मंगळवार, २८ नोव्हेंबर, २०२३
दीव-सोमनाथ-व्दारका-३
शनिवार, २५ नोव्हेंबर, २०२३
दीव-सोमनाथ-व्दारका-२
१४ नोव्हेंबरला दुपारचे ऊन ओसरल्यावर आम्ही INS Khukri स्मारक बघायला बाहेर पडलो. १९७१ सालच्या भारत-पाकिस्तान युद्धामधे, भारतीय नौदलाचे हे लढाऊ जहाज पाकिस्तानी पाणबुडीने केलेल्या सागरी हल्ल्यामध्ये कामी आले. दिनांक ९/१२/१९७१ या दिवशी, दीवच्या किनाऱ्यापासून ४० सागरी मैल दूरवर या जहाजाला आणि त्यावरील १८ नौदल अधिकारी आणि १७६ नौसैनिकांना जलसमाधी मिळाली. खुकरी जहाजाचे अवशेष आजही दीवजवळ समुद्राच्या तळाशी पडून आहेत.
नौदलाच्या परंपरेप्रमाणे, जहाजावरील सर्व व्यक्ती सुखरूप बाहेर पडल्याशिवाय जहाजाचा कप्तान जहाज सोडत नाही. ती परंपरा सांभाळत, 'खुकरी'चे मुख्य अधिकारी, कॅप्टन महेंद्रनाथ मुल्ला यांनी जहाजासोबतच जिवंत जलसमाधी घेतली. भारतीय नौदलाने, कॅप्टन महेंद्रनाथ मुल्ला यांना मरणोत्तर महावीरचक्र देऊन त्यांचा गौरव केला. INS Khukri स्मारकाचे उद्घाटन १५ डिसेंबर १९९९ साली, नौदलाच्या पश्चिम विभागाचे तत्कालीन मुख्य अधिकारी, व्हाईस ऍडमिरल माधवेंद्र सिंग यांच्या हस्ते केले गेले. हे स्मारक चोवीस तास खुले असते आणि इथे जाण्यासाठी काहीही प्रवेशशुल्क आकारले जात नाही.
आम्ही स्मारकाजवळ पोहोचलो त्यावेळी ऊन उतरलेले असल्याने हवा आल्हाददायक होती. समुद्रकिनाऱ्याजवळच एका टेकाडावर हे स्मारक उभे केलेले आहे. हे छोटेसे टेकाड चढून जाणे सहजी शक्य आहे. तसेच वर जाण्यासाठी, बॅटरीवर चालणाऱ्या गोल्फ कार्टची व्यवस्था अगदी माफक दरात उपलब्ध करून दिलेली आहे. दादा आमच्याबरोबर असल्याने आम्ही सर्वजण गोल्फ कार्टनेच वर गेलो. त्या टेकाडावर उभे राहून, तेथे फुलवलेल्या बागेकडे नजर टाकल्यास, समुद्राच्या लाटांचा आभास होतो. टेकाडावरील बाग, आसपासचा परिसर आणि अगदी समुद्रालगत असलेले अँफीथिएटर, हा सर्व परिसर अतिशय स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटका ठेवलेला आहे.
टेकाडावरील सर्वात उंच जागी, चहूबाजूंनी काचेच्या भिंती असलेल्या एका बंदिस्त खोलीत खुकरी जहाजाची प्रतिकृती ठेवलेली आहे. समुद्राच्या दिशेला तोंड करून ठेवलेली जहाजाची प्रतिकृती काचेतून व्यवस्थित दिसते. १९७१ साली भारत-पाकिस्तान युद्धामधल्या त्या दुर्दैवी घटनेत जलसमाधी मिळालेल्या सर्व वीर नौसैनिकांची नावे त्या काचेच्या भिंतींवर लिहिलेली आहेत. स्मारकाजवळ उभे राहून आम्ही त्या सर्व वीरांना, मनोमन श्रद्धांजली वाहिली. स्मारकाचा स्वच्छ परिसर, समुद्राच्या तटावर असलेले सुंदर, खुले अँफी थिएटर, आणि त्या तटाला धडक देणाऱ्या फेसाळत्या लाटा, हे सगळे दृश्य अतिशय मनोहर होते. पण तरीही, खुकरी दुर्घटनेच्या आठवणीमुळे, "आहे मनोहर तरी गमते उदास" अशाच काहीश्या संमिश्र भावना आमच्या मनामध्ये होत्या.
१९७१ च्या युद्धात खुकरी जहाज बुडाल्यानंतर काही वर्षांनी, भारतीय नौदलामधील Corvette प्रकारच्या दुसऱ्या एका जहाजाला पुन्हा 'खुकरी' हेच नाव दिले गेले. हे भारतीय बनावटीचे जहाज, माझगाव डॉक येथे तयार केले गेले होते. ऑगस्ट १९८९ मध्ये नौदलाच्या सेवेत रुजू झालेले हे खुकरी जहाज डिसेंबर २०२१ मध्ये नौदलाच्या सेवेमधून निवृत्त झाले. जानेवारी २०२२ मध्ये नौदलाने ते जहाज दीव प्रशासनाकडे हस्तांतरित केले. आता ते दीवच्या समुद्रकिनाऱ्यावर नांगर टाकून उभे आहे आणि तरंगते संग्रहालय म्हणून ओळखले जाते. लढाऊ जहाजामध्ये वापरली जाणारी विविध शस्त्रे व उपकरणे आणि इतर काही वस्तू या संग्रहालयामध्ये ठेवलेल्या आहेत. खुकरी स्मारक पाहून निघाल्यावर खरं तर आम्हाला हे 'खुकरी संग्रहालय' बघायला जायचे होते. पण सर्वानुमते आमचे असे ठरले की आधी संग्रहालय पाहण्याऐवजी दिवसाउजेडी नागोवा बीचवर जाऊन यावे.
दीव गावापासून सुमारे तेरा किलोमीटर अंतरावर आणि दीव विमानतळापासून अगदी जवळ नागोवा बीच आहे. इथे दीवमधली सर्वात आलिशान आणि महागडी हॉटेल्स आहेत. दीवमधल्या बऱ्याच हॉटेल्सचे दर पर्यटनाचा मौसम सुरु झाला की गगनाला भिडतात. इतरवेळी ३ ते ४ हजार रुपये रोजचे भाडे अससेल्या हॉटेलच्या खोलीसाठी काही लोकांना १५ ते २०००० रुपये मोजावे लागले होते. आम्ही उतरलेल्या हॉटेलमध्येही आमची अशीच लुबाडणूक झाली होती. दीव हे गुजरातशेजारच्या केंद्रशासित प्रदेशातील शहर गुजरातच्या सीमेलगतच आहे. गुजरातमध्ये दारूबंदी असल्यामुळे आणि या केंद्रशासित प्रदेशात दारूबंदी नसल्यामुळे, खास मद्यपान करण्यासाठी अनेक गुजराती पर्यटक या ठिकाणी येतात, असे मी ऐकून होते. 'खास पिण्यासाठी' आलेले वाटावेत अशा पर्यटकांची गर्दी नागोवा बीचच्या आसपास दिसली.
समुद्रकिनारी हजारो पर्यटकांची गर्दी उसळली होती. त्यातच अनेक फिरंगी पर्यटकही होते. एकुणात हा बीच म्हणजे दीव मधील 'Happening place' आहे, हे जाणवत होते. बीचकडे जाणाऱ्या वाटांवर दुतर्फा, गिचमिडीत अनेक छोटी-छोटी दुकाने होती. कपडे, फळे, खाद्यपदार्थ, फुगे, खेळणी, शीतपेये आणि आईस्क्रीम विक्रेते मोठमोठ्याने ओरडून लोकांना आपापल्या दुकानात बोलावत होते. तसेच जवळपासच्या हॉटेल्समध्ये भरपूर रोषणाई, पाश्चात्य संगीत, अशी चहल-पहल दिसत होती.
पुळणीवर समुद्राला समांतर फेरफटका मारण्यासाठी उंट आणि मोटारबाईक होत्या. तसेच समुद्राच्या पाण्यावर नौकाविहाराला जाण्यासाठी स्पीड बोट्स व साध्या बोटीही दिसत होत्या. दूरवर पॅरासेलिंग चाललेले दिसले. चार वर्षांपूर्वी मी दिवेआगारला प्रथम पॅरासेलिंग केले होते. त्यावेळी जीपला बांधलेल्या एकाच पॅराशूटच्या सहाय्याने मी आणि आनंद, दोघेही हवेत उंच उडालो होतो. पॅरासेलिंगची ती माझी पहिलीच वेळ असल्यामुळे, 'कधी एकदा सुखरूप खाली पोहोंचतोय' या विचाराने मी जीव मुठीत धरून बसले होते. त्यामुळे हवेत तरंगण्याचा आनंद फारसा अनुभवता आला नव्हता. आता मात्र मला आणि प्राचीलादेखील पॅरासेलिंग करायची उर्मी आली. वाऱ्यावर हेलकावत, हवेत उंच जाण्याचा आनंद यावेळी उपभोगायचाच अशी खूणगाठ मी मनाशी पक्की केली. पण प्रत्यक्ष वर जाताना आणि खाली येताना पोटामध्ये गोळा उठल्याशिवाय राहिला नाही. प्रशिक्षकाने सांगितल्याप्रमाणे, पॅराशूटच्या दोरीवर घट्ट पकडलेले हात काही सेकंदासाठी सोडून, पक्ष्याच्या पंखाप्रमाणे हवेत पसरून मी हलवले. पॅराशूटमध्ये वारं भरून आपण वर गेलो की आपले अंगही अगदी हलके भासते. अर्थात वजन घटल्याचा तो आनंद क्षणिक असतो, कारण काही मिनिटांतच आपल्याला जमिनीवर आणले जाते!
मला वाटते प्रत्येक व्यक्तीने आयुष्यात एकदा तरी पॅरासेलिंगचा अनुभव घ्यायलाच हवा.
पॅरासेलिंग करून येईपर्यंत आम्हाला उशीर झाला होता. खुकरी संग्रहालयाला भेट देणे आम्हाला शक्य झाले नाही. दीवमधल्या प्रत्येक प्रेक्षणीय ठिकाणी, उघड्या पोत्यांमध्ये ठेवलेला सुकामेवा आणि गरम मसाल्याचे छोटे-छोटे ढीग किंवा वाटे विकणारे विक्रेते दिसले होते. अगदी उत्तम प्रकारचा सुकामेवा बाजारभावाच्या निम्म्या भावात इथे उपलब्ध होता. तो इतका स्वस्त कसा काय विकत असतील? हे कोडे मात्र सुटले नाही. कदाचित तो कर चुकवून आणलेला किंवा तस्करीचा विदेशी माल असू शकेल असे आम्हाला वाटले. नमुन्यादाखल आम्ही सुकामेवा विकत घेतला, आणि थोडा-थोडा सुकामेवा तोंडात टाकत, साडेसात-आठ वाजेपर्यंत हॉटेलमधे परतलो. जेवणानंतर पुन्हा पत्त्यांचे डाव रंगल्यामुळे झोपायला बराच उशीर झाला.