 'ऍडव्हान्स स्टडीज'ची ही वास्तू आतून बघायला, माणशी  १०० रुपये इतके जुजबी तिकीट आहे. साधारण अर्ध्या तासात आपल्याला आत हिंडवून, तिथली माहिती सांगतात.

या इमारतीच्या बाहेर अतिशय सुंदर बाग आहे. मागच्या बाजूला टेनिस कोर्ट्स आहेत. मुख्य  इमारत आतून-बाहेरून नितांतसुंदर आहे. बाहेरून भक्कम दगडी बांधकाम असल्याने ती एखाद्या राजवाड्यासारखी दिसते. आतल्या बाजूला उत्तम  लाकूडकाम केलेले आहे. स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात १९४५ साली, महत्वाची शिमला कॉन्फरन्स याच वास्तूमध्ये झाली होती. भारतीयांना स्वायत्तता देण्याच्या प्रक्रियेतील, 'वेव्हेल प्लॅन' हा अत्यंत महत्वाचा टप्पा, याच ठिकाणी संमत केला गेला. पंडित नेहरू, वल्लभभाई पटेल, महात्मा गांधी, अशा दिग्गजांचे पाय या वास्तूला लागलेले आहेत. इतिहासाच्या पाऊलखुणा सांगणारे अनेक फोटो आत लावलेले आहेत. पण त्या बाबतची माहिती वाचायला वेळ कमी पडल्यामुळे खूपच चुटपुट लागून राहिली. या वास्तूच्या बाहेरून फोटो काढता येतात, पण आत फोटो काढण्यास मनाई आहे. त्यामुळे वास्तूच्या आतल्या भागातले सौंदर्य डोळ्यातच साठवत आम्ही बाहेर पडलो. खोलीवर परत येईपर्यंत संध्याकाळचे पाच वाजत आले होते.   

संध्याकाळी, आम्हाला जनरल बालींनी जेवायला बोलावले होते. त्यामुळे आम्ही खोलीवर परतून, तयार होऊन त्वरित  बाहेर पडलो. जाताना आर्मी ट्रेनिंग कमांडच्या मुख्यालयासमोर फोटो काढले. शिमल्यातल्या लोकप्रिय मॉल रोडवर आम्ही अजून तसे मनसोक्त हिंडलो नव्हतो. मला शिमल्यातले 'लोअर बाजार' आणि 'लक्कड बाजार' हिंडायचीही इच्छा होती. सुदैवाने त्या संध्याकाळी पाऊस थांबला होता आणि इतक्या दिवसात प्रथमच छानसे ऊन पडले होते. पुढचा तास-दीड तास शिमल्यातले सगळे बाजार पायाखालून घातले. खरेदी अशी काहीच करायची नव्हती. पण लोअर बाजारात एके ठिकाणी एक भाजीवाला आंबेहळद विकायला बसला होता. माझ्या बागेत लावायला म्हणून त्याच्याकडून मी थोडे कंद विकत घेतले. 

संध्याकाळच्या उन्हामध्ये Ridge वर हिंडायला खूप मजा आली. तिथे सर्वच पर्यटकांच्या उत्साहाला उधाण आले होते. घोड्यावर बसून रपेट करणे, पारंपरिक हिमाचली वस्त्रे आणि आभूषणे घालून फोटो काढून घेणे, एकमेकांसाठी फोटो काढणे, फेरीवाल्यांकडून वस्तू विकत घेणे, साबणाचे फुगे सोडणे, खाणे-पिणे अशा एक ना अनेक गोष्टी तिथे चालू होत्या. गंमत म्हणजे दोन-चार दिवसांच्या संततधारेमुळे दूरवरची काही शिखरे बर्फाच्छादित झालेली दिसत होती. थोड्याच वेळात, जनरल बाली आणि त्यांची बायको अप्राजिता, Ridge वर चालत येताना दिसले. जनरल बालींनी Ridge वरून दूरवर दिसणाऱ्या सगळ्या इमारतींबद्दल आणि पर्वतराजींबद्दल आम्हाला माहिती दिली. त्यांनी हेही सांगितले की, इतक्या वर्षांमध्ये त्यांनी प्रथमच मे महिन्यात झालेली बर्फवृष्टी पाहिली होती. साठच्या दशकामध्ये जनरल बाली आणि सौ. अप्राजिता यांचे शालेय शिक्षण शिमल्यामध्ये झाले. त्यामुळे त्यांच्याकडे जुन्या शिमल्याच्या आठवणींचा खजिना होता. त्याकाळी सूट-बुटात वावरणारे शिमलावासीय, देवानंदबरोबर झालेली भेट, आणि शिमल्यामध्ये अनेक सिनेमांचे चित्रीकरण होत असताना त्यांनी बघितलेले प्रसिद्ध सिने-सितारे आणि तारका, यांच्या आठवणी त्यांनी सांगितल्या.

