Wednesday, 27 November 2013

अपघात, एक नव्हे दोन

मागच्या बुधवारची गोष्ट.  घरातून बाहेर पडून माझ्या क्लिनिककडे  चालत निघाले होते. नेहरू मेमोरियल हॉलच्या चौकात, सुप्रिया हॉटेल समोर, एक तरुणी अचानक  दुचाकी वाहनाचा जोराचा धक्का लागून रस्त्यावर पडताना दिसली. मी धावत तिला उचलायला गेले. आसपास बरीच गर्दीही जमली. आम्ही तिला उचलून समोरच्या दुकानात बसवले व पाणी दिले. मी डॉक्टर आहे, हे सांगून सूत्रे हातात घेतली व तिची तपासणी केली. मुलीच्या कंबरेला थोडा मुका मार लागला होता, पण तिच्या जिवाला काही धोका नव्हता.

वरकरणी जरी काळजी करण्यासारखे काहीच नसले, तरी  तिच्या घरच्या कोणाला तरी बोलावून त्यांच्याकडे तिला सुपूर्द करावी अथवा पोलिसांनीच तिला तिच्या घरी पोहोचवावे, असा सल्ला मी वाहतूक पोलिसांना दिला. गंमत म्हणजे ती तरुणी त्या गोष्टीला काही केल्या  तयार होईना. 'माझ्या आई-वडिलांना अपघाताबद्दल काहीही सांगू नका', अशा हात जोडून विनवण्या करू लागली. 'मला फारसे काहीही झालेले नाही व माझी मी घरी जाईन' असा आग्रह तिने धरला. तिच्या अशा भूमिकेमुळे गर्दीतल्या सर्वांच्याच मनात डोकावलेल्या वेगवेगळ्या शंका त्यांच्या चेहऱ्यावर दिसू लागल्या.

मी तिला विचारले, "आई वडिलांना कळवायला का नको म्हणते आहेस तू ?"
"माझ्या बाबांना न सांगता माझ्या आईने माझ्यासाठी स्पोकन इंग्रजीचा क्लास लावला आहे. पूर्ण फीदेखील भरली आहे. आज क्लासचा पहिलाच दिवस होता. आता हे अपघाताचे कळले, तर बाबांना माझ्या क्लासचेही कळणार. मग माझे बाबा आईला रागावतील आणि माझा क्लास बंद पाडतील. म्हणून म्हणते, मला जाऊ द्या. माझ्या घरच्यांना कृपा  करून कळू देऊ नका. " ती तरुणी पुन्हा गयावया करू लागली.

तशा परिस्थितीत तिला एकटीलाच घरी जाऊ देणे मला योग्य वाटत नव्हते. मुका मार असला तरी आतल्या आत रक्तस्त्राव होऊ शकतो याची कल्पना मी पोलिसांना दिली. तिला एकटीला घरी पाठवले आणि नंतर नेमके तसे काही झालेच तर तिच्या जिवाला धोका आहे व तुमच्यावर बेजबाबदारपणाचा ठपकाही येऊ शकतो, असे पोलिसांना सांगून मी माझ्या क्लिनिकला निघून गेले .

स्वत:च्या हिमतीवर, अगदी नवऱ्याच्या इच्छेविरुद्ध मुलीला इंग्रजी शिकवून पुढे आणण्याच्या एका आईच्या जिद्दीचे मला कौतुक वाटले . पण त्या मुलीला एकटीला घरी न सोडण्याचा माझा सल्ला, तिच्या आईच्या जिद्दीच्या आणि  त्या मुलीच्या प्रगतीच्या आड, येणार की काय, ही बोच मनाला लागून राहिली.

उमा, तू लवकर बरी हो

उमा बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल झाली त्याला दहा दिवस उलटून गेले.  नेपाळच्या ट्रीप मध्ये, कुणा वेटरच्या चुकीमुळे उमा शेकोटीच्या ज्वालांमध्ये अचानक भाजली गेली. जवळजवळ ४२ टक्के बर्न्स आहेत असे कळतेय. ही बातमी समजल्यापासून मी बेचैन आहे. एकदा वाटले होते, लगेच उठावे आणि जावे मुंबईला. पण मी जाऊन तरी काय होणार? सध्या मलाच सर्दी खोकला आणि तापाने पछाडलेले आहे. माझ्या जाण्याने व भेटण्याने उमाला मदत होण्यापेक्षा जंतुसंसर्ग होण्याची शक्यताच जास्त आहे .  

मुंबईतच हार्ट सर्जन म्हणून कार्यरत असलेला आमचा वर्गमित्र डॉ अजय चौगुले, नुकताच तिला भेटायला जाऊन आला. त्याने उमाच्या बोलण्याचा एक छोटासा video काढून आम्हाला पाठवलाय.  उमा किती धीराची आहे म्हणून सांगू! त्या video मध्ये ती आम्हा वर्ग मित्र-मैत्रिणीना धीर देण्याचे काम करते आहे. तिच्या वेदना सहन करता करता बिचारी बोलते आहे, हे पाहून माझ्या मनाला फार यातना झाल्या. वैद्यकीय शास्त्र खूपच प्रगत झालेले आहे, तिला उत्तम उपचार मिळत आहेत, तरीही उमाची बातमी ऐकल्यापासून मन सैरभैर आहे .

 उमा, तू लवकर बरी हो बरं, आणि पुन्हा पूर्वीसारखी मनमोकळी हसत रहा !

Tuesday, 26 November 2013

सोन्यासारखी सोनल

त्या दिवशी संध्याकाळी फोनवर माझी सेक्रेटरी यास्मिन रडत रडत म्हणाली, "मॅडम, आजही मुझे पता चला था कि सोनल कागली हॉस्पिटलमें दो दिन से भर्ती थी. अभी उधर फोन करा, तो बता रहे हैं कि थोडी देर पहलेही सोनल की डेथ  हो गयी". अचानक आलेल्या या बातमीने मीही क्षणभर अचंभित झाले. पण पुढच्या क्षणी स्वत:ला सावरून, यास्मिनला शाब्दिक धीर देऊन फोन ठेऊन दिला.

दहा वर्षांपूर्वी, मी व डॉक्टर जैन यांनी शेजारी शेजारी क्लिनिक्स चालू केली. या काळा, माझ्या क्लिनिकच्या पाच सात  सेक्रेटरी  काम सोडून गेल्या. पण  सोनल मात्र पहिल्या दिवसांपासून  डॉक्टर जैनांकडे टिकून होती. न चुकता वेळेवर येणारी, कितीही उशीर झाला तरी शेवटपर्यंत थांबणारी, सुस्वभावी, मितभाषी, गुणी मुलगी. डॉक्टर जैन यांच्या क्लिनिकमध्ये तिच्या असण्याची मला इतकी सवय झाली होती की आता यापुढे ती कधीही दिसणार नाही वा  भेटणार नाही हे मनाला पटवणे फार जड जाते आहे.

सुरुवातीला, एक-दोन शब्दांची अथवा निरोपांची देवाण-घेवाण होता होता पुढे माझ्या व तिच्या गप्पाही व्हायला लागल्या. माझ्या क्लिनिकला कुलूप असतानामाझ्याकडे एखादा पेशंट आला तर सोनल मला लगेच फोन करून कळवत असे. माझ्या सेक्रेटरीकडून तिच्याबद्दल थोडीफार माहिती कळायची. सतत आजारी असणारे वयोवृद्ध वडील, शरीराने अधू असलेला भाऊ आणि घरची गरीबी. मोठ्या बहिणींची लग्न झालेली पण हिच्या लग्नाचा योग काही जुळून येत नव्हता. क्लिनिक संपल्यावर जोराचा पाऊस असलातर माझ्या सेक्रेटरी मुलीबरोबर मी आवर्जून सोनललाही तिच्या घरापर्यंत गाडीतून सोडायचे. अगदी मोडकळीला आलेल्या वाड्यात दोन खोल्यांमध्ये तिचे कुटुंब भाड्याने रहायचे. ते पाहून मला नेहमी दु:ख होत असे. अशा परिस्थितीतही सोनल हसतमुखाने काम कसे करायची, हे एक न उलगडलेले कोडे होते. 

पाच सहा वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. "सर्दी खोकला झाला आहे, काहीतरी औषध लिहून दया" असे सांगत सोनल माझ्याकडे आली. न तपासता नुसतेच औषध लिहून देणे योग्य न वाटल्याने स्टेथोस्कोप  तिच्या छातीला लावला आणि मी दचकलेच. तिच्या हृदयाच्या दोन झडपा बऱ्याच खराब आहेतहे मला कळले. मी जुजबी औषध लिहून तिला पाठवून दिले पण लगेच डॉक्टर जैनांना फोन करून माझे निदान सांगितले. डॉक्टर जैनांनी त्वरित तिच्या सर्व तपासण्या करून घेतल्या आणि त्या दुर्दैवी निदानावर शिक्कामोर्तब झाले. हृदयरोगतज्ञांच्या सल्ल्याने तिचे औषधोपचारही चालू झाले. पुढे तिच्या वडिलांचे निधन झाले. पण, स्वतःच्या दुर्धर आजाराला तोंड देत, सोनल पूर्वीसारखीच उत्साहात व हसतमुखाने काम करीत राहिली. त्यामुळे ती कधी आजारी वाटतच नसे. 

दोन वर्षांपूर्वी  हृदयरोग तज्ञ डॉक्टरांनी तिच्या हृदयावर शस्त्रक्रिया करून झडपा बदलण्याचा सल्ला दिला होता. ती शस्त्रक्रिया झाली असतीतर सोनल निश्चितच पुढे पंचवीस-तीस वर्षे तरी चांगले आयुष्य जगू शकली असती. शस्त्रक्रिया झाली नसती तरीही ती सहज दहा बारा वर्षे जगली असती. पण ती शस्त्रक्रिया काही कारणाने होऊ शकली नाही. अचानक दोन दिवस सोनल हॉस्पिटलमध्ये भर्ती होते काय आणि अचानक मृत्यू पावते काय, हे सगळं मी डॉक्टर असूनही मला पटवून घ्यायला अवघड जाते आहे. वैद्यकीय शास्त्र इतके पुढे गेलेले असतानाही आपण आपल्या जवळ वावरणाऱ्या व्यक्तीला वाचवू शकत नाही, हा सल आयुष्यभर मनांत राहणारच .

चार सहा दिवसापूर्वीच आमचे बोलणे झाले तेंव्हा सोनल अगदी खुषीत मला सांगत होती की तिच्या कुटुंबीयांनी एक नवीन flat घेतला होता आणि लवकरच ते सगळे तिथे राहायला जाणार होते. स्वत:च्या घरांत रहायला मिळण्याचे इतके छोटेसे सुखही बिचारीच्या नशिबात का नसावे? निदान तिच्या आत्म्याला तरी आता सुख-शांती लाभोहीच देवाजवळ प्रार्थना!
डॉक्टर स्वाती बापट   

Wednesday, 30 October 2013

शिक्षण पालकांचे

शिक्षण पद्धतीत लवकरात लवकर आमूलाग्र बदल व्हायला हवाच आहे. आपल्या देशची राजकीय परिस्थिती आणि नेत्यांची बौद्धिक पातळी लक्षात घेता, आपल्या शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल घडायला किती वर्षे जातीला कुणास ठाऊक.पण तो पर्यंत काय? 

शिक्षण पध्दती किंवा शाळा कशीही 
 असली तरी, पालकांनी आपापल्या मुलांना शिक्षणाची गोडी लावावी लागते. मुलांना हळू हळू करत प्रत्येक विषयातील पाठ्यक्रमाबाहेरचे व जरा कठीण असे थोडेसे काहीतरी शिकायला लावणे हे कुठल्याही सजग पालकाला शक्य आहे . पण बरेचसे पालक ते करत नाहीत व फक्त आपल्या शिक्षण पद्धतीला नावे ठेवत बसतात. अतिशय सोप्या अन बुद्धीला चालना न देणाऱ्या अशा सध्याच्या शालेय अभ्यासाचे स्वरूप लक्षात न घेता, आपल्या मुलांना अभ्यासाचा फार ताण आहे, अशा समजुतीत बरेसचे पालक असतात . दुर्दैवाने या समजूतीबरोबरच मार्क्स=हुषारी असे समीकरण कित्येक पालकांच्या मनात तयार झालेले असते . त्यामुळे मग मुलांच्या शिक्षणाचे outsourcing तत्परतेने 'tution classes' कडे केले जाते. या सगळ्यामुळे , ज्ञान मिळवणे व ते योग्य पद्धतीने वापरणे हा शिक्षणाचा मूळ हेतूच आजचे पालक विसरून चालले आहेत. 

आजकाल बहुतेक मुले संगणक आणि मोबाईल, गेम्स खेळणे, apps वापरणे या कामांसाठीच सफाईने हाताळतातत. आपले मूल कशासाठी संगणक व मोबाईल याचा वापर करते आहे याची पालकांना कल्पनाच नसते . त्यामुळे या उत्तम साधनांचा अत्यंत निरुपयोगी कामांसाठी वापर होत आहे हे लक्षात न घेता, आपापल्या मुलांच्या स्मार्टनेसचे अवाजावी कौतुक पालक करत रहातात. ख़रेतर संगणक आणि इंटरनेटमुळे आजच्या मुलांसमोर ज्ञानाचे मुक्त भांडार खुले आहे. पण पालकांनी ते कसे वापरायचे हे शिकावे लागते व मुलांनाही ते शिकवावे लागते.


पालकांनी शिक्षणाशी संबंधित या सर्व बाबींचा विचार डोळसपणे केला पाहिजे.

 

Tuesday, 1 October 2013

लढवय्ये पुणेकर

शिवकालापासून आजपर्यंत लढवय्या पुणेकरांच्या युद्धनीतीमध्ये जरासाच फरक पडला आहे. तेंव्हा जिवावर उदार होऊन इंच इंच लढवत किल्ले जिंकले जायचे. आताचे पुणेकर ट्राफिक मध्ये एक एक  इंच लढवत जिवावर उदार झालेले दिसतात! गनिमी कावा मात्र पुणेकर आजही तेव्हढाच वापरतात!

Saturday, 14 September 2013

जय महाराष्ट्र?

मागच्या आठवड्यात आम्ही आमच्या गाडीने पुणे ते कोल्हापूर, सांगली आणि परत असा प्रवास केला . संध्याकाळ झाली होती आणि  रस्त्यावरच्या पाट्या नीट  दिसत नव्हत्या.  कुठल्यातरी आडगावाच्या नाक्यावर उभ्या असलेल्या काही तरुणांना रस्ता विचारावा म्हणून थांबलो.
"पलूस फाटा किती लांब आहे?"
"पलूस यहां कहां? आप आगे आ गये.  पलूस तो पाक पिछे रह गया" एका तरुणाने तत्परतेने उत्तर दिले.
"मी मराठीत विचारलं आणि तुम्ही सुद्धा मराठी बोलणारे दिसता आहात. मग माझ्या प्रश्नाला हिंदीत का उत्तर देता आहात?"
ओशाळवाणं हसून तो तरुण म्हणाला, "कुटं बिगडलंय हिंदीत बोललुय तर?"
मी स्पष्ट केलं, "मी स्वतः जर प्रश्न राष्ट्रभाषेमध्ये विचारला असता तर तुमचं उत्तर योग्यच होतं. पण महाराष्ट्रात मराठी भाषेत विचारलेल्या प्रश्नाला एका मराठी भाषिक माणसाकडून मला उत्तर मराठीत अपेक्षित होतं" 
पुन्हा कसनुसं हसून तो म्हणाला, "मला वाटलं तुम्ही मुंबईहून आलाय. म्हणून मी हिंदीतून उत्तर दिलं."
मला त्याच्या उत्तराची फारच गंमत वाटली.  मी त्याला विचारलं,
"मुंबई महाराष्ट्रातच आहे, का महाराष्ट्राच्या बाहेर?"
माझ्या प्रश्नाला तो काय उत्तर देतो आहे, हे ऐकायला आम्ही तिथे थांबलोच नाही. जाता जाता नाक्यावर एका राजकीय पक्षाच्या भव्य फ्लेक्स वर लिहिलेले दिसले "जय महाराष्ट्र".
दुर्दैवानं आज "जय महाराष्ट्र" ही फक्त एक राजकीय घोषणा होऊन राहिली आहे. मनात आलं, आता कुठल्या तरी राजकीय पक्षाने असा फतवा काढावा की,"प्रत्येक मराठी भाषिक माणसाने निदान मराठीत विचारलेल्या प्रश्नाला तरी मायबोली मराठीत उत्तर दिलं पाहिजे'. कदाचित त्यानंतर आपण सगळेच अभिमानानं म्हणू शकू  "जय हिंद, जय महाराष्ट्र"!

व्हिजन २०-२०


संध्याकाळी घरी येत होते, तर वाटेत एक दोन मंडळांचे गणपती दिसले. गणपतीपुढे लाऊड स्पीकर वर हिंदी सिनेमातली 'बलम पिचकारी' किंवा तत्सम गाणी लागलेली होती. बऱ्याचशा शाळकरी मुला-मुलींचे तसेच तरूण-तरुणींचे पाय त्या गाण्यांवर थिरकत होते.

हल्ली जवळ जवळ बारा महिने कुठल्या ना कुठल्या सणाच्या निमित्ताने असं गाणं, बजावणं आणि पाय थिरकवणं चालू असतंच. तसेच वर्षभर, शहरातल्या तरूण मुला-मुलींचे हातही मला दिवसरात्र भरभर चालताना दिसतात, पण ते मुख्यत: हातातल्या मोबाईलवर!

हेच हातपाय जर, रोज थोड्या वेळासाठी का होईना, विधायक कामांसाठी चालायला लागले, तर लवकरच आपला  देश प्रगतीपथावर लागेल. नाहीतर आपण निवांतपणे २०-२०च्या matches बघत, 'vision २०२० 'ची वाट इसवी सन ४०४० पर्यंत बघत बसू!


Saturday, 13 July 2013

'मेंटल ब्लॉक'

हल्ली मला मनापासून सारखं काहीतरी लिहावसं वाटतंय आणि मी रोज चक्क लिहितेय.

झालं असं की, मला आधीच हात दुखण्याचा त्रास होत होता. तरी तसेच कॉम्प्युटर वरचा मराठी font वापरून, लिखाण चालू ठेवलं होतं. पण typing च्या त्रासातून मार्ग काढण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने विचार करून बघितला, मित्र-मैत्रिणींशी बोलले. मी सगळं हातानीच लिहून काढावं, कुणाकडून तरी लिहून घ्यावं, किंवा सरळ मराठी टायपिस्ट कडून type करून घ्यावं, असे आणि इतर बरेच उपाय  समोर आले. स्वतः डॉक्टर असल्यामुळे शंका अशीही आली की माझं हस्ताक्षर इतरांना तर सोडाच, पण माझं मला तरी परत वाचता येईल का? आणि लिहिताना  हात दुखणार होते ते वेगळंच. बरं, माझ्या मनात जसे जसे विचार येत जातील तसे ते लगेच type  करणारा टायपिस्ट कुठून आणायचा? मराठीसाठी speech to text असं काही software मिळतंय का, हे शोधलं पण तसं काही  मिळालं नाही. मग हळू-हळू type करत,सात आठ लेख लिहून काढले.

माझ्या दुखण्यावर मात करून, कसं जिद्दीने मी लिहितेय हे मी मोठ्या अभिमानानं  अमेरिकेत शिकणाऱ्या आमच्या मुलांना सांगितलं. लगेच त्या दोघांनीही, "एक ब्लॉग लिहायला सुरु कर" असं सुचवलं. पण मला तर ब्लॉग कसा उघडायचा ते माहिती नव्हतं. मग तो उघडणार कोण ? बरं, तो उघडला तर वापरायचा कसा हे कोणाकडून शिकणार? मग सोयीस्करपणे मनाशी म्हटलं, मला कुठलं काय ब्लॉगिंग जमणार? खरंतर,  blogging, netbanking या असल्या गोष्टींबद्दल केवळ अज्ञानामुळे बसलेली, एक सुप्त अढी माझ्या मनांत होतीच! मी मग मुलांना सांगून टाकलं, "तुम्ही  पुण्याला आलात की मला शिकवा." खरंतर हे सांगण्यात शिकण्याच्या उर्मीपेक्षा, ब्लॉग  प्रकरण पुढे ढकलण्याची माझी इच्छाच जास्त प्रबळ होती. मग, माझं लिखाण आधीच्याच पद्धतीनं हळू हळू चालू राहिलं. 

आमच्या मुलीचा मित्र, रघू महाजन गेल्या शनिवारी सहा जुलैला पुण्यात आमच्या घरीच उतरला  होता. तो स्वत:च्या तीन-चार ब्लॉग्सवर नेहमी काही न काही लिहीत असतो, या गोष्टीचं मला खूप कौतुक वाटत आलंय. पण त्याच्यासारख्या हुषार मुलाला काय सगळंच शक्य आहे, असंही वाटायचं. आमच्या दोन दिवसांच्या सहवासात, पुण्या मुंबईतील हॉटेलमधल्या चांगल्या-चुंगल्या खाण्याबद्दलचं माझं ज्ञान ऐकून, मी ह्या विषयावर एक ब्लॉग लिहावा, असं रघूनं सुचवलं. त्याची ती सूचना ऎकूनही मी न ऎकल्यासारखी केली. रविवारी, सात जुलैला रघूबरोबर मुक्त संवादाचा एक कार्यक्रम आम्ही स्वानंद फाउंडेशनतर्फे, गरवारे कॉलेजच्या ए.व्ही. हॉलमध्ये ठेवला होता. हॉल उघडण्याची वाट बघत, आम्ही उभे होतो. तेवढ्यात रघूनं  हॉलच्या भिंतीकडे कुठेतरी बोट दाखवून प्रश्न केला, "पुराचं पाणी तिथपर्यंत आलं होतं का?" मी त्या दिशेनं बघितलं. भिंतीवर एके ठिकाणी मला flood level अशी लाल रेघ दिसली. मी दुजोरा दिला. "किती साली आला होता पूर?" त्याचा पुढचा प्रश्न आला. मग मात्र, "माझ्या जन्माच्या आधी एक दोन वर्षे" असं vague उत्तर देऊन मी त्याच्या पुढच्या प्रश्नांपासून सुटका करून घेतली. खरंतर, इतके वेळा इथे येऊनही, flood level ची ही  लाल रेघ,  मला आधी कधीच दिसली नाही आणि पानशेत धरण नेमकं कधी फुटलं हेही मला माहीत नसावं या दोन्ही गोष्टींची मला कमालीची लाज वाटली होती. पण तीही तेवढ्यापुरतीच! वेळ तर मारून नेली होती, त्यामुळे मग तो विषय डोक्यातून निघून गेला. 

बारा जुलै २०१३. सकाळी उठल्या उठल्या वर्तमानपत्र चाळताना लक्षात आलं  की पानशेत धरण फुटण्याच्या घटनेला आज बावन्न वर्षे झाली. सगळ्या वर्तमानपत्रांमधून त्यावेळचा घटनाक्रम, बातम्या, थरारक अनुभव, छायाचित्रं, असं सर्व छापून आलेलं होतं. गेली कित्येक वर्षे, म्हणजे निदान चाळीस तरी, या दिवशी छापून येणाऱ्या अशाच प्रकारच्या बातम्या मी वाचत राहिले असेन. अगदी लहानपणापासून या घटनेबद्दल घरातल्या मोठ्या माणसांकडून, बरेच वेळा बरंच काही ऐकलेलं होतं. पण पुण्याच्या इतिहासातील इतक्या महत्त्वाच्या घटनेबद्दल माझ्या लक्षात फारसं काहीच राहिलेलं नव्हतं, हे  रघूशी बोलताना हे प्रकर्षानं जाणवलं होतं. त्यामुळे मग आज मात्र सगळ्या बातम्या अगदी मन लावून वाचल्या. जास्त पाणी साठल्यामुळे आधीच कच्चे असलेले बांध फुटून 'पानशेत झालं'. पण धरण फुटण्यापूर्वी सैन्याच्या जवानांनी, धरणाला पडलेल्या फटी ब्लॉक करण्यासाठी वाळूच्या bags रचून, धरणफुटी काही काळ तरी लांबवली होती, तसेच खडकवासला धरणाची काही दारे वेळीच उघडून पुणेकरांना पुरापासून वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता म्हणे. हे वाचून भारतीय सैन्याबद्दल नेहमीप्रमाणेच पुन्हा अभिमान वाटला. 
  
परवा मुलाचा मित्र सुजीत घोलप, आमच्या घरी रहायला आला होता. सहज म्हणून त्याला माझे लेख वाचून दाखवले. "काकू, छान लिहिता आहात अगदी. तुमचा ब्लॉग आहे का? ब्लॉगवर टाका ना. आणि ब्लॉग नसेल तर आजच उघडा आणि त्यावर लिहीत जा." असं म्हणाला. त्याच्यापुढे माझं अज्ञान उघडे पडू नये असं एकीकडे वाटत असलं तरी, सरळ मी सांगितलंच, "मला ब्लॉग उघडता आणि वापरता येत नाही." लगेच सुजीतने, मला माझा ब्लॉग उघडून दिला आणि त्यावर लिहायला शिकवले. ब्लॉगवर लिहितेय तर जाणवतंय की  ब्लॉगवर लिहिणं नुसतं type करण्यापेक्षा बरच सोप्पं आहे. जाम मस्त वाटतंय आता. मग जेंव्हा माझ्या मुलांनी सांगितलं तेंव्हा मी का बरं तयार नव्हते? एकमेव कारण म्हणजे माझा 'मेंटल ब्लॉक'! तो 'ब्लॉक' निघाला आणि हा 'ब्लॉग' उघडला, तेंव्हाच मला मजा यायला लागली. 

'मेंटल ब्लॉक' वरून, सहज मनांत विचार यायला लागले.  आपापल्या मनातले अज्ञानाचे 'ब्लॉक्स' लवकरात लवकर हटवून टाकण्यातच शहाणपणा असतो. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या या युगांत हे किती सुकर होऊन गेलंय ते. पण मनामध्ये, न्यूनगंडाचे, नैराश्याचे, नकारात्मक विचारांचे, तर कधी गैरसमजुतीचे 'ब्लॉक' देखील असतातच  की. मनाचे काही दरवाजे बंद ठेवण्यानं खूप काही साधतं हे खरं आहे. पण, बांध फुटू नये यासाठी, वेळच्यावेळी आपल्या मनाची काही दारं उघडून तिथले 'ब्लॉक' काढावेच लागतात. केंव्हा कुठले दरवाजे उघडायचे आणि कुठले बंदच ठेवायचे, हे ज्याचं त्यानं समजून घेतलेलं बरं. नाही का? प्रत्येक वेळी कोण आणि कसं समजावून सांगणार?

Thursday, 11 July 2013

महिती अधिकार कायद्याचा वापर

आज पहिल्यांदा महिती अधिकार कायद्याचा वापर केला . खूप बरं वाटलं. आता बघुयात काय होते आहे ते. 

ब्लॉगिंगची सुरवात .

आज सुजीतने मला ब्लॉग वापरायला शिकवला.