सोमवार, ३ ऑक्टोबर, २०१६

'बुचाची फुले'
बऱ्याच दिवसांनी कालचा रविवार अगदी निवांत गेला. आरामात उठले, सगळी वर्तमानपत्रे वाचली, नाष्टा आणि सकाळचा स्वयंपाक हे सगळंच उशिरा केलं. संपूर्ण दिवसभर कोणी पेशन्ट बघावे लागले नाहीत किंवा कोणी फोन करून त्रासही दिला नाही. संध्याकाळी विवेकच्या, म्हणजे माझ्या बालमित्राच्या कॅफेला भेट देऊन छान जेवलो आणि रात्री अकराच्या पुढेच घरी परतलो. घरी आल्या-आल्याच Whatsapp वरच्या कुठल्यातरी ग्रुपवरून बारामुल्लामध्ये अतिरेकी हल्ल्याची बातमी आली आणि मनात उगीचच एक ताण सुरु झाला. मग ती बातमी इतर ग्रुपसवर पाठवणं, त्यावर चर्चा करणं, वेगवेगळ्या चॅनेल्सवर त्या बातम्या बघणं असं करता करता बराच काळ गेला, त्यातून मनावरचा ताण थोडा वाढतच गेला आणि रात्री एकच्या पुढेच झोप आली. अर्थातच त्यामुळे आज, माझ्या नेहमीच्या वेळेपेक्षा बरीच उशिरा, साडेसहाला जाग आली. 


आज सोमवार, आधीच उठायला उशीर झालेला, आता फिरायला जावं की न जावं, दिवस धावपळीत जाणार आणि व्यायामाला वेळच मिळणार नाही, या विचारांनी पुन्हा मनावर ताण आला. तरी पण निग्रह करून रोजच्याप्रमाणे थोडावेळ का होईना, फिरून यायचंच असे ठरवले आणि घराबाहेर पडले. बाहेर पडल्या पडल्या एक मंद, परिचित वास आला आणि मन प्रसन्न झाले. आमच्या सोसायटीतून बाहेर जाण्याच्या मार्गावरच एक बुचाचे झाड आहे. ते झाड आता डवरलंय आणि झाडाखाली पांढऱ्या फुलांचा सडा पडायला सुरुवात झालीय हे जाणवलं. पुढे माझ्या नेहमीच्या फेरफटक्याच्या मार्गावरही, फुलांनी बहरलेली अशीच अनेक झाडे लागली आणि पुन्हा त्या फुलांचा तोच मंद सुवास आला . 

पुण्याच्या आर्मी कॅन्टोन्मेंटमध्ये, माझ्या रोजच्या फिरण्याच्या रस्त्यावर ठिकठिकाणी बुचाची झाडे आहेत. त्यांचे अस्तित्व इतर ऋतुंमध्ये मला जाणवतही नाही. सैन्यदलाच्या गणवेशाशी साधर्म्य असलेल्या या झाडाच्या, काळपट हिरव्या पानांमुळे, सैनिकांच्या शिस्तीत उभी असलेली ती झाडे, तिथे आहेत हे मला जाणवतच नसावे कदाचित. पण इतर ऋतूंमध्ये लक्षांत न येणारी तीच बुचाची झाडं, या दिवसांत माझ्या नजरेत भरतात ती केवळ गडद हिरव्यागार रंगाच्या झाडावर फुलणाऱ्या आणि उठून दिसणाऱ्या पांढऱ्या फुलांमुळे. पावसाच्या पाण्यामुळे या झाडांच्या पानावरची धूळ धुतली जाऊन आधीच त्यावर एक तरारी आलेली असते. त्यामुळे या चकचकीत हिरव्या रंगावर फुललेली ही नाजूक फुले बघितली की, हिरव्यागार रंगाच्या साडीवर कुणी पांढऱ्या धाग्याने, नाजूक असा कर्नाटकी कशिदाच काढलाय, असे मला वाटते. 

बुचाची फुले पाहिली की मनात जपलेल्या बालपणीच्या आठवणी उचंबळून येतात. लहानपणी मोठ्या टोपलीत किंवा परकर किंवा झग्ग्याच्या सोग्यामध्ये ती फुले आम्ही उचलायचो आणि मग आमची खूप मजा चालायची. ताज्या फुलांना एकमेकात गुंफून, आम्ही मुली छान वेणी करायचो, किंवा मोठा हारही करायचो. पिस्ता रंगांची देठं गुंफून केलेली, पांढऱ्या फुलांची आणि ती वेणी अतिशय नाजूक दिसायची. त्या फुलांबरोबर आमचे काही जरा विध्वंसक खेळही चालायचे. काहीवेळा आम्ही त्या नाजूक फुलांचे जरा जास्तच हाल  करत असू.  फुलाची पाकळी वेगळी करून, चिमटीत पकडून तिचे दोन पदर आधी दूर करायचो. मग तोंडाने हलकेच हवा त्यात सोडली की त्या पाकळीचा एक छोटासा,  पांढरा फुगा तयार व्हायचा.  तो फुगा आपल्या स्वतःच्या किंवा समोरच्याच्या कपाळावर फोडायचा. तो फुगा फुगला आणि चांगला मोठा आवाज करून फुटला की अगदी मस्त वाटायचं. कधीकधी कोण कमीत कमी वेळात जास्तीत जास्त फुगे फुलवतंय आणि फोडतंय याची स्पर्धा चालायची. तर कधी वरच्या पाकळ्या तोडून केवळ खालचे दांडे बाण म्हणून एकमेकांना मारायचो.


ताज्या बुचाच्या फुलांचा दांडा एका ठराविक अंतरावर खुडून, मागच्या बाजूने तो दांडा फुंकला की छान पिपाणी वाजते. उचललेल्या फुलांच्या पिपाण्या तयार करणे आणि दोन ओठांच्यामध्ये एकाचवेळी चार-पाच पिपाण्या घेऊन जोरजोरात वाजवत बसणं हा एक खेळ असायचा. दोन-तीन भावंडांनी किंवा मैत्रिणींनी एकाच वेळी मोजून सारखी फुले घ्यायची आणि मग कोण जास्त पिपाण्या तयार करतंय ते बघायचं, अशीही स्पर्धा चालायची.  कधी कधी हे असले खेळ आम्ही गटागटाने खेळायचो. बालपणीचे हे अगदी छोटे-छोटे आणि बिन खर्चाचे खेळ आम्हाला किती आनंद देऊन जायचे याची कल्पना आजच्या पिढीतल्या, महागड्या गेम्समध्ये रमणाऱ्या मुलांना येऊच शकणार नाही!

आज सकाळी, फिरायला निघताना जाणवत असलेला मनावरचा ताण, बुचाच्या फुलांचा वास श्वासात भरून घेतल्या-घेतल्या कमी झाला. या फुलांशी निगडित असलेल्या बालपणीच्या सुखद आठवणी कोंडून राहिलेल्या, मनाच्या कुपीचे बूच, आपसूक निघाले आणि मन अगदी हलके झाले. परत येताना, दोन्ही हात भरून फुले उचलून आणली. काही फुलांच्या पाकळ्यांचे फुगे करून फोडले आणि दोन चार फुलांच्या पिपाण्या करून आनंदच्या  कानाशी नेऊन वाजवल्या आणि येत्या आठवड्याचे काम करायला सज्ज झाले!    


१२ टिप्पण्या:

 1. खूपच छान लिहिले आहे, कमालीच्या सहजतेने आणि ओघवत्या भाषेत .

  उत्तर द्याहटवा
 2. Beautiful article.This flower is my favorite and we have many trees in our TMV colony.This article reminded me of one article written by Dr. R. S. Khatavkar m long back in Rotary Magazine.

  उत्तर द्याहटवा
 3. प्रत्युत्तरे
  1. मनाच्या कुपीचे बूच उघडणारे व आठवणी दरवळवणारे......म्हणूनच याचे नाव बूच असावे.

   हटवा