त्यानंतर जनरल बाली आम्हाला Ridge वरच असलेल्या एका पुतळ्यापाशी घेऊन गेले. दिवंगत लेफ्टनंट जनरल दौलत सिंग यांचा तो पुतळा होता. १९६१ ते १९६३ या काळामधे, लेफ्टनंट जनरल दौलत सिंग हे आर्मीच्या पश्चिम कमांडचे 'जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ' होते. १९९३ सालापर्यंत पश्चिम कमांडचे मुख्यालय शिमल्यातच होते. त्या काळात, जम्मूच्या पूंछ  भागाची हेलिकॉप्टर मधून हवाई पाहणी करण्यासाठी गेलेले असताना, या अतिशय कर्तबगार अधिकाऱ्याचे, हेलिकॉप्टर कोसळून अपघाती निधन झाले. जनरल बालींच्याच पुढाकारामुळे हिमाचल प्रदेश सरकारने Ridge वर, लेफ्टनंट जनरल दौलत सिंग यांचा पुतळा उभा केला. पुतळ्याभोवती लेफ्टनंट जनरल दौलत सिंग, यांच्या स्मरणार्थ एक उद्यानही तयार केले गेले.  

साडेसातच्या सुमारास जनरल बाली आम्हाला शिमल्याच्या Amateur Dramatics Club या सुप्रसिद्ध, ब्रिटिश कालीन,  आणि  अगदी उच्चभ्रू  लोकांसाठी असलेल्या क्लबमध्ये जेवायला घेऊन गेले. तिथे आत जाताना,  तिथला सुटा-बुटाचा ड्रेस कोड पाळावा लागतो. हा क्लब आतून खूपच सुंदर आहे. तिथे अनेक सिनेमांचे शूटिंग झाले आहे. या क्लबच्या डायनिंग हॉलमध्ये जाण्यासाठी पायऱ्या उतरून खाली जावे लागते. त्यामुळे आपण Ridgeच्या खालच्या पातळीवर बसून जेवण करतो. क्लबमध्ये निवांतपणे जेवण आणि गप्पा झाल्या. तिथले फिश फिंगर्स, हरा-भरा कबाब, पेने पास्ता, बेक्ड व्हेजिटेबल्स, रोस्टेड चिकन, कटलेट्स आणि लेमन सूफले हे सर्वं खाद्यपदार्थही उत्तम होते. 

आम्ही आल्यापासून चार दिवस पाऊस पडत असल्याने, शिमल्यातील  Annadale चे आर्मी म्युझिअमही बघायचे राहिले होते. ते बघितल्याशिवाय तुम्ही जाऊ नका असे जनरल बालींनी आम्हाला सांगितले. त्यामुळे आम्ही शिमल्यातला आमचा मुक्काम अर्ध्या दिवसाने वाढवायचे ठरवले.

(क्रमशः)

शनिवार, २० मे, २०२३

शिमला-कसौली भाग-७

२ मेच्या सकाळी उशीरानेच जाग आली. आदल्या दिवशीच्या पायपिटीमुळे पाय आणि दिवसभर डोक्यावर छत्री घेऊन हिंडल्यामुळे, माझे हातही दुखत होते. बाहेर संततधार चालू होती. त्यामुळे आजचा दिवस टॅक्सी करून हिंडावे, असे आम्ही ठरवले. त्या दिवशी शिमल्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीचे मतदान असल्यामुळे इन्स्टिटयूट  ऑफ ऍडव्हान्स स्टडीज बंद आहे, असे समजले. मग शिमल्याच्या बाहेर फिरून यावे, अशा विचाराने  एक-दोन टॅक्सी वाल्यांशी संपर्क साधला. परंतु, पाऊस आणि धुक्यामधे बाहेर पडायला कोणी तयार होईना. शेवटी एक टॅक्सीवाला तयार झाला. त्यामुळे आम्ही  शिमल्याच्या आसपासचा, नालदेहरा-मशोब्रा हा भाग बघायला बाहेर पडलो.  

बाहेर प्रचंड धुके असतानाही आमचा टॅक्सीवाला अतिशय सफाईने टॅक्सी चालवत होता. राष्ट्रपतींचे उन्हाळ्यातले अधिकृत निवासस्थान मशोब्रा येथे आहे. उन्हाळ्यामध्ये सुमारे दोन आठवडे राष्ट्रपतींचा आणि त्यांच्या चाळीस कर्मचाऱ्यांचा मुक्काम इथेच असतो. राष्ट्रपती तिथे राहत नसतील त्या काळात ते निवासस्थान पर्यटकांसाठी यावर्षीपासूनच  खुले करण्यात आले आहे. टॅक्सीतून जातानाच आनंदने  फोनवरून ऑनलाईन पैसे (प्रत्येकी रु. ५०/-) भरून तिथले  तिकीट काढले. राष्ट्र्पती निवासाच्या बाहेरच्या प्रवेशद्वारापाशी टॅक्सी सोडून द्यावी लागते. बाहेर सुरक्षा तपासणी झाल्यानंतर प्रत्यक्ष राष्ट्रपती निवासापर्यंत, बरेच अंतर चालत जावे लागते. तो रस्ता अगदी निर्मनुष्य असल्यामुळे आपण बरोबर जातोय की नाही? अशी शंका मनात सतत येत होती. बरेच चालल्यानंतर, शेवटी राष्ट्रपती निवासाची पाटी असलेले मुख्य प्रवेशदार दिसले. तिथे पुन्हा सुरक्षा तपासणी, तिकीट तपासणी झाली. आमच्या आधी आणि नंतर आलेले असे १५-२० पर्यटक जमल्यानंतर आमच्या गटाला आत सोडण्यात आले.

राष्ट्रपती निवासाची सर्व माहिती सांगण्यासाठी आमच्याबरोबर एक अधिकृत गाईड दिला होता. ही वास्तू १७३ वर्षे जुनी असून आजूबाजूचा परिसर अतिशय रम्य आहे. कोटी संस्थानाच्या राजाच्या मालकीची असलेली ही वास्तू, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ब्रिटिशांच्या ताब्यात होती. खूप पूर्वी  एकमजली असलेली ही लाकडी दिमाखदार इमारत पुढे दुमजली करण्यात आली. मार्च महिन्यामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते तिथल्या ट्यूलिप गार्डनचे उदघाटन  झाले होते. आम्हालाही  बागेमध्ये काही ट्यूलिप्स बघायला मिळाले. इमारतीतील काही खोल्या पर्यटकांना दाखवत असले तरी आतले फोटो काढण्यास मनाई आहे. आतल्या दालनांची सविस्तर माहिती गाईड आम्हाला सांगत होता. आत लावलेले अनेक फोटो बघायला आणि त्याबाबतची  माहिती वाचायला खूप मजा आली. तिथल्या डायनिंग रूमच्या भिंतीवरच्या एका मोठ्या फ्रेममधल्या 'चंबा रुमालाने' माझे लक्ष वेधून घेतले. हिमाचलच्या अतिशय दुर्मिळ आणि प्राचीन कलेचा तो सुंदर नमुना मी प्रथमच बघितला. राष्ट्रपती निवासाच्या आवारामध्ये थोडेफार फिरून, फोटो काढून आम्ही पुढे निघालो. राष्ट्रपती निवासापर्यंत पोहोचायला इलेक्ट्रिक गाड्यांची सोय केली जावी असे मात्र प्रकर्षाने वाटले. तसेच आवारातली रेस्टॉरंट आणि स्वच्छतागृहे याची सोयही विशेष चांगली नव्हती. 
 
त्यानंतर आमच्या टॅक्सीचालकाने, तेथून जवळच असलेल्या, 'भीमाकाली' मंदिरापाशी आम्हाला नेले. भर पावसामध्ये, निसरड्या पायऱ्या चढून आम्ही मंदिर बघितले. तिथून निघून आम्ही नालदेहराचे गोल्फ कोर्स बघायला जाणार होतो. वाटेवर हिमाचलची 'फ्रूट रिसर्च इन्स्टिटयूट' बघायला आम्ही थांबलो. तिथले तिकीट काढून आत गेलो. हिमाचलमध्ये सफरचंदाची लागवड कधी आणि कशी सुरु झाली, सफरचंदाच्या वेगवेगळ्या जाती, त्यावर पडणाऱ्या किडींचे निर्मूलन याबाबतची रंजक माहिती फलकांवर लिहिलेली होती. पण तिथे माहिती सांगायला कोणीही नव्हते. एकूणच सरकारी अनास्था जाणवली. हे सगळे होईपर्यंत दुपारचे दोन वाजले होते. त्यामुळे वाटेत एके ठिकाणी आम्ही जेवायला थांबलो. पोटात जेवण गेल्यावर जरा जास्तच थंडी वाजायला लागली. त्यामुळे जेवणानंतर गरमागरम 'अद्रकवाली चाय' पिऊन पुढे निघालो. 

नालदेहरा येथील गोल्फकोर्स भारतातले कदाचित सर्वात जुने, सर्वात अवघड पण अतिशय नयनरम्य गोल्फकोर्स आहे. सर्वबाजूनी उंच-उंच वृक्षांनी वेढलेल्या या भागामध्ये, गोल्फ कोर्स तयार करता यावे  इतकी विस्तीर्ण मोकळी जागा कशी मिळाली, याबाबतही एक आख्यायिका प्रसिद्ध आहे. दोन देवतांमधील तुंबळ युद्धामध्ये मधल्या जागेतील सगळे वृक्ष जळून आणि दगड वितळून गेल्यामुळे हे शक्य झाले असे समजले जाते. ब्रिटिश व्हॉईसरॉय लॉर्ड कर्झनने जवळपास सव्वाशे वर्षांपूर्वी इथे गोल्फकोर्स तयार करवले. या जागेच्या प्रेमात पडलेल्या लॉर्ड कर्झन याने आपल्या तिसऱ्या  मुलीचे नाव Alexzandra Naldehra असे ठेवले होते. गोल्फ कोर्स जवळ पोहोचेपर्यंत, काही  पायऱ्या आणि चढी वाट चढून झालेली आमची दमणूक, हिरवेगार गोल्फ कोर्स समोर येताच, कुठल्याकुठे पळून गेली. गोल्फ-कोर्सच्या अवती-भवती घोड्यावर बसूनही फेरफटका मारता येतो. तिथे अनेक हौशी पर्यटक भर पावसामध्ये घोडेस्वारीचा आनंद घेत होते. गोल्फकोर्सच्या आत, बऱ्याच अंतरावर एक नागदेवतेचे देऊळ आहे असे समजले. परंतु, पावसामुळे सर्वत्र चिखल झाल्याने आणि वाटा निसरड्या झालेल्या असल्यामुळे आम्ही देवळापर्यंत गेलो नाही. गोल्फक्लबमध्ये एक छान रेस्टॉरंट आहे. तिथे बसले की आपल्याला सगळे गोल्फ कोर्स दिसू शकते. आमचे  जेवण व चहा नुकतेच झालेले असल्यामुळे आम्ही तिथे काही खाल्ले-प्यायले नाही. गोल्फ कोर्सच्या जवळच राहण्यासाठी टुमदार बंगल्या आहेत. त्याचे आरक्षण हिमाचल टूरिझमद्वारे करता येते. 

संध्याकाळ झाली आणि आम्ही परतीच्या वाटेला लागलो. दिवसभर घाटातल्या रस्त्यांवर फिरून आणि थंडगार वारे खाऊन आम्ही दमलो होतो. सहा-साडेसहा पर्यंत आम्ही खोलीवर परतलो. जेवण लवकरच उरकून घेतले. आम्ही आणखी एकच दिवस शिमल्यामध्ये राहणार होतो. उद्याच्या दिवस तरी शिमल्यामध्ये पाऊस नसावा, अशी मनोमन प्रार्थना करत निद्राधीन झालो. 
(क्रमशः)
  

शुक्रवार, १९ मे, २०२३

शिमला-कसौली भाग-६

एलिझीयम रिसॉर्टमधून निघून शिमल्यातल्या मॉल रोडजवळच्या 'आर्मी ट्रेनिंग कमांडच्या ऑफिसर्स मेस'मध्ये येऊन  स्थिरस्थावर झालो. सकाळचे अकरा वाजत आले होते, तरी संततधारेमुळे सूर्यदर्शन झालेले नव्हते. गेले दोन दिवस, खिडकीतून पाहताना, शिमल्याचे ओले हिरवे निसर्गसौंदर्य जरी रम्य वाटले असले तरी आता शिमला-दर्शन करायचे कसे? या विवंचनेत आम्ही होतो. तेवढ्यात, आनंदच्या शिमलास्थित मित्राचा, म्हणजे मेजर जनरल प्रदीपमोहन बाली (सेवानिवृत्त) यांचा फोन आला. 

"Welcome to Shimla! शादी कैसी रही? आप लोग अपने साथ  बारिश भी लेकर आये हो। लेकिन कोई बात नहीं। आज का क्या प्लॅन बना रहे हो?"

जरा उघडीप होईपर्यंत ताणून देण्याच्या विचारात आम्ही होतो. आमचा इरादा प्रदीप बालीने ओळखला असावा. आम्ही काही बोलायच्या आताच त्याने जवळजवळ हुकूमच  सोडला,

'ऐसा करो, मेस से दो छाते ले लो और पैदल बाहर निकलो। मेसके पास 'इंडियन इन्स्टिटयूट ऑफ ऍडव्हान्स स्टडीज'  है। आज पहले वो देख लो। उसके बाद मॉल रोड पे आ जाना। ठीक छे बजे मैं आपको स्कँडल पॉईंट पे मिलता हूँ।"

पुढचे  तीन दिवस शिमल्यात पाऊस असणार, असे भाकीत गुगलने वर्तवलेले होतेच. आम्ही आळस झटकून, छत्र्या घेऊन बाहेर पडलो. भर पावसात, हातातल्या छत्र्या सांभाळत, 'ऍडव्हान्स स्टडीज' पर्यंतचे जेमतेम दोन किलोमीटर  अंतर कापायला, आम्हाला पाऊण तास लागला. पण सोमवारी शिमल्यात सगळी सरकारी स्थळे बंद असल्यामुळे, तिथे पोहोचूनही, आम्हाला गेटच्या बाहेरूनच परतावे लागले. आदल्या रात्रीच्या जागरणामुळे आम्ही दमलेले होतो. तरीही खोलीवर न जाता, तडक मॉलरोडवरच गेलो. 

'ऍडव्हान्स स्टडीज' पासून Ridge वर असलेल्या ख्राईस्ट चर्चपर्यंत आम्ही साधारण एक वाजता पोहोचलो असू. एलिझीयम रिसॉर्टमध्ये उशिरा आणि भरपेट नाश्ता झालेला असल्याने जेवायची इच्छा नव्हतीच. सहा वाजायच्या आत जाखू टेकडीवरील  हनुमान मंदिर बघून यावे, असे आम्ही ठरवले. ख्राईस्ट चर्चपासून एक टॅक्सीवाला आमच्या मागे लागला होता. "माझी टॅक्सी जवळच आहे, तुम्ही टॅक्सीने जाऊन आरामात देऊळ बघा" असा लकडा त्याने लावला होता. आमच्यासारखेच, देऊळ बघू इच्छिणारे दोन केरळी तरुण आम्हाला भेटले. आम्हा चौघांना देवळापर्यंत नेऊन परत आणण्यासाठी, चारशे रुपयांमधे एक टॅक्सी आम्ही ठरवली. पण त्या टॅक्सीपर्यंत पोहोचेस्तोवर, पंधरा-वीस मिनिटे चढाचा रस्ता कापत आम्हाला जावे लागल्यामुळे आमची चांगलीच दमछाक  झाली.  

जाखू टेकडीचा रस्ता खूप वळणावळणाचा व चढाचा आहे. केबल कारमध्ये बसूनही वर जाता येते. पण, धुक्यामुळे बाहेरचे दृश्य दिसणारच नव्हते. त्यामुळे केबल कारपेक्षा टॅक्सीचा पर्यायच योग्य ठरला. टेकडीवर पोहोचल्यावरही, पाऊस, ढगाळ वातावरण आणि धुक्यामुळे आम्हाला आसपासचे दृश्य काहीच दिसले नाही. टेकडीवर हनुमानाचे प्राचीन मंदिर आहे. संजीवनी मुळीच्या शोधात आलेल्या हनुमानाने या टेकडीवर काही काळ विश्रांती घेतली होती, अशी आख्यायिका आहे. या टेकडीवरच हनुमानाची १०८ फुटी भव्य मूर्ती बघायला मिळते. थंड वाऱ्यात कुडकुडत, जेमतेम दर्शन घेऊन, आणि फोटो काढून झाल्यावर, चार वाजेपर्यंत आम्ही टेकडीवरून खाली आलो. परतीच्या वाटेवर ख्राईस्ट चर्चलाही भेट दिली. चर्च आतून खूपच भव्य आणि सुंदर आहे. 

स्कँडल पॉईंटजवळच शिमल्याचे 'गेटी'  थिएटर आहे. २ मे पर्यंत रोज संध्याकाळी तिथे 'भरतनाट्यम महोत्सव' असल्याची जाहिरात आम्ही जातानाच वाचली होती. एक कपभर गरम कॉफी पिऊन आम्ही गेटी थिएटरमध्ये भरतनाट्यम बघायला गेलो. १८८७ साली बांधलेले हे थिएटर आतून फारच सुंदर आहे. रुडयार्ड किपलिंग, पृथ्वीराज कपूर, कुंदन लाल सेहगल, टॉम आल्टर, अनुपम खेर, नासिरुद्दीन शहा, अशा अनेक दिग्गजांनी आपली कला पूर्वी इथे सादर केली आहे. तिथे गेल्यावर अगदी भारावून जायला होते. त्या दिवशी मात्र तिथे अगदीच नवशिक्या भरतनाट्यम कलाकारांचा कार्यक्रम होता. 

सहा वाजायच्या सुमारास जनरल बालींना स्कँडल पॉईंटवर भेटलो. आनंद आणि प्रदीप बाली, हे नुसते NDA कोर्समेटच नव्हे, तर संपूर्ण ट्रेनिंगच्या काळात एकाच स्क्वाड्रनमधे राहिलेले असल्याने, काही काळ ते दोघेही मला विसरून आपल्याच गप्पांमध्ये गुंगून गेले. त्यानंतर जनरल बाली जवळच्याच 'अल्फा रेस्टॉरंटमधे' आम्हाला घेऊन गेले. दिवसभराच्या तंगडतोडीमुळे सहा वाजेपर्यंत चांगलीच भूक लागली होती. तिथे भला मोठा, खुसखुशीत आणि चविष्ट सामोसा खाल्ला आणि अगदी ब्रिटिश स्टाईलमध्ये, किटलीतून आणलेला 'इंग्लिश टी'  प्यायलो. बालींचे शालेय शिक्षण शिमल्यामध्ये झालेले असल्यामुळे, शिमल्याबद्दल आम्हाला काय सांगू आणि काय नको, असे त्यांना झाले होते. पण आमच्या चेहऱ्यावरची दमणूक जाणवल्यामुळेच कदाचित त्यांनी गप्पा आवरत्या घेतल्या. 

रात्री मेसमध्ये शिमल्यातले काही सेनाधिकारी भेटले. त्यांच्याशी छान मनमोकळ्या गप्पा झाल्या. तिथल्या एका अधिकाऱ्याच्या पत्नीच्या आग्रहाखातर मी Toddy नावाचे एक पेय प्यायले. मध, लिंबाचा रस आणि मसाले घातलेले ते गरम पेय मी पहिल्यांदाच प्यायले आणि मला ते खूप आवडले. Baked Vegetables, चीझ मॅकरोनी, कटलेट्स, डिनर रोल्स, पुडिंग अशा मस्त जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर, झोप कधी लागली, ते आम्हाला कळलेच नाही. 


  

गुरुवार, १८ मे, २०२३

शिमला-कसौली भाग-५

रविवार दि. ३० एप्रिलच्या सकाळी हळदीचा कार्यक्रम रिसॉर्टच्या गच्चीवर झाला. उत्तर हिंदुस्थानात या कार्यक्रमाला खूप महत्त्व असते. हळदीच्या  कार्यक्रमासाठी सगळ्यांनीच पिवळ्या रंगाचे कपडे घालणे अपेक्षित असते. आम्हीही पिवळया रंगाचे कपडे घालून, रिसॉर्टच्या पाचव्या मजल्यावरच्या गच्चीवर गेलो. सर्व बाजूंनी काचेच्या भिंती आणि वर काचेचे छत असल्याने तिथे पाऊस लागत नव्हता. पण भिंतींना मोठ-मोठाल्या खिडक्या असल्याने त्यातून येणारे ओले वारे आणि पावसाचे तुषार अंग मोहरून टाकत होते. अगदी रोमँटिक वातावरणात हळदीचा आणि वधू-वरांवर फुले उधळण्याचा कार्यक्रम झाला. हळदीच्या कार्यक्रमासाठी पारूलने, म्हणजे साहिलच्या आईने, आम्हा सर्व बायकांना पिवळ्या रंगांच्या फुलांचे खोटे दागिने दिले आणि घालायला लावले.

त्यानंतर 'भात' हा कार्यक्रम झाला. आपल्याकडे नवऱ्या मुलीने बोहल्यावर चढताना नेसायची पिवळी किंवा अष्टगंधी साडी, मामाने देण्याचा प्रघात आहे. तसेच मारवाड्यांमध्येही 'ममेरा' नावाची पद्धत आहे. या ममेऱ्यासाठी वधूचा मामा, बराच मोठा खर्च करतो आणि भाचीला आणि बहिणीच्या कुटुंबातील इतर सर्वाना कपडे, दाग-दागिने देतो. उत्तर प्रदेशातल्या या 'भात' कार्यक्रमाचा खर्च मात्र नवऱ्या मुलाच्या मामाने करायचा असतो. पण नवऱ्या मुलाने तो कार्यक्रम बघायचा नसतो. शेजारच्या खोलीमध्ये एकीकडे तो कार्यक्रम चालू होता. त्यावेळी साहिल मोकळा असल्याने आमच्याशी गप्पा मारत बसला होता. मुलाकडच्या सर्व वऱ्हाडी मंडळींना साहिलच्या मामा-मामींनी आहेराची पाकिटे दिली. आम्हा दोघांना बोलावून आहेर दिला. 'एखाद्याचा मामा बनवणे' हा वाक्प्रचार या असल्या मामांशी संबंधित असलेल्या खर्चिक प्रथांमुळेच पडला असावा असा विचार माझ्या मनामध्ये येऊन, मला हसू आले.

दुपारी पावसाने थोडा वेळ विश्रांती घेतली होती. त्यामुळे दुपारचे जेवण झाल्यावर, मी तासभर फेरफटका मारून आले. संध्याकाळी 'हाय टी' होता. त्यातल्या खाद्यपदार्थाना लांबूनच 'हाय' म्हणून मी फक्त गरम चहाचा आस्वाद घेतला. हॉटेलमध्ये सकाळी भरभक्कम नाश्ता, जेवणाच्या आधी स्नॅक्स, मग दुपारचे जेवण, त्यानंतर सॅन्डविच-भजी-केक्स व कुकीज सह 'हाय टी', पुन्हा संध्याकाळच्या जेवणाच्या आधी स्नॅक्स व  शीतपेये, आणि शेवटी रात्रीचे जेवण, अशी सगळी रेलचेल होती! सर्व खाद्यपदार्थ अतिशय रुचकर असले तरी, ते पाहूनच आमचे पोट भरत होते. काही वऱ्हाडी मंडळी मात्र सतत काही ना काही खाताना दिसत होती. शिवाय आमच्या खोलीमध्ये, 'गिफ्ट हॅम्पर', म्हणजे  अनेक खाद्यपदार्थ असलेली एक सुशोभित टोपली आलेली होतीच. तसेच अग्रवाल आणि शुक्ल कुटुंबियांकडून आलेले मिठायांचे डबेही होते.

मुलाकडचे आम्ही सर्व बाराती संध्याकाळी हॉटेलच्या बाहेर पडलो. ढोलकीच्या तालावर नाचत आमची बारात हॉटेलमध्ये शिरली. त्यावेळी वधुपक्षाने आमचे आगत-स्वागत केले. त्यानंतर 'जयमाला' म्हणजे, साहिल-अंशुला यांनी एकमेकांना हार घालण्याचा कार्यक्रम झाला. रात्रीच्या जेवणानंतर 'फेरे' म्हणजे सप्तपदी झाली. या लग्नासाठी खास अग्रवाल कुटुंबियांचे गुरुजी बरेलीहून आलेले होते. रात्री बाराच्या पुढे 'फेरे', वरपूजन आणि इतर विधी झाले. थोड्या-फार प्रमाणात सगळ्या लग्नांमध्ये आजकाल जे होते, तेच या लग्नातही झाले. प्रथम ढोलकीवाला रंगात येऊन, वेगवेगळ्या नातेवाईकांना गाण्यांद्वारे ललकारून नाचायला बोलवत होता. नाचणाऱ्या बारातीवरून ओवाळून टाकलेल्या पैशांची भरपूर कमाई त्याने केली. जयमाला झाल्यानंतर त्यानंतर फोटोग्राफरने साहिल व अंशुला यांचा ताबा घेतला. गुरुजींना संधी सरतेशेवटी मिळाल्यामुळे रात्रीच्या तीन वाजेपर्यंत त्यांची पूजा चालली. आम्ही सगळेजण पेंगुळलेल्या अवस्थेत बसलो होतो. श्री. शिशिर अग्रवालांनी अखेर गुरुजींना आवरते घेण्याची विनंती केल्यामुळे कसेबसे पहाटे साडेतीन वाजेपर्यंत सर्व लग्नविधी पार पडले. 

दुसऱ्या दिवशी, म्हणजे १ मेच्या सकाळी ९ वाजेपर्यंत आम्हाला जाग आली. आम्ही आमचे सामान आवरून हॉटेलमधल्या रेस्टॉरंटमध्ये नाश्ता करायला गेलो. तिथेच सर्व अग्रवाल कुटुंबीय भेटले. नववधू अंशुला आणि साहिलही भेटले. नाश्ता करून, सर्वांचा निरोप घेऊन आम्ही बाहेर पडलो. 

आमची शिमला ट्रिप खऱ्या अर्थाने यानंतर सुरु होणार होती. 

सोमवार, १५ मे, २०२३

शिमला-कसौली भाग-४

शिमला स्टेशनवर आम्हाला घ्यायला आलेल्या गाडीच्या डिकीमध्ये सामान ठेऊन आम्ही आत बसेपर्यंत आमच्यावर गारांचा मारा झालाच. ते बघून आनंद पुटपुटला,

"जहाँ जहाँ पाँव पडे संतन के, वहाँ वहाँ होवे बंटाधार।"  

आम्ही सिमल्याला आल्यामुळे काही विशेष घडले आहे, असे वाटून मला एकदम अभिमान वाटला. पण त्या हिंदी वाक्प्रचाराचा खरा अर्थ आनंदने सांगितल्यानंतर मात्र मी पुरती खजील झाले. "अभागी व्यक्ती जिथे जाईल तिथे आपले नशीब घेऊन जाते", असा काहीसा अर्थ त्या वाक्याचा आहे!

'वेलकम हेरिटेज एलिसियम रिसॉर्ट' या कार्यस्थळी आम्ही पोहोचलो. आमच्या स्वागताला साहिलचा धाकटा भाऊ सुशांत, लॉबीमधे उभाच होता. रिसॉर्टवाल्यांनी आमच्या गळ्यात एकेक हिमाचली स्कार्फ घालून व मधुर चवीचे पेय पाजवून आमचे स्वागत केले. साहिलप्रमाणेच सुशांतही वेळोवेळी आमच्या घरी येऊन राहिलेला आहे. त्यामुळे हॉटेलच्या खोलीची किल्ली मिळेपर्यंत त्याच्याशी प्राथमिक गप्पा झाल्या. आम्हाला रिसॉर्टवर पोहोचेपर्यंत दुपारचा दीड वाजून गेला होता.  मेंदीचा कार्यक्रम संपलेला होता. "आता आपण जेवायलाच जाऊया", असे सुशांतने सुचवले. खोलीवर जाऊन कपडे बदलून जेवायला येतो असे सांगून, आम्ही आमच्या खोलीकडे निघालो. वाटेत अचानकच, दोन्ही होतांच्या कोपरापर्यंत आणि पायांना ढोपरापर्यंत मेंदी लावलेली एक हसतमुख तरुणी आमच्या समोर आली, आणि आम्हाला बघताच म्हणाली,

"नमस्ते आँटी! आप स्वाती आँटी और आप आनंद अंकल हो ना? साहिलने आप दोनोके बारेमें  मुझे बहोत कुछ बताया है।" 

ती साहिलची वाग्दत्त वधू, अंशुला आहे हे आमच्या लक्षात आलेच. आमची आणि तिची पूर्वी कधीच भेट झालेली नसतानाही तिने आम्हाला ओळखावे याचे आम्हाला अप्रूप वाटले. 

दुपारचे जेवण झाल्यावर आनंदने ताणून दिली. मी मात्र शिमल्याची थंड हवा आणि निसर्गसौंदर्य  अनुभवायला चालत बाहेर पडले. तोपर्यंत पाऊस थांबलेला असल्यामुळे, चांगला दीड-दोन तासांचा फेरफटका मारून मी ताजीतवानी होऊन आले. सिमल्यामध्ये वळणावळणाच्या आणि चढ-उताराच्या रस्त्यांवर चालण्याचा व्यायाम खूपच सुखद वाटला. इतका सतत आणि सहजी व्यायाम होत असताना हिमाचल सरकारने जागोजागी ओपन जिम्स उभी करून उगाच वायफट खर्च केला आहे असे मला वाटले. एप्रिल महिन्याच्या अखेरीला शिमल्यामध्ये अकाली झालेल्या वृष्टीमुळे हवेमध्ये चांगलाच गारठा आलेला होता. इतकी थंडी पडेल अशी मुळीच अपेक्षा नसल्यामुळे आम्ही आमच्या सामानात काहीही गरम कपडे ठेवलेले नव्हते. चालताना मला थंडी जाणवली नाही. पण चालणे संपवून हॉटेलवर परत आल्यावर अंगामध्ये हुडहुडी भरून आली. मी परत येईपर्यंत आनंदची वामकुक्षी निर्विघ्नपणे पार पडल्यामुळे तोही अगदी ताजातवाना झाला होता!  

'वेलकम हेरिटेज एलिसियम रिसॉर्ट' हे आरामदायी हॉटेल होते. आमची खोलीही सर्व सुखसोयींनी युक्त अशी होती. हॉटेलच्या बाहेरच्या बाजूच्या सगळ्या भिंती काचेच्या आहेत. त्यामुळे कुठेही उभे राहिले तरी बाहेर टुमदार शिमला शहर आणि आजूबाजची पर्वतराजी दिसते. अग्रवालांनी त्या रिसॉर्टमधल्या सगळ्या खोल्या वऱ्हाडी मंडळींसाठी आरक्षित केलेल्या होत्या. आमंत्रितांमध्ये वर आणि वधू पक्षांकडचे अगदी जवळचे नातेवाईक आणि वधू-वरांचे मित्रमंडळ असे मोजकेच लोक होते. शिशिर अग्रवाल हे उच्चपदस्थ इन्कमटॅक्स अधिकारी असूनही त्यांच्या आगे-मागे धावणारे कोणीही सरकारी कर्मचारी तिथे नव्हते. त्यामुळे लग्न जरी हॉटेलमध्ये असले तरीही सगळ्या वातावरणात एकप्रकारचा घरगुतीपणा होता. साहिलच्या मुंबई आय.आय.टी. मधल्या वर्गमित्रांपैकी बरीचशी मुले आमच्या मुलाला, अनिरुद्धला ओळखत असल्याने, साहिलने आमची आणि त्यांची ओळख करून दिली. मग त्यांच्याशीही आमच्या गप्पा झाल्या.  

संध्याकाळी साडेसातच्या सुमारास तयार होऊन आम्ही 'संगीत' कार्यक्रमासाठी गेलो. हॉलमधली सजावट, उत्तम होती, पण त्यात भपका नव्हता. स्वतः अंशुला आणि वऱ्हाडातील इतर कोणीही भडक मेकप केलेला नव्हता. सर्वप्रथम 'सगाई', म्हणजेच, एकमेकांना अंगठी देण्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर झालेला 'संगीत' कार्यक्रम अतिशय आनंददायी होता. साहिल आणि अंशुलाच्या कुटुंबियांनी आणि काही मित्र-मंडळींनी मोजकीच नृत्ये सादर केली. आजकाल अशा सर्व कार्यक्रमांमध्ये वाजणारी कर्णकर्कश्श गाणी, आणि मद्यधुंद होऊन, डीजेच्या तालावर बेभानपणे नाचणारी तमाम वऱ्हाडी मंडळी, असले काहीही नव्हते. 

निवृत्त आर्मी अधिकारी असलेले, अंशुलाच्या एका जीवश्च-कंठश्च मैत्रिणीचे वडील लग्नाला आले होते. त्यांच्याबरोबर, 'गुड ओल्ड डेज' च्या गप्पा मारण्यात आनंद व्यग्र होता. त्या काळात, संगीताच्या तालावर नाच करण्याची माझी हौस मीही भागवून घेतली. दहा-साडेदहापर्यंत तो कार्यक्रम संपला. त्यानंतर जेवणे आटपून आम्ही आपापल्या खोल्यामध्ये झोपायला गेलो.


 (क्रमशः)