शुक्रवार, १ डिसेंबर, २०२३

दीव-सोमनाथ-व्दारका- ४


१९६० च्या दशकामध्ये केंव्हातरी दादांनी सोमनाथ मंदिर बघितलेले होते. शिवाय, मंदिरामध्ये असलेली  तुफान गर्दी आम्ही आदल्या दिवशी पहिली होती. त्यामुळे १६ नोव्हेंबरला, आम्ही दादांना बरोबर न घेताच दर्शनाला जायचे ठरवले. आंघोळी करून आम्ही पाचजण पहाटे साडेसहा वाजेपर्यंत दर्शनाच्या रांगेमधे लागलो. पहाटेच्या वेळीही बरीच गर्दी होती. तरी आम्हाला सकाळची आरती बघायला मिळाली. आनंद, गिरीश आणि शिरीष पुरुषांच्या रांगेत आणि मी व प्राची बायकांच्या रांगेमध्ये होतो. कोणाजवळही मोबाईल नसल्यामुळे, दर्शनानंतर बाण-स्तंभाजवळ भेटायचे असे आधीच ठरवून ठेवले होते. काही वर्षांपूर्वी मोबाईलशिवायही आपले आयुष्य सुरळीत कसे चालू होते, याचे आज आश्चर्य वाटते. 

सोमनाथ मंदिर परिसरातील बाणस्तंभ हे एक मोठे आश्चर्य मानले जाते. या प्राचीन स्तंभावर असलेल्या बाणाचे टोक दक्षिणेला असलेल्या समुद्राकडे रोखलेले आहे. "आसमुद्रांत दक्षिण ध्रुवपर्यंत अबाधित ज्योतिर्मार्ग" असा संस्कृत भाषेतला मजकूर या बाणस्तंभावर लिहिलेला आहे. सोमनाथ मंदिराकडून सरळ रेषेमध्ये दक्षिणेकडे सागरी प्रवास सुरू केल्यास, हजारो मैल दूर असलेल्या दक्षिण ध्रुवापर्यंत जमिनीचा तुकडादेखील वाटेत लागणार नाही, असा त्याचा अर्थ आहे. कित्येक शतकापूर्वी, कुठलीही साधने अथवा उपकरणे नसताना, आपल्या पूर्वजांना हे सत्य कसे समजले असावे, याचे आश्चर्य वाटते. 

पहाटेच्या प्रसन्न वेळी फिरत-फिरत आम्ही सोमनाथ मंदिराचा संपूर्ण परिसर बघितला. त्यानंतर आपापले फोन, पर्सेस वगैरे ताब्यात घेतले आणि जवळच असलेल्या जुन्या शिवमंदिरात गेलो. पुण्यश्लोक अहल्याबाई होळकरांनी बांधलेल्या या जुन्या मंदिरामध्ये मात्र मोबाईल व इतर सामान नेण्यावर काहीही पाबंदी नव्हती. त्यामुळे तिथे आम्हाला फोटो काढता आले. दर्शन घेऊन झाल्यावर आनंद, शिरीष आणि गिरीश हॉटेलवर परतले. प्राचीला अभिषेक करायचा असल्याने आम्ही दोघी मागे थांबलो. प्राची भक्तिभावाने अभिषेक करत होती आणि मी नुसतीच 'मम' म्हणत होते. 


मुख्य सोमनाथ मंदिरात पूजा-अर्चा-अभिषेक इत्यादि करण्याची व्यवस्था नाही. ते सर्व विधी अहल्याबाईंनी बांधलेल्या जुन्या मंदिरातच करता येतात. त्याकरता ठरवून दिलेले शुल्क अनेक ठिकाणी फलकांवर लिहिलेले आहे. आपण जमा केलेले पैसे सोमनाथ ट्रस्टला मिळतात आणि ट्रस्टमार्फत नेमलेले गुरुजी ते विधी पार पाडतात. आपल्याला कोणी ओळखीचे गुरुजी हवे असल्यास त्यांच्याकडून आपण  विधी  करून घेऊ शकतो. पूजा झाल्यावर आम्ही दोघी हॉटेलवर परतलो. सोमनाथ देवळाच्या उत्तरेला काही अंतरावर प्राचीन सोमनाथ मंदिराच्या अवशेषांचे संग्रहालय आहे पण ते आम्ही पाहिले नाही. 

दुपारची विश्रांती झाल्यावर, आनंद, मी आणि गिरीश-प्राची असे चौघे सोमनाथमधील इतर देवस्थाने बघायला बाहेर पडलो. शिरीषला बरे वाटत नसल्याने तो दादांबरोबर हॉटेलमध्येच थांबला. आम्ही लक्ष्मीनारायणाचे देऊळ, सूर्यमंदिर, त्रिवेणी संगम, त्रिवेणी संगम मंदिर, गीता मंदिर, कामनाथ महादेव मंदिर इत्यादी अनेक मंदिरे बघितली. पाच पांडव गुहा सध्या बंद ठेवलेल्या असल्यामुळे त्या बघता आल्या नाहीत. भालका तीर्थ आणि देहोत्सर्ग स्थान ही दोन ठिकाणे भाविकांनी विशेष भेट द्यावीत अशी आहेत. पिंपळाच्या झाडाखाली झोपलेल्या श्रीकृष्णाला हरीण समजून व्याधाने बाण मारला आणि त्यामुळे श्रीकृष्णाचा देहांत झाला अशी पौराणिक कथा आहे. ज्या ठिकाणी ही घटना घडली त्याच ठिकाणी भालका तीर्थ आहे. हिरण नदीच्या काठावर देहोत्सर्ग तीर्थ आहे. तिथे भगवान श्रीकृष्णांच्या पावलांचा ठसा आहे. या दोन्ही मंदिरातही बरीच गर्दी होती आणि स्वच्छतेचा अभावच होता. 

सोमनाथ मंदिराच्या आवारात रोज संध्याकाळी ''light and sound show" असतो. त्या कार्यक्रमाची तिकिटे गिरीशने संध्याकाळी आधीच जाऊन काढली होती. कार्यक्रम उत्तम होता, पण त्यामध्ये मुख्य भर पौराणिक कथांवर होता. सोमनाथाचे देऊळ कोणी-कोणी आणि किती वेळा लुटले, याचा तपशीलही मिळेल या अपेक्षेने मी गेलेले असल्याने माझा थोडा अपेक्षाभंग झाला. देवळाच्या मागच्या बाजूला समुद्रकिनाऱ्यावर, अंबानी कुटुंबियांनी बांधलेले 'सागर दर्शन' नावाचे अतिथीगृह आहे. तिथे रास्त दरामध्ये राहण्याची उत्तम सोय उपलब्ध आहे. पण त्यासाठी त्यांच्या वेबसाइटवरून, बरेच आधी अर्ज करून आरक्षण करावे लागते. तिथले जेवणही शुद्ध-सात्विक आहे असे समजले. 

मागच्या वर्षी आम्ही इजिप्तला गेलो होतो. मूर्तिभंजक आक्रमणकर्त्यांनी तिथल्या प्राचीन मंदिरांची केलेली तोडफोड आम्ही पाहिली होती. मोठमोठ्या शिळा वापरून उभारलेली ती मंदिरे आपल्या मंदिरांपेक्षा अतिभव्य आकाराची असल्याने आक्रमणकर्त्यांना ती पूर्णपणे उध्वस्त करता आली नव्हती. मात्र त्या धर्मांध आक्रमणकर्त्यांनी  इजिप्तवासीयांचा धर्म पूर्णपणे नामशेष केला. त्यामुळे, आक्रमण होण्यापूर्वी प्राचीन इजिप्तवासीयांच्या धर्माचे नेमके स्वरूप कसे होते? या प्रश्नाचे उत्तर आज आपल्याला मिळत नाही. 

तुलना करायची झाल्यास, आपली मंदिरे जरी वेळोवेळी उद्ध्वस्त झाली तरी आपला धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा जतन  केला गेला, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. सोमनाथचे मंदिरही मुसलमान आक्रमकांनी कैक वेळा लुटून जमीनदोस्त केले. परंतु, प्रत्येक वेळी, तत्कालीन राजांनी ते मंदिर पुन्हा बांधून घेतले.  १९५१ साली पुनर्निमाण झालेले सोमनाथ मंदिर, सनातन धर्माच्या शाश्वततेचे प्रतीक म्हणून आज  दिमाखात उभे आहे. याच कारणामुळे हे  देऊळ बघण्याची माझी प्रबळ इच्छा होती. पण सोमनाथ मंदिराचा इतिहास बघता, एका गोष्टीचे मात्र मला कमालीचे वाईट वाटते. एकदा हल्ला झाल्यानंतर, आपल्या पूर्वजांनी या मंदिरावर पुन्हा-पुन्हा हल्ले का होऊ दिले? 

आजच्या युगात कोणी परकीय आक्रमक येऊन आपल्या मंदिरांवर हल्ला करण्याची शक्यता कमीच आहे. पण समाजमाध्यमांतून, जाहिरातींमधून, आणि लव्ह-जिहाद, सक्तीचे धर्मांतर अशा प्रकारातून, आपल्या धर्मावर आणि संस्कृतीवर सतत हल्ला होतो आहे. झालेला प्रत्येक हल्ला परतवण्यासाठी आपण सक्षम असायला हवे. परंतु, त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे, हल्ला करण्याची कोणाची हिंमतच होऊ नये, यासाठी आपण सजग राहिले पाहिजे असे मला वाटते .  

(क्रमशः)