आजच्या इंडियन एक्स्प्रेस मध्ये पहिल्या पानावरच आलेली एक बातमी वाचून मनात विचारचक्र चालू झाले.
पुण्यातील वीस-बावीस महिला, त्यांच्या मुला-बाळांना घेऊन, मोराची चिंचोळी गावाला सहलीसाठी गेल्या होत्या. चालत्या बसमध्ये, चालकाला अचानकच अस्वस्थ वाटू लागले, त्याला फिट आली आणि तो खाली कोसळला. त्याचे हातपाय वाकडे झाले होते आणि त्याच्या तोंडातून विचित्र आवाज निघत होता. अशावेळी त्या बसमध्ये प्रवास करणाऱ्या महिला व लहान मुले पार घाबरून गेली आणि प्रचंड आरडाओरडा व रडारडी चालू झाली. पण या महिलांमध्ये योगिता सातव नावाची एक धीरोदात्त महिला होती. योगिताताईंनी मिनीबसच्या स्टियरिंगचा ताबा घेतला आणि त्यांनी ती बस चालवत, त्या चालकाला लवकरात लवकर शिक्रापूरच्या रुग्णालयात पोंहोचवले. योगिता सातव याना चारचाकी गाडी चालवता येत होती. पण ऐनवेळी मिनीबस चालवण्यास त्या घाबरल्या नाहीत आणि सर्व प्रवाशाना सुखरूप घरी आणले, हे विशेष. ही बातमी वाचल्यानंतर मी यू-ट्यूबवरची योगिता सातव यांची मुलाखत ऐकली आणि कौतुकाने माझा ऊर भरून आला. प्रत्येक स्त्रीला दुचाकी व चारचाकी येणे किती आवश्यक आहे हे पुन्हा जाणवले.
खरंतर मागच्याच महिन्यात महिला चालकांबाबत काहीतरी छानसा लेख लिहावा असा प्रसंग आला होता. पण एखादा विचार कृतीत आणण्याबाबत आपण चालढकल करत राहतो. तसेच काहीसे माझे झाले. मागच्या महिन्यात आम्ही अमृतसरला जाणार होतो. त्यावेळी पुणे विमानतळावर जाण्यासाठी मी माझ्या मोबाईलमधून उबर टॅक्सी मागवली. चालक कुठे पोहोचला आहे हे फोनमध्ये मी बघत असताना मला समजले की त्या टॅक्सीची चालक एक महिला आहे. मी, आनंद आणि माझे वडील महिला चालक असलेल्या टॅक्सीमध्ये प्रथमच बसणार होतो. हा अनुभव कसा असेल? याचे मला कमालीचे कुतूहल वाटले होते. थोड्यच वेळात ती महिला, अगदी सफाईने टॅक्सी चालवत आमच्याजवळ पोहोचली. अर्थातच त्या बाईंशी गप्पा मारण्याचा मोह आवरला नाही.
अगदीनम्रपणे आणि मृदू आवाजात बोलणाऱ्या, साधे पण स्वच्छ कपडे परिधान केलेल्या व चेहऱ्यावर अगदी सात्विक भाव असलेल्या त्या चाळिशीच्या महिला चालक बाईंचे नाव होते 'सौ. सुनीता काळे'. सुनीताला लहानपणापासूनच कार चालवायची इच्छा असल्याने, तिच्या तरुणपणातच, कदाचित माहेरीच ती कार चालवायला शिकली होती. मुले मोठी झाल्यावर नुसते घरी बसून काय करायचे? या विचाराने तिने आपली ती आवड अर्थार्जनासाठी वापरायचे असे ठरवले. मारुती सेलेरिओ ही गाडी तिने कर्ज काढून विकत घेतली. प्रथमतः काही दिवस तिने तिची टॅक्सी कंपन्यांच्या नोकरदारांसाठी चालवली. नंतर उबरने महिला चालक घ्यायला सुरु केल्यावर, ती उबरसाठी तिची टॅक्सी चालवू लागली.
सुनिताकडून काही गमतीदार किस्सेही ऐकायला मिळाले. स्त्री चालक आहे हे बघितल्यावर काही पुरुष प्रवासी कसे साशंक होतात, हे तिने सांगितले. काहीजण ट्रिपच रद्द करून टाकतात. एका पुरुष प्रवाशाने, टॅक्सीत बसल्यावर तिला, "'तुला येईल ना? का मी चालवू गाडी?" असेही विचारले होते, हे सुनीताने आम्हाला हसत-हसत सांगितले.
सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुनीता उबरसाठी टॅक्सी चालवते. सकाळी दहाच्या आधी दोन-तीन महिलांना चारचाकी चालवायला शिकवते. 'आत्मनिर्भर' सुनीताने स्वकमाईतून टॅक्सीसाठी घेतलेले कर्ज तर फेडत आणले आहेच. शिवाय कर्जाचा हप्ता गेल्यानंतरही महिना चाळीस-पन्नास हजार शिलकी पडत आहेत. लॉकडाऊनच्या काळात या कमाईमुळे, त्यांच्या कुटुंबाला आर्थिक चणचण भासली नाही हे विशेष. सुनीताने तिच्या तरुण मुलीलाही गाडी शिकवली आहे. सुनीताचे पती चारचाकी चालवत नसल्याने, कौटुंबिक सहलींसाठी कुठेही बाहेरगावी गेले तरी गाडी सुनीताच चालवते. सुनीता सोलापूर जिल्ह्याची माहेरवाशीण आहे हे कळल्यावर, मनाने अजूनही 'सोलापूरकरच' असलेल्या आम्हा तिघांनाही खूपचआनंद वाटला.
अमृतसरहून पुण्याला परतताना आमचे विमान चालवणारी मुख्य वैमानिक एक महिला आहे हे कळल्यावर, मला महिलांच्या क्षमतेबद्दल कमालीचा अभिमान वाटला होता. अशावेळी काही पुरुष प्रवाशांना,' ही बाई कितपत सक्षम असेल? असे निश्चित वाटले असेल. पण ,"बाई तू उठ आणि तुझ्याऐवजी मी विमान उडवतो" असे सांगायला ते स्वतः सक्षम नसल्याने, संपूर्ण प्रवासात जीव मुठीत धरून बसले असतील अशी कल्पना करून मी मनोमन हसले होते. आज प्रवासी विमाने चालवणाऱ्या कितीतरी महिला वैमानिक आहेत. त्यांशिवाय अनेक महिला सशस्त्र सेनादलातली मालवाहू आणि लढाऊ विमानेही चालवत आहेत, हे विशेष.
योगिता सातव यांना त्यांच्या वडिलांनी आणि काकांनी गाडी चालवायला शिकवली होती. त्यांच्या मुलाखतीत, त्यांनी आपल्या वडील आणि काकांच्या प्रति आभार व्यक्त केलेले ऐकून माझे मन पंचेचाळीस वर्षे मागे गेले. १९८५-८६ साली मी विशीतली तरुणी होते. नुकतीच डॉक्टर झाले होते. त्यावेळी माझ्या वडिलांनी नवीनच बाजारात आलेली मारुती-८०० ही गाडी विकत घेतली होती. माझ्या हातात त्या नव्या कोऱ्या गाडीचे चक्र देऊन मला त्यांनी ती गाडी शिकवली. पण जवळजवळ पाठोपाठच माझे लग्न झाले. पुढे मला दोन मुले झाली, मुले लहान असतानाच मी माझे एम डी पूर्ण केले. याकाळात आमच्याकडे फक्त एक दुचाकी होती. त्यामुळे गाडी शिकले असले तरीही मला गाडी चालवायचा सराव करायला मिळाला नव्हता.
पुढे १९९३ साली आम्ही नवीकोरी मारुती व्हॅन विकत घेतली. प्रत्यक्षांत ती व्हॅन घरी आली तेव्हा पेढे घेऊन मी शेजारणीकडे गेले. तिने मला विचारले,
"तुला चारचाकी चालवायला येते का गं ?"
"हो. येते ना. मला वडिलांनी गाडी शिकवलेली आहे. पण गेल्या चार-पाच वर्षांत सराव राहिलेला नाही. आता आमची नवीन मारुती व्हॅन आली आहे ती चालवेन" असे उत्साहाने मी तिला सांगितले.
तिने मला हलक्या आवाजात, एक 'मौलिक' सल्ला दिला, "हे बघ, शहाणी असशील तर गाडी चालवायला लागू नकोस. ही नवरेमंडळी फार चतुर असतात. एकदा का तू गाडी चालवते आहेस हे तुझ्या नवऱ्याला कळले की सगळी बाहेरची कामे तो तुझ्यावर टाकायला सुरु करेल. घरकाम तर आपल्या पाचवीला पुजलेले आहे. ते काही कधी सुटणार नाही. वर बाहेरची सगळी कामेही तुझ्याच गळ्यात पडतील. "
त्यावेळी तिचा तो विचार मला पटला नाही आणि आजही पटत नाही. गेली कित्येक वर्षे मी गाडी चालवते आहे. १९९५ साली पुण्यात राहायला आल्यानंतर माझे सगळे आयुष्यच गाडीच्या चाकावर चालत असल्यासारखे मला वाटते आहे. पण मला चारचाकी चालवायला येत असल्यामुळे, कित्येकदा मी अनेक अत्यवस्थ नवजात बालकांना, त्यांच्या पालकांसह माझ्या गाडीत घालून वेळच्यावेळी नवजात अतिदक्षता विभागात पोहोचवून त्यांचे प्राण वाचवलेले आहेत. मला आणि आनंदला कोविड झाला होता. मी आजारी असतानासुद्धा आनंदला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याचे आणि त्याला डिस्चार्ज मिळाल्यावर त्याला घरी घेऊन येण्याचे काम मी केले, या गोष्टीचा मला अभिमान आहे. प्रत्येक स्त्रीला दुचाकी आणि चारचाकी यायलाच हवी असे माझे मत आहे.
योगिता सातव यांच्या समयसूचकतेसाठी आणि त्यांनी दाखवलेल्या धैर्यासाठी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. सुनीता काळे आणि तिच्यासारख्या अनेक 'चक्रधर' महिला चालकांनाही माझा सलाम!
एकदा मी अमेरिकेला गेलेले असताना मला अशाच एका महिला चालकाचा आलेला अनुभव मी पुन्हा कधीतरी सांगेन...
सुंदर अनुभव.
ReplyDeleteधन्यवाद सर!
ReplyDeleteछान अनुभव
ReplyDeleteखुप खुप हर्षदायी लेख.
धन्यवाद!
Deleteअनुभवांचे छान कथन केले आहे.
Deleteनेहमीप्रमाणेच खूप छान लिहिलं आहे! अमेरिकेत आम्ही एनसिनीटास ते एलए उबर ने गेलो होतो तेंव्हा आम्हाला एक स्त्री उबर चालक आजीबाई भेटल्या होत्या त्याची आठवण झाली. त्या PhD होत्या पण व्यवसायातून retire झाल्यावर नवीन माणसांना भेटायची हौस म्हणून रोज काही तास उबर टॅक्सी चालवायच्या. त्या प्रवासात आम्ही दोघींनी खूप गप्पा मारल्या आणि त्यांच्या नातवंडांबद्दल गोष्टी सांगितल्या, त्यांचे फोटो सुध्दा दाखवले☺️
Deleteधन्यवाद!
Deleteखूप छान अनुभव
ReplyDeleteधन्यवाद!
Deleteतुझं कौतुक करावं तितकं थोडं. सहृदयी, संवेदनशील, समयसूचक, आणि कितीतरी सद्गुण असलेली तू, मैत्रीण आहेस ह्याचा सार्थ अभिमान वाटतो. लेखनशैलीबद्दल वेगळं लिहिण्याची
ReplyDeleteगरज नाही. ती वादातीत आहे.
😊😊😌😌
असाच स्नेह राहू दे!
ReplyDeleteछान लिहलेय.
ReplyDeleteआभारी आहे!
Deleteनेहमीप्रमाणे उत्तम
ReplyDelete🙏🙏
Deleteस्वाती नेहमी प्रमाणेच खूप छान लिहिलंय.पुढचा लेख येण्याची वाट पाहत आहे.👌👌👌
ReplyDeleteधन्यवाद सुलभा!
Deleteखूप छान लिहलंय तुम्ही आणि खूप प्रेरणादायी आहे,खूप खूप शुभेच्छा
ReplyDeleteधन्यवाद!
Delete