सोमवार, १३ जुलै, २०२०

पासष्ठावी कला

आपल्या पूर्वजांनी, चौषष्ठ कला आणि चौदा विद्यांबद्दल लिहून ठेवलेले आहे. सहज म्हणून ती यादी वाचली, तर त्यात काही कलांचा उल्लेख करायचे राहून गेले आहे असे वाटते. त्यापैकी एक कला म्हणजे घासाघीस करण्याची कला!




काही कला आपण केवळ निरीक्षणाने शिकतो. तशीच, घासाघीस करण्याची कला मला माझ्या आईचे निरीक्षण करता-करता अवगत झाली असावी. घरामध्ये कामाला नवी मोलकरीण ठेवणे असो, बाजारहाट करणे असो किंवा बोहारीणीशी सौदा करणे असो, अनेक ठिकाणी आई तिची ती कला मनसोक्तपणे वापरायची. नवीन मोलकरीण नेमताना, तिच्या  कामाचे तास, यायची वेळ, ती काय-काय कामे करणार याचे तपशील आणि तिचा पगार या सर्व मुद्द्यांवर भरपूर घासाघीस व्हायची. मोलकरीणही घासाघीस करण्यांत तरबेज असायची. शेवटी, त्या  मोलकरणीला पटवल्यानंतर आई मनोमन खूष असायची. पण सांगायची गंमत म्हणजे, त्या बाईने दोन चार महिने चांगले काम केले की तिच्या महिन्याच्या पगारापेक्षा दुप्पट पैसे आईने तिला अंगावर दिलेले असायचे. 

"आई, तिला कामावर ठेवताना तिच्याशी पगारासाठी किती वेळ घासाघीस केली होतीस. मग आता तिला अंगावर इतके पैसे का दिले आहेस ? असे मी आईला विचारायचे.

त्यावर आईचे ठरलेले उत्तर असायचे, "तिची बिचारीची फारच आबदा होतेय गं. नवरा दारुडा, काही कमवत तर नाहीच उलट हिच्याकडचे पैसेच काढून घेतो. तिची लहान-लहान मुले आहेत. त्यांना दोन वेळचे पोटाला तरी मिळायला नको का? म्हणून मी पैसे दिलेत. तिच्या पगारातून ती फेडेल हळू-हळू. "  

घासाघीस करून, चांगली मोलकरीण मिळवल्याचा आनंद आईला आधीच मिळालेला असायचा. आता, तिने दिलेल्या जास्तीच्या पैशांमुळे, त्या बाईच्या मुलांच्या पोटात अन्न जातेय, याचेही तिला अपार समाधान मिळत असायचे. मोलकरणीच्या अंगावर दिलेले पैसे तिने फेडावेत यासाठी आई तिच्यामागे कधी फारसा तगादाही लावायची नाही. 

आईबरोबर खरेदीला गेले की आई सगळ्या वस्तू छान भाव करून मगच घ्यायची. वस्तूची प्रत बघून त्यामानाने त्या-त्या वस्तूला किती किंमत द्यावी, उत्तम प्रतीची वस्तू योग्य भावात कशी विकत घ्यावी, हे मी आईकडे बघून-बघूनच शिकले. कधीकधी मात्र, आई अगदी छोट्या खरेदीतही फार वेळ घासाघीस करायची. तिच्या मनासारखा सौदा झाला नाही की ती वस्तू खरेदी करण्याचा बेतच रद्द करायची. आम्हाला हव्या असलेल्या वस्तूसाठी असे होताना दिसले की, आपल्याला ती वस्तू मिळणार नाही की काय, असे वाटून आमचा धीर सुटू लागायचा. आमच्या लहानपणी एकदा, दारावर डहाळ्याच्या पेंड्या विकायला आलेल्या बाईबरोबर, आई बराच वेळ घासाघीस करत होती. ती बाई चार आण्याला चार पेंड्या असा भाव सांगत होती तर आई चार आण्याला सहा पेंड्या दे म्हणत होती. थोड्याच वेळात, आईने त्या बाईकडून चार आण्याला पाच पेंड्या मिळवल्या असत्या. पण जास्त वेळ घासाघीस चाललेली बघून, आता आपल्याला डहाळे मिळणारच नाहीत, असे वाटल्यामुळे माझा मोठा भाऊ, जयंत जाम वैतागून त्या बाईला म्हणाला, "तुला चार आण्याला चार पेंड्या द्यायच्या असतील तर दे नाहीतर आम्ही दुसरीकडून घेऊ" 

आईने डोक्याला हात लावून घेतला. नाईलाजाने त्या बाईकडून तिने चार आण्याला चार पेंड्या विकत घेतल्या. नंतर मात्र तिने जयंतची चांगलीच कानउघडणी केली. घासाघीस करताना आपण कधीही घायकुतीला येऊ नये, आणि आपल्यापैकी कोणी एकजण घासघीस करत असेल तर दुसऱ्या कोणीही पडते घेऊ नये,  याचा धडा तिने आम्हाला दिला. 

एखाद्या दिवशी दुपारी घरी बोहारीण यायची. आईची आणि त्या बोहारणीची, घासाघीस करण्याची जणू जुगलबंदीच चालायची. ती जुगलबंदी ऐकताना आणि बघताना आम्हा मुलांचे दोन-अडीच तास आनंदात निघून जायचे. या दोन्ही कलाकारांनी आपापली कला यावेळी अगदी पणाला लावलेली असायची. अर्थात तो सामना बरोबरीतच सुटायचा. या असल्या अनेक प्रसंगांची साक्षीदार राहिल्यामुळे हळूहळू मला ही कला अवगत झाली असावी. पण माझे लग्न होईपर्यंत, ती कला वापरायची संधी मला फारशी कधी मिळाली नव्हती. 

आमच्या लग्नानंतर लगेच, आम्ही मध्यप्रदेशमध्ये महू येथे राहत होतो. कॉलेजकुमार असलेला माझा लहान भाऊ गिरीश, उन्हाळ्याच्या सुटीत, आमच्या घरी काही दिवसांसाठी राहायला आला होता. पीटी आणि गेम्स परेडमध्ये घालण्यासाठी, आनंदला नवीन पांढऱ्या पँट्सची त्यावेळी गरज होती. पॅंटपीस आणि इतरही काही खरेदी करायला आम्ही तिघेही महूपासून जवळच असलेल्या इंदौर शहरातील तुकोजी मार्केटमध्ये गेलो. तिथे भरपूर घासाघीस करावी लागते, हे माझ्या काही मैत्रिणींकडून मला आधीच कळले होते. आईकडून अवगत झालेली कला वापरण्याची संधी मला मिळणार, या विचाराने मी हुरळून गेले. सगळ्या वस्तूंचा भाव मी करेन, तुम्ही दोघांनी मधे काहीही बोलायचे नाही अशी तंबी मी, आनंदला आणि गिरीशला, घरून निघतानाच देऊन ठेवली होती. 

तुकोजी मार्केटमधल्या एका फिरत्या विक्रेत्याने, एका पॅंटपीसची किंमत ११० रुपये सांगितली. मी कापड पाहिले, त्याची रास्त किंमत काय द्यायला हवी याचा मनोमन अंदाज बांधला आणि, त्या पँटपीसचे मी फक्त पन्नास रुपये देईन असे त्याला सांगितले. मी अर्ध्याहून कमी किंमत सांगितल्यावर, मी काहीतरीच बोलले आहे असे गिरीश आणि आनंदला वाटले. त्यातून त्या माणसाने, "मेडमजी, आपको पचास रुपयेही देना है तो साहब के लिये पॅंटका कपडा क्यूँ खरीद रहीं हैं? आप पैजामा का कपडा देखिये ना। आपके बजेटमें केवल पैजामेका ही कपडा मिलेगा" असे बोलून माझी लाज काढली. ते ऐकल्यावर तर आनंदला आणि गिरीशला अगदी मेल्याहून मेल्यासारखे झाले. त्या दोघांनी, मला तिकडून जवळजवळ ओढतच पुढे नेले. मी किती मूर्खपणा केलाय, माझ्यामुळे त्यांना हे असले बोलणे ऐकावे लागले, असे बरेच काही त्यांनी मला सुनवले.  

"११० रुपयाचा पॅंटपीस फार-फार तर तो १०० रुपयात देईल. पण तू पन्नासला मागितलास. तो कसा देईल? त्याने आपली किती लाज काढली ऐकलंस ना? आता यापुढे खरेदी करताना तू बोलायचे नाहीस. आम्ही व्यवस्थित भाव ठरवू" 

पण माझ्या कलेवरचा माझा विश्वास दृढ असल्याने, मी शांतपणे त्या दोघांचे बोलणे ऐकत होते. गंमत म्हणजे, थोड्या वेळात तो विक्रेता आमच्या मागे-मागे येऊन ९० रुपये तरी द्या, ८० रुपये तरी द्या असे म्हणू लागला. आतातरी तो पॅंटपीस मी विकत घेऊन टाकावा असे आनंद आणि गिरीशचे मत होते. पण मी मात्र पन्नास रुपये देणार यावर ठाम होते. त्यामुळे, पुन्हा त्या दोघांनी  मला टोमणे मारायला सुरुवात केली. त्यांच्या बोलण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत, मी त्या विक्रेत्याशी बोलणे चालू ठेवले. शेवटी, त्याने तो पॅंटपीस मला ५५ रुपयाला दिला. माझ्या कलेचा विजय झाल्यामुळे मी खुश झाले होते. आनंदची आणि माझ्या हुशार भावाची चांगलीच जिरल्यामुळे त्या दोघांचीही तोंडे बंद झाली होती. त्यावेळेपासूनच, गिरीश माझा पाठचा भाऊ असूनही मला पाठिंबा न देता, माझी चेष्टा करण्यासाठी आनंदच्या पक्षात जाऊन मिळालेला आहे, असे मला वाटते .  

१९९२-९६ या काळात आम्ही अलाहाबादला होतो. एके दिवशी, आम्ही प्रथमच गंगा-यमुना आणि सरस्वतीचा संगम बघायला गेलो. संगम बघण्यासाठी, नावेत बसून नदीच्या पात्रात बरेच आत जावे लागते. अलाहाबादच्या घाटावर नावाड्यांपैकीच काही पोरे, संगम बघायला आलेल्या आमच्यासारख्या पर्यटकांना, "आता संगमावर जाणारी ही शेवटचीच नाव आहे, ती काही मिनिटातच सुटणार आहे, तीही आता जवळजवळ भरत आली आहे, तुम्हाला जागा हवी असेल तर माणशी १५० रुपये द्या आणि पटापट चला, नाहीतर इथपर्यंत येऊन संगम बघायला मिळणार नाही", असे बोलून खूपच घाई करत होते. ते फार जास्त पैसे मागत आहेत याचा अंदाज प्रत्येकालाच आलेला होता. काही पर्यटक थोडीफार घासाघीस करत, माणशी १०० रुपये देऊन नावेत बसायला तयार होत होते. त्या सर्व लोंकांपेक्षा आपल्याला कमी पैसे पडले पाहिजेत असे मनाशी ठरवून मी त्या नावाड्यांशी बराच वेळ घासाघीस केली. पण ते काही केल्या तयार होत नव्हते. आमच्यासमोर पंचवीस-एक लोक माणशी १०० रुपये देऊन नावेकडे गेलेही. आता नाव सुटेल आणि आपल्याला आज संगम बघायला मिळणार नाही, असेही आम्हाला वाटू लागले. 

मी मोठ्या संयमाने घासाघीस करत राहिले. शेवटी, मी अजिबात बधणार नाही हे लक्षात आल्यावर, ते नावाडी माणशी ५० रुपयांवर तयार झाले. घासाघीस करण्याच्या कलेतल्या माझ्या नैपुण्यामुळेच आपल्याला रास्त भाव मिळाला या आनंदात आम्ही नावेमधे जाऊन बसलो. आता काही मिनिटातच नाव संगमाकडे जायला निघणार, असा आमचा समज करून दिला गेलेला होता. पण प्रत्यक्षात, पुढचा अर्धा-पाऊण तास, ती नाव तिथून हलली नाही. नाव फक्त अर्धीच भरलेली होती. हळूहळू करत, आमच्यानंतरही अनेक पर्यटक येतच राहिले. बऱ्याच वेळानंतर नाव भरली आणि आम्ही संगम बघायला नदीच्या पात्रात निघालो. आपल्यानंतर आलेल्यांकडून नावाड्यांनी किती पैसे घेतले असावेत, हे जाणून घेण्याची मला तीव्र इच्छा झाली. आमच्यानंतर शेवटी-शेवटी आलेल्या लोकांनी माणशी १० रुपये आणि शेवटच्या दोघा-तिघांनी तर केवळ ५ रुपये देऊ केल्याचे मला कळले. त्यामुळे, घासाघीस करण्याच्या कलेची मला अजून बरीच साधना करायला हवी, हे मला कळून चुकले. तसेच कोणत्याही कलाकाराला आपल्या कलेचा गर्व वाटू लागला तर मात्र गर्वहरण होतेच, हे मला कळले. 

मला अवगत झालेली ही कला, आजपर्यंत गेली अनेक वर्षे, ठिकठिकाणी वापरून त्यामधून मी कमालीचा आनंद मिळवलेला आहे. जिथे घासाघीस करायला मिळणारच नाही अशा ठिकाणी खरेदी करायला मला फारसे आवडत नाही. त्यामुळे, सेलमध्ये, मॉलमध्ये, 'एकच फिक्स्ड रेट' असलेल्या दुकानांमधून, खरेदी करायला मी जातच नाही. परदेशातही खरेदी करण्यात मला फारशी मजा येत नाही. नाही म्हणायला, उझबेकिस्तानमध्ये वस्तू खरेदी करताना घासाघीस करण्याचा आनंद मला मिळाला. अमेरिकेत 'क्रेग्स लिस्ट' वरून काही गोष्टी खरेदी करताना, थोडीफार 'ऑनलाईन' घासाघीस करता आली, पण त्यात फारशी मजा आली नाही.  

कुठेही घासाघीस करायची वेळ आली की आजही आनंद माझ्या कलेला, 'मोठ्या मनाने',  मुक्त वाव देतो. यात त्याचे अनेक हेतू साध्य होतात. एकतर त्याला स्वतःला कधी घासाघीस करावी लागत नाही. दुसरे म्हणजे, त्याने घासाघीस करून विकत आणलेली वस्तू, "यापेक्षा कशी स्वस्त मिळायला पाहिजे होती", किंवा "याच भावांत जास्त चांगल्या दर्जाची मिळायला हवी होती", अशी माझी बोलणी त्याला ऐकावी लागत नाहीत. घासाघीस करून मी चांगला भाव मिळवते याबाबत तो माझे नेहमीच तोंड भरून कौतुक करतो. पण, एखाद्यावेळी माझी फजिती झालीच, तर गिरीशसोबत माझी चेष्टा करायला त्याला एक चांगला विषय मिळतो आणि ती संधी ते दोघेही सोडत नाहीत !

शुक्रवार, ३ जुलै, २०२०

माझं 'काळं' पोर!

आमच्या घरी, आनंदला आणि आमच्या मुलांना कुत्री आवडतात. पण माझं 'श्वानप्रेम'(?) मात्र सर्वज्ञात आहे. 

माझ्या माहेरच्या घरी कधी कुत्रे पाळलेले नव्हते. माझ्या मोठ्या काकांकडे, मामाकडे आणि इतर नातेवाईकांकडे कुत्री असायची, पण त्यांच्याबद्दल मला कधीच आपुलकी निर्माण होऊ शकली नाही. आनंद सैन्यदलातील अधिकारी असल्यामुळे, आमच्या लग्नानंतर बरीच वर्षे मी कॅंटोन्मेंट भागांमध्ये राहिले. तिथे तर काय, घरोघरी मोठमोठाली कुत्री पाळायची पद्धतच होती. त्या कुत्र्यांचे अतोनात कोड-कौतुक व्हायचे. थंडीच्या दिवसात त्यांच्या 'आया' त्यांच्यासाठी लोकरीचे छानछान स्वेटर्स विणायच्या, टोपडी आणि बूट घालायच्या. पण अशा सजवलेल्या कुठल्याही कुत्र्याबद्दल  माझ्या मनात कधीच प्रेम उत्पन्न होऊ शकले नाही. मला कुत्री आवडत नाहीत आणि कधीही आवडू शकणार नाहीत याची खात्री असल्याने "आपण घरी कुत्रं पाळूया" असा  आग्रह आनंदने आणि मुलांनी कधीही धरला नाही. 

आमची मुले लहान होती तेंव्हाची, म्हणजे साधारण १९९७-९८ सालची  गोष्ट आहे. रोज दुपारी करून ठेवलेल्या, पोळीच्या डब्यातल्या पोळ्या कमी होत आहेत असा शोध मला रात्रीच्या जेवणाच्या वेळी लागायचा. मग मी पोळ्या मोजून ठेवायला लागले आणि एक-दोन पोळ्या निश्चित गायब होत आहेत याची मला खात्री पटली. दुपारी घरात बाहेरून कोणीही येत नसताना हे असे कसे होते आहे, या विचाराने मी बेचैन होते. एके दिवशी मला अचानक समजले की आमच्या अनिरुद्धला एका भटक्या कुत्रीच्या पिलाचा लळा लागला होता. दुपारच्या जेवणानंतर मी वामकुक्षी घ्यायला गेले, की मला कळू न देता, अनिरुद्ध हळूच पोळ्यांच्या डब्यातील एखादी-दुसरी पोळी पळवायचा आणि गुपचूप त्या पिल्लाला खायला द्यायचा. अशा रीतीने, कुत्रे पाळण्याची त्याची हौस अनिरुद्ध बाहेरच्या-बाहेर भागवून घेत होता. मग, 'कुत्रं-प्रेमामुळे' नव्हे तर केवळ पुत्रप्रेमामुळे मी त्याच्या या 'उद्योगाकडे' डोळेझाक करू लागले. ते पिल्लू त्यानेही कधी घरात आणले नाही. थोडक्यात काय, एकवेळ कुत्र्याचे शेपूट सरळ होऊ शकेल, पण या जन्मांत मला कधीही कुठल्याही कुत्र्याबद्दल प्रेम वाटणार नाही याबद्दल फक्त माझीच नव्हे, तर आनंदची आणि मुलांचीही खात्री पटलेली होती. परंतु, आयुष्यात काही गोष्टी आपल्या ध्यानीमनी नसताना बदलतात, हेच खरं.

माझ्या मुंबईच्या भाऊ-वहिनीच्या, म्हणजे गिरीश-प्राचीच्या घरांत गेली अनेक वर्षे पाळीव कुत्री आहेत. माझी भाचरंडे लहान असताना त्यांनी एक भुऱ्या रंगाचे लॅब्राडोर जातीचे पिल्लू आणले होते. त्याचे 'ब्रूनो' असे नामकरणही केले होते. पण अत्यंत अल्पशा आजाराने ब्रूनोचा अचानक मृत्यू झाला. मग त्यांनी पुन्हा एक 'खानदानी' लॅब्राडोर पिल्लू आणले. त्या काळ्या कुळकुळीत रंगाच्या पिलाचे नाव 'डॅझ' ठेवले. पण त्याच सुमारास, आधीच्या पिलाच्या विरहाने दुःखी झालेल्या माझ्या भाचीने रस्त्यावरून उचलून एक गावठी कुत्रीचे पिलू घरात आणले व तिचे नाव 'रोझ' ठेवले. अशा रीतीने त्यांच्या घरी डॅझ हा 'उच्चकुलीन' कुत्रा आणि 'खानदानाचा पत्ता नसलेली' रोझ, हे दोघेही अगदी गुण्यागोविंदाने नांदू लागले. श्वानप्रेमी लोकांच्या घरात जसे कुत्र्यांचे कौतुक होते, तसेच डॅझ-रोझचे कौतुक त्यांच्या घरात होत असे. डॅझ-रोझ घरात राहायला आल्यानंतर आम्ही असंख्य वेळा त्या घरी गेलो होतो. आनंदला आणि मुलांना डॅझ-रोझचा खूपच लळा होता. त्यांच्याशी खेळणे, त्यांचे लाड करणे, कधी त्यांना फिरायला नेणे, असे करून, श्वानप्रेमाची त्यांची भूक गिरीश-प्राचीच्या घरी गेल्यावर ते भागवून घ्यायचे. पण मी मात्र त्या कौतुक सोहळ्यात कधीच सामील होऊ शकले नव्हते. डॅझ-रोझला प्राची रोज सकाळी दूध आणि अंडी द्यायची. आम्ही त्यांच्याकडे राहायला गेलेलो असलो तरी माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे, इतरांची साखरझोप सुरु असताना मी भल्या पहाटे उठायचे.  क्वचित, प्राचीची झोपमोड होण्यापूर्वी, डॅझ-रोझ यांना दूध आणि अंडे द्यायचे काम केवळ कर्तव्यभावनेने मी केलेही होते. पण ते देताना त्यात प्रेमाचा ओलावा अजिबात नव्हता.

पाच वर्षांपूर्वी गिरीशला, मोठा अपघात झाला व त्याच्या अनेक हाडांना क्रॅक फ्रॅक्चर्स झाली. आधी दोन आठवडे रुग्णालयात व पुढचे चार आठवडे घरी, असे सहा आठवडे तो अंथरुणाला खिळून होता. त्या काळांत प्राची त्याची शुश्रूषा करत होतीच. दीड  महिन्याच्या विश्रांतीनंतर गिरीश जवळ-जवळ बरा झाला. पण अचानकच त्याच्या पोटरीत रक्ताच्या गुठळ्या होऊन त्या फुफुसांत गेल्यामुळे तो अत्यवस्थ झाला. त्याला अतिदक्षता विभागात हलवावे लागले. आधीच प्राचीची खूप ओढाताण होत होती. त्यातून पुन्हा गिरीश अत्यवस्थ झाल्याने ती खूपच धास्तावली. तिला मदत व्हावी, आणि गिरीशच्या वैद्यकीय उपचारांमध्ये काही हयगय होऊ नये, या उद्देशाने, सलग दोन आठवडे, मी मुंबईला त्यांच्या घरी राहिले. माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे मी पहाटे उठून, तयार होऊन गिरीशजवळ हॉस्पिटलमध्ये जायचे, ते रात्रीच परत यायचे.
पहिल्या एक दोन दिवसातच  प्राची मला म्हणाली,
"स्वातीताई, तुम्ही रोज पहाटे लवकर उठताच, तर तुम्ही आहात तोवर, तुम्ही डॅझ-रोझला दूध-अंडे द्याल का? मलाही पहाटे-पहाटे त्यासाठी उठावे लागणार नाही"
मी म्हणाले, "काहीच हरकत नाही. तू काळजी करू नकोस. मी निश्चित ते काम करेन"

अशा रीतीने, सलग दोन आठवडे, डॅझ-रोझला सकाळी दूध आणि अंडे देण्याचे कर्तव्य मी पार पाडले. एक दोन दिवसांतच, "आता ही बाई आपल्याला रोज सकाळी खायला घालणार आहे", याची कल्पना डॅझ-रोझला आली. "कोणी का देईना, अंडी खायला मिळाल्याशी कारण!" या विचाराने, ती कल्पना डॅझने स्वीकारली असावी. पण, रोझला मात्र ते फारसे आवडले नव्हते. पहाटे उठून, मी माझा चहा करायला ठेवला की, डॅझ शेपूट हलवत माझ्या भोवती घुटमळू लागायचा. मग मी हळूहळू त्याच्याशी आणि रोझशी बोलायलाही लागले. तशा त्या काही प्रेमाच्या गप्पा नव्हत्याच. कडक आवाजात, "मी तुम्हाला स्वैयंपाकघरात दूध आणि अंडी देणार नाहीये, तुम्ही बाल्कनीत जाऊन बसा बरं, खायला-प्यायला तिथेच मिळेल, इथे नाही... " असंच काही-बाही मी एखाद्या शिस्तप्रिय आईसारखी सांगायचे. "रोज तर आम्ही स्वयंपाकघरात बसूनच खातो-पितो, आता हे काय नवेच?" असा नाराजीचा भाव रोझच्या चेहऱ्यावर असायचा. पण डॅझ मात्र एक-दोन दिवसांतच आज्ञाधारकपणे बाल्कनीत जाऊन थांबू लागला. दूध दिल्यावर पटापट ते संपवून, "आता अंडी कधी देणार?" अशा प्रश्नार्थक मुद्रेने बघत माझ्याकडे यायला निघायचा. मग मी त्याला दटावयाचे. "डॅझ, बाल्कनीतच थांब. अंडी उकडून झाली आहेत, पण अजून गरम आहेत. माझा चहा झाला की सोलून देते". मग तोही, एखाद्या गुणी बाळासारखा, खाली मान घालून बाल्कनीत जाऊन बसायचा. त्या दोन आठवड्यात मला हळूहळू डॅझचा चांगलाच लळा लागला. मी त्याच्या छोट्या-छोट्या लकबी टिपायला लागले. कुत्र्यांशी गप्पा मारता येतात, हे आनंदचे मत पूर्वी मी नेहमीच खोडून काढायचे. पण आता माझे बोलणे डॅझला समजायला लागले होते आणि डॅझची देहबोली मला कळायला लागली होती. 

गिरीशची तब्येत सुधारल्यावर मी पुण्याला परतले. पण पुढेही कधी मुंबईला गेले की डॅझ माझ्या शिस्तीप्रमाणे वागून माझे मन जिंकून घ्यायचा. मी पहाटे उठले की तो लगेच बाल्कनीत जाऊन बसायचा आणि मी दूध-अंडी खायला कधी देतेय याची वाट बघायचा. दरवाज्यावरची घंटी वाजली की रोझ जोरजोरात भुंकत पाव्हण्यांच्या स्वागताला उभी असायची. दारावर अनोळखी माणूस दिसले की जोरजोरात भुंकून त्याला घाबरवून टाकायची पण डॅझ मात्र शांत असायचा. ओळखीचं माणूस बाहेरून आलं की मात्र ही दोघेही अंगावर उड्या मारून, छातीवर पाय ठेऊन लाड करून घ्यायची. कुत्री अंगाजवळ आलेली मला अजिबात आवडत नाहीत हे डॅझला माहिती झाले होते. तो फक्त भुंकून, किंवा शेपटी हलवून माझे स्वागत करायचा. खाण्याच्या बाबतीत डॅझ माझ्यासारखाच, म्हणजे 'हाय कॅल' पदार्थांचा अतिशय शौकीन होता. त्याला, लाडू, श्रीखंड, मिठाई, आईस्क्रीम अशा चांगल्या पौष्टिक गोष्टी आवडायच्या. मग मीही जेवताना माझ्या घासातला घास काढून त्याला द्यायला लागले. त्यामुळे डॅझचे आणि माझे नाते एखाद्या आई-मुलाच्या नात्याप्रमाणे फुलत गेले आणि शेवटपर्यंत टिकून राहिले. जवळजवळ चार वर्षांपूर्वी डॅझ सारखा आजारी पडू लागला आणि शेवटी २०१६ च्या सप्टेंबर महिन्यात गेलाच. मला त्यावेळी खूप वाईट वाटले.

डॅझ गेल्यानंतर मी हा लेख लिहिला होता. पण काही कारणाने तो पूर्ण केला गेला नाही. आज सकाळच्या माझ्या फेरफटक्यादरम्यान अगदी डॅझसारखाच दिसणारा कुत्रा मला दिसला. त्यामुळे, त्या माझ्या लाडक्या काळ्या पोराची मला खूप प्रकर्षाने आठवण झाली आणि घरी येऊन लगेच हा लेख पूर्ण केला.   

गुरुवार, २ जुलै, २०२०

पाऊले चालती ...

आज पहाटे अगदी लवकर जाग आली. चटकन तयार होऊन लांब सायकल स्वारीला जावे असा विचार केला होता. पण सायकल दुरुस्तीसाठी टाकली आहे हे लक्षात आले. म्हणून मग खूप लांब चालायला जायचे ठरवले. अचानक मला, कॅनबेरामध्ये विकत घेतलेल्या, माझ्या नव्याकोऱ्या एसिक्स बुटांची आठवण झाली. नव्याकोऱ्या नव्हे, न वापरलेल्या, असे म्हणूया. कारण ते बूट विकत घेऊन दहा महिने उलटून गेले. पण आज प्रथमच मी ते वापरले आणि चांगला दहा-बारा किलोमीटरचा फेरफटका मारून आले. मला थोडे दमायला झाले. पण  त्यामानाने, माझ्या पायांना व्यवस्थित बसणाऱ्या बुटांमुळे माझ्या पायांना खूप थकवा जाणवला नाही.  
 
मागच्या वर्षी, जुलैच्या शेवटाला मी ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा येथे, माझ्या मुलीच्या बाळंतपणासाठी गेले होते. माझी नात दोन आठवड्याची झाल्यानंतर तिला घेऊन, माझी मुलगी, जावई आणि मी असे कॅनबेरात हिंडायला बाहेर पडायला लागलो होतो. मला तिथे काही खास खरेदी करायची नव्हती. पण, निघताना माझे वापरातले बूट पुण्यातच राहिल्यामुळे मी प्राचीचे, म्हणजे माझ्या मुंबईच्या वहिनीचे, बूट घालून ऑस्ट्रेलियाला गेले होते. ते बूट माझ्या पायाला जरा घट्टच होत होते. पुण्यात राहिलेले माझे बूटही तसे जुनेच झाले होते. त्यामुळे, कॅनबेरात मी चांगले बूट खरेदी करावेत, असा 'बूट' निघाला आणि माझी मुलगी व  जावई मला तिथल्या मॉलमध्ये घेऊन गेले.

एरवी, मी आणि माझी मुलगीही, मॉलमध्ये जायला अजिबात उत्सुक नसतो. पूर्वी तिच्याकडे शिकागोला गेले असताना, केवळ अमेरिकन मॉल्समधल्या वातावरणाची झलक दाखवायला म्हणून, मुलीने मला आवर्जून तिथल्या  मॉलमध्ये नेले होते. अमेरिकेतला मॉल बघितल्यावर, भारतातल्या मॉलमधले चंगळवादी वातावरण कुठून आले आहे, ते लगेच कळते. कॅनबेरातल्या मॉलमध्ये साधारण आपल्या इथल्या मॉल सारखीच मोठी-मोठी दुकाने होती. पण अमेरिकेतल्या किंवा भारतातल्या मॉल्समध्ये अनुभवायला मिळणारे, कान किटवणारे संगीत, धांगडधिंगा करणारे तरुण-तरुणींचे घोळके, श्रीमंतीचे ओंगळवाणे प्रदर्शन किंवा बेभानपणे खरेदी करत सुटलेल्या बायका, असे फारसे काहीच दिसले नाही. 

आम्ही एसिक्स कंपनीच्या दुकानात गेलो. तिथे नेमका सेल चालू होता. सेलवर असलेल्या बुटांकडे माझे पाय वळणार इतक्यात मुलीने आणि जावयाने नजरेनेच मला दाबले. तिकडची पद्धत जराशी वेगळी असते. दुकानात गेल्यानंतर, तुम्हाला काय हवे आहे असे कोणीतरी विचारते. मग तिथल्या विक्रेत्या पोऱ्याला आपल्याला नेमके काय हवे आहे ते आधी सांगायचे. मग तो आपल्याला त्यांच्या दुकानांत कुठे आणि काय विकत घ्यायचे याबाबत मार्गदर्शन करतो. तिथल्या विक्रेत्याने मला दोन-चार प्रश्न विचारून, बूट नेमके कुठे आणि कशासाठी वापरायचे आहेत याचा अंदाज घेतला. आपल्याकडे बूट-चपलांच्या दुकानात जसे पायाचे माप घेतात तसे माझ्या पायाचे अंदाजे माप त्याने घेतले. मग कुठल्यातरी मशीनद्वारे माझ्या दोन्ही पायांचे सर्व बाजूने (३D )नेमके माप घेतले. त्यानंतर मला, दहा-बारा पावले एका रेषेत चालत जाऊन परत यायला सांगितले. माझ्या चालण्याचे त्याच्या हातात असलेल्या टॅबवर त्याने व्हिडीओ शूटिंग केले. या सगळ्या गोष्टींचे कंप्यूटर अनॅलिसिस झाल्यावरचे सर्व निष्कर्ष, त्याने आम्हाला समजावून सांगितले. माझे एक पाऊल दुसऱ्या पावलापेक्षा थोडे मोठे असल्याने, मोठया पावलाच्या मापाचे बूटच खरेदी करावेत; मला मुख्यतः सपाट रस्त्यावरून चालण्यासाठी बूट हवे असल्याने पळणे, खडकाळ रस्तावरुन चालणे किंवा टेकडीवर चढणे, यासाठी वापरायचे बूट घेऊ नयेत; तसेच माझा चवड्यांचा भाग थोडा अधिक रुंद असल्याने, पुढे रुंद असलेले बूट विकत घ्यावेत; असा सल्ला त्याने दिला. शेवटी, बूट रचून ठेवलेल्या अनेक रांगांपैकी एका विशिष्ट रांगेकडे बोट दाखवून, या रांगेतल्या बुटांपैकी कुठलेही एक बूट तुमच्यासाठी योग्य होतील असे सांगून तो निघून गेला. 

त्याने निर्देशित केलेल्या बुटांच्या रांगेकडे आम्ही वळलो. त्या रांगेतले कुठलेच बूट सेलवर नव्हते. त्यामुळे सेलमधले, पन्नास-साठ ऑस्ट्रेलियन डॉलर्स किंमतीचे, चांगले बूट मिळण्याची आशा मावळली. त्याने दाखवलेल्या त्या रांगेतले एक-दोन बूट घालून मी चालून बघितले. अर्थातच ते माझ्या पायांना अगदी सुखावह वाटत होते. दीड-दोनशे डॉलर्स किंमत बघून मी खरेदीतून पाय मागे घेणार, हे माझ्या मुलीच्या लक्षात आले. "अगं, हे बूट पायाला अगदी आरामदायी असतात, वर्षानुवर्षे टिकतात, एक बुटाची जोडी तू विकत घेच" असा आग्रह तिने व जावयाने धरला. मग, मला आवडलेले निळ्या रंगातले बूट मी खरेदी केले. भारतात परतल्यानंतर, माझ्या आईच्या आजारपणात मी अतिशय व्यस्त होते. गेल्या ऑगस्टमध्ये खरेदी केलेले ते बूट, मी अजून वापरलेच नव्हते. आई गेल्यानंतर माझे सायकलस्वारीचे रूटीन सुरु झाले, पण माझे जुने बूटच मी वापरत होते. आज प्रथमच, खूप लांबवर चालण्यासाठी एसिक्स कंपनीचे नवीन बूट वापरले. पहाटेच्या शांत वातावरणांत चालता-चालता माझ्या मनातल्या विचारांनाही  चालना मिळाली. 
             
कालच आषाढी एकादशी झाली. या वर्षी वारी, दिंड्या, रिंगण या सगळ्या गोष्टीना करोनामुळे बंदी होती. सहजच, माझ्या मनासमोर पंढरीच्या वारकऱ्यांचे चित्र उभे राहिले. वर्षानुवर्षे, गावोगावचे अनेक वारकरी विठूमाऊलीच्या ओढीने पंढरीला पायी चालत जातात. माझी आजीही वयाच्या पंच्च्याहत्तरीपर्यंत सोलापूरहून पंढरपूरला चालत  जायची. पण ती कधी बूट वापरायची नाही, चप्पलच घालायची. ती वारीला निघायची त्यावेळी माझे आई-वडील तिला चांगल्या चपला घेऊन द्यायचे. वारीबरोबर पाच-दहा किलोमीटर चालून, सोशल मीडियावर स्वतःचे पन्नास फोटो टाकून, आपल्या भक्तीचे प्रदर्शन मांडणारे, मॉडर्न 'वारकरी'ही मला आठवले. ते मात्र  रिबॉक, आदिदास, नायके  वगैरे कंपन्यांचे बूट घालून चालत असतील. पण सामान्य वारकऱ्यांचे काय? तुटक्या, झिजलेल्या बूट-चपला घालून हे वारकरी रोजचे वीस-वीस किलोमीटर अंतर चालतात. कित्येकांना मी अनवाणी पायानेही जाताना पाहिलेले आहे. भक्तिमार्गावर चालणाऱ्या या खऱ्याखुऱ्या वारकऱ्यांच्या पायांना, तो पंढरीनाथ शीण येऊच देत नसावा. महागडे आणि आरामदायी बूट घालून, व्यायामासाठी मी करत असलेल्या पायपिटीच्या दरम्यान मला, पांडुरंगाच्या भेटीसाठी मैलोन-मैल अनवाणी चालणाऱ्या गरीब वारकऱ्यांची आठवण झाली आणि मनोमनच त्या अनामिक वारकऱ्यांचे मी पाय धरले.