बुधवार, ११ मार्च, २०२०

विटाळशीची खोली!

माझ्या माहेरचे घर म्हणजे शंभरी गाठायला आलेला भला मोठा वाडा आहे. सोलापुरात मध्यवर्ती भागातल्या नवीपेठेच्या मुख्य रस्त्याच्या आतल्या एका बोळात वाड्याचा पुढचा दरवाजा उघडतो. तर वाड्याचा मागचा दरवाजा भागवत टॉकीजकडून शिंदे चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या एका बोळात उघडतो. वाड्याच्या मागच्या बाजूला साधारण बारा-पंधरा फूट उंचीची संरक्षक भिंत आहे. त्या जाडजूड भिंतीतच वाड्याचे मागचे दार आहे. त्या दारातून येऊन प्रशस्त अंगण  पार करून आपण आलो की वाड्यातल्या राहत्या खोल्या आहेत. वाड्याच्या पुढच्या बाजूला असलेल्या एका खिडकीतून नवीपेठेतल्या मुख्य रस्त्यावरची, आणि मागच्या दारात उभे राहिले की मागच्या रस्त्यावरची रहदारी दिसते. तरीही त्या रस्त्यांवरच्या गजबटाचा त्रास, वाड्यात जाणवत नाही. तसेच वाड्यात आत काय चालले आहे, हे  बाहेरून  कोणालाही समजत नाही.

माझ्या पणजोबांनी १९२५ साली हा वाडा, चुना-मातीने बांधून घेतला होता. त्यानंतर १९७४-७५ साली, पूर्वीचे बांधकाम जुने झाले असल्याने माझ्या वडिलांनी वाड्याच्या मधला बराचसा भाग पाडून तिथे सिमेंट-काँक्रीटचे पक्के बांधकाम करून घेतले. वाड्याच्या दर्शनी भागात, माझ्या पणजोबांच्या काळापासून वापरात असलेली, एक मोठे आणि एक लहान, अशी दोन ऑफिसेस आणि त्यावरची माडी आहे. पणजोबांनी १९२५ साली बांधलेल्या वाड्याचा हा भाग, वाड्याचे नूतनीकरण करताना, न पाडता तसाच ठेवला आहे. वाड्याच्या मागच्या अंगणात उघडणाऱ्या तीन खोल्या आणि त्यावरची माडी, हा भाग माझ्या पणजोबांनी १९२८ साली बांधून घेतला होता. तो जुना भागदेखील आज तसाच आहे. त्या तीन खोल्यांमधली एका कडेची अंधारी खोली, ही 'बाळंतिणीची खोली' आहे. त्या खोलीबद्दल पुन्हा कधीतरी लिहीन. पण सांगायचं मुद्दा असा की सध्या अस्तित्वात असलेला वाडा म्हणजे, बाहेरून जुना आणि आत मात्र जुन्या आणि नव्या बांधकामाचा सुंदर मिलाफ असलेला, असा आहे.

वाड्याच्या मागच्या बाजूला असलेल्या भिंतीलगतच्या एका कोपऱ्यात पूर्वी एक 'विटाळशीची खोली' होती. त्या  खोलीत आतल्या बाजूला एक मोरी होती आणि खोलीत जायला मागच्या अंगणात उघडणारा दरवाजा होता. तीन बाजूंनी उंच भिंती असलेली ती अरुंद, लांबुळकी खोली, लहानपणी मला एखाद्या खोल गुहेसारखी वाटायची. ती खोली म्हणजे आम्हा भावंडांसाठी मोठाच कुतुहलाचा आणि रागाचाही विषय होता. अधून-मधून आई-काकू किंवा पाहुण्या आलेल्या कोणी आत्या-माम्यांना सुध्दा, तीन-चार दिवस शिक्षा मिळाल्यासारखे तिथे का बसावे लागते? याबाबत एकीकडे कमालीचे कुतूहल होते, तर दुसरीकडे, त्या चार दिवसांत आईजवळ जाता येत नाही, याबद्दलचा राग असायचा. आमचं सगळं घर आजीच्या धाकात असायचे. विटाळशीच्या खोलीतल्या बाईजवळ कोणीही जायचे नाही, हा आजीने घालून दिलेला अलिखित नियम होता. तिथे फक्त बायकांना आणि कधीकधीच का बसावे लागते? इतरवेळी कोणालाच त्या खोलीत का जाता येत नाही? असे अनेक प्रश्न मनांत असायचे. पण त्याबाबत कोणालाही काही विचारायची सोय नव्हती. आईला विचारले, तर "तू लहान आहेस, तुला नाही कळायचे, कावळा शिवला की तिकडे बसावे लागते किंवा अगोचरपणा करू नकोस, आजीने सांगितलेले ऐकायचे, उगीच भलते प्रश्न विचारायचे नाहीत," असली उडवाउडवीची उत्तरे मिळायची. आमच्यापैकी कुणीही,  विटाळशीच्या खोलीबद्दलचे प्रश्न फारच लावून धरले, तर पाठीत एक चांगला सणसणीत रट्टा मिळायचा, पण समाधानकारक उत्तर कधीच मिळायचे नाही. जुन्या वाड्याचे नूतनीकरण  करताना, म्हणजे साधारण १९७५-७६ साली ती खोली पाडल्यामुळे वाड्यातून कायमची गायब झाली.

आई किंवा काकू त्या खोलीत गेल्या की आजी त्यांना धान्य निवडणे, भुईमूगाच्या शेंगा फोडणे, किंवा भाजी निवडणे अशी ठराविक कामे द्यायची. तिथे बसलेल्या बाईला जेवणाचे ताट वाढून दिले जायचे. तिच्यासाठी वेगळे तांब्या-भांडे ठेवलेले असायचे. त्या बाईला तिथे आतच असलेल्या मोरीमध्ये अंघोळ करावी लागे, स्वतःचे कपडेही तेथेच धुवावे लागत आणि तिथेच झोपायला लागायचे. इतर वेळी आई स्वयंपाकघरांत सतत कामं करत उभी असायची. त्यामुळे  आमच्याशी गप्पा-गोष्टी करायला, तिला कधी वेळच नसायचा. त्या चार दिवसांत, आई त्या विटाळशीच्या खोलीत निवांत बसलेली बघून तिच्याजवळ जावे, तिच्याशी गप्पा माराव्यात, असे वाटायचे.  तिला बिचारीला आजीने शिक्षा केली आहे किंवा तिच्यावर अन्याय होतो आहे, असे वाटून कधीकधी तिची कीव यायची. कोणीही लहान मूल चुकून जरी त्या  विटाळशीच्या खोलीतल्या बाईकडे गेले, किंवा तिला शिवले, तर त्या भावंडाला आजी लांबूनच पाणी टाकून अंघोळ करायला लावून मगच घरात घ्यायची. चौथ्या दिवशी, आजी मोलकारीणीला सांगून विटाळशीच्या अंगावर, लांबूनच पाणी टाकायची, विटाळशीला डोक्यावरून अंघोळ करायला लावयाची. अशारितीने तिचे शुद्धीकारण झाले, की तिला घरात प्रवेश मिळायचा. आई घरात आली की मला अगदी हुश्श व्हायचे.

जसजशी मी मोठी व्हायला लागले तसतसे हळूहळू आपोआपच त्या खोलीबाबतचे गूढ उलगडायला लागले. आमच्या गल्लीत राहणाऱ्या काही मुली वयात आल्यामुळे, त्यांना मखरात बसवून ठेऊन, मोठे समारंभ व्हायला लागले. काही मैत्रिणी महिन्यातले तीन-चार दिवस अकारणच शाळा बुडवू लागल्या. आई-आत्या-काकू-मावशी-मोठ्या बहिणी किंवा शाळेतल्या काही मैत्रिणींकडून, दबक्या आवाजात मासिक पाळी बाबत थोडीफार माहिती मिळत गेली. आता आपल्यालाही कधीतरी त्या विटाळशीच्या खोलीत बसायला लागणार, या भीतीने मला ग्रासले. त्यामुळे प्रत्यक्षांत मासिक पाळी सुरु व्हायच्या आधीच, माझ्या मनाने बंड पुकारले. काय वाट्टेल ते होवो आपण त्या खोलीत बसायचे नाही, हे मी मनातल्या मनांत पक्के ठरवून टाकले. आणि मला पहिल्यांदाच पाळी येण्याचा, तो दिवस प्रत्यक्षांत उजाडला. आईला माझा निश्चय सांगितला. आईला माझी भूमिकापटत असली तरीही, माझ्या बंडखोरीला ती पाठींबा देऊ शकणार नाही , हे तिने मला स्पष्ट केले. मग मात्र त्या दिवशी, प्रथमच आजीच्या डोळ्याला डोळे भिडवून , मी काहीही झाले तरी  त्या खोलीत बसणार नाही हे निक्षून सांगून टाकले. आजी चिडली असावी , तीन-चार दिवस  बोलली नाही.  पण मग शेवटी, स्वयंपाकघरात आणि देवघरात यायचे नाही या अटींवर, माझा निर्णय तिने नाईलाजाने आणि नाराजीने स्वीकारला.

तुम्हाला असे वाटेल, मी आज हे इतके उघडपणे आणि सविस्तरपणे  लिहण्याचे कारणच  काय?

गेले चार-पाच दिवस माझे डोळे आलेले आहेत. नुकत्याच जीवघेण्या आजारातून बाहेर पडलेली, दोन्ही किडनीज निकामी झाल्यामुळे दर दोन-तीन दिवसाआड डायलिसिस लागणारी माझी वयोवृद्ध आई, सध्या आमच्याबरोबर राहते आहे . माझ्या संसर्गामुळे तिचे डोळे आले तर बिचारीचे अजूनच हाल होतील, या विचारानेच मीच  स्वतःला माझ्या खोलीत कोंडून घेतले आहे. इथे बसून, व्हाटसऍपवर चॅटिंग करता करता किंवा टीव्ही बघता बघता, भाजी निवडणे, लसूण सोलाणे, कपड्यांच्या घड्या घालणे, अशी काही फुटकळ घरकामे  मी सध्या करते आहे. मला इथे आयते ताटं वाढून आणून दिले जाते आहे. या सर्व गोष्टींमुळे मला माझ्या माहेरच्या वाड्यातल्या त्या विटाळशीच्या खोलीची, आई-काकूंच्या त्या दिवसांची आणि मी पुकारलेल्या त्या बंडाची तीव्रतेने आठवण झाली. गम्मत म्हणजे,  योगायोगाने नेमके कालच माझ्या एका मैत्रिणीने, एका तात्विक मुद्द्यावर माझे मत विचारण्यासाठी व्हॅट्सऍपवर एक चॅट पाठवले.

" माझ्या ओळखीतल्या एका मुलीचे लग्न जवळजवळ ठरत आले आहे. स्थळ उत्तम आहे. दोन्ही बाजूने पसंती आहे. पण सासरचे म्हणताहेत की लग्नानंतर मुलीच्या मासिक पाळीच्या काळांत ते तिला स्वयंपाकघरात येऊ देणार नाहीत  आणि  दवपूजाही करू देणार नाहीत. थोड्यावेळासाठी तू असे समज की, तुझ्या मुलीच्या बाबतीत मुला कडच्यांनी अशी अट घातली असती आणि पुढे जायचे की नाही, या बाबतीतला निर्णय सर्वस्वी तुझ्या हातात असता, तर तू काय केले असतेस?"

मी निश्चितच स्पष्टपणे नकार कळवून टाकला असता, असे माझे मत मी मैत्रणीला मी क्षणार्धांत कळवून टाकले. अर्थात लग्नाच्या मुलीला या अटी मान्य आहेत की नाहीत या गोष्टीला मी जास्त महत्व दिले असते, हेही मी तिला लिहले.त्याउपर, आपल्या दोघींच्याही मुलींची लग्नें झालेली असताना ही चर्चा उगीचच  कशासाठी करत बसायची? असे विचारून, तिला चार स्मायली पाठवून, तो विषय तिथेच संपवला. पण प्रत्यक्षांत, इतक्या वर्षांनंतरही विटाळशीच्या खोलीची खोली, अजूनही तशीच आहे , या जाणिवेने माझे मन मात्र  खिन्न झाले.
   

१४ टिप्पण्या:

  1. एका असामाजिक व चुकीच्या प्रथेकडे केलेला अत्यंत योग्य लक्षवेध .

    उत्तर द्याहटवा
  2. धन्यवाद!

    आजही ही प्रथा चालू आहे हे आपले दुर्दैव आहे.

    उत्तर द्याहटवा
  3. स्वाती , छान! सहज सुंदर आणि कसदार लिहिलंयस्.

    उत्तर द्याहटवा
  4. त्या काळात प्रथे विरुद्ध बंड पुकारने इतके सहज नक्कीच नसणार. धाडसाचे कौतुक कमीच आहे..👍

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. मला ते खूप अवघड वाटले होते. पण गंमत म्हणजे, माझ्या आईच्या एका मैत्रिणीने तिच्या लहानपणी, म्हणजे साधारण १९४७-४८ च्या सुमारास तिच्या घरीही असेच बंड पुकारले होते, हे माझी पोस्ट वाचून तिने मला सांगितले. ते मला खूपच कौतुकास्पद वाटले.

      हटवा
  5. मी आपल्याशी नक्कीच सहमत आहे
    पण आपण थोड्या वेळ त्या काळचा विचार केला तर
    1)त्या काळात एकत्र कुटुंब पद्धती होती घरात माणसं खूप असायची घरातल्या बायकांना कामें ही खूप असायची
    त्यामुळे एक तर तीन चार दिवस एखादीला आराम तरी मिळायचा
    जो खरंच या दिवसात आवश्यक असायचा
    आजकाल आपल्याला छोट्या कुटुंबात कधी त्रास होत असेल तर आपण आराम करू शकतो तेव्हा ते तितके सोपे होत नसेल कदाचित
    2)hygiene च्या दृष्टीने त्या काळात disposable उपलब्ध नव्हत्या त्या मुळे एकत्र कुटुंब पद्धतीत अनेक अडचणी येत असतील नाही का
    हा त्याचा विटाळ किंवा अस्पृश्य असा अतिरेक होत असावा जो चुकीचा आहेच पण पुव्री प्रत्येक गोष्टीला जरा देवाधर्मा चा धाक दाखवत असत पण असो कदाचित फार शास्त्रीय विचार केला जात नसेल कदाचित शिक्षणाचा अभाव असल्याने

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. माझ्या लहानपणी आमच्या घरी कसे वातावरण होते याचे मला जसे आठवतेय तसे वर्णन केले आहे.त्या काळात जे होते ते बरोबर होते का चूक होते, यावर मला फारसे बोलायचेच नाही. ज्या गोष्टी मला पाटल्या नाहीत, त्याचा मी विरोध केला इतकेच.



      आजही कोणी काही पळत असेल तर तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.

      हटवा
  6. आपल्या माहेरच्या विचारात किती रमतेस वाचून छान वाटते
    छान लिहितेस आवडले

    उत्तर द्याहटवा