रोज सकाळी माझ्या फेरफटक्याच्या मार्गावर बऱ्याच ठिकाणी मला शंकासुरांची झुडुपे दिसतात. लाल व पिवळ्या रंगाच्या या फुलांना काही विशेष गंध नसतो. या फुलांचे नाव 'शंकासुर' असे का पडले असावे? असा मात्र नेहमी मला प्रश्न पडतो .
'शंकासुर' या नावामुळे मला आमच्या अनिरुद्धचे बालपण आठवते. त्याला बोलायला येऊ लागल्यापासूनच अनेक प्रश्न आणि शंका विचारून, तो आम्हाला इतका भंडावून सोडायचा की एखादा 'शंकासुरच' आपल्या मागे लागला आहे असे वाटायचे. त्याच्या अनेक चित्र-विचित्र प्रश्नांना उत्तरे देणे, हे आम्हा दोघांना अवघड जायचे. तरीही मोठ्या संयमाने आम्ही समर्पक उत्तरे देत रहायचो. पुढे, तो जरा मोठा झाल्यावर त्याला आम्ही वाचनाची गोडी लावली. त्यामुळे त्याच्या बऱ्याचशा शंकाचे समाधान पुस्तकांमधून आणि इंटरनेटवरून होऊ लागले. आज तो शास्त्र शाखेचा एक अभ्यासू विद्यार्थी आहे. वेगवेगळ्या शास्त्र शाखांमधील संशोधनात तो रमलेला आहे आणि हातून काही मूलभूत संशोधन घडावे अशा प्रयत्नात आहे .
माझ्या दवाखान्यात, साधारण दोन तीन वर्ष वयाचे छोटे 'शंकासुर' रोज येत असतात. हे 'शंकासुर' सुद्धा त्यांच्या आई-वडिलांना सतत अनेक प्रश्न विचारून पिडत असतात. काही आई-वडील त्यांच्या 'शंकासुरा'ला योग्य पद्धतीने शांत करताना मी पाहते. काही पालक मात्र त्यांच्या शंकाकडे लक्ष देण्याची तसदीही घेत नाहीत. तर काहीजण ऐकतात, पण समाधानकारक उत्तरेच देत नाहीत. हे बघितले की मात्र मला फार वाईट वाटते. या शंकासुरी वृत्तीमुळेच उद्याचा शास्त्रज्ञ घडणार आहे. न्यूटन नामक शंकासुराला, 'झाडावरचं सफरचंद खाली का पडलं?' हा प्रश्न पडलाच नसता, तर शास्त्र आणि तंत्रज्ञान क्षेत्रातली मानवाची प्रगती कदाचित झालीही नसती. 'तुमच्या या शंकासुराला शांत करा ' हा माझा सल्ला ऐकायला अशा पालकांना वेळही नसतो आणि ऐकण्याची इच्छाही नसते .
पालकत्व जर असेच चालू राहिले तर भावी शात्रज्ञांची संख्या घटणार की काय? ही शंका मात्र माझ्या मनांत आल्यावाचून रहात नाही!