गुरुवार, ३ डिसेंबर, २०२०

गुरुवंदना!

गुरुवंदना!

डॉ. सौ. स्वाती बापट 

यावर्षी, करोना महामारीमुळे मार्च महिन्यापासून लॉकडाऊन सुरु झाला. त्यानंतर कधीतरी, बहुतेक मे-जून महिन्यात, श्री. संजय रानडे या मला अपरिचित असलेल्या व्यक्तीने, माझ्याशी फेसबुक मेसेंजरवर संपर्क साधला. मी लिहिलेले काही ब्लॉग्ज त्यांनी वाचले होते. माझे लेखन त्यांना आवडले. फेसबुकवर माझ्याबद्दलची माहिती वाचल्यामुळे मी सोलापूरच्या हरिभाई देवकरण प्रशाला, किंवा ह. दे. प्रशालेची विद्यार्थिनी आहे, हे त्यांना कळले. ते स्वतःदेखील ह.दे. प्रशालेचे माजी विद्यार्थी असल्याने माझ्याशी काहीही ओळख नसताना, बिनदिक्कतपणे त्यांनी माझ्याशी संपर्क साधला होता. मलाही त्यात काही गैर वाटले नाही कारण ते आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत, हे मोठे आपुलकीचे नाते होते. पुढे माझी आणि त्यांची फोनवर बरीच चर्चा झाली. 

आपल्या शाळेला शंभर वर्षे पूर्ण होऊन गेली आहेत. या शतकभराच्या काळात, शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांच्या आठवणी आजी-माजी विद्यार्थ्यांकडून लिहून घ्याव्यात आणि त्याचे एक पुस्तक छापावे, ही श्री. रानडेंची कल्पना मला फारच आवडली. ह दे प्रशालेत शिकलेल्या माझ्या आप्तेष्टांना त्यांच्या शिक्षकांच्या आठवणी लिहून काढण्याची विनंती मी केली. हे पुस्तक खरोखरीच छापले जाईल की नाही याबाबत मी स्वतःच साशंक होते. पण, "हाती घ्याल ते तडीस न्या" हे आमच्या शाळेचे ब्रीदवाक्य, श्री. संजय रानड्यांनी प्रत्यक्षात उतरवले. त्यासाठी त्यांनी, व्हॉट्सअपवर सर्व माजी विद्यार्थ्यांना वरचेवर निरोप पाठवले. लेख लिहू शकतील अशा प्रत्येक व्यक्तीशी ते आवर्जून बोलले व सगळ्या गोष्टींचा अगदी योग्य पद्धतीने पाठपुरावा केला हे विशेष. 

आपल्या जडणघडणीत शालेय शिक्षणाचे महत्व खूपच असते. शाळेतल्या एकूण वातावरणाचा आपल्या मनावर आणि व्यक्तिमत्वावर, नकळत पण फार खोलवर परिणाम होत असतो. तसा सकारात्मक परिणाम माझ्यावरही झाला. पहिली ते चौथी मी सोलापुरातच नूमवि प्राथमिक शाळेत शिकले होते. शि. प्र. मंडळी, पुणे, या संस्थेच्या, नूमवि आणि ह दे प्रशाला या दोन्ही शाळा एकाच आवारात होत्या. आमच्या नूमवि शाळेतून ह दे प्रशालेची भव्य इमारत दिसायची. आमच्या एकत्र कुटूंबातील माझ्यापेक्षा मोठी सर्व भावंडे ह दे प्रशालेतच शिकत असल्याने, मी पाचवीत जाण्याच्याही आधी कधीतरी, त्यांच्याबरोबर ह दे प्रशालेत गेलेले आठवते आहे. भावंडांप्रमाणे मीदेखील ह दे प्रशालेतच जाणार हे जणू ठरलेलेच होते. त्यामुळे मोठ्या शाळेत जाण्याचे दडपण वगैरे नव्हते. 

ह दे प्रशालेत अनेक चांगले शिक्षक व सोयी-सुविधा होत्या. शाळेचे वाचनालय आणि प्रयोगशाळा या दोन गोष्टी विशेष होत्या. विविध विषयांच्या अनेक पुस्तकांनी सुसज्ज असे वाचनालय पूर्णपणे भोमे सरांच्या ताब्यात होते. वाचनालयात भोमे सरांची कडक शिस्त दिसून यायची. सगळी पुस्तके विषयवार लावून ठेवलेली असत. शाळेच्या वेळापत्रकातच वाचनाचा एक तास असायचा. त्या तासाला आमच्यापैकी कोणीतरी वाचनालयात जाऊन पुस्तकांनी भरलेली एक पेटी वर्गात आणायचा. त्यातलेच एखादे पुस्तक त्या तासात आम्ही वाचायचो. त्या पेटीत फारशी काही धड पुस्तके नसायची. तरीही आमच्या हाताला लागेल ते आम्ही आनंदाने वाचायचो. पुस्तकाची पेटी घ्यायला गेलो की,"पुस्तके नीट वापरा. फाडू नका" अशी दटावणी भोमे सर त्यांच्या करड्या आवाजात करायचे. त्यामुळे, सुरुवातीला काही काळ भोमे सरांची खूपच भीती वाटायची व त्यांचा रागही यायचा. दर शनिवारी, शाळेच्या वाचनालयातून काही पुस्तके आम्हाला घरी नेता येत असत. मी सातत्याने वाचनालयातून पुस्तके घरी नेऊन वाचत असे. मी ती पुस्तके व्यवस्थितपणे हाताळायचे आणि वाचून झाली की वेळेत परत करायचे. त्यामुळे हळू-हळू भोमे सरांची आणि माझी ओळख झाली. वाचनात रमणाऱ्या आणि पुस्तके जपून वापरणाऱ्या विद्यार्थ्यांना भोमे सर चांगली पुस्तके आवर्जून काढून देत असत. एखाद्या विद्यार्थ्याला विशिष्ट विषयाची गोडी लागल्याचे लक्षात आल्यास, त्याच्या वयानुसार योग्य अशी, त्या-त्या विषयाची पुस्तके सुचवणे, हे भोमे सरांचे वैशिष्ट्य होते. काही वर्षांपूर्वी, मी भोमे सरांच्या घरी गेले होते. त्यावेळी, आम्हा विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रुजवल्याबाबत त्यांचे आभार मानायचे राहून गेले याची खंत वाटते. आज भोमे सर हयात नाहीत. पण मी आयुष्यभर त्यांची ऋणी राहीन.  

शास्त्र आणि गणित या विषयांची गोडी मला कुमठेकर सरांमुळे लागली. हे दोन्ही विषय शिकवताना, तर्कशुद्ध विचार कसा करायचा हे कुमठेकर सर सांगत. त्यांचे बोलणे अतिशय सडेतोड होते. गणित हा त्यांचा हातखंडा विषय होता. पण त्याचबरोबर त्यांचे अवांतर वाचनदेखील दांडगे होते. त्यामुळे, एखाद्या ऑफ तासाला ते आमच्या वर्गावर आले की, इंग्रजी भाषेतल्या काही सुरस कथा, विशेषतः काल्पनिक विज्ञानकथा, आम्हाला मराठीतून ऐकवायचे. त्या ऐकल्यामुळे पुढे इंग्रजी कथा-कादंबऱ्या वाचायची गोडी लागली. Science आणि pseudoscience यामध्ये फरक कसा करावा, अंधश्रद्धांना दूर कसे ठेवावे  आणि शास्त्रशुद्ध विचार कसा करावा, ही कुमठेकर सरांची शिकवण, मला आयुष्यभर पुरलेली फार मोठी देणगी आहे. कुमठेकर सरांमुळेच गणित व शास्त्रविषयांची गोडी मला लागली आणि मी आणि पुढे शास्त्रशाखेकडे वळले.

शाळा-कॉलेजातल्या मुलांच्या आत्महत्या हा आज एक मोठा सामाजिक प्रश्न होऊन बसला आहे. कदाचित आमच्या काळातही थोडाफार असेलच. त्याविषयी कुमठेकर सर एका विशिष्ट पद्धतीने आमचे प्रबोधन करायचे. ते म्हणायचे, "एखाद्या परीक्षेत मार्क कमी पडले म्हणून जीव द्यावा इतका काही तुमचा जीव स्वस्त नाहीये. उगीच जीव द्यायची भाषा कोणीही करू नये." 'Failure is the key to success' अशी काही वाक्येही ते ऐकवायचे. पुढे म्हणायचे, "त्यातून कोणाला जीव द्यावासा वाटत असेल तर मला सांगा. मी तुम्हाला मदत करेन." अर्थातच हे उपरोधात्मक बोलणे होते हे आम्हाला कळायचे आणि त्यांच्या बोलण्याच्या त्या विशिष्ट शैलीची गंमतही वाटायची. परंतु, कुठलेही संकट आले तरीही निराश होणे, जीव देणे, हे किती अयोग्य आहे हे त्यांनी आम्हा सर्वांच्या बालमनावर चांगलेच बिंबवले. सरांच्या आवाजात आणि एकूणच व्यक्तिमत्वात एक गोडवा होता. त्यामुळे गणित आणि भौतिकशास्त्र असे 'कठीण' समजले जाणारे विषय शिकवत असले तरीही कुमठेकर सर आम्हा विद्यार्थ्यांचे अतिशय लाडके होते. 

गणित आणि भौतिकशास्त्र या विषयाची गोडी मला लागली होती, पण जीवशास्र मात्र मला फारसे आवडत नसे. आम्ही नववी-दहावीच्या वर्गात आल्यावर, त्यावेळी अगदीच पोरसवदा वाटणारे श्री. भास्कर कानडे सर आम्हाला जीवशास्त्र शिकवायला आले. ते नवीनच नोकरीला लागलेले होते. आमचा वर्ग म्हणजे हुशार मुला-मुलींचा वर्ग होता. पण त्या वयात जितपत वात्रट असावे तेवढे आम्हीही होतोच. शाळेत आलेल्या नवीन शिक्षकांना 'सळो की पळो' करून सोडण्याची रणनीती जणू ठरलेलीच असायची. कानडे सरांनाही सुरुवातीला आमच्या वर्गाने खूप त्रास दिला. पण आमच्या गोंधळाकडे लक्ष न देता, ते चिकाटीने आणि अक्षरशः जीव ओतून, जीवशास्त्र शिकवत राहिले!कानडे सरांच्या शिकवण्याच्या पद्धतीमुळे हळूहळू मला जीवशास्त्रातही गोडी निर्माण झाली. बारावीत गेल्यावर आमच्या लक्षात आले की, 'Cell' ची संकल्पना त्यांनी आम्हाला किती छान समजावून दिली होती. सेवानिवृत्तीनंतर, वयाच्या सत्तरीमध्ये, कानडे सर एल.एल.बी. झाले. वकिलीतले डावपेच शिकायला आणि कोर्ट केसेसवर चर्चा करायला ते माझ्या वडिलांकडे येऊ लागले. मी सोलापूरला माहेरी गेले की अजूनही त्यांची भेट होते. सत्तरीतले कानडे सर वकिली विषयातली मोठी-मोठी पुस्तके मन लावून वाचताना बघून, मला त्यांच्या अभ्यासू वृत्तीचे खूप कौतुक वाटते. ते भेटले की त्यांना मी आवर्जून त्यांच्या शिकवण्याबद्दल सांगते आणि त्यांचे आभार मानते. जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्यामुळे त्यांनाही खूप बरे वाटत असावे. 

आपल्या शाळेतल्या मराठीच्या शिक्षिका, आगरकर बाई आणि माझी चुलत आत्या, सौ. सुलभा पिशवीकर या दोघी अगदी घट्ट मैत्रिणी होत्या. त्यामुळे आगरकर बाईंचे आमच्या घरी खूप वर्षांपासून येणे-जाणे होते. आम्ही मुले त्यांना घरी 'पुष्पाआत्या' अश्या नावानेच हाक मारायचो. पण शाळेमध्ये आम्ही त्यांच्याशी सलगी दाखवलेली त्यांना मुळीच चालत नसे. आमचा आणि त्यांचा घरोबा आहे म्हणून आम्हा भावंडाना त्यांनी कधी झुकते माप दिलेले आठवत नाही. आगरकर बाईंचे केस खूपच लांब होते. त्यावेळी आम्हा मुलींच्या दृष्टीने तो एक कौतुकाचा विषय असायचा. बाई अतिशय शिस्तप्रिय होत्या आणि एक शिक्षिका म्हणून त्यांचे आचरण अगदी 'आदर्श' म्हणावे असेच होते. 

आमच्या आधीच्या बॅचपर्यंत, इयत्ता नववी-दहावीच्या मुलींना, गणवेशाच्या स्कर्ट-ब्लाऊज ऐवजी, निळी साडी नेसावी लागे. त्याचप्रमाणे, नववी-दहावीच्या मुलांनी फुलपँट घालावी असा नियम होता. तसे पाहता, चाळीस वर्षांपूर्वीच्या काळात, या नियमात गैर वाटण्यासारखे काहीच नव्हते. पण  मला आणि आमच्या तुकडीतील इतर मुलींना ते पसंत नव्हते. "आपण गणवेश म्हणून साडी नेसायची नाही" अश्या निर्धाराने, आम्ही काही समविचारी मुलींनी याबाबत आवाज उठवायचे ठरवले. आमच्या या मागणीला अध्यापकबाई, आगरकर बाई आणि इतरही अनेक शिक्षक-शिक्षिकांचा विरोध होणार होता याची आम्हाला कल्पना होती. 

एके दिवशी, अध्यापक बाई रजेवर असताना, मुख्याध्यापक  श्री. ग य दीक्षित सरांना आम्ही चक्क जिन्यातच घेराव घातला! आम्ही शाळेत सायकलने येत-जात असल्याने साडी नेसणे आम्हाला कसे गैरसोयीचे आहे हे सांगितले. "तुम्ही मुले-मुली आता मोठी झालेला आहेत. पूर्ण अंगभर पोशाख असणे आवश्यक आहे", असे समजावण्याचा सरांनी प्रयत्न केला. परंतु, "साडी नेसल्यावर पोटाचा आणि पाठीचा काही भाग उघडा राहतो" असा प्रतिवाद आम्ही केला. शेवटी तोडगा म्हणून, साडीऐवजी पायघोळ परकर किंवा मॅक्सी वापरण्याची परवानगी आम्ही सरांकडून मिळवलीच! अशा रीतीने, १९७८ च्या बॅचच्या आमच्या तुकडीतील सर्व मुलींनी साडीऐवजी मॅक्सीच वापरली. गंमत म्हणजे, आमच्या बॅचच्या इतर तुकड्यांमधल्या मुलींना मात्र साडीच नेसावी लागली! अध्यापकबाईंच्या गैरहजेरीत आम्ही केलेल्या या आगाऊपणामुळे त्या आम्हाला खूप रागावल्या होत्या हे आठवते. आगरकर बाईंनी तर घरी येऊन माझी चांगली खरडपट्टी केली होती. परंतु पुढे त्यांनी तो राग कधीच मनात ठेवला नाही. आजदेखील कधीही फोन केला तरी आगरकर बाई अगदी आपुलकीने बोलतात हे विशेष!

आगरकर बाई, पुजारी बाई, लता कुलकर्णी बाई आणि तपस्वी सर हे चौघेही मराठी विषय फार छान शिकवायचे. विटकरबाई आणि अयाचित सर संस्कृत उत्तम शिकवायचे. शाळेत शिकलेली संस्कृत सुभाषिते आजही मला पाठ आहेत. खरे पाहता, आमची इंग्रजी मीडियमची आणि हुशार मुला-मुलींची तुकडी होती. पण काही कारणांमुळे, आम्ही दहावीच्या वर्गात येईपर्यंत, आम्हा सर्वांचाच इंग्रजी विषय खूपच कच्चा राहिला होता. सुदैवाने, दहावीत अध्यापक बाई आम्हाला इंग्रजी शिकवायला आल्या. आमच्या इंग्रजी भाषेची दुःखद स्थिती पहिल्या एक-दोन तासातच त्यांच्या लक्षात आली. त्यामुळे त्यांनी आमच्या वर्गासाठी इंग्रजीचा जादा तास घेणे सुरु केले. शाळा भरण्याआधी तासभर त्या आम्हाला शिकवायच्या. साधी-सोपी इंग्रजी वाक्यरचना कशी करायची ते अध्यापक बाईंनी छान समजावून दिले. आमचे इंग्रजी व्याकरणही पक्के झाले. मुख्य म्हणजे, इंग्रजी भाषेबद्दलची भीती निघून गेली. पुढील आयुष्यात याचा खूप उपयोग झाला. तसे पाहता, संस्कृतव्यतिरिक्त इतर भाषा विषयांत मला फारसा रस नव्हता. परंतु, शाळेत माझ्या नकळत, माझ्यावर भाषेचे संस्कार झाले असावेत. त्यामुळेच आज मी चार-पाच वेगवेगळ्या विषयांवर सातत्याने ब्लॉग लिहिते. शाळेमध्ये भाषा विषयांत फारशी गति नसलेल्या माझ्यासारख्या विद्यार्थिनीचे लेखन आवडल्यामुळे श्री. रानड्यांनी माझ्याशी संपर्क साधला, हे विशेष. 

कमालीच्या उत्साही काळे बाई, मिश्किल स्वभावाचे रंगनाथ जोशी आणि अबोल असे कोरवलीकर हे दोघेही चित्रकलेचे सर, अतिशय सज्जन वृत्तीचे सारोळकर सर, गायनशिक्षक पंचवाडकर सर, बोलघेवड्या पाळंदेबाई, सुस्वभावी सारोळकरबाई,  कडक शिस्तीचे खांबेटे सर आणि कांबळे सर , टी डी  कुलकर्णी सर, जेऊरकर सर, मोहोळकर सर, बेणारे बाई, निफाडकर बाई, ही यादी खूप मोठी आहे. शाळेतल्या काही थोड्याच शिक्षकांच्या आठवणी मी लिहिल्या असल्या तरी, अनेक शिक्षक-शिक्षिकांना माझ्या मनात मानाचे स्थान आहे. या सर्व गुरूंमुळे आम्ही घडलो. या लेखाच्या रूपाने त्या सर्व गुरूंना मी वंदन करते.  
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा