१९९२च्या डिसेंबर महिन्यामध्ये, प्रथमच आनंद, मी आणि मुले एकत्र असे अलाहाबादला रहायला लागलो. सुरुवातीला काही दिवस आम्ही आमच्या स्कूटरवर फिरायचो. पण नंतर आम्ही मोठ्या हौसेने नेव्ही ब्लू रंगाची नवीकोरी मारुती 'ऑम्नी' व्हॅन घेतली. ती व्हॅन आम्हाला फारच आवडायची. पुढे बॉनेट नसल्यामुळे, ती चालवताना सगळ्या रस्त्यावर अधिराज्य असल्यासारखे वाटायचे. आज कुणाला सांगितले तर खरे वाटणार नाही, पण त्यावेळी पैसे भरल्यानंतर, व्हॅन मिळेपर्यंत गिऱ्हाईकांना निदान दोन-चार महिने वाट बघावी लागायची. काही उतावळे लोक जास्तीचे पैसे (On Money) देऊन मारुती व्हॅन घ्यायचे. आम्ही ती व्हॅन आर्मीच्या कॅन्टीन मार्फत विकत घेतल्यामुळे आम्हाला ती बाजार भावापेक्षा दहा-बारा हजार रुपयांनी स्वस्तच मिळाली होती. आम्ही व्हॅन विकत घेतली आणि त्यानंतर जवळजवळ लगेच मारुती कंपनीने व्हॅनच्या किंमती वाढवल्या होत्या.
आम्ही ती व्हॅन बरीच वापरली. मुले लहान असल्यामुळे उंच सीटवर बसून त्यांना बाहेर बघायला मजा वाटायची. अलाहाबादला आमच्याकडे नातेवाईकांचा सारखा राबता असायचा. अनेक वेळा सात-आठ जण दाटीवाटीने बसून, खाण्यापिण्याचे सामान बरोबर घेऊन आम्ही वाराणसी, लखनौ, फैजाबाद-अयोध्या, चित्रकूट-खजुराहो असे अनेक दौरे केले. त्याकाळी गाडीच्या मॉडेलला, किंवा गाडी किती सीटर आहे या गोष्टीला, फारसे महत्त्व नसायचे. त्यावरून तुमची 'किंमत'ही ठरवली जात नसे. मुख्य म्हणजे गाडी कितीही सीटर का असेना, कुरकुर न करता भरपूर लोक त्यात बसून आनंदात फिरायचे. हल्ली आपले सर्वांचे राहणीमान उंचावले आहे, पण कदाचित मनोवृत्ती संकुचित होत चालली आहे. त्यामुळे, काहींना चार सीटर गाडीमध्ये पाचव्या व्यक्तीची, अगदी एखाद्या लहान मुलाची सुद्धा अडचण वाटते.
१९९५ सालच्या मे महिन्यापासून मुलांना घेऊन मी पुण्याला राहू लागले. आनंद एकटाच अलाहाबादेत राहणार असल्याने त्याला गाडीची गरज उरली नाही. म्हणून, ऑक्टोबर महिन्यात, दिवाळीच्या सुट्टीत मी मुलांना घेऊन अलाहाबादला आले असताना आम्ही ती गाडी विकायचे ठरवले. दिवाळी संपल्या-संपल्या, "आर्मी ऑफिसरची एकहाती वापरलेली गाडी विकणे आहे" अशी जाहिरात अलाहाबादच्या स्थानिक वर्तमानपत्रांमधून आम्ही दिली. जाहिरात छापून आली त्याच दिवशी आमच्याकडे इच्छुक गिऱ्हाईकांची अक्षरश: रांग लागली. दिवसभर येत राहिलेल्या अनेक गिऱ्हाईकांना गाडी व गाडीची कागदपत्रे दाखवणे, किंमतीबद्दल घासाघीस करणे हे करून मी, आनंद आणि आनंदचा सहायक, तिघेही अगदी दमून गेलो. त्यातल्या बऱ्याच जणांनी, ही व्हॅन इतर कोणालाही देऊ नका, आम्हीच घेणार आहोत असे सांगितले असले तरीही पैसे कोणीही दिलेले नव्हते. अलाहाबादला बरीच फसवेगिरी आणि गुंडगिरीही असल्यामुळे, एक रकमी पूर्ण पैसे दिल्याशिवाय गाडी विकणार नाही, असे आम्ही निक्षून सांगितलेले होते.
त्या संध्याकाळी आमच्याकडे आनंदचे दोन आर्मी ऑफिसर मित्र, त्यांच्या बायका-मुलांसह आले होते. आम्ही खात-पीत व गप्पा मारत बसलो होतो. सकाळी येऊन गेलेल्या इच्छुक लोकांपैकी एकजण पुन्हा येऊन आमच्या दारावर धडकला. आनंदने त्याच्याशी बोलणी सुरु केली. तितक्यात, सकाळी गाडी पाहून गेलेला दुसरा एकजणदेखील आला. त्या माणसाला मी दुसऱ्या एका खोलीत नेऊन बसवले आणि आनंदच्या मित्रांनी त्याच्याशी बोलणी चालू केली. आमचे आर्मी क्वार्टर, खूपच मोठे म्हणजे जवळजवळ तीन हजार स्क्वेअर फुटाचे होते. ते दोघे खरेदीदार जरी वेगवेगळ्या खोलीत बसलेले असले तरीही, दुसरा एक ग्राहकदेखील येऊन बोलणी करीत आहे याची त्या दोघांनाही पूर्ण कल्पना होती. दोघेही थोडे पैसे घेऊन आलेले होते आणि उरलेले पैसे उद्या आणून देऊन गाडी घेऊन जाऊ असे म्हणत होते. त्या दोघांनाही ती गाडी हवी असल्यामुळे ते दोघेही किंमत वाढवत गेले. हा अगदीच नाट्यमय प्रसंग होता. एकाच वेळी दोन गिऱ्हाईक आल्यामुळे आम्हाला घासाघीस करायला भरपूर वाव होता. मी एका खोलीतून दुसऱ्या खोलीत फेऱ्या मारून कोण जास्त किंमत द्यायला तयार आहे याचा अंदाज घेत होते. असे करता-करता शेवटी आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त किंमत द्यायला ते दोघेही तयार झाले. हे सगळे नाट्य संपेपर्यंत रात्रीचे आठ वाजून गेले होते. शेवटी, जो कोणी ठरलेली संपूर्ण रक्कम आधी आणून देईल, त्याला आम्ही गाडी देऊ असे सांगून त्या दोघांचीही आम्ही बोळवण केली. त्यानंतर आम्ही पुन्हा मित्र परिवाराबरोबर गप्पा-गोष्टी करण्यात गुंगून गेलो.
खरी गंमत तर पुढे झाली. आमची जेवणे उरकल्यानंतर साधारण रात्री नऊ-साडेनऊच्या सुमारास, आनंदचे मित्र घरी परतायला निघाले होते. तितक्यात त्या दोन इच्छुक खरेदीदारांपैकी एकजण परत आला आणि त्याने नोटांच्या पुडक्याने भरलेली पिशवीच समोर काढून ठेवली. सर्वात जास्त आश्चर्याची गोष्ट म्हणजे "ठरलेली सर्व रक्कम मी आज देऊन जातो, गाडी तुम्ही मला उद्या द्या" असेही तो म्हणू लागला. त्यामुळे आम्ही अजूनच बुचकळ्यात पडलो. आमच्याच सांगण्यानुसार तो पैसे घेऊन तातडीने हजर झाला होता. आता त्याला परत तरी कसे पाठवायचे? एकीकडे हा प्रश्न आमच्यापुढे होता. तर दुसरीकडे, इतकी मोठी रक्कम आणि विकलेली गाडी दोन्हीही आमच्याकडेच ठेवून जाण्यामागे, या माणसाचा काही विपरीत हेतू तर नसेल ना? अशा शंकेने आम्हाला घेरले होते. हे चोरीचे पैसे तर नसतील ना? तसे असले तर काय होईल ? किंवा या पैशांसाठी रात्रीतून आमच्यावर कोणी हल्ला केला तर काय? अनेक शंका आमच्या मनात येऊ लागल्या. पण तो अपरिचित इसम मात्र, "तुम्ही आत्ताच्या आत्ता पैसे घ्याच, पण कुठल्याही परिस्थितीत ही गाडी मलाच विका" असे म्हणत हटूनच बसला. आम्ही मात्र चांगलेच अडचणीत पडलो. "तुम्ही उद्या सकाळी रक्कम घेऊन या, आम्ही उद्या तुम्हालाच गाडी देऊ, इतर कोणालाही विकणार नाही" असेही आम्ही त्या माणसाला सांगून पहिले. पण तो इसम काही केल्या ऐकेना. आत्ता रात्री या रक्कमेची पावती देणे आम्हाला शक्य होणार नाही, अशी लंगडी सबब पुढे केली. तरीही तो ऐकायला तयार होईना. शेवटी मी व आनंद आणि त्याच्या आर्मी ऑफिसर मित्रांनी मिळून चर्चा केली, आणि ते पैसे व गाडी दोन्ही आमच्याकडेच ठेवून घेऊन त्या माणसाशी सौदा पक्का करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरच्या अर्ध्या तासात आनंदने आणि त्याच्या दोन्ही मित्रांनी मिळून ती सगळी रक्कम मोजून घेतली. पैशाची कच्ची पावती घेऊन, पण खरेदी केलेली गाडी मात्र न घेता तो माणूस रात्री दहानंतर परत गेला. त्या रात्रभर मी आणि आनंद काळजीने नीट झोपूही शकलो नाही.
दुसऱ्या दिवशी भल्या सकाळी तो खरेदीदार एका स्टॅम्पपेपरवर खरेदीखताचा मसुदा टाईप करूनच घेऊन आला. त्यावर त्याने व आनंदने सह्या केल्या, साक्षीदार म्हणून आनंदच्या दोन्ही मित्रांनी सह्या केल्या आणि तो व्यवहार प्रत्यक्षात पूर्ण झाला. स्वतःला गाडी चालवता येत नसल्याने ती गाडी तो आदल्या रात्री घेऊन गेला नव्हता हा खुलासा त्याने तेंव्हा केला! सकाळी येताना मात्र, गाडी चालवता येत असलेल्या कोणालातरी बरोबर घेऊन तो आला होता. गाडी व कागदपत्रे त्याने ताब्यात घेतली आणि चालकाच्या शेजारी बसून, मोठ्या समाधानाने आणि विजयी मुद्रेने तो निघून गेला. दीड लाखात ऑन-रोड घेतलेली, दोन वर्षे मनसोक्त वापरून झालेली ती व्हॅन आम्ही एक लाख सदुसष्ट हजाराला विकल्यामुळे आम्हीही भलतेच खुषीत होतो. आनंदने तातडीने जाऊन ती रक्कम बँकेत भरून टाकली आणि आम्ही सुटकेचा निश्वास सोडला.
Wow great.
उत्तर द्याहटवाKhup chhan Marathi lekhan
उत्तर द्याहटवाThanks!
हटवाsopa ani sunder!..keep writing!!
उत्तर द्याहटवाKhup chan
उत्तर द्याहटवाThanks!
हटवाडॉक्टर स्वाती,
उत्तर द्याहटवातुमचं लिखाण खूप ओघवतं आहे.
छान.
वा स्वाती प्रसंग मस्त खुलवून लिहिला आहे , मजा आली वाचतांना, चित्र उभे राहिले
उत्तर द्याहटवाजयु
आजकाल unknown असंच येतं म्हणून नाव लिहिलं
Thanks Jayu!
हटवावा स्वाती, नेहमीप्रमाणेच सोपी सुटसुटीत पण प्रभावशाली लेखन.
उत्तर द्याहटवाशुभदा
Thanks Shubhada!
हटवाKhup chan
उत्तर द्याहटवाAnju
Thanks Anju!
हटवाअनपेक्षित लाभ! मजा आली लेख वाचायला
उत्तर द्याहटवाKhoopach sundar...
उत्तर द्याहटवाThanks Nalini!
हटवाPlease keep it up
उत्तर द्याहटवाThanks Dr Patil!
हटवाफारच सुंदर आणि सुटसुटीत लेखन.
उत्तर द्याहटवासहज सुंदर लेखन. Keep it up.🙏
उत्तर द्याहटवाThanks Girish!
हटवाnice artical
उत्तर द्याहटवाThanks Shekhar!
हटवाI have similar weird memories of our OMNI! Thanks for sharing.डॉक्टरांची आणि एक हाती वापरलेली एवढं वर्णन पुरेसं होतं. माझ्या सकाळच्या कन्सल्टिंग च्या वेळात फारच फास्ट सौदा झाला आणि मला अजितनी "अगं ओम्नी गेली!" असं सांगितल्यावर खूप वाईट वाटलं .इतक्या झटपट पाठवणी पण होईल, सौदा पण उत्तम होईल असं वाटलं नव्हतं.आनंद झाला पण मला तिच्यातून शेवटची राईड पण मारता अली नाही याचं वाईट वाटत राहिलं!तिला बाय बाय करायचं राहून गेलं!
उत्तर द्याहटवाI can understand your sentiments madam.
हटवाNicely written Swatee Tai. What a novel way of negotiating - bid two buyers against each other to get a higher price !!
उत्तर द्याहटवाMilind Ranade
Thanks Milind. It happened by accident, we did not design it!
हटवाआमच्या अलाहाबाद tripची आठवण झाली लेख वाचून ��
उत्तर द्याहटवा