साधारण १० वर्षांपूर्वी, एका रविवारी पहाटे माझा अमेरिकास्थित भाऊ पुण्यात पोहोचला होता. त्या दुपारी अचानक त्याचे डोके भयंकर दुखू लागल्याने त्याला मी पुण्यातील एका सुप्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. त्याच्या स्कॅनचा रिपोर्ट नॉर्मल असल्याचे केसपेपरवर लिहून आले. पण सोमवारी तोच स्कॅन मुख्य डॉक्टरांनी पाहिल्यानंतर मेंदूमध्ये मोठा रक्तस्राव झालेला आहे असे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर सगळ्यांची एकच धावपळ सुरु झाली. अनेक तज्ज्ञ डॉक्टरांना बोलवून त्यांची मते घेण्यात आली. प्रत्येक डॉक्टरने एकेक नवनवीन औषध लिहिले. सुदैवाने माझा भाऊ त्या दुखण्यातून पूर्ण बरा झाला. सहा आठवड्यानंतर पुन्हा केलेला त्याचा स्कॅन नॉर्मल आला आणि मला हायसे वाटले. पण त्याला अनेक अनावश्यक औषधे सुरु आहेत, असे एक डॉक्टर म्हणून माझे मत होते. स्कॅन नॉर्मल आल्यामुळे ती औषधे आता बंद करावीत, असे त्याच्या डॉक्टरांना मी सुचवले. पण त्यांच्यापैकी कोणीच डॉक्टर औषधे बंद करण्याचा निर्णयही घेईनात आणि ती सुरु ठेवण्यासाठी सबळ कारणही सांगेनात. माझे समाधान न झाल्याने एक सेकंड ओपिनियन घ्यावे असे मला वाटले. तशा परिस्थितीत एकच व्यक्ती योग्य व ठाम निर्णय देऊ शकेल याची मला खात्री होती. ती व्यक्ती म्हणजे सोलापूरचे डॉक्टर शिरीष वळसंगकर सर! त्यामुळे मी भावाला घेऊन सोलापूरला गेले. शिरीषसरांशी चर्चा करून त्यांच्या सल्ल्याने सर्व औषधे बंद केली. त्यानंतर मी निश्चिन्त झाले आणि भावाला अमेरिकेला जाऊ दिले.
वळसंगकर कुटुंबियांचे आणि माझ्या सासर-माहेरच्या दोन्हीही कुटुंबियांचे अनेक वर्षे घनिष्ठ संबंध आहेत. शिरीषसर एक निष्णात डॉक्टर तर होतेच पण अतिशय उत्तम शिक्षकही होते. मी एमबीबीएस करत असताना शिरीषसरांनी मला मेडिसिन हा विषय शिकवला होता. त्यामुळे अर्थातच आमचे गुरु-शिष्याचे नाते होते. माझ्या काकांचे, म्हणजे सोलापूरच्या कै. डॉ. राम गोडबोले यांचे आम्ही दोघेही शिष्य असल्याने शिरीषसर माझे गुरुबंधुही होते. खूप वर्षांपूर्वी अगदी मित्रत्वाच्या नात्याने आम्ही एकत्र ब्रिजही खेळलेलो आहोत. सर अतिशय सुस्वभावी, सद्गुणी, सत्शील, मृदूभाषी, बुद्धिमान, सामाजिक भान असलेले, निर्मळ, विनम्र आणि गप्पांत रमणारे जगन्मित्र होते. माझ्या नवऱ्याचे तसेच माझ्या सर्व भावांचे आणि सरांचे अनेक वर्षांपासूनचे अतिशय मैत्रीपूर्ण संबंध असल्याने काही कौटुंबिक कार्यक्रमांमधेही अधून-मधून आमची भेट व्हायची. कधीही आणि कुठेही भेट झाली की सर अगदी निखळ हासत, नर्म विनोद आणि चेष्टा करत बोलायचे. त्यांच्यासारखा मोठा माणूस आपल्याशी इतके मोकळेपणाने बोलतो, हे बघून सुखावायला व्हायचे.
काही महिन्यांपूर्वी अगदी अचानकच त्यांचा मला फोन आला. फोनवर मला म्हणाले, "तुझा सल्ला घ्यायला फोन केला आहे." ते ऐकून मला आश्चर्याचा धक्काच बसला. सरांसारख्या इतक्या मोठ्या आणि यशस्वी व्यक्तीला माझ्याकडून काय सल्ला हवा असेल? असा प्रश्न मला पडला. माझी दोन्ही मुले बारावीनंतर अमेरिकेतील विद्यापीठामधे शिकलेली आहेत. सरांच्या नातवाला मेडिकलच्या शिक्षणासाठी अमेरिकेला पाठवण्याचा निर्णय ते घेऊ इच्छित घेत असावेत, असे त्यांच्या बोलण्यातून मला जाणवले. नातवाला अमेरिकेला पाठवायचे झाल्यास काय आणि कशी तयारी करावी, कुठल्या विद्यापीठांसाठी प्रयत्न करावेत, याबाबत त्यांना माझा सल्ला हवा होता. एमबीबीएस करण्यासाठी अमेरिकेत न पाठवता एमबीबीएसनंतरच्या उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला पाठवण्यास हरकत नाही, असे माझे मत मी त्यांना सांगितले. माझा सल्ला आणि त्यामागची कारणमीमांसा ऐकताना एखाद्या अतिसामान्य व्यक्तीने जितक्या शांतपणे ऐकावे, तसेच सर ऐकत होते. आमच्या संभाषणादरम्यान त्यांच्या मोठेपणाचा लवलेशही मला कुठे जाणवला नाही. त्यानंतर मात्र कधीच आमची भेट किंवा बोलणे होऊ शकले नाही.
अचानक मागच्या आठवड्यात, १८ एप्रिलला सरांच्या दुर्दैवी अंताची बातमी आली. डोकं सुन्न होऊन माझ्या डोळ्यातून घळाघळा पाणीच वाहू लागले. पहिले दोन-तीन दिवस तर मला नीटशी झोपही लागू शकली नाही. सरांची आठवण झाली की मनामधे एक प्रकारची वेदना उमटते. माणसांमधे रमणारे, सर्व नातेसंबंध जपणारे असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. त्यामुळे शिरीषसरांना जवळून ओळखत असलेल्या प्रत्येक व्यक्तीची माझ्यासारखीच अवस्था झालेली असणार यात मला शंका नाही. गेल्या काही दिवसांत आलेल्या बातम्यांवरून असे लक्षात येते आहे की सरांनी पूर्ण विचारांती आत्महत्येचा निर्णय घेतला असावा. त्यामुळे माझ्या मनात राहून-राहून एकच प्रश्न येतो. इतका टोकाचा निर्णय घेण्याआधी सरांनी एखादे सेकंड ओपिनियन का घेतले नाही ? असे असेल का, की यशाच्या इतक्या उत्तुंग शिखरावर पोहोचलेल्या व्यक्तीला आपले मन मोकळे करायला कोणीच नसते? Is it so lonely at the top?
जे झाले ते अतिशय वेदनादायक आहे. सरांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबियांचे नुकसान तर झाले आहेच, पण संपूर्ण समाजाचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे.
सरांच्या आप्तस्वकीयांच्या दुःखात मीही सहभागी आहे. शिरीषसरांच्या आत्म्याला शांती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना !
डॉक्टर स्वाती बापट, MBBS , MD (Pediatrics)
बालरोगतज्ज्ञ , पुणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा