गुरुवार, ९ एप्रिल, २०२०

बाबांनो वेळ काय सांगून येत नाही!

सध्या संपूर्ण जगावर करोना महामारीचे संकट ओढवले आहे. हातावरचे पोट असलेल्या गरीब लोकांची रोजगाराच्या अभावामुळे उपासमार होत आहे. पण सुखवस्तू मध्यमवर्गावरही याचा परिणाम झाला आहे. डॉक्टर, वकील, सीए इत्यादी व्यावसायिकांचे उत्त्पन्न बंद झाले आहे. खाजगी नोकरीतील लोकांच्या नोकऱ्या धोक्यात आलेल्या आहेत. अनेक मध्यमवर्गीय लोकांची चाललेली कुरकुर माझ्या कानावर पडतेय. सोशल मीडियावर आपल्या स्तिथीची रडगाणी लोक गात आहेत. पण माझ्या माहेरच्या आणि सासरच्या वडीलधाऱ्यांनी केलेल्या संस्कारांमुळे या परिस्थितीचा सामना मी मात्र अगदी लीलया करू शकते आहे. त्यामुळेच या दिवसांमध्ये मी मनोमन त्यांचे आभार मानते आहे.  

माझ्या माहेरच्या एकत्र कुटुंबात उत्तम आर्थिक परिस्थिती असली तरीही आम्हा भावंडांना घरातली छोटी-छोटी कामे करावीच लागायची. त्याकाळीही आमच्या घरात मोटरकार होती. पण ती फक्त काकांना आणि वडिलांना कामाला जाण्यासाठी वापरली जायची. आम्हा मुलांना शाळेत जाताना चालत अथवा बसनेच जावे लागायचे. फोन आणि फ्रीज  या वस्तूंना हात लावायची आम्हा लहानमुलांना मनाई होती. "शिकून मोठे व्हा, स्वतःच्या पायावर उभे राहा, स्वकमाईने या वस्तू घ्या आणि मग वापरायला लागा", असे सांगितले जायचे. शिसपेन्सिलीचा तुकडा बोटांमध्ये धरणे अशक्य होईपर्यंत नवीन शिसपेन्सिल मिळत नसे. मोठ्या भावंडांची जुनी पुस्तके, दप्तरे,गणवेश व इतर कपडे लहानभावंडे वापरायची. त्यावेळी या असल्या शिस्तीचा खूप राग यायचा. नवीन कपडे, वस्तू यांचे फार अप्रूप वाटायचे.  

घरात सुबत्ता असली तरीही अन्न किंवा कुठलीही वस्तू वाया घालवलेली चालत नसे. पानात वाढलेले संपवावेच लागे. बाहेरून खाद्यपदार्थ आणायची किंवा बाहेर जाऊन खाण्याची मुभा नव्हती. आई-काकू-आजी सतत  स्वयंपाकघरात राबत असायच्या. "कितीही शिकली तरीही बाईला चूल आणि मूल काही चुकत नाही" हे वाक्य मी वैद्यकीय शिक्षण घेत असतानाही मला ऐकावे लागायचे. कोणीही मला स्वयंपाक करायला शिकवल्याचे आठवत नाही. पण आई-आजीच्या हाताखाली रोज काम करता-करता आपसूक शिकले, हेच खरे. आई-आजीं पैकी कोणी परातीत कणिक मळली की त्या परातीला कणकेचा एक कणही राहायचा नाही. पालेभाजी निवडताना एक पानही कचऱ्यात जाऊ दिले जायचे नाही. ते बघून-बघून मलाही तशीच सवय लागली. रोज सकाळी आजी आदल्या दिवशीचे उरलेले अन्न बाहेर काढून ठेवायची. उरलेल्या पोळ्यांची फोडणीची पोळी तरी व्हायची किंवा गूळ-तूप घालून लाडू व्हायचा. शिळ्या भाताला चमचमीत फोडणी देऊन केलेला 'फोडणीचा भात' केंव्हाच फस्त व्हायचा. उरलेल्या भाजी-आमटीचे थालीपीठ लागायचे. एखादेवेळी फारच जास्त अन्न उरले तर ते वेळच्यावेळी मोलकरणींना घरी न्यायला दिले जायचे. 

माझे सासूसासरेही खर्चिक नव्हते. वयाच्या ऐंशी वर्षांनंतरही ते दोघेही स्वावलंबी होते. आपल्या अपत्यांकडून कसलीही आर्थिक मदत न घेता अत्यंत समाधानी आयुष्य जगत होते. आनंद आर्मी ऑफिसर असल्याने  ठराविक मासिक वेतन आमच्या घरात नियमित यायचे. आर्मीमध्ये देखील बऱ्याच ऑफिसरांचे राहणीमान खूप खर्चिक असायचे. उंची दारू, महागडे कपडे आणि दागदागिन्यावर बराच खर्च करणारे ऑफिसर आमच्या अवती-भोवती होते. पण आम्ही दोघांनी मात्र कधीही वायफळ खर्च केलेला आठवत नाही. तसेच आमची घरकामाची सवयही आम्ही कधी मोडली नाही. त्यामुळे आमच्या मुलांनाही तशाच सवयी लागल्या. मुलांच्या इंग्रजी मिडियम शाळांमध्ये गर्भश्रीमंतांची मुले असायची. त्यांची चैन बघून कधीकधी आमच्या मुलांना वैषम्य वाटायचे. पण ऐहिक सुखांच्या मागे लागण्यातला फोलपणा आम्ही दोघेही त्यांना नीट समजावून सांगायचो. त्यामुळेच आमची मुले कष्टाळू, समाधानी व आनंदी झाली आहेत. मुलांमध्ये अशी वृत्ती व स्वावलंबन बाणण्यासाठी त्यांच्यासमोर रोल मॉडेल लागते. माझ्या सासर-माहेरच्या घरातून मला ते मिळाले. त्यामुळेच आमच्या सवयी साध्या राहिल्या आणि आम्हीही मुलांना तसेच घडवू शकलो.      

लहानपणी सणावाराच्या गोष्टींमध्ये, "उतू नका मातू नका घेतला वसा टाकू नका", हे वाक्य असायचे. त्या गोष्टींमधे घडणाऱ्या चमत्कारांवर माझा कधीही विश्वास बसला नाही. पण  उतणे-मातणे अयोग्य आहे, हे मात्र मनावर बिंबले. "खाऊन माजा पण टाकून माजू नका" अशा वाक्यांमुळे आणि वडिलधाऱ्यांच्या आदर्श वागणुकीमुळे वृत्तीत कधीही माज आला नाही. मागच्या पिढीतल्या वडीलधाऱ्यांच्या इतके साधे जीवन आम्ही निश्चितच जगत नाही आहोत. परंतु, केवळ पैसे आहेत म्हणून विकत घेता येणाऱ्या सर्व सुखांच्या मागेही आम्ही लागलेलो नाही. 

आज करोनाच्या साथीमुळे घरात नोकर-चाकर नाहीत, प्रत्येक काम स्वहस्ते करावे लागते आहे. तरीही आम्हाला काहीही अडचण येत नाहीये. वाट्टेल तो बाजारभाव असेल तरीही भाजी-पाला, दूध व अन्नधान्य विकत घेणे आपल्याला शक्य आहे, याबाबत आम्ही समाधानी आहोत. त्याउलट, चालत जाऊन भाजी आणणे, घर स्वच्छ करणे, भांडी घासणे, स्वयंपाक करणे अशी सोपी कामेही अनेक सुखवस्तू लोकांना जड जात आहेत. आपल्या नोकरमाणसांचे घर कसे चालत असेल? या काळजीपेक्षा, नोकरांशिवाय आपल्याला आलेल्या पंगुत्वाचे रडगाणे हे लोक गात आहेत. बँकेत भरपूर पैसे असूनही छानछोकीचे जीवन जगता येत नसल्याने, सुस्थितीतल्या  बऱ्याच लोकांची चडफड होत असताना मी पाहते आहे. घरकाम करून वैतागलेल्या, दारू, हॉटेलींग, शॉपिंग, पार्टीज या चैनींशिवाय तडफडणाऱ्या सुखवस्तू, सुशिक्षित मध्यमवर्गीयांची चडफड पाहून-ऐकून, मी अचंबित होतेय. अचानक आलेल्या करोनाच्या या संकटाच्या निमित्ताने का होईना, अश्या लोकांनी साध्या जीवनशैलीचे महत्व लक्षात घ्यावे असे मला वाटते. या वैतागलेल्या लोकांना मला अगदी कळकळीने सांगावेसे वाटते की, "बाबांनो, वेळ काय सांगून येत नाही"