इलू -इलू , इलू -इलू !
|
खडगपूर आय आय टी ची मुख्य इमारत |
या दिवाळीत अगदी अचानकच खडगपूर आय आय टी मधे जाण्याचा आणि दिवाळीचे तीन-चार दिवस तिथल्या गेस्टहाऊसमध्ये राहण्याचा योग आला. सध्या तेथे माझा भाचा जयदीप इंजिनियरिंगच्या दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी आहे. दिवाळीमध्ये जयदीपला फक्त लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच सुट्टी असल्यामुळे, त्याला इतक्या लांबून घरी येणे शक्य होणार नव्हते. जयदीपला भेटायला माझा भाऊ शिरीष हा खडगपूरला जाणार होता. मग मी आणि आनंदनेही त्याच्याबरोबर जायचे ठरवले.
"दिवाळीच्या तुमच्या सुट्टीच्या दिवशी आपण काय करू या? तुझ्या आवडीचं काहीतरी करू या ना?" आम्ही जयदीपला विचारले.
"दिवसा काय करायचे ते आपण ठरवू. पण संध्याकाळी मात्र तुम्ही आर पी हॉलवर, म्हणजे आमच्या हॉस्टेलवर 'इलू' बघायला या" जयदीप मोठ्ठ्या उत्साहाने म्हणाला.
"इलू? ते काय असतं?"
"ते काय असतं ते मी आत्ता नाही सांगणार. ते तुम्ही बघायलाच हवे. नुसतं सांगून तुम्हाला कळणारच नाही" आमच्या प्रश्नाला बगल देत जयदीप उत्तरला.
खडगपूर आयआयटीमध्ये अनेक हॉल्स अथवा हॉस्टेलस आहेत. बरेचसे हॉल्स मुलांचे आहेत आणि काही हॉल्सवर फक्त मुलीच राहतात. त्या प्रत्येक हॉलवर 'इलू' साजरे होणार होते. तसेच कुठल्या हॉलवर किती वाजता ते साजरे होणार आहे, याचे वेळापत्रकही दिले गेले होते.
|
AGV चे निरीक्षण करताना शिरीष |
लक्ष्मीपूजनाच्या, म्हणजे खडगपूर आय आय टीच्या सुट्टीच्या दिवशी, आम्ही आय आय टी चा विस्तृत कॅम्पस जयदीपबरोबर पायी हिंडून पहिला. जयदीपने आम्हाला सगळी डिपार्टमेंटस दाखवली. जयदीप
Automated guided vehicle (AGV) वर काम करतो. त्याने त्यांची ती 'मनुष्य विरहित' चालणारी गाडी आम्हाला दाखवली आणि त्यांच्या त्या प्रोजेक्टची सविस्तर माहिती दिली. ब्रिटिशांनी वसवलेल्या 'हिजली डिटेन्शन कॅम्प'च्या आवारात खडगपूर आयआयटी आज उभी आहे. त्या कॅम्पच्या मुख्यालयाची दिमाखदार इमारत बघितली. स्वातंत्र्य संग्रामात तिथे बळी पडलेल्या स्वातंत्र्य सैनिकांना आम्ही आदरांजली वाहिली. दिवसभर पायी भटकून आम्ही खूप दमलो होतो. चालून चालून झालेली आमची दमणूक बघून जयदीपने असे सुचवले की आम्ही राधाकृष्णन हॉल आणि त्याला लागूनच असलेला जयदीपचा राजेंद्रप्रसाद हॉल या दोनच हॉलचे 'इलू' बघावे. ती सूचना आमच्याही पथ्यावरच पडली. 'इलू' बघायला आम्हाला राधाकृष्णन हॉलवर (आर के) हॉलवर आठ वाजता आणि जयदीप राहात असलेल्या राजेंद्रप्रसाद (आर पी) हॉलवर आठ वाजून वीस मिनिटांनी पोहोचायचे होते.
दिवसभराची रपेट करून आम्ही चार-साडेचारला गेस्टहाऊस मध्ये येऊन झोपलो ते सहा सव्वासहाला उठलो. चहा प्यायला शिरीषला आणि जयदीपला आमच्या खोलीमध्ये बोलावण्यासाठी त्यांच्या खोलीवर फोन केला तर तिकडून काही उत्तरच आले नाही. परत थोड्यावेळाने फोन केला, त्यांच्या खोलीच्या दाराची घंटी वाजवली तरीही काहीच उत्तर आले नाही, हे बघून मी आणि आनंद चांगलेच चक्रावलो होतो. इतक्यात शिरीष मोठ्या विजयी मुद्रेने जयदीपला घेऊन बाहेरून आला. 'इलू'च्या वेळी घालायला आपल्याकडे चांगला कुडता नाही हे अचानकच जयदीपच्या लक्षात आलं होतं. त्यामुळे त्याला घेऊन कुडता खरेदीच्या मोहिमेवर शिरीष बाहेर पडला होता. लक्ष्मीपूजनाचा दिवस असल्यामुळे कॅम्पसमधली आणि बाहेरचीही बरीचशी दुकाने बंदच होती. गावातल्या सगळ्या गल्लीबोळातून 'सायकलरिक्षाने फिरून झाल्यावर, आता काही कुठेही कुडता मिळणार नाही अशा निष्कर्षाला आल्यावर, अचानक एका छोट्याशा दुकानात त्यांना जयदीपच्या मनासारखा कुडता मिळून गेला होता. त्यामुळे जयदीप आणि शिरीष दोघेही अतिशय आनंदले होते.
|
मी आणि जयदीप 'इलू' बघायला तयार |
नवा कुडता घालून जयदीप त्याच्या हॉलवर सायकलवरून पसार झाला. आम्हीही तयार होतोच. जयदीपच्या पाठोपाठच आम्ही चालत-चालत आर के हॉल कडे निघालो. बाहेर पडलो तर आमच्या डोळ्यावर आमचा विश्वासच बसेना. आधीचे दोन दिवस, अगदी साधेच टीशर्ट आणि जीन्स घातलेली, आणि सायकल मारत भराभर इकडून तिकडे जाणारी आय आय टी मधली अभ्यासू मुले-मुली आम्ही बघत होतो. पण त्या दिवशी संध्याकाळी ती सगळी मुले-मुली चक्क नटलेली होती. मुलांचे रंगीबेरंगी कुडते काय आणि मुलींचे भरजरी कपडे, साड्या, नट्टापट्टा आणि दागदागिने काय, सगळे वातावरण अगदी फुलून गेले होते. मुलामुलींच्या आणि आमच्या सारख्या इतर पालकांच्या घोळक्याबरोबर आम्ही आर के हॉलपर्यंत आठच्या आधीच पोहोचलो. पण आम्ही पोहोचायच्या आधीच तिथे प्रचंड गर्दी झालेली होती. हॉलसमोरच्या पटांगणात उभ्या केलेल्या बांबूच्या २०-२२ फुटी भव्य चटयांवर, पणत्यांच्या साहाय्याने पौराणिक देखावे सादर केले होते. त्याचसोबत रांगोळ्यांनी रंगवलेली पौराणिक चित्रे आणि त्यावर सोडलेला अल्ट्रा-व्हायोलेट झोत असे 'हाय-टेक' देखावेही होते. सर्व हॉल्सची पहिल्या आणि दुसऱ्या वर्षाची मुले महिनाभर खपून हे देखावे तयार करतात. प्रत्येक हॉल वेगवेगळ्या आशयांचे देखावे सादर करतो आणि नामांकित परीक्षकांच्या मते ज्या हॉलचे देखावे सर्वोत्कृष्ट ठरतात, त्या हॉलला बक्षीस मिळते. एखादा हॉल यावर्षी नेमका कुठला देखावा सादर करणार आहे, हे फक्त त्या-त्या हॉलच्या मुलांनाच माहिती असते. हे जे टॉप सिक्रेट ठेवलेले असते ते त्या स्पर्धेच्या वेळीच बाहेर पडते. विजेवर चालणारे सगळे दिवे बंद करून फक्त हजारो पणत्या एकाच वेळी पेटवल्या जातात आणि अचानक अंधारात आपल्यासमोर हे सुंदर देखावे तयार होतात. या नेत्रदीपक इल्युमिनेशन स्पर्धेचे संक्षिप्त रूप म्हणजेच 'इलू' हे आम्हाला तिथे गेल्यावरच कळले!
|
जयदीपच्या आर पी हॉलचे या वर्षीचे 'इलू ' |
आर के हॉल चे देखावे पाहिल्यानंतर आम्ही जयदीपच्या आर पी हॉलवर गेलो. पणत्या पेटवणे चालू असताना 'आता काय-काय दिसणार?' अशी कमालीची उत्सुकता सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. सगळ्या पणत्या पेटल्या आणि तिथलेही सुरेख देखावे आमच्या डोळ्यापुढे उभे राहिले. पाच चटयांवर, केवळ पणत्यांच्या साहाय्याने जणू संपूर्ण महाभारत रेखाटले होते. द्रौपदी-वस्त्रहरण, द्रोणाचार्य आणि एकलव्य, भीष्म-परशुराम युद्ध, कर्णाच्या रथाचे चिखलात रुतलेले चाक, बाणांच्या शय्येवर पडलेले भीष्माचार्य, असे देखावे अगदी हुबेहूब होते. हजारो पणत्या एकाच वेळी पेटवल्यामुळे अमावास्येच्या अंधाऱ्या रात्रीचे आकाश उजळून निघाले होते. उभ्या चटयांवरच्या त्या देखाव्यांचे प्रतिबिंब जमिनीवरच्या कृत्रिम तळ्यातील पाण्यामध्ये पडल्यामुळे ते दृश्य फारच सुरेख दिसत होते. पणत्यांच्या प्रकाशामुळे प्रचंड जनसमुदायाच्या डोळ्यांच्या पणत्याही लखलखत होत्या. हवेत तरंगणारे अनेक रंगीत आकाशकंदील एकापाठोपाठ आकाशात सोडलेले होते. शोभेच्या दारूकामाने आसमंत उजळून निघाला होता. आरपी हॉलची मुले घोषणा देत होती. इतर मुले-मुली त्यांना प्रोत्साहन देत होती. भरपूर फोटो काढले जात होते. फ्लॅश उडत होते. तरुणाईच्या जल्लोषामुळे आणि त्यांच्यातल्या ऊर्जेमुळे वातावरण भारल्यासारखे झाले होते. गेले दोन दिवस पाहिलेल्या त्या 'अभ्यासू' मुला-मुलींचे हे वेगळेच रूप, त्यांचे टीम स्पिरिट, त्यांच्यामधले ते चैतन्य, त्यांच्यातल्या कलागुणांची, कल्पकतेची आणि हरहुन्नरीपणाची एक वेगळीच झलक आम्हाला पाहायला मिळाली. जयदीपच्या आर पी हॉलला, या वर्षीच्या 'इलू' चे पहिले बक्षिस मिळाल्याचे जयदीपने आम्हाला मोठ्ठ्या अभिमानाने सांगितले आणि आम्हाला खूप कौतुक वाटले.
|
आर पी हॉलच्या 'इलू' समोर जयदीप |
बऱ्याच वर्षांनंतर खडगपूर आय आय टीमधील दिवाळीच्या निमित्ताने 'इलू' हा शब्द मी ऐकला. पूर्वी एका हिंदी गाण्यात हा शब्द मी ऐकला होता.
"इलू, इलू, इलू, इलू,S S, इलू का मतलब आय लव्ह यू " असं ते गाणं होतं.
खडगपूर आय आय टी मधलं ऊर्जस्वल वातावरण, शिक्षणाचा दर्जा, तिथे घडत असलेली, अनेक कलागुणसंपन्न अशी भावी पिढी, आणि 'इलू' हे सगळं बघून मी भलतीच भारावून गेले आहे. तुम्हाला हसायला येईल, आणि कदाचित तुम्ही माझी चेष्टाही कराल. पण खरंच सांगते, या ट्रिपहून आल्यापासून मी खडगपूर आय आय टी ला उद्देशून "इलू, इलू, इलू, इलू,S S, इलू का मतलब आय लव्ह यू " हे गाणं गुणगुणते आहे, पण फक्त माझ्या मनांतल्या मनांतच बरं का!
खुप छान. असं नेहमी तु नवनवीन लिहीत जा.
उत्तर द्याहटवाछान!
हटवाकाय सुंदर वर्णन केलेले आहेस!सगळं उत्साहाने भरलेलं चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं!
उत्तर द्याहटवाखूप छान.. भारलेल्या वातावरणाची अनुभूतीच जणू तुझ्या लिखाणातून आली. मुलांचं कौतुक आहे खरंच..
उत्तर द्याहटवाthanks Nanda!
हटवामस्त आहे लेख , केरळच्या गुरुवायूर मंदिरात एकाचवेळी हजारभर पणत्या त्या देवळाच्या भिंतींवर लावतात याची आठवण झाली ।
उत्तर द्याहटवाThanks!I have heard about the Guruvayur temple. I should try and visit it during Diwali.
हटवाखूप छान.
उत्तर द्याहटवामस्त aah.
एकदा जावे असे वाटते
Thanks!You must watch it once!
हटवातुमच्या इतकीच आमचीही उत्सुकता वाढली होती. IIT मध्ये शिकणारी तरुण पिढी महाभारत आठवते हे जाणून आनंद झाला.
उत्तर द्याहटवाThanks!
हटवाWonderful
उत्तर द्याहटवाThanks!
हटवास्वाती छान लिहल आहेस असे अनुभव तुझ्यामुळे आम्हाला वाचनातून घेता येतात धन्यवाद
उत्तर द्याहटवाThanks!
हटवाखूप छान उपक्रम दिसतोय !! मस्त वाटले दृश्य डोळ्या समोर आले !!
उत्तर द्याहटवा