लहानपणापासून मला पहाटे लवकर उठायची सवय आहे. पहाटेच्या शांत, थंड आणि शुद्ध हवेमधे गरमागरम चहाचा आस्वाद घ्यायला मला फार आवडते. माहेरी, माझी आजी, भल्या पहाटे उठायची व दूध न घालता काळी कॉफी प्यायची. आज्जीच्या हातचा चहा विशेष चांगला व्हायचा. बरेचदा, मी आजीला माझ्यासाठी चहा करण्याची गळ घालायचे. एकीकडे तिची कॉफी करत दुसरीकडे ती मला चहा करून द्यायची. मी मेडिकलचे शेवटचे एक वर्ष माझ्या मोठ्या काकांच्या, अप्पांच्या बंगल्यावर राहिले. तिथे मी आणि काका पहाटे उठून चहा प्यायचो व नंतर मी अभ्यासाला बसायचे. इंटर्नशिपपासून मात्र या सकाळच्या चहानंतर व्यायामासाठी बाहेर पडायची सवय मला लागली. भल्या पहाटे घराबाहेर पडून व्यायाम करण्यासाठी माझे शरीर आणि मन आसुसलेले असते.
माझ्या लग्नानंतरही आजतागायत व्यायामाची सवय आहेच. आनंद आर्मीच्या नोकरीत असेपर्यंत त्याला पहाटे उठणे बंधनकारक होते. त्यामुळे आम्ही पहाटेचा चहा एकत्र घ्यायचो. त्यानंतर तो आर्मीच्या पीटी परेडला व मी माझ्या व्यायामाला, असे बाहेर पडायचो. पुढे मुलांच्या शिक्षणासाठी मी पुण्यात राहिल्यामुळे बराच काळ आम्ही वेगवेगळे राहिलो. १९९७ सालापासून आम्ही मुख्य पुणे कँटोन्मेंटमधे, म्हणजे सदर्न कमांड हेडक्वार्टरच्या जवळ, आर्मीच्या क्वार्टर्समध्ये राहायला आलो. आनंद त्याच्या बदलीच्या ठिकाणाहून पुण्याला येऊन-जाऊन असायचा. पुढे २००७ साली आनंदने सैन्यातून स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यानंतर आम्ही कँटोन्मेंटच्या हद्दीलगतच असलेल्या आमच्या सध्याच्या घरात राहू लागलो. त्यामुळे आजही आम्ही पुणे कँटोन्मेंटमधे राहात असल्यासारखे वाटते. आनंदने सेवानिवृत्तीनंतर हळूहळू पहाटे उठणे बंद केले. पण मी मात्र माझ्या सवयीप्रमाणे पहाटे उठते, चहा घेते आणि मोठ्या उत्साहाने एकटीच व्यायामाला बाहेर पडते. अर्थात हे रोज जमतेच असे नाही. पण रोज जाण्याचा माझा प्रयत्न असतो.
मला रेसचा जरी नसला तरीही पहाटे पुणे रेसकोर्सवर फिरायला जाण्याचे व्यसन १९९७-९८ सालापासून लागले. रेसकोर्सच्या मध्यावर एक वर्तुळाकार मैदान आहे. तिथे घोड्यांचे प्रशिक्षण चालते. त्या मैदानाच्या परिघाभोवती चालण्यासाठी २ किलोमीटर लांबीचा, एक साधारण लंबवर्तुळाकार वॉकिंग ट्रॅक आहे. त्या चालण्याच्या ट्रॅकच्या परिघाभोवती घोड्यांचा पळण्याचा ट्रॅक आहे. बाहेरच्या ट्रॅकवर दौडणाऱ्या घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकत, वेगात धावणाऱ्या घोडयांना बघत, रेसकोर्सवर चालण्यात किंवा पळण्यात मला कमालीची नशा वाटते. कधीकधी जवानांची एखादी तुकडी सकाळच्या पीटी परेडला तिथे येते. मग काय, घोड्यांच्या टापांच्या आवाजाबरोबरच, पळणाऱ्या सैनिकांच्या बुटांचा आवाजही येतो आणि रेसकोर्सवरचे वातावरण अजूनच नशिले होते. आठ-नऊ वर्षांपूर्वीपर्यंत, घरातून पहाटे ५-५.३० च्या सुमाराला निघून, रेसकोर्सपर्यंतचे दोन किलोमीटर अंतर चालत मी सहाच्या आत रेसकोर्सवर हजर असायचे. चार-पाच फेऱ्या जॉगिंग करायचे. पण व्यायामाच्या व्यसनापेक्षा, माझे खादाडीचे व्यसन जास्त प्रबळ असल्याने, माझे वजन वाढत गेले. त्यामुळे जॉगिंगपेक्षा आता सायकलिंगवर भर आहे. पहाटे दहा बारा किलोमीटर सायकलिंग करून नंतर मग रेसकोर्सवरच्या ट्रॅकवर चालत एखादी फेरी मारते.
रेसकोर्सवर फिरण्यामधे, मला नेमकी कशाची नशा जास्त येते हे सांगणे तसे अवघड आहे. सर्व बाजूने गोलाकार दिसणारे आकाश, आणि थंडगार वारे मनाला भुरळ घालतातच. पण अठरापगड जातींचे, धर्मांचे, लहान मुलांपासून अगदी जख्खड म्हातारे, वेगवेगळ्या वेशभूषा केलेले, विविध नोकऱ्या वा व्यवसाय करणारे, वेगवेगळ्या आर्थिक स्तरातले स्त्री-पुरुष मला तिथे दिसतात. फिरत असताना या सर्व व्यक्तींचे बोलणे अर्धवटच माझ्या कानावर पडत असते. ते ऐकण्याचा आणि त्या व्यक्तीबद्दल मनातल्या मनात काही आडाखे बांधण्याचाही मला नाद आहे. त्यातल्या कांहींशीच माझी ओळख आणि काहींशी विशेष मैत्री झालेली आहे. पण अनेक व्यक्तींचे नाव मला किंवा माझे नाव त्यांना माहिती नाही. तरीही आमची "अबोल मैत्री" आहे. रोज ठराविक वेळी दिसणारी व्यक्ती दिसली नाही की मला अगदी चुकल्या-चुकल्यासारखे होते. ती व्यक्ती दुसऱ्या दिवशी दिसली की अगदी हायसे वाटते. जसे मला वाटते अगदी तसेच त्यांनाही वाटत असणार याची मला खात्री आहे. त्यातली एखादी व्यक्ती इतर वेळी बाहेर कुठे भेटली तर आम्ही अगदी खूप जुनी ओळख असल्यासारखे, सलगीने बोलायला लागू, असे वाटते. पण या सर्व गोष्टींपेक्षाही रेसकोर्सच्या वातावरणात ऐकू येत असलेल्या घोड्यांच्या टापांच्या आवाजाच्या नादात, माझ्या मनाला, एखाद्या अबलख वारूसारखे उधळू द्यायला मला फार आवडते.
सध्या लॉकडाऊनमुळे रेसकोर्स बंद आहे. मी रोज पहाटे पाच-साडेपाचला उठून एम्प्रेस गार्डनच्या मागच्या भागात, व्हिक्टोरिया रोड, नेहरू रोड , अलेक्झांडर रोड, या भागात सायकलस्वारीला जाते. अतिशय शांत, दुतर्फा झाडी असलेला, अनेकविध पक्षांच्या आवाजाने संगीतमय झालेला, वेगवेगळ्या जातींच्या आणि रंगांच्या फुलांनी सजलेला, ब्रिटिशकालीन प्रशस्त बंगले असलेला, हा अतिशय सुंदर परिसर आहे. तिथे फोर्ट कॉम्प्लेक्सच्या आसपास अनेक मोर मला रोज दिसतात. ते मोर पाहून मनी मोर नाचण्याचा, सध्या मी रोज अनुभव घेतेय. पण या सगळ्या रम्य वातावरणात, माझ्या मनाला बेलगाम उधळू देण्याची किमया करणाऱ्या रेसकोर्सची नशा मात्र नाही. त्यामुळेच कधी एकदा हा लॉकडाऊन संपतोय आणि रेसकोर्स चालू होतंय याचीच मी आतुरतेने वाट बघतेय.
मस्त नशीले वर्णन.
उत्तर द्याहटवाधन्यवाद!
हटवाYou are a cheerful fountain hence horses, army persons & co-morning participants must be taking inspiration of intoxication from you & missing you in this lockdown period. As usual fantastic blog.
उत्तर द्याहटवाThanks!
हटवाChhan
हटवाnice writeup.....you write so nicely....not knowing that....great
उत्तर द्याहटवालेख नेहेमीप्रमाणे छान,! "अबोल मैत्री" आवडली. मनातले मोर आणि वारू मोकळे होऊन पूर्वीप्रमाणे विहरूदे !
उत्तर द्याहटवाधन्यवाद मॅडम!
हटवाइच्छा तशीच आहे पण हा करोना हवं तसं जगू देईल तर ना😄
धन्यवाद!
उत्तर द्याहटवातुम्ही म्हणता तसे करोना करे देईना😄
Khupch chan 👌🏻
उत्तर द्याहटवाThanks Shrilekha!
उत्तर द्याहटवा