सोमवार, ३ मे, २०२१

अरे तू असा न भेटता कसा गेलास?

सुरेश राठोड या नावाचा कोणी मुलगा, दहावीला आमच्या शाळेत, माझ्या बॅचमध्ये होता, हे मला माहिती असण्याचे त्यावेळी किंवा नंतरही काही कारण नव्हते. पुढे आमच्या दहावीच्या बॅचचा, म्हणजे शाळेतल्या सर्व तुकड्यांचा मिळून एक व्हॉट्सऍप ग्रुप तयार झाला आणि हा सुरेश राठोड आमच्या बरोबर होता असे कळले. 

मागच्या किंवा कदाचित त्याच्याही आधीच्या वर्षी, काहीतरी क्षुल्लक कारणाने राठोड ग्रुप सोडून गेला असल्याचे मला समजले होते. त्यावेळी, मी स्वतःहून त्याला फोन करून, तसे न करण्याचा सल्ला दिला होता. त्यावेळेस प्रथमच आमच्यात संभाषण झाले. तो आधी जरा बुजला होता, पण नंतर मोकळ्या गप्पा झाल्या. त्यानंतरच्या काळात, कधी वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस आणि सणासुदीला, व्हॉट्सऍपवर शुभेच्छांची देवाण घेवाण होत राहिली. या वर्षी, ३० जानेवारीला माझ्या मित्रमैत्रिणींना मी घरी चहाला बोलावले होते. मात्र, तो येऊ शकणार नसल्याचे त्याने मला फोनवर कळवले होते. "पुढे पुण्याला आलो की निश्चित भेटेन" असेही तो त्यावेळी म्हणाला होता. 

सुरेश राठोड कोव्हीड पॉझिटिव्ह झाल्याचे निदान त्याने स्वतःच मला ११ एप्रिलला कळवले. त्याचे सगळे रिपोर्ट्सदेखील त्याने पाठवले. त्याला अगदी सौम्य लक्षणे दिसत होती व रिपोर्टससुद्धा नॉर्मल होते. म्हणून, तो घरीच विलगीकरणात होता. पुढे एक-दोन दिवस त्याच्या तब्येतीची विचारपूस मी व्हॉट्सऍपवर करत होते. त्याला काहीच त्रास जाणवत नव्हता. त्यामुळे मग, "तुला काही वैद्यकीय मदत हवी असेल तर कधीही मला फोन कर" इतकेच आश्वासन देऊन मी  पुढे काही चौकशी केली नाही. 

१७ एप्रिलला सकाळी अचानकच, घाबऱ्या-घुबऱ्या आवाजात त्याचा फोन मला आला. त्याचा खोकला वाढला होता. मी त्याला त्वरित त्याच्या नेहमीच्या डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला दिला. "डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाच तर त्वरित ऍडमिट हो, घाबरू नकोस" असा धीरही मी त्याला दिला. त्याप्रमाणे तो डॉक्टरांकडे गेलाही. डॉक्टरांनी गोळ्या बदलून दिल्याचे त्याने सांगितले. १९ एप्रिलला मी पुन्हा त्याच्या तब्येतीची चौकशी व्हॉट्सऍपवर केली. तो बरा आहे असे त्याने मला २० एप्रिलला कळवले होते. 

आज अचानक तो गेल्याची बातमी माझ्या जीवाला फार चुटपुट लावून गेली. 

मी डॉक्टर असल्याने, मित्र-मैत्रिणींना आणि आप्तांना जमेल ती वैद्यकीय मदत करत असते. पण, राठोडच्या बाबतीत, 'मी कुठे कमी तर पडले नाही ना? त्याची तब्येत पूर्ववत झाली आहे की नाही हे मी पुन्हा विचारायला पाहिजे होते का?', असे मला सारखे वाटते आहे. 

मैत्रीच्या नात्याने त्याला जाबही विचारावासा  वाटतो, "अरे, तू निश्चित भेटतो म्हणाला होतास ना? मग असा न भेटता कसा गेलास?"

आता मात्र तो प्रश्न अनुत्तरितच राहणार. 

कै. सुरेश राठोड यास भावपूर्ण श्रद्धांजली.  

७ टिप्पण्या:

  1. स्वाती रडवलस माझातर 1 ली पासुन मित्र सुरवातीचा बराच काळ आम्ही शेजारी बसत होतो

    उत्तर द्याहटवा
  2. रडवले ग बाई तू सुरेश व मी शाळेत 1 च सायकल वर येत होतो तो लष्कर मधून माझ्याकडे येत होता मग आम्ही मिळून शाळेत येत असू .भावपूर्ण श्रद्धांजली.💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

    उत्तर द्याहटवा
  3. रडवले ग बाई तू सुरेश व मी शाळेत 1 च सायकल वर येत होतो तो लष्कर मधून माझ्याकडे येत होता मग आम्ही मिळून शाळेत येत असू .भावपूर्ण श्रद्धांजली.💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

    उत्तर द्याहटवा
  4. आजची सकाळची शॉकिंग न्यूज होती माझ्या साठी

    उत्तर द्याहटवा
  5. खरोखर असच अचानक घडत.आणि चुटपुट लाऊन जात.
    भावपूर्ण श्रद्धांजली

    उत्तर द्याहटवा