मंगळवार, २९ ऑक्टोबर, २०२४

अवघे एकशे वयमान!

 साधारण दहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. माझ्या रोजच्या सवयीप्रमाणे मी पहाटे उठून, तयार होऊन चालायला बाहेर पडले. आमच्या इमारतीमधून बाहेर पडून गल्लीच्या टोकाला येऊन मी मुख्य रस्त्याला लागणार होते. तितक्यात मला डावीकडून एक वयस्कर गृहस्थ चालत येताना दिसले. त्यामुळे ते जाईपर्यंत मी जरा थांबले आणि मग त्यांच्या मागोमाग निघाले. पण त्यांना पार करून पुढे जात असताना,  त्यांचे वय विचारावेसे मला कुतूहलापोटी वाटले. 
माझा प्रश्न ऐकल्यावर ते गृहस्थ हसून म्हणाले, " माझ्या वयाबाबत तुझा काय अंदाज आहे?"
" नव्वदी तर पार केलेली वाटतेय" 
"नव्वदी केंव्हाच पार झाली. मला  नुकतीच सत्त्याण्णव पूर्ण झाली आहेत!" 
मी चकित झाले. त्यांनी आपले नाव श्री. कन्सल असे सांगितले. पुढे त्यांची आणि माझी चांगली ओळख झाली. पहाटे आमची भेट झाली की गप्पाही होऊ लागल्या. एक प्रकारे मैत्रीच झाली म्हणा ना. आमच्या गप्पातून मला त्यांच्याबद्दल बरीच माहिती कळली. हे कन्सल आजोबा केंद्र सरकारच्या डिफेन्स अकाऊंट्स खात्यामध्ये जवळपास चाळीस वर्षे नोकरी करून वयाच्या साठाव्या वर्षी निवृत्त झालेले होते. जसजसे वय वाढत जाते तसतसे सरकारी निवृत्ती वेतनामधेही वाढ होत जाते आणि वयाची शंभरी पार केल्यानंतर पेन्शन दुप्पट होते, असे ते मला सांगायचे. आर्थिकदृष्ट्या मी कोणावरही अवलंबून नाही आणि कोणालाही माझे काही करावे लागत नाही, असे ते मला मोठ्या अभिमानाने सांगायचे.   

जनरल पोस्ट ऑफिसच्या बरोबर समोरच्या गल्लीतल्या एका इमारतीतील चौथ्या मजल्यावरच्या सदनिकेत ते राहत होते. त्यांच्या इमारतीला लिफ्ट नसल्यामुळे ते रोज सकाळी जिना उतरून एकटेच बाहेर पडायचे. तिथून सुमारे अर्धा किलोमीटर चालत जाऊन, परमार ट्रेड सेंटर नावाच्या इमारतीत रोज सकाळी सहाच्या सुमारास भरणाऱ्या सत्संगाला ते जायचे. साधू वासवानी चौकातला 'सर माणेकजी मेहता मार्ग', ते कोणाच्याही मदतीशिवाय पार करायचे. सातच्या सुमारास सत्संग संपल्यानंतर मात्र, त्यांचा पंच्याहत्तरीचा  मुलगा त्यांना घ्यायला यायचा. कारण त्यावेळेपर्यंत सर माणेकजी मेहता रस्त्यावरच्या वाढलेल्या रहदारीतून त्या वयोवृद्ध आजोबाना एकट्याने वाट काढणे अवघड पडत असावे. त्यानंतरही ते आपल्या मुलाबरोबर चालतच  परतून, चार जिने चढून आपल्या घरी जायचे. पुढे माझी त्यांच्या मुलाशीही ओळख झाली. त्यांच्या मुलाकडून मला अजूनच आश्चर्यकारक माहिती कळली होती. ते आजोबा रोज पुन्हा संध्याकाळी चार जिने उतरून, इमारतीच्या खाली वीस-पंचवीस मिनिटे चालायचे व परत जिने चढून वर जायचे.

पुढील दोन-तीन वर्षांनंतर हळू-हळू ते आजोबा मला सकाळी रस्त्यावर दिसेनासे झाले. पण त्यांच्या मुलाची आणि माझी कधीकधी भेट होत असे.  मुलाकडून आजोबांची खबर मला मिळत असे. शंभरी पार करेपर्यंत ते आजोबा दिवसातून दोन वेळा जिने उतरून इमारतीच्या खालच्या आवारात फिरायचे म्हणे. वयाची १०३ वर्षे पूर्ण झाल्यावर त्यांना कुठलाही त्रास न होता घरच्याघरी मृत्यू आला, असेही मला कळले. पण माझा हा मित्र शतायुषी झाल्यानंतर मात्र आमच्या भेटीचा योग कधी आला नाही.
 
भोर येथे स्थायिक असलेल्या, प्रोफेसर  विनय कुलकर्णी या माझ्या वर्गमित्राच्या वडिलांना, म्हणजे श्री. लक्ष्मण बाळाजी कुलकर्णी यांना १८ ऑक्टोबर २०२४ रोजी १०० वर्षे पूर्ण झाली. वडिलांच्या शताब्दीपूर्तीप्रीत्यर्थ प्रो. विनय कुलकर्णी यांनी भोर येथे एक मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. काही कारणाने आम्हाला त्या कार्यक्रमाला उपस्थित राहता आले नव्हते. विनयशी आधी संपर्क साधून, रविवार दि. २७ ऑक्टोबर रोजी सकाळी मी आणि आनंद माझ्या वडिलांना घेऊन भोरला गेलो. माझ्या वडिलांना गेल्या महिन्यात ९१ वर्षे पूर्ण झाली. आता त्यांच्या समवयस्क व्यक्ती भेटणेही दुर्लभ झाले आहे. त्यामुळे, वयाची शंभरी पार केलेल्या व्यक्तीला भेटण्यासाठी माझे वडीलही उत्सुक होते. आम्ही प्रो. विनय कुलकर्णी यांच्या घरी पोहोचलो तर त्यांचे वडील आम्हाला भेटायला स्वतःहून उठून चालत बाहेर दिवाणखान्यात आले. आमचे नमस्कार स्वीकारून, त्यांनी हसतमुखाने आमची  विचारपूसही केली. आम्ही बोललेले त्यांना बऱ्यापैकी ऐकू येत होते. त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधणे शक्य झाले. श्री लक्ष्मण कुलकर्णी यांनी १९४३ -१९८२ या काळात भारत सरकारच्या तारखात्यामधे नोकरी केलेली होती. त्यापैकी पहिली सात वर्षे ते मुंबईमध्ये कार्यरत होते. १९५० पासून निवृत्त होईपर्यंत म्हणजे १९८२ सालापर्यंत ते सोलापुरात राहत होते. त्यांनी त्यांच्या सोलापुरातल्या वास्तव्याबद्दलच्या काही आठवणी सांगितल्या. माझ्या वडिलांचे सर्व आयुष्य सोलापुरातच गेलेले असल्याने त्या दोघांच्या काही ओळखीही निघाल्या आणि त्या दोघांच्या गप्पा होऊ शकल्या. 


श्री. लक्ष्मण कुलकर्णी उर्फ अण्णांच्या तब्येतीच्या काहीही तक्रारी नाहीत. मुलगा विनय त्यांच्या खाण्या-पिण्याची व्यवस्थित काळजी घेतोच. परंतु, अंघोळ, कपडे बदलणे, जेवणे  इत्यादी आपापली कामे स्वतःच  करतात, आणि त्यासाठी त्यांना कोणाचीही मदत घ्यावी लागत नाही. इतकेच काय, विनयला कामानिमित्त दिवसभरासाठी बाहेर जावे लागले, तर ते एकटेच घरात राहतात, आपापले जेवायला वाढून घेतात, हे विशेष. आण्णा ठराविक आहार घेतात, जेवणा-खाण्याच्या वेळा सांभाळतात आणि अधेमधे काही खात-पीत नाहीत. १९८२ साली सेवानिवृत्त झाल्यावर आण्णांनी योगासनाचे शिक्षण घेतले. त्यानंतर आजतागायत ते न चुकता संध्याकाळी पाच वाजता त्यांच्या योगसाधनेला सुरुवात करतात. पूर्वी ते जवळपास तास-दीडतास योगासने करायचे. आता वयोमानापरत्वे तो वेळ थोडा कमी झाला आहे इतकेच. आम्ही संध्याकाळचा चहा घेत असताना , अण्णांची योगासनांची वेळ झाली.  बांधून ठेवलेली योगासनांच्या मॅटची गुंडाळी उघडून, त्यांनी ती जमिनीवर अंथरली. एखाद्या विशीतल्या तरुणाला लाजवेल अशा चपळाईने अण्णांनी योगासने करायला सुरुवात केली. अर्धा-पाऊण तास सर्वांगाला व्यायाम झाल्यावर त्यांनी जमिनीवर अंथरलेल्या मॅटची गुंडाळी बांधून जागेवर ठेवली. विनयच्या आणि अण्णांच्या परवानगीने मी त्यांची योगसाधना माझ्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपली. अण्णा नोकरीत असताना, भारतीय तारखात्याच्या विभागीय क्रिकेट संघाचे उपकप्तान होते.  त्या शिवाय ते टेबल टेनिस, बुद्धीबळही खेळायचे, हे विनयकडून आम्हाला समजले.

माझे सासरे, कै. भास्कर वेंकटेश बापट वयाच्या ९२ वर्षेपर्यंत जगले. ते तसे नाजूक चणीचे होते, आणि व्यायामाने कमावलेली अशी त्यांची शरीरयष्टी नव्हती. म्हणूनच, आपल्या दीर्घायुष्याबद्दल ते कधी-कधी स्वतःच आश्चर्य बोलून दाखवत असत. पण विशेषतः नव्वदी पार केल्यानंतर ते नेहमी म्हणायचे, "मी कधी काही व्यसन केले नाही, पोटाच्या वर कधीही जेवलो नाही, आयुष्यभर जेवणाच्या वेळा सांभाळल्या,  बाहेरचे खाणे टाळले आणि आयुष्यभर चालत-फिरत राहून आपापली कामे करत राहिलो. या पाच सूत्रांचे पालन केले म्हणून मी कदाचित दीर्घायुषी झालो असेन." 

अण्णांना भेटल्यानंतर मला माझ्या सासऱ्यांची आणि त्यांनी सांगितलेल्या त्या पाच सूत्रांची मला प्रकर्षाने आठवण झाली. अण्णांची भेट माझ्यासाठी आणि आनंदसाठी खूपच प्रेरणादायी होती. पण मुख्यत्वे माझ्या वडिलांमध्ये नवचैतन्य आल्यासारखे आम्हाला वाटले. भोरहून पुण्याला परत निघताना आम्ही सगळेच अण्णांच्या  पाया पडलो. दादा अण्णांच्या पाया पडताना म्हणाले, "मी शंभरी ओलांडली की पुन्हा भोरला येईन आणि तुमचे आशीर्वाद घेईन." दादांना आशीर्वाद देत आण्णा, " तथास्तु" म्हणाले